Showing posts with label घोळ. Show all posts
Showing posts with label घोळ. Show all posts

Thursday, August 28, 2008

जाणं, राहणं आणि गुंता

काल घर सोडायला हवं होतं. म्हणजे सांगितलं तसंच होतं की बुधवारी निघायचं. सोमवारपासून जोरदार तयारी चालू होती. खरेदी तर दिल्लीहून परतल्यापासून थांबतच नाहीये. त्यात परदेशी कामाला जायचं असल्याने कंपनीने काही जास्त अलावन्स दिलाय. कुणी खरेदी करायला असेच पैसे दिले तर कोण सोडेल. अगदी शेवटच्या पैपर्यंत तो अलावन्स मी संपवला. त्याची बिलंही पाठवून दिली.

पुढचा प्रोजेक्ट ट्रेनिंगचा प्रोजेक्ट आहे. नेहमीप्रमाणे मी काय करणार आहे ह्याची मला अजिबात कल्पना नाहीये. त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे एकच महिना तिथे जायचंय. मग काही दिवस भारतात परत यायला मिळणारे. पण ट्रेनिंगचा प्रोजेक्ट असल्याने, आम्ही सर्व प्रेसेंटेबल दिसणं आवश्यक आहे. त्या प्रकारचे फॉर्मल्स खरेदी करणं आलं. ब्लेझर वगैरे बाप जन्मात कधी घातलं नव्हतं ते आता घालायला लागेल. गंगा वाहतेच आहे तर हात धुऊन घ्या म्हणून माझी उंची दीड इंचाने वाढवणारे हिल्स आणि गिरगावात राहणाऱ्या मुलीच्या मानाने तोकडे वाटणारे (तरीही चांगलेच लांब) असे स्कर्टस घेऊन झाले. अर्थात घेतानाच दोन सेमी फॉर्मल घेतलेत, म्हणजे ऑफिसात आणि ऑफिसाबाहेर चालतील.

गेला आठवडाभर आई नुसती सुटलेय. माझ्या पाककलेच्या ज्ञानात दर रोज काही ना काहीतरी भर पडतेय. मी आईला म्हटलं, मला हे सगळं काही लक्षात राहणार नाही. तर म्हणाली, राहील. करून करूनच येतं. तिथे गेल्यावर बाहेरचं खाऊ नको. घरीच बनवत जा. तब्बेतीला चांगलं नाही बाहेरचं. मी हो म्हटलं. ही बाबाची पॉलिसी. आई जे म्हणेल त्याला तो हो म्हणतो. आणि स्वतः शेवटी हवं तेच करतो. मीही तसंच करते आणि विन्याही तसंच करतो.

मला कधी कधी खूप वाईट वाटतं आईचं. ती एवढं करते आमच्या सगळ्यांसाठी आणि आम्ही तिला सीरियसली घेत नाही. बाबाची पण चूक आहे. तोपण सतत तिची थट्टा करत राहतो आणि आम्हीपण. पण तरीही ती आमचं मनापासून करते. आम्ही सल्ले मानत नाही माहीत असूनही सल्ले देते. वाईट वाटलं की मग मी दोन दिवस शहाण्यासारखं वागते. तिला उलटून बोलत नाही. तिने सांगितलेलं ऐकते, पण दोन दिवसांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

तर आईने सगळं किराणा मालाचं दुकान खरेदी करून आणलंय. मी तिला म्हटलं आई वीसच किलो नेता येतं. तर म्हणते असूदे. नाही मावलं तर घरी वापरता येईल पण मावत असेल तर ऐन वेळी दुकानात जायला नको. मी आपलं बरं म्हटलं.

काल निघायचं होतं. परवापासूनंच घरात निरोपाची भाषा चालली होती. बाबा म्हणाला मला, नीट राहा, शहाण्या मुलीसारखी राहा, फोन करत जा, अगदी रोज नाही जमला तरी आठवड्यातून एकदा तरी कर. मेल रोज कर. त्याच्या डोळ्यात दिसतं की आभाळ भरून आलंय म्हणून. मन भरून येणं हा संसर्गजन्य रोग आहे. मग मला त्याची बधा झाली नाही तरच नवल.

खरंतर घरापासून दूर राहूनंच मी आता परत आलेय. पहिल्यांदाच एकटी कुठे जातेय असं नव्हे. बाहेर एकटं राहायची भीती आहे, अनुभव नाही असं अजिबात नाही. तरीही मला दिल्लीला जाताना जितकं हळवं व्हायला झालं होतं तितकंच कालही झालं.

