Thursday, July 24, 2008

गुड न्यूज आणि त्रांगडं

एक गुड न्यूज.

सोमवारी आमच्या मिशन इंपॉसिबलचा दी डे आहे. आमच्या परीने जे करता येईल ते सगळं केलेलं आहे. बहुतेक काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत.

पण खरी गंमत तर पुढे आहे. दिल्लीमध्ये राजकीय गरमागरमी चालू असताना, आम्ही इथे असून त्यापासून दूर कसे राहू शकू? आमच्या प्रोजेक्टमध्ये सोमवारापासून सत्तापालट आहे. जुन्या लीडला डच्चू देण्यात आला आहे आणि अस्मादिकांना लीडपदाची सूत्र हाती घ्यायचा आदेश मिळालेला आहे. उरलेले दोन आठवडे मी लीड असेन. इतकंच नव्हे तर ह्या प्रोजेक्टनंतर इथेच एक नवा प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे. त्यात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी काम करावं अशी क्लायंटची फर्माइश आहे.

ही झाली बातमी.

आता ह्यामागचं राजकारण. आम्ही इथे आलो तेव्हा मी होते ह्या कंपनीतली एक नवखी नोकर आणि ती होती अनुभवी. साहजिकच ती पुढारी झाली. पण अनुभवी असणं आणि पुढारी असणं ह्यात फरक आहे की नाही? स्वतःचं काम स्वतः करणं आणि दुसऱ्यांकडून ते करून घेणं ह्यात फरक आहे.

मुळात पुढाऱ्याविषयी जनतेला प्रेम वाटायला हवं. विश्वास वाटायला हवा. आमच्या पुढारणीच्या हे गावीही नव्हतं. ती आम्हा सगळ्यांना आणि क्लायंटलाही गृहीत धरून चाललेली होती. माझ्या आणि तिच्या दुर्दैवाने आमच्या दोघांचं फील्ड सेम. मग साहजिकच तुलना होत गेली. मी फार हुशार आहे असं नाही. हवंतर वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणूया, पण मी वरचढ ठरत गेले. आमच्या टीमलाही हे दिसत होतं, क्लायंटलाही हे दिसत होतं. कुठेतरी आपण कमी पडतोय ह्याची जाणीव तिला व्हायला लागली आणि तिथेच माशी शिंकली.

तिचं उणं लोकांना दिसावं म्हणून मी हे करीत नव्हते. हे आपोआप होत होतं. पण तिच्या मनात ते बसलं. मी हे सगळं मुद्दाम करतेय असं तिने स्वतः ठरवून टाकलं. आणि सुरू झालं एक युद्ध. अर्थातच तिचं पारडं जड होतं. सगळे प्रोजेक्ट रिव्ह्यू तिच्याकडून वर जात होते. ऑन फील्ड काहीही होत असलं तरी ती सांगेल तो इतिहास होणार होता. मला मानसिकरीत्या खच्ची कसं करता येईल ह्याचाच ती विचार करायला लागली आणि त्यातून जन्माला आलं राजकारण. ते इतक्या खालच्या थराला गेलं, की मी क्लायंट साइडच्या एका बड्या अधिकाऱ्याशी लगट करत असते अशी अफवाही पसरवली गेली.

इथे लिहिलं नव्हतं, पण खूप त्रास झाला. मी जवळ जवळ प्रोजेक्ट सोडून निघून जाणार होते. इतक्या हलक्या दर्जाचं राजकारण मी कधी अनुभवलं नव्हतं. पण माझे इतर कलीग्ज मदतीला धावून आले. त्यांनी मला समजावलं. ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि देअर वॉज अ डिफरंट मी आफ्टर दॅट. मी माझी लढाई स्वतः खेळले आणि जिंकले.

जेव्हा मला ही बातमी समजली की तिला डच्चू दिलाय, मला खूप आनंद झाला. थोडी "ग"ची बाधाही, खोटं कशाला बोलू? तिथेच प्रोफेशनॅलिझम सुटला. सगळं व्यक्तीगत झालं.

रात्री घरी फोन केला. जे चाललं होतं ते अर्थात घरी माहीत होतंच. सगळे खूश झाले. आई फक्त म्हणाली, जास्त हवेत उडू नकोस. आता संपलं ना सगळं? मग जाऊन बोल तिच्याशी. मला अजिबात तिच्याशी बोलायची इच्छा नव्हती.

