Thursday, April 28, 2011

देवयानी (8)

आयुष्य थोडं सोपं झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. ती पण एक गंमतच आहे. म्हणजे गोष्टी सोप्या होतायत असं वाटायला लागलं की काही ना काही कारणाने काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतातच. असो, पण नव्या ऑफिसातले ते दिवस मात्र खूपच मजेत गेले. ऑफिसात तोरा मिरवायला मिळायचा. वर समोर जे दिसत होतं ते निर्माण करण्यात खारीचा वाटा का होईना आपला आहे हे पाहून अभिमान वाटत होता.

तीन क्लायंट आणि एकशेपन्नासचा हेडकाउंट झाल्यावर सहाजिकंच मार्केटमध्ये आमचं वजनही वाढलं. आतापर्यंत आम्ही कामं हुंगत फिरत होतो, अता कधीमधी एखाद्या कस्टमरची एंक्वायरी स्वतःहून यायला लागली. कंपनीचं काम वाढत होतं तसं माझंही काम वाढत होतं. दौरे वाढत होते. ह्या दरम्यान कधी मिळणार नाही इतकं फिरायला मिळालं. अगदी गल्फ, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, सगळीकडे फिरून आले. कामाची गडबड असायची पण तरीही वेळ काढून आणि मुख्य म्हणजे खिशात खुळखुळत असलेले स्वतःचे पैसे खर्च करून आजूबाजूची ठिकाणं पाहून आले.

प्रवासात आणखी एक छान गोष्ट होते, ती म्हणजे आपल्याला स्वतःला स्वतःचा असा वेळ मिळतो. आणि मला विचार करायला खूप आवडतं. एकंदरित आयुष्याबद्दल विचार करण्यात मी माझे बरेचसे प्रवास खर्च केले आहेत. पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या सांनिध्यात घालवलेली संध्याकाळ अगदी मला ताजमहालाची आठवण आणून गेली. आल्प्सची शिखरं कुठेतरी आपल्या धरमशालाची आठवण करून गेली. ह्या सगळ्या गोष्टी पाहताना मनात विचारांचं काहूर उडतं. मला थोडंसं फिलॉसॉफिकल पण व्हायला होतं. का आपण हे सगळं करत असतो? का जीवाच्या आकांताने आल्या दिवसाशी भांडत असतो? का शक्य नसतं आपल्याला त्या दिवसाच्या कुशीत विसावून आयुष्य सुखाने घालवणं?

असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत राहणे. शिवाय पर्सनल फ्रंटवरही बऱ्याच गोष्टी घडत होत्या. आई बाबांचा लग्नासाठी तगादा लागलेला होता. मला तर लग्न करायचं नव्हतंच तेव्हा. करिअर ऐन भरात आलेलं होतं. आकाशाला गवसणी घालण्याची मनिषा होती. आणि लग्न लग्न तरी का करतात लोकं? मला तर वाटतं marraige is easiest way of insuring your life. प्रचंड इनसेक्युरिटी हे लग्न करण्याचं आणि लग्न न करण्याचंही महत्त्वाचं कारण आहे असं मला नेहमी वाटतं.

माझ्या ट्रीप्सच्या विचार करता करता मीही फिलॉसॉफिकल झाले. असो, तर आयुष्य असं छान चाललेलं होतं, आधी लिहिल्याप्रमाणे गोष्टी सोप्या होतायत असं वाटायला लागलं होतं. मी बांद्र्यात स्वतःचा फ्लॅट भाड्यानी घेणार होते. छोटंसं एक माझं घर करायचं होतं, एकटीचं का असेना पण माझं असणार होतं ते. घरापासून दूर जायचं हे तर मी ठरवलेलंच होतं, फक्त नोकरी मुंबईतच असल्याने ते कठीण झालेलं होतं. पण आता मात्र मला बाहेर पडायचंच होतं. जागा पाहून आले आणि नक्की करणार इतक्यात काकांनी आणखी एक धक्का दिला.

आमची कंपनी टेक ओव्हर करण्याची एक ऑफर आली. i must admit it was too good to be true at that time. इन्व्हेस्टर्सनि मिळून ठरवलं की कंपनी विकायची. आणि पुन्हा एकदा सोप्या होऊ घातलेल्या आयुष्यात एक ट्विस्ट आला. ही कंपनी खूपंच मोठी होती. आमची दीडशे लोकं म्हणजे किस झाडकी पत्ती होती त्यांच्यापुढे.

मला अजूनही आठवतंय मराठे काकांनी मला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि ही बातमी सांगितली. ऑफर ऐकून मला धक्काच बसला. खरं सांगायचं तर मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. पण मग अचानक पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाला. मी काकांना सांगितलं की मला त्यांच्याबरोबरंच काम करायचं आहे आणि त्यांचा जो काही नवा प्रोजेक्ट असेल त्यात मी त्यांच्याबरोबर काम करीन.

पुढे घडलं मात्र वेगळंच.

- देवयानी (8)

Wednesday, April 27, 2011

देवयानी (7)

कोणत्याही छोट्या संस्थेचा होतो तसा आमच्याही कंपनीचा प्रवास चालू होता. मागे लिहिल्याप्रमाणे अपयशही पदरी पडत होतं. कधी यश थोडक्यात हुलकावणी देऊन जात होतं. नाही म्हणायला दोन पेइंग कस्टमर होते, पन्नासाच्या आसपास माणसं होती, पण धंदा वाढवण्यात मात्र म्हणावं तसं यश येत नव्हतं. कुठेतरी माझ्या मनाला हे खुपत होतं. काकांनी आपल्यावर जो विश्वास टाकला तो आपण सार्थ करू शकत नाही अशी भावना मनात निर्माण होऊ लागली, त्यातून नैराश्यही यायला लागलं.