आईने, विन्याने सुट्टी घेतली होती. दुपारी जेवणं झाल्यावर मात्र मला अगदी असं वाटायला लागलं की मरूदे ती नोकरी. इथेच राहावं मजेत. मुंबईत नोकऱ्यांची कमी नाही. कशाला उगाचच घरापासून दूर राहून स्वतःला त्रास करून घ्यायचा. तरीही शेवटची आवरा आवर चाललेली होती. संध्याकाळचं विमान होतं. तिनाच्या सुमाराला घरातून निघायचं होतं. पासपोर्ट एअरपोर्टवर मिळायचा होता. आणि साधारण अडीच वाजता फोन आला, व्हिसा झाला नाही, आज जाता येणार नाही.

दुसऱ्या कुणाचं असं झालं असतं तर मला वाटलं असतं काय पचका झाला. माझ्या बाबतीत झालं, तेव्हा मात्र मला असं काहीही वाटलं नाही. झाला असेल तर थोडा आनंदच झाला. एक दिवस अजून घरी राहायला मिळणार म्हणून. फोन करणारा असंही म्हणाला, की उद्या जर काम झालं नाही व्हिसाचं तर रविवारीच होईल, कारण शुक्रवार, शनिवार तिथे सुट्टी आहे.

एकीकडे वाटलं, उद्या यायलाच हवा. दुसरीकडे वाटलं, नकोच यायला, तेवढं जाणं अजून लांबेल. जायचं तर आहे पण घरी राहायचं पण आहे.

असा सगळा गुंता आहे.

- संवादिनी

Thursday, July 24, 2008

गुड न्यूज आणि त्रांगडं

एक गुड न्यूज.

सोमवारी आमच्या मिशन इंपॉसिबलचा दी डे आहे. आमच्या परीने जे करता येईल ते सगळं केलेलं आहे. बहुतेक काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत.

पण खरी गंमत तर पुढे आहे. दिल्लीमध्ये राजकीय गरमागरमी चालू असताना, आम्ही इथे असून त्यापासून दूर कसे राहू शकू? आमच्या प्रोजेक्टमध्ये सोमवारापासून सत्तापालट आहे. जुन्या लीडला डच्चू देण्यात आला आहे आणि अस्मादिकांना लीडपदाची सूत्र हाती घ्यायचा आदेश मिळालेला आहे. उरलेले दोन आठवडे मी लीड असेन. इतकंच नव्हे तर ह्या प्रोजेक्टनंतर इथेच एक नवा प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे. त्यात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी काम करावं अशी क्लायंटची फर्माइश आहे.

ही झाली बातमी.

आता ह्यामागचं राजकारण. आम्ही इथे आलो तेव्हा मी होते ह्या कंपनीतली एक नवखी नोकर आणि ती होती अनुभवी. साहजिकच ती पुढारी झाली. पण अनुभवी असणं आणि पुढारी असणं ह्यात फरक आहे की नाही? स्वतःचं काम स्वतः करणं आणि दुसऱ्यांकडून ते करून घेणं ह्यात फरक आहे.

मुळात पुढाऱ्याविषयी जनतेला प्रेम वाटायला हवं. विश्वास वाटायला हवा. आमच्या पुढारणीच्या हे गावीही नव्हतं. ती आम्हा सगळ्यांना आणि क्लायंटलाही गृहीत धरून चाललेली होती. माझ्या आणि तिच्या दुर्दैवाने आमच्या दोघांचं फील्ड सेम. मग साहजिकच तुलना होत गेली. मी फार हुशार आहे असं नाही. हवंतर वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणूया, पण मी वरचढ ठरत गेले. आमच्या टीमलाही हे दिसत होतं, क्लायंटलाही हे दिसत होतं. कुठेतरी आपण कमी पडतोय ह्याची जाणीव तिला व्हायला लागली आणि तिथेच माशी शिंकली.

