Monday, October 17, 2011

देवयानी (25)

श्रेयाचं लग्न ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट होती. ती तर माझी सख्खी मैत्रीण होतीच, पण तिचा नवरा पीयुष हा देखील माझा चांगला मित्र झालेला होता. लग्नाला बनारसला यायचंच असं मात्र तिनं निक्षून सांगितलं. प्रीतमला ऑफिसच्या कामासाठी परदेशी जायचं होतं. अर्थात तो तसाही आला असता असं नाही. पण त्याला आयतंच कारण मिळालं. मला असं काही कारण नव्हतं आणि मुळात मला तिच्या लग्नाला जायचंच होतं. घरात सगळा पसारा पडलेला होता म्हणून पाय निघत नव्हता.

आणि तिथे मला ओळखणारी ती एकटीच होती. तिला ओळखणारे खूप जण होते, त्यामुळे सतत मला एंटरटेन करणं तसंही तिला शक्य नव्हतंच. त्यामुळे माझं थोडं जाऊ का नको असं होत होतं. शेवटी हिय्या करून मी जायचं ठरवलंच. सोमवार ते शुक्रवार सुटी घेतली. लग्न शुक्रवारी होतं. सगळं आवरून मी रविवार संध्याकाळच्या विमानानं परत येणार होते. बनारसला विमानतळावर उतरले आणि माझ्या नावाची पाटी घेऊन ड्रायव्हर उभाच होता. इथपासून जो राजेशाही थाट सुरू झाला विचारू नका.

श्रेया खरी लखनऊची पण नवऱ्याचं गाव बनारस म्हणून लग्न बनारसमध्ये झालं. इतक्या दूरवरून हे दोघं मुंबईत आले आणि त्यांचं जमलं मुंबईला पण घरं एकाच राज्यात, म्हटलं तर विमानाने अर्ध्या तासावर. असो, त्यामुळे त्यांचं सगळं वऱ्हाड ताज "बेनारस" मध्ये उतरलेलं होतं. श्रीमंती असावी तर अशी. श्रेयाला मी आधीच खूप कटकट केली होती की मला एकटीला सोडू नको, म्हणून श्रेयाची रूम पार्टनर मी होते. खूप मजा केली आम्ही. त्यांचे एकावर एक कार्यक्रम. प्रत्येक कार्यक्रमासाठी खास बनारसी साड्या घेतल्या. खाण्या पिण्याची चंगळ होतीच.

श्रेयाच्या घरचेही सगळे खूप छान होते. प्रत्येकातच एक खानदानीपण होता. श्रेयाचं ते खानदानी सुंदर असणं कुठून आलं असावं त्याचा अंदाज तिथे आला. तिथे खरं संगीत वगैरे वगैरे काहीही होत नाही, पण हल्ली आपल्या मराठी लग्नात जसं हे सगळं होतं तसं तिथेही होतं. मेहेंदी, हलदी, संगीत असे एकावर एक कार्यक्रम झाले.

संध्याकाळी ह्या अशा जायच्या. जमलंच तर सकाळी मी बाहेर फिरायला जायचे. अगदी आपण मुंबईत आवडीने खातो ते बनारसी पानंही खाल्लं. पण ते काही आवडलं नाही. काशी विश्वनाथाचं मंदिर पाहिलं. अगदी लोकं नको नको सांगत असतानाही जाऊन पाहिलं. गाडी आतापर्यंत नेणं म्हणजे मोठं कठीण काम होतं. सगळीकडे चिखल आणि घाण. अगदी कसतरीच वाटलं. गंगेचे घाट मात्र आवडले, समोरच्या बाजूने. आपल्या बाजूचा घाट गलिच्छ वाटतो पण समोरच्या बाजूचा खूप छान वाटतो. मागे कुणीतरी सांगितलं होतं की इथे अर्धवट जळकी प्रेतं टाकतात गंगेत. ती काही मला दिसली नाहीत. एकदा वाटलं निदान पाय तरी पाण्यात बुडवावेत, पण धीर झाला नाही.

