Saturday, April 9, 2011

देवयानी (2)

कॅफे कॉफी डे मध्ये येऊन काहीतरी करत बसण्याची माझी ही पहिलीच वेळ नाही. इथे येऊन कित्येक वेळा मी वाट्टेल ती कामं केली आहेत. ठिकाणंच असं मस्त आहे. समोर खाडीचा शार समुद्र आहे, त्याच्या अलीकडे मॅंग्रोव्हज. डाव्या बाजूला लांबवर भंगारात काढलेले ट्रॉलर्स रस्टिक फील आणतायत. माझी ही कितवी कॉफी? ठाऊक नाही. असं लिहिण्याची पद्धत आहे, पण माझी पहिलीच आहे. दुसरी कॉफी सीसीडीतली तरी मी पिऊ शकत नाही. पण ही जागाच जबरदस्त आहे. दोन रस्त्यांची टोकं बरोब्बर इथे येऊन मिळतात आणि आपण असे कोपऱ्यावरून बाहेरचं दृश्य बघत बसतो. सही.

हं तर मी लिहितं होते इथे येऊन वाट्टेल ती कामं करण्याबद्दल. अगदी अगदी. ऑफिसातली प्रेसेंटेशन्स असूदेत किंवा मिड लाईफ क्रायसिसवर, जी माझ्या आयुष्यात यायची असावी पण आधीच आल्यासारखी वाटते, त्यावर प्रीतमबरोबर केलेली डिसकशन्स, (प्रीतम हे नाव अगदीच बुळचट वाटतं ना? हं, त्याचं खरं नावही असंच बुळचट आहे. आय ऍम रिअली सॉरी इफ युअर नेम इज प्रीतम) किंवा श्रेयाबरोबर पाहिलेले इथले अगणित सूर्योदय, किंवा अगदी इंटरनेट मित्रांबरोबर केलेलं गॉसिप, किंवा आपण मुंबईत आहोत हे विसरण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा पुन्हा येणं.

माझ्या ऑफिसपासून ही जागा फारशी लांब नाही. चालत म्हटलं तर पंधरा मिनिटं असतील बहुतेक. पण चालत आलंयच कोण? ऑफिसातल्या असंख्य बॉसेसच्या असंख्य गाड्या काय फक्त ड्रायव्हरांना दिवसभर झोपण्यासाठी असतात की काय? त्यातल्या डझनभर ड्रायव्हरांचे फोन माझ्याकडे असतात. अशा प्रसंगी उपयोगाला येतात. डुअर टू डुअर लिफ्ट मिळते. येता जाता त्यांच्याशी दोन शब्द बोललं की झालं. माहीतच असेल की आज दादांना (ड्रायव्हारांसाठीचा खास शब्द. अगदीच म्हातारा ड्रायव्हर असेल तर मामा) बोलवायचं आहे, तर थोडं लाडात येऊन हसायचं. झालं की काम. तशी मी फार स्वार्थी बाई आहे. पण हसू इथे तिथे उगाचच सांडत बसण्याची भलतीच वाईट खोड मला आहे. अशी कधी कधी ती उपयोगाला येते.

आणि ड्रायव्हर, टॅक्सी ह्यांचा माझ्या आयुष्याशी एकदम घनघोर संबंध आहे. नाही नाही, माझ्या वडिलांनी टॅक्सी चालवून माझं शिक्षण बिक्षण नाही केलं. ना मी कुणा टॅक्सीवाल्याच्या प्रेमात बिमात पडले. पण तरीही घनघोर संबंध असायचं कारण म्हणजे माझी नोकरी. मी एका बीपीओमध्ये काम करते.

असं मी कुणाला म्हटलं, की अर्धा क्षणही न दवडता लोकं मला विचारतात, अच्छा, म्हणजे कॉल सेंटरमध्ये काम करतेस वाट्टं? आणि वेगवेगळी लोकं हाच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारतात बरं का. तरुण मुलगा असेल, तीशीपर्यंतचा, तर समोरचं काम सोपं आहे असा लुक. तीशीनंतरचा लग्न बिग्न झालेला बाप्या असेल आणि बायको नसेल सोबत, तर आपण कॉलसेंटरमधल्या मुलींबद्दल ऐकतो ते सगळं खरं असेल का? असा लुक. बायको असेल सोबत तर जनरली नवरे हा प्रश्न विचारतच नाहीत आणि लग्न झालेली बाई असेल तर कॉल सेंटर हे कॉल सेंटर नसून कॉल गर्ल सेंटर असल्यासारखा लुक देऊन हा प्रश्न विचारते.

पण मी सांगत वेगळंच होते. ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र माझं नकारार्थी आहे. मी कॉल सेंटरमध्ये नाही काम करत, पण त्याचाच एक नॉन ग्लॅमरस भाऊ किंवा बहीण आहे, त्यात काम करते. पण तरीही माझं काम, क्लायंटांच्या तालावर नाचतं (नाही नाही डान्सबार सुद्धा नाही) आणि कामाची वेळसुद्धा. सकाळी चारला काम सुरू करायचं म्हणजे टॅक्सीवाल्यांशी, ड्रायव्हरांशी घनघोर संबंध येणारंच ना. रोज सक्काळी मी कुणाचं तोंड पहिलं पाहत असेल तर तो ड्रायव्हर. बहुदा पहिलं मी माझंच तोंड पाहत असेन, पण अर्ध्या झोपेत असल्याने ते रजिस्टर होत नसावं. पण आमच्या बिल्डिंगच्या लाकडी जिन्यावर चपलांचे होणारे आवाज, लोकांना न उठवण्याइतपतच ठेवण्याच्या प्रयत्नात माझी झोप उडते आणि मग मी ज्या व्यक्तीला पाहते तो म्हणजे माझा सकाळचा ड्रायव्हर. आणि त्याची पेंगुळलेली अवस्था पाहून, तो मला नीट ऑफिसपर्यंत सोडेल ना? ह्या विचाराने माझी आणखीनंच झोप उडते.

असो. मी सांगत होते काय आणि सांगत बसले काय. माझं हे असं पिठाच्या गिरणीसारखं असतं. पट्टा चालू. गव्हाचं पीठ का तांदळाचं हा विचार नाही. गिरणी चालू राहणं महत्त्वाचं. तसं माझं होतं. पहिल्या पोस्टात माझा दिनक्रम वगैरे लिहिणार होते, पण कॉफीही संपलेय आणि डोळ्यावर झोपही यायला लागलेय, तेव्हा इथेच थांबलेलं बरं.

पुढच्या पोस्टापासून खरी सुरवात, पहिला डाव भुताचा किंवा देवाचा. ह्या काँट्रोव्हर्सीबद्धल पुन्हा लिहीन कधीतरी

buttermilk - english शब्द roman मध्ये न लिहिता देवनागरीत लिहिले तर वाचायला सोपे जातात हे सुचवल्याबद्दल thank you.

- देवयानी (2)

Wednesday, April 6, 2011

Hi

नमस्कार, संवादिनीचा गेला post वाचला. first reaction होती की makes no sense. पण जरा विचार केला आणि मलाच ही कल्पना आवडली. एखादा कट्टा किंवा चावडी असावी, तसा हा blog. मनात असाही विचार आला की तिच्या ब्लॉगवरून कशाला लिहा, आपलाच नवा ब्लॉग काढला तर? पण जर कुणी ready viewership देत असेल तर ती का नाकारा?

माझा स्वतःचा blog आहे आणि मी लिहिलेलं वाचणारे लोकंही आहेत. पण जे तिथे लिहिता येत नाही ते, अगदी मनातलं, खोलवरंचं, खुपणारं (खुपते तिथे गुप्ते मध्ये मला कधी बोलावणार? ) ते लिहावं म्हणून इथल्या शाळेत admission घेतली. संवादिनीने (मला माहीत आहे तुझं नाव शमा आहे किंवा सुषमा आहे, पण तुला संवादिनी सोडून दुसरं काहीच म्हणावंसं वाटत नाही. खरंच!) परवानगी दिली आणि here I am.

pen name आहे देवयानी. देवयानी का? मी शाळेत असताना ययाती वाचलं. तेव्हा वाचलेली देवयानी अगदी ठसलीच मनावर. मुलं म्हणतात ना हल्ली, मुली जाम attitude दाखवतात. ते attitude मला देवयानीत कुठेतरी दिसलं. तेव्हा पक्कं वाटायचं, शर्मिष्ठा चांगली, सभ्य, marriage material. पण आपल्याला बा देवयानीसारखं व्हायचं. चुका करायच्या, पण मनस्वी करायच्या.

तसं काही झालं नाही. खरं तसं शर्मिष्ठा किंवा देवयानी किंवा यती किंवा ययातीही खऱ्या आयुष्यात होणं कठीणच आहे. फार फार तर कच होणं त्यातल्या त्यात सोपं. पण blog वर काहीही होणं एकदमच सोप्पं आहे. म्हणून हे नाव घेतलं. ह्या नावात एक romanticism आहे. कचासाठी बापाशी भांडणारी, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याने विश्वासघात केल्यावर चक्क त्याला विसरून ययातीच्या प्रेमात पडणारी देवयानी अद्भुतच नाही का?

आता ययाती तसं पुसटसंच आठवतं. पुन्हा वाचायचा प्रयत्न केला तर शब्द लागत नाहीत. खोटं कशाला सांगा, मी पुन्हा वाचायचा प्रयत्नच केला नाही. काळ बदलतो तसे आपणही बदलतो. तशी मीही बदलले. स्वतःला आरशात पाहिल्यावर, डोळ्याला चस्मा लावू adolescent वयात ययाती वाचणारी, दोन वेण्या घालणारी, पुस्तकातला शब्दन शब्द घासून घासून पाठ करणारी, वेडी गबाळी मी होते ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. कुठेतरी हा प्रवास romantic होता. (बरोबर मराठी शब्द आठवत नाही, पण ह्या romantic चा प्रेमाशी काहीही संबंध नाही. काव्यमय चालेल का? कवित्व वरून? ) खडतर आहे. फार काही special नाहीये, पण माझ्यासाठी super duper आहे. अर्थात अर्धवट आहे, पुढचा रस्ता invisible आहे. मागे जाणं अशक्य आहे. एकंदरीत सगळं confusing आहे.