फक्त आई म्हणाली म्हणून मी तिच्याकडे गेले. रूमचा दरवाजा नॉक केला. काहीच रिस्पॉन्स नाही. पुन्हा नॉक केला. थोड्या वेळाने तिने दरवाजा उघडला. मला बघून ती शॉक्डच झाली. गेला आठवडा आम्ही फक्त मेलमधूनच बोलतोय. तिने मला आत बोलावलं. मी तिच्या बेडवर जाऊन बसले. काय बोलावं काही सुचत नव्हतं. तिला ते सगळं सहन झालं नाही आणि ती एकदम रडायलाच लागली. मग मलाही भरून आलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती अजून रडायला लागली. मी तिला सॉरी म्हटलं आणि माझ्या मनात तिच्याविरुद्ध काहीही नाही असंही सांगितलं. ती अजूनच रडायला लागली.

मग मलाही रडायला आलं. मी तिला सगळं पहिल्यापासून सांगितलं. मी तिच्याविरुद्ध कुठेही चुगल्या केल्या नाहीत हेही सांगितलं. तिला खूप वाईट वाटत होतं. मग मात्र तिने माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. पण त्या अफवेबद्दल मात्र ती काहीच बोलली नाही. मी तिला स्पष्ट तसं विचारलं तर तिने स्वतःच्या मुलीची शपथ घेऊन सांगितलं की तिने असं काहीही केलं नाही म्हणून.

मी तिला माझा हात दिला. तिनेही तो हातात घेतला आणि मनापासून सॉरी म्हणाली. ते मला तिच्या डोळ्यात दिसलं. असा रडत रडत आमच्या भांडणाचा सुखांत झाला. ती ह्या आठवड्यानंतर प्रोजेक्ट सोडून जाईल आणि मी तिची जागा घेईन असं वरून कळलं.

आनंद झाला पण तिच्यासाठी खूप वाईट वाटलं. आई म्हणाली म्हणून मी तिच्याशी बोलले. नाहीतर हा द्वेष मनात कायम राहिला असता, तिच्या आणि माझ्याही. हेच जर आम्ही आधी केलं असतं तर? तिच्या मनात असलेले माझ्याविषयीचे गैरसमज आणि माझ्या मनात असलेले तिच्याविषयीचे गैरसमज आम्ही रोखठोक एकमेकींना विचारले असते तर? नक्कीच हे सगळं ह्या थराला पोचलं नसतं.

असो, एक धडा मिळाला. वरवर माझं काहीही चुकलेलं नाहीये. पण आपली चूक नसेल तरीही आपण पुढाकार घेऊन बोलायला काय हरकत आहे? बोलूनही काही फरक पडला नाही तर गोष्ट वेगळी.
सगळं त्रांगडं झालंय आता. मलाच गिल्टी फीलिंग येतंय. आनंद तर होतोय, पण दुसऱ्या कुणालातरी खाली खेचून तो मिळालाय असं वाटतंय. आई म्हणाली तेच खरं, पाय जमिनीवरच ठेवायला हवेत, यशातही आणि अपयशातही.

हल्ली जरा माझे पोस्टस ऍब्सर्ड होतायत का? कारण मी जे लिहिते ते न वाचता पोस्ट करतेय, वेळ नाहीये म्हणून. ऱ्हस्व दीर्घाच्या चुका आणि टायपोजसाठी क्षमस्व. हल्ली लिहिण्यासारखंही फार घडत नाहिये असं वाटायला लागलंय. त्यामुळे काहीतरी साहित्यिक वगैरे लिहावं असं वाटायला लागलेलं आहे. कसं लिहायचं माहीत नाही, जमेल का माहीत नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? म्हणून पुढच्या आठवड्यात नो दैनंदिनी. पुढच्या आढवड्यात काहीतरी साहित्यिक वगैरे. बाबा म्हणतो, की कलाकृती कळली नाही की तिचं फार कौतूक होतं. बघुया, न समजणारं काही लिहिता येतंय का ते.

- संवादिनी

Thursday, July 17, 2008

गारठलेल्या सकाळी आणि धमाल

सकाळी सहाचा गजर वाजतो. मी तो ऐकते आणि तसाच बंद करून टाकते. शेवटची फिरायला कधी गेले होते ह्याची मनाशी नोंद होते. परवाच गेले होते, मग आज नको, झोपूया, असं म्हणून पांघरूण डोक्यावर घेते. रात्रभर घुरघुरणाऱ्या एसीने रूमचा डीप फ्रीजर करून टाकलेला असतो, पण तरीही मला उठून तो एसी बंद करावासा वाटत नाही. स्नूझ झालेला गजर पुन्हा एकदा वाजतो, सव्वा सहा. काल किती वाजता घरी आले मी? रात्री बारा. मग आज थोडं उशिरा पोचलं तरी चालेल. पुन्हा थंडी, पुन्हा पांघरूण, पुन्हा गजर, पुन्हा स्नूझ आणि पुन्हा थंडी. माझ्या सगळ्या सकाळी सध्या अशा गारठून गेलेल्या आहेत.

डोक्यावरचं काम प्रचंड वाढतंय. दिवस सुरू झाला की कधी मावळतो आणि संध्याकाळी त्याच्या घरी पळालेला सूर्य, विश्रांती घेऊन पुन्हा कधी उगवतो, हेच कळत नाही. सकाळचा ब्रेकफास्ट करायला मिळाला तर ठीक, नाहीतर ऑफिसमध्ये पोचायचं, पहिला चहा होतो न होतो, मेल चेक केले न केले, इतक्यात कुणीतरी येऊन टपकतो.

काल तू असं सोल्युशन दिलं होतंस, तसं प्रोग्रॅम करणं अशक्य आहे. दुसरं डिझाइन दे. अरे, शक्य नव्हतं तर काल का तसं नाही सांगितलं? इतकं डोकं आपटून मी ती स्पेक बनवली ती आता कचऱ्याच्या टोपलीत? हा विचार मनातल्या मनात करून, अगदी हसऱ्या चेहऱ्याने, असं का? बरं. बघूया काय जमतंय असं म्हणून मी त्याला वाटेला लावते.

त्याची पाठ दिसते न दिसते तर दुसरं कुणी येतं. म्हणे मॅडमनी बोलावलाय. मॅडम म्हणजे आमच्या टीमची लीड. अडलंय माझं खेटर? मॅडमला हवं असेल तर येईल झक मारत, असं मनातल्या मनात म्हणते आणि निरोप्याला, आलेच असा उलट निरोप पाठवते. शेवटी झक मारत मीच जाते मॅडमना भेटायला. तिच्या आज्ञेचं पालन मला करायला लागलं ह्याचा आसुरी आनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसतो. तो आनंद, तिला मला पाहून झाला आहे, असं स्वतःला खोटंच समजावत मीही खोटं हसते.

बहुदा मॅडमचं घोडं (की गाढव? ) कुठल्यातरी खड्ड्यात पडून अडकलेलं असतं. मग मॅडम अडकलेलं घोडं खड्ड्याबाहेर काढायच्या कामाला मला जुंपून, अजून एखादा घोडा कसा खड्ड्यात टाकता येईल ह्याचा विचार करायला निघून जातात. आम्ही इमानदारीत एकदा घोड्याची शेपूट पकड तर एकदा लगाम, असं करत यथाशक्ती यथामती त्याला बाहेर काढायचं काम करू लागतो.

ते आवरेपर्यंत जेवणाची वेळ होते. पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात. मग दुपारच्या जेवणाचा घाट. जेवणात पनीर नसेल तर ह्या लोकांना अपचन होतं की काय कोण जाणे? प्रत्येक गोष्टीत पनीर. सगळ्यात घाणेरडं मी खाल्लेलं इथलं पनीरचं काँबिनेशन म्हणजे पनीर बैंगन. पण अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने, वदनी कवळ घेता, जी काही चव लागेल ती गोड मानून, समोर असेल ते गिळते आणि अन्नदाता सुखी भव म्हणत पुन्हा घाण्याला जुंपून घेते.

