Friday, December 28, 2007

प्राक्तन आणि चिल पिल

आमच्या चाळीत सध्या एक नवं खूळ आलंय. सकाळी काही ना काहीतरी व्यायाम करायचा. म्हणजे तसं हे सुरू होऊन तीन चार आठवडे झालेत पण किती दिवस टिकेल काय सांगा म्हणून आधी लिहिलं नाही.


आमच्या घरातल्या चक्क चारही लोकांनी भाग घ्यायचा ठरवला. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या आठवड्यात बरेच आरंभशूर including विन्या बाद झालेले आहेत. आई घरच्या कामापुढे वेळ काढू शकत नाहीये आणि ते काम करतानच तिचा भरपूर व्यायाम होत असल्याने तिला फिरायला वगैरे जाण्याची गरज नाही हे तिला लक्षात आलंय. त्यामुळे राहता राहिले दोघं रिकामटेकडे सकळीक, जेपी (बाबा) आणि मी.


बरोब्बर सहा वाजता जेपी मला गदागदा हलवून घराबाहेर पडतात. त्या भूकंपसदृष्य अनुभवामुले मला उठावंच लागतं. मी साडेसाहाला बाहेर पडते. मग ते चर्चगेटला बसलेले असतात मी पॉइंटापर्यंत जाऊन येईपर्यंत बसतात आणि मग आम्ही एकत्र घरी.


जेपींचे बरेच मित्र आहेत तिथे. त्यांना उगीचंच माझी वाट पाहत बसायला लागतं. म्हणून हल्ली आम्ही वेगवेगळे येतो. त्याहीपेक्षा मला एक माझा ग्रूप मिळालाय. चार आजोबा आणि दोन आजी आणि मी. पॉइंटाला बसतात ते बऱ्याच वेळा. पाच दिवस रोज बघून हसायला लागले. सहाव्या दिवशी चक्क मला त्यांनी जिलबी खायला बोलावलं. बरोबर ओळखलंत. गुज्जूच. पण सगळे नाहीत दोन मराठी आजोबा आहेत. आणि जिलबी म्हणजे माझा weak point मग काय झाली दोस्ती


मस्त वाटतं त्यांना भेटून. आपलं बघा एक विश्व असतं. त्याला आपण चौकटी पाडून घेतो. विटांच्या भिंती बांधतो म्हणजे बाहेरचं काही दिसत नाही. कधी काही लोकं काचेच्या भिंती लावतात. पण डोळ्याला पट्टी बांधून घेतात. मलाही तसंच वाटलं त्यांच्याकडे बघून. आपण फार फार स्वयंकेंद्रीत वगैरे झालोय असं वाटायला लागलं मला. कामात बिझी असलेली मुलं, सुना, नातवंडं, आपल्या संसारात रमलेल्या मुली ह्यांना वेळ कुठाय ह्या जुन्या खोडांकडे बघायला? प्रत्येकाची काही व्यथा आहे. पण जिलबीच्या बकाण्यात दडपून टाकतात. मीही असं करेन का? म्हणजे जेपी, आई, लग्न झाल्यावर सगळ्यांना विसरेन का? माझ्याच जगण्यात मश्गुल होऊन जाईन मी?

बाबांना विचारलं, म्हटलं, बाबा तुम्हाला असं वाटतं का की नवी पिढी जुन्या पिढीकडे लक्ष देत नाही वगैरे. ते म्हणाले प्राक्तन आहे. तुम्ही आणि आम्ही वेगळे आहोत. वयाचा फरक आहे. वयामुळे विचारांत फरक आहे. माझ्या आणि माझ्या वडिलांच्यातही होता, त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्याही होता तेव्हा कदाचित त्यांनाही वाटलं असेल नवी पिढी नालायक आहे म्हणून. ते त्याचं प्राक्तन. आता हे आमचं प्राक्तन आणि वाईट वाटून घेऊ नकोस कराण उद्या असंच तुमचंही प्राक्तन असेल काहीतरी. मग काय करणार? त्याची सल मनात ठेऊन जगणार का आनंदाने जगणार?

सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणी म्हणत?


मला ते बोलले ते फरसं काही कळलं नाही पण शेवटचा प्रश्न कळला.