त्या सर्वाची संगती लावायचा हा एक वायफळ प्रयत्न.

- देवयानी (1)

Tuesday, February 22, 2011

फ्लॉप आयडिआ - ब्लॉग चालवायला देणे आहे

ब्लॉग चालवायला देणे आहे

माझ्या ब्लॉगला आलाय माझा कंटाळा. पूर्वी नियमित लिहायचे. आता नियमितपणे लिहिणं ही कल्पनातीत गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा न हालवलेला निर्विकार चेहरा पाहायची वेळ आली की फार वाईट वाटतं. काल असंच बिचाऱ्या ब्लॉगकडे पाहत असताना ही कल्पना सुचली. अर्थात ती किती वास्तव किंवा अवास्तव आहे हे हा पोस्ट टाकल्यावरच कळेल.

कुणाला वाटत असेल की संवादिनीच्या मार्फत संवाद साधावा तर जरूर samvaadini@gmail.com वर मेल पाठवा.

अटी दोनच

१) फक्त स्त्रियांसाठी
२) सांगण्याची गोष्ट असावी.

बस.

अर्थात कुणी म्हणेल की आम्ही स्वतःचा ब्लॉगच काढू. ते खरंच आहे. पण तरीही मनात आलं, ब्लॉगवर टाकलं. काहीच नाही झालं पुढचे काही दिवस तर समजा, फ्लॉप आयडिआ.

Thursday, January 27, 2011

कल्याण

सध्या आमच्याकडे प्रचंड धामधुमीचे दिवस आहेत. सईकडे पाहता पाहता अगदी नाकी नऊ येतात. रात्रीची झोप दुरापास्त नाही म्हणता येणार, पण तुटक झालेली आहे. त्यात कुंभकर्णाशीच लग्न केलंय असा भास व्हावा अशी परिस्थिती असल्याने, इकडनं किंवा तिकडनं काही मदत होण्याची शक्यता नाहीच. आणि आमची गंमत वेगळी आहे. सईला झोपवून मला स्वतःला झोप येईपर्यंत पुन्हा तिची जागं होण्याची वेळ झालेली असते. झोप येईपर्यंत रात्र रात्र करायचं काय हा प्रश्न असतो.

परत सई का रडते हा एक मोठा परिसंवादाचा विषय जेव्हा जेव्हा ती रडते तेव्हा होतो. आईला, बाबाला, मला आणि कुंभकर्णाच्या मावस भावाला सर्वांनाच तिच्या रडण्याचं कारण वेगवेगळं आहे असं वाटतं. मग कारणमीमांसेतच बराचसा वेळ निघून जातो. मग तिचं रडं थांबवण्याच्या कॢप्त्या शोधून काढायचं काम जोरात चाललंय.

गुगलबाबा आहेतच. कुणी सांगितलं हेअरड्रायरचा आवाज लहान मुलांना झोपायला मदत करतो कारण त्यांना म्हणे पोटात असताना तसाच आवाज येतो. बाबा मला गाणं म्हणायला सांगतो. उगाचच. माझा रियाज इतका झालेला नाहीये की माझ्या गाण्याने ती झोपण्याऐवजी अजून जागी होऊन रडायला लागण्याची शक्यता आहे. तिच्या बापाने, म्हणजेच कुंभकर्णाच्या मावस भावाने चक्क आयफोन ऍप्लिकेशन शोधून काढलं तिला झोपवण्यासाठी. त्यातून हृदयाच्या ठोक्यांसारखा आवाज येतो. त्याने म्हणे बाळं झोपतात. एका मैत्रिणीनं एक सीडी आणून दिली. बाळाच्या रडण्याचे पाच प्रकार आणि प्रत्येक वेळी बाळ का रडतंय हे कसं ओळखायचं ते शिकवणारी.

एक ना एक अनेक साधनं उपलब्ध आहेत. पण आमच्या राजकन्येवर कशाचाच काहीच परिणाम होत नाही. मी बाबाला विचारलं की आम्ही कसे होतो? मजा आहे ना. आपल्या स्वतःलाच आपण कसे होतो हे आठवत नाही. बाबा म्हणाला की मी लहानपणी तानपुरा लावला किंवा संवादिनीवर सूर धरला की एकटक बघत बसायचे आणि रडायचं विसरून जायचे. हा प्रयोग सईवर झालेला आहे, पण तिच्यावर काही तानपुऱ्याचा फारसा परिणाम झाला नाही.

परवा बाबा म्हणाला कल्याण लावून बघ. कल्याण म्हणे लहान मुलांच्या मनावर चांगले संस्कार करतो. म्हटलं बरं आहे. माझ्या कडच्या ज्या काही सीडीज आहेत त्यातून शोधून एक सीडी काढली. तेवढ्यात आईनं जोरात हाक मारली म्हणून बाहेर गेले. आई काँप्युटरवर पेपर वाचीत होती. मी बाहेर गेले तशी ती म्हणाली भीमसेन जोशी गेले.

