Thursday, January 31, 2008

मी आणि भविष्याचं भूत

गेल्या आठवड्यात उगाचंच उदास उदास वाटत होतं. कशामुळे? काही कळलं नाही. कदाचित नव्या वर्षात तो एकदाही दिसला नाही म्हणून असेल. पण त्याच्यामुळे मी उदास व्हायचं काहीच कारण नाही. मग काय झालं?


कदाचित काहीच झालं नाही म्हणून असेल. जेपींनीही मला विचारलं, काही बिनसलंय का म्हणून, जग्गूंनीही विचारलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विन्यानी सुद्धा विचारलं. बाकी दोघांचं ठीक आहे पण बाळराजे त्यांच्या आत्ममग्नतेतून बाहेर येऊन चक्क माझी चौकशी करतात म्हणजे खासच.


हा बाळराजे शब्द माझा नाही बरं का. नुकतीच मिलिंद बोकिलांची "शाळा" वाचली. अगदी गेल्या रविवारी वाचायला घतली आणि सोमवारी रात्री दोन वाजता संपली. त्यातल्या त्या मुलला त्याची बहीण बाळराजे म्हणते, मला तो शब्द आवडला. उचलला. मुळात ते पुस्तकंच आवडलं. कधी कधी वाटलं शिरोडकर म्हणजे मीच, अगदी शेवटी हुरहूर लावणारी गोष्ट आहे. खरंतर कुणीतरी हीच गोष्ट शिरोडकरची म्हणून लिहायला हवी. मी नक्की वाचेन.


सध्या एकंदरित पुस्तकांचा दुष्काळ आहे. आईला सध्या मासिकं वाचायचं वेड लागलंय म्हणून पुस्तकं बंद. आमच्या लायब्ररीत सगळी इंग्लिश पुस्तकं आहेत. परवाच हिटलरच आत्मचरित्र आणलं. ओ की ठो कळत नाहीये. म्हणजे एक लाईन तीन तीन वेळा वाचल्यावर कळतंय त्याला काय म्हणायचंय ते. खरंतर फिलॉसॉफीचं पुस्तक वाटतंय ते. एवढा मोठा (आणि छोटाही) माणूस, ओरॅटर पण लेखन एकदम सपक वाटलं. की ही भाषांतरकाराची किमया? थोडं थोडं त्याचं म्हणणं पटलंसुद्धा. आपण नाही का युपी बिहार मधून आलेल्यांच्या नावाने शंख करत?


महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा बायो डेटा अपडेट करून टाकला. बघुया कॉल येतात का ते? जेपींना सांगितलं, तर ते म्हणाले कशी तुम्ही आजची मुलं, दोन वर्षात नोकऱ्या बदलता? त्यांनी फक्त एकाच ठिकाणी नोकरी केली आणि शेवटी कंपनीने नारळ दिला. असुदे, प्रत्येकाच्या निष्ठा असतात. त्यांची तिथे. आईला पण तिच्या कंपनीत वीस वर्ष होऊन गेली असतील. गमतीत आम्ही म्हणतो सुद्धा, बरेच चेअरमन आले आणि गेले पण त्यांची सेक्रेटरी एकच आहे वीस वर्ष. विन्या फक्त म्हणाला, ताई बदल बदल, नोकरी बदल, लोक बघ कुठे कुठे अमेरिका, युरोपला जातायत. तुलाही नक्की चान्स मिळेल.


खरंच मिळेल? म्हणजे एकटीने राहायचं, स्वतः सगळं मॅनेज करायचं. मदतीला आई नाही, सल्ला द्यायला बाबा नाहीत, खोड्या काढायला विनय नाही. माझा डेस्क नाही, मैत्रिणी नाहीत आणि....तोही नाही. ग्लॅमरस आहे पण तितकंच घाबरवणारं.


हं, कदाचित ह्याच्यामुळेच मला उदास उदास वाटतंय

Thursday, January 24, 2008

मी आणि तो

लिहिण्याचा बॅकलॉग भयंकर वाढत चाललाय. आता नवं वर्ष उलटून किती दिवस गेले पण अजून माझं लिखाण तिथेच रेंगाळतंय. गेल्या आठवड्यातंच खरंतर लिहिणार होते, पण जरा जास्तंच झालं असतं म्हणून आता लिहिते.