दुपारची मज्जा तर काय वर्णावी? रात्रीची कमी झालेली झोप डोळ्यात उतरायला लागते आणि वाचतेय काय, टंकतेय काय आणि बोलतेय काय? ह्याचा काही ताळमेळच राहत नाही. डुलक्यांचे हल्ले परतवून डोळे उघडे ठेवण्यात यश मिळालं तरी बरं वाटतं. असा सरता न सरणारी दुपारची वेळ जाऊन चहाची वेळ होते आणि मनाला पुन्हा एक उभारी मिळते.

चहा आणि ग्लूकोजची बिस्किटं. अहाहा. वाफाळलेल्या चहाच्या घोटांनी आणि माझ्या लाडक्या ग्लूकोजच्या बिस्किटांनी विस्कटलेल्या दुपारची घडी इस्त्री केल्यासारखी बसते आणि संध्याकाळची चाहूल लागायला लागताच, डोक्यावर साचलेल्या कामाच्या डोंगराची आठवण होऊन मी पुन्हा माझ्या वर्क स्टेशनकडे वळते.

सह्याद्रीच्या डोंगररांगाच्या अंगाखांद्यावर खेळलेली मी, ह्या कामाच्या डोंगराला मात्र नाकं मुरडते. पण तरीही कामाला लागते. आज करायचं म्हणून ठरवलेल्या कामाला हात लावायला सकाळपासून वेळच झालेला नसतो. त्यात लीडरबाईंचं घोडं आणि पुन्हा करायची स्पेक ह्याचं टेन्शन डोक्यावर असतंच. केसांचा गुंता सोडवायचं काम, रोजच्या रोज केस आणि हेअरकलर मात्र बदलत जातात. एक गुंता सुटतोय तर दुसरा दत्त म्हणून हजर.

संध्याकाळ होते. लोकं घरी परतायला लागतात. ऑफिस उदासवाणं वाटायला लागतं. बाहेर पडायला लागलेला अंधार, सगळी संध्याकाळ काळ्या रंगात रंगवून काढायला लागतो. आता चहाची सोबतही नसते. ग्लूकोजची बिस्किटं तेवढी माझ्या पर्स मध्ये गुपचूप पडलेली असतात. शेवटी आज सकाळी सुरुवात करायच्या कामाला हात लावायला वेळ मिळतो. डोकं चालेल की नाही ह्याची खात्री नसल्याने मी घुलाम अली कानाला लावते.

दिनभर तो मै दुनियाके धंदोमें खोया रहा,
जब दीवारोसे धूप ढली, तुम याद आये, तुम याद आये.

खुर्चीत मी मागे जराशी रेलते, समोरचा स्क्रीन धूसर होतो. उगाचच आईची आठवण येते. संध्याकाळच्या वेळी, घरी गेल्यावरचा चहा, बाबाच्या गमती जमती, एकेकांना टपल्या मारणं. विन्या असेल तर त्याच्याशी मुद्दाम उकरून काढलेलं भांडण, सगळं सगळं डोळ्यासमोर येत जातं. टीम मेंबर्सच्या गराड्यात एकदम एकटं वाटायला लागतं. पुण्याची आठवणही येतेच, आनंद आठवतो, आनंदी आठवते, कुठे अडकून पडलो असं होतं.

तितक्यात मागून कुणीतरी येऊन खांद्यावर चापटी मारतं. मॅडम सो गयी क्या? हमारी डिजाईन तो आपने बनायीही नही? एक दीर्घ श्वास घेऊन मी पुन्हा कामाला लागते. घुलाम आली आपल्याच तंद्रीत गात असतो, त्याचा आवाज फक्त एक आभास बनून कानात घुमत राहतो.

पुन्हा एकदा जेवणाची वेळ होते. बाहेरून आणलेलं काही बाही आम्ही सगळेच बकाबका खातो. कामाला लागतो, घरी जाण्याआधी मला निदान ते डिझाइन पूर्ण करायचं असतं. मध्यरात्रीपर्यंत ते काम संपतं. ईमेल टाकून मी ऑफिसमधून निघते. बाहेर ड्रायव्हर पेंगत बसलेला असतो. त्याला जागं करून घरच्या रस्त्याला लागते. मोजून तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. मी तशीच माझ्या रूममध्ये जाते, कपडे बदलते आणि बिछान्यावर पडते.

