Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Thursday, October 2, 2008

उत्तर आणि प्रश्न

दाटून आलेला होकार,
ओठांशी येऊन थांबला

त्याने प्रश्न विचारताच,
वेंधळ्यागत सांडला.




- संवादिनी

Thursday, June 19, 2008

दिल्ली आणि नेलपॉलिश

विमानतळावर उतरले आणि माझ्यावर अचानक बरीच लोकं चाल करून आली आणि आपण मुंबईत नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं. सगळे दिल्ली चे ठग मला (आणि इतरांनादेखील) ठगवण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले. अर्थात मीपण मुंबईत तयार झालेली असल्याने त्यांना भीक न घालता प्रीपेड टॅक्सीच केली.

गेला आठवडाभर दिल्ली अभी दूर नही चाललेलं. एकदाची येऊन पोचलेच. अर्थात दिल्ली काही मला नवी नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी मी दिल्लीला आलेली आहे. कधी आईबरोबर, तिच्या कामासाठी. बाबा खास सव्हीस जानेवारीची परेड पाहायला घेऊन आला होता तेव्हाची. इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या ऑडिटोरिअमध्ये कडकडून टाळ्या वाजवणारी.

पण आजची दिल्ली खूप वेगळीच वाटली. एकटी अशी मी दिल्लीला कधी आलेच नाहीये म्हणून असेल. पोचले दिल्लीत पण मनातून मुंबई जाईना. मुंबई तर मुंबई, अगदी पुणंपण आठवत राहिलं. पुण्याला येऊन फार दिवस नाही झालेत पण आता परत जायला मिळेलच असं नाही. इथे आठवड्यासाठी म्हणून पाठवलंय. पण जातानाच सायबाने सांगितलंय की कदाचित महिनाही लागू शकेल. वर अजून काही प्रोजेक्टसंबंधी बोलणी चालू आहेतच. दरम्यानच्या काळात तिथे नंबर लागला तर थेट तिथेच जावं लागेल.

बरं पुण्याला सगळी गंमत जंमत होती. इथे तसं काही नाहीये. भरपूर काम माझी वाट पाहतंय. दर आठवड्याला घरी जाता येणार नाही. आनंदी नाही आणि आनंदही. उगाचच हाताकडे बघत राहिले. नवं नेलपॉलिश लावायचं राहूनंच गेलं.

बराच वेळ विचार करत होते की ही गोष्ट लिहावी का? पण शेवटी हिय्या करून लिहितेय. मला बॉसने सांगितलं की सोमवारी पोचायचं दिल्लीला. आनंद झाला तसं वाईटही वाटलं. शुक्रवारी परत घरी जायचं होतं, म्हणून गुरुवारी सेलेब्रेशन करायचं ठरलं. आनंदकडे. आनंदी होती. ऑफिसातली अजून दोघं तिघं होती. आनंदीचा भाऊही होता. मजा आली. माझ्या जाण्याच्या नावाखाली धांगडधिंगा, बाकी काही नाही. खूप उशीरापर्यंत बसले होते सगळे. घरी जायला निघालो. आनंद म्हणाला मी सोडतो तुला, एकटी जाऊ नको म्हणून. पण माझं घर एक एकदम जवळ आहे तिथून. म्हटलं मी एकटीच जाते. सगळे खाली पोचलो. आनंदीला अच्छा करून मी कायनेटिक सुरू करायला गेले तर ती हटून बसली. कशीबशी मेन स्टँडला लावून किक मारायला सुरवात केली आणि लक्षात आलं की टायर पंक्चर आहे. झालं. आता काय करणे?साहेबांना फोन केला. साहेब उचलेनात. म्हणून पुन्हा वर गेले.