मागे वळून बघताना मला नेहमी वाटतं, की काकांना तेव्हा एकंदरीत परिस्थितीचं किती टेन्शन येत असेल. पण त्यांनी कधीही ते आम्हा कुणाच्याच डोक्यावर लादलं नाही. कधी कधी माझ्या मनात काय चाललंय ह्याची त्यांना कल्पना यायची मग ते उगीचच मला जिमखन्यावर बोलवत रविवारी. डोसा आणि कॉफी झाली की मग नकळत मला उपदेश करीत. जे लोकं सेल्स मध्ये आहेत त्यांना कल्पना असेल की मार्केटिंगमध्ये असणं ह्याबरोबर मानसिक चढ उतार, ज्यांना आपण अप्स अँड डाउन्स म्हणतो, ते फारंच असतात. एखादा कमावलेला प्रॉजेक्ट तुम्हाला टॉप ऑफ द वर्ल्ड फिलींग देतो तर एखादा गमावलेला प्रोजेक्ट एक प्रचंड लो देऊन जातो. त्यात स्त्री असण्याचा भाग म्हणून जे मानसिक चढ उतार होत असतात ते वेगळे. ह्या दोघांचं काँबिनेशन अतिशय लिथल आहे.

अर्थात मी त्यावेळी नवखी होते, त्यामुळे ते जास्त जाणवे. आताशा स्विच ऑन आणि ऑफ करायची कला हळू हळू जमू लागली आहे. ऑफिसात नसताना ऑफिसचा विचार कटाक्षानं करायचा टाळते. नेहमीच जमतं असं नाही, पण शक्य तितका प्रयत्न करते. पण हल्ली मोबाइल्स, मोबाइल इंटरनेट ह्यामुळे सर्वांचीच प्रायव्हसी थोडी कमी होत चालली आहे. आणि त्यात तूम्ही विकत असाल तर कस्टमर हा तुमचा मायबाप असल्याने, वेळ काळाचं बंधन थोडसं सैल पडतंच.

असो, मी सांगत वेगळंच होते आणि विषयांतरंच खूप झालं. हं, तर असा आमचा प्रवास रडत खडत चाललेला होता. प्रॉस्पेक्टस खूप होते पण त्यांचं रोख पैशात रुपांतर होत नव्हतं. इन्व्हेस्टर्सही रेस्टलेस व्हायला लागलेले होते. करो वा मरो अशी परिस्थिती निर्माण होणार होती तितक्यात युके चं एक प्रपोसल आलं. पुन्हा दिवस रात्री एकत्र करून चांगलं प्रेसेंटेशन बनवलं. मीच बोलणार होते, पण यावेळी काकांनी सोबत यायचं ठरवलं. त्यात काकांचा एक शाळेतला मित्र ह्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. प्रेसेंटेशन चांगलं झालं, आम्ही आमचं काम केलंच पण काकांच्या मित्रानेही केलं आणि हो नाही करता करता नेगोशिएटिंग टेबलवर आम्हाला ते कॉंट्रॅक्ट मिळालं.

खूपंच सुंदर अनुभव होता तो. वाटाघाटी करणे म्हणजे एक कला आहे. मुळातंच वाटाघाटी ह्या अविश्वासावर चालतात. विकत घेणाऱ्याचा विकणाऱ्यावर कधीच विश्वास नसतो. ही आपल्याला गंडवायलाच बसली आहे ह्या विश्वासानेच तो समोर बसतो. मग त्याचं मन वळवणं. आमच्या बरोबर बिझनेस केल्याने त्याला कसा फायदा होईल हे त्याच्या कानी कपाळी ओरडून सांगणं आणि शेवटी भाजी मंडईत होते अक्षरशः तशी घासाघीस करून किंमत ठरवणं. काका मला एक गोष्ट नेहमी सांगत आणि ती अतिशय योग्यच आहे. लोखंड तापलेलं असताना घाव घालायला लागतो. जर सेल होण्याची शक्यता असेल तर त्या क्षणी काहीही करून तो पदरात पाडून घ्यायचा. उद्या, परवावर ढकलायचं नाही, नाहीतर कस्टमर विचार बदलण्याची शक्यता जास्त असते.

हं. पुन्हा विषयांतर झालं. तर हे कॉंट्रॅक्ट आम्हाला मिळालं आणि पुढच्या तीन महिन्यात पन्नासचे दीडशे लोकं झाले. आमचं ऑफिस शिफ्ट करावं लागलं. पहिल्या जागेत तर मी आणि काका कसे बसे मावायचो, दुसऱ्या ठिकाणी चाळीसची जागा होती त्यात पन्नास कोंबलेले होते. पण आता मात्र मोठं ऑफिस जरूरीचं होतं. बांद्रा कुर्ला काँप्लेक्समध्ये आम्ही जागा बघून आलो. एकदम पॉश ऑफिस होतं. चकचकीत. एकदम कॉर्पोरेट. अगदी माझ्या जुन्या कॉल सेंटरपेक्षाही चांगलं. आम्ही तिथे शिफ्ट झालो आणि काकांनी मला आणखी एक सरप्राइज दिलं. he offered me an office.

आपल्या देशी भाषेत बोलायचं झालं तर मला माझ्या आयुष्यातलं पहिलं (आणि शेवटचं ) केबिन मिळालं. सॉलिड वाटलं तेव्हा. एकदम माज केला मी काही दिवस. म्हणजे असा स्वतःचा खूप अभिमान वगैरे वाटायचा आणि आपण जरा इतरांपेक्षा वेगळे किंवा वरचढ (दोन्हीही चुकीचे समज) आहोत असं वाटायचं. आपल्याला कुणी भेटायला आलं तर

पण ते केबीन एंजॉय करणं माझ्या नशीबात फारसं नव्हतंच.

- देवयानी (7)

Friday, April 22, 2011

देवयानी (6)

आत्मविश्वास.

होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारी गोष्ट आहे ही. मला नेहमी वाटतं की माझ्यात आत्मविश्वास थोडा कमीच आहे. कोणत्याही बाबतीत, म्हणजे अगदी शॉपिंगला गेलेलं असताना बार्गेनिंग करताना पण मला आत्मविश्वास वाटत नाही. कॉर्पोरेट जग तर दूरचीच बाब राहिली. ह्या सगळ्याचं मूळ कुठेतरी माझ्या कॉलेज आयुष्यामध्येच आहे. वाहवत जाणं, हा कमी किंवा अतिआत्मविश्वास ह्या दोघांचं लक्षण असू शकतं. कमी हे माझ्या बाबतीत खरं होतं, पण का कोण जाणे जगासमोर मी एक अल्ट्रा कॉंफिडंट मुलगी म्हणूनच वावरले, वावरते.