ह्या वेळी एकतीस तारखेला आमच्या ऑफिसची पार्टी होती. जुहूलाच होती. अर्थात विनयभंग वगैरे झाले तेव्हा आम्ही सगळे, सगळ्यांचं माहीत नाही पण मी तरी घरी शांत झोपले होते. आम्ही नववर्ष संध्याकाळीच साजरं केलं. तर ह्या पार्टी निमित्ताने सगळ्या डिपार्टमेंटची लोकं एकत्र आली.

नवी गर्दी मिळाली की चेहेरे शोधण्याचं काम फक्त मुलंच करतात असं नाही. माझ्यासारख्या काही मुलीही त्यात सहभागी असतातंच की. अर्थात माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या डिपार्टमेंटला काम करते तिथे पस्तिशीच्या खालचं कुणी फिरकंतच नाही. CA असल्याचा साइड इफेक्ट आहे हा. त्यामुळे दुसऱ्या डिपार्टमेंटातून नजर फिरवणं आलंच.

काही बरे चेहेरे दिसले, पण एक विशेष. चेहेरा म्हणण्यापेक्षा एक विशेष माणूस भेटला. दिसायला तर चांगला होताच, पण बोलायलाही छान वाटला.

मला नेहेमीप्रमाणे गाणं म्हणण्याचा आग्रह झालाच आणि आपल्याला काय स्टेज आणि श्रोते मिळाले की कॅसेट सुरू. मग एका साहेबाने एका डुएटची फर्माइश केली. आता साहेब लोकांना कोण समजावणार की डुएट दोघं गातात म्हणून. मी म्हंटलं सर हे डुएट आहे, तर त्यांनी चक्क "त्या"ला आग्रह केला गाणं म्हणण्याचा. म्हणजे हा गातो पण? डुएट छान झालं, माझा आवाज कापत होता इतकंच, पण त्याला काही पर्याय नव्हता.

नंतर सगळा वेळ नजर त्यालाच शोधत राहिली. खरंतर मुद्दाम नाही, पण तो काय करत असेल, त्याचे मित्र कोणते? (त्यात एखादा ओळखीचा आहे का?), तो कसा बोलतो, कसा हसतो, सबकॉन्शसली मी माझ्या एक्स्पेक्टेशन्स मॅच करत गेले. काही मॅच झाल्या, काही नाही, शेवटी तडजोड ही करावी लागणारच कधी ना कधी, असं म्हणून तो उद्योगही सोडला. आनंद ह्याचाच आहे, की मी मोकाट इथे सगळं लिहू शकतेय. एरवी कुणाला सांगितलं असतं?

म्हंटल्या गाण्यासरशी ओळख झालीच. नाव कळलं, मराठी असल्याचंही कळलं. बरं वाटलं. कोब्रा नाही हेही कळलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, गाणं म्हणतो म्हणजे जेपींनाही (बाबांना) नाही, त्यांना मराठी पुरे आहे. विन्याचा तर प्रश्नच नाही. राहता राहिली आई. ती फार जातीनिष्ठ आहे, तेव्हा तिला मॅनेज करणं कठीण.

ह्याला काय म्हणतात? सुतावरून स्वर्ग गाठणे.

पण मला तो आवडला. एकंच प्रॉब्लेम आहे. मिशी! मला बिलकूल आवडणार नाही नवऱ्याने मिशी बिशी ठेवलेली. पण ते सगळं नंतर.

क्रश तरी नक्कीच आहे. प्रेमाचं काही माहीत नाही. बघुया पुढे काय घडतं ते.

Thursday, January 17, 2008

मी आणि माझे संकल्प

पुन्हा एकदा वर्ष संपलं.


म्हटलं, ह्या वर्षीचा लेखा जोखा मांडावा. मी गेल्या वर्षी काय केलं? तसं बरंच काही केलं आणि काहीच केलं नाही.