तिचं उणं लोकांना दिसावं म्हणून मी हे करीत नव्हते. हे आपोआप होत होतं. पण तिच्या मनात ते बसलं. मी हे सगळं मुद्दाम करतेय असं तिने स्वतः ठरवून टाकलं. आणि सुरू झालं एक युद्ध. अर्थातच तिचं पारडं जड होतं. सगळे प्रोजेक्ट रिव्ह्यू तिच्याकडून वर जात होते. ऑन फील्ड काहीही होत असलं तरी ती सांगेल तो इतिहास होणार होता. मला मानसिकरीत्या खच्ची कसं करता येईल ह्याचाच ती विचार करायला लागली आणि त्यातून जन्माला आलं राजकारण. ते इतक्या खालच्या थराला गेलं, की मी क्लायंट साइडच्या एका बड्या अधिकाऱ्याशी लगट करत असते अशी अफवाही पसरवली गेली.

इथे लिहिलं नव्हतं, पण खूप त्रास झाला. मी जवळ जवळ प्रोजेक्ट सोडून निघून जाणार होते. इतक्या हलक्या दर्जाचं राजकारण मी कधी अनुभवलं नव्हतं. पण माझे इतर कलीग्ज मदतीला धावून आले. त्यांनी मला समजावलं. ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि देअर वॉज अ डिफरंट मी आफ्टर दॅट. मी माझी लढाई स्वतः खेळले आणि जिंकले.

जेव्हा मला ही बातमी समजली की तिला डच्चू दिलाय, मला खूप आनंद झाला. थोडी "ग"ची बाधाही, खोटं कशाला बोलू? तिथेच प्रोफेशनॅलिझम सुटला. सगळं व्यक्तीगत झालं.

रात्री घरी फोन केला. जे चाललं होतं ते अर्थात घरी माहीत होतंच. सगळे खूश झाले. आई फक्त म्हणाली, जास्त हवेत उडू नकोस. आता संपलं ना सगळं? मग जाऊन बोल तिच्याशी. मला अजिबात तिच्याशी बोलायची इच्छा नव्हती.

फक्त आई म्हणाली म्हणून मी तिच्याकडे गेले. रूमचा दरवाजा नॉक केला. काहीच रिस्पॉन्स नाही. पुन्हा नॉक केला. थोड्या वेळाने तिने दरवाजा उघडला. मला बघून ती शॉक्डच झाली. गेला आठवडा आम्ही फक्त मेलमधूनच बोलतोय. तिने मला आत बोलावलं. मी तिच्या बेडवर जाऊन बसले. काय बोलावं काही सुचत नव्हतं. तिला ते सगळं सहन झालं नाही आणि ती एकदम रडायलाच लागली. मग मलाही भरून आलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती अजून रडायला लागली. मी तिला सॉरी म्हटलं आणि माझ्या मनात तिच्याविरुद्ध काहीही नाही असंही सांगितलं. ती अजूनच रडायला लागली.

मग मलाही रडायला आलं. मी तिला सगळं पहिल्यापासून सांगितलं. मी तिच्याविरुद्ध कुठेही चुगल्या केल्या नाहीत हेही सांगितलं. तिला खूप वाईट वाटत होतं. मग मात्र तिने माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. पण त्या अफवेबद्दल मात्र ती काहीच बोलली नाही. मी तिला स्पष्ट तसं विचारलं तर तिने स्वतःच्या मुलीची शपथ घेऊन सांगितलं की तिने असं काहीही केलं नाही म्हणून.

मी तिला माझा हात दिला. तिनेही तो हातात घेतला आणि मनापासून सॉरी म्हणाली. ते मला तिच्या डोळ्यात दिसलं. असा रडत रडत आमच्या भांडणाचा सुखांत झाला. ती ह्या आठवड्यानंतर प्रोजेक्ट सोडून जाईल आणि मी तिची जागा घेईन असं वरून कळलं.

आनंद झाला पण तिच्यासाठी खूप वाईट वाटलं. आई म्हणाली म्हणून मी तिच्याशी बोलले. नाहीतर हा द्वेष मनात कायम राहिला असता, तिच्या आणि माझ्याही. हेच जर आम्ही आधी केलं असतं तर? तिच्या मनात असलेले माझ्याविषयीचे गैरसमज आणि माझ्या मनात असलेले तिच्याविषयीचे गैरसमज आम्ही रोखठोक एकमेकींना विचारले असते तर? नक्कीच हे सगळं ह्या थराला पोचलं नसतं.