आजचं न झालेलं काम, अजूनही खड्ड्यात अडकून बसलेलं घोडं, ऑफिसमधलं राजकारण, सगळं माझ्या मनात घर करून राहतं. डोळ्यावर झापड तर येत असते, पण झोप काही येत नाही. घुलाम अलीसुद्धा काही करू शकत नाही. मग मी खिडकी उघडते आणि बाहेर बघत बसते. कधीमधी दिसणारा चंद्र हिरव्या पानांवर सांडलेला काय झकास दिसतो. जवळ जवळ रात्रीचा एक वाजत आलेला असतो, तरीही मी फोन घेते आणि बाबाला फोन लावते.

तो झोपला असणार मला माहीत असतं, पण तरीही, तो फोन उचलतो, मी बराच वेळ त्याच्याशी बोलत राहते. आज ऑफिसमध्ये काय काय झालं, ते सगळं सगळं सांगते, तोही बिचारा ऐकून घेतो. मग तो घरी काय काय झालं ते सांगतो. शेवटी तो विचारतो कशी आहेस? मला माहीत असतं त्याला काय उत्तर हवंय. मी सांगते मजेत आहे.

कोणत्याही कठीण क्षणाचीही एक मजा असते. ती मजा अनुभवायला शीक, म्हणजे आपले सगळे दिवस मजेत जातात. कधीतरी, कुठेतरी त्याला मी विचारलेलं असतं, की तुला कधीही कसा आहेस विचारलं की तू मजेत असं कसं सांगतोस? तेव्हा त्याने सांगितलेलं कारण आठवतं.

मी फोन ठेवते, पण सगळा शीण कुठच्या कुठे पळालेला असतो. पुन्हा बिछान्यावर पडते. स्वतःलाच विचारते. हाऊ वॉज युअर डे? आतून उत्तर येतं "धमाल". त्या विचारातच कधी झोप लागते समजतंच नाही.

आणि पुन्हा एक गारठलेली सकाळ उजाडते.


- संवादिनी

Thursday, July 10, 2008

पडदे, पुस्तकं आणि चुकलेला अंदाज

दिल्लीत मनाजोगतं फिरणं ह्या विकेंडला झालं. आमच्या बॉसने कंपल्सरी शनिवारी ऑफिसला न जाण्याचा हुकूम दिला. भाग्य लागतं की नाही असा बॉस मिळायला? म्हणाला तुम्ही करताय ते खूप आहे. पण चांगलं काम करायला, मनही फ्रेश हवं. जर तुम्ही कंटाळून गेला असाल तर दहा मिनिटांचं काम करायला तासभर लावाल. आम्हाला काय? पडत्या फळाची आज्ञा.

खूप शॉपिंग केलं, खूप खाल्लं आणि खूप भटकलो. चांदनी चौक, लाजपतराय मार्केट धुंडाळून काढलं. खूप खरेदी केली. माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. बाबासाठी एक खास झब्बा घेतला. त्याला ग्लॉसी काही आवडत नाही. मग खादीचाच पण जरा उच्चीचा वाटावा असा झब्बा. मुंबईला खादी ग्रामोद्योगमध्ये वगैरे मिळतात तसे. स्वस्त मिळाला असं वाटलं. अर्थात, हे मी आईला सांगितलं की ती म्हणणारच की जास्त दिले म्हणून. मला ना कधी कधी तिच्याबरोबर शॉपिंगला जायची लाज वाटते. दुकानदार पाचशे म्हणाला की ही शंभर पासून सुरू करते. पण खरं सांगायचं तर तिला ती नॅक आहे. मला पाचशेचे तीनशे करतानापण धाकधूक वाटते.

तर बाबासाठी झब्बा, विन्यासाठी त्याने खास पत्ता दिलेल्या दुकानातून आणि मुंबईहून फोन करून ऑर्डर करून घेतलेली इंग्लिश विलो बॅट, आईसाठी साडी आणि उरलेली सगळी खरेदी माझ्यासाठी. उन्हाळ्याचा मुहूर्त साधून बरेच स्वेटर्स घेतले. स्वस्तात मिळाले. चुडीदार, कुर्तीज मस्त मिळाल्या. मी काही स्वस्तातलं आणलं की बाबा म्हणतो की आधी कापड धू आणि मग तुला झालंच तर चांगलं मिळालंय म्हण.

