Tuesday, April 19, 2011

देवयानी (5)

बऱ्याच वेळा मी एकटीच विचार करीत बसते की मी नोकरी का करते? नोकरी म्हणण्यापेक्षा काम का करते? मराठे काकांकडे काम सुरू केलं तेव्हा नक्की माहीत होतं, की नोकरी करायची कारण पैसे मिळवायचे आणि घरापासून जितकं शक्य होईल तितकं दूर राहायचं. पण तिथे काम करायला लागले आणि अचानक पैसा गौण वाटायला लागला. इतका की मला किती पगार मिळतो, मिळतो की नाही, मी जे काम करते त्याला बाहेर किती पगार मिळेल, असले प्रश्न माझ्या मनात चुकूनही आले नाहीत. येऊ नयेत असं नाही, पण माणसाच्या मानसिकतेत कसा बदल होतो बघा. कॉल सेंटरमध्ये ह्या मानाने खूपंच पैसा होता. पण किक नव्हती. इथे पैसा नव्हता पण किक होती.

काहीतरी नवं निर्माण करणं ह्यात जे समाधान आहे ना, किंवा किक आहे ना, ती कशातही नाही. खाज आल्यावर खाजवल्याने, किंवा पगार मिळाल्यावर किंवा प्रमोशन मिळाल्यावर जो आनंद मिळतो तसा हा आनंद नहीये. मराठे काकांबरोबर काम करताना मला तो आनंद मिळाला. आम्ही दोघंच होतो, कंपनी विकली तेव्हा दीडशे लोकं कामाला होती. बांद्रा कुर्ला कॉंप्लेक्समध्ये बऱ्यापैकी मोठं ऑफिस होतं, आणि गंमत म्हणजे तिथं मला सिनियर असा एकंच माणूस होता, तो म्हणजे मराठे काका. आणखी एक धडा मिळाला. कुठल्याही कल्पनेला, संस्थेला छोटं समजू नको. जे छोटं आहे ते आपल्या कष्टानं मोठं कर म्हणजे तूही त्या कल्पनेबरोबर मोठी होशील. मीही आमच्या कंपनीबरोबर मोठी झाले.

बाहेरच्या देशातून काम भारतात घेऊन यायचं आणि स्वस्तात करून द्यायचं हा सोपा हिशेब होता. जुने काँटॅक्टस होते, नाही असं नाही, पण मोठ्या प्रमाणावर काम करायचं तर पैसा उभा करणं अत्यावश्यक होतं. काका त्याच कामात लागलेले होते. मोठमोठ्या इन्व्हेस्टर्सना भेटणं, त्यांना कंपनीचे प्रॉस्पेक्टस समजावून सांगणं हे सगळं काका करायचे. आणि त्यांना प्रेसेंटेशन्स बनवून देण्याचं काम माझं. सुरवातीला मी ते सांगतील तसं फक्त प्रेसेंटेशन बनवायचे. हळू हळू मग मला काही सुचलेले मुद्दे मी त्यांना सांगायला लागले. मी काही अनुभवी नव्हते त्यामुळे बरेचसे माझे प्रश्न, सजेशन्स टाकाऊच असायच्या, पण तरीही काकांनी कधीही त्यांना कमी लेखलं नाही.

प्रत्येक वेळी मला ते म्हणायचे, तुला वाटतं ते तू बोलत जा. we are a team मग माझीही भीड चेपत गेली. माझं कॉंट्रिब्युशन किती होतं हा मुद्दा त्यांना महत्त्वाचा नव्हताच, मला कॉंट्रिब्युट करावसं वाटणं, तितका अत्मविश्वास आणि मोकळेपणा वाटणं हे त्यांना महत्त्वाचं होतं. हे सगळं ना माझ्या डोक्यातल्या कंसेप्टसना शिरशासन घालायला लावणारं होतं. Boss is as good as their team and team is as bad as their boss. हे मी तिथे शिकले. खरंच महत्त्वाचं आहे हे. आज कॉर्पोरेट जगात वावरताना वारंवार खटकतं. बॉस हा टीमचा मालक नव्हे, नेता असायला हवा, हे कुठेतरी, सगळ्या मॅनेजमेंट शाळांमध्ये शिकवून सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही.

हळू हळू पैसा आत येत होता. पैसा आत येत होता तसं नेटवर्कही मोठं होत होतं. एकदा अमेरिकेहून काही लोकं मिटींगला येणार होती. अर्थात त्यांना आमचं ऑफिस बघायचं होतं. पण आमची अवस्था कोंबडी आधी की अंडं आधी अशी झालेली. काम नाही म्हणून मोठं ऑफिस नाही आणि मोठं ऑफिस नाही तर काम मिळणार नव्हतं. शेवटी हो नाही करून, आमच्या एका इन्व्हेस्टरच्या, वीस पंचवीस माणसं असलेल्या ऑफिसच्या बाहेर आमच्या नावाचा बोर्ड लावला. मला खरंतर हे पटत नव्हतं, पण शेवटी धंदा म्हटला की अशा काही गोष्टी करायला लागतातंