Thursday, October 8, 2009

अपूर्ण

सध्या इथे छान हवा आहे. ना धड उन्हाळा, ना धड थंडी. मध्ये मध्ये पावसाचा शिडकावा. पानगळ होऊन फांद्यांचे सांगाडे उरलेल्या झाडांना पुन्हा नवी पालवी फुटायला लागली आहे. पुन्हा एक नवा उभार, पुन्हा एक नवा उत्साह आणि मग पुन्हा एक पानगळ. निसर्गाचं चक्र पूर्ण फिरलेलं इथे पहिल्यानेच पाहतेय. उन्हाला अजून नकोसा उष्मा चिकटला नाहीये आणि वाऱ्याला आलेली बोचरी धार बोथट होत चालली आहे. कधी मध्येच सदासर्वदा अंगात अडकवलेला स्वेटर बाजूला फेकून जरा मोकळ्या ढाकळ्या कपड्यात बाहेर जायचा उत्साह वाटायला लागलाय.

झापड लावून कॅलेंडरवरचे दिवस ढकलणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही निसर्गातला हा बदल इतका जाणवावा तर पशू पक्ष्यांची काय कथा? हल्ली सकाळी उठले की खिडकीबाहेर ऊन खात पडलेल्या बागेचं दर्शन होतं. आमच्या घराच्या बाहेरच रस्त्यावर एक मोठं झाड आहे. आणि झाडावर ह्या ना त्या पक्ष्यांचा अड्डा नेहमीच बसलेला.

इथले कावळ्यासारखे दिसणारे पण काळे पांढरे मॅग्पाय पक्षी फार. कधी पोपटासारखे रंगीबेरंगी पक्षी. कधी गवतातले किडे खात लॉनवर इथून तिथे फिरणाऱ्या टिटव्या, तर कधी कबुतराच्या कुळातले वाटणारे काही पक्षी झाडावर हमखास ठेवलेले. बऱ्याच दिवसांनी सगळी नातवंड एकत्र घरी आली की आमचे आजो (म्हणजे आजोबा) व्हायचे तसं वाटतं ह्या झाडाकडे बघून. अगदी अंजारून गोंजारून सगळ्यांना आपल्या फांद्यांवर खेळवतं ते झाड. बाहेर जाताना किंवा बाहेरून येताना उगाचच हात त्या झाडाला लागतात. आपलं काही मिळाल्याचा आनंद होतो.

तर हल्ली सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग येते. मग दात घासायच्याही आधी आमच्या ह्या अजोबाचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आज कोण कोण आलंय ते पाहिलं की मग दिवसाची सुरुवात काय मस्त होते. गेले काही दिवस मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटातलं संगीत कुठे तरी हरवून गेल्यासारखं वाटलं. म्हणजे कधी कधी गाणं चालू असताना तबला उतरल्यावर कसा बेसुरा वाटतो, तसंच.

घरून काम करण्याचा एक फायदा म्हणजे हवं तिथे बसून काम करता येतं. मी हल्ली मुद्दामच झाडाच्या समोरच्या खिडकीत जाऊन बसते. दुनयाभरच्या आकडेमोडीने आणि मेलामेलीने डोकं विटलं की पटकन समोर आजोबा नातवंडांचा निर्व्याज खेळ पाहता येतो. परवा अशीच बसले होते तर एक गोष्ट लक्षात आली. झाडावर फक्त मॅग्पाइज होते. बाकी सगळे पक्षी एकतर लॉनवर नाहीतर शेजारच्या झाडावर होते. पहिल्याने वाटलं हवाबदलासाठी दुसरीकडे बसले असतील. मग लक्षात आलं मामला थोडा गंभीर होता.

झाडाच्या बेचक्यांत घरट्यासारखं काही दिसलं. दुर्बीण काढून बघितलं तर होयकी, मॅग्पाइजनी चक्क घरटं बांधलं होतं. इतर सर्व पक्ष्यांना आजोबांवरून त्यांनीच उडवलं होतं. त्यांच्याच दादागिरीमुळे किलबिलाटातलं संगीत वगैरे हरवून बसलं होतं. आता काय नवीनच चाळा लागला. घरटं बघत राहणं आणि काही विशेष घडतंय का ते पाहणं.

एक दोन दिवस असेच गेले. मी बाहेरून घरी येत होते आणि नेहमीसारखा माझा हात झाडाकडे वळला अन काय झालं काही कळलं नाही एकदम कावळ्यासारखा रागीट ओरडण्याचा आवाज आला आणि एक मॅग्पाय चक्क वरून माझ्याकडे येत असलेला पाहिला. मला वाटलं हा माझ्या डोक्यावर आपटणार, पण तेवढं न करता फक्त डोक्याला वारा घालून तो निघून गेला. त्याचा तो अवतार बघून मी प्रचंड घाबरले आणि अंगणात पळाले. डेव्ह आजोबांनी माझी ही गंमत पाहिली. ते म्हणाले की पक्ष्यांनी घरटं बांधलंय आता ते ओव्हरप्रोटेक्टिव्ह होतात, माणसांसारखेच.

झालं, तेव्हापासून जरा लांबूनच. मॅग्पायभाऊ आणि मॅग्पायीण्वहिनींना धोकादायक वाटणार नाही अशा अंतरावरून येणं जाणं आणि दुर्बिणीतून घरटं बघणं चालू होतं. साधारण आठवडा झाला असेल. थोड्याच दिवसात बाळ मॅग्पाय जन्माला येणार होतं. माझ्या नवऱ्याला ह्यात भारी उत्साह. तो अगदी रोज न चुकता मला अपडेट विचारायचा.

शनिवार सकाळ झाली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. जन्मात पहिल्यानेच पडायला मिळतंय असा तो पंधरा मिनिटं पडला. हंतरुणात पडल्या पडल्या पावसाचा आवाज छान वाटत होता. थोड्या वेळाने पाऊस सरला आणि लख्ख ऊन पडलं. मी उठले आणि नेहमीसारखं खिडकीतून घरटं पाहिलं. घरटं तसंच होतं पण मॅग्पायभाऊ आणि वहिनी बहुतेक विकली शॉपिंग करायला गेले होते. दुपारी परत पाहिलं तर चक्क झाडावर इतर नेहमीचे पक्षी बसलेले. काय झालं कळेना. संध्याकाळी बाहेर पडलो तर झाडाखाली अंड्याची टरफलं दिसली. नुसती टरफलं.

मी म्हटलं झाडावरून पडली अंडी. पिलं व्हायच्याआधीच गेली. नवरा म्हणाला नाही पिलं झाली असतील नाहीतर नुसती टरफलं नसती पडली. विचारणार कुणाला? झाडाला विचारलं असतं त्याला उत्तर देणं शक्य असतं तर.

हल्ली सकाळ किलबिलाटानंच होते. मीही खिडकी उघडून बघते छान ऊन पडलेलं असतं. निरनिराळे पक्षी बागडत असतात. त्यात एखादा मॅग्पाय बघितला की उगाचच ती टरफलं आठवतात.

ना नात्याची ना गोत्याची, पण ही अपूर्ण गोष्ट मात्र कधीच पूर्ण होणार नाही.

Thursday, October 1, 2009

सीमोल्लंघन

परवा दसरा झाला. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ह्याचं महत्त्व. हा साडेतीन मुहूर्त हा काय प्रकार आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे वगैरे मला अजूनही माहीत नाही. पण दसऱ्याला बरीच लग्न दर वर्षी लागत असतात हा मुख्य मुद्दा. लग्नानंतरचा पहिला दसरा. लग्नानंतरचे पहिल्या वर्षीचे जे काही सण आहेत ते सगळे आमचे इथेच व्हायचेत. म्हणजे थोडक्यात जी काही पहिल्या सणाची मजा असते ती हुकलेय.

माझ्या घरी म्हणजे माहेरीपण दसऱ्याचं काही वेगळं महत्त्व नव्हतंच. घरच्या घरी साधी पूजा, दुपारी पणशीकरांचे श्रीखंड, मग मस्त झोप आणि संध्याकाळचा घरीच करायचा टाइम पास. ह्यात गप्पा, गाणी ते नुसतंच बसून राहणं सगळं सगळं आलेलं. जग कसं बदलतं. मी आणि माझा भाऊ आणि आई बाबा असं आमचं चौरस घर. प्रत्येकाचा कोपरा वेगळा, पण दुसऱ्यांच्या कोपऱ्यांकडे बघत उभा असलेला. प्रत्येकाचं महत्त्व तेच नेमकं, नव्वद अंशाचं आणि त्यावर घराचा तोल बरोबर सांभाळलेला. चौरसाचा त्रिकोण आणि त्रिकोणाची सरळ रेषा कधी झाली हे कुणालाच समजलं नाही. असेच काहीसे डिप्रेसिंग विचार येत राहिले.

तसं काम होतंच, त्यामुळे दिवस कसा गेला कळलं नाही. पण नेमकं नवऱ्याला कामानिमित्त बाहेरगावी जायला लागलेलं. एवढ्या मोठ्या घरात एकटी मी. बरं इथल्या घरांची गंमत आहे. लाकडी असल्याने मधून मधून करकरल्याचे आवाज येतात. आणि ते आवाज मोजत मोजतंच माझी रात्र जाते. झोपायचं राहूनंच जातं. कधी एखादा पोसम छपरावर येऊन आपलं नृत्यकौशल्य दाखवतो तर कधी घोंघावणारा वारा माझी झोप उडवतो. खूपच बोर झालं. मग सरळ फोन उचलला आणि आजीला फोन लावला.

भारतातही खूप असं कंटाळवाणं वाटलं की मी सरळ आजीकडे जायचे. आजी म्हणजे आईची आई. तिच्या घरी दुपारच्या सुमाराला जायचं आणि तिला चहा करायला सांगून मस्त चहा पिता पिता गप्पा ठोकायच्या असं कित्येक वेळा केलंय. अगदी परीक्षेच्या दिवसात तर खासंच. कारण दुपारी इतकी झोप यायची की स्कूटी काढून थेट आजीकडे.

फोन केला बराच वेळ गप्पा मारल्या. तिला म्हटलं असं सणाच्या वेळी खूप कंटाळा येतो वगैरे वगैरे. तर म्हणे कशी, तुझ्या आजोबांची नात शोभतेस. ते आणि आजी त्यांच्या कोंकणातल्या गावातून इकडे आले. आजोबांना सतत आठवण यायची गावाची, घराची, थोडीशी शेती होती त्याची. आंब्यांची, फणसांची, नारळी, फोफळीच्या झाडांची. आंब्यांना तर त्यांनी नावं दिली होती एकेक. नावानेच बोलायचे आंब्यांबद्दल. इतका जिव्हाळा होता आणि एकदम सगळं सोडून मुंबईला आले. म्हणाली तुमचं तरी दुसरं काय आहे. कोंकणातून त्या काळी मुंबईला येणं म्हणजे आजच्या काळी परदेशी जाण्यासारखंच होतं. त्यांनी तेव्हा सीमोल्लंघन केलं, तुम्ही आता केलं.

हो म्हणाले. पण एक विचित्र विचार घुमत राहिला डोक्यात. माणसं सीमोल्लंघन का करतात? दसरा आहे म्हणून? नसलेलं काही मिळविण्यासाठी? काही सिद्ध करण्यासाठी? पूर्वीच्या काळी राजे रजवाड्यांनी हेच केलं. आम्हीही आता हेच करतोय. पण का? कशासाठी? असे प्रश्न त्यांनी आणि आम्ही विचारलेत का? कधी वाटतं आपण उगीच हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो. कधी वाटतं, प्रवाही असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नक्की काय बरोबर? काय चूक? आमच्या कक्षांच्या सीमा ओलांडून साजरा केलेला दसरा अधिक चांगला की घरच्यांसोबत पणशीकरांचं श्रीखंड खाऊन साजरा केलेला अधिक चांगला? असले बेसिक पण उत्तर न देता येणारे प्रश्न पडतात. तेव्हाही तसंच झालं.

बराच वेळ अशी वैचारिक लंगडी घातल्यावर एकदाची झोप लागली. पण झोप लागते न लागते तोच मोबाईल खणखणला. त्रासानेच उचलला, पण बरं झालं उचलला, भावाचा होता. मग झोप विसरून खूप वेळ गप्पा मारल्या. त्याला म्हटलं काय रे दसरा कसा साजरा केलास? म्हणाला ताई, चिल. दसराच साजरा करायचा असता तर भारतातच राहिलो नसतो का? म्हणाला व्हेन इन रोम लिव्ह लाइक रोमन, नॉट लाइक सोमण. म्हटलं हुश्शार आहेस तू.

पण मला पटलं त्याचं थोडंसं. हे हॅविंग केक आणि इटिंग इट टू सारखं झालं. विच इज ऍन ऍबस्युल्युट इंपॉसिबिलिटी.

सीमा न ओलांडता सीमोल्लंघन करता येत नाही हेच खरं.

मग एकदम शांत झोप लागली.

Thursday, September 24, 2009

फँटसी

पित्रुपंधरवडा संपून एकदाचे घट बसले की आमच्या चाळीत उत्साहाचं वारे वाहायला लागायचे. सुरवात व्हायची ती भोंडल्याने आणि मग हळदीकुंकू, दसरा करीत करीत दिवाळीपर्यंतचा वेळ कसा जायचा समजायचंच नाही. भोंडला म्हटला की सर्वात आधी आठवण होते ती परीक्षेची. सहामाई परीक्षेला लागूनच साधारण घट बसायचे. बसायचे म्हणजे अजूनही बसत असतील. पहिल्या दिवशी चाळीतल्या टवाळक्या करत फिरणाऱ्या एक दोन पोरांना पकडून अंगणात दिवे लावून घ्यायचे. ते काम मोठ्या बायकांचं. आम्ही मुली खिडकीच्या गजाआडून तयारी कुठपर्यंत आलेय ते फक्त बघायचं.

नेन्यांच्या घरात बायकांची उभ्यानेच बैठक जमायची. कारण भोंडल्यासाठी पाट त्यांचाच लागायचा ना. त्यांचाच का लागायचा हे मला अजूनही माहीत नाही. पण अजूनही त्यांचाच पाट भोंडल्याला असतो. नेन्यांच्या घरी बापटांकडचे तांदूळ पोचायचे. हत्ती काढायचं काम आमच्या आईचं. चित्र वगैरे काढणारी चाळीत एकंच बाई मग तिला खास हत्तीचं चित्र काढण्यासाठी बोलावलं जायचं. आईही वर्षानुवर्ष त्याच मापाचा तसाच दिसणारा हत्ती काढत राहायची. मग बापटांचे तांदूळ, नेन्यांच्या पाटावर, साठ्यांनी काढलेल्या हत्तीच्या पोटात बसायचे आणि कुणाच्यातरी करंगळीचा छाप हत्तीचा डोळा बनायचा.

असा हा तांदुळाचा हत्ती अंगणाच्या मध्ये ठेवला गेला की मग आम्हा मुलींना खाली जायची परवानगी असायची. अभ्यासातून सुटका झाल्याने सर्वांनाच खूप छान वाटायचं. घटस्थापनेच्या दिवशी अगदी घरात घालायच्या फ्रॉकपासून सुरुवात व्हायची आणि चढत्या भाजणीने दसऱ्यापर्यंत तास दीड तास दवडून साडी किंवा तत्सम काहीतरी मिरवायच्या ड्रेसपर्यंत प्रवास व्हायचा. घट बसायच्या दिवशी पाच बायका आणि पाच पोरी आणि एखादा लहान मुलगा ह्यांनी सुरू झालेला भोंडला दसऱ्याच्या दिवशी चांगला वीसेक बायका पंधराएक पोरी इथपर्यंत फुगायचा. चार पाच गाणी वाढत वाढत दहा पंधरा विसापर्यंत पोचायची. चाळीतल्या हौशी गायिका सगळ्या आपले गळे साफ करून घ्यायच्या. ऐलमा पैलमा पासून सुरवात व्हायची. मग कोणे एके दिवशी काऊ यायचा. सुंद्रीचं लगीन जुळायचं आणि करत करत आडात शिंपले कधी पडायचे ते समजायचं नाही.

छोट्या छोट्या आम्ही पोरी, चाळीत नव्या लग्न होऊन आलेल्या मुली आणि त्यांच्या सास्वा असलेल्या बायका सगळ्या मिळून एकंदरीतच सासर ह्या प्रकाराची टिंगल टवाळी करणारी गाणी म्हणायचो. म्हणजे दात्यांची सून आणि दातेकाकू दोघीही म्हणायच्या

उजव्या हाताला विंचू चावला बाई, विंचू चावला
आणा माझ्या सासर चा वैद्य
अंगात अंगरखा फाटका तुटका,
डोक्याला पागोटे चिंध्या मिंध्या
कपाळाला टिळा शेणाचा

दिसतो कसा बाई XX वाणी.

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटे जरतारी
कपाळाला टिळा चंदनाचा

दिसतो कसा बाई राजावाणी...

इतकी गंमत वाटायची. मी आईला विचारायचे पण दाते काकूंना राग नसेल का येत? मग आई सांगायची अगं ही नुसती गंमत आहे. पण ती नुसती गंमत नाहीये. एकच बाई सुनेच्या रोलमध्ये वेगळी वागते आणि सासूच्या रोलमध्ये वेगळी वागते. भोंडला हे तिला ह्याची जाणीव करून देण्याचं माध्यम असावं.

मग दुसरी गाणी सुरू व्हायची.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
कोण पाहुणा आलाय गं बाई, आलाय गं बाई
सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
सासू पाहुणी आलेय गं बाई आलेय गं बाई

सासूने काय आणलंय गं बाई, आणलंय गं बाई
सासूने आणलेय साडी गं बाई, साडी गं बाई

साडी मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिप्रं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

मग एक एक करत सासरा यायचा, नणंद यायची दीर यायचा. काही ना काही आणायचे, पण भोंडल्यातल्या रिंगणातली प्रत्येक बाई तोऱ्याने त्यांना परत पाठवायची. अगदी पळवून लावण्यासाठी झिप्रं कुत्रंसुद्धा सोडायची. आणि त्यांची उडालेली भंबेरी पाहून मनातल्या मनात हसायची. कुठेतरी आत खोलवर आपण घरातली मुलगी नसून सून आहोत त्यामुळे आपल्याला कमीपणा मिळतो ही सल मग तिथे बाहेर पडायची. साडी मी घेत नाही, सांगा मी येत नाही, ह्या शब्दांना तर खास धार चढायची. ही त्यांची एक फँटसी.

आणि मग आम्ही पोरी च्या कडव्याची वाट बघायचो ते यायचं.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
कोण पाहुणा आलाय गं बाई, आलाय गं बाई
सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे
नवरा पाहुणा आलाय गं बाई आलाय गं बाई

नवऱ्याने काय आणलंय गं बाई, आणलंय गं बाई
नवऱ्याने आणलंय मंगळसूत्र गं बाई, मंगळसूत्र गं बाई

मंगळसूत्र मी घेते
सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई उघडा गं बाई
झिप्रं कुत्रं बांधा गं बाई बांधा गं बाई

लग्न न झालेल्या मुलींच्या मनात मग सासुरीच्या वाटे येणाऱ्या नवऱ्याची चित्र उमटायची. आमच्या सारख्या शाळकरी मुलींना तर कुणीतरी राजकुमार वगैरे येणार गोष्टीतल्याप्रमाणे असंच वाटायचं. ही आमची एक फँटसी.