घराच्या आघाडीवर मी अक्षरशः काहीही केलं नाही. कधी बाबांचं टॅक्स रिटर्न भरून दे, आईला भाजी चिरून दे, विन्याच्या डिफिकल्टीज सोडव, असले फुटकंळ उद्योग केले, नाही असं नाही. पण ते सोडलं तर काहीही नाही. माझा पगार पण नाही. कारण तो माझ्या अकाउंट मध्ये जातो आणि त्यातून कधीच पैसे काढले जात नाहीत.


मग मी माझ्या घरासाठी काय केलं तरी काय गेल्या वर्षी? तशी माझ्याकडून काही अपेक्षा नाहीच, पण आपण ज्या संस्थेचा भाग आहोत आणि ज्या संस्थेच्या जिवावर आपण उड्या (फार उंच गेल्या नाहीत तरीही) मारतो, त्या संस्थेचं आपण काही देणं लागतो की नाही?

मला वाटतं माझा आळस नडतो. बऱ्याच वेळा वाटतं आईला मदत करावी. पण मग कोचावर बसून टी.व्ही. कोणी बघायचा. कोणीच बघत नाही, म्हणून त्याला (टी.व्ही. ला) वाईट वाटेल, म्हणून मी आपली टी.व्ही. बघत बसते. ते काही नाही. नव्या वर्षी केबल बंद. थोडं का होईना घरचं काम करायचं. थोडी बाबांनाही मदत करायची म्हणजे बिलं भरणं बँकेत जाणं असली कामं कधीतरी करायला काही हरकत नाही. आणि विन्याचं? छ्या त्याचं काही काम करायला नकोय, जमल्यास त्यानेच मला माझ्या कामात मदत करावी. तसा करतो तो मदत पण अजून.

हे झालं घरचं, नोकरी फ्रंटवर? सध्या नोकरी म्हणजे रुळावर चालणाऱ्या आगगाडीसारखी झालेय. रुळ सोडता येत नाही, दिशा बदलता येत नाही. रुळ नेतील तिथे जायचं. बदल हवाय एवढं नक्की. जग्गू (ओळखीसाठी मागील ब्लॉग वाचा) भेटल्यावर तर अजूनच जाणवलं, काहीतरी बदल हवाय आयुष्यात. त्यामुळे नव्या वर्षीचा संकल्प म्हणजे नोकरी बदलणे. जग्गूला सांगितलं तर ते काय खूष झाले. म्हणाले तुला लवकर समजलं. बऱ्याच जणांना रिटायर होताना समजतं. कठीण आहे पण. म्हणजे तिथले लोकं, ती जागा, माझा डेस्क आणि कंप्युटर सगळं सोडताना कसं वाटेल? आपलाच एक भाग सोडून चाललोय असं वाटेल. वाटूदे. आणखी एक अनुभव दुसरं काय?

नाटक आणि गाणं. गेलं वर्षभर बंद आहे गाणं. ह्या खात्यात शून्य मार्क. काही चांगले कार्यक्रम ऐकले हे खरं पण, रियाज अजिबात नाही. नवीन काही शिकणं तर नाहीच नाही. ठरलं. आजच बाईंना फोन करते आणि परत जायला सुरुवात करते. वेळ काढला नाही, तर वेळ मिळणार नाही हेच खरं.

नाटकाच्या दृष्टीने मात्र हे वर्ष प्लस. चार एकांकिका केल्या, खूप झाल्या. ह्याच्या उप्पर करणं काही शक्य नाही. एका सिरियलच्या शूटला पण गेले होते. पण एकंदरित ते मला झेपेलसं वाटत नाही. नाटक त्यापेक्षा खूपच छान. शूटींग भयंकर त्रासदायक आणि वेळकाढू प्रकार वाटला. आणि ती सिरियल कचऱ्याच्या टोपलीत गेली हे दुसरं. अर्थात एका एपिसोडमध्ये का होईना पण माझ्यासारख्या लोकांना घेतल्यावर सिरियल कचऱ्याच्या टोपलीतच जाणार.