आणि आमच्या पहिल्या क्लायंट सक्सेसनं तर माझा आत्मविश्वास चांगलाच वाढवला. मराठे काकांनी एक मात्र केलं. त्यांनी मला जमिनीवर आणायची एकही संधी सोडली नाही. नुकत्याच पंख मारायला लागलेल्या पक्षाच्या पिलानं जशी थोडी थोडी झेप घ्यायची असते, तशी थोडी थोडीच झेप त्यांनी मला घेऊ दिली. म्हणून तोंडघाशी पडायला नाही झालं. पुढे पुढे सगळीच प्रेसेंटेशन्स मी करायला लागले.

ह्या काळातला सर्वात मोठा माझ्यासाठीचा हायलाइट म्हणजे अमेरिकेला जायला मिळणं. हल्ली त्यात काही मोठ्ठं राहिलेलं नाहीये. पण त्या वेळी अमेरिकेला जायचा एक वेगळाच माज होता. आमच्या पहिल्या क्लायंटनेच अजून काही सर्व्हिसे आउटसोर्स करण्याची RFP काढलेली होती. आम्हालाही त्यांनी bid करायला बोलावलं होतं. दोन महिने मी आणि काका जय्यत तयारी करीत होतो. अशा प्रकारच्या प्रेसेंटेशन्सना टीम घेऊन गेलं तर त्याचा प्रचंड फायदा होतो. एकतर तुमचा अत्मविश्वास वाढतो, जबाबदाऱ्या वाटून घेता येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोकळेपणे बोलायला कुणीतरी असतं.

पैशाची कमतरता होतीच. अमेरिकेला आठवडाभर जरी जाऊन यायचं तरी तिकिटं, राहणं, खाणं-पिणं ट्रान्स्पोर्ट पकडून बऱ्यापैकी खर्च होणार होता. अर्थात ती गुंतवणुकच होती, पण काम मिळण्याची गॅरेंटी नव्हती. शेवटी काकांनी मला एकटीलाच पाठवायचा निर्णय घेतला. मला पुन्हा एकदा धडकी भरली. मी कधीही मुंबई सोडून कुठेही गेले नव्हते. मित्रांच्या गराड्यात राहून आवाज मोठा करून बोलणं सोप्पं असतं. पण एकटीनं, परदेशी कसं काय जमणार होतं. प्रपोसल चं टेंन्शन होतंच आणि त्याबरोबर, कस्टम्स, इमिग्रेशन, विमानतळावर उतरल्यावर टॅक्सी कशी पकडायची, टॅक्सीवाला बरोबर नेईल ना? बरं कॉस्ट कटिंगमुळे सगळं कट टू कट होतं. आठवड्याभरात परत यायचं होतं.

वाटलं होतं, तितके प्रॉब्लेम्स अजिबात आले नाहीत. सगळं शिस्तीत झालं. मिटिंगा चांगल्या झाल्या. माझ्याबरोबर भारतातल्या चार कंपन्या होत्या आणि अमेरिकेतली एक. अमेरिकन कंपनीची धास्ती अजिबात नव्हती कारण आमच्या इतकी कॉस्ट त्यांना परवडली नसती. पण भारतीय नावं मोठी होती. पण आम्ही आधीच तिथे काम करीत होतो, आम्हाला थोडं ऍडव्हांटेजही होतं. शेवटच्या दिवशी मटका फुटायचा होता. मनातून आशा वाटत होती, पण शेवटी जे व्हायचं तेच झालं. आमचा रँक शेवटचा आला. पहिल्या तिघात न आल्याने आम्हाला नेगोशिएटिंग टेबलवर बसायची सुद्धा संधी मिळाली नाही.

मी खूप निराश झाले. वर एकटीच होते. अगदी मनातलं सांगायचं तर रडू आलं पण रोखलं. सर्वांच्याच टीम्स होत्या. जिंकलात तर तुम्हाला टीमची मदत होते तशी हरलात तशी पण होते. ती मला नव्हतीच. वर गेल्या काही महिन्यांची मेहनत, ह्या ट्रीपचा खर्च सगळं एकदम डोक्यात धिंगाणा घालत होतं. आता पाठी वळून बघताना असं वाटतं की त्यात नवं असं काहीच नव्हतं. पुढे कित्येक प्रपोसल्स केली काही जिंकली, काही हरली. its all part of the game. पण तेव्हा ते दुःख खूप जिव्हारी लागलं. जणू माझ्याच खिशातले पैसे गेले होते आणि माझ्याच कंपनीचा प्रॉफिट बुडाला होता. पण त्या वयात आपण सगळं पर्सनली घेतो, तसंच माझं झालं.

नंतर कळलं की आमची कंपनी स्केल बेसिसवर शेवटची ठरलेली होती. काकांना माझ्या प्रेसेंटेशनचाही फीडबॅक चांगला मिळाला. थोडं बरं वाटलंही, पण एका अर्थी झालं ते चांगलंच झालं. आपण जेव्हा त्या त्या काळाच्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतो, तेव्हा असा थोडासा पाय घसरावाच. लागतं, खरचटतं, पण पुन्हा उठून नवं शिखर समिट करायची उर्जा येते अंगी.

आणि हो. आणखी एक जमेची बाजू म्हणजे, ह्या सगळ्या गडबडीत मला श्रेया भेटली. ती दुसऱ्या कंपनीच्या थ्रू आलेली होती. सपोर्ट रिसोर्स म्हणून. ओळख झाली खरी, पण पुढे ती इतकी महत्त्वाची होईल असं तेव्हा वाटलं नव्हतं.