शनिवारी घट बसले. हे सगळं सगळं आठवलं. घटकाभर जुन्या दिवसांमध्ये मन गुंगून गेलं. तसे फार दिवस झाले नाहीत म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी मी होतेच की भोंडल्याला. तेव्हा मीही ही फँटसी बघितलीच असेल नाही का? ते दिवस सरले ती स्वप्नही सरली. त्या मैत्रिणीही सरल्या. श्रद्धा अमरिकेला गेली, रमा पुण्याला गेली. प्रीती अजून कुठेतरी, मी अजून कुठेतरी. आम्ही सगळ्या साळकाया म्हाळकाया, भोंडल्याचं रिंगण फिरता फिरताच मोठ्या झालो आणि एकेक करून निघूनही गेलो.

वाटलं सगळ्यांना पुन्हा एकत्र करावं नेन्यांचा पाट घ्यावा, बापटांचे तांदूळ घ्यावेत, आईला हत्ती काढायला सांगावा आणि माझ्या करंगळीने त्याचा डोळा काढावा आणि पुन्हा एकदा ऐलमा पैलमा खेळ मांडावा.

हं. ही माझी एक फँटसी.

-------------

स्नेहा, खो दिल्याबद्दल थँक्स. माझा खो सखीला

Thursday, September 17, 2009

एका पावसाचे पडणे

पाऊस कधीचा पडतो
पाचूंची हिरवी पाने
मातीच्या हीनपणाला
गंधांची ओली दाने

पाऊस कधीचा पडतो
जणू पागोळ्यांच्या माळा
रुणु निळ्या घनाच्या पोटी
झुणु निषादसुंदर गळा

पाऊस कधीचा पडतो
कोरडे मात्र अंगण
स्वप्नांचे बहर बगीचे
मनी मोरांचे रिंगण

पाऊस कधीचा पडतो
मन उदास काहुर होते
मदमत्त वातस्पर्शाने
तनी उसनी हुरहुर होते

पाऊस कधीचा पडतो
पाऊस पाडुनि जातो
पापण्या ठेऊनि ठाक
तो डोळे भिजवुन जातो

Thursday, September 10, 2009

माझे गाणे

माझे गाणे असले गाणे
माझे गाणे तसले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
तरारलेले एक तराणे

माझे गाणे असले गाणे...

पाऊस बिंडा नादावूनी
पागोळ्यांचा धरतो ताल
मल्हाराच्या गोड गळ्यावर
अभ्राभ्रांची सुरेल शाल

कडकड कडकड कडाडणारी
वीजबाईची तान वेगळी
सरसर सरसर रसरसलेली
पऊसरींची मीण आगळी

गरगर गरगर गोल घुमोनी
मारुतराज समेवर येई
ह्या सगळ्या कल्लोळामागे
माझे गाणे हरवून जाई

माझे गाणे असले गाणे?.....

माझे गाणे कसले गाणे
माझे गाणे असले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
कोमेजून गेलेले कण्हणे

Thursday, September 3, 2009

हरवलेली माणसं

रोज साधारण दुपारी दोनच्या सुमाराला आमचा पोस्टमन येतो. इथला पोस्टमन आणि आपला देशी पोस्टमन ह्यात जमीन असमानाचं अंतर आहे. आपला डोक्याला टोपी घालतो, तर ह्याच्या डोक्याला असतं हेल्मेट. आपला सायकल चालवतो तर ह्याला मिळते लुनासारखी बाइक. मग हा पाठीला दप्तर लावून फुटपाथवरून लुना चालवत चालवत प्रत्येक घराच्या समोर थांबतो. सगळ्या पत्रांचा रबरबँड लावून एक गठ्ठा केलेला असतो आणि तो गठ्ठा घराच्या लेटर बॉक्समध्ये टाकून स्वारी पुढच्या घराकडे वळते.

हल्ली पत्र हा प्रकार फक्त घेणेकऱ्यांनी देणेकऱ्यांना पाठवायचाच उरलेला आहे. आमचा लेटरबॉक्स टेलिफोन, इलेक्ट्रिसिटीची बिलं किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट असले फारसे आवडीचे नसलेले प्रकार सोडले तर बाकी इथल्या तिथल्या मॉल्सचे कॅटलॉग्ज, टेक अवे च्या जाहिराती वगैरे वगैरे कचऱ्याच्या टोपलीत (नव्हे रिसायकल बीनमध्ये ) टाकायच्या लायकीच्या गोष्टींनी भरलेला असतो.

पण तरीही पोस्टमन येऊन गेला की ताबडतोब बाहेर जाऊन आपली पत्र घेऊन यायला मला आवडतं. असंच परवा पोस्टमन साहेब येऊन गेल्यावर मी पटकन अंगणात उतरून पत्र आणायला गेले. रोजचा कचरा होताच. पण एक पत्र वेगळंच वाटलं. माझ्याच नावाचं होतं. वेगळंच म्हणजे चक्क हाताने त्यावर माझं नाव आणि पत्ता लिहिला होता. उलटं करून पाहिलं तर कुणाचा पत्ता नव्हता. हं. नाही म्हटलं तरी थोडी उत्सुकता वाढलीच. मनात माहीत होतं की हे काही कामाचं पत्र नाही.

घरात शिरले आणि पत्र उघडलं. चक्क हाताने लिहिलेलं पत्र होतं. भरभर वाचून काढलं. चक्क जग्गूंचं पत्र होतं. किती मोठ्ठं असावं? दोन मोठे फुलस्केप भरून. मला एकदम कसंसंच वाटलं. भारत सुटल्यापासून मी त्यांना पत्र फोन वगैरे काही करण्याचा वीचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. कधी मधी बाबाकडून कळायचं त्यांच्याबद्दल. हल्ली पाय दुखतात म्हणून पॉइंटापर्यंत जात नाहीत, वगैरे माहीत होतं. पण ह्या उप्पर काही विचारण्याचा मी प्रयत्न केला नाही आणि बाबाने त्याहून अधिक काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता.

ह्यांनी चक्क बाबाकडून माझा पत्ता घेऊन मला पत्र पाठवलं. अगदी सगळं सगळं लिहिलं. आमच्या नाना नानी ग्रुपबद्दल लिहिलं. एका आजोबांना तिसरी नात झाली म्हणून त्यांच्या मुलाला शिव्या देऊन झाल्या. म्हणे मुलासाठी कशाला देशाची लोकसंख्या वाढवता? एका आजींच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्या आता फिरायला येत नाहीत. स्वतःबद्दलही खूप लिहिलं. गाण्याचे कार्यक्रम वगैरे जोरदार चाललेत म्हणे. गणपतीचे कार्यक्रम कुठे कुठे काय काय आहेत आणि ते कोणते कोणते पाहायला जाणारेत.

एकदम मस्त वाटलं. आपल्याकडे असलेली एखादी छानशी वस्तू आहे हेच आपण विसरून जातो आणि कधीतरी साफसफाई करताना एकदम ती वस्तू डोळ्यासमोर येते आणि नकळत चेहऱ्यावर हसू फुलतं तसं झालं.

जुने दिवस आठवले. रोज सकाळी न चुकता जायचे मी फिरायला. समुद्राचं वेड होतंच पण आमच्या नाना नानी ग्रुपचं त्याहून होतं. सगळ्या ओल्डीजमध्ये मी एकटी विशीतली होते. सगळ्यांची लाडकी नात. आणि जग्गूंची आणि माझी तर विशेष मैत्री. कारण आम्ही घरी चालत एकत्र जायचो. आणि तो माणूसही असा इंटरेस्टिंग की खूप मजा यायची. त्यांच्या गमती जमती विनोद वगैरे सांगायची पद्धतही खूप छान होती.

पण वेळ बदलते तसं आपलं जग बदलतं. जुने लोकं दूर होतात, नवे लोकं जवळ येतात. रहाटगाडगं चालू असतं. पण कधीतरी असं जुनं काहीतरी आठवतं. वाईट वाटतं. म्हणजे जुने दिवस गेले ह्याचं नाही वाईट वाटत. कारण तेव्हा जी मजा करायची होती ती भरपूर केली. वाईट अशाचं वाटतं की कधी काळी आपल्या आयुष्यात रोजच्या असलेल्या व्यक्तींना आपण पार विसरतो ह्याचं. जग्गू वन्स वॉज लाइक अ बेस्ट फ़्रेंड.

असो, तर अशी त्यांच्या पत्राची मजा. मग मीही त्यांना पत्र लिहायला घेतलं, पण अर्ध्यावरच लक्षात आलं की मला त्यांचा पूर्ण पत्ता कुठे माहितेय, त्यांनी पत्रातही लिहिला नव्हता. जुनी एक सुटकेस आहे माझी, त्यात माझं जुनं सामान भरलंय. ती उपडी करून त्यातून माझी जुनी डायरी शोधायचा प्रयत्न केला. नाही सापडली. जुन्या फोनमध्येही पाहिलं. त्यातही नव्हता. मग सरळ बाबाला फोन केला, त्याला विचारलं त्याच्याकडे आहे का? त्याच्याकडे जग्गूंचा फोन असण्याचं कारणंही नव्हतं. तो म्हणाला मी त्यांना विचारून देतो म्हणून. पण मला ते नको होतं. मला आताच्या आता त्यांच्याशी बोलायचं होतं.

खूप शोधाशोध केली. नाही सापडला. मग स्वतःवरच चिडून खिडकीत जाऊन बसले. हरवलेली माणसं शोधत.

Thursday, August 27, 2009

आणखी एक गणपती

हा आठवडा गणपतीचा. गेल्या वर्षी आखातात होते गणपतीच्या वेळी. ह्या वर्षी इथे आहे. मी घरी नसतानाची ही दुसरी गणेश चतुर्थी. दोन वर्षापूर्वी आम्ही चौघेही घरी होतो. चौघे म्हणजे मी, माझा भाऊ आणि आई बाबा. गेल्या वर्षी एक मेंबर कमी. मी आणि ह्या वर्षी अजून एक मेंबर कमी, माझा भाऊ. आता आई आणि बाबा आणि आमचा सर्वांचा लाडका गणपती.

बाबाला सांगून ठेवलं होतं गणपती घरी आला की मला पहिला फोटो काढून पाठवायचा. आमचा गणपती कधीही बदलत नाही. म्हणजे मला कळायला लागल्यापासूनची जी मूर्ती आहे ती दर वर्षी तशीच असते, पण तरीही ह्या वर्षीची मूर्ती बघण्याची खूप उत्सुकता होती. मखरही पाहायचं होतं. माझा भाऊ नाही म्हणजे मखराची मजा नाहीच. त्याला मी कितीही शिव्या दिल्या तरी ह्या बाबतीत त्याचं फक्त कौतुकच होतं. ह्या वर्षी आईने केलं होतं मखर. कमळाची प्रतिकृती बनवली होती तिनं.

यंदा गणपती रविवारी आले. बरं वाटलं. सकाळी उठून बाप्पाची पूजा केली. म्हणजे आमच्या देवातल्या बाप्पाचीच. मग मोदक बनवायचा घाट घातलेला. घरी असताना आई बनवायची, आजीही बनवायची. दोन्हीकडे जाऊन मोदक खायचं काम आमचं. कधी मला स्वतःला मोदक बनवायची वेळ येईल ही रिऍलिटी तेव्हा उमजलीच नव्हती. ती परवा उमजली. आदल्या दिवशी आजीला फोन करून रेसिपी लिहून घेतली होती. आजीची रेसिपी म्हणजे गंमतच आहे. नारळ खोवून घे त्यात गूळ घाल. किती गूळ घालू? अगं घाल अंदाजाने. मीठ? अंदाजाने. तेल? अंदाजाने. पीठ? अंदाजाने. मग म्हणाली आईला फोन कर. आईने जरा सांगितलं व्यवस्थित. थोड्या वेळाने आजीचा पुन्हा फोन आला. म्हणाली नैवेद्याच्या मोदकाचं पुरण आधी चाखून बघायचं नसतं पण तू पहिल्यानेच करतेयस ना? मग पुरणाचा नैवेद्य दाखव आणि घे चव. हुश्श!

मोदक बरे झाले. मुख्य म्हणजे गोड असूनही नवऱ्याला आवडले. मला तर काय आवडतातच. मोदकाची शेंडी फोडून भरपूर तूप ओतून खाल्लेला मोदक म्हणजे जीव्हासुखाची परमावधीच. जेवणानंतर सोफ्यावर पडल्या पडल्या कधी डोळा लागला कळलंच नाही.

संध्याकाळच्या सावल्या पसरल्या आणि जाग आली. रविवारची संध्याकाळ म्हणजे सगळ्यात कंटाळवाणा प्रकार. येणाऱ्या आठवड्याचं काम डोळ्यासमोर. इस्त्रीचा ढीग. घरातली उरलेली कामं डोळ्यासमोर दिसायला लागली. पण काही करावंसं वाटेना. घरचंच सगळं आठवत राहिलं. संध्याकाळी कोण कोण येईल? घरी बनवलेले खव्याचे मोदक कसे झाले असतील? या वर्षी गाणं होणार नाही म्हणून बाबा नाराज असेल का? खाली उत्सवात यंदा काय काय कार्यक्रम असतील? आरती म्हणताना अण्णांचा सूर जास्त टिकेल की माझ्या वयाच्या मुलांचा? यंदा मांडव घातला की घालून घेतला? हळदी कुंकू कधी आहे? मखर बनवायला माझा भाऊ नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याची आठवण काढली असेल का? माझ्या कोण कोण मैत्रिणी माहेरपणाला आल्या असतील? मी असते भारतात तर मी जाऊ शकले असते ना? उत्तरांतून प्रश्न आणि प्रश्नांतून उत्तरं असं चालू होतं.

आपल्या मनाला एक विलक्षण शाप आहे. जे आपल्याकडे नाही त्याचा विचार करत बसण्याचा आणि एक विलक्षण वरदान आहे. आपण जिथे नाही तिथे मनानेच जाऊन येण्याचं.

मी घरी गणपतीला नसण्याचा विचार करत बसले खरी. पण करता करता स्वतःच घरी एक फेरी मारून आले मनाने. आईने केलेले खव्याचे मोदक चाखले, आजीचे अंदाजपंचे बनवलेले उकडीचे मोदक अगदी शेंडी फोडून आत ओतलेल्या तुपासकट चाखून आले. उत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. दर चतुर्थीला करते तसा अण्णांना जाऊन नमस्कार करून आले. अगदी आमच्या बाईंचं गाणं पण ऐकून आले. अगदी उत्तरपूजेजे मंत्र म्हणताना झालेला बाबाचा कातर स्वरही ऐकला. आणि पुढच्या वर्षी लवकर ये, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर माफ कर आणि तुझं दर्शन घेणाऱ्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत असं निःस्वार्थी गाऱ्हाणं बाबाने देवाला घातलं की डबडबायचे तसे डोळे डबडबलेही.

गणपती जोरात साजरे झाले हेच खरं!

Thursday, August 20, 2009

मैत्रीण

सकाळी सकाळी स्टेशनला जायला निघाले. डोळ्यात पूर्ण न झालेली झोप होती. नव्या जबाबदारीचं थोडं टेन्शन.

माझा बॉस एकदम चक्रम आहे. कोणतीही व्यक्ती कोणतंही काम सहज करू शकते असा त्याचा गैरसमज आहे. म्या पामर ऍनालिस्टला त्याने सेल्स च्या कामाला जुंपलंय. काम तसं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नव्या क्लायंटला भेटणं, त्यांना आम्ही कसे चांगले आहोत च्या गोळ्या देणं वगैरे वगैरे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे साधारण तासाभराच्या मीटिंगसाठी मला तीन तास आधी निघावं लागतं. अर्धा तास एक दोन एक दोन करीत स्टेशनला पोचलं की मग तास सव्वा तास रेल्वेमध्ये झोपा काढायच्या. मग साधारण अर्धा तास ट्रॅममध्ये डुगडुगून काढला की आलं क्लायंटचं ऑफिस. ह्या सगळ्या व्यवस्थेतली माझे पाय सोडून जी इतर वाहनं आहेत ती कधीही त्यांच्या मर्जीनुसार बंद, धीमी होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी अजून अर्धा तास. बरं गाडीत झोप वगैरे झाली असल्याने माझा चांगलाच अवतार होतो. तो अवतार ठीक ठाक करायला अजून पंधरा मिनिटं.

एवढं सगळं करून क्लायंटची मीटिंग मेली तासाभरात संपते. आणि पुन्हा दोन तासाची वणवण करीत मी घरी येते.

काही दिवस हे प्रकरण चाललंय. रोज नाही जायला लागत पण बऱ्याच वेळा लागतं. रोज गाडीत एक छोटी मुलगी आणि तिची आई दिसतात. गाडी तशी भरलेली असते, पण समहाऊ आम्ही दोन तीन वेळा समोरासमोर आलो. हसण्याइतपत ओळख झाली. मुलगी जाम गोड आहे. गोरी गोरी पान. गालांचे लाल लाल टोमॅटो. निळे डोळे. निळे म्हणजे अगदी निळे. नेत्रदानाच्या ऍडमध्ये ऐश्वर्या रायचे दिसायचे तसले. आणि सोनेरी केसांना लाल निळी रिबीन बांधून केलेल्या दोन शेपट्या. दप्तरासारखी बॅग आईच्या हातात.

एकदा झटकन माझ्या लक्षात आलं की माझ्या पर्स मध्ये दोन किटकॅटचा एक मिनी पॅक आहे. मग तिच्या आईला विचारून तिला दिली. मग एकदम बाईंची कळी खुलली. इतके दिवस नुसती हसायची. आता भरपूर बोलते. फक्त न चुकता मला किटकॅटचा मिनी पॅक न्यायला लागतो. तिची आई मला ओरडते चॉकलेट दिलं की. पण माझी ही छोटी मैत्रीण एकदम चुणचुणीत आहे. तीच आईला सांगते, की ह्या पॅकमध्ये दोन किटकॅट त्यातली अर्धी मी "शॅमा", (म्हणजे म)ला देणार, अर्धी तुला देणार, एक उरली की त्यातली अर्धी मी खाणार आणि अर्धी जेसन ला देणार. मग काय हरकत आहे? जेसन म्हणजे तिचा भाऊ.

मग उठून माझ्या शेजारी येऊन बसेल, आणि सांगत राहील "शॅमा, टीचर गेव्ह मी धिस" करून एखादी ट्रॉफी दाखवेल छोटीशी. आपल्याकडे उत्तेजनार्थ बक्षीस देतात ना तसं काहीतरी. शॅमा लुक ऍट धिस, शॅमा डू धिस, गिव्ह दॅट, अशा ऑर्डरी सुटत राहतात. तिची आई तिला ओरडते मध्ये मध्ये. पण मला बरं वाटतं. तेवढाच वेळ जातो.

परवा माझ्या पर्सशी खेळत होती आणि माझं पाकीट काढलं पैशाचं. आत नाणी होती खूप. नोटा नव्हत्या. म्हणाली शॅमा यू आर सो रिच. यू हॅव्ह सो मच मनी. एव्हन माय बँक डसंट हॅव सो मच. असं चाललेलं असतं.

परवा अशीच एक मोठी सहा तासाची वारी करून घरी आले. रोज संध्याकाळी माझ्या दिवसात काय काय झालं ह्याचे डिटेल्स नवऱ्याला कंटाळा येईपर्यंत ऐकवायला मला खूप आवडतात. बऱ्याच वेळा तो लॅपटॉप उघडून बसलेला असतो किंवा टीव्हीसमोर असतो, तेव्हा. असं? वाह! ओके, येस, अशी उत्तरं टाकून तो माझं बोलणं ऐकतोय असं दाखवत असतो. पण परवा साहेब मुडात होते कसल्या कोण जाणे पण एकदम ऐकून घेतलं, मला ट्रॅव्हेलिंगचा त्रास होतो, दमायला होतं म्हणून चहा वगैरे केला. आणि मग म्हणाला उद्यापासून नो प्रॉब्लेम. तू आपली गाडी घेऊन जा. मला लांबच्या साईटवर जायचंय म्हणून पुढचे तीन महिने कंपनीची गाडी आहे.

सही! म्हणजे आता सगळी कटकटंच मिटली. उद्यापासून मला गाडीने जाता येईल, वेळ वाचेल, कमी दमायला होईल, लवकर घरी येता येईल, पण..

पण माझी छोटी मैत्रीण आता भेटणार नाही. पर्समध्ये मिनी किटकॅट कुणासाठी ठेवू? शॅमा, शॅमा करून मला कोण हाक मारेल? मी नाही दिसले आठवडाभर तर ती नाराज होईल का? शॅमा कुठे म्हणून आईला विचारेल का? एक ना एक हजारो प्रश्न ...

रोजच्या आयुष्यात आपल्याला हजारो लाखो लोकं दिसतात. त्यातल्या एखाद दुसऱ्याशीच आपला असा सूर जुळतो. आनंद देतो, पण शेवटी विरूनच जातो.

तसं नको व्हायला. छोटीला भेटायला तरी पुन्हा कधीतरी ट्रेनने गेलंच पाहिजे.

Thursday, August 13, 2009

आपली गर्दी

गेल्या आठवड्यात एका खास कार्यक्रमाला गेले होते. खास अशासाठी की इथे येऊन बरेच महिने झाले, पण मराठी बोलण्याची संधी फारशी मिळत नव्हती. कोणतंही कारण नसताना आमचं सगळं मित्रमंडळ अमराठी झालं होतं. पण परवाच्या कार्यक्रमात म्हणजे अगदी धन्य झाले. इतके सगळे मराठी लोकं एकत्र बघून एकदम अभिमान वगैरे वाटायला लागला. कशाचा ते माहीत नाही, पण खूप छान वाटलं.

खरंतर कार्यक्रमाची जागा आमच्या घरापासून बऱ्यापैकी दूर होती. येऊन जाऊन साडेतीन चार तासाचा प्रवास होता. मला कार्यक्रमाबद्दल माहिती होती, पण माझ्या नवऱ्याला मराठी कार्यक्रमात वगैरे फार रस नाहीये. मग त्याला बिचाऱ्याला एवढं ड्रायव्हिंग करून माझ्याबरोबर यायला लागलं असतं. म्हणून काही बोललेच नव्हते. अगदी आदल्या दिवशी चुकून (थोडंसं मुद्दाम) बोलून गेले, तर उत्साहाने नवरोबा तयार.

तिथे पोचलो तर इतकी लोकं होती. सगळी मराठी बोलत होती. मध्येच कुणीतरी इंग्रजी झाडणारंही होतं. बरीच मुलं मुली होती. ती मात्र सरळ इंग्लिशमध्ये बोलत होती. अगदी अनोळखी माणसंही हसत होती. बोलत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी पुस्तकांची खाण भेटली मला तिथे. आता हवी तितकी पुस्तकं वाचता येतील ह्या जाणीवेनेच एकदम छान वाटलं. बाकी काहीही मागितलं तरी बाबा लगेच हो म्हणायचा नाही. कंडिशन घालायचा. पिकनिकला जायचंय? मग अमुक रागाच्या ताना बसव, मगच जा. उगीचच नवा ड्रेस घ्यायचाय? मग अभ्यासातलंच काहीतरी कर आधी, वगैरे वगैरे. पण पुस्तक मागितलं तर मात्र दुसऱ्या दिवशी हजर. मी नुसतं पुस्तकाचं नाव घ्यायचा अवकाश. घरी माझ्या पुस्तकांनी भरलेलं एक कपाट आहे. अगदी चांदोबा, ठकठक पासून ज्ञानेश्वरीपर्यंत सगळं आहे. अर्थात ज्ञानेश्वरी मी कधी वाचली नाही. तसा तो पुस्तकांनी भरलेला टब पाहिला आणि एकदम भरून आलं.

कार्यक्रम सुरू झाला. थीम छान होती. तरुणांचा कार्यक्रम. सगळ्या लहान लहान मुलांनी कार्यक्रम बसवलेले. नाच होते, गाणी होती, नाटक सुद्धा होतं. मला तर एकदम आमच्या चाळीतल्या गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आठवण झाली. तोच बाज होता. देश फक्त वेगळा होता इतकंच. एका नाचामध्ये एका मुलीने थेट मला माझीच लहानपणाची आठवण करून दिली. नाचता नाचता मध्येच तिला तिचे आई बाबा दिसले असणार. पठ्ठी नाच सोडून त्यांनाच हात दाखवत बसली. आमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये एका नाचात मला परी केलं होतं. बाबा ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन येणार होता. नाच सुरू झाला तरी तो येईना. मग माझा चेहरा एकदम पडलेला. आईशेजारी तो दिसला तेव्हा मात्र एकदम कळी खुलली आणि मी चक्क नाच विसरून त्यालाच हात दाखवत बसले.

कशी गंमत असते ना? आई वडलांशिवाय पानही न हालणारे आपण कधी मोठे होतो, कधी त्यांचा घट्ट पकडलेला हात अलगद सोडून पुढे पसार होतो, ना त्यांना कळतं ना आपल्याला. मग कधीतरी अशा एखाद्या बेसावध क्षणी, कुणीतरी दुसऱ्याने त्याच्या आई बाबांचा घट्ट पकडलेला हात पाहिला ना, की आपल्या हातात त्यांचा हात नसल्याची जाणीव होते.

बाकीचे कार्यक्रमही छानच होते. मुळात सगळी मुलं असल्याने कार्यक्रमाला एक वेगळीच एनर्जी होती. त्यानेच खूप बरं वाटलं. तरुणांच्या कार्यक्रमात आपण नुसते प्रेक्षकांत बसून आहोत ह्याचं वाईटही वाटलं. पण खरंच सगळी मुलं विशीच्या आसपासची होती. मीही हळूहळू तरुण वयोगटातून रिटायर होत आहे असं उगाचच वाटलं. नवऱ्याला सांगितलं तर नुसतं हसला. म्हणाला तू हो म्हातारी आय ऍम यंग ऍट हार्ट. ह्याला काय उत्तर देणार? म्हटलं गप, मराठी कार्यक्रमात मराठी बोल उगाच इंग्लिश झाडू नको.

कार्यक्रम संपल्यावर जेवण पण होतं. ते ठीकंच होतं, पण सगळे लोकं आपापसात बोलत होते. कुणी कलाकारांचं जाऊन कौतुक करत होते. कौतुक म्हणजे कलाकाराचं इंधनच. पटकन मला वाटलं किती महिने झाले आपण परफॉर्म केलं नाही? पण एकंदरीतच लोकांच्या उत्साहात मी परफॉर्म करत नसल्याचं दुःख मागे पडलं. गर्दी खूप होती, पण आम्ही कुणालाच ओळखत नव्हतो. हॉलच्या एका कोपऱ्यात दोघंच उभे होतो. कुणी ओळखीचं दिसण्याची शक्यता नव्हतीच, पण तरीही ओळखीचे चेहरे शोधत राहिलो. नवरा म्हणाला निघूया का, म्हटलं थांब पाच मिनिटं.

ओळखीची नसली तरी ती गर्दी आपली वाटत होती. देशामध्ये गर्दीला नाकं मुरडणारी आम्ही, देशाबाहेर पडलो की मात्र तीच हरवलेली गर्दी शोधत राहतो.

असलेलं नको असणं आणि नको असलेलं हवं असणं, कुणाला चुकलंय?

Thursday, August 6, 2009

रेघोट्या

शेजारच्या घरातल्या आजी परवा दुपारी फिरायला गेले होते तेव्हा रस्त्यात भेटल्या. त्यांचं नाव करीन. मी त्यांना म्हटलं एका सुंदर बॉलीवूड ऍक्ट्रेसचं नाव करीना आहे. तर म्हणतात कशा, सुंदर आहे ना खूप? म्हटलं हो. मग म्हणाल्या तू मला करीन ऐवजी करीना म्हण. म्हटलं बरं. ह्या आजी त्यांच्या नवऱ्याबरोबर राहतात. आमच्या अगदी बाजूच्या घरात. नवऱ्याचं नाव डेव्ह. मला त्यांच्याशी नीट ओळख करायचीच होती. मग लगेचच त्यांना चहाला बोलावलं.

त्याचीही एक गंमत झाली. इथे "टी" ला बोलावलं तर त्याचा अर्थ संध्याकाळचं जेवण असा घेतला जातो. त्यामुळे ओळख नसताना कुणी एकमेकाकडे "टी" ला जात नाही. हा आधी शिकलेला धडा मी विसरले आणि त्यांना टी ला बोलावलं. आजी बाई जराश्या संकोचल्या म्हणाल्या "टी" नको, आम्ही फक्त थोडा वेळ येऊन जातो. मग माझं आपलं भारतीय आदरातिथ्य उफाळून आलं. म्हटलं चहा नको तर कॉफी करेन. मग आजीबाईंच्या सगळा घोळ लक्षात आला आणि माझ्याही. शेवटी फक्त चहाच प्यायला बोलावलंय हे कंफर्म करून करीना आजीबाई गेल्या.

शनिवारी संध्याकाळी पाचाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. करीनाआजी आणि डेव्ह आजोबा वेळेवर हजर. आजींनी जुन्या धाटणीचा एक ड्रेस घातला होता. गळ्यामध्ये मोत्याची सुरेख माळ. आजी चपला न काढताच आत घुसल्या. मला घरात कुणी चपला घालून आलेलं अजिबात चालत नाही. पण त्यांना सांगणार कसं. तितक्यात आजोबांनीच आजींना पाठी खेचलं. आणि चपला कुठे काढायच्या हे मला विचारलं. बहुतेक आमच्या पायात चपला किंवा बूट नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं असणार.

मग थोड्या इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या. आम्ही कुठून आलो काय करतो वगैरे आजोबांनी विचारून घेतलं. सगळ्या विषयांत त्यांना भारी रस. अगदी भारतात सासऱ्यांच्या वर्कशॉपमध्ये काय चालतं इथपर्यंत सगळं विचारलं. ते स्वतः खाणकामगार होते. आता रिटायर झालेत. पण त्यांची एकंदरीत शरीरयष्टी बघून ह्यांनी अनेक वर्ष अंगमेहनतीचं काम केलं असणार हे कळत होतं. आजी लोकल काउन्सिल मध्ये कामाला होत्या. त्यांनीही रिटायरमेंट घेतली होती. इथे एक गंमत आहे. माणसं अमुक एक वय झालं की रिटायर होत नाहीत. त्यांना वाटेल तेव्हा होतात आणि त्यांना वाटेल तितकी वर्ष ती काम करू शकतात.

आजोबांना चाय लाटे भयंकर आवडतो असं आजींनी बोलता बोलता सांगितलं होतं. त्यामुळे मी आजोबांना इंडिअन चाय लाटे बनवलाय असं सांगितलं. इंडियन चाय लाटे म्हणजे अर्ध्या दुधाचा कडकडीत उकडवून केलेला ताजमहाल चहा! बेकरीतून नवऱ्याने पेस्ट्रीज आणल्या होत्या आणि चितळ्यांच्या बाकरवड्या आमच्या घरी खोक्यांनी पडलेल्या असतात त्या काढल्या. घरी केलेला चिवडा काढला. झाली तयारी. आजोबांना बाकरवड्या खूप आवडल्या. आजींना कवळी असल्यामुळे त्या नीट खाता येणार नाहीत हे आजोबांनीच आम्हाला सांगितलं आणि आजी चिडल्या. मला एकदम पुलंच्या पेस्तनकाका आणि पेस्तनकाकूंचीच आठवण झाली. चहा मात्र दोघांना खूप आवडला. आजोबांनी तर पुन्हा मागून घेतला.

मग बराच वेळ ते दोघं खूप बोलत राहिले. आम्हालाही खूप बरं वाटलं. परदेशात आलेले आम्ही दोघं. त्यात ह्या गावांत भारतीयांचं दर्शन कमीच. आधीच्या शहरी तसं नव्हतं. ओळखी झाल्या होत्या. मित्रमंडळ जमलं होतं. इथे आल्यापासून प्रथमच कुणी घरी आलं, खूप बरं वाटलं. कुठे कुठे फिरून जमवलेल्या भिंतीवर लावलेल्या एकेका शोपीसचं जेव्हा आजोबांनी भरभरून कौतुक केलं तेव्हा मलाच अगदी पिसासारखं हलकं वाटलं. घरी पाहुणे येणं ही घरातल्या बाईची एक गरज आहे असं मला वाटलं. तिने छान ठेवलेल्या घराचं कुणी केलेलं कौतुक ऐकणं हे फक्त लोकांना घरी बोलावल्यावरच शक्य आहे.

बऱ्याच गप्पा झाल्या. आजोबा आजींना एक मुलगी आहे, तिलाही दोन मुलं आहेत. नातवंड मोठी हुशार आहेत. खेळात आणि अभ्यासातही पुढे आहेत. त्यांनी काढलेली ड्रॉइंग्ज बघायला लगेच आजींनी मला आमंत्रण दिलं. त्यांची मुलगी इथे नसते ती दुसऱ्या शहरात आहे. तिचा नवरा चायनीज आहे आणि त्याने बनवलेलं चायनीज आजोबा आजी दोघांनाही अजिबात आवडत नाही, इथपर्यंत गोष्टी झाल्या. वेळ कसा गेला कळलं नाही.

शेवटी आजी आजोबा जायला निघाले. आम्ही दोघंही त्यांना सोडायला दरवाज्यापर्यंत गेलो. आपले संस्कार कुठेतरी खोलवर मनात रुजलेले असतात आणि काही गोष्टी प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारख्या आपण करतो. दुसऱ्या देशी, दुसऱ्या संस्कृतीत कुठेतरी त्यांना आवर घालून ठेवावा लागतो. मला खूप वाटलं, त्यांना वाकून नमस्कार करावा. पण नाही करता आला. त्याऐवजी आजींनी जवळ घेऊन गालाला गाल लावला. अतिशय मायेने त्यांनी पाठीवरून हात फिरवला. एकदम थेट आजीच आठवली. अगदी मनात येईल तेव्हा मी आजीकडे जायचे. जे खावंसं वाटेल ते सांगायचे आणि तीही करून घालायची. आजी भारतात हरवली आणि आम्ही इकडे हरवलो. शेजारच्या आजी आजोबांची मुलगी दुसऱ्या शहरात हरवली आणि ते इथे.

आईचं रेघोट्यांचं पेंटिंग आठवलं. आमच्या हॉलमध्ये समोरच लावलेलं आहे अगदी. तिचा विचार हा की माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं.

असं बनतंय आमचं इथलं रेघोट्यांचं पेंटिंग.

Thursday, July 30, 2009

तीन पायाची शर्यत

शनिवारी सकाळी सकाळी एकटीच गाडी घेऊन बाहेर पडले. शनिवार आणि रविवार म्हणजे आमच्या घरी दिवस रात्र झोपण्याचे वार. पण दिवस रात्र झोपणं मला झेपण्यातलं नाहीच आहे. मग काय करा? सकाळी सकाळी लवकर (म्हणजे ८ वाजता. पतिराजांच्या मानाने ही पहाटच) उठले काढली गाडी आणि निघाले. दोन पर्याय होते. एक म्हणजे जवळच्याच मोठ्या शहरात जायचं किंवा समुद्राच्या कडेकडेनं जाणाऱ्या रस्त्याने लांब भटकायचं.

गाडीत बसले. गॅरेज उघडलं. बाहेर पडणार इतक्यात वाटलं नवऱ्याला विचारावं येतो का ते. नाही म्हणणार हे पुरतं माहीत होतं पण तरीही तिथूनच गाडीत बसल्या बसल्या फोन केला. बराच वेळ वाजून व्हॉईस मेसेजवर गेला. त्याला तिथेच व्हॉईस मेसेज ठेवला की मी जात आहे. दुपारपर्यंत येईन. शेवटी करता करता समुद्राचा रस्ता पकडला. तसा दिवस उगवला असला तरी लोकं उगवायची होती त्यामुळे रस्ते रिकामेच होते. भरभर गाडी चालवत समुद्राजवळच्या रस्त्याला लागले. जिथे जिथे म्हणून थांबता येणं शक्य होतं तिथे तिथे थांबले. नवऱ्याचा नवा कोरा एसएलार कॅमेरा घेतला होताच अशक्य फोटो काढले.

थंडी होतीच. हुक्की आली म्हणून खिडकीच्या काचा उघडल्या. भन्नाट वारा सुटलेला अंगाला झोंबायला लागला. किशोरीताईंचा तोडी लावला होता. एकेक मधामध्ये सत्तर सत्तर वर्ष घोळलेला स्वर. तो कोमल ग. एकदम माझ्या गाण्याच्या बाईंची आठवण झाली. एका स्पर्धेत तोडी म्हणायचा होता. त्याची तयारी करून घेत होत्या त्या. मी लहानंच होते. सूर कळण्याचं वय नव्हतं. पण मी योग्य तेच गावं हा त्यांचा हट्ट. तोडीमध्ये कोमल ग, अतिकोमल लागला पाहिजे. कितीदा रटवून घेतलं होतं. अख्ख्या गाण्यापेक्षा अतिकोमल ग चा रियाज जास्त करून घेतला होता. स्पर्धा झाली. बक्षीस मिळालं. पण बाई रागावल्या. म्हणाल्या एवढं शिकवून आलं कसं नाही तुला? बक्षीस मिळाल्याच्या कौतुकापेक्षा सूर हवा तसा बरोबर लागल्याचं कौतुक त्यांना जास्त. अशा आमच्या बाई. गचकन कुणीतरी हॉर्न मारला आणि बाई आठवणीत हरवून गेल्या परत.

एका ठिकाणी उतरले उंचावरची जागा. समोर अथांग समुद्र पसरलेला. वारा सुटलेला, त्याची सुरावट कानात. किती वेळ झाला कोण जाणे समाधीच लागली. समुद्राचा आणि माझा एक विलक्षण ऋणानुबंध आहे. तो कसाही असला तरी मला आवडतो. अगदी ओहोटीचा हिरमुसलेला दिसणारा असला तरी आणि उधाणलेला भरतीचा असला तरी. अख्खं विश्व पोटात गुडुप करून ठेवण्याची ताकद आहे त्याची. त्याच्याकडे बघताना भारावून जायला होतं.