आनंदने दरवाजा उघडला. नेहमीसारखी माझी व्यवस्थित खेचून झाल्यावर साहेब तयार होऊन निघाले माझ्यासोबत. मला म्हणाला गाडी इथेच ठेव. मी पंक्चर काढून तुझ्या बिल्डिंगच्या खाली लावून ठेवीन, तू यायच्या आधी. म्हटलं ठीक. घरी पोचल्यावर म्हटलं ठीके आता भेटू उद्या. तर म्हणाला चल एक कॉफी मारू. वर आलो कॉफी केली. तो उगाचच काहीतरी बोलत राहिला. मला झोप येत होती पण त्याचं मन मोडवत नव्हतं म्हणून बसलेले. शेवटी एकदाचा तो निघाला. दरवाज्याशी पोचल्यावर म्हणाला विसरणार नाहीस ना मला? म्हटलं काय रे जास्त झालेय का तुला? तुला कशी विसरेन. काहीच बोलला नाही. मी वाट पाहत राहिले तो कधी निघतो त्याची.

मला काही कळायच्या आत एकदम गुडघ्यांवर बसून माझा हात हातात घेतला. मला जे नको होतं तेच घडणार होतं. आता हा मला प्रपोज करणार. मग मी ह्याला नाही म्हणणार, मग ते नेहमीचं रडगाणं. मग समजावणं. न दुखावता दुखावणं. हे सगळं लख्ख दिसायला लागलं. माझी नाराजीही चेहऱ्यावर स्पष्ट दिसली असेल कोण जाणे. दिल्लीचं डिक्लेअर झाल्यापासून मला असं होईल असं वाटत होतं. आणि शेवटी ते घडलंच.

दोन क्षण त्याने कसलातरी विचार केला. मग हाताकडे बघत म्हणाला कसलं फडतूस नेलपॉलिश लावलंय. दिल्लीला जाताना तरी चेंज कर.

हसावं की रडावं? माझ्या मनातलं कसं बरोबर ओळखलं त्याने. काही लोकं इतकी निरागस असतात ना, की त्यांचा चेहराच आपल्याला सगळी गोष्ट सांगतो. त्याचा चेहराही सगळी गोष्ट सांगत होता. मी न बोलता त्याला घरात घेतलं. त्याने न विचारताच ह्या घडीला प्रेम, लग्न वगैरे मला करायचं नाही. तू चांगला मुलगा आहेस, आपण मित्र आहोत पण धिस इज समथिंग डिफरंट, असे घिसे पिटे डायलॉग्स बोलत गेले. तो ऐकत गेला. शेवटी मी थांबले. माझं बोलायचं तेवढं बोलून झालं. तो उठला. दारापर्यंत गेला. जाताना वळला मात्र. म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदल मात्र. जड पावलाने त्याला पायऱ्या उतरताना बघून मलाच रडायला आलं.

दुसऱ्या दिवशी दबकत दबकतंच त्याच्यासमोर गेले, तर तो पूर्वीसारखाच अगदी काही झालं नाही असा माझ्याशी बोलला. दिवसभर मला खूप वाईट वाटलं. तो माझ्याशी बोलला नसता. चिडला असता, ओरडला असता तरी जितकं वाईट वाटलं नसतं, तितकं त्याच्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून मला वाटलं. मुंबईला एकत्रच आलो. सगळा प्रवास मी गप्प आणि तो नेहमीप्रमाणे. शेवटी निरोप घेताना मीच त्याला सॉरी म्हटलं. नेहमीचं त्याचं खळखळून हसला. म्हणाला तू कशाला सॉरी. मीच सॉरी. तुझ्यासाठी. चांगला चान्स हातचा घालवला राव तुम्ही. असं म्हणून पुन्हा जोरात हसला आणि जायला निघालासुद्धा. मी तशीच बघत राहिले त्याच्याकडे. दोन पावलं चालून परत आला.

म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदलून जा. उगाच आठवण येईल माझी. निघून गेला.

खडूने गिरगिटलेली पाटी हाताने कितीही पुसली तरी स्वच्छ होत नाही ना तसं झालं माझं पहिले दोन दिवस. हळूहळू मन रुळावर आलं. आता नेलपॉलिशही बदलायला हवं!

- संवादिनी

Thursday, February 28, 2008

मँगलोर, तो आणि पंचावन्न पाढे

काल परत आले. आम्ही सगळेच आलो. मागच्या पोस्ट मध्ये लिहिलं नाही पण तोही मँगलोरला आला होता. त्याच्या डिपार्टमेंटच्या कामासाठी.