आणि हो. शेवटचं राहिलंच. हा ब्लॉग सुरू केला. मजा वाटते लिहायला. डायरी लिहितेय असंच वाटतं. कोणाशी गप्पा माराव्यात तसं वाटतं आणि इतरांच्या प्रतिक्रिया वाचायला पण आवडतात. पुढच्या वर्षी इतर सगळे ब्लॉग वाचायचे हा संकल्प. काही चाळले मी. कवितांचं अमाप पीक आहे, त्यात काही चांगल्या कविता लपून जातात. गद्य पण काही इतकं सुंदर लिहितात की क्या बात है! त्यांच्यापुढे माझा ब्लॉग म्हणजे एखाद्या सुंदर कादंबरीसमोर जनरल लेजर. असो जनरल लेजर तर जनरल लेजर, माझ्यासारख्या मुलीला हेही नसे थोडके.

जेपींना (बाबांना) विचारलं की त्यांचा संकल्प काय नव्या वर्षीचा. तर म्हणाले, कोणताही संकल्प करायचा नाही, हाच त्यांचा संकल्प. कारण त्यांच्या मते त्यांनी एखादा संकल्प केला की तो हटकून पुरा होत नाही. मग विनूला विचारलं. तर म्हणाला ताई, बस इक सनम चाहिये आशिकी के लिये. हाच माझा संकल्प. कप्पाळ माझं. आशिकी करतायत. मग आईला विचारलं. ती म्हणाली, माझं (म्हणजे माझंच) लग्न करून देणे. नेहमीप्रमाणे जास्त काही न बोलता मी तिथून सटकले.


अजून थोडं लिहायचं होतं पण आता खूप उशीर होतोय. तेव्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.

विश यू ऑल अ व्हेरी हॅप्पी (अँड व्हेरी बिलेटेड) न्यू इयर....



- संवादिनी

Friday, January 11, 2008

मी, जग्गू आणि हॅट्स...

ह्या आठवड्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फिरण्याचा संकल्प अजूनही चालू आहे. तशी मला व्यायामाची वगैरे आवड नाहीच आहे. पण काय आहे, माणसांचं व्यसन मला आहे. जिथे जिथे चांगली माणसं भेटतात, तिथे तिथे मी कष्ट झाले तरी जाते. मग ते, सकाळी सकाळी छान झोपायच्या वेळी उठून, चालून चालून, पायांना दिलेले का असेना.


सकाळचा आमचा ग्रूप एवढा छान जमलाय की एक दिवस सुद्धा चुकवत नाही. कधी कधी तर गप्पांच्या भरात ऑफिसला जायला उशीरही होतो. पण ऑफिसची वेळ ही वेळेवर जाण्याकरता नसतेच. उद्या एक तास उशीराने सुरू झालं ऑफिस तरी मला लेट होणारच.


तर मी ह्या माझ्या नव्या मित्रांबद्धल लिहिणार होते आज. सगळे सत्तरीच्या वरचे आहेत. पण आनंदी. आपल्या व्यथा वेदना बाजूला ठेवतात आणि मगच फिरायला येतात. आणि त्या सगळ्या ग्रूप ची मी नात आहे. मी सगळ्यांना आज्जी आणि आजोबाच म्हणते. पण एक सोडून. म्हणजे आमच्या गिरगावातले एक आजोबा आहेत तिथे. त्यांना नाही आजोबा म्हणत. म्हणजे त्यांनीच मला सांगितलंय, त्यांना नावाने हाक मारायची. "जगजीवन". मी त्यांना म्हटलं तुमचं नाव फर मोठं आहे. "आजोबा" छोटं आणि सुटसुटीत आहे. मग म्हणाले की "जग्गू" म्हण. आता एवढ्या मोठ्या माणसाला जग्गू कसं म्हणणार? बाकी सगळे त्यांना जग्गू म्हणतात. ते ठीक आहे. एक दिवस ते आपल्या नातीला घेऊन आले. लहान आहे. तीही त्यांना जग्गूच म्हणते. मग मी पण सुरू केलं.