नवऱ्याच्या फोनने भानावर आले. नुकताच उठला होता. मला म्हणाला मला का नाही उठवलं. म्हटलं मित्रा, मी फोन केला होता. तू उचलला का नाहीस. म्हणाला, काय बाई एका घरात राहून एकमेकांना फोन करतो आपण. मी म्हटलं मग काय बुवा, एका माणसाला झोपण्यापुढे काही सुचत नाही. आणि दोघंही जोरजोरात हसलो. इतकं की बाजूला गाडी लावून उभी असलेलं एक अख्खं कुटुंब माझ्याकडे बघायला लागलं. मग मी गाडीत जाऊन बसले आणि चक्क नवऱ्याबरोबर तासभर गप्पा मारल्या. मी त्याला जेवायला येते म्हणून निरोप ठेवला होता आणि इथे गाडीत अर्ध्या रस्त्यातच जेवायची वेळ झाली.

मग काय फिरले परत. घरी पोचते तर शिरता शिरताच मस्त जेवणाचा वास आला. नवरोबा मुडात होते तर आज. एकदम त्याची लाडकी चिकन करी आणि कोकोनट राईस वाटच बघत होते. मग काय? दोघांनी मिळून फडशा पाडला.

माझं मलाच हसायला आलं. आमच्या वाडीत उत्सवाच्या वेळी दर वर्षी तीन पायांची शर्यत असायची. ती आठवली. मी आणि रमा नेहमी भाग घ्यायचो. रमा म्हणजे माझी बेस्ट फ़्रेंड. अजूनही आहे. माझ्याशिवाय तिचं आणि तिच्याशिवाय माझं अजिबात पान हलायचं नाही. पण तीन पायाच्या शर्यतीत एकदा पाय बांधले की आमची धमालच व्हायची. कधी तिचा पाय पुढे कधी माझा पाय मागे. असं करत करत पंधरा वेळा पडायला व्हायचं. मग ती माझ्यावर चिडणार किंवा मी तिच्यावर चिडणार. कशी बशी आम्ही लाइन ओलांडायचो. ते एकदा मात्र झालं की वेड लागल्यासारखं हसायचो. आम्ही कसे पडलो, लोक आम्हाला कसे हसले, मग आम्हीच एकमेकीवर कसे चिडलो आणि ओरडलो, कधी तिने मला कसं खेचलं कधी मी तिला कसं ढकललं ह्याचीच मजा. तेव्हा वाटायचं एवढ्या आम्ही जीवा भावाच्या मैत्रिणी मग आमचे पाय एका लयीत का पडू नयेत?

आताशा थोडं कळायला लागलंय की हे लग्न प्रकरण म्हणजे पण तीन पायाची शर्यत आहे. एकट्याने चालायचा प्रयत्न केला तरी चालता येत नाही आणि दोघांनी एकत्र चालता चालता एकमेकांच्या चालण्याशी जुळवून घेतानाच दमछाक होते. पडणं होतं, रडणं होतं. पण सगळ्यात शेवटी आपण एकत्र काहीतरी अचीव्ह केला हा आनंदही असतो.

अशी आहे आमची तीन पायाची शर्यत. पडणे, रडणे आणि खळखळून हसणे ह्या चक्रातून जाणारी.

Thursday, July 23, 2009

धुमसतं बर्फ

उद्या बर्फात जायचं. शुक्रवारी ओरडतंच नवरा घरात शिरला.
त्याच्या एका कलीगबरोबर त्याने प्रोग्रॅम ठरवून पण टाकलेला. त्याच्यापेक्षा खरंतर मलाच ह्या सर्व गोष्टींचा उत्साह जास्त आहे. प्रचंड उत्साहात करण्याची एकंच गोष्ट त्याला माहीत आहे. ती म्हणजे झोपणे. शनिवारी-रविवारी चांगलं बारा वाजेपर्यंत ताणून देऊन अर्धा विकेंड लक्षात न राहिलेली स्वप्न बघण्यात घालवायचा हा त्याचा शिरस्ता. तर विकेंडला लवकर उठून पूर्ण दिवस सत्कारणी लावायचा हा माझा. त्यामुळे आम्ही एकत्र फिरायला वगैरे जाण्याचा योग मणिकांचन किंवा दुग्धशर्करा वगैरे जे प्रकरण आहे त्यात मोडणाराच. त्यामुळे अजून बरं वाटलं.

ठिकाण तर ठरलेलं होतं. त्यापुढे माझा आणि त्याचा अजून एक वादाचा विषय. त्याला पोचायची घाई फार. मला अजिबात नाही. किती वेळात पोचलात ह्यापेक्षा कसे पोचलात. प्रवासात मजा केली का? किती ठिकाणी उतरलात? कोणत्या नव्या जागा पाहिल्यात? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची मजा मला खूप वाटते. म्हणजे ते रक्तातच आहे. गोव्याला जाताना आम्ही तीन तीन दिवस लावलेत मुंबईहून. बाबाचं म्हणणं, रोज एक वेगळी पिकनिक करायची. वाटेल तिथे थांबावं. हवा तितका वेळ मज्जा करावी आणि वाटेल तेव्हा पुढे जावं. त्यामुळे मला अगदी सगळीकडे उतरून वेळ घालवावासा वाटतो. अरे थांब ना जरा म्हटलं, की म्हणणार. बर्फात चाललोय ना? मग हे झरे नि झाडं नि पक्षी काय बघत बसतेस. हा. काय करा? जोरजोरात पळत सुटा, गाडी दोन आकडे वरच चालवा स्पीड लिमिटच्या. करत करत शेवटी पोचलो.

पुढे एका ठिकाणी गाडी थांबवून गाडीच्या चाकांना चेन लावावी लागली म्हणजे गाडी बर्फावर घसरत नाही. ती लावायला म्हणून नवरा बाहेर उतरला. मला पण उतरायची हुक्की आली. उतरले पण बाहेर मरणाची थंडी होती. त्यामुळे लगेच आत येऊन बसले. लगेच नवरा म्हणाला, आता जिथे जिथे थांबायचं असेल तिथे सांग नक्की थांबवणार. फक्त उतरायचं आणि बाहेर जाऊन यायचं. झालं आता सगळा वेळ त्याला हे पुरणार होतं.

वर पोचलो. स्कीइंग करायचंच होतं. मग त्याचे कपडे आणि स्कीज घेतले होतेच. पण ते स्कीज पायावर चढवायची वेळ आली तेव्हा खरा प्रॉब्लेम झाला. स्कीज लावले की उभंच राहावं लागतं. पडलात तर स्कीज सोडवून उभं राहून परत घालावे लागतात. असं करता करताच बराच वेळ गेला. त्याच्या मित्रानं आम्हाला शिकवलं. पण माझी प्रगती न पडता एका ठिकाणी उभं राहण्याइतपतच झाली. नवऱ्याला बाकी जमलं. त्याने आधीही केलेलं होतं. थोड्या वेळाने मी स्कीज उतरवले आणि सरळ खांद्यावर घेऊन फिरायला लागले. दुसऱ्या दिवशी खांदा खूप दुखत होता.

नवरा आणि त्याच्या मित्राचं स्कीइंग जोरात चालू असल्याने मी एकटीच राहिले.

मग कॉफीचा एक कार्डबोर्ड कप घेऊन निवांत एका ठिकाणी बसले. समोर सगळं पांढरं जग होतं. माझ्या समोरूनच एक छोटी मस्तपैकी स्कीइंग करत गेली. माझ्या कंबरेपर्यंतपण नसेल तिची उंची. रंगीबेरंगी कपड्यातली माणसं, सगळ्यांच्या गोंड्याच्या कानटोप्या. कुठेच नजरेत भरणारी एखाद्या देशी माणसाने किंवा बाईने घातलेली मंकी कॅप. बर्फावरून मस्त घसरणारी, एकमेकांवर बर्फ फेकणारी मुलं. त्यांना ओरडणाऱ्या आया, आणि मुलांना सामील होऊन ओरडणाऱ्या आयांचा अंगावर बर्फ उडवणारे बाबा. कुठे बर्फावर घसरत आइसक्रीम खाणारी जोडपी.

काही कारण नसताना उगाचच मला भरून आलं. कशामुळे? खूप विचार केला पण तरीही समजलं नाही. कदाचित अशा एखाद्या गर्दीने भरलेल्या क्षणी खूप एकटं वाटून जातं, एकटं नसतानाही. तसंच झालं असावं माझं. पुन्हा फिरून आपण काय करतोय, आपल्याला काय करायचं होतं? बर्फाने भरलेले डोंगर स्कीज लाऊन धडाधड उतरावं, तसं माझं मन ओळखीचीच वळणं घेत घेत तळाला कधी जाऊन पोचलं कळलंच नाही. तळाला पोचल्यावर, पुन्हा कधीतरी घसरत खाली येण्यासाठी, मोठ्ठा डोंगर चढावा लागणार ह्याची जाणीवही झाली.

तेवढ्यात नवरा आणि त्याचा मित्र दमून भागून आले. त्याला लहान मुलासारखं लांबून हात हलवत माझं लक्ष वेधून घेताना पाहिलं आणि खुदकन हसायलाच आलं. खांद्यावर स्कीज टाकून पुन्हा एकदा मी निघाले. डोंगर चढायला.

बर्फावरची भुरभूर सुरू झाली. धुमसत्या बर्फावर आकाशातून पडणाऱ्या बर्फाने चादर घातली. धुमसतं बर्फ क्षणभर हसलं. पुन्हा आतल्या आत धुमसण्यासाठी.

Thursday, July 16, 2009

माणसांची सवय आणि सवयीची माणसं

हल्ली घरून काम करतेय. म्हणजे ऑफिसात अजिबात जायचंच नाही. अगदी अख्खा दिवस, अख्खा आठवडा घरून काम. पहिल्यानं वाटलं, मज्जाच मज्जा. घरी मी एकटीच त्यामुळे काहीही करा, वॉच ठेवायला बॉस नाही, कलिग्ज नाहीत, कुणीच नाही. मनाला वाटेल तेव्हा काम करायचं, नाही वाटणार तेव्हा सोडून द्यायचं. झोप काढावीशी वाटली, झोपायचं अगदी काही न करावंसं वाटलं तर तसं करायचं. पण ह्या सगळ्याच्या शेवटी काम तर वेळच्या वेळी झालंच पाहिजे ना.

आता एक आठवडा होत आला. आताशा कंटाळाच यायला लागलाय. म्हणजे, जिथे राहायचं तिथेच काम करायचं आणि काम संपल्यावर पुन्हा जिथे काम केलं तिथेच राहायचं. सकाळची ट्रेन गाठायची धावपळ नाही, की डबा भरायची दगदग नाही. नवरा आपला बिचारा त्याची वेळ झाली की उठतो, फ्रीजमध्ये काल भरून ठेवलेला डबा उचलतो आणि चालता होतो. तो गेलाय हे कळेपर्यंत तो बहुतेक ऑफिसात पोचलेला असतो. मग कंटाळत उठून कामाला सुरवात करायची. अगदीच एकटं एकटं वाटलं तर आरशात जाऊन बघायचं, नाहीतर काहीतरी काम काढून नवऱ्याला फोन करायचा किंवा जॉर्जीला करायचा किंवा आणखी कुणालातरी. कुणालातरी गूगलवर सतवायचं, असले उद्योग चालू असतात.

पण दुपार सरायला लागते, तसं मग कामाचं टेन्शन वाढतं, कारण अमुक एक काम आज संपवायचं असतं. तमुक एक प्रेसेंटेशन संपवायचं असतं कारण बॉसची मीटिंग असते. विकली मीटिंगमध्ये उगाचच उत्साहाने एखाद्या कलीगला मदत करायचं आता नकोसं वाटणार ओझं घेतलेलं असतं ते आठवायला लागतं. कल करेसो आज कर आज करेसो अब चं एकदम उलटं माझं चाललंय. अब करेसो आज कर, आज करेसो परसो.

आणि वर घुम्यासारखं घरात एकटं राहणं. तसं एकटं राहण्याच्या मला प्रॉब्लेम नाही. इन फॅक्ट, एकटं राहायला मला आवडतं कधीकधी. म्हणजे मी गमतीत म्हणायचे, की मी हरवून एखाद्या व्हर्जीन आयलंडवर वगैरे पोचले तर आरामात एकटी राहू शकीन (तिथे पाली आणि झुरळं नसतील तरच. मला त्यांची अनावर भीती वाटते). पण खूप कठीण आहे. जस्ट टू चेंज युअर एन्व्हायरमेंट, वन नीडस टू गो टू ऑफिस.

माणसं किती आवश्यक आहेत एकंदरीतच आयुष्यात. ऑफिसात इतकी माणसं असतात, त्यांच्याशी आपण बोलतो, नाही बोलतो, हसतो, कधी कधी नाही सुद्धा हसत, पण त्यांचं नुसतं असणं किती आनंददायक असू शकतं ते मला आता कळतंय. मग ह्यावर उतारा म्हणून भर दुपारी फिरायला (आणि मनात असेल तेव्हा पळायला) जायचं काढलंय. लंच टाइम वॉक. भर दुपारी व्यायाम हा प्रकार भारतात एकदम भारीच वाटेल. पण इथे सकाळी आणि संध्याकाळी एवढी मरणाची थंडी असते की मी बाहेर गेले तर माझा गोठून पुतळा होईल. एकदम हाउस ऑफ वॅक्स सारखा फक्त मेणाशिवाय बनवलेला.

हळू हळू शेजार पाजाराची माणसंही ओळखीची व्हायला लागलीत. आमचा हा गाव म्हणजे तसा म्हाताऱ्यांचाच गाव आहे. एका बाजूला एक म्हातारे आजोबा आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक म्हातारे आजी आजोबा आहेत. आजी आजोबांचं काहीनं काही चाललेलं असतं. अजून फारशी ओळख नाहीये. पुढे मागे वाढली की त्यांना चहाला बोलवायचा विचार आहे. एकटे आजोबा आहेत त्यांचं बहुतेक त्यांच्या बागेवर प्रचंड प्रेम आहे. घराच्या खिडकीतून त्यांचं अंगण दिसतं. सतत काही ना काही बागेत चाललेलं असतं. जाता येता कधी दिसले तर हात करतात आणि जोरात ओरडतात "गूड डे".

मी फिरायला जाते तेव्हा मला अजून एक आजी दिसतात. बरोबर त्याच वेळी त्या त्यांच्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडतात. नाक्यावरच्या प्लॉटवर घराचं काम चाललं आहे, तिथले ट्रेडस्मन दिसतात. बघून बघून हाय हॅलो सुरू झालं आहे. आमचं लॉन कापायला एक अजून एक आजोबा आहेत. ते बरीच घरं करतात आमच्या स्ट्रीटची, ते दिसतात. कधी घरी पैसे घ्यायला ते येतात. तेव्हा थोड्या गप्पा होतात.

आपल्याला माणसांची सवय होते आणि सवयची माणसं दिसली नाहीत की चुकल्यासारखं होतं. होतं काही दिवस पण मग नवी माणसं सवयीची व्हायला लागतात आणि मग ते चुकचुकणं कमी होतं. तसंच काहीसं माझं चाललंय.

एकटी एकटी म्हणून आता मीही माझा गोतावळा जमवायला सुरवात केलीच आहे की.

Monday, July 6, 2009

होडी

बऱ्याच दिवसांनी आज निवांतपणा मिळाला. दिवसभराच्या लढाईत इतकं हरवून जायला होतं की आपला म्हणून काही वेळ असू शकतो हेही लक्षात राहत नाही. हल्ली हल्ली तर तो असावा अशी अपेक्षासुद्धा नाहीशी होत चालली आहे. पण आज तसं नाहीये. बऱ्याच दिवसांनी एकटीनंच घरी बसून आळोखे पिळोखे देत दिवस घालवायची संधी चालून आली. आणि दोन्ही हातांनी मी ती संधी आपलीशी केली.

सकाळी उशीरानेच उठले. उठल्यावर काहीच करायचं नसल्याने एकदम बावचळल्यासारखं झालं. मग चहा करायचं ठरवलं. फ्रीज उघडून बघते तर आतमध्ये दुधाच्या डब्या ठेवलेल्या. प्रत्येक डबीत फार फार तर तीन चमचे दूध. अशा फारा डब्या रिकाम्या करून चहाचा घाट घातला. कुठल्याश्या मंद इंग्लिश चहाच्या डिप डिप पिशव्या सापडल्या. त्या तशाच टाकाव्या का फोडून चहाची पावडर पातेल्यात टाकावी ह्याचा विचार करता करता आधण उकळलं सुद्धा. गाळणं मिळालं नाही, मग तशाच पिशव्या पातेल्यात टाकल्या. चहाची चव आणि चहाचा रंग हे दोन्ही चहा पिण्याच्या एक्स्पिरियन्सचा अविभाज्य भाग आहेत. आणि रंग चांगला आला नाही तर चव चांगली लागत नाही, असं हे जुळ्याचं दुखणं. अर्ध्या पातेल्याचा ढग झाला तरी हवा तो रंग येईना. मग जसा झाला, ज्या रंगाचा झाला तो चहा मगात घेऊन खिडकीपाशी आले.

पावसाची रिपरिप चालूच होती. खिडकीच्या काचेपाशी येऊन चहाचा एक घोट घेतला आणि एका उःश्वासासरशी मनातलं धुकं काचेवर दाटलं. मग उगाचच काचेवर धुक्याचं पेंटिंग करत राहिले बराच वेळ. काच भरली की मग बोटांच्या ब्रशनी त्याच्यावर नक्षी काढायचा खेळ. मग उगाचच थंड काचेला गाल चिकटवून खिडकीबाहेर बघत राहणं. वेळ कसा गेला कळलं नाही.

पावसाचा जोरही थोडा वाढला. खिडकी उघडली आणि थंड हवेचा झोतच अंगावर आला. देशातला पाऊस असा कधीच नव्हता. हा पाऊस दूर लोटणारा वाटला. देशातला पाऊस जवळ घेणारा. मनसोक्त भिजता येण्यासारखा. हा पाऊस गरम गरम चहाचा कप घेऊन हीटरच्या शेजारी खुर्ची टाकून स्वेटर बिटर घालून बंद काचेतून बघायचा पाऊस. एखाद्या रम्य चित्रासारखा, पण तरीही आपल्याला त्या चित्रात सामावून न घेणारा. एकलकोंडा.

हॉटेलच्या नावासकट ठेवलेलं एक नोटपॅड दिसलं. हॉटेलात नोटपॅड का ठेवत असावेत हे मला समजत नाही. कुणीही कधी त्यावर काही लिहिलेलं ऐकीवात नाही. लहान होते, आणि कधी अशा हॉटेलात राहायची वेळ आली तर मात्र न चुकता ती नोटपॅड्स उचलून घरी घेऊन यायचे मी. छान छान कागद त्यावर मस्तपैकी हॉटेलचं नाव छापलेलं. आणि त्याचा एक एक कागद आवाज न करता फाडता यायचा. मग त्याची बसची तिकिटं व्हायची. बसची का? विमानाची पण व्हायची. आमच्या विमानात पण कंडक्टर असायचा आणि तो सगळ्यांना विमानात चढल्यावर तिकिटं द्यायचा. मला कंडक्टर व्हायला खूप आवडायचं, अगदी ड्रायव्हरपेक्षाही.