काळजात चर्र झालं. मी त्यांना कधीही भेटलेले नाही, कधी त्यांच्याशी बोललेले नाही. पण माझ्याच आयुष्यातलं काहीतरी हरवल्याचा एक क्षण भास झाला. अगदी बाबाच्या मांडीवर बसून मी त्यांचं गाणं ऐकलेलं आहे. माझ्या जन्माच्या खूप खूप आधीपासून माझ्या बाबाच्या जन्माच्याही आधीपासून ते गात होते. मला त्यांचं गाणं तर आवडायचंच पण त्याहीपेक्षा आवडायच्या त्यांच्या भावमुद्रा. गाण्यामध्ये समरसून जाणं पण तरीही अलिप्त असणं. पिसाळलेल्या घोड्याला काबूत आणावं तसं बैठकीला आणि श्रोत्यांच्या मनाला काबूत ठेवणारा त्यांचा सूर आणि त्यांची नजर. सगळं क्षणार्धात नजरेसमोरून गेलं.

बाबाला सांगायला म्हणून आत गेले, तर बाबानं सीडी चालू केलेली. त्यांचाच कल्याण लागलेला. तोच तो धीरगंभीर खर्ज. सईचं रडं कसं कुणास ठाऊक त्या क्षणी मात्र थांबलेलं. माझ्या बाबांच्या मांडीवरून मी ऐकलेला अलौकिक माणूस ती कधीच माझ्यासोबत ऐकू शकणार नाही ह्याचं मला सर्वाधिक दुःख वाटलं. काळ बदलत जातो, माणसं बदलत जातात. बदलणाऱ्या काळाबरोबर हरवत चाललेली आपल्या जीवनातली श्रद्धास्थानं मात्र क्षणभर का होईना आपल्याला हळवं बनवून जातात.

Monday, December 13, 2010

सई

घड्याळाच्या काट्याची टिकटिक. कधीपासून चाललेली. सेकंद गेली, मिनिटं गेली, तास गेले. त्याची टिकटिक असंबद्ध चाललेली. घटका भरण्याची वाट बघत आम्ही दोघी. एक ती आणि एक मी. एकमेकींना आधार देत, एकमेकींवर चिडत, रडत, भेकत, विनवण्या करत, सरकणाऱ्या एकेक सेकंदाशी प्राणपणाने लढत, गेलेल्या एकेक सेकंदाचा हिशेब मांडत बसलेल्या.

तिचं आणि माझं नातंच असं होतं. नातं होतं हे खरंच. त्याला नाव होतं हेही खरंच. पण तरीही ते कधी उलगडलं नव्हतं. कदाचित मला ते उलगडल्याचा आभास निर्माण झाला होता. तलवारीसारखं हे नातं. एका बाजूला मूठ, दुसऱ्या बाजूला धारधार पातं. आयुष्यभर ह्या नात्याची मूठ पकडून मी बसलेले. पातं धरायला लागलं की मुठीत असताना वाटलेली संरक्षक तलवार संहारक वाटायला लागते. तसंच आमचं नातंही. मला कळलेलं पण न कळलेलंही.

आम्ही दोघी अगदी जीवश्च, कंठश्च मैत्रिणी. कशी झाली मैत्री? कुठे झाली? केव्हा झाली? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत असंही मला कधी वाटलं नाही. तिला वाटलं असेल, नसेल, कल्पना नाही. पण मैत्रिणींनी एकमेकींना द्यायचे सगळे ताप, मनस्ताप आम्ही एकमेकींना दिलेले. कधी तिचा रागही आलेला. तिलाही माझा नक्कीच आला असेल. माझा आनंद तिचा होता, माझी दुःख तिची होती, माझं घर, माझी माणसं सगळी सगळी तिचीही होती. तिचं घर, तिची माणसं सगळी सगळी माझी होती. तिचा विचार माझा होता. माझी असणं तिचं होतं आणि तिचं असणं माझं होतं.

तिला आवडेल ते न आवडूनही मी खायचं आणि मला आवडेल ते न आवडूनही तिनं खायचं. मला गाणं आवडतं, म्हणून ते तिलाही आवडावं हा माझा हट्ट. मग तासंतास चांगलं चुंगलं गाणं तिला ऐकावंच लागायचं. तिला आवडायचं की नाही कोण जाणे. पण ऐकायची बिचारी.

कुणी सांगे, ती फार स्वप्नाळू आहे. असेलही. तिचं जग आपल्या जगापेक्षा खूप वेगळं होतं. तिथं ती तिच्या मर्जीची मालकीण होती. वाटेल तसं जागावं, वाटेल तेव्हा झोपावं, वाटेल ती स्वप्न बघावीत. तिच्यामुळे कदाचित मीही स्वप्नाळू झाले. माझी स्वप्न तिची झाली, तिची स्वप्न माझी झाली.