खूप मजा आली आणि नाहीही. तो खरंच खूप चांगला आहे. खूप गप्पा मारल्या त्याच्याशी मी. भटकलो खूप. त्याचं आजोळ आहे मँगलोर! आणि जुनं घरपण आहे त्याच्या आजोबांचं. तिथे तो घेऊन गेला. बीचवर घेऊन गेला. म्हणजे मला एकटीलाच नाही, सगळ्यांनाच. पण त्याच्याशी खूप छान मैत्री झाली. रविवारी म्हणाला फिश खायला जाऊ. बाकी सगळे कट्टर व्हेजी लोकं. मग दोघंच गेलो.

ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. जी व्यक्ती तुम्हाला आवडते तिच्यासोबत एक संध्याकाळ घालवायला मिळणं ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?

पहिली धडधड, त्यात वेंधळेपणा करणं, हेही मी साग्रसंगीत केलं, नेहेमीप्रमाणे. मग हळूहळू तो बोलत गेला आणि मीही. माझं घर, आई, बाबा, विनय, माझी चाळ, माझी शाळा, मैत्रिणी, पुस्तकं, नाटक, गाणं, सगळं सगळं.

तोही बोलत गेला. त्याच्याबद्दल. त्याच्या बायकोबद्दल!

हो. त्याचं लग्न झालंय. गेल्याच वर्षी. आधी चौकशी..

जाऊदे. काय लिहू आणि काय नाही? मला तो आवडतो. त्याचं बोलणं, वगणं, हसणं, गाणं, खिदळणं. सगळं सगळं मनापासून आवडतं. पण त्याने काहीही फरक आता पडणार नाही. पुढचे सगळे रस्तेच खुंटलेत.
फार वाईट अवस्था झाली माझी तिथे. अचानक लक्षच उडालं सगळ्यातलं. तो काय बोलतोय मी काय बोलतेय? काय खातेय? खातेय ते चांगलं आहे की वाईट? काही काही कळत नव्हतं. हॉटेलवर परत आले तर रडायचीसुद्धा खोटी. माझी रूम पार्टनर होतीच. मग काय? खोटं खोटं हसत सांगावं लागलं फिश खूप आवडलं म्हणून.

रात्रभर झोप नाही. सतत डोक्यात तेच चालू होतं. तो मिळणार नाही म्हणून दुःख की मी सपशेल गंडले म्हणून दुःख? ते शेवटपर्यंत कळलं नाही. खरंतर मी त्याला पुरेशी ओळखत नव्हतेच प्रेम बीम करायला, मग मी का गुरफटत गेले?

पण मग विचार केला. जर मला माहीत असतं की त्याचं लग्न झालंय आधीच, तरीही आवडलाच असता ना तो मला? म्हणजे एक चांगला मित्र झालाच असता ना? नाही झालाच तो चांगला मित्र माझा. सगळंच मोठं विचित्र आहे. मी स्वतःलाच समजवू शकत नाहीये की मी त्याच्याशी मैत्री करू शकतेच ना? देअर कॅन बी लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे लग्न. लाईफ पार्टनर वगैरे अशक्य आहे. ते तर मी कधीच डोक्यातून काढलं आहे. पण ते नाही म्हणून अजिबात बोलायचंच नाही असं थोडीच आहे? आणि त्याला बिचाऱ्याला तर यातलं काही माहीत सुद्धा नाही.

प्रेमभंग नाही म्हणता येणार पण जवळपासचं काहीतरी अनुभवायला मिळालं. खूप त्रास झाला. पण मलाच बरं वाटलं. मी स्थितप्रज्ञपणे विचार करू शकले म्हणून.

घरी गेल्यावर आई म्हणाली. तिच्या मैत्रिणीने एक स्थळ सुचवलंय म्हणून. फोटो पसंत आहे त्यांना भेटायचंय. खरंतर डोक्यात तिडीक जायला हवी होती, पण चक्क बरं वाटलं. आपण कुणालातरी आवडलो ही भावना अशा वेळी हात देते. आईने फोटो दाखवला. मुलगा चांगला वाटला. पण तो परदेशी आहे. आई वडील येणारेत त्याचे, जर मला फोटो आवडला तर. मी सांगितलं आईला, नीट बघते आणि सांगते.