मनात काय विचार आला कोण जाणे, म्हटलं कागदाची होडी करू. जरा आठवून आठवून बनवायला लागले. पण मला नुसती शिडाची होडी बनवता येईना. नांगरहोडी मात्र बरोबर जमत होती. कुणी होडी बनवायला शिकवली आठवत नाही. बहुतेक बाबानेच. पण साधी शिडाची होडी बनवणं सोपं असतं आणि नांगरहोडी बनवणं कठीण असतं एवढं आठवत होतं. पण तरीही साधी शिडाची होडी काही जमली नाही. कठीण आणखी कठीण आणखी आणखी कठीण अशा पायऱ्या चढत जाताना कुठेतरी आयुष्यातलं साधं सोपं कुठेतरी हरवून जातं ना? तशीच माझी साधी शिडाची होडीही हरवून गेली.

शेवटी नांगराच्या होडीचं नांगत कात्रीने कापून टाकलं आणि झाली तय्यार माझी साधी शिडाची होडी. मग हळूच दारासमोरच्या पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोचले आणि आजूबाजूचं कुणी मला बघत तर नाही ना असं बघून ती होडी सोडून दिली खालच्या पाण्यात. पाहत राहिले अगदी नजरेआड होईपर्यंत. जिथपर्यंत दिसली तिथपर्यंत दिसली, पुढे तिचं काय झालं? कशात जाऊन ती शेवटी बुडली असेल, किंवा किती लांब गेली असेल, किंवा एखाद्या लहान मुलाला ती दिसली असेल आणि त्याने ती उचलून घेतली असेल, की कुणाच्या पायाखाली येऊन ती मोडली असेल, ह्याचाच विचार बराच वेळ करत राहिले.

थंडी असह्य झाली तेव्हाच भानावर आले. शहर बदललं पण प्रवास थांबणार का? नाही. माझी नांगर कापून टाकलेली शिडाची होडी अशीच वाहवत जाणार, पाणी नेईल तिथे.

पण त्या वाहून जाण्यातही एक मजा आहेच की?

Thursday, May 21, 2009

वाट पाहण्याचा खेळ

मेपलच्या झाडाची पानं पडायला लागलीत. हिवाळा आता काही फार दूर नाही. हवेतला गारवा वाढायला लागलाय. हल्ली संध्याकाळी, पडत्या उन्हाच्या किरणांच्या शाली पांघरून येईनाश्या झाल्यात. त्याऐवजी काळ्या रंगाच्या अंधाराचं जाजम पांघरूनच त्या पसरतायत.

गोधुल्या वेळी सूर्याने आपला पसारा आवरत घेतला की उगाचच रिकामं रिकामं वाटतं. नारायणाचं दुकान बंद झालं की उरतो हताश रिकामपणा. अंधार. अंधाराची मला भीती वाटते. अंधारापेक्षासुद्धा लांब लांब होत चाललेल्या सावल्या ज्या वेळी नाहीश्या होतात ती वेळ मला भीती घालते. म्हणूनच कदाचित तिला दिवेलागणीची वेळ म्हणत असावेत. संध्याकाळी मी घरी पोचते. दाराचा रिकाम्या घरात घुमणारा आवाज असह्य वाटतो. दिवसाउजेडी प्रकाशाने भरून गेलेला आमचा दिवाणखाना संध्याकाळी एकदम ओकाबोका वाटतो. जणू काही आम्ही तिघं राहतो तिथे. मी, तो आणि अख्ख्या घरात भिंतीएवढ्या खिडक्यांतून पसरून राहिलेला उजेड. उन्हाळ्यात मला घरी कधी एकटं वाटलं नाही कारण घर उजेडानं भरलेलं असायचं.

हल्ली वाटतं. रस्त्यावरच्या दिव्याचा चोरून खिडकीवाटे घरात शिरणारा प्रकाश पराभूत सैनिकाप्रमाणे वाटतो. त्याच्या पराभवाची छाया मग माझ्यावर पडायला लागते. तो अंधार मग माझ्यातला उत्साह शोषून घेतो. मलाही करून टाकतो निस्तेज आणि निरर्थक

मग मी काय करते? चटकन हात पाय धुते आणि देवाघराकडे जाते. अगदी निरांजनात वात लावण्याचादेखील धीर नसतो. तेव्हा असं वाटतं आधी कुणी वात लावून ठेवली असती तर? पण मग मलाच त्यातला फोलपणा जाणवतो. कारण सकाळी घाई गडबडीत पूजा करून तेवत्या निरांजनाला एकटं सोडून मीच नाही का निघून जात? घाईघाईने वात निरांजनात लावून घट्ट झालेलं तूप कसंबसं त्यात घालून काड्यापेटीने दिवा लावला की मग थोडा हायसं वाटतं.

त्या तिथे तेवत्या निरांजनासमोर देवासमोर हात जोडून एकटीनेच उभी असताना गळ्यात विलक्षण कढ दाटून येतो. कंटाळा करून आईचा ओरडा खाऊन म्हटलेलं शुभंकरोती आठवतं. शुभंकरोती नाही, आईच आठवते. लहानपणाचे दिवस आठवतात. तेव्हाही संध्याकाळी अशीच चलबिचल व्हायची मनाची. आधी आई यायची घरी मग बाबा यायचा. दिवे लागले की खूप मस्त वाटायचं. आता कुणीच येणार नसतं बराच वेळ.

देवघराच्या निरांजनासमोर प्रकाशात दिसणाऱ्या इटुकल्या पिटुकल्या देवांच्या मूर्ती पाहिल्या की स्थिर वाटतं. मग मी उगीचच अख्ख्या घरातले दिवे लावते. तरीही समाधान होत नाही, मग रेकॉर्ड प्लेयर लावते. तिथेही मारवाच लागतो. हृदय पिळवटून टाकणारे मारव्याचे सूर मला खूप आवडतात, पण त्याक्षणी असं वाटतं की नको हा मारवा. अजूनच उदास उदास करून टाकतोय मला.

मग उशीरापर्यंत मी काही बाही करत राहते, स्वैपाक, थोडी इकडली तिकडली कामं ह्यात जीव रमवत राहते. काम करता करता मन आठवणींचा खेळ खेळायला लागतं. नाजूक सोन्याच्या कड्यांनी बनवलेल्या नेकलेससारख्या एकात एक गुंफत एकमेकीचे हात धरून आठवणी फेर धरतात अगदी नवरात्रीतल्या भोंडल्यासारख्या.

सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुणा आलाय गं बाई आलाय गं बाई. मग एकेक पाहुणा एकेका आठवणीच्या गाडीत बसून येतो. आई येते, ओरडून जाते. बाबा येतो रडवून जातो. भाऊ येतो चिडवून जातो, मैत्रिणी येतात सुखावून जातात, नवरा येतो चिंबवून जातो. थोड्या वेळासाठी का होईना आपल्या माणसात असल्याचा आभास निर्माण होतो. कधी आजी आठवते. तिची अंगाई आठवते.

आमच्या गं दारावरनं, कुणाची गं गेली रंगीत गाडी, त्यात होती भावा बहिणींची जोडी, विनू शमा. आजीचा तो आवाज, डोळ्यात हमखास पाणी आणणारी अंगाईची चाल. सगळं सगळं आठवतं. अगदी आजीच्या कुशीत ही अंगाई ऐकल्यावर स्फुंदून स्फुंदून रडणारी मी सुद्धा आठवते.

आठवता आठवता कधी डोळा लागतो कळतंच नाही. मग रात्री थंडीने टोचून टोचून हैराण केलं की मग उठून पांघरुणात शिरायचं.

ओट्यावर केलेला स्वैपाक खाणाऱ्या तोंडाची वाट पाहत एकटा पडून राहतो. निरांजन कधीच विझलेलं असतं तेही पुन्हा कोण वात घालील, तूप घालील आणि मी प्रकाशमान होईन ह्याची वाट पाहत बसलेलं असतं. आतमध्ये विझलेली मी आणखी एका उजळ दिवसाची वाट पाहत पडून असते.

माझ्या पिटुकल्या जगात हल्ली असा वाट पाहण्याचा खेळ चालू असतो.

- संवादिनी

Thursday, April 2, 2009

जॉर्जी

काल संध्याकाळी ऑफिस सुटता सुटता जॉर्जी भेटली. तिला पाहिलं ना की मला फुलपाखराची आठवण येते. एकतर अतिशय सुंदर निळे डोळे आहेत तिचे. सोनेरी केस आणि अगदी उमललेल्या फुलासारखं टवटवीत हसणं. नाकी डोळी एकदम नीटस आणि मनाने खूप चांगली. अवखळ, मस्तीखोर पण कामातही हुशार. अशा ह्या उत्साहाच्या कारंज्याला दुष्काळानं गाठलं असं म्हणावा असा तिचा चेहरा झालेला.

बाईंचं काहीतरी बिनसलं होतं. तशा आम्ही काही फार जवळच्या नव्हे. मी इथे येऊन जेवढे दिवस झाले तेवढीच आमची ओळख. एकत्र काम करतो म्हणून झालेली. पण मग थिएटरची तिची आवड आणि माझी नाटकाची आवड असेल किंवा उगाचच निष्कारण बोलत बसण्याची सवय असेल आमची थोडीशी घसट वाढली, पण तरीही तीच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मला आणि माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल तिला काहीच माहीती नव्हती. तरीसुद्धा न राहवून मी तिला विचारलंच काय झालं म्हणून.

खोटंखोटं हसून ती काही नाही कामाचा ताण आहे वगैरे बोलली. लिफ्टमधून आम्ही एकत्रच उतरलो. उतरल्यावर आमचे रस्ते वेगळे आहेत म्हणून मी तिला बाय म्हणून वळले आणि चालायला लागले. तितक्यात तिने पाठून हाक मारली. म्हणाली काय करणारेस घरी जाऊन? काही खास? म्हटलं अजिबात नाही. मला काहीही करण्यासारखं नाहीये घरी. म्हणाली चल लेटस हॅव्ह अ ड्रिंक. म्हटलं बाई, मला एखदं ड्रिंकसुद्धा झेपत नाही. मी नुसती कंपनी द्यायला येते. म्हणाली चालेल.

जवळच्याच एका कॅफेमध्ये आम्ही दोघी शिरलो. रस्त्याच्या जवळचं, काचेला खेटून असलेलं एक मस्त टेबल पकडलं. आग्रह करून करून शेवटी मला तिने एक कॉकटेल घ्यायला लावलंच. कुठल्या कुठच्या आम्ही दोघी. पण मैत्रीणीच्या अधिकाराने तिने मला आग्रह केला आणि मलाही मोडवला नाही. बराच वेळ तिथे बसलो होतो. जॉर्जी पीत होती, सिगरेट ओढत होती आणि बोलत होती.

धरणाचे दरवाजे उघडावेत आणि बदाबदा पाणी कोसळावं तसं बोलली. तिचा देश, तिचं शहर, तिची आई. घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारा बाप. दारू पिणारा, दारूच्या नशेत बायका पोरांना बडवून काढणारा. म्हटलं काय वेगळं आहे गं तुमच्या आणि आमच्या देशात? जिथे पुरुष आहे, दारूचा अतिरेक आहे, तिथे बाईचं मार खाणं आलंच. मग देश कुठलाका असेना? एकेक पाव खाऊन दिवस काढलेत तिने लहानपणी, पावाबरोबर मांसाचा तुकडा मिळाला म्हणजे एकदम मेजवानी असं काहीसं जगणं. साम्यवादाचा पगडा, मग त्यातून झालेली सुटका, मोकळा श्वास. शिकण्यासाठी लंडनला येणं, तिथून इथे येणं. किती मोठा प्रवास तिचा. मी अवाक होऊन ऐकत होते जॉर्जी बोलत होती.

वाक्या वाक्याला बापाबद्दलचा, स्वतःच्या देशाबद्दलचा राग. नको नको त्या शिव्या देणं. पण तिला थांबवण्याची ताकत माझ्यात नव्हती. आणि तिचं काय चूक होतं? मुलांच्या पावाचे पैसे दारूत उडवणाऱ्या बापाला शिव्या नाही द्यायच्या तर काय? मला माझा बाबा आठवला. एकदा मी बाबाला खूप हट्ट केला होता. मला एकदम महागातले वॉटर कलर्स हवे होते. तेव्हा आमची परिस्थिती उगाचंच पैसे फुकट घालवण्याइतकी चांगली नव्हती. पण मला नाही म्हणाला नाही तो. खरंतर साधे रंग घेऊन देता आले असते. पण दोन गोष्टींपुढे त्याला काहीही मोठं नव्हतं, एक म्हणजे कलेची जोपासना आणि दुसरं म्हणजे त्याची लाडकी मुलगी. ज्या गोष्टी सहजच मिळत जातात त्याचं कौतूक वाटत नाही हेच खरं.

बराच वेळ आम्ही बोलत होतो. संध्याकाळ सरून रात्र झाली, गाडी विषयांचे रूळ बदलत होती पण एकच समान धागा तो म्हणजे तिचा बाप. तिने मला विचारलं बाबाबद्दल. मी काय सांगणार? तिला अजून वाईट वाटेल असं मला काहीच बोलायचं नव्हतं म्हणून मी टाळंटाळ करत होते. पण तिने काढून घेतलंच माझ्याकडून.

बाबाबद्दल बोलायला लागले की मला थांबताच येत नाही, इतका त्याचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे. ती सगळं कौतूकाने ऐकून घेत होती. कुठेही असुया किंवा दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे नाही ह्याचं वाईट वाटणं दिसलं नाही. मग मीही सगळ्या आठवणी सांगितल्या तिला. बाबाच्या गमती, त्याचं पेटी वाजवणं, नाटकं. मग आई, विन्या. म्हणाली भेटलं पाहिजे सगळ्यांना. म्हटलं चल भारतात. म्हणाली नक्की.

बराच उशीर व्हायला लागला होता. उद्या ऑफिसही होतं. तिला आणि मलाही आणि जॉर्जीची अवस्था काही फार चांगली नव्हती. अजून पीत बसली तर मलाच तिला घरी पोचवायला लागलं असतं. म्हणून मीच जरा आवराआवरीची भाषा करायला लागले. तिच्याही ते लक्षात आलं, आम्ही बाहेर पडलो. मला ट्रेनने जाणं शक्य होतं पण जॉर्जीला ते जमेलसं मला वाटेना. मीच तिला टॅक्सीने जायचं सुचवलं. मी खरं सोडलं असतं तिला पण आमची घरं एकदम विरुद्ध दिशेला आहेत, म्हणून वाटूनही तसं म्हटलं नाही.

तिला टॅक्सी मिळाली आणि मला हुश्श वाटलं. तशी ती ठीकच होती. मला बहुतेक उगाचंच भीती वाटत होती. टॅक्सी निघाली आणि मी उलट्या दिशेने चालायला लागले. स्टेशन काही लांब नव्हतं. मी रस्ता क्रॉस करते न करते तोच माझ्या बाजूला एक टॅक्सी थांबली आणि चक्क जॉर्जी आतून उतरली.

शांतपणे चालत ती माझ्यापर्यंत आली. मला म्हणाली, तू ऑफिसमध्ये मला विचारलंस ना की काही प्रॉब्लेम आहे का म्हणून? आणि मी काही नाही म्हणाले. ते खोटं होतं. आज सकाळी मला माझ्या आईचा फोन आला होता, काल रात्री माझा बाप मेला. काय बोलावं हेच मला कळेना. ती एकटक माझ्याकडे बघत होती. तिच्या उजव्या डोळ्यातून एकच अश्रू गालावर ओघळला तशीच ती वळली आणि टॅक्सीत बसून गेलीसुद्धा.

उगाचंच ग्रेस आठवले आणि "ती गेली तेव्हा रिमझिम सुद्धा" घरी जाऊन पहाटेपर्यंत ऐकत बसले. कसा का असेना बाप होता. तो सुधारेल, आपल्याला वडलांचं प्रेम देईल, ही भाबडी आशा होती बहुतेक. ती काल तिच्यासाठी संपली. तो ओघळलेला एक अश्रू बहुतेक त्या दुःखाचाच होता.

एक माणूस गेला. पण नातं संपलं का? की सुंभाच्या न जळलेल्या पिळासारखं हे नातं कायमचं जॉर्जीला त्रास देत राहणार?

- संवादिनी

Thursday, March 26, 2009

नाती आणि आठवणी

खूप खूप दमलेय.

आताच ऑफिसमधून परत आले. कामाचा व्याप विलक्षण वाढलाय अचानक. दिवसभर मीटिंगच मीटिंग चालल्यात. पण त्यात एक विलक्षण आनंद आहे. आपण केलेलं काम कुणालातरी आवडतंय. आपलं काही महत्त्व आहे आपल्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी जरी अहं सुखावणाऱ्या असल्या तरी हव्या हव्याशा आहेत. गंमत आहे. काम खूप वाढल्याचा त्रास आहे, पण आपण महत्त्वाचे आहोत ह्याचं समाधान आहे. आपल्या चाकरांना ते महत्त्वाचे आहेत असं भासवून किती मालकांनी आपापले खिसे भरले असतील कुणास ठाऊक.

असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहोंचा व्हिसा लवकरच येईल. तसं आमच्या ऑफिसमधे त्यांनी कळवलंय. इतकी वाट कोणत्याही गोष्टीची पाहिली नव्हती, तितकी ह्या व्हिसाची पाहिली. तसा मला येऊन जास्त वेळ झाला नाहीये. लग्न व्हायच्या आधीही मी इथेच होते कित्येक दिवस, पण आता तो सतत जवळ असावा असं वाटतं. एका नात्यातून दुसऱ्या नात्यात शिरल्याने एवढा फरक पडावा?

काल एक गंमत झाली. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेले होते. कानाला गाणं चाललं होतं. काय झालं कुणास ठाऊक, एकदम कशात तरी पाय अडखळला आणि धम्मकन पडले. समोरून एक मुलगा धावत चालला होता. तो पटकन आला, उठायला मदत वगैरे केली. खरं मला काही लागलं नव्हतं, पण असं कुणासमोर धसमुसळेपण केल्यानं फारच एंबॅरॅसिंग झालं. मुलगा छान होता. उंचापुरा, देखणा. म्हटलं चला, एवढं पडले ते अगदीच फुकट नाही गेलं. बाई पुरे, लग्न झालंय आपलं. पण खरं सांगायचं तर लग्न झालं म्हणून आजूबाजूची देखणी मुलं काय कमी देखणी होतात का? पण नात्यांची लेबलं लागली की मग त्यांचे कायदे येतात. आणि त्या कायद्यांची पण मोठी गंमत आहे. तुमच्या मनात काही चुकीचं असो किंवा नसो. त्यातून काही चुकीचे संकेत गेले तरी तुम्ही अट्टल गुन्हेगार ठरता.

नवऱ्याशी बोलत होते. त्याला सांगितलं हे. त्याला म्हटलं, तू लग्न झालं म्हणून इतर पोरी बाळींकडे बघायचं सोडलंस का? तर म्हणाला खरं सांगायचं तर प्रयत्न केला, पण एखादी चांगली पोरगी दिसली की बघितलं जातंच. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त बघणारंच असशील तर. आणि तुलाही नको, मी कुणाला बघितलं तर. हो म्हणाला. तसा समजूतदार आहे.