मी लगेच उत्तर दिलं गाणी म्हणंत. मग म्हणाले चल एक छानसं गाणं म्हणून दाखव. मग त्यांचं आवडतं उगवला चंद्र पुनवेचा म्हटलं.

पटलं. गाणी म्हणंतच जगायला हवं.

मग आईला विचारलं. आई म्हणाली, एकदम बरोबर आहे. हल्लीच्या पिढीला मोठ्यांबद्दल काही आदरंच राहीलेला नाही. आम्ही सांगतो ते तुमच्या भल्यासाठीच ना? तरीही तुम्ही काहीही ऐकत नाही. गाडी आता मी तिच्या, मी लग्न करण्याच्या, आग्रहाला दाखवलेल्या कात्रजच्या घाटाच्या अंगाने जातेय हे बघून मी तो विषय आवरता घेतला.

विन्याला पण विचारलं. विन्या म्हणाला ताई टेक अ चिल पिल. तुला हे काय झालंय? आर यू ओके?

उद्या आमच्या नाना नानी ग्रूपला हा प्रश्न विचारते.

Thursday, December 13, 2007

१२ डिसेंबर आणि मी

काही तारखा मनाच्या कॅलेंडरमध्ये नेहेमीच मार्क केलेल्या असतात. तशीच ही तारीख १२ डिसेंबर. वाढदिवस लक्षात न राहण्याचा अवगूण माझ्यात ठासून भरलेला आहे. विनूचा लक्षात आहे. आई बाबांचा आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस एकाच महिन्यात असल्याने नेहेमी थोडा गोंधळ उडतो. बाकी मैत्रीणींचे वाढदिवस मी नेहेमी विसरते. पण १२ डिसेंबर नाही.

खरंतर माझ्या जगात ह्या दिवसाला आता काहीच महत्त्व नाही. फार फारतर एखादा इ-मेल किंवा ऑर्कूट्वर स्क्रॅप बस. पण कधीतरी महत्त्व होतं. कधी म्हणजे? फार फार पूर्वी. जेव्हा मी शाळेत होते तेव्हा.


आठवीत किंवा नववीत असेन तेव्हा. ते वय विचित्रच असतं ना? म्हणजे आपण मोठ्या तर झालेल्या नसतो, पण मोठं झाल्यासारखं वाटत असतं. पौगंडावस्था. माझी आजीच्या शब्दकोषात ह्याला एक चांगला शब्द होता. अशा मुलांना ती "आडबाप्या" म्हणायची. पण मुलींना? मी विचारलं होतं तिला ती म्हणाली, माहीत नाही, पण आडबाई म्हणायला हरकत नाही. तस असं हे आड whatever वय.


परिकथेतल्या स्वप्नांना शक्यतेचे कोंब फुटायला लागलेले असतात. प्रेम, प्रेम जे काय म्हणतात ते एकदा चाखून पाहायचं असतं. उत्सुकता असते, दडपण पण असतं. मी अनुभवलंय. म्हणजे कुणावर प्रेम वगैरे बसण्याचे ते दिवस नसतातंच. कारण आपल्य स्वतःच्या आवडी निवडीच आपल्याला नक्की माहीत नसतात. पण प्रेमात पडणं मात्र अनुभवायचं असतं. अशा नेमक्या वेळी आपल्याला तो दिसतो.


आता एका शाळेत म्हणजे लहानपणापासूनच त्याला बघितलेलं असतं. पण आता जसा तो उलगडतो तसा पूर्वी कधी उलगडलेला नसतो. त्याचा तो चष्मा, गोड स्माईल वगैरे सगळं दिसायला लागलेलं असतं. तसा तो हुषार असतोच. खेळात अगदीच आघाडीवर नसला तरी बिघाडीवरही नसतो. हळुहळू तो आवडायला लागतो. अं हं. तो आवडण्यापेक्षा त्याच्या प्रेमात पडण्याची कल्पना आवडायला लागते.