गुरवारी रात्री मोठा समारंभ होता. शुक्रवारी संध्याकाळी लग्न. खूप मजा करून आम्ही दोघी हॉटेलच्या रूमवर परतलो. श्रेयाला म्हटलं कसं वाटतंय? ती काही बोललीच नाही. मीच विचार करत राहिले, कसं वाटत असेल लग्नाच्या आधीच्या रात्री. पहिला विचार माझ्या मनात आला तो म्हणजे उद्यापासून प्रायव्हसी नाही. दुसऱ्या कुणाबरोबरतरी सतत राहायचं. आणि ह्या विचारावर माझं मलाच हसायला आलं. बराच वेळ आम्ही दोघी गप्पा मारत बसलो. तिची लव्ह स्टोरी तिनं (पुन्हा) मला सांगितली. मीही नव्यानं ऐकल्यासारखी पुन्हा ऐकली. तिला जे हवं ते तिला मिळालं म्हणून मला मनापासून आनंद झाला. पण मला जे हवं ते मला का मिळू नये असं वाटून दुःखही झालं.

श्रेयाचा बहुतेक डोळा लागला होता मीही अर्धवट ग्लानीत होते, आणि माझा फोन खणखणला.

- देवयानी

Wednesday, October 12, 2011

देवयानी (24)

हं. करेक्ट. आय नीडेड सम फोकस.

आणि मला स्वतःच्या घरात जायचंच होतं. मागे बांद्र्याला जागा पसंत करूनही शिफ्ट झाले नव्हते. हीच योग्य वेळ होती. घरापासून दूर आणि ऑफिसच्या जवळ ह्या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या असत्या. दुसऱ्याच दिवशीपासून मी कामाला लागले. कुठे कुठे कोणते प्रोजेक्ट्स चालू आहेत, काय स्टेजला आहेत, भाव काय आहे? वेळ बरा जायला लागला. विकेंडला माझ्या आणि प्रीतमच्या सगळीकडे चकरा. श्रेया लग्नाच्या गडबडीत होती. तिचं लग्न दोन महिन्यांवर येऊन ठेपलेलं. त्यामुळे तिची मदत काही झाली नाही.

असं करता करता शेवटी घर नक्की झालं. दहाव्या मजल्यावरचा अगदी मोठा नसला तरी टू बेडरूमचा फ्लॅट. समोर लांबवर समुद्र दिसणार होता. मी मस्त तिथे एकटी राहणार होते. आईची कटकट नसणार होती. बाबांचा अबोला नसणार होता. एकटीने राहायचं आणि काय वाटेल ते करायचं. बस, हे माझ्यासाठी पुरेसं होतं. इ. एम. आय खूप जास्त होणार होता, पण माझ्या पगारात आरामात भागणार होतं. तसंही घर भाड्याने घेतलं असतं तर थोडी रक्कम भाड्यापोटी गेलीच असती ना?

सगळं जमून आलं आणि मी तो तयार फ्लॅट घेतला देखील. सगळंच स्वप्नवत झालं. आईला अजिबात आवडलं नाही. बाबांना आवडेल ह्याची काही शक्यताच नव्हती. मी मूव्ह झाले. माझं सामान घरातून बाहेर काढताना सगळ्या जुन्या आठवणी दाटून आल्या. घरातून बाहेर पडताना आईच्या डोळ्यात पाणी आलं. बाबांना मी निघते असं म्हणाले. ते पेपर वाचत होते. माझ्याकडे त्यांनी पाहिलंही नाही नुसती मान हालवली. त्यांना नमस्कार करायला मी वाकणार होते पण नाही वाकले. आईला खरं असं माझ्या लग्नात रडायचं होतं. पण ते आता जमणार नव्हतं.

मी टॅक्सीत बसले आणि मला हमसा हमशी रडायला आलं. आयुष्यातला एक चॅप्टर कायमचा संपला असं वाटलं. माझं बालपण, कॉलेज, अनुराग, आजी आजोबा, मराठे काका, सगळं. पण आपण त्या पिंजऱ्यातून बाहेर पडलो ह्याचा आनंदही झाला. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. असतं ते आपल्याला कधीच नको असतं. आणि ते जेव्हा सुटतं हातातून तेव्हा आपण त्याचाच विचार करीत राहतो. तसंच माझं झालं.