खरंतर एखाद्याला त्याच्या नावानं हाक मारण्यात काहीच वाईट नाही. नाही का? पण आपलं कंडिशनिंगच असं झालंय की अहो जाहो येतंच तोंडात हटकून. आपल्याला जे लहानपणापासून शिकवलंय योग्य म्हणून त्याच्या व्यतिरिक्त काही योग्य असू शकतं, ही शक्यताच आपण ध्यानात घेत नाही. किमान मी तरी घेत नाही. पण घ्यायला हवी. चौकटीबाहेर जाऊन वस्तूनिष्ठपणे (कसला शब्द आठवलाय, सही!!) प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. मला कधी जमेल देवालाच माहीत.


तर जग्गूही गिरगावातच राहत असल्याने आम्ही दोघं हल्ली एकत्रच परत येतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडी अधिक माहिती आहे. वल्ली आहे. म्हणजे बघा, ते तबला वाजवतात, मिलिट्रीतून रिटायर झालेले आहेत (काय म्हणून विचारलं की हवालदार म्हणतात, पण हुद्दा सांगत नाहीत). हॉटेल चालवून झालं, क्रिकेट कोच म्हणून काम करून झालं. मोटरमनच्या नोकरीसाठी त्यांना अर्ज करायचा होता पण वय आड आलं. असं केलं तर माझ्यासारख्या मुलीचं, एक ना धड भाराभार चिंध्या असं व्हायचं, जग्गूचं नाही. सगळीकडे यशस्वी. यश मिळालं की ज्याच्यात यश मिळालं ते काम सोडायचं आणि पुढचं वेगळं काहीतरी धरायचं.


परवाच मी त्यांना विचारलं की, त्यांना अस्थिरता इतकी का आवडते? एवढा नव्याचा हव्यास कशासाठी? जग्गूनी मला विचारलं, तुझा पुनर्जन्मावार विश्वास आहे? मी म्हटलं, अजून विचार केलेला नाही. मग म्हणाले, त्यांचा नाही. आणि जगात एवढ्या चांगल्या चांगल्या अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत, की खूप प्रयत्न केले तरी पाच सहा गोष्टीच नीट मनसोक्त करता येतात. सतत नवनवे अनुभव घेत राहयचं. आयुष्याचा दुसरा उद्देश काय आहे? फक्त आपला जोडीदार सोडून सगळं बदलून पाहायचं आणि जोरजोरात हसले आगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत.


मग मी न विचारताच त्यांच्या नातीबद्दल, मुलीबद्दल बोलत राहिले. म्हणाले तुला पाहिलं की मला माझी मुलगी आठवते लग्नाआधीची. म्हणून तुला जग्गू म्हणायला सांगितलं.


मला कौतूक वाटलं त्याचं, आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या पत्नीचं, की इतकं मनसोक्त आयुष्य जगणाऱ्या माणसाचा संसार सांभाळणारी बाई किती खमकी असेल? पण आपल्याला आवडून गेले ते. एकच आयुष्य, वेळ कमी, मग जास्तीत जास्त गोष्टी करायच्या, बदलून पाहायच्या, पण जोडीदार सोडून.


त्यांना मी विचारलं त्यांच्या जोडीदाराबद्दल. चर्नीरोडच्या ब्रीज वर चढलो की आम्ही वेगेवेगळ्या दिशेला वळतो. तिथेच विचारलं. काहीच बोलले नाहीत. हसले आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी लवकरंच पॉइंटाला पोहोचले आणि इतर आजोबांना विचारलं ह्याबद्दल. ते म्हणाले की जग्गूची बायको लग्नानंतर दोन वर्षातच गेली.


मला प्रचंड धक्का बसला. मी जवळ जवळ रडलेच तिथे. प्रेम असावं तर कसं? असं. ते आता सत्तरीच्या वर आहेत म्हणजे किमान चाळीस वर्षांपूर्वी त्यांची बायको गेली आणि नाविन्याचा ध्यास घेतलेल्या ह्या माणसाला एकदाही वाटू नये की आपण दुसरं लग्न कराव? कदाचित वाटलंही असेल, पण त्यांनी केलं नाही हे नक्की.


आता लिहिताना पण मी सुन्न झालेय. रडतेय.


हॅटस ऑफ जग्गू. हॅटस ऑफ!!