सध्यातरी मी सरळ रेषेत विचार करू शकेन कशाबद्धलही असं वाटत नाहीये. कुणी चांगली शंभर ठिपके शंभर ओळींची नक्षीदार रांगोळी काढायला घेतली आणि ती पूर्ण व्हायच्या आतच वाऱ्यावर उधळली गेली, तर काढणाऱ्याला कसं वाटेल? तसंच काहीसं मला वाटलं. रांगोळी पुन्हा काढता येईल, दहादा काढता येईल, पण ती अशीच जमेल ह्याची काय खात्री?

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.


- संवादिनी

Thursday, February 21, 2008

मँगलोर आणि मंजूनाथाची कृपा

आपल्याला वाटतं आपण एकटे असतो. कुणाचीतरी सोबत असावी असं वाटत असतं. पण ती सोबत खूप खूप दूर आहे हे माहीत असतं. सगळं कसं बेचव, निरस वाटत राहतं.

आणि कसल्या चाव्या फिरतात कोण जाणे?

आले मंजूनाथाच्या मना तेथे कोणाचे चालेना. अचानक वसंत बहरतो, कळ्यांची फुलं होतात, फुलांच्या सुगंधाने आसमंत दरवळतो, सूर्यसुद्धा शीतल वाटायला लागतो, दिवसा चांदण्यांची स्वप्न पडतायत की काय असं वाटायला लागतं. पण ते स्वप्न नसतंच मुळी. आपणंच आपल्या हाताला चिमटा काढून बघतो. आणि दुखलेल्या चिमट्याच्या वळातच आपल्याला सर्वाधिक सूख मिळतं. कारण जे अशक्य वाटत असतं ते घडतं.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?

आता एवढंच. पुढच्या आठवड्यात मुंबईत आले की सविस्तर लिहिणं होईलंच.

Thursday, January 24, 2008

मी आणि तो

लिहिण्याचा बॅकलॉग भयंकर वाढत चाललाय. आता नवं वर्ष उलटून किती दिवस गेले पण अजून माझं लिखाण तिथेच रेंगाळतंय. गेल्या आठवड्यातंच खरंतर लिहिणार होते, पण जरा जास्तंच झालं असतं म्हणून आता लिहिते.

ह्या वेळी एकतीस तारखेला आमच्या ऑफिसची पार्टी होती. जुहूलाच होती. अर्थात विनयभंग वगैरे झाले तेव्हा आम्ही सगळे, सगळ्यांचं माहीत नाही पण मी तरी घरी शांत झोपले होते. आम्ही नववर्ष संध्याकाळीच साजरं केलं. तर ह्या पार्टी निमित्ताने सगळ्या डिपार्टमेंटची लोकं एकत्र आली.

नवी गर्दी मिळाली की चेहेरे शोधण्याचं काम फक्त मुलंच करतात असं नाही. माझ्यासारख्या काही मुलीही त्यात सहभागी असतातंच की. अर्थात माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या डिपार्टमेंटला काम करते तिथे पस्तिशीच्या खालचं कुणी फिरकंतच नाही. CA असल्याचा साइड इफेक्ट आहे हा. त्यामुळे दुसऱ्या डिपार्टमेंटातून नजर फिरवणं आलंच.

काही बरे चेहेरे दिसले, पण एक विशेष. चेहेरा म्हणण्यापेक्षा एक विशेष माणूस भेटला. दिसायला तर चांगला होताच, पण बोलायलाही छान वाटला.

मला नेहेमीप्रमाणे गाणं म्हणण्याचा आग्रह झालाच आणि आपल्याला काय स्टेज आणि श्रोते मिळाले की कॅसेट सुरू. मग एका साहेबाने एका डुएटची फर्माइश केली. आता साहेब लोकांना कोण समजावणार की डुएट दोघं गातात म्हणून. मी म्हंटलं सर हे डुएट आहे, तर त्यांनी चक्क "त्या"ला आग्रह केला गाणं म्हणण्याचा. म्हणजे हा गातो पण? डुएट छान झालं, माझा आवाज कापत होता इतकंच, पण त्याला काही पर्याय नव्हता.

