Showing posts with label अर्धविराम. Show all posts
Showing posts with label अर्धविराम. Show all posts

Thursday, April 24, 2008

आजी आणि अर्धविराम

परवाच आजीकडे गेले होते. आजी म्हणजे माझी एकदम मैत्रीणच आहे. चक्क ऑफिसला दांडी मारली आणि तिकडे गेले. तसंही ऑफिसमध्ये काम कमी झालंय. रजा फुकट जायची ती घेऊन टाकली. खूप गप्पा मारल्या. ती म्हणाली दमतेस किती? सतत इकडे तिकडे धावत असतेस? म्हटलं आजी, त्यातच मजा असते. घरी बसून काय करायचं? नुसतं बसून वेळ फुकट जातो काहीतरी करत राहिलं की वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान मिळतं.

तशी ती मला तिच्या आईची गोष्ट सांगायला लागली. तिची आई म्हणजे माझी पणजी. मी तिला फार पाहिलं नाही, पण तिची मला भीतीच जास्त वाटली होती. कारण मी होते तीन-चार वर्षांची आणि ती नव्वदीतली. आलवण नेसायची ती. बहुतेक आलवणंच म्हणतात त्याला. म्हणजे कोंकणातल्या विधवा बायका पूर्वी घालायच्या ना, तो साडीचा प्रकार. डोकं सतत झाकलेलं. त्या साडीचा तो विचित्र रंग. ती आली की रडायलाच लागायचे मी. तिची गोष्ट.

अगदी शंभर वर्षाची झाली तरी एकटी राहायची कोंकणातल्या तिच्या घरात. एवढं मोठं ते घर. लाकडी होतं. माडीवर चालायला लागलं की करकर वाजायची ती लाकडं. घरासमोरच एक दोणी होती. दोणी म्हणजे एकदम छोटासा हौद. मी तीन-चार वर्षाची असतानापण पुरती बुडायचे नाही इतका छोटा. आणि त्या दोणीवर नेहमी एक भला थोरला बेडूक यायचा. त्याची मात्र भीती वाटायची नाही. बेडूक आला की मी तिकडे धावायची आणि आई मागेमागे. अर्थात मला त्या बेडकाबद्दल कितीही प्रेम असलं तरी मला बघून तो पळूनच जायचा.

घरामागेच एक टेकडी होती. मामा तिथे मला फिरायला घेऊन जायचा. माझा मामा एवढा उंच. त्याच्यापुढे तर मी एकदमच छोटी दिसायचे. लाल तपकिरी माती असावी बहुतेक तिथे. नीटसं आठवत नाही, पण खूप मस्त जागा होती ती. कधी बंदरावर घेऊन जायचा. तिथला मासळीचा वास बिलकुल आवडायचा नाही मला. किती छोट्या छोट्या गोष्टी आणि इतक्या वर्षांपूर्वीच्या कुठे रेकॉर्ड होऊन जातात डोक्यात कुणास ठाऊक? पणजी आजीची गोष्ट सांगता सांगता कुठे येऊन पोचले.?

तर अशी आमची ही पणजी आजी. तिला स्वस्थ बसवत नसे. सतत काहीनं काहीतरी करत राहायचं. विश्रांती माहीतच नाही. आणि पूर्वी कामंपण जास्त असतील, जात्यावर पीठ दळण्यापासून ते जमीन सारवणे, लिंपणे सगळं सगळं एकटीच करायची, अगदी शेवटपर्यंत. कुणी तिला सांगितलं की आजी थोडा आराम कर, तर ऐकायची नाही. शेवटी शेवटी तिला अल्झायमर झाला होता. जुनं आठवायचं, नवं आठवायचं नाही. आजीला पण ओळखायची नाही बऱ्याच वेळा. तेव्हा सतत म्हणत राहायची ती. जरा पाच मिनिटं आडवी होते. मुलांचं करता करता, घरातल्यांचं करता करता, बाहेरच्यांचं सांभाळता सांभाळता, शांत बसायचं राहूनच गेलं तिचं. ते असं शेवटच्या दिवसात बाहेर आलं. म्हणायची मला कुणी पाच मिनिटं स्वस्थ बसू देत नाही.


मला एवढं वाईट वाटलं हे ऐकून. कधी कधी काही लोकं आपल्या दृष्टीने अस्तित्वातच नसतात. मला एकदम वॉटर पिक्चरमधली ती आजीबाई आठवून गेली. तिला लाडू खायचा असतो पण तिला शेवटपर्यंत तो मिळत नाही. त्यासाठीच ती जगत असते आणि लाडूचा एक घास गिळल्यावर सुखाने मरते. तसं काहीसं, खूप आत आत धक्का देणारं.


आजी म्हणाली, ऐक माझं. आता थोडे दिवस सगळं बंद कर, विश्रांती घे. शरीर दमतंच. आपण समजावत राहतो स्वतःला की मी दमत नाही. माझी शक्ती अफाट आहे म्हणून. ताबडवत राहतो आपल्याच शरीराला. तसं करू नकोस. म्हणाली एक अर्धविराम घे. मॅट्रिकसुद्धा न झालेली माझी आजी. कसे चपखल शब्द वापरते. अर्धविराम. कुणी शिकवलं असेल तिला?


म्हणूनच, सगळ्या आवांतर ऍक्टिव्हीटीज काही दिवस बंद करायचं ठरवलंय. ह्या महिन्याच्या नाटकात मी म्युसिक करणार होते. त्यांनाही नाही सांगून टाकल. हा ब्लॉगही अवांतरच नाही का? मग इथेही एक पॉज घ्यायचं ठरवलंय. किती शक्य होतं ते माहीत नाही. पण प्रयत्न करून बघेन. इथे लिहिण्याचं व्यसनच लागलंय मला. पण तरीही. त्यामुळे पुढची भेट कदाचित मी पुण्याला गेल्यावरच होईल. कदाचित नाहीही. कारण तिथे काँप्युटर नाहीच आहे. ऑफिसमध्ये आहे, पण तिथे मराठी लिहिता येईल असं नाही. नव्या ऑफिसमध्ये सुरवातीला का होईना काम करण्याचं सोंग घ्यावं लागेल. त्यामुळे तसंही जमेलसं वाटत नाही. त्यामुळे माझा हा अर्धविराम.

पुन्हा भेटूच;

कधीतरी.