सेकंद गेली, मिनिटं गेली, तास गेले, दिवस गेले, महिने गेले. तिची आणि माझी मैत्री अधिकच घट्ट होत गेली. पण तरीही घटका भरण्याची वाट बघत आम्ही दोघी. एक ती आणि एक मी. एकमेकींना आधार देत, एकमेकींवर चिडत, रडत, भेकत, विनवण्या करत, सरकणाऱ्या एकेक सेकंदाशी प्राणपणाने लढत. मध्यरात्रीच्या चंद्रानं आम्हाला बेभान केलं की उधाणाच्या भरतीच्या लाटा किनाऱ्यावर फुटाव्यात तशा वेदनेच्या लाटा शरीरावर झेलताना आम्हा दोघींचा आणि काळाचा संपर्क तुटला कोण जाणे. किती वेळ तसाच गेला कळलंच नाही. चक्रातून चक्रात, चक्रातून चक्रात, चक्रातून चक्रात आम्ही फिरत राहिलो. वेड लागायची पाळी आलेली, पण तरीही तेव्हा पुसटसा अभिमन्यू आठवला. चक्रव्यूहातून बाहेर न पडणारा. एक क्षण डोळ्यात पाणी आलं. पण दुसऱ्याच क्षणी मनानं आणि शरीरानंही, तिच्या आणि माझ्याही, अभिमन्यू व्हायचं नाकारलं. चक्रव्यूह फुटलं.

सुटका झाली तशी ती बेंबीच्या देठापासून ओरडायला लागली. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. कुणीतरी तिचा इवलासा देह माझ्या छातीवर आणून ठेवला.

घड्याळाची टिकटिक पुन्हा जाणवली. आता कसलाही हिशेब मांडायचा नव्हता.

Tuesday, September 14, 2010

कालच्या आईची आजची आई

ह्यावेळी गणपतीची वेगळीच मज्जा झाली. बाबा तिथे आणि आई इथे माझ्यासोबत. बाबानी उकडीच्या मोदकापासून सगळं काही स्वतः बनवलं. त्याची प्रॅक्टिस म्हणून बरेच वेळा उकडीचे मोदक बनवले. बऱ्याच वेळा फसले पण करून करून जमले एकदाचे. बाबाला म्हटलं फोटो काढून ठेव आणि किचनमध्ये लाव. लोकं कसे आपण मारलेल्या प्राण्यांच्या तोंडाची ट्रॉफी करून दिवाणखान्यात लावतात तसं.

मोदक करणे म्हणजे काय प्रकरण आहे हे मी गेली दोन वर्ष अनुभवतेय. कधी खोबरं जास्त तर कधी गूळ कमी. त्यात इथे मोदकांचं स्पेशल पीठ मिळत नाही त्यामुळे कव्हरपण हवं तसं होत नाही, अशी अनेक कारणं मी मोदक चांगले न होण्यासाठी देत आलेली आहे. पण ह्या वर्षी त्याच फ्रोजन कोकोनट आणि तांदळाच्या पिठाचे आईने मोदक केले. आईच्या हातची चव वेगळीच. काहीही साहित्य असूदे, मोदक चांगलेच होणार.

मला खूप वाईट वाटत होतं आईला इथे बोलावून घेताना. गणपती आणि बाबा घरी एकटा, हे काही बरोबर नव्हतं पण गणपतीपर्यंत आईचं इथे येणं पुढं ढकलणंही शक्य नव्हतं. पण गुरवारी रात्री श्रीमंत विनोबा घरी हजर. रविवारी सुटी टाकली त्याने. शुक्रवार शनिवार तशीही सुटी असतेच त्याला. बाबाला एकदम सरप्राइज दिलं त्यानं. तो बिलकुल मॅच्युअर्ड नाही असं माझं आपलं पक्कं मत. पण कधीतरी अशा गरजेच्या वेळी एकदम शहाण्या बाळासारखा कुठूनतरी उपटतो, म्हणून त्याचं कौतुकही वाटतं. त्याच्या उभ्या आयुष्यात, मी त्याच्या केलेल्या, एका हातावर मोजता येण्याइतक्या, कौतुकांपैकी हे एक.

दुपारी मी आणि आई इथल्या वुलवर्थमध्ये जाणार होतो. वुलवर्थ म्हणजे इथलं आमचं लाडकं वाण्याचं दुकान उर्फ सुपरमार्केट. पण दुपारी मला थोडं बरं वाटत नव्हतं. आई म्हणाली की बरं नसेल वाटत तर अजिबात यायचं नाही. मी जाते म्हणून. आधी मी नाहीच म्हणत होते मी. कारण तशी एकटी ती इथे फिरली नाहीये. इंग्रजीचा तिचा बिलकुल प्रॉब्लेम नाहीये पण हे लोकं काय बोलतात ते भारतातल्या अट्टल इंग्रजाच्याही डोक्यावरून जाऊ शकतं. वर तिला एकटीला तिथे जाणं जमेल का, बरोबर वस्तू कुठून उचलायच्या हे समजेल का? मग बरोबर बाहेर येऊन पिशव्या हातावर वागवत एवढं चालत ती येईल का? ह्या प्रश्नांनी हैराण झाले. तरी तिनं हट्टच मांडला. मग तिला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या. पुन्हा पुन्हा दिल्या. शेवटी एकदाची ती एकटी गेली आणि ती येईपर्यंत माझ्या जीवाला घोर.