नंतर सगळा वेळ नजर त्यालाच शोधत राहिली. खरंतर मुद्दाम नाही, पण तो काय करत असेल, त्याचे मित्र कोणते? (त्यात एखादा ओळखीचा आहे का?), तो कसा बोलतो, कसा हसतो, सबकॉन्शसली मी माझ्या एक्स्पेक्टेशन्स मॅच करत गेले. काही मॅच झाल्या, काही नाही, शेवटी तडजोड ही करावी लागणारच कधी ना कधी, असं म्हणून तो उद्योगही सोडला. आनंद ह्याचाच आहे, की मी मोकाट इथे सगळं लिहू शकतेय. एरवी कुणाला सांगितलं असतं?

म्हंटल्या गाण्यासरशी ओळख झालीच. नाव कळलं, मराठी असल्याचंही कळलं. बरं वाटलं. कोब्रा नाही हेही कळलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, गाणं म्हणतो म्हणजे जेपींनाही (बाबांना) नाही, त्यांना मराठी पुरे आहे. विन्याचा तर प्रश्नच नाही. राहता राहिली आई. ती फार जातीनिष्ठ आहे, तेव्हा तिला मॅनेज करणं कठीण.

ह्याला काय म्हणतात? सुतावरून स्वर्ग गाठणे.

पण मला तो आवडला. एकंच प्रॉब्लेम आहे. मिशी! मला बिलकूल आवडणार नाही नवऱ्याने मिशी बिशी ठेवलेली. पण ते सगळं नंतर.

क्रश तरी नक्कीच आहे. प्रेमाचं काही माहीत नाही. बघुया पुढे काय घडतं ते.

Thursday, December 13, 2007

१२ डिसेंबर आणि मी

काही तारखा मनाच्या कॅलेंडरमध्ये नेहेमीच मार्क केलेल्या असतात. तशीच ही तारीख १२ डिसेंबर. वाढदिवस लक्षात न राहण्याचा अवगूण माझ्यात ठासून भरलेला आहे. विनूचा लक्षात आहे. आई बाबांचा आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस एकाच महिन्यात असल्याने नेहेमी थोडा गोंधळ उडतो. बाकी मैत्रीणींचे वाढदिवस मी नेहेमी विसरते. पण १२ डिसेंबर नाही.

खरंतर माझ्या जगात ह्या दिवसाला आता काहीच महत्त्व नाही. फार फारतर एखादा इ-मेल किंवा ऑर्कूट्वर स्क्रॅप बस. पण कधीतरी महत्त्व होतं. कधी म्हणजे? फार फार पूर्वी. जेव्हा मी शाळेत होते तेव्हा.


आठवीत किंवा नववीत असेन तेव्हा. ते वय विचित्रच असतं ना? म्हणजे आपण मोठ्या तर झालेल्या नसतो, पण मोठं झाल्यासारखं वाटत असतं. पौगंडावस्था. माझी आजीच्या शब्दकोषात ह्याला एक चांगला शब्द होता. अशा मुलांना ती "आडबाप्या" म्हणायची. पण मुलींना? मी विचारलं होतं तिला ती म्हणाली, माहीत नाही, पण आडबाई म्हणायला हरकत नाही. तस असं हे आड whatever वय.


परिकथेतल्या स्वप्नांना शक्यतेचे कोंब फुटायला लागलेले असतात. प्रेम, प्रेम जे काय म्हणतात ते एकदा चाखून पाहायचं असतं. उत्सुकता असते, दडपण पण असतं. मी अनुभवलंय. म्हणजे कुणावर प्रेम वगैरे बसण्याचे ते दिवस नसतातंच. कारण आपल्य स्वतःच्या आवडी निवडीच आपल्याला नक्की माहीत नसतात. पण प्रेमात पडणं मात्र अनुभवायचं असतं. अशा नेमक्या वेळी आपल्याला तो दिसतो.