दिल्ली हाटला तर मी अक्षरशः वेडावून गेले. रंगाची तर नुसती उधळण. राजस्थानी रंग, गुजराती रंग, काश्मिरी रंग, मराठी रंग. सगळं थोडं महाग वाटलं, पण अशा सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळणं कठीण आहे, आणि बघून शेवटी घ्याव्याश्या वाटतातच. त्यामुळे बऱ्याचशा नको असलेल्या आणि काही हव्या असलेल्या गोष्टी घेतल्या. त्यातले राजस्थानी पडदे तर खासंच आहेत. ते लावायला खिडक्याच नाहीयेत अजून, पण तरीही घेतले. गिरगावात तर काही लावता येणार नाहीत. पुढे झालंच स्वतःचं घर तर वापरता येतील. नाहीतर कुणाला गिफ्ट म्हणून देता येतील.

तिथले फूड स्टॉल्स तर भन्नाट आहेत. म्हणजे चव ठीक ठाक. पण व्हरायटी काय आहे? मी चक्क बिहारी कचोऱ्या वगैरे खाल्ल्या. बाकी चरणं सुरूच होतं. चाट, गोल गप्पे, समोसे. सगळं झकास.

एका मस्त वेगळ्या ठिकाणी पण गेले. आमच्या टीम मधल्या क्लायंट साइडच्या एकाच्या वडिलांचं जुन्या अँटिक पुस्तकांचं दुकान आहे. बाकी कुणाला पुस्तकांत वगैरे रस नव्हता. मग मीच त्याला म्हटलं की मला घेऊन चल. साहेबांची फटफटी आहे. मग हेल्मेट घालून मी त्याच्या मागे (केस\चेहरा जाम खराब होतात हेल्मेट घातलं नाही तर. घातलं तर घामाने होतात, पण चालतं). कसलं दुकान होतं ते. कसले जुने जुने ग्रंथ. सगळ्या भाषांतले. मराठीही होते. काही जुनी हस्तलिखितं होती. प्रिंटींग होत नसे तेव्हाची. मोडी भाषेतली होती. काहीही कळलं नाही.

पण चटकन मनात आलं, कुणी कोणे एके काळी लिहिलेली ती पत्र, त्यानंतरची कित्येक वर्ष, निसर्गाला तोंड देत टिकून राहतात काय आणि आजच्या जेट युगातली मी, ती बघते काय? ह्यालाच विधीलिखित म्हणत असावेत. किती पावसाळे पाहिले असतील त्या पत्रांनी? माझ्या आजोबांचे आजोबासुद्धा जन्माला आले नसतील तेव्हा.

इतरही अनेक पुस्तकं होती तिथे. वेगळंच विश्व वाटलं ते. वर्तमानातून एकदम भूतकाळात जाऊन येता येईल असं टाइम मशीन. मग तो कलीग त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचं बनिया कुटुंब. वडिलांची जरब, भिजल्या मांजरासारखी दिसणारी आई, त्याची लग्नाच्या पहिल्या काही महिन्यातंच प्रेग्नंट झालेली बायको. डोक्यावर पदर. माझ्यापेक्षा लहान असेल ही, पण तिचं विश्व किती वेगळं? पोटातलं मूल, मुलाचा बाप, ह्यांच्या पलीकडे ती विचार करत असेल का? असेलही करत तरी ते व्यक्त करायची तिला परवानगी असेल का? ऑफिसमध्ये एकदम नॉर्मल वाटणारा तो कलीग, घरात एकदम वेगळाच वाटला. कसलातरी मुखवटा घातलेला किंवा काढलेला. नक्की कळलं नाही.

ह्यालाच लग्न म्हणायचं का? सहजीवन म्हणायचं का? कुणाच्यातरी दावणीला स्वतःला बांधून घ्यायचं का? एक ना अनेक, कित्येक प्रश्न मनात येत गेले. त्याच्याकडून बाहेर पडले, त्याने पुन्हा आमच्या अपार्टमेंट पर्यंत सोडलं. त्याला मी विचारलं बायको काय करते? तर म्हणाला अजून शिकतेय. म्हटलं काय? तर म्हणाला यूपीएससी देतेय ती.