ती गेली आणि मला माझीच मी आठवले. कॉलेजची परीक्षा असेल किंवा सीएची असेल, पण घरातून बाहेर पडेपर्यंत आईच्या सूचना चालू असायच्या. पेनं घेतलीस ना? पट्टी घेतलीस ना? शांतपणे पेपर लिही. स्कूटर हळू चालव. सिग्नल्सकडे लक्ष दे. पहिले सगळा पेपर वाच, मग उत्तरं लिही. मग मी आईला म्हणायचे, आई मला कळतंय, उगाच टेन्शन देऊ नकोस. मग बिचारी गप्प बसायची आणि मग मी घरी येईपर्यंत तिची उलाघाल चालू असायची. पेपर चांगला गेला असं मी तिला सांगेपर्यंत तिचं कशात लक्ष लागायचं नाही.

गंमतच वाटली. काळ बदलला, स्थळ बदललं की माणसांचे रोल्सही बदलतात. ती मला जसं सगळं पुन्हा पुन्हा सांगायची तसंच मी तिला सांगत राहिले. मी येईपर्यंत तिला जशी काळजी वाटायची तशीच ती येईपर्यंत मला वाटत राहिली. काल मुंबईत मी मुलीच्या रोलमध्ये होते आज इथे मी तिची आई असल्यासारखी वागले.

Tuesday, July 13, 2010

पारिजात

अंगणी पारिजात फुलला

बहर तयाचा, काय माझीया, प्रीतीला आला

अंगणी पारिजात फुलला

Thursday, May 13, 2010

मोहर

बोडक्या डोंगराच्या भरल्या कपाळावर
उभा होता एक खट्याळ आंबा

पानाची हिरवाई होती, मातीची माया होती
समोर आमराई होती, ढगांची छाया होती

आंबा आपला मस्तीत होता एकटाच गाणं म्हणत
उंचीच्या धुंदीतलं आंधळं जिणं जगत

लहानगा आंबा झाला आता मोठा
डोळे उघडले तसा पैसा झाला खोटा

आमराई कधी बहरली त्याला कळलीच नाही
चैत्र सरून गेला तरी मोहर उमललाच नाही

Thursday, October 8, 2009

अपूर्ण

सध्या इथे छान हवा आहे. ना धड उन्हाळा, ना धड थंडी. मध्ये मध्ये पावसाचा शिडकावा. पानगळ होऊन फांद्यांचे सांगाडे उरलेल्या झाडांना पुन्हा नवी पालवी फुटायला लागली आहे. पुन्हा एक नवा उभार, पुन्हा एक नवा उत्साह आणि मग पुन्हा एक पानगळ. निसर्गाचं चक्र पूर्ण फिरलेलं इथे पहिल्यानेच पाहतेय. उन्हाला अजून नकोसा उष्मा चिकटला नाहीये आणि वाऱ्याला आलेली बोचरी धार बोथट होत चालली आहे. कधी मध्येच सदासर्वदा अंगात अडकवलेला स्वेटर बाजूला फेकून जरा मोकळ्या ढाकळ्या कपड्यात बाहेर जायचा उत्साह वाटायला लागलाय.

झापड लावून कॅलेंडरवरचे दिवस ढकलणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही निसर्गातला हा बदल इतका जाणवावा तर पशू पक्ष्यांची काय कथा? हल्ली सकाळी उठले की खिडकीबाहेर ऊन खात पडलेल्या बागेचं दर्शन होतं. आमच्या घराच्या बाहेरच रस्त्यावर एक मोठं झाड आहे. आणि झाडावर ह्या ना त्या पक्ष्यांचा अड्डा नेहमीच बसलेला.

इथले कावळ्यासारखे दिसणारे पण काळे पांढरे मॅग्पाय पक्षी फार. कधी पोपटासारखे रंगीबेरंगी पक्षी. कधी गवतातले किडे खात लॉनवर इथून तिथे फिरणाऱ्या टिटव्या, तर कधी कबुतराच्या कुळातले वाटणारे काही पक्षी झाडावर हमखास ठेवलेले. बऱ्याच दिवसांनी सगळी नातवंड एकत्र घरी आली की आमचे आजो (म्हणजे आजोबा) व्हायचे तसं वाटतं ह्या झाडाकडे बघून. अगदी अंजारून गोंजारून सगळ्यांना आपल्या फांद्यांवर खेळवतं ते झाड. बाहेर जाताना किंवा बाहेरून येताना उगाचच हात त्या झाडाला लागतात. आपलं काही मिळाल्याचा आनंद होतो.

तर हल्ली सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग येते. मग दात घासायच्याही आधी आमच्या ह्या अजोबाचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आज कोण कोण आलंय ते पाहिलं की मग दिवसाची सुरुवात काय मस्त होते. गेले काही दिवस मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटातलं संगीत कुठे तरी हरवून गेल्यासारखं वाटलं. म्हणजे कधी कधी गाणं चालू असताना तबला उतरल्यावर कसा बेसुरा वाटतो, तसंच.