मनातली ही कल्पना कोणत्यातरी बेसावध क्षणी शब्दात उतरते. नाही. अजून त्याला सांगायचं धैर्य झालेलं नसतं. पण हे आपलं गुपित अलगद मैत्रिणींना समजतं. मग सुरू होते चिडवा चिडवी. लटका राग.
कसा कोण जाणे मग त्याला ह्या गोष्टीचा वास लागतो. मग तोही प्रेमात पडतो, प्रेमात पडण्याच्या संकल्पनेच्या. दिवस जातात आठवडे जातात. महिने जातात. कधीतरी शाळेची पिकनिक निघते. गाण्याच्या भेंड्या सुरू होतात. मैत्रिणी तिला आणि मित्र त्याला चिडवत राहतात.


शेवटी तो तिला प्रपोज करतो. आता शब्द आठवत नाहीत पण ती हो म्हणतंच नाही. फक्त हसते. हो कसं म्हणायचं हेसुद्धा तिला माहित नसतं. कोणी तरी आपल्या प्रेमात पडलंय ही किती सुखावणारी भावाना आहे हे तेव्हा कळतं.


आणि हे प्रेमप्रेकरण तिथेच संपतं. कारण त्यात पुढे काही होण्यासारखं नसतंच मुळी. शाळा संपते, दोघांचं कॉलेज वेगवेगळं असतं. विश्व विस्तारतात आणि जुनी विश्व अवास्तव, खुजी वाटायला लागतात. ह्या विश्वातून त्या विश्वात जाताना होणाऱ्या गदारोळात ही प्रेमात पडल्याची भावना विरून जाते.


आता तो कधी कधी तिला मेल करतो. ती त्याला उत्तर देते. वाढदिवस, त्याचा आणि त्याच्या लग्नाचा, ती विश करते. अर्थात लग्नाचा वाढदिवस आता लक्षात राहत नाही पण वाढदिवस मात्र राहतो.
कारण त्या मंतरलेल्या दिवसात त्याच्या वाढदिवसाला कधीतरी तिने स्वतःच्या हाताने काढलेलं स्केच दिलेलं असतं कुठल्याश्या हिंदी चित्रपटाच्या कॅसेटवरच्या चित्राचं. अर्थात तो चित्रपट म्हणजे प्रेमकथा असते.


ती तो चित्रपट आणि ते स्केच दोन्हीही विसरलेली असते. त्याच्याकडे अजूनही ते जपून ठेवलेलं असावं असं मात्र तिला का कोण जाणे वाटत राहतं. फक्त तो दिवस तिच्या लक्षात राहतो १२ डिसेंबर.


तसाच हा दिवस माझ्याही लक्षात राहिला. १२ डिसेंबर. आठवून वाटतं. किती वेडी होते मी तेव्हा. नाही. हा सगळा वयाचा परिणाम. पण जे काही घडलं ते मी मनापासून एन्जॉय केलं. ते महत्त्वाचं. पात्र कोण होती हे महत्त्वाचं नाही. अनुभव महत्त्वाचा.

कधी कधी वाटतं, काहीच जरी कळत नसलं तरी त्या दिवसातलं प्रेम किंवा क्रश किंवा whatever खरा असावा, कारण त्याला मोजमापं नसतात. पगाराची, उंचीची, जातीची, वयाची, शरीराची. कदाचित तेच खरं असेल. कुणी सांगावं?

Thursday, December 6, 2007

मी, नाटक आणि ती

गेल्या आठवड्यात आमच्या नाटकाबद्दल काही लिहिता आलं नाही, आणि ह्या आठवड्यात लिहिण्यासारखं काही विशेष घडलं नाही, म्हणून आता नाटकाबद्दलंच लिहिते.


ह्या महिन्याची एकांकिका बरी झाली. म्हणजे तशी चांगलीच झाली, पण "आपली आपण करी जो स्तुती तो सर्व जगी मूर्ख मानावा" असं कोणीतरी, बहुतेक रामदासांनी, म्हटलेलं आहे, म्हणून एकांकिका बरी झाली असं म्हणायचं. तसं रामदासांचं सगळंच मला पटत नाही. ते "टवाळा आवडे विनोद" म्हणतात. म्हणजे सगळे मराठी नाटकवाले आणि त्यांचे प्रेक्षक टवाळंच झाले की हो. असो, तर आमची एकांकिका बरी झाली.