घरात पदर डोक्यावर घेऊन राहत असली तरी तिचं विश्व त्या पदराएवढं मर्यादित नाही. मलाच माझं हसू आलं, आपण किती पटकन मतं बनवतो, काही माहिती नसतानाही. पण बरं वाटलं. दिल्ली हाटातल्या राजस्थानी पडद्यांवरचे रंग एकदम उजळून निघाले असं वाटलं. कधी कधी आपले अंदाज चुकतात. पण अंदाज चुकल्याचा खूप आनंद झाला.

- संवादिनी

Thursday, July 3, 2008

स्वातंत्र्य आणि एक कन्फेशन

जेव्हा मी खूप लहान होते तेव्हाची गोष्ट. पहिली दुसरीत असेन तेव्हा. बोलण्यामध्ये एकदम पुढे होते तेव्हा मी. साहजिकच, गाणी म्हणणं, भाषणं करणं, ह्यासाठी नेहमी निवड व्हायची. असाच एकदा गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यासाठी प्रत्येकाने घरून तयारी करून या असं शाळेत सांगितलं. आपल्या मुलीने अशा कार्यक्रमात चमकावं ही आईची जबरदस्त इच्छा. झालं, ती एक छान गोष्टीचं पुस्तक घेऊन आली. लहानपणी मला हातात पुस्तक मिळालं की ते क्रेयॉन्सने रंगवून काढायचं हा माझा छंद होता. त्यामुळे हे पुस्तक मला मिळालं असतं, तर त्याचा कधीच मी रंग दे बसंती करून टाकला असता. म्हणून आईने ते माझ्यापासून लपवून ठेवलं.

मीही हुशार मला ते कुठे ठेवलंय ते दिसलं. स्टूलवर उभं राहून कपाटाला चावी लावून वगैरे ते मी मिळवलं. घरी आजी होती फक्त. तिला बिचारीला काय कल्पना मी काय करतेय ह्याची? ते पुस्तक मी रंगवलं मात्र नाही. नुसतंच पाहिलं. मिळत नव्हतं तोपर्यंत हवंहवंसं वाटणारं पुस्तक, एकदा पहिल्यावर तितकंसं आकर्षक राहिलं नाही. मी ते तसंच कुठेतरी टाकून दिलं आणि खेळायला गेले.

संध्याकाळी भाषणाची तयारी करून घेण्यासाठी आईने कपाट उघडलं तर पुस्तक नाही. माझ्या ते लक्षात आलं, पण मी पुस्तक कुठे टाकलंय हे मलाही आठवेना. आईला नक्कीच कळलं की पुस्तक मी घेतलंय, पण आता ते हरवलं हे जर तिला कळलं तर मात्र माझी धडगत नव्हती. तिने मला विचारलं की तू पुस्तक घेतलंस का? मी हो म्हटलं. तिने का घेतलंस विचारलं, आता काय सांगा? मी ठोकलं, बाईंनी बघायला मागितलं शाळेत म्हणून नेलं. मग ती म्हणाली कुठंय ते? पुन्हा नवी थाप. म्हटलं शाळेत ते फाटलं. मग फाटलं तर फाटकं पुस्तक कुठाय? अजून एक थाप, मी तिथेच टाकून दिलं. हे सगळं आईचा ओरडा वाचवण्यासाठी.

ते पुस्तक मीही विसरले आणि आईही. भाषण चांगलं झालं, बक्षीस मिळालं आणि अचानक एके दिवशी साफ सफाई करताना बाबाला ते पुस्तक सापडलं. अजून देवापुढे उभी राहून रडत रडत पुन्हा मी कधी कधी खोटं बोलणार नाही, असं म्हणणारी मी मला आठवतेय. ही आठवण कायमची कोरली गेली मनावर आईचा मार, मग हे कन्फेशन.

आई भयंकर चिडली होती. बाबा मला नंतर म्हणाला होता. काळजी करू नको, मीपण खोटं बोलल्याबद्दल आजोबांचा मार खाल्लाय. सगळेच चुकतात कधी ना कधी. पण सगळेच चूक मान्य करीत नाहीत. जे करतात, ते पुढे जातात, जे नाही करत, ते चुकाच करत राहतात. तेव्हापासून कन्फेशन ही माझी गरज झालेय.