असो, एक धडा मिळाला. वरवर माझं काहीही चुकलेलं नाहीये. पण आपली चूक नसेल तरीही आपण पुढाकार घेऊन बोलायला काय हरकत आहे? बोलूनही काही फरक पडला नाही तर गोष्ट वेगळी.
सगळं त्रांगडं झालंय आता. मलाच गिल्टी फीलिंग येतंय. आनंद तर होतोय, पण दुसऱ्या कुणालातरी खाली खेचून तो मिळालाय असं वाटतंय. आई म्हणाली तेच खरं, पाय जमिनीवरच ठेवायला हवेत, यशातही आणि अपयशातही.

हल्ली जरा माझे पोस्टस ऍब्सर्ड होतायत का? कारण मी जे लिहिते ते न वाचता पोस्ट करतेय, वेळ नाहीये म्हणून. ऱ्हस्व दीर्घाच्या चुका आणि टायपोजसाठी क्षमस्व. हल्ली लिहिण्यासारखंही फार घडत नाहिये असं वाटायला लागलंय. त्यामुळे काहीतरी साहित्यिक वगैरे लिहावं असं वाटायला लागलेलं आहे. कसं लिहायचं माहीत नाही, जमेल का माहीत नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? म्हणून पुढच्या आठवड्यात नो दैनंदिनी. पुढच्या आढवड्यात काहीतरी साहित्यिक वगैरे. बाबा म्हणतो, की कलाकृती कळली नाही की तिचं फार कौतूक होतं. बघुया, न समजणारं काही लिहिता येतंय का ते.

- संवादिनी

Thursday, April 10, 2008

नोकरी आणि भिजलेली रात्र

मिळाली. शेवटी मिळालीच.

गेल्या आठवड्यात लिहिलं नाही, पण नव्या नोकरीची बोलणी जवळ जवळ जमत आलेली होती. ह्या आठवड्यात ऑफर लेटर आलं. खूप छान वाटतंय. म्हणजे दहादा नाही ऐकल्यावर, दोन तीन वेळा नाही म्हटल्यावर, हो ऐकून, हो म्हणायचा आनंद काही वेगळाच असतो ना? तसा काहीसा आनंद झालाय मला.

कालच ऑफिसमध्ये सांगितलं. आमचा बुटकोबा तर एकदम सेंटीच झाला. म्हणाला, अभी मेरेसाथ कॉफी पिने कौन जायेगा? तशी काय मी त्याच्याबरोबर रोज नाही जायचे पण कधी कधी खूप वैताग आला सगळ्याचा की मला घेऊन जायचा कॉफी प्यायला. सगळ्या जगाला शिव्या घालायचा आणि मग शांत व्हायचा. त्याला माहीत होतं की मी इथली गोष्ट कधीही तिथे करणार नाही. आपल्याला काय, फुकट ते पौष्टिक. कॉफी आणि ऑफिसच्या पॉलिटिक्सचं ज्ञान फुकट कोण नाही म्हणेल?

त्याला सांगितलं, मग डिपार्टमेंट हेड कडे जाऊन रीतसर राजीनामा वगैरे दिला. आपण कुणीतरी मोठ्ठे झालोत असं वाटलं. त्यांनी विचारलं का चाललीस. काय उत्तर द्यायचं? का चालले? सूख खुपलं? अहं, असं काही मी बोलले नाही. मी सांगितलं, पगार चांगला आहे. आपली कंपनी पण छान आहे, पण तेवढा पगार नसता मिळाला म्हणून सोडतेय. खोटंच सांगितलं. पगार चांगला आहे, पण पगारासाठी नाही मी नोकरी सोडली. माझं आभाळ शोधण्यासाठी सोडली.

मग सगळ्या ऑफिसमध्ये बातमी पसरली. एकेक फोन यायला लागले. त्याचाही आला. मिशीवाल्याचा. ऑल द बेस्ट म्हणाला. काहीबाही बोलत गेला. पण त्याचं बोलणं काही डोक्यात गेलंच नाही. फक्त तो बोलत असल्याचा फील.

नेहमीची टेप लावायची. कुठली कंपनी, काय रोल, कुठलं शहर? मग पुणं म्हणून सांगितलं की मग तू एकटी राहणार? आमच्यासाठीपण बघा ना काहीतरी नव्या कंपनीत, इथपर्यंतच्या गप्पा. दिवस मोठा मजेत गेला.