घरून काम करण्याचा एक फायदा म्हणजे हवं तिथे बसून काम करता येतं. मी हल्ली मुद्दामच झाडाच्या समोरच्या खिडकीत जाऊन बसते. दुनयाभरच्या आकडेमोडीने आणि मेलामेलीने डोकं विटलं की पटकन समोर आजोबा नातवंडांचा निर्व्याज खेळ पाहता येतो. परवा अशीच बसले होते तर एक गोष्ट लक्षात आली. झाडावर फक्त मॅग्पाइज होते. बाकी सगळे पक्षी एकतर लॉनवर नाहीतर शेजारच्या झाडावर होते. पहिल्याने वाटलं हवाबदलासाठी दुसरीकडे बसले असतील. मग लक्षात आलं मामला थोडा गंभीर होता.

झाडाच्या बेचक्यांत घरट्यासारखं काही दिसलं. दुर्बीण काढून बघितलं तर होयकी, मॅग्पाइजनी चक्क घरटं बांधलं होतं. इतर सर्व पक्ष्यांना आजोबांवरून त्यांनीच उडवलं होतं. त्यांच्याच दादागिरीमुळे किलबिलाटातलं संगीत वगैरे हरवून बसलं होतं. आता काय नवीनच चाळा लागला. घरटं बघत राहणं आणि काही विशेष घडतंय का ते पाहणं.

एक दोन दिवस असेच गेले. मी बाहेरून घरी येत होते आणि नेहमीसारखा माझा हात झाडाकडे वळला अन काय झालं काही कळलं नाही एकदम कावळ्यासारखा रागीट ओरडण्याचा आवाज आला आणि एक मॅग्पाय चक्क वरून माझ्याकडे येत असलेला पाहिला. मला वाटलं हा माझ्या डोक्यावर आपटणार, पण तेवढं न करता फक्त डोक्याला वारा घालून तो निघून गेला. त्याचा तो अवतार बघून मी प्रचंड घाबरले आणि अंगणात पळाले. डेव्ह आजोबांनी माझी ही गंमत पाहिली. ते म्हणाले की पक्ष्यांनी घरटं बांधलंय आता ते ओव्हरप्रोटेक्टिव्ह होतात, माणसांसारखेच.

झालं, तेव्हापासून जरा लांबूनच. मॅग्पायभाऊ आणि मॅग्पायीण्वहिनींना धोकादायक वाटणार नाही अशा अंतरावरून येणं जाणं आणि दुर्बिणीतून घरटं बघणं चालू होतं. साधारण आठवडा झाला असेल. थोड्याच दिवसात बाळ मॅग्पाय जन्माला येणार होतं. माझ्या नवऱ्याला ह्यात भारी उत्साह. तो अगदी रोज न चुकता मला अपडेट विचारायचा.

शनिवार सकाळ झाली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. जन्मात पहिल्यानेच पडायला मिळतंय असा तो पंधरा मिनिटं पडला. हंतरुणात पडल्या पडल्या पावसाचा आवाज छान वाटत होता. थोड्या वेळाने पाऊस सरला आणि लख्ख ऊन पडलं. मी उठले आणि नेहमीसारखं खिडकीतून घरटं पाहिलं. घरटं तसंच होतं पण मॅग्पायभाऊ आणि वहिनी बहुतेक विकली शॉपिंग करायला गेले होते. दुपारी परत पाहिलं तर चक्क झाडावर इतर नेहमीचे पक्षी बसलेले. काय झालं कळेना. संध्याकाळी बाहेर पडलो तर झाडाखाली अंड्याची टरफलं दिसली. नुसती टरफलं.

मी म्हटलं झाडावरून पडली अंडी. पिलं व्हायच्याआधीच गेली. नवरा म्हणाला नाही पिलं झाली असतील नाहीतर नुसती टरफलं नसती पडली. विचारणार कुणाला? झाडाला विचारलं असतं त्याला उत्तर देणं शक्य असतं तर.

हल्ली सकाळ किलबिलाटानंच होते. मीही खिडकी उघडून बघते छान ऊन पडलेलं असतं. निरनिराळे पक्षी बागडत असतात. त्यात एखादा मॅग्पाय बघितला की उगाचच ती टरफलं आठवतात.

ना नात्याची ना गोत्याची, पण ही अपूर्ण गोष्ट मात्र कधीच पूर्ण होणार नाही.

Thursday, October 1, 2009

सीमोल्लंघन

परवा दसरा झाला. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ह्याचं महत्त्व. हा साडेतीन मुहूर्त हा काय प्रकार आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे वगैरे मला अजूनही माहीत नाही. पण दसऱ्याला बरीच लग्न दर वर्षी लागत असतात हा मुख्य मुद्दा. लग्नानंतरचा पहिला दसरा. लग्नानंतरचे पहिल्या वर्षीचे जे काही सण आहेत ते सगळे आमचे इथेच व्हायचेत. म्हणजे थोडक्यात जी काही पहिल्या सणाची मजा असते ती हुकलेय.