हे सगळं लिहायचं कारण म्हणजे असंच एक कन्फेशन. शनिवारी रात्री क्लाएंटने पबमध्ये पार्टी ऍरेंज केली होती. मी फक्त वाइन पिते. तेसुद्धा घरच्यांच्या सोबत. एकटी, मित्र-मैत्रिणींसोबत, ऑफिसमध्ये कधीच मी प्यायले नव्हते. पण त्या दिवशी काय वाटलं कोण जाणे? घरी जायचं नव्हतं, आईचा धाक नव्हता, बाबाची नजर नव्हती. म्हटलं आपण घरी एखादा ग्लास आईबाबांबरोबर घेतो, इथेही एखादा घ्यायला काय हरकत आहे. गप्पा गप्पांमध्ये आग्रह झाला, दुसरा ग्लास झाला.

त्यानंतर सगळे डान्स करायला लागले, मीही गेले. पण डान्स केल्यावर काय झालं मला कळलंच नाही. माझा पूर्ण कंट्रोलच गेला. म्हणजे अक्षरशः झेलपाटायला लागले मी. नाटकाचे डायलॉग्ज काय म्हटले, पूर्णपणे गॉन केस. अनुनी घरी आणलं सांभाळून. दुसऱ्या दिवशी सगळे जणं चेष्टा करीत होते माझी. तशी म्हटलं तर गंमत होती, पण आतून मी पूर्ण हादरून गेले होते.

आपण कोण आहोत? आपण काय करायला इथे आलो आहोत? आणि आपण काय करतो आहोत? ह्या प्रश्नांनी दिवसभर माझा पिच्छा पुरवला. घरी फोन केला तेव्हा बाबाने विचारलं पार्टी कशी झाली. मी सांगितलं चांगली झाली, बाकी काही बोलले नाही. आईनेही विचारलं तिलाही काही सांगितलं नाही. इकडचं, तिकडचं बोलत राहिले. फोन ठेवला आणि मला एकदम रडायलाच आलं. मी तसं करायला नको होतं. मला स्वातंत्र्य हवं होतं, ते मला मिळालं, पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग मी केला. खूप वाईट वाटलं, एकटीच कुढत बसले होते बराच वेळ.

शेवटी हिय्या करून घरी फोन केला. आईने उचलला. ती काही बोलायच्या आतच मी जे घडलं ते तसंच्या तसं तिला सांगितलं. ती एक शब्द बोलली नाही आणि बाबाला फोन दिला. बाबाने शांतपणे ऐकून घेतलं, मग असं करू नको तसं करू नको, असं काहीबाही सांगत राहिला. अगदी आईसारखं. त्याला खूप काळजी वाटली असणार. आणि ते इतके दूर काही भलतं सलतं झालं तर. एकदम हळवा झाला असणार तो. शेवटी आईने फोन घेतला. म्हणाली झालं ते झालं. चूक झालं की योग्य झालं ते तुला कळलेलंच आहे. तेवढं लक्षात ठेवून राहा. तुला आता अमुक करू नको तमुक करू नको हे सांगायचं तुझं आणि आमचं दोघांचंही वय नाहीये, त्यामुळे बहकून जाऊ नको. मोकळ्या हवेतही माणसं गुदमरून गेल्याची अनेक उदाहरणं आहेत.

एवढंच बोलली आणि फोन ठेवला. मला खूप वाईट वाटलं, पण एकीकडे बरंही वाटलं. मला नेहमी स्पून फीडिंग करणारी माझी आई मला म्हणाली, की मी माझे निर्णय घ्यायला सक्षम आहे. नेहमी बाबा जसा बोलतो तशी आज आई बोलली. एकदम मला पटेल असं. चूक न दाखवता चूक दाखवणारं आणि मला मोकळीक आणि जबाबदारी दोन्ही देणारं. खूप काही बोलावंसं वाटत होतं. पण कुणाशी? माझ्या टीम मेंबरना मी केलं त्यात काही वावगं वाटलंच नाही. मग एकटीच रडत बसले.

रडत रडतंच माझ्या जवळच्या गणपती बाप्पाला सांगितलं, मी पुन्हा कधी, आईला त्रास होईल, बाबाला त्रास होईल, विन्याला मान खाली घालावी लागेल, असं बेजबाबदार वागणार नाही, म्हणून. अगदी थेट लहान असतानासारखं.

स्वातंत्र्य हे दुधारी तलवारीसारखं असतं हेच खरं.

- संवादिनी