घरी जायला निघाले, तेव्हा मात्र हुरहूर लागली. बरोबर पाच आठवडे राहिले. पाच आठवड्यांनंतर मी ह्या इथे येणार नाही. कुठेतरी दुसरीकडे जाईन. पण जग बदलणार नाही. तसंच राहील. लोकं ऑफिसात येतील, आपली कामं करतील आणि घरी जातील. मी मात्र इथे नसेन. माझा डेस्कही असेल, कॉमही असेल आणि तिथे दुसरंच कुणीतरी? छे, ही कल्पनाच असह्य आहे.

घरी पोचले. कालपासून घरी तशी शांतताच आहे. मी पुण्याला जाणार महिन्यांनी म्हणून. बाबाला मी म्हटलं, काय शोकसप्ताह वगैरे साजरा करताय का? नुसताच हसला. तो असा हसला ना की मला खूप वाईट वाटतं. खूप बिचारा वाटतो तो. बाबा. मुलगी जायला तर नकोय पण अडवायचं पण नाहीये अशी काहीशी हतबलता. काहीच बोलला नाही. मग मीच मुघल ए आझम ची सीडी लावली. ऐकत राहिला डोळे मिटून.

कधी नव्हे ते आत जाऊन आईला मदत केली थोडी. बाबापेक्षा आई ठीक वाटली. म्हणजे तिने ऍक्सेप्ट केलंय की मी जाणारे म्हणून. मग पोळ्या लाटल्या. अर्ध्या आईने पुन्हा लाटल्या. पण आमटी मात्र मीच बनवली. आता माझा स्वैपाक मलाच करायला लागेल ना ह्यापुढे?

आणि आज चक्क मी बनवलेल्या आमटीचं विन्यानी तोंडभरून कौतुक केलं. जेवणं झाली. नेहमीच्या गप्पा काही रंगल्या नाहीत. बाबा तर गप्प गप्पच होता. विन्या फुटकळ बोलत होता पण त्यालाही म्हणावा तसा उत्साह नव्हता. आई तर काय कामातच असते नेहमी ती तशी होतीच.

झोपायच्या आधी देवाला नमस्कार करायला गेले. म्हटलं बरोबर निर्णय घेतलाय ना? मला कोण उत्तर देणार? पाठी विन्या उभा होता. म्हणाला ताई तू आता अतिरेकी होणार पुण्याला जाऊन. आता मी कुणाशी भांडणार? कुणाच्या कुरापती काढणार? आय विल मिस यू यार.

आय विल मिस यू टू.

बिछान्यावर पडले तर झोप लागेना. खूप रडायला आलं. खूप खूप. सगळं आठवलं, माझा रिसल्ट, सेलेब्रेशन. बाबा तर अक्षरशः नाचला होता. आईच्या कंपनीत नोकरी, वेगळी वेगळी ऑफिसेस, आमचा बुटकोबा, मोठे सर, नवखी मी, रुळलेली मी, निराश मी, उत्साही मी, माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेय ही नोकरी. आणि तीच कापून दूर करायची?

पूर्ण रात्र भिजून निघाली.

- संवादिनी

Friday, November 30, 2007

दिवाळी, ऑफिस आणि नाटक

सगळ्या लढाया पार पाडत शेवटी नाटकाचा प्रयोग पार पडलाच (पार पडला म्हणजे नाटक पार पडेल आहे असं नव्हे. तशी आमची नाटकं उभी कमी राहतात आणि पडतात जास्त, असो). दिवाळी, त्यात ऑफिसमध्ये वाढलेलं काम, हे सगळं सांभाळत शेवटी एकांकिका झाली आणि म्हणूनच आता लिहायला थोडा वेळ मिळतोय.


नशीब इतकं चांगलं की ह्यावेळी तालमींचा हॉल ऑफिसच्या जवळ होता. मग काय? संध्याकाळी साडेसहा सातला मी ऑफिसमधून गुल व्हायचे. नऊ वाजता परत. मग पुन्हा उशीरापर्यंत काम, मग रात्री ड्राइव्ह करत घरी. परत सकाळी ऑफिस. त्यात तालमीला उशीरा येते म्हणून आमचा डिरेक्टर माझ्या नावानी कांदे सोलणार. माझा रोलही त्याने कट केला त्यामुळे. दुसरा कमी महत्त्वाचा रोल दिला. त्याचंही बरोबरच आहे म्हणा. माझ्या ऑफिसची काळजी त्याने का करावी?