विन्या दुबईला चाललाय. एक दिवस सटाक त्याचा फोन आला. म्हणाला ताई मी चाललो दुबईला. त्याला काही बोलून दाखवलं नाही, पण मनातून मला वाईटच वाटलं. एकतर सध्याच्या परिस्थितीत लोकं दुबईवरून पळ काढतायत असं बातम्यांत ऐकतेय आणि हा तिथे कशाला तडमडायला चाललाय असं वाटलं. पण आले विनोबांच्या मना तेथे कोणाचे चालेना, अशी त्याने स्वतः तयार केलेली म्हण आहे, त्यामुळे तो जाणार म्हणजे जाणार.

पण त्याहीपेक्षा आता आई बाबा अजून एकटे होणार ह्याचं जास्त वाईट वाटलं. मुलगी लग्न होऊन गेली की ती दुसऱ्याची झाली आणि मुलगा परदेशी निघून गेला तर? आपला असूनसुद्धा जवळ नाहीच ना. हा विचार मनात आला आणि लगेच वाटलं की मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर काय वेगळं करतेय? माझ्यामुळे त्यांचा मुलगा देश सोडून चाललाच आहे ना? असो, आई बाबांचं दुःख जास्त बोचतं मनाला. सासू सासऱ्यांचं तितकंसं नाही. प्रॉब्लेम एकंच पण नातं बदललं की त्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलतो बघा.

घरी फोन केला मग. बाबा नव्हता. आईशीच बोलले. अख्खा वेळ तिचं विनोबा आख्यान चाललं होतं. कौतुकंच करत होती त्याचं. पण आमच्या आईला ना, मनात असेल तरी सांगता येणार नाही की तो जातोय ते तिला नाही आवडत आहे. आणि हेही तितकंच खरं की कितीही प्रयत्न केला तरी तिला ते लपवता येणार नाही. आम्हा दोघांच्यात विन्या तिचा जास्त लाडका. आणि बाबाची मी. दिसायला तो डिट्टो आईसारखा आणि मी डिट्टो बाबासारखी. राहून राहून मला जुने दिवस आठवत राहिले. जुन्या मैफिली घरगुती आठवल्या.

दिवस निघून जातात पण आपल्या मनावर आठवणी कायमचे कोरून जातात. त्यांना आठवून आपल्याला खूप आनंद होतो, जेव्हा त्या घटना परत घडणं सहज शक्य असतं. पण एकदा का पुनरावृत्तीच्या शक्यता विरळ व्हायला लागल्या की मात्र त्याच आठवणी डोळ्यात रडू आणतात.

नात्यांचे संदर्भ आणि आठवणी ह्यांचंही काही नातं असेल का?

- संवादिनी

Thursday, March 19, 2009

शोध

स्वतःच्या घरी शिफ्ट झाले.

स्वतःच्या म्हणजे भाड्याच्या. पण तरीही हॉटेलात राहण्यापेक्षा चांगलंच आहे की. अर्थात साप सफाई वगैरे अंगावर पडणार पण ते ठिके. तिथे राहून राहून भयंकर कंटाळा आला होता. अपार्टमेंट चांगला असला तरीदेखील, घर ते घर आणि हॉटेल ते हॉटेल. आता काही महिने तरी इथून हालणार नाही. अर्थात नवरा आल्यावर जागा बघितल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं पण तोपर्यंत कंपनी मला हॉटेलमध्ये ठेवायला तयार नव्हती. शेवटी मला आधीच घर बघून शिफ्ट व्हावं लागलं.

अगदी दहा दिवसात घर मिळालंसुद्धा. गेल्या आठवड्यात दोन तीन जागा पाहिल्या होत्या. पण ही जागा अगदी मनासारखी होती. एकमजली घर आहे. खाली किचन आणि बैठकीची खोली आणि वरच्या मजल्यावर दोन बेडरूम्स आणि बाथरुम, टॉयलेट वगैरे. एका बेडरूमला छान बाल्कनी आहे. खाली व्हरांडा आहे. तिथे काही खुर्च्या आणि टेबल आहे. घरात काहीही फर्निचर नाही. अजून मी काही घेतलंही नाहीये. भारतातून येताना काही भांडी आणली होती तेवढीच आणि बाबाने मला पुण्याला जाताना घेऊन दिलेला लॅपटॉप सोडला तर काहीच नाही.

पण घर एकदम सही आहे. भरपूर उजेड. ऐसपैस जागा, हीटर, एसी, गरम पाण्याची सोय. आणखी काय पाहिजे? हा पाहिजे की. मी एकटी काय करणार इथे? अहो लवकर पोचले तर बरं होईल. मग मजा येईल. सोसायटीच्या आवारातंच झाडं गिडं आहेत. शिवाय स्विमिंग पूलही आहे. त्याला पोहता येत नाही. मी त्याला शिकवणारे. त्याला आधीच सांगून ठेवलंय.

ज्या दिवशी चावी घेतली त्या दिवशी एकटीला एकदम विचित्र वाटत होतं त्या रिकाम्या घरात. शेवटी लॅपटॉपवर गाणी लावली आणि ऐकत बसले. आवाजाने घर भरल्यावर जरा बरं वाटलं. होतं ते सगळं सामान नीट लावलं. बॅगा रिकाम्या केल्या. कपडे कपाटात व्यवस्थित लावून ठेवले. एकदम असं घरगुती झाल्यासारखं वाटलं. एक क्षण मनात आलं असंच राहावं. म्हणजे हाऊस वाइफ. घर नेटकं ठेवावं, आपलं गाणं गिणं करावं आणि बाहेरच्या लढाईची जबाबदारी नवऱ्यावर टाकावी. दुसऱ्याच क्षणाला तो विचार झटकून टाकला. ऑफिसमधून बॉसचा फोन आला. ताबडतोब बोलावलं. मी ऑन कॉल होते, पण ऑफिसमध्ये जायचा अजिबात मूड नव्हता पण जावंच लागलं. दोन क्षणापूर्वीच्या स्वप्नातल्या हाऊस वाइफ स्वप्नातच राहिल्या.

हे म्हणजे खरं माझं घर असल्यासारखं वाटतं. लग्न झाल्यावर गेले ते त्याच्या घरी. पण हे घर ना त्याचं ना माझं. आमच्या दोघांचं आहे. दोघांची नवी सुरुवात. म्हणून काही फर्निचरही घेणार नाहीये तो येईपर्यंत. आला की दोघं मिळून घेऊ. मी घेतलं तर त्याला आवडणार नाही असं नाही, पण घरटं दोघांनी बांधलं तर जास्त मजा येईल. अर्थात माझ्या दुकानांच्या वाऱ्या सुरू झालेल्या आहेत.

काही गोष्टी खूप आवडल्यात. पण जे आवडतंय ते सगळं खिशाच्या पालीकडलं आहे. जे स्वस्त आहे ते चांगलं नाहीये. बघूया सध्या तरी फक्त एक मॅट्रेस घेतली आहे. ती जमिनीवर घातली आहे. उशा, हंतरूण, पांघरूण मी घेऊन आले होते भारतातून. त्यामुळे सध्या एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच माझं जीवनमान आहे.

घरी फोन केला तेव्हा हे सगळं आईला सांगितलं. तिचं लगेच सुरू झालं. नीट विचार करून सगळं घे. एकदा घेतलं की बदलता येत नाही काही वर्ष. नवऱ्याला सगळं विचारून घे. उगाच महागाचं घेऊ नको. तुला सवय आहे खर्चीक गोष्टी घ्यायची वगैरे वगैरे. असं सुरू झालं की बाबा पॉलिसी अंगिकारायची. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तसंच केलं. सगळ्याला हो, बरं, हो बरं म्हणत संपवलं.

आईला कोण समजावणार? आमची काळजी करण्यात तिचं अख्खं आयुष्य गेलं, त्यामुळे तिचा अधिकारही आहे तो.

बाबाशी मात्र खूप गप्पा मारल्या. तो कुठल्याशा कार्यक्रमाला गेला होता त्याचा सगळा रिपोर्ट दिला. म्हणाला गाणं सोडू नकोस. एकवेळ जेवण विसरलीस तरी चालेल पण रियाज विसरू नको. मी काय सांगणार त्याला? दोन आठवड्यात तंबोरा लावला सुद्धा नाही म्हणून?

लग्न झाल्यापासून एक गोष्ट जाणवतेय. आई बाबा, विन्या यांच्या मनात मी अजून तीच आहे, पुण्याला जायच्या आधीची, घर सोडायच्या आधीची, धडपडी, सतत कशात ना कशात गुंतलेली. ऑफिसातून थेट सुटून नाटकाच्या तालमी करून आल्यावर कितीही दमली असली तरी थोडा का होईना रियाज करणारी. मनातली प्रत्येक गोष्ट घरी बोलून दाखवणारी. खळखळून हसणारी आणि भडभडा रडणारी. पण आता जाणवतंय, की मी किती बदललेय.

घराचा शोध आता संपला, आता स्वतःचा शोध पुन्हा घ्यायला हवा.

- संवादिनी

Thursday, March 12, 2009

न पाहिलेला ऑपेरा

बरेच दिवस मनात एक विचार घोळत होता. ऑपेरा बघायचा होता. आधी कंपनी नाही म्हणून आणि मग वेळ नाही म्हणून चालढकल केली. खरी गोम तर वेगळीच होती. अजूनही बिझनेस व्हीसा वर असल्याने कंपनीच्या अलावन्स वरच भागवावं लागत होतं. तो काही विशेष नव्हता. जरी घराचं भाडं कंपनी देत असली तरी बाकी सगळा खर्च आमचा आम्हालाच करायचा होता. त्यासाठी अलावन्स पुरेसा होता पण एकदम तीन दिवसाचा अलावन्स ऑपेरावर खर्च करावा इतकीही माझी परिस्थिती चांगली नव्हती. वर्क परमिट होईपर्यंत कळ काढणं आवश्यक होतं. मग इथेच पगार मिळाला असता आणि खर्चावरची बंधनं थोडीशी सैल झाली असती.

दरम्यानच्या काळात आमच्या टीममध्ये एक रोमानिअन मुलगी सामील झाली. जॉर्जिना तिचं नाव. तर ह्या जॉर्जला पण थिएटर ची प्रचंड आवड. बोलता बोलता मी तिला म्हटलं की मलाही एकदा ऑपेराला जायचंय. अगदी पिटातलं तिकिट काढलं तरी चालेल. ती म्हणाली चांगला ऑपेरा बघायचा असेल तर पिटातल्या तिकिटात पूर्ण स्टेज दिसत नाही. म्हणजे पुढची तिकिटं काढणं आलं, अर्थात पूर्ण पैसे भरावे लागणार.

आमच्या कंपनीचा वेळकाढूपणा इतका होता की शेवटी मी डेली अलावन्स मधली पंचवीस टक्के रक्कम ऑपेरासाठी बाजूला काढायला लागले. दोन आठवड्यात मला पाहिजे तेवढे पैसे जमणार होते म्हणून मी जॉर्जीला सांगून टाकलं की आपण ऑपेराला जाऊया. एका शनिवारची तारीखही ठरली. तिने ऑफिसमधल्या अजून सात-आठ गोऱ्यांना जमवलं. आपले लोक खर्च करण्याच्या बाबतीत मागे असल्याने देशी कुणीच नव्हतं. पुढच्या शनिवारचं तिकीट असल्याने सोमवारी ते काढायचं असं ठरलं आणि पैसेपण सोमवारी जॉर्जीकडे द्यायचे असं ठरलं.

पुढच्या विकेंडला ऑपेरा बघायला मिळणार ह्या आनंदातच शुक्रवारी घरी पोचले. नेहमीची विकेंड दंगामस्ती चालू होती. झोपणे, जेवण बनवणे आणि जेवणे ह्यात शनिवार कसा निघून गेला ते कळलंच नाही. रविवारी उशीरा उठून टीव्ही लावून बसले तर बातम्या लागलेल्या.

न भूतो न भविष्यती अशी आग शेजारच्या राज्यात लागलेली. जंगलंच्या जंगलं जळून खाक झाली. साडेसातशे घरं जळून गेलेली. सव्वाशेच्या आसपास माणूस मारला गेलेला. एकदम सुन्न झाले. रडणाऱ्या लोकांचे चेहरे पाहून मलाच रडू यायला लागलेलं. एवढा संपन्न देश. प्रगत प्रगत म्हणून मिरवणारा पण वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या वणव्याला काही रोखता आलं नाही. बऱ्याच लोकांना आग लागलेय हेच समजलं नाही आणि त्यांची घरं त्यांच्यासकट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्यांना पळता आलं ते पळाले, पण नेसत्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं. आईविना मुलं, मुलं शोधणारी आई, कुणाचं कोण अजून दिसलं नव्हतं, पत्ता लागत नव्हता. निसर्गाचा कोप दुसरं काय?

चटकन मला देश आठवला. देशावर आलेली संकटं. मुंबईचा सव्वीस जुलैचा पाऊस, त्सुनामी, लातूरचा भूकंप. अगदी सगळं सगळं डोळ्यासमोर आलं. लातूरच्या वेळी तर अगदी डबे घेऊन फिरले होते तेपण आठवलं. दुःख आणि अश्रू ह्यांना देशांच्या सीमारेषा समजतंच नाहीत आणि निसर्गालाही. कोण प्रगत, कोण अप्रगत असला विचार निसर्ग कधीच करत नाही, सगळ्यांना सारखाच न्याय.

त्या सुन्न वातावरणातच रविवार निघून गेला. सोमवारी सकाळी नेहमीसारखी ऑफिसात पोचले. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे एफ्. एम. चालू होता. बातम्या येत होत्या, मृतांचे आकडे, नुकसानीचे आकडे वाढत होते, मदतीसाठी फोन नंबर सांगितले जात होते, वेबसाइट सांगत होते. एकदम डोकं भणभणायला लागलं, तिथून पळून जावं असं वाटायला लागलं. आपण किती असहाय असतो ह्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

थोड्या वेळाने जॉर्जी आली. तिच्या बोलण्याचा विषयही हाच. जाता जाता म्हणाली अगं तू ऑपेरा चे पैसे ट्रान्स्फर केलेस का? मला बहुतेक ह्यावेळी नाही जमणार. पुढच्या महिन्यात एखाद्या छानशा ऑपेराला जाऊया. तुम्ही जा माझ्याशिवाय. जॉर्जी नाराज झाली. पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.
पंधरा दिवस ऑपेरासाठी साठवलेले पैसे घेऊन मी रेडक्रॉसच्या काउंटरला गेले. मला नव्हता ऑपेरा बघायला मिळणार ह्या आठवड्यात पण कुणालातरी त्या पैशाचा माझ्यापेक्षा जास्त, खूप जास्त उपयोग होणार होता. म्हणून ते पैसे देऊन टाकले.

आजपासून परत साठवायला सुरवात केलीय.

- संवादिनी

Thursday, March 5, 2009

स्वप्नांच्या गावा

हल्ली भन्नाट स्वप्न पडायला लागलीत.

भन्नाट म्हणजे भन्नाटंच. मला वाटतं आपण जितका अधिक विचार करतो तितकी स्वप्न जास्त आणि मनोरंजक पडत असावीत. आता माझंच बघा. मला कधी म्हणजे कधी स्वप्न पडायची नाहीत. रात्री बिछान्यावर पडल्यावर डोळा लागला की सकाळी आईची कातावलेली दुसरी किंवा तिसरी हाक ऐकू येईपर्यंत काहीही कळत नसे. झोपणे ही आयुष्यातली एकमेव आनंददायक घटना असायची, कारण दिवस सगळा कामात जायचा. ऑफिस आणि काही अंगावर घेतलेल्या तर बऱ्याचशा अंगावर पडलेल्या अनंत ऍक्टिव्हीटीज. जीव इतका दमून जायचा की झोपायचा जो वेळ आहे तो स्वप्नातही फुकट घालवायची कल्पना मी कधी केली नव्हती.

पण सध्या सगळाच आनंदी आनंद गडे आहे. काम यथा तथाच आहे. गोऱ्यांच्या देशात जर मला सर्वाधिक काही आवडत असेल तर कामाच्या वेळा. आठ म्हणजे आठला हजर आणि पाच म्हणजे पाचाला फुटास्को. त्यातही डोक्यावर कामाचा डोंगर आहे असं नाही. सगळ्या प्रकारचा वेळकाढूपणा केल्यावरही काम संपवायला भरपूर वेळ असतो. चकाट्या पिटायला ऑफिसात कोणी नाही, अपार्टमेंटवर एकटीच. मग करायचं काय? टी. व्ही? मला फारसा आवडत नाही. मग काय करायचं? विचार करायचा. कशाचा? कशाचाही? अगदी रस्त्यावरून चाललेल्या माणसाच्या डोक्यात काय चाललंय इथपासून सेम दिसणाऱ्या गाड्यांच्या किमतीत इतका फरक का पडतो इथपर्यंत काहीही.

मूळ लिहायचं होतं ते राहिलंच. तर स्वप्न पडतात. आणि त्याची आठवण का झाली तर कुणीतरी मला एक ऑनलाईन सर्व्हे पाठवला, स्वप्नांवरती. त्यात एक प्रश्न होता तुम्हाला कुणाची स्वप्न पडावीशी वाटतात? उत्तर, नवऱ्याची. तुम्हाला त्या व्यक्तीची स्वप्न पडतात का? उत्तर, अजिबात नाही. आपल्याला हवी ती स्वप्न का नाही पडू शकत आपल्याला? काही गोष्टी सत्यात शक्य नसतात स्वप्नात तरी व्हाव्यात की नाही?

आता माला वाटतं माझ्या नवऱ्याने माझ्या गाण्याचं कौतुक करावं. पण आमचे साहेब आलाप सुरू झाले की जांभया द्यायला लागतात. आता गेलाबाजार पडलं एखादं स्वप्न की ज्यात मी जोरजोरात गातेय आणि साहेब मनापासून दाद देतायत तर काय हरकत आहे? पण असलं काहीही स्वप्न न पडता मला काय स्वप्न पडावं?

मला ऑफिसला जायला उशीर झालाय मी धावत पळत माझ्या अपार्टमेंटमधून बाहेर पडते तर लिफ्ट बंद मग एवढे प्रचंड मजले उतरून खाली येते तर आपली मुंबईतली पिवळी काळी टॅक्सी उभी. (मुळात माझं ऑफिस पाच मिनिटावर चालत आणि तीन मिनिटांवर धावत असताना मी टॅक्सी का घेते हा वेगळा प्रश्न झाला) टॅक्सीवाला चक्क भाड्याला नाही म्हणतो. काहीच वाहन मिळत नसल्याने टेन्शन वाढ वाढ वाढतं. घामाघूम होते मी आणि ढँटडँ..... जाग येते.

ह्याला काही अर्थ आहे का? अजून एक आठवणारं स्वप्न म्हणजे मी बारमध्ये (मी आणि बारमधे? ) पंजाबी ड्रेस घालून एक पेय (कोणतं ते कळत नाही) पीत बसलेय. आणि काहीही करत नाहीये. पेय पितेय संपलं की रिफिल. बस.