पुढचा आठवडा मी ऑफिसमध्ये रजा टाकली होती. मिषू रोज मदतीला यायची माझ्या. मला तिने घर लावायलाच नाही तर सजवायलाही मदत केली. तिची रंगसंगतीची जाण खूप छान आहे. त्या आठवड्यात माझी तिच्याशी छान मैत्री झाली. प्रीतम माझा मित्र असला तरी तो ऑफिसमधला. त्याचं घरचं रूप तसं ओळखीचं नव्हतं. मिषूच्या बोलण्यात सतत त्याचा उल्लेख व्हायचा. सुहानीचं त्याच्यावर किती प्रचंड प्रेम आहे. आणि बाबाला लेकीशिवाय कसं करमत नाही ह्याचे किस्से.

कशी गंमत असते बघा, आपण एखाद्याला ऑफिसात भेटतो. त्याच्या तिथल्या वागण्यावरच आपलं मत बनतं त्याच्याविषयीचं. पण हा जो कोपरा आहे फॅमिलीचा, तो कधीच उघड होत नाही. प्रीतम एकदम मला वेगळाच वाटायला लागला, म्हणजे ऑफिसात एवढा कमांडिंग, फोकस्ड, कॉर्पोरेट वाटणारा प्रीतम घरी मात्र एकदम साधा सुधा घरेलू माणूस होता. मला त्याचा हेवा वाटला आणि मिषूचाही. आणखी माणसाला आयुष्यात काय लागतं? दिवसभर दमून भागून घरी गेल्यावर आपल्या माणसाच्या कुशीत शिरणं? आपल्या छकुलीला छातीशी कवटाळणं? का आपण असं साधं सोपं सूख सोडून पळत्याच्या मागे लागतो.

असो, तो आठवडा खूप छान गेला. मिषूसारखं आपणंही हाऊस वाइफ व्हावं असं उगाचच वाटायला लागलं. घर नीट नेटकं ठेवावं, नवऱ्याचं कौतुक करावं, एक छोटंसं पिलू असावं असं पुन्हा पुन्हा वाटायला लागलं. त्या विचारामागे मी लागण्याइतका वेळ मात्र मला मिळाला नाही. कारण ऑफिस जॉईन केलं आणि परत श्रेयाच्या लग्नासाठी म्हणून बनारसला जावं लागलं.

- देवयानी

Monday, October 10, 2011

देवयानी (23)

झाल्या प्रकाराने मला खूप मनस्ताप झाला. दुःख झालं असं खरंच नाही म्हणता येणार, कारण हा मुलगा ही एक शक्यताच होती माझ्यासाठी. अनुरागसारखं नव्हतं. त्या वेळी खरं दुःख झालं होतं, कारण मी मनापासून त्याच्यावर प्रेम करीत होते. पण आतामात्र आपण किती बावळट आणि दूधखुळे आहोत असं वाटायला लागलं.

अर्थात सर्व प्रॉब्लेम्सवर एकच जालीम इलाज आहे. तो म्हणजे टाइम. तेवढा वेळ जाणं आवश्यक असतं आणि मग गाडी रुळावर येते. ऑफिसच्या कामात काही विशेष प्रगती नव्हती. घरी तर माझा काही संबंध नसल्यासारखंच मी वागायचे. माझं सगळं सोशल लाईफ म्हणजे श्रेया आणि प्रीतम होते. श्रेयाचं लग्न ठरलेलं होतं. प्रीतमच झालेलं होतं, त्याला एक छकुलीसुद्धा होती. साहजिकच मला त्यांचा जितका वेळ हवा होता तितका ती दोघं देऊ शकत नसत.

एकलकोंडेपण तर ठरलेलं होतं. पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात अशी स्टेज यायला लागली की नथिंग इंटरेस्टिंग वॉज हॅपनिंग. असेच आम्ही एकदा प्रीतमच्या घरी जमलेले होतो. मी श्रेया तिचा नवरा आणि प्रीतमची फॅमिली. प्रीतमची बायको मिष्टी. नावाप्रमाणेच अतिशय गोड. एकतर बंगाली असल्याने एक जन्मजात नजाकत तिच्यात होती. लांब सडक केस, कुणाही मुलीला, मलाही हेवा वाटावे असे. आणि ती मोठं लाल भडक कुंकू लावायची. आमचीही बऱ्यापैकी ओळख झाली होती. माझ्या एखाद्या मैत्रिणीसारखीच मला ती होती. आणि त्या दोघांची मुलगी सुहानी. ही सुहानीतर माझी खूप लाडकी. तिलाही मी खूप आवडायचे. देवी आंटी, देवी आंटी म्हणून हाक मारायची मला. आंटी ऑड वाटायचं मला पण काय आहे, वय कुणासाठीही थांबत नसतं, कधी कधी मला ती वॉर्निंग बेलसारखी वाटायची.