- देवयानी (6)

Tuesday, April 19, 2011

देवयानी (5)

बऱ्याच वेळा मी एकटीच विचार करीत बसते की मी नोकरी का करते? नोकरी म्हणण्यापेक्षा काम का करते? मराठे काकांकडे काम सुरू केलं तेव्हा नक्की माहीत होतं, की नोकरी करायची कारण पैसे मिळवायचे आणि घरापासून जितकं शक्य होईल तितकं दूर राहायचं. पण तिथे काम करायला लागले आणि अचानक पैसा गौण वाटायला लागला. इतका की मला किती पगार मिळतो, मिळतो की नाही, मी जे काम करते त्याला बाहेर किती पगार मिळेल, असले प्रश्न माझ्या मनात चुकूनही आले नाहीत. येऊ नयेत असं नाही, पण माणसाच्या मानसिकतेत कसा बदल होतो बघा. कॉल सेंटरमध्ये ह्या मानाने खूपंच पैसा होता. पण किक नव्हती. इथे पैसा नव्हता पण किक होती.

काहीतरी नवं निर्माण करणं ह्यात जे समाधान आहे ना, किंवा किक आहे ना, ती कशातही नाही. खाज आल्यावर खाजवल्याने, किंवा पगार मिळाल्यावर किंवा प्रमोशन मिळाल्यावर जो आनंद मिळतो तसा हा आनंद नहीये. मराठे काकांबरोबर काम करताना मला तो आनंद मिळाला. आम्ही दोघंच होतो, कंपनी विकली तेव्हा दीडशे लोकं कामाला होती. बांद्रा कुर्ला कॉंप्लेक्समध्ये बऱ्यापैकी मोठं ऑफिस होतं, आणि गंमत म्हणजे तिथं मला सिनियर असा एकंच माणूस होता, तो म्हणजे मराठे काका. आणखी एक धडा मिळाला. कुठल्याही कल्पनेला, संस्थेला छोटं समजू नको. जे छोटं आहे ते आपल्या कष्टानं मोठं कर म्हणजे तूही त्या कल्पनेबरोबर मोठी होशील. मीही आमच्या कंपनीबरोबर मोठी झाले.

बाहेरच्या देशातून काम भारतात घेऊन यायचं आणि स्वस्तात करून द्यायचं हा सोपा हिशेब होता. जुने काँटॅक्टस होते, नाही असं नाही, पण मोठ्या प्रमाणावर काम करायचं तर पैसा उभा करणं अत्यावश्यक होतं. काका त्याच कामात लागलेले होते. मोठमोठ्या इन्व्हेस्टर्सना भेटणं, त्यांना कंपनीचे प्रॉस्पेक्टस समजावून सांगणं हे सगळं काका करायचे. आणि त्यांना प्रेसेंटेशन्स बनवून देण्याचं काम माझं. सुरवातीला मी ते सांगतील तसं फक्त प्रेसेंटेशन बनवायचे. हळू हळू मग मला काही सुचलेले मुद्दे मी त्यांना सांगायला लागले. मी काही अनुभवी नव्हते त्यामुळे बरेचसे माझे प्रश्न, सजेशन्स टाकाऊच असायच्या, पण तरीही काकांनी कधीही त्यांना कमी लेखलं नाही.

प्रत्येक वेळी मला ते म्हणायचे, तुला वाटतं ते तू बोलत जा. we are a team मग माझीही भीड चेपत गेली. माझं कॉंट्रिब्युशन किती होतं हा मुद्दा त्यांना महत्त्वाचा नव्हताच, मला कॉंट्रिब्युट करावसं वाटणं, तितका अत्मविश्वास आणि मोकळेपणा वाटणं हे त्यांना महत्त्वाचं होतं. हे सगळं ना माझ्या डोक्यातल्या कंसेप्टसना शिरशासन घालायला लावणारं होतं. Boss is as good as their team and team is as bad as their boss. हे मी तिथे शिकले. खरंच महत्त्वाचं आहे हे. आज कॉर्पोरेट जगात वावरताना वारंवार खटकतं. बॉस हा टीमचा मालक नव्हे, नेता असायला हवा, हे कुठेतरी, सगळ्या मॅनेजमेंट शाळांमध्ये शिकवून सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही.

हळू हळू पैसा आत येत होता. पैसा आत येत होता तसं नेटवर्कही मोठं होत होतं. एकदा अमेरिकेहून काही लोकं मिटींगला येणार होती. अर्थात त्यांना आमचं ऑफिस बघायचं होतं. पण आमची अवस्था कोंबडी आधी की अंडं आधी अशी झालेली. काम नाही म्हणून मोठं ऑफिस नाही आणि मोठं ऑफिस नाही तर काम मिळणार नव्हतं. शेवटी हो नाही करून, आमच्या एका इन्व्हेस्टरच्या, वीस पंचवीस माणसं असलेल्या ऑफिसच्या बाहेर आमच्या नावाचा बोर्ड लावला. मला खरंतर हे पटत नव्हतं, पण शेवटी धंदा म्हटला की अशा काही गोष्टी करायला लागतातंच. मी नेहमीप्रमाणे प्रेसेंटेशन बनवत होते. दोन दिवस अवकाश होता आणि काकांनी बाँब टाकला.

ते म्हणाले मी प्रेसेंटेशन करायचं. मला हा धक्काच होता. पण मनातून छानही वाटत होतं. ताबडतोब हातावर पैसे ठेवले आणि म्हणाले जा वेश पालटून ये. गोऱ्या पाहुण्यांसमोर त्यांचाच ड्रेस हवा ना? मला काय वाटलं कोण जाणे, पण मी त्यांना म्हटलं की आपण सगळ्या प्रेसेंटेशनला थोडा कल्चरल टच देऊया. थोडे रंग, थोडं म्युसिक, थोडी चव आणि बराच भारतीयपणा. आपण त्यांच्यासारखेच आहोत असं दाखवण्यापेक्षा, आम्ही तुमच्यासारखे आहोतंच, आम्हाला तुमची भाषा येतेच, तुमची वागण्याची पद्धत येतेच पण त्याबरोबर आम्ही आमच्याही काही गोष्टी घेऊन येतो, तुमचं चांगलं आणि त्यात भरीस आमचं चांगलं असं मिळून आपण पुढे जाऊया. ती काकांना आवडली. मी पंजाबी ड्रेस घालून प्रेसेंटेशन केलं. कॉल सेंटरमध्ये कमावलेला अमेरिकन ऍक्सेंट होताच. all in all it was a hit. आम्हाला आमचा पहिला क्लायंट मिळाला आणि सोबत भरपूर इन्व्हेस्टमेंट सुद्धा.