आता एका शाळेत म्हणजे लहानपणापासूनच त्याला बघितलेलं असतं. पण आता जसा तो उलगडतो तसा पूर्वी कधी उलगडलेला नसतो. त्याचा तो चष्मा, गोड स्माईल वगैरे सगळं दिसायला लागलेलं असतं. तसा तो हुषार असतोच. खेळात अगदीच आघाडीवर नसला तरी बिघाडीवरही नसतो. हळुहळू तो आवडायला लागतो. अं हं. तो आवडण्यापेक्षा त्याच्या प्रेमात पडण्याची कल्पना आवडायला लागते.


मनातली ही कल्पना कोणत्यातरी बेसावध क्षणी शब्दात उतरते. नाही. अजून त्याला सांगायचं धैर्य झालेलं नसतं. पण हे आपलं गुपित अलगद मैत्रिणींना समजतं. मग सुरू होते चिडवा चिडवी. लटका राग.
कसा कोण जाणे मग त्याला ह्या गोष्टीचा वास लागतो. मग तोही प्रेमात पडतो, प्रेमात पडण्याच्या संकल्पनेच्या. दिवस जातात आठवडे जातात. महिने जातात. कधीतरी शाळेची पिकनिक निघते. गाण्याच्या भेंड्या सुरू होतात. मैत्रिणी तिला आणि मित्र त्याला चिडवत राहतात.


शेवटी तो तिला प्रपोज करतो. आता शब्द आठवत नाहीत पण ती हो म्हणतंच नाही. फक्त हसते. हो कसं म्हणायचं हेसुद्धा तिला माहित नसतं. कोणी तरी आपल्या प्रेमात पडलंय ही किती सुखावणारी भावाना आहे हे तेव्हा कळतं.


आणि हे प्रेमप्रेकरण तिथेच संपतं. कारण त्यात पुढे काही होण्यासारखं नसतंच मुळी. शाळा संपते, दोघांचं कॉलेज वेगवेगळं असतं. विश्व विस्तारतात आणि जुनी विश्व अवास्तव, खुजी वाटायला लागतात. ह्या विश्वातून त्या विश्वात जाताना होणाऱ्या गदारोळात ही प्रेमात पडल्याची भावना विरून जाते.


आता तो कधी कधी तिला मेल करतो. ती त्याला उत्तर देते. वाढदिवस, त्याचा आणि त्याच्या लग्नाचा, ती विश करते. अर्थात लग्नाचा वाढदिवस आता लक्षात राहत नाही पण वाढदिवस मात्र राहतो.
कारण त्या मंतरलेल्या दिवसात त्याच्या वाढदिवसाला कधीतरी तिने स्वतःच्या हाताने काढलेलं स्केच दिलेलं असतं कुठल्याश्या हिंदी चित्रपटाच्या कॅसेटवरच्या चित्राचं. अर्थात तो चित्रपट म्हणजे प्रेमकथा असते.


ती तो चित्रपट आणि ते स्केच दोन्हीही विसरलेली असते. त्याच्याकडे अजूनही ते जपून ठेवलेलं असावं असं मात्र तिला का कोण जाणे वाटत राहतं. फक्त तो दिवस तिच्या लक्षात राहतो १२ डिसेंबर.


तसाच हा दिवस माझ्याही लक्षात राहिला. १२ डिसेंबर. आठवून वाटतं. किती वेडी होते मी तेव्हा. नाही. हा सगळा वयाचा परिणाम. पण जे काही घडलं ते मी मनापासून एन्जॉय केलं. ते महत्त्वाचं. पात्र कोण होती हे महत्त्वाचं नाही. अनुभव महत्त्वाचा.

कधी कधी वाटतं, काहीच जरी कळत नसलं तरी त्या दिवसातलं प्रेम किंवा क्रश किंवा whatever खरा असावा, कारण त्याला मोजमापं नसतात. पगाराची, उंचीची, जातीची, वयाची, शरीराची. कदाचित तेच खरं असेल. कुणी सांगावं?