एखादा वाइनचा ग्लास रिता झाला की माणसं बोलायला लागतात. मार्केटिंगमध्ये हे वन पेग टेक्निक मी खूप वापरलंय, वापरतेही. पण एकाचा दोन करू द्यायचा नाही, आपलं काम होईपर्यंत. दोन झाले की फोकस जातो. मीही स्वतः एकाच्या वर कधीच जात नाही. बिझनेस मीटिंगला तर शक्यतो नाहीच. तर असा वाइनचा ग्लास रिकामा झाला आणि मी बोलती झाले आयुष्यात कसं फ्रस्ट्रेशन आलंय वगैरे वगैरे. श्रेयाचा नवरा म्हणाला मिड लाईफ क्रायसेस असेल, म्हटलं हॅलो अजून तिशी येतेय माझी. इतक्यात मिड लाईफ क्रायसिस कसली. मिषू म्हणाली तू लग्न कर आता. आताशा ते मला पटत होतं पण मुलगा कुठून आणू? श्रेया म्हणाली गिव्ह इट सम टाइम. प्रीतम म्हणाला, घर का घेत नाहीस तू? यू विल हॅव सम फोकस बिफोर थिंग्ज गेट सॉर्टेड

हं. करेक्ट. आय नीडेड सम फोकस.

- देवयानी

Wednesday, October 5, 2011

देवयानी (22)

दरम्यानच्या काळात मी याहू चॅटवर जायला लागले. प्रथम उत्सुकता होती म्हणून आणि मग व्यसन लागलं म्हणून. खरं सांगायचं तर ह्या चॅट साईट्ससारखी दुसरी टुकार जागा नाही. त्यातही केवळ शारीरिक गरजा इतरत्र भागत नाहीत म्हणून त्यासाठी तिथे येणारे महाभागच अधिक. पण मला तिथलं काय आवडलं तर सेंटर ऑफ अटेन्शन होणं. लोकं तुमच्या भर भरून मागे लागतात बोलण्यासाठी शंभरातले नव्याण्णव जरी टुकार असले तरी एक चांगली व्यक्ती बोलायला मिळाली तर वेळ बरा जातो. मुळात माझ्यासारख्या पूर्णपणे एकट्या पडलेल्या मुलीसाठी हे खूपंच छान होतं. बरं आपण काय बोलतो, कसं बोलतो, कशाबद्दल बोलतो ह्याचं काही बंधन नव्हतं. तुमच्या बोलण्यावरून लोक तुम्हाला जज करणार नसतात आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलणं सोडून त्या माणसाला अगदी इग्नोरही करू शकता.

हळू हळू मी तिथे गुंतत गेले. जितकी जास्त गेले तितकी जास्त गुरफटले. पुन्हा पुन्हा जाऊ लागले. एका मुलाशी बरेच दिवस बोलत होते. तो खूप चांगला वाटला. मोठ्या कंपनीत नोकरीला, पगार चांगला वगैरे वगैरे. आम्ही एकमेकांना एकमेकांचे फोटोही पाठवले. त्याच्याकडे व्हिडिओ कॅम होता त्यावर मी त्याला पाहिलं. एकमेकांशी आम्ही व्हॉईस चॅटवर बोललो देखील. त्याने माझ्याकडे माझा नंबर मागितला. मीही थोडे आढे वेढे घेऊन त्याला दिला. मला त्रास होईल असं काहीच तो करणार नव्हता ह्याची मला खात्री होती. एक दिवस त्याने मला भेटूया का म्हणून विचारलं. मीही हो म्हटलं.

वेळ ठरवून आम्ही भेटलो. तो जसा वाटला होता तसाच होता. छान. एकदा भेटलो, दोनदा भेटलो, तीनदा भेटलो. फोन आणि चॅटतर रोजचंच झालं होतं. आपण कोणत्या माध्यमातून भेटलो ह्याचं भान माझं थोडं सुटत चाललेलं होतं. श्रेया आणि प्रीतमला मी हे सगळं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडून चिडवा चिडवी चालू असे. अजूनतरी माझं त्याच्यावर प्रेम वगैरे नव्हतं. पण मी त्यापासून खूप दूर होते असंही नाही.