मला इंग्लिश चांगलं बोलता येतं आणि म्हणून काकांनी ते महत्त्वाचं प्रेसेंटेशन मला करायला दिलं. बॉसला सगळं काही आलं पाहिजे असं मुळीच नाही. चांगला बॉस कोणता? रादर चांगला बिझनेसमन कोणता? ज्या व्यक्तीला आपल्याला चांगलं काय करता येत नाही हे माहीत असतं आणि ते करण्यासाठी तो योग्य लोकांची निवड करतो तो. काकांना मी हे करू शकीन असं का वाटलं हे ना मी त्यांना विचारलं ना त्यांनी मला सांगितलं. पण जे झालं ते सही झालं. मुळात सेकंड इयर बी एस सी ला माझा जो आत्मविश्वास बुडाला होता ना, तो कुठेतरी मला परत मिळाला.

आणि हो मला पगारात पहिली राइजही मिळाली.

- देवयानी (5)

Saturday, April 16, 2011

देवयानी (4)

हं, तर डॉट कॉम बबल बर्स्ट झाला आणि माझी नोकरी गेली. प्रत्येक लाइफस्टाइलची सवय व्हायला वेळ लागते. सतत घरी बसून राहणं, काही काम धंदा नसणं आणि घरातल्यांची बोलणी खाणं ह्याची सवय व्हायला काही वेळ गेला. पण मग झाली सवय. आधी मी भांडण वगैरे करायचे. मग लक्षात आलं, जोपर्यंत घरी हात पसरावे लागत नाहीत तोपर्यंत आवाज वर करून बोललेलं चालतं. एकदा का पैसे मागायची वेळ आली की मग आवाज आणि मान खाली घालूनच राहावं लागतं. महत्त्वाचा धडा आहे बरं का हा.

कधी कधी मलाच कसंतरी वाटायचं की माझं आणि माझ्या आईवडलांचं नातं किती खोटं आहे, कृत्रिम आहे. मी घरी राहते कारण मला दुसरीकडे कुठेच जाता येत नाही. जाता येणार नाही असं नाही, पण सगळ्या गोष्टी फिरून पुन्हा पैशापाशीच येतात ना? जसं तुरुंगात फुकट बाळंतपणं होतात म्हणून गरीब बायका गरोदर राहिल्यावर फुटकळ गुन्हे करून अटक करून घेतात, तसंच कितीही नाही आवडलं, तरी एक हक्कचं चलनी नातं माझ्याकडे होतं. मुलगी असल्याचं, आणि मी कितीही नाही आवडले तरी मला वाऱ्यावर सोडणं त्यांनाही शक्य नव्हतं. मी म्हटलं तशी, काही दिवसांनी, मला काहीही न करण्याची आणि त्यांना मला पोसण्याची सवय व्हायला लागलेली होती.

अगदी उशीरापर्यंत झोपावं, ब्रेकफास्टला आईच्या बोलण्यासोबत काही बाही खावं. कितीही ओरडली माझ्या नावानं तरी माझं जेवण ती बनवणारंच होती, ते दुपारी कधीतरी कंटाळा आला की जेवायचं, रात्री बाबांबरोबर पीन ड्रॉप सायलेन्समध्ये अजून एक जेवण. नशिबाने वडिलांनी लहानपणीच जिमखान्याची लाइफ मेंबरशिप घेऊन टाकलेली. आजी गेल्यावर. आजी माझी मेंबर होती, तिची मेंबरशीप माझ्या वाट्याला आली. तिथं संध्याकाळी जायला लागले. थोडा का होईना वेळ बरा जायचा, वर जरा हवापालट.

आणि तिथेच पुन्हा लक माझ्या कोर्टात पडलं. तिथे माझी शशिकांत मराठे ह्यांच्याबरोबर ओळख झाली. ते अजुनही जिमखान्यावर येतात, एखाद रविवार अजूनही त्यांची भेट हटकून होते. मराठे काकाही तेव्हा माझ्यासारखेच बेकार होते. पण त्यांची स्टोरी माझ्यापेक्षा वेगळी आहे. त्यांची नोकरी बिकरी काही गेली नव्हती. मुळात ते नोकरी करीतंच नव्हते. दर पाचेक वर्षांनी नवा धंदा सुरू करणे हाच त्यांचा धंदा आहे. नवा बिझनेस सुरू करायचा, वाढवायचा आणि एका स्टेजला तो पोचला की विकून टाकायचा. त्या सुमाराला ते नव्या बिझनेसची जुळणी करत होते.

रोज बघून बघून ओळख झाली. एकमेकांकडे बघून हसणं आणि मग कधी बोलणं. एकदा म्हणाले चल कॉफी प्यायला. शेवटचं कुठल्याही कॅफेमध्ये जाऊनही काळ लोटला होता, मी त्यांचं आमंत्रण आनंदाने स्वीकारलं. बोलता बोलता मी काहीच करत नाही आणि ते बरच काही करतात हे एकमेकांच्या लक्षात आलं. असाच महिनाभर गेला असेल, आणि एक दिवस ते मला म्हणाले मी तुला नोकरी देतो, करणार का? मी कसली नोकरी, काय नोकरी काहीही नं विचारता ताबडतोब हो म्हटलं.

अडीच हजार रुपये पगार होता. रिसेप्शनिस्ट कम सेक्रेटरी कम ऑफिस अटेंडंट, कम झाडूवाली, कम एव्हरीथिंग. अक्षरशः त्या ऑफिसात मी झाडूही मारला आहे. अगदी छोटंसं ऑफिस होतं. टोकाला काकांचं केबीन होतं, बाहेर माझी खुर्ची आणि टेबल आणि टेबलासमोर दोन खुर्च्या. आलेल्या व्हिजिटर्सना बसायला. पण जनरली कुणीच ऑफिसात येत नसे. काकाच बाहेर जात मिटिंगांसाठी. ऑफिसचं सगळं मी बघायचं. काकांचं चेकबुक सही केलेल्या कोऱ्या चेक्ससहित आणि कॅश माझ्याकडे असे. पण कधीही त्यातले दोन पैसे लाटावेत असं नाही वाटलं. मी ज्या विचित्र परिस्थितीत तेव्हा होते, सहा महिन्यापूर्वीचं माझं आयुष्य आणि आताची ही नोकरी ह्यात जमीन आसमानाचा फरक होता. जबाबदारीचा. जबाबदारी अंगावर पडली आणि मी तिच्यात गुरफटून गेले. गुरफटून का? बहुतेक मी तिच्या आणि ती माझ्या प्रेमातंच पडलो म्हणा ना, इतके की त्यांनंतर आम्ही एकमेकींची साथ बिलकुल सोडली नाही.