पण सगळ्यात भन्नाट स्वप्न पडतायत ती भुतांची. ती मात्र पडली की मग झोप लागत नाही मग डोक्यावर पांघरूण घेऊन उशीखाली डोकं खुपसून रामरक्षा म्हणायला लागते झोप येईपर्यंत. इथले काही हॉरर कार्यक्रम बघितल्याचा परिणाम असेल. आणि एकटी असल्याने भीती अजून वाटते. मग उगाचच कोपऱ्यातलं रोपटं रात्रीच्या अंधारात कुणाच्यातरी नखं वाढलेल्या लांब हातासारखं दिसतं. किंवा वाऱ्याचा आवाज भुताच्या श्वासासारखा वाटतो. मग रामरक्षा आणि अजून रामरक्षा आणि अजून अजून रामरक्षा. रामाला लवकरच माझा कंटाळा येणारे.

कशी पडत असतील स्वप्न? मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणावं तर माझ्या मनी न वसणाऱ्यांचीच स्वप्न मला जास्त पडतात. ज्याला आपण घाबरतो त्याची स्वप्न पडावी तर थोडंफार खरं आहे.

हे सगळं लिहिताना एकदम आजीची आठवण झाली. आजी म्हणजे बाबाची आई. ती कधीच देवाघरी गेली. स्पष्ट आठवतंय ती एकदा सांगतानाचं, तिच्या स्वप्नाबद्दल. म्हणाली होती की एक खूप छान स्वप्न पडलं. डोंगर होते, दऱ्या होत्या, नद्या होत्या, डोंगरावरचे पांढरे शुभ्र ढग, त्यांच्या पाठचं निळं आकाश, हिरवे डोंगर, त्यातून वाहणारं नदीचं पाणी. मग म्हणाली मी जिथे उभी होते तिथे खूप फुलं होती. वेगवेगळ्या रंगांची आणि त्याला इतका छान वास येत होता. मग म्हणाली अजून तो वास मनात दरवळतोय.

इतकं छान स्वप्न? अगदी टुडी नाही थ्रीडी नाही फोरडी स्वप्न पडलं तिला. असं मला का पडू नये? फार कुठे बाहेर न पडलेल्या माझ्या आजीला स्वित्झरलंड ची स्वप्न पडावीत आणि तिथे प्रत्यक्ष जाऊन आलेल्या मला त्याच्या जवळपासचही काही दिसू नये, असं का व्हावं? की ही एक प्रकारची क्रिएटिव्हीटी आहे. तिची कंस्ट्रक्टिव्ह असेल, माझी कदाचित डिस्ट्रक्टिव्ह किंवा न्युट्रल असेल.

कुणी सांगावं?

- संवादिनी

Thursday, February 26, 2009

एकलकोंड्याची गोष्ट

पहिला आठवडा सगळं बस्तान बसवण्यात गेला. शनिवारी रात्री पोचले. अर्थातच कंपनीने सगळी व्यवस्था केली होती. आणि दुसऱ्या वेळी येत असल्याने पहिल्या वेळी झालं तसं "धुंडो धुंडो रे" झालं नाही.

यंदा टॅक्सीवाला एकदम मस्त भेटला होता. इथिओपियन होता आणि रस्ताभर गप्पा मारत होता. आपणही किती रेसिस्ट असतो ना? काळा माणूस दिसला की उगागंच भीती वाटते. मला विचारत होता तू काय करतेस, तर सांगितलं त्याला. तसा म्हणाला पगार बरा मिळतो का? तर म्हटलं मला अलावन्स मिळतो. म्हणे किती? म्हटलं अमुक अमुक. तर म्हणे ते सोड टॅक्सी चालव ह्यात खूप पैसे आहेत. कपाळाला हात लावला. इथे आधीच लोकं कमी, त्यात मी टॅक्सी चालवायला लागले तर अजून काही देवाघरी धाडायचे.

तर रात्री हॉटेलवर पोचले. बाहेर जाऊन काही खायची इच्छा नव्हती. असं होईल हे माहीत असल्याने चक्क मॅगी घेऊन आले होते. शनिवार रात्र आणि रविवारची जेवणं मॅगीवरच झाली. सगळा दिवस झोपून काढला. फक्त ब्रेड आणि दूध आणायला गेले तेवढंच. माझी रूम विसाव्या मजल्यावर आहे. व्ह्यू मागच्यापेक्षा खूप छान आहे. पण एकटीला त्यात मजा वाटत नाही हेच खरं. तसे ऑफिसमधल्या काही लोकांना फोन केले. पण ते सगळे आपापल्या घरी असल्याने आणि माझं हॉटेल अगदी शहरात असल्याने भेट झाली नाही.

सोमवारी ऑफिसला गेले. कामाचा मूड नव्हताच. कॉफी आणखी कॉफी आणि आणखी आणखी कॉफी. एकटेपणा आणि व्यसन ह्यांची संगत अशीच होत असावी. एकटी नाहीये मी तसं. लोकं आहेत. पण आपल्या घरून आल्यावर कितीही लोकं असतील तरी एकटेपणा जाणवतोच.

रोज संध्याकाळी जॉगिंगचं सुरू केलंय. तेवढा टाइम पास होतो आणि व्यायामही. धावताना जो एक ऱ्हिदम मिळतो ना तो एकदम वेडावणारा आहे. इनटोक्सिकेटिंग हा शब्द जास्त योग्य वाटतो. सुरवातीला शरीराने नाही म्हणायचं, स्नायूंनी दुखायचं, श्वासाने भंजाळायचं, पण एकदा तो ऱ्हिदम मिळाला की मग सगळे शिस्तीत एका सुरात आणि एका तालात जणू गायला लागतात. दे बिकम वन टीम. माहीत नाही, पण मला ती स्टेज खूप आवडते. कानाला आयपॉड असेल तरी श्वास लख्ख ऐकू येतो. गाण्याचा ऱ्हिदम, श्वासांचा, पायांचा आणि विचारांचा सगळं एका पातळीवर येतं आणि विलक्षण आनंद मिळतो. अजून काही दिवस चालूदे हे मग बघूया माझं मत बदलतं का ते?

आणि एक सही काम झालं. इंटरनेटवर डिजीटल तानपुरा आणि तबला मिळाला, आता काँप्युटर लावून मस्त गाता येतं. जेट लॅग म्हणा किंवा आठवणी म्हणा रात्री झोपच येत नाही. ज्या दिवशी तानपुरा मिळाला, त्या रात्री अशीच झोप येत नव्हती. सगळ्या खिडक्या गच्च ओढून घेतल्या. एसी फुल चालू केला (थंडी नव्हती पण गाण्याचा त्रास दुसऱ्यांना होऊ न देण्याचा एक मार्ग म्हणजे दुसरा कसलातरी आवाज चालू करणे). मारवा घेतला. एकतर मध्यरात्रीची वेळ, त्याला साजेसा मारव्यासारखा धीरगंभीर राग. कोमल रे असा लागला की बस. चांगला एक तास मारवा गायले. ऐकायला कुणी नव्हतं पण स्वतःसाठी गाण्याची मजा वेगळीच.

सध्या भीमसेनांचं चरित्र वाचतेय. वाचताना असं जाणवतं की आपण किती अतिसामान्य आहोत. लहान वयात घर सोडून फक्त गाण्यासाठी पळून जाणं. गदगपासून जालंधरपर्यंत जाणं. स्वतःच्या हिमतीवर गाणं शिकणं. मग सवाई गंधर्वांच शिष्यत्व त्यात सोसलेले हाल केवळ गाण्यावरील प्रेमापोटी. असं आयुष्यात माणसाला काही ध्येय पाहिजे की ज्यापाठी त्यानं पागल व्हावं. वाचताना भान हरपून जातं. पंडितजी माझे खूप आवडते गायक आहेत, पण हे सगळं वाचल्यावर खरंतर माझे देवंच झालेत ते. नुसतं त्यांचं स्मरण केलं तरी माझं गाणं चांगलं होईल असं वाटतं.

असो, तर ह्या झाल्या माझ्या एकटेपणाच्या एकलकोंड्या गोष्टी. कशात ना कशात मन रमवत राहायचं दिवस घालवायचा. संध्याकाळ झाली आणि सूर्य नारायण मावळतीला परतायला लागले, झाडांच्या सावल्या लांबुडक्या व्हायला लागल्या की एक विलक्षण विषण्णता पसरते. आई बाबाची, नवऱ्याची खूप खूप आठवण येते. कधी रडायलाही येतं. पण कधी धावता धावता स्वतःला दमवून, कधी सुरांच्या भुलभुलय्यामध्ये स्वतःला हरवून तर कधी पुस्तकांच्या छापील पानांत दडलेली प्रश्नांची उत्तरं शोधत दिवस घालवते आहे.

ह्या सर्वात एक नशा आहे. तो बोथट करतो आठवणी आणि देतो हुरूप नव्या दिवसाची वाट बघण्याचा.

- संवादिनी

Thursday, February 19, 2009

शॉर्टकट

लग्न म्हणजे एक रोलर कोस्टर राइड आहे. बरंचसं सुख आणि त्याला दुःखाची किनार. म्हणजे नवऱ्याचा विरह संपल्याचा आनंद आणि घरापासून दूर गेल्याचं दुःख. पार्टनर मिळाल्याचा आनंद पण स्वातंत्र्य गेल्याचं दुःख. शेअर करता येतंय हा आनंद पण अवलंबी झाल्याचं दुःख. कधी भेटला नाही असा उधाणलेला समुद्र आणि त्याने अस्ताव्यस्त केलेला किनारा. समुद्राच्या उधाणाचा आनंद, किनारा अस्ताव्यस्त झाल्याचं दुःख. कधी कधी मला वाटतं हे सगळ्यांचंच होतं की हा माझाच प्रॉब्लेम आहे? सुख नाही असं नाही, पण दुःख नाही असंही नाही अशी काहीशी विचित्र परिस्थिती.

जाऊदे. नवा भिडू, नवं राज्य. माझा मुंबईचा मुक्काम संपत आला. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा कामावर रुजू होईन. परका देश परके लोक आणि एकटी मी. इथेसुद्धा फिफ्टी फिफ्टी आहे. आपल्या लोकांपासून दूर जायचं हे दुःख पण सासरी राहण्याचं जे अवघडलेपण आहे, त्यातून सुटका होण्याचा आनंद. कदाचित मी खूप सेल्फ सेंटर्ड वगैरे वाटत असीन. पण स्वतःचं विश्व निर्माण करताना होणारे कष्ट अपार आनंद देऊन जातात. एका विश्वातून दुसऱ्या विश्वात सामावून जाण्यातले कष्ट खूप त्रासदायक आहेत.

हे सगळं सांगावं तरी कुणाला? आईला सांगितलं तर आई म्हणणार मुलीच्या जातीला हे सगळं करावंच लागतं. नवऱ्याला ह्याची डेप्थ समजणार का? त्याच्या दृष्टीने त्याचं विश्व चांगलंच आहे. आणि चांगलं आहेच. वाईट काहीच नाहीये, पण ते माझ्या विश्वापेक्षा खूप वेगळं आहे म्हणूनही त्रास होऊ शकतो ते त्याला कसं पटवायचं? हा अनुभव आल्याशिवाय कळावं तरी कसं किती अवघड आहे हे सगळं? म्हणून त्याला काही बोलत नाही. बाबाला सांगावं खूप वाटतं पण त्याच्या डोक्याला त्रास नको म्हणून नाही सांगत. जीवाभावाच्या मैत्रिणीही आता जवळ राहिल्या नाहीत की उचलला फोन आणि बोललं तासभर. एकंदरीत सुखमय शोक किंवा शोकमय सुख असं काहीसं आयुष्य झालंय.

पण लवकरंच ते बदलेल. तिथून निघतानाचा विमानतळावरचा उत्साह इथून निघताना नक्कीच नसेल. का कुणास ठाऊक, भारत सोडताना मी नेहमी भावुक होते. विमान उडाल्यावर मुंबईचे दिवे, झोपड्या ढगाआड जाईपर्यंत बघत राहते. पुन्हा कधी दिसाल? असं त्यांना विचारत राहते. ह्या वेळी नवऱ्याचा विरहही सोबतीला असेल. गंमत आहे. सोबत नसली म्हणजे होतो तो विरह आणि अशा विरहाचीही सोबत. निदान दोन अडीच महिनेतरी सोबतीला राहीलच तो.

पुन्हा तिकडे गेल्यावरचं काम, एकटेपण, कंटाळा, सगळं सगळं डोळ्यासमोर दिसतंय. मी जेव्हा शाळेत होते अगदी लहान असताना तेव्हा वाटायचं आज जोरात पाऊस पडूदे आणि शाळा बुडूदे. तसंच काहीसं वाटतं, काहीतरी जादूची कांडी फिरावी आणि रद्दच व्हावं जाणं. मग समोर दिसतो एक डोंगर, माझ्यासारख्या कित्येकींनी चढलेला. स्वतःला दुसऱ्या एका साच्यात कोंबायचा.

मग एक मन पळपुटं होतं. म्हणतं जाऊदे तो डोंगर, पळायची संधी मिळतेय, पळ काढ. मग एकदम खूप खूप उदास वाटतं. मनापासून प्रमाने वागवणारे सासू सासरे, मी त्यांच्यात स्वतःला सामावून घ्यावं अशी रास्त अपेक्षा बाळगणारा नवरा. ह्यांचा आपण कुठेतरी अपेक्षाभंग करतोय असं वाटत राहतं. एक न्यूनगंडही येतो. आपणच असे आहोत. इतक्या चांगल्या लोकांत मिसळायला खरंच त्रास होण्याची गरज नाही, पण आपल्यालाच तो होतो, म्हणजे आपणंच कुठेतरी चुकतो आहोत. असा.

जाऊदे, सध्या तरी जे जमत नाही त्याला सामोरं जाण्याऐवजी त्याला पाठ दाखवण्याचा शॉर्टकट मी घेतलाय. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघता येईल. सध्या शोवटच्या काही दिवसातली मुंवई आणि नवरा मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करतेय.

- संवादिनी

Thursday, February 12, 2009

नो प्रॉब्लेम

नवऱ्याचं ऑफिस पुन्हा सुरू झालं. मला अजून पंधरा दिवस सुट्टी आहे. पण सुट्टीची अशी मजा येत नाहीये. उगाचच आपण सुट्टी घेऊन घरी बसलो असं फिलिंग येतंय. पण सुट्टी नाही तर मी मुंबईत राहू शकणार नाही. म्हणजे थोडा वेळ का होईना जो नवऱ्याबरोबर घालवता येतोय तेही जमणार नाही. सासरेही ऑफिसला जायला लागले. त्यांचं खरंतर सतत काम चालूच होतं घरूनही पण आता ऑफिसला जायला लागलेत. सासूबाई घरीच असतात आणि सूनबाईही.

खूप छान आहेत त्या म्हणजे सासू ह्या संस्थेच्या पारंपरिक इमेजला पूर्ण विरुद्ध आहेत. मला स्वैपाकात गती नाही हे त्यांना माहिती आहे. पण मला जास्त सला वगैरे देत नाहीत. त्या करतानाच मला एकेक सांगत जातात की असं केलं तर असं होतं तसं केलं तर तसं होतं. तुझं चूक माझं बरोबर असा ऍटिट्युड नाहीये. बऱ्याच गोष्टी आमच्यापेक्षा जरा वेगळ्या करतात त्या. पण मी त्यांना तसं भासवून देत नाही.

एकदा
पिक्चरला पण घेऊन गेल्या, त्यांच्या मैत्रिणींबरोबर. मला एवढं ऑकवर्ड झालं होतं. पण काय सांगा? कधी कधी असं वाटतं सुट्टी वाया चाललेय. आई बाबांची भेट होत नाही आणि नको त्या (सासूबाई नव्हे, त्यांच्या मैत्रिणी) लोकांबरोबर वेळ घालवावा लागतोय.

अर्थात आठवड्यात दोन वेळा घरी जाऊन आलेच. माहेरी जाण्याची मजा काय आहे ते आता कळतंय. सासरी भिजल्या मांजरीसारखी असणारी मी घरी पोचले की मस्त अघळ पघळ पसरते. दुपारी गेले तर आई नसतेच, पण बाबा असतो. मग काय? आपल्या राजकन्येसाठी राजा चहाही बनवायचे कष्ट घेतो. अगं हे घे, ते घे, कचोरी आणलेय मुद्दाम तुला आवडते म्हणून, गायवाडीतली नानकटाई आणलेय, आयडिअलचे वेफर्स आणलेत आणि काय नि काय. पोहे बनवू का? नाहीतर शिरा बनवतो, की परशुराम वाडीचा वडापाव आणू? असे असंख्य प्रश्न. मी त्याला म्हणते अरे जाऊदे रे, माझ्याशी गप्पा मार. मीच चहा बनवते आणि आपण मस्त ग्लूकोज ची बिस्किटं खाऊ.

लग्नाआधी आभाळ खाली आलं तरी चालेल किचन मध्ये जाणार नाही म्हणणारा बाबा चक्क मला चहा बनवू का म्हणून विचारतो ना, तेव्हा कसंसंच होतं. एकदम बिचारा वाटतो तो मला. आणि डोळ्यात पाणी येतं. मग एकमेकांपासून डोळे लपवायचा खेळ खेळायचा. तोपर्यंत आई येते. मग पुन्हा हे करू की ते करू सुरू होतं तिचं.

लग्नाआधी काढलेला आमच्या चौघांचा एक मस्त फोटो त्याने फ्रेम करून आणलाय. तो एक बदल झालाय. बाकी घर तसंच आहे. शेजारी पाजारीही तसेच आहेत. रहाटगाडगं चालतं आहे. गाडग्यातलं एक भांडं पडलं म्हणून इतरांचं काम थांबत नाही. त्रास फक्त त्या भांड्याला होतो आपण त्या चक्रात नाही म्हणून.

एकदा मी आणि आई होतो तेव्हा आई सांगत होती, बाबाला बिलकूल करमत नाही. मग जुनं कुठलंतरी रेकॉर्डिंग काढून बसेल, नाहीतर फोटो बघत बसेल. खरंतर तिलाही करमत नसणार, पण ती कबूल करणार नाही.

संध्याकाळी दोघंच एकटे घरी असताना काय वाटत असेल त्यांना? मुलगा इथे आहे पण तोही बाहेर जायचं म्हणतोय, मुलीचं लग्न झालेलं, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं. तानपुरा नसलेला माझा कोपरा, रिकामं झालेलं माझं कपाट, आईने हौसेने माझ्यासाठी आणलेल्या काही बाही वस्तू. सगळं सगळं आठवतं आणि खूप खूप रडायला येतं. पण आदर्श सूनबाईच्या कर्तव्यात सतत हसतमुख राहणे हेही येतंच. मग कढ आवरायला लागतात, आवंढे गिळायला लागतात.

मग
तो बांध कधीतरी बाथरुमच्या भिंतीआड फुटतो किंवा रात्रीच्या अंधारात नवऱ्याच्या शर्टाची बाही भिजवून जातो. त्याला वाटतं काही प्रॉब्लेम आहे का?

पण त्याला कसं समजावणार की काहीही प्रॉब्लेम नसूनही प्रॉब्लेम्स असतातच..

- संवादिनी

Thursday, February 5, 2009

मचाण, कलकत्ता आणि बदललेलं जग

परवा कोलकात्याहून परत आलो. गेले दहा-बारा दिवस कसे गेले कळलंच नाही.