बोलता बोलता एकमेकांची खूप ओळख झाली विश्वास वाढला. पावसाळा चालू होता, वातावरण छान कुंद असायचं. फोनवर बोलता बोलता त्याने एकदा प्रश्न टाकला. लोणावळ्याला जाऊया विकेंडला? दोन दिवस जाणं मला शक्य नव्हतं आणि असतं तरीही मी काही एकट्या त्याच्याबरोबर ओव्हरनाइट जाणार नव्हते. हो नाही करता करता शेवटी शनिवारी माथेरानला जायचं ठरलं. दस्तुरीला गाडी लावून आत चालत जायचं आणि परत बाहेर चालत यायचं आणि संध्याकाळी घरी परत. बेत छान होता. माथेरान माझी खूप आवडती जागा आहे. रोमँटिक. लाल रस्ते, छड्या, घोडेवाले, आणि झाडांचा हिरवा रंग.

दिवस मोठा मजेत गेला. आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या, भरपूर मजा केली. अगदी कॉलेजच्या पिकनिकला खेळतात तशा गाण्याच्या भेंड्याही खेळलो. दिवस मावळतीला झुकला तसे आम्ही माघारी फिरलो. असं दिवसभर खूप मजा केली की संध्याकाळी एक वेगळीच हुरहुर लागते, तसं काहीसं झालं होतं. पाय दुखत होते, दिवस संपला होता, परत रोजच्या रामरगाड्यात परत जायचं होतं. आम्ही दोघंही शांत होतो.

अचानक तो मला म्हणाला, देवी तू मला आवडतेस. काय बोलावं मला सुचेना. मलाही तो आवडत होताच पण असा एक्सप्रेस होकार द्यायची माझी तयारी नव्हती. मी काहीच बोलले नाही. पण त्याने मला तसं निरुत्तर राहू दिलं नाही. अखेरीस मीही मान्य केलं की तोही मला आवडतो. अख्खा दिवस आम्ही एकत्र होतो पण चुकूनही त्याने मला स्पर्श केला नव्हता. त्याने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला आणि माझा हात हातात धरला. एक क्षण मला अनुरागचीच आठवण झाली. सगळं सगळं आठवलं आणि मी त्याचा हात झिडकारला. त्याला नक्की काय झालं ते कळलं नाही. मग आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता गाडीत जाऊन बसलो.

तो गाडी सुरू करणार इतक्यात मी त्याला थांबवलं. अनुराग बरोबर जे काही झालं होतं ते मी त्याला अजून सांगितलं नव्हतं. अथ पासून इति पर्यंत मी त्याला सगळं सांगितलं. सगळं शांतपणे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला की एवढं टेन्शन घेऊन नकोस, हल्ली सगळेच तसं करतात, आपणही करू. मी विचारात हरवले होते, माझी तंद्री लागलेली होती. त्यानं पुढं वाकून माझ्या ओठावर त्याचे ओठ टेकवले तेव्हाच मला ते समजलं. तो क्षण मी वर्णन करू शकत नाही इतका किळसवाणा होता. एका क्षणात मनात कित्येक विचार येऊ शकतात पहा. मला स्वतःचीच किळस वाटली, कीव वाटली, वाईट वाटलं, त्याचा राग आला. मी माझ्या मनातला एक दुखरा कोपरा त्याच्यापुढे उघड केला आणि त्याला त्याचं काहीच नव्हतं. आपणंही करू? व्हॉट द फक?

असो, मी तशीच गाडीतून उतरले जी पहिली टॅक्सी उभी होती तिच्यात बसले आणि नेरळ स्टेशनला आले. ट्रेनने घरी आले. एकदाही तो मागे आला का हे पाहिलं नाही. पुन्हा त्याला फोन केला नाही, चॅट केलं नाही, मेलही नाही. हे सगळंच फार वाईट होतं. पुरुष हे असेच असतात आणि त्यांच्याकडून ह्यापेक्षा चांगलं काही अपेक्षितंच नाही का? असं वाटायला लागलं. रात्रभर रडत राहिले.

- देवयानी