कुणी म्हटलंय आठवत नाही, पण selecting right boss is very important for your career. बरेचसे लोकं, अगदी मीही कधी असा विचार केला नव्हता. आपण काम, पैसे, ऑफिसची जागा, शहर, ह्या सगळ्यांची गणितं मांडत असतो, पण आपण कुणासाठी काम करणार आहोत, ह्याचा विचार फार लोकं करत नाहीत. काकांकडून ही एक गोष्ट मी शिकले. you need someone to champion you to the world. काका championed me to the world.

तो सगळाच प्रवास मोठा इंटरेस्टिंग आहे. कुठेतरी कधीतरी कसलंतरी चांगलं काम मी केलं असेल, की ज्यामुळे माझं जग पालटून गेलं. नुकतंच बावीस लागलं असेल तेव्हा, त्यामुळे डोक्यावर कसलीच चिंता नव्हती. घरापासून आठ तास दूर राहता यावं आणि त्याचे महिन्याला अडीच हजार मिळावे ह्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नव्हती. कसलाही विचार न करता मी एक पाऊल टाकलं. ज्या वेळी ते पाऊल टाकलं ती वेळ खरच चांगल्या मुहुर्ताची असावी, कारण अजाणतेपणे घेतलेला हा निर्णय माझ्या आतापर्यंतच्या प्रोफेशनल लाइफ मधला सर्वोत्तम होता.


- देवयानी (4)

Friday, April 15, 2011

देवयानी (3)

काही लोकं मला वर्कोहोलिक म्हणतात. पण मला स्वतःला तसं अजिबात वाटत नाही. सकाळी चारला ऑफिसला पोचणे हा कुणाचा छंद कसाकाय असू शकतो? तसा तो माझाही नाही. पण बऱ्याचदा काय होतं, की आवडत नसूनही गोष्टी करायला लागतात. तोंडल्याची भाजी खाणे, जवळ जवळ रोज कितीही आळस आला तरी जिमखान्यावर जाऊन येणे तसंच सकाळी उठून ऑफिसला जाणे. पण माझ्या कामाच्या वेळांमुळे मी भलतीच करिअर ओरिएंटेड वगैरे वगैरे असल्याचा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे.

आणि बरं फारंच थोडे लोकं दहावी झाल्यानंतर त्यांना काय व्हायचंय असं विचारल्यावर जे उत्तर देतात, तेच होतात. दहावी झाल्यावर मला काय व्हायचं होतं? सायंटिस्ट हे माझ्या लिस्टवरचं हॉट फेवरिट होतं. मी अगदी यंग सायंटीस्ट च्या परीक्षा वगैरे दिलेल्या होत्या. कुणाला माहीत असेल तर BCTS, MCTS आणि मग सर्वात शेवटी NCTS अशा चढत्या भाजणीने परीक्षासुद्धा दिल्या होत्या. सगळं एकदम फिट्ट होतं. बी. एस्सी, एमेस, पीएचडी. एकदम लाइनीत शिस्तीने होणार होतं.

पण.

हा पण बघा सगळं आपलं प्लॅनिंग बिघडवून टाकतो. कॉलेजात गेले आणि गाडी रुळावरून घसरली. इतकी की सेकंड इयरला पुन्हा बसायची वेळ आली. कॉलेज हा कदाचित एका दुसऱ्या लेखाचा विषय होईल. कारण इतकी अपरिमित धमाल, आनंद आणि इतकं अपरिमित दुःख सहा वर्षाच्या माझ्या कॉलेज लाइफमध्ये मी अनुभवलं. की असं दहा शब्दात ते लिहिणं कठीण आहे. मी आज जशी आहे, बरी, वाईट त्यात त्या सहा वर्षांचा खूप मोठा वाटा आहे. फक्त पंजाबी ड्रेस ते थाय बेअरिंग ड्रेस इतका पल्ला मी या सहा वर्षात गाठला.

पण त्यामुळे झालं काय, की हवे तितके मार्क ग्रॅज्युएशनला पडले नाहीत. अर्थात फिकीर कुणाला होती? मला फक्त एकंच दिसत होतं की ह्या शिक्षणाच्या कटकटीतून सुटका. आईबापाकडे लाचारासारखं पैसे मागणं, मग गेल्या वेळी त्यांनी दिलेल्या पैशाचा त्यांनी हिशेब मागणं आणि मग सहाजिकच ग्रूपमधल्या इतरांपेक्षा आपण गरीबच आहोत असा गंड. मग घरच्यांवर रागावणं, भांडणं हे सगळं लागून आलं. बरं बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही ना? आणि सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं नाही आणता येत. मग मित्रमैत्रिणींसमोर थोडासा अपमान. ह्या सगळ्यातून सुटायचं होतं. आणि त्यासाठी एकंच मार्ग होता.

नोकरी.

कॉलेल्जातले बरेचसे मित्र हायसो होते, त्यामुळे नोकरी मिळवणं तितकंसं कठीण नव्हतं. त्या सुमाराला जरा बरं इंग्रजी बोलणाऱ्या मुला मुलींना कॉल सेंटरमध्ये सहज नोकरी मिळत असे, मलाही मिळाली. मोजून दहा हजार रुपये खणखणून वाजवून पहिला पगार घेतला. माझ्या बाबांना पंचवीस वर्ष लागली तिथं पोचायला तिथं मी एका फटक्यात पोचले. शिक्षण बिक्षण सगळं झूट आहे. पैसा हे फक्त सत्य आहे असं वाटायला लागलं.