नुसता कल्लोळ झाला होता डोक्यात. घरी काय तर दिवाळीची तयारी. दर वेळी कंदिल करायला जेपींना (बाबांना) मी मदत करते. ह्यावेळी विनूने केली. आईचा आग्राह. फराळ करायला शीक. मी लाख शिकेन पण मी बनवलेला फराळ खाऊन दाखवेल असा "माँ का लाल" जन्माला यायचाय म्हणावं. नाही म्हणायला थोडे लाडू वळून दिले तिला. तेवढंच तिचं समाधान.


मग दिवाळीचे दिवस. पहिल्या दिवशी नव्हतीच सुट्टी. पण दांडी मारली. ह्यावेळी आमच्या चाळीत मोठा कंदिल बनवायची टुम निघाली. मग काय रात्रभर जागरण. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी उशीरापर्यंत (आठ वाजेपर्यंत. हा आमच्याकडचा उशीर) झोपते म्हणून आईचा ओरडा खाल्ला. पण कंदिल बाकी झकास झाला. रात्री काय सही दिसत होता.


रंगांची उधळण, त्या पणत्या, फुलबाज्या, फटाक्यांचा वास, थोडासा फराळ, विन्याने दिलेली भाऊबीज. वाह! मजा आली दिवाळीला. जेपींनी आईला पाडव्याला नवी साडी घेतली. भाऊबीजेला सगळी भावंड जमली. मजा आली. माझ्या लग्नाची काळजी आत्यांनाही भेडसावू लागल्याचं त्यांनी वारंवार, चुकवता येणार नाही अशा पद्धतीने उघड केलं. मी ते हसण्यावारी नेलं, पण किती दिवस?

तर तेवढा भाग सोडला तर दिवाळी जोरदार झाली. मोठ्या रांगोळ्या काढल्या. गेरू सारवताना हमखास मी माझा ड्रेसही सारवते, ते यंदाही चुकलं नाही. मी वळलेले लाडू गोल नसल्याचं विन्यानी मला पुन्हा पुन्हा सांगितलं. अर्थात त्याचा तो धंदाच आहे, त्याला तो तरी काय करणार? पण भाऊबीज झकास. "झोंबी" दिलं ह्यावेळी. मस्त आहे. मी वाचलंय पण पुस्तक आपल्या मालकीचं झालं की जास्त जवळचं वाटतं, नाही?

दिवाळी संपली आणि ऑफिसमध्ये महिन्याचा गो लाईव्ह जवळ यायला लागला. ह्या महिन्यात दहा लोकेशन्स आहेत. त्यामुळे त्याची कामं लागलेली होतीच. शिवाय मागच्या महिन्यात लाइव्ह गेलेल्या लोकेशन्सचे लोकं पीडायला असतातंच. त्यांचं काही चूक नाही म्हणा. भांडी घासताना एकदम राखुंडीच्या ऐवजी डिशवॉशर दिला तर काय अवस्था होईल रामा गड्याची? तीच गत त्यांची झालेय. गो लाईव्ह च्या दिवशी बहुदा रात्र ऑफिसमध्ये काढावी लागणार असं दिसतंय.

ह्या गो लाईव्ह ची एक गम्मत आठवली. लोकेशन्स चे लोकं ट्रेनिंगला येतात, त्यांच्यात दिल्लीच्या आसपासनं आलेला एक मुलगा होता. दोन दिवस माझी सेशन्स होती. एकदा चहा पिताना मला म्हणाला, "दीदी, जे गोलाय गोलाय क्या है?". आता दिदी म्हणायचं माझं वय आहे का? मी त्याला माझ्या मराठमोळ्या राष्ट्रभाषेत म्हटलं " गोलाय? ये तो मैने पयली बार सुना है" मग तो म्हणाला तुमचे साहेब लोक लोकेशन ला येऊन कितीतरी वेळा बडबडून गेले. मग आता दिदी च्या नात्याने त्याला सगळं गो लाइव्ह प्रकरण समजावलं.

गम्मत वाटली कितीतरी वेळा आपण लोकांना गृहित धरतो. की त्यांना अमुक गोष्ट माहीत आहे. नुस्त ऑफिसमध्येच नाही तर जनरली, घरी, बाजारात, दुकानात. ही गृहितकं सोडायला हवीत. माझ्यापुरतं तरी मी ठरवलंय. कठीण आहे. पण प्रयत्न करीन.

नाटकाबद्धल पण लिहायचंय, पण आज नको पुढच्या वेळी.