निबिड जंगल, निरभ्र आकाश, चांदणी रात्र, दूरवर लावलेल्या ट्यूबमधून यावा असा चंद्रप्रकाश, बांबूचा मचाण, अशक्य शांतता, वाऱ्याबरोबर होणारा बांबूची कचकच. पाण्याचा एक आवाज मात्र कायम. मध्येच पायाखाली वाजणारी पानं? कुणाचे बरं असतील ते पाय ह्याचा अंदाज बांधत मचाणावर बसलेली सहा जणं. आम्ही दोघं, एक आजी आजोबा आणि दोघं टिपीकल सोल्जर स्टाइल ड्रेसिंग, वर हाफ जॅकेट, रात्री उगाचच घातलेल्या टोप्या अशा अवतारातले सो कॉल्ड नेचर लव्हर्स.

त्यातल्या
आजींशी माझी खासंच गट्टी जमली होती. म्हणजे आजी फक्त वयानेच आजी होत्या. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. खरंतर अहोंना असलं रात्री बेरात्री मचाणावर वगैरे बसायला बिलकुल मानवत नाही. पण आजींनी भरीस पाडलं. बघायला काय मिळालं? काहीच नाही. तशा दुर्बिणी वगैरे नेल्या होत्या. पण मला आवाजाची दिशा समजून मी दुर्बीण फोकस करेपर्यंत जे काही होतं ते पळून गेलेलं असायचं. मग नेचर लव्हर्स मला नक्की काय होतं ते सांगायचे.

पण अशा ठिकाणी प्राणी बिणी बघायला कोण जातं. मचाणाखाली सळसळलेल्या पानांनी शांततेच्या अंगावर शहारा आणावा. मनात एकदम धस्स व्हावं, मी अहोंचा दंड पकडावा आणि एकदम आश्वस्त वाटावं, ह्यातला जो रोमान्स आहे तो आपल्या नागरी संवेदनांना उलगडावा तरी कसा? त्यासाठी अशा मचाणांवर बसूनच संवेदना धारदार करायला हव्यात.

हे माझं लॉजिक नाहीये. आजींचं आहे. हे सांगून त्यांनी माझ्या अहोंना रात्र मचाणावर काढायला पटवलं. मी काय? असल्या गोष्टीत प्रचंड उत्साही आहे. पण त्याला पटवणं कठीण. पण बिचारा माझ्यासाठी तयार झाला. त्याच्यापेक्षा नेचर लव्हर्सच माझ्याशी जास्त बोलत होते. आणि बिचाऱ्याला चरफडण्याव्यतिरिक्त काहीही करता येत नव्हतं. असो, तरी आला हेच खूप झालं. जंगलातल्या ट्रीपचा हा हायलाइट.

तिथून कलकत्त्याला पोचलो. माणसांच्या जंगलात आल्यावर अहोंना बरं वाटलं. त्याचे बरेच मित्र भेटले. शिकायला तो कलकत्त्याला होता. एक वेगळाच तो दिसला मला तिथे. म्हणजे माझ्याशी अगदी मृदूपणे बोलणारा, एकदम संयत, मितभाषी मुलगा मित्रांच्या घोळक्यात शिरल्यावर प्रचंड बदलला. त्याच्या मित्रांनीपण त्याच्या जुन्या कुलंगड्या बाहेर काढल्या. मजा आली. एवढा मोकळा ढाकळा त्याला पहिल्यांदाच पहिला. म्हटलं तू तर अगदी माझ्यासारखा आहेस. माझ्याशीपण अशीच मस्ती कर. हो म्हणाला, पण मुंबईला आल्यावर ये रे माझ्या मागल्या.

तिथून रोज घरी फोन करीत होते. शेवटच्या दिवशी आई म्हणाली आता मुंवईला पोचल्यावर रोज फोन करू नको. उगाच सासू-सासऱ्यांच्या डोळ्यात येईल. मला तिचा रागच आला. अरे, फोन नको करू म्हणजे काय? माझी स्वतःची आई मला हे सांगते ह्याचं दुःख जास्त. मग तिचंही म्हणणं थोडंसं पटलं. मग एक मध्यममार्ग काढला. कुणी घरी नसताना किंवा मी बाहेर असताना कॅजुअली फोन करायचा. आणि आठवड्यातून एक दोन वेळा ऑफिशिअली करायचा.

बाकी नवं घर मस्त आहे. सासू सासरे सुद्धा. फिरायला जाईपर्यंत माझा चेहरा पडलेला होता. घरची खूप म्हणजे खूप आठवण यायची. अगदी रडायला यायचं. पण आता ठीके. सवय झाली थोडीफार. माणसं कळायला लागली थोडीफार. पण त्याबद्दल पुढच्यावेळी.

"आणि माझं जगंच बदलून गेलं" हा वाक्प्रचार आपण कित्येक वेळा ऐकतो. सध्या मी ते अक्षरशः अनुभवतेय. कालपर्यंत मी माझ्या बाबालाच बाबा म्हणायचे. आता मी त्याच्याही बाबांना बाबा म्हणते, आईला आई म्हणते. पण म्हणून एका दिवसात ते मला माझ्या आई बाबांसारखे वाटतील का? नाहीच वाटत. मग तशी अपेक्षा मुलीकडून करावीच का?

माझे सासरे ह्यावर फार मार्मिक बोलले. म्हणाले, आपण म्हणतो आता सून घरी आली, ती आम्हाला मुलीसारखीच आहे. "सारखी" आहे, पण मुलगी नाहीच असंच आपण बोलून दाखवतो ना? माझ्या बाबाला सांगत होते. मग म्हणाले, म्हणून आम्ही म्हणतो, ही आमची मुलगीच आहे. तिने फक्त आम्हाला तुमच्याइतकं जवळचं स्थान द्यावं. ते म्हणतात ते मला शंभर टक्के पटलं. पण मी त्यांना माझ्या बाबाची जागा देऊ शकते का? नक्कीच नाही. मग त्यांनी मला त्यांच्या मुलीची जागा द्यावी अशी अपेक्षा मी कशी करू शकेन?

काही अंतर कधीच कापली जात नसावीत. कुणाची चूक म्हणून नाही पण परिस्थितीची असहायता म्हणून.
- संवादिनी

Thursday, January 29, 2009

अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर

गंगेत घोडं न्हालं एकदाचं. करायचं करायचं म्हणून ठरत नसलेलं आणि मग अचानक ठरलेलं आणि येतंय, जवळ येतंय म्हणून येऊ घातलेलं लग्न एकदाचं पार पडलं.

कसं वाटलं लग्नाला? माझ्याच. अगदी ईदच्या कुर्बानीच्या सजवलेल्या बोकडासारखं वाटलं नसलं तरी गेलाबाजार पोळ्याच्या सजवलेल्या बैलासारखं वाटलंच. आपल्या स्वतःच्या लग्नात आपल्या स्वतःलाच इतकं बोअर व्हावं ह्यासारखं दुर्दैवं ते कोणतं. नटून सजून दृष्टिकर्कश्श फ्लड लाइट्सच्या समोर उभं राहा. एसी चालू असूनसुद्धा भयंकर उकडत होतं. नको तो मेक अप आणि नको ती हेअरस्टाईल असं झालं होतं. त्यात मेकअप करणाऱ्या बाईने आपलं कौशल्य जरा जास्तच पणाला लावलं. इतकं की माझ्या नवऱ्यालादेखील मी अनोळखी वाटावे.

मग ते लग्नाचे सोपस्कार. सिंहासनावर बसणं किंवा न बसणं. ती सिंहासनवजा खुर्ची तिथे ठेवली कशाला होती कुणास ठाऊक? कारण पहिली दहा मिनिटं सोडली तर आम्हा दोघांनाही तिच्यावर बसायला मिळालं नाही. भेटायला आलेल्यांची ही भली मोठी लाइन. त्यातले कोण आपले कोण समोरचे काही कळत नव्हतं.

लहानपणी भेटलेल्या कुठल्यातरी लांबच्या आत्या किंवा मावशीने त्यानंतर एकदम लग्नात उपटून "ओळखलंस का? " म्हणून विचारणं, मी त्याला ओशाळत "हो" असं जोरदार ठोकून देणं, मनात अशा करत की ती आत्या किंवा मावशी मला "सांग बरं कोण?" म्हणून विचारणार नाही. एकमेकांच्या नातेवाईकांच्या ओळख करून देणाऱ्यालाही फार काळ लक्षात न राहणाऱ्या ओळखी आणि एकंदरीतच लग्न ह्या प्रकारात आलेल्या पाहुण्यांना नसलेला रस.

तीन साडेतीन वाजल्यानंतर झालेलं किंवा नकोसं झालेलं जेवण. बळेबळेच एकमेकांना भरवणं वगैरे. पण तेव्हाच मला समजलं की ही लग्नात नवरा नवरीने एकमेकांना भरवायची पद्धत का रूढ झाली असावी. बाय द टाइम, उत्सवमूर्ती असलेल्या दांपत्याचं जेवण होतं, त्याची जेवणावरची वासनाच मेलेली असते. निदान आपल्या नवपरिणित जोडीदारच्या हातून तरी ते घास दोन घास खाऊन पुढच्या कार्यक्रमासाठी थोडी शक्ती मिळवतील म्हणून असेल कदाचित.

मग ते नाव घेणं. आता मी त्याचं नाव दर मिनिटाला पंचवीस वेळा घेते. अजून उखाण्यात काय वेगळं घ्यायचं. पण ते घेतलं. त्याने माझं नाव घेतलं ते ऐकून हसून हसून मुरकुंडी वळली. मराठी भाषेचं सामान्य ज्ञान आधीच कमी, त्यात आकडे सांभाळण्यात आयुष्य गेलेलं त्याचा उखाणाही तसाच असायचा. मी खरं त्याला आधीच एक मस्त उखाणा सांगितला होता, पण साहेबांना स्वतःची क्रिएटिव्हीटी दाखवायची हौस आली.

असो. हे सगळं होता होता घरी जायची वेळ आली आणि लक्षात आलं अरे, आज तर आपलं घर बदललं. कालपर्यंत अल्लडपणे माहेरी वावरणाऱ्या आपण आज एकदम अचानक मोठ्या झालो. सूनबाई झालो. एका नव्या विश्वात प्रवेश. त्याच्या घरी मी पहिल्यांदाच जात होते असं नाही. पण आतापर्यंत त्याच्या घरी म्हणून जात होते. आता माझ्या घरी म्हणून जायचं होतं. माझ्या घरी वगैरे फक्त म्हणायला कारण आत कुठेतरी खोलवर मला माहितेय माझं घर म्हणजे माझ्या आई बाबांचंच घर. आणि त्याचं घर म्हणजे त्याच्या आई बाबांचं घर. पुढे कधी आमचं एखादं घर झालं तरच कदाचित हा कन्सेप्ट बदलेल.

नेहमी होते ती रडारडी भरपूर झाली. इतरांना रडतात म्हणून हसणारी मीदेखील धाय मोकलून रडले. पण नंतर त्यावेळी झालेला माझ्या नवऱ्याचा चेहरा आठवून खुदकन हसू देखील आलं. म्हणजे, बिचाऱ्याला फार गिल्टी फीलिंग वगैरे आलं होतं. सगळे रडतायत आणि ह्या सगळ्या रडारडीला आपण कारणीभूत आहोत असा काहीसा भाव. फारच बिचारा चेहरा करून उभा होता तो.

त्याच्या घरी पोचले. त्याच्या बिल्डिंगमधल्या लोकांनी एकदम जोरदार स्वागत केलं. पायघड्या काय, फुलं काय. मजा आली. खरंच आपण कुणीतरी स्पेशल आहोत असं वाटलं. लग्नाच्या ह्या दिवसात जर मी काही एन्जॉय केलं असेल तर हे स्वागत. घरी पोचल्यावर पुन्हा एकदा सर्व नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या ओळखीच सेशन झालं. नव्या सूनबाईच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही झाला. मनात नव्हतं पण सगळ्यांनी भरीला पाडलं.

एव्हाना दिवस सरला होताच. रात्रीचे रंग पसरायला लागले आणि एक वेगळीच जाणीव झाली. कालपर्यंत मी एकटी होते पण आजपासून तो बरोबर होता. रोमँटिक कल्पना वगैरे डोक्यात नव्हत्या असं नाही, पण आजपासून जो माझा हक्काचा स्वतःचा एकटीचा वेळ होता, झोपण्याचा तोपण शेअर करायला लागणार ह्या कल्पनेचं दडपण वगैरे आलं.

भरजरी साडीमध्ये नटून थटून, फुलांनी सजवलेल्या पलंगावर, भरजरी पोषाख घालून बसलेल्या नवऱ्यासाठी बदामाचं दूध वगैरे घेऊन जाणाऱ्या, लाजऱ्या बुजऱ्या, मान खाली घातलेल्या बॉलीवूड चित्रपटांमधल्या नवपरिणितेच्या कल्पनेला जमिनीवर दाणकन आपटत जेव्हा मी माझा घरचा अगदी रोजच्या वापरातला गाऊन घालून जांभया देत आणि नवऱ्याची वाट पाहत गॅलेरीत उभी होते, तेव्हा कळलं. की परिकधा आता संपली.

"अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर" हे साकारणं हे खरं चॅलेंज आहे.

- संवादिनी

Thursday, January 22, 2009

मी एक पँडोरा?

पँडोरा. एक अतिशय सुंदर स्त्री. जगाला वेडं करण्याची सर्व अस्त्र तिला मिळालेली. पण तिची निर्मितीच मुळी झाली होती जगाला वठणीवर आणण्यासाठी, मानवजातीला शिक्षा म्हणून. एका स्त्रीकडे असायला हवेत ते सगळे गुण तिच्याकडे होते आणि एका स्त्रीकडे असायला हवा तो एक अवगुणही. प्रत्येक गोष्टीबद्दलची उत्सुकता.

तिला पुरुषांना घायाळ करण्याची सर्व अस्त्र तर मिळालेली, पण त्याबरोबरच मिळाला एक हंडा. तिला बजावण्यात आलेलं की काहीही झालं तरी ह्या हंड्याचं झाकण उघडायचं नाही. पण तिची उत्सुकता शिगेला पोचली. तिचा संयम सुटला आणि तिने तो हंडा उघडला. आणि चमत्कार झाला. मनुष्यजातीला जेरीला आणणारी रोगराई, त्रास आणि वाईट गोष्टी, ज्या मानवाला तोपर्यंत माहीतही नव्हत्या, त्या हंड्यातून बाहेर पडल्या. तिला तिची चूक समजण्याआधीच व्हायचं ते नुकसान झालं होतं. तिने झटकन हंड्यावर झाकण ठेवलं आणि शेवटची एक गोष्ट मात्र हातची जाऊ दिली नाही. ती म्हणजे "आशा".

काल सहज विकिपीडिआ चाळत असताना पँडोराज बॉक्स वर पोचले. पँडोराज बॉक्स मधल्या पँडोराची ही गोष्ट.

एका वरदानाबरोबर मिळालेला एक शाप. अनिश्चिततेचा आणि सरतेशेवटी कुठल्याही संकटातून वर काढणारी, यायाला मदत करणारी आशा. निर्गुण, निराकार, निरंकार, अगदी परमेश्वरासारखी असावी अशी आशा. आज त्याच्यासमोर सीसीडी मध्ये बसलेले असताना, त्याच्या बोलण्याकडे बिलकूल लक्ष नव्हतं. मनात सतत पँडोराच घोळत राहिली. माझे हरवलेले डोळे कुठेतरी काही शोधत राहिले त्याच्या डोळ्यात. आयुष्याला दिवाणं बनवणारी सगळी सुखं समोर हात जोडून उभी आहेत पण त्याबरोबर पेलावं लागणारे अनिश्चिततेचं शिवधनुष्य.

कदाचित मी फारच निगेटिव्ह वगैरे विचार करणारी असेनही, पण आपल्या समाजात नक्कीच मुलीला लग्नानंतर ह्या अनिश्चिततेला सामोरं जायला लागतं. तो भेटून फार काळ नाही झाला. आणि प्रत्यक्ष भेटण्याच्या वेळा तर दोन हातांच्या बोटावर मोजता येण्यासारख्या. तेवढ्यात काय कळणार खरं काय खोटं काय? माझं जजमेंट अगदीच वाईट नाहीये. त्याच्याबाबतीत ते चुकणार नाहीही. पण त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या जगाचं काय?

पण शेवटी काहीही झालं तरी त्यातून सावरण्याची आशा ही माझीच आहे. माझी स्वतःची.

- संवादिनी

Friday, January 16, 2009

Second Innings!!

खरोखरच ब्लॉगिंगचा नशा आणि गरज दोन्हीही ब्लॉगपासून दूर होऊ देत नाही.

ह्यापायीच
अजून एका टोपणनावाने अजून एक ब्लॉग सुरू केला होता. मग उगाचच एकाला दुसरं टोपणनाव नको म्हणून तो बंद केला आणि तिथे छापलेले दोन उतारे इथे छापून सुरुवात करणार आहे. कुणी चुकून तिथे हे आधीच वाचलं असेल तर क्षमस्व.

होपफुली आता मी थोड्या अधिक मॅच्युरिटीने वागेन आणि मागच्यासारखा "सावळो गोंधळ" घालणार नाही. आधी लिहीत होते तसंच लिहिणार आहे. म्हणजे माझ्या लिखाणात पूर्णसत्य काहीच नाही, पण खोटंही काहीच नाही आहे. सगळी काळ, वेळ, घटना आणि माणसं ह्यांची मिसळ आहे. एखादं ललित साहित्य म्हणून वाचलंत तर उत्तम.

गेली दोन टेस्ट पोस्ट टाकली, त्यात असं दिसून आलं की मराठी ब्लॉग विश्वावर माझा ब्लॉग अपडेट होत नाहीये. तो व्हावा म्हणून मी त्यांना सांगणार नाहीये. जेणेकरून हा ब्लॉग हे एक प्रायव्हेट अफेअरच राहील. तुम्हाला लिंक माहीत आहेच तेव्हा तुम्हाला सादर आमंत्रण.

मला लिहिण्याची आणि तुम्हाला वाचण्याची मजा येईल अशी आशा.

फिर मिलेंगे और मिलतेही रहेंगे.

- संवादिनी

Wednesday, January 14, 2009

थेंब

ढग सोडून निघालेल्या
इवलाल्या थेंबासारखी मी मोकलून रडले

अश्रू
हाती लागलेच नाहीत
ते माझ्यासकट माझ्या समुद्रात विरघळले

- संवादिनी

Thursday, January 8, 2009

नमस्कार

हे नवीन वर्ष, सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि आनंदाचे जावो. मंदीचं सावट जाऊन चांदीचे दिवस पुन्हा येवोत. खूप लोकांनी खूप लिहावं आणि आमच्यासारख्यांनी भरपेट वाचावं.

कुणीतरी असा मेल पाठवला की २००९ हे आयुष्यातलं सर्वात चांगलं वर्ष ठरो, मी म्हणते आयुष्यातलं नको, २००९ पर्यंतच्या आयुष्याचं सर्वात चांगलं वर्ष ठरो आणि मग २०१० आणि २०११ आणि पुढे.

पुन्हा भेटूच, तोपर्यंत टाटा.

- संवादिनी