हातात पैसा आल्यावर खर्च वाढले, हॉटेलिंग वाढलं, पब्स सुरू झाले. नोकरीच्या पहिल्या सहा महिन्यातंच दहा हजारही कमी पडायला लागले. पुन्हा चिडचिड, पुन्हा त्रास. खर्चाची बघा एक गंमत असते. जोपर्यंत आपण तो करत नाही तोपर्यंत तो आपल्या ताब्यात असतो, एकदा आपण तो खर्च केला की मग आपण त्याच्या ताब्यात जातो. जी ऐश वाटायची, ती गरज वाटायला लागते. बरं खर्च करायचं व्यसन हे एक व्यसन आहे, बाकीही प्रलोभनं आहेतंच की. दारू आहे, चरस आहे, अगदीच पैसे खुळखुळत असतील तर कोकेनदेखील आहे.

पण माझं नशीब चांगलं होतं. होतं नाही अजूनही आहे म्हणून डॉट कॉम बबल बर्स्ट झाला. टू थाउजंड ते टू थाउजंड टू. आमचं कॉल सेंटर पूर्णपणे अमेरिकन टेलेकॉम कंपन्यावर टेकलेलं होतं. ते पडले तसे टेकून पडलेले आम्हीही पडलो. धडाधड नोकऱ्या गेल्या. सहा महिने घरी बसायची वेळ आली. काम नाही, काम नाही म्हणून पैसे नाहीत. बरं मित्रांकडे मागावेत तर त्यांचीही परिस्थिती माझ्यासारखीच. त्यामुळे बाहेर जाणं बंद झालं. घरी स्वतःला डांबून घेतलं. आई घरीच असते माझी. रात्रंदिवस तिचं तोंड बघायचं, तिची बोलणी ऐकायची, बाबांनी बोलणं कधीच टाकलं होतं.

टाइम सॉल्व्हज मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स, पण ते मग कधीतरी...

- देवयानी (3)

Saturday, April 9, 2011

देवयानी (2)

कॅफे कॉफी डे मध्ये येऊन काहीतरी करत बसण्याची माझी ही पहिलीच वेळ नाही. इथे येऊन कित्येक वेळा मी वाट्टेल ती कामं केली आहेत. ठिकाणंच असं मस्त आहे. समोर खाडीचा शार समुद्र आहे, त्याच्या अलीकडे मॅंग्रोव्हज. डाव्या बाजूला लांबवर भंगारात काढलेले ट्रॉलर्स रस्टिक फील आणतायत. माझी ही कितवी कॉफी? ठाऊक नाही. असं लिहिण्याची पद्धत आहे, पण माझी पहिलीच आहे. दुसरी कॉफी सीसीडीतली तरी मी पिऊ शकत नाही. पण ही जागाच जबरदस्त आहे. दोन रस्त्यांची टोकं बरोब्बर इथे येऊन मिळतात आणि आपण असे कोपऱ्यावरून बाहेरचं दृश्य बघत बसतो. सही.

हं तर मी लिहितं होते इथे येऊन वाट्टेल ती कामं करण्याबद्दल. अगदी अगदी. ऑफिसातली प्रेसेंटेशन्स असूदेत किंवा मिड लाईफ क्रायसिसवर, जी माझ्या आयुष्यात यायची असावी पण आधीच आल्यासारखी वाटते, त्यावर प्रीतमबरोबर केलेली डिसकशन्स, (प्रीतम हे नाव अगदीच बुळचट वाटतं ना? हं, त्याचं खरं नावही असंच बुळचट आहे. आय ऍम रिअली सॉरी इफ युअर नेम इज प्रीतम) किंवा श्रेयाबरोबर पाहिलेले इथले अगणित सूर्योदय, किंवा अगदी इंटरनेट मित्रांबरोबर केलेलं गॉसिप, किंवा आपण मुंबईत आहोत हे विसरण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा पुन्हा येणं.

माझ्या ऑफिसपासून ही जागा फारशी लांब नाही. चालत म्हटलं तर पंधरा मिनिटं असतील बहुतेक. पण चालत आलंयच कोण? ऑफिसातल्या असंख्य बॉसेसच्या असंख्य गाड्या काय फक्त ड्रायव्हरांना दिवसभर झोपण्यासाठी असतात की काय? त्यातल्या डझनभर ड्रायव्हरांचे फोन माझ्याकडे असतात. अशा प्रसंगी उपयोगाला येतात. डुअर टू डुअर लिफ्ट मिळते. येता जाता त्यांच्याशी दोन शब्द बोललं की झालं. माहीतच असेल की आज दादांना (ड्रायव्हारांसाठीचा खास शब्द. अगदीच म्हातारा ड्रायव्हर असेल तर मामा) बोलवायचं आहे, तर थोडं लाडात येऊन हसायचं. झालं की काम. तशी मी फार स्वार्थी बाई आहे. पण हसू इथे तिथे उगाचच सांडत बसण्याची भलतीच वाईट खोड मला आहे. अशी कधी कधी ती उपयोगाला येते.

आणि ड्रायव्हर, टॅक्सी ह्यांचा माझ्या आयुष्याशी एकदम घनघोर संबंध आहे. नाही नाही, माझ्या वडिलांनी टॅक्सी चालवून माझं शिक्षण बिक्षण नाही केलं. ना मी कुणा टॅक्सीवाल्याच्या प्रेमात बिमात पडले. पण तरीही घनघोर संबंध असायचं कारण म्हणजे माझी नोकरी. मी एका बीपीओमध्ये काम करते.

असं मी कुणाला म्हटलं, की अर्धा क्षणही न दवडता लोकं मला विचारतात, अच्छा, म्हणजे कॉल सेंटरमध्ये काम करतेस वाट्टं? आणि वेगवेगळी लोकं हाच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारतात बरं का. तरुण मुलगा असेल, तीशीपर्यंतचा, तर समोरचं काम सोपं आहे असा लुक. तीशीनंतरचा लग्न बिग्न झालेला बाप्या असेल आणि बायको नसेल सोबत, तर आपण कॉलसेंटरमधल्या मुलींबद्दल ऐकतो ते सगळं खरं असेल का? असा लुक. बायको असेल सोबत तर जनरली नवरे हा प्रश्न विचारतच नाहीत आणि लग्न झालेली बाई असेल तर कॉल सेंटर हे कॉल सेंटर नसून कॉल गर्ल सेंटर असल्यासारखा लुक देऊन हा प्रश्न विचारते.