माझा रोल तसा वेगळा नव्हता. म्हणजे रोल चांगला होता. पण तो माझ्यासारखाच होता. म्हणजे माझ्याच वयाची मुलगी, प्रेमात पडते वगैरे वगैरे. त्याच्यामुळे कमी मेहेनत घ्यावी लागली. अर्थात, कामच्या व्यापामुळे ते माझ्या पथ्यावरंच पडलं. शंभरात पंच्याण्ण्व वेळा असतं तसं हे नाटकही पुरुषप्रधानच होतं. म्हणजे जे काही नाट्य बिट्य घडू शकतं ते पुरुषांच्या बाबतीतच घडू शकतं. स्त्रीया फक्त मम म्हणायला. असं काहीसं. बहुदा नाटकात, विषेशतः एकांकिकांमध्ये स्त्री लेखकांची, किंवा लेखकांची वानवा आहे. दिग्दर्शनातही तेच. त्यामुळे असेल, पण अशीच परिस्थिती आहे.


असो मेली, सांगायचा मुद्दा काय तर साधा रोल होता, करायला मजा आली. जबाबदारी कमी, गंमत जास्त. दिरेक्टरच्या शिव्या कमी, ओव्या जास्त.


एक मी असते, माझ्यासारखीच, तिला एक तो भेटतो, काजूवडीसारखा (संदर्भ न लागल्यास मागचे ब्लॉग वाचणे). त्याला मी आवडते, मला तो आवडतो आणि आम्ही प्रेमात पडतो.


जे माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात घडायला पाहिजे ते सगळं नाटकात घडतं. शेवटी नाटक इज अ फॅन्टसी. मग मी माझी फॅन्टसी नाटकातच जगून घेते. तीच होऊन जाते. समोरचा मुलगा समोरचा राहतच नाही. तो माझा काजूवडी होतो. प्रत्यक्षातल्या उर्मी रेषा बनून चेहेऱ्यावर उमटतात. उमटलेल्या रेषा प्रेक्षकांना त्यांच्या उर्मींची जाणीव करून देतात. कधी प्रकट झालेल्या, कधी प्रकट न झालेल्या आणि नाटक प्रेक्षकांना भावतं. everyone lives their fantacy, मी, तो आणि प्रेक्षक सुद्धा. तेव्हा नाटक चांगलं होतं. भावतं.


आणि माझ्यासाठी नाटक म्हणजे त्याहीपेक्षा काही जास्त आहे. कल्पना करा. अर्ध्या पाऊण तासासाठी का होईना, आपण स्वतःला विसरायचं. स्वतःची नोकरी, कुटुंब, मुलं, समस्या, राग, लोभ, अहंकार सगळं विसरायचं. आणि जो रोल करायचा असेल ती व्यक्ती व्हायचं. राणी, भिकारीण, बायको, मुलगी, वेष्या काहीही. मग माझे विचार, माझं व्यक्तिमत्त्व, माझ्यावर झालेले संस्कार हे सगळं सोडून मला त्या व्यक्तीसारखं वागणं भाग होतं. परकाया प्रवेश वगैरे जे म्हणतात ना तसं काहीसं. Getting into shoes of someone else.


मग बाकीच्या जगाचं अस्तित्व पुसलं जातं. समोरचा अंधार, डोक्यावरचे लाईटस आणि आपण. मध्येच प्रेक्षकांतून येणारी हास्याची लकेर किंवा कान फुटतील इतकी जाणवणारी निःशब्द शांतता. ह्यांचंच एक वेगळं विश्व. एक फॅन्टसी, एक नाटक, एक आयुष्य. पार्श्वसंगीत, पार्श्वसंगीत नव्हे, माझ्या भावना, डोळ्यातून ओघळणाऱ्या, रडणाऱ्या, भेकणाऱ्या, हसणाऱ्या, वेडावणाऱ्या, धुंद आणि मी नव्हे, ती, जीचा रोल मी करतेय.


नाही ना काही कळलं? त्या जाणीवा व्यक्त करण्यासारख्या नाहीतच मुळी. किंवा त्या व्यक्त करण्याईतकी माझी भाषा संपन्न नाहीये. शेवटी काय भा.पो. ना? (भा.पो. म्हणजे भावना पोहोचल्या), मग ठीक.