माझ्या घरी म्हणजे माहेरीपण दसऱ्याचं काही वेगळं महत्त्व नव्हतंच. घरच्या घरी साधी पूजा, दुपारी पणशीकरांचे श्रीखंड, मग मस्त झोप आणि संध्याकाळचा घरीच करायचा टाइम पास. ह्यात गप्पा, गाणी ते नुसतंच बसून राहणं सगळं सगळं आलेलं. जग कसं बदलतं. मी आणि माझा भाऊ आणि आई बाबा असं आमचं चौरस घर. प्रत्येकाचा कोपरा वेगळा, पण दुसऱ्यांच्या कोपऱ्यांकडे बघत उभा असलेला. प्रत्येकाचं महत्त्व तेच नेमकं, नव्वद अंशाचं आणि त्यावर घराचा तोल बरोबर सांभाळलेला. चौरसाचा त्रिकोण आणि त्रिकोणाची सरळ रेषा कधी झाली हे कुणालाच समजलं नाही. असेच काहीसे डिप्रेसिंग विचार येत राहिले.

तसं काम होतंच, त्यामुळे दिवस कसा गेला कळलं नाही. पण नेमकं नवऱ्याला कामानिमित्त बाहेरगावी जायला लागलेलं. एवढ्या मोठ्या घरात एकटी मी. बरं इथल्या घरांची गंमत आहे. लाकडी असल्याने मधून मधून करकरल्याचे आवाज येतात. आणि ते आवाज मोजत मोजतंच माझी रात्र जाते. झोपायचं राहूनंच जातं. कधी एखादा पोसम छपरावर येऊन आपलं नृत्यकौशल्य दाखवतो तर कधी घोंघावणारा वारा माझी झोप उडवतो. खूपच बोर झालं. मग सरळ फोन उचलला आणि आजीला फोन लावला.

भारतातही खूप असं कंटाळवाणं वाटलं की मी सरळ आजीकडे जायचे. आजी म्हणजे आईची आई. तिच्या घरी दुपारच्या सुमाराला जायचं आणि तिला चहा करायला सांगून मस्त चहा पिता पिता गप्पा ठोकायच्या असं कित्येक वेळा केलंय. अगदी परीक्षेच्या दिवसात तर खासंच. कारण दुपारी इतकी झोप यायची की स्कूटी काढून थेट आजीकडे.

फोन केला बराच वेळ गप्पा मारल्या. तिला म्हटलं असं सणाच्या वेळी खूप कंटाळा येतो वगैरे वगैरे. तर म्हणे कशी, तुझ्या आजोबांची नात शोभतेस. ते आणि आजी त्यांच्या कोंकणातल्या गावातून इकडे आले. आजोबांना सतत आठवण यायची गावाची, घराची, थोडीशी शेती होती त्याची. आंब्यांची, फणसांची, नारळी, फोफळीच्या झाडांची. आंब्यांना तर त्यांनी नावं दिली होती एकेक. नावानेच बोलायचे आंब्यांबद्दल. इतका जिव्हाळा होता आणि एकदम सगळं सोडून मुंबईला आले. म्हणाली तुमचं तरी दुसरं काय आहे. कोंकणातून त्या काळी मुंबईला येणं म्हणजे आजच्या काळी परदेशी जाण्यासारखंच होतं. त्यांनी तेव्हा सीमोल्लंघन केलं, तुम्ही आता केलं.

हो म्हणाले. पण एक विचित्र विचार घुमत राहिला डोक्यात. माणसं सीमोल्लंघन का करतात? दसरा आहे म्हणून? नसलेलं काही मिळविण्यासाठी? काही सिद्ध करण्यासाठी? पूर्वीच्या काळी राजे रजवाड्यांनी हेच केलं. आम्हीही आता हेच करतोय. पण का? कशासाठी? असे प्रश्न त्यांनी आणि आम्ही विचारलेत का? कधी वाटतं आपण उगीच हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो. कधी वाटतं, प्रवाही असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नक्की काय बरोबर? काय चूक? आमच्या कक्षांच्या सीमा ओलांडून साजरा केलेला दसरा अधिक चांगला की घरच्यांसोबत पणशीकरांचं श्रीखंड खाऊन साजरा केलेला अधिक चांगला? असले बेसिक पण उत्तर न देता येणारे प्रश्न पडतात. तेव्हाही तसंच झालं.

बराच वेळ अशी वैचारिक लंगडी घातल्यावर एकदाची झोप लागली. पण झोप लागते न लागते तोच मोबाईल खणखणला. त्रासानेच उचलला, पण बरं झालं उचलला, भावाचा होता. मग झोप विसरून खूप वेळ गप्पा मारल्या. त्याला म्हटलं काय रे दसरा कसा साजरा केलास? म्हणाला ताई, चिल. दसराच साजरा करायचा असता तर भारतातच राहिलो नसतो का? म्हणाला व्हेन इन रोम लिव्ह लाइक रोमन, नॉट लाइक सोमण. म्हटलं हुश्शार आहेस तू.

पण मला पटलं त्याचं थोडंसं. हे हॅविंग केक आणि इटिंग इट टू सारखं झालं. विच इज ऍन ऍबस्युल्युट इंपॉसिबिलिटी.

सीमा न ओलांडता सीमोल्लंघन करता येत नाही हेच खरं.

मग एकदम शांत झोप लागली.