पण मी सांगत वेगळंच होते. ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र माझं नकारार्थी आहे. मी कॉल सेंटरमध्ये नाही काम करत, पण त्याचाच एक नॉन ग्लॅमरस भाऊ किंवा बहीण आहे, त्यात काम करते. पण तरीही माझं काम, क्लायंटांच्या तालावर नाचतं (नाही नाही डान्सबार सुद्धा नाही) आणि कामाची वेळसुद्धा. सकाळी चारला काम सुरू करायचं म्हणजे टॅक्सीवाल्यांशी, ड्रायव्हरांशी घनघोर संबंध येणारंच ना. रोज सक्काळी मी कुणाचं तोंड पहिलं पाहत असेल तर तो ड्रायव्हर. बहुदा पहिलं मी माझंच तोंड पाहत असेन, पण अर्ध्या झोपेत असल्याने ते रजिस्टर होत नसावं. पण आमच्या बिल्डिंगच्या लाकडी जिन्यावर चपलांचे होणारे आवाज, लोकांना न उठवण्याइतपतच ठेवण्याच्या प्रयत्नात माझी झोप उडते आणि मग मी ज्या व्यक्तीला पाहते तो म्हणजे माझा सकाळचा ड्रायव्हर. आणि त्याची पेंगुळलेली अवस्था पाहून, तो मला नीट ऑफिसपर्यंत सोडेल ना? ह्या विचाराने माझी आणखीनंच झोप उडते.

असो. मी सांगत होते काय आणि सांगत बसले काय. माझं हे असं पिठाच्या गिरणीसारखं असतं. पट्टा चालू. गव्हाचं पीठ का तांदळाचं हा विचार नाही. गिरणी चालू राहणं महत्त्वाचं. तसं माझं होतं. पहिल्या पोस्टात माझा दिनक्रम वगैरे लिहिणार होते, पण कॉफीही संपलेय आणि डोळ्यावर झोपही यायला लागलेय, तेव्हा इथेच थांबलेलं बरं.

पुढच्या पोस्टापासून खरी सुरवात, पहिला डाव भुताचा किंवा देवाचा. ह्या काँट्रोव्हर्सीबद्धल पुन्हा लिहीन कधीतरी

buttermilk - english शब्द roman मध्ये न लिहिता देवनागरीत लिहिले तर वाचायला सोपे जातात हे सुचवल्याबद्दल thank you.

- देवयानी (2)

Wednesday, April 6, 2011

Hi

नमस्कार, संवादिनीचा गेला post वाचला. first reaction होती की makes no sense. पण जरा विचार केला आणि मलाच ही कल्पना आवडली. एखादा कट्टा किंवा चावडी असावी, तसा हा blog. मनात असाही विचार आला की तिच्या ब्लॉगवरून कशाला लिहा, आपलाच नवा ब्लॉग काढला तर? पण जर कुणी ready viewership देत असेल तर ती का नाकारा?

माझा स्वतःचा blog आहे आणि मी लिहिलेलं वाचणारे लोकंही आहेत. पण जे तिथे लिहिता येत नाही ते, अगदी मनातलं, खोलवरंचं, खुपणारं (खुपते तिथे गुप्ते मध्ये मला कधी बोलावणार? ) ते लिहावं म्हणून इथल्या शाळेत admission घेतली. संवादिनीने (मला माहीत आहे तुझं नाव शमा आहे किंवा सुषमा आहे, पण तुला संवादिनी सोडून दुसरं काहीच म्हणावंसं वाटत नाही. खरंच!) परवानगी दिली आणि here I am.

pen name आहे देवयानी. देवयानी का? मी शाळेत असताना ययाती वाचलं. तेव्हा वाचलेली देवयानी अगदी ठसलीच मनावर. मुलं म्हणतात ना हल्ली, मुली जाम attitude दाखवतात. ते attitude मला देवयानीत कुठेतरी दिसलं. तेव्हा पक्कं वाटायचं, शर्मिष्ठा चांगली, सभ्य, marriage material. पण आपल्याला बा देवयानीसारखं व्हायचं. चुका करायच्या, पण मनस्वी करायच्या.

तसं काही झालं नाही. खरं तसं शर्मिष्ठा किंवा देवयानी किंवा यती किंवा ययातीही खऱ्या आयुष्यात होणं कठीणच आहे. फार फार तर कच होणं त्यातल्या त्यात सोपं. पण blog वर काहीही होणं एकदमच सोप्पं आहे. म्हणून हे नाव घेतलं. ह्या नावात एक romanticism आहे. कचासाठी बापाशी भांडणारी, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याने विश्वासघात केल्यावर चक्क त्याला विसरून ययातीच्या प्रेमात पडणारी देवयानी अद्भुतच नाही का?

आता ययाती तसं पुसटसंच आठवतं. पुन्हा वाचायचा प्रयत्न केला तर शब्द लागत नाहीत. खोटं कशाला सांगा, मी पुन्हा वाचायचा प्रयत्नच केला नाही. काळ बदलतो तसे आपणही बदलतो. तशी मीही बदलले. स्वतःला आरशात पाहिल्यावर, डोळ्याला चस्मा लावू adolescent वयात ययाती वाचणारी, दोन वेण्या घालणारी, पुस्तकातला शब्दन शब्द घासून घासून पाठ करणारी, वेडी गबाळी मी होते ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. कुठेतरी हा प्रवास romantic होता. (बरोबर मराठी शब्द आठवत नाही, पण ह्या romantic चा प्रेमाशी काहीही संबंध नाही. काव्यमय चालेल का? कवित्व वरून? ) खडतर आहे. फार काही special नाहीये, पण माझ्यासाठी super duper आहे. अर्थात अर्धवट आहे, पुढचा रस्ता invisible आहे. मागे जाणं अशक्य आहे. एकंदरीत सगळं confusing आहे.

त्या सर्वाची संगती लावायचा हा एक वायफळ प्रयत्न.

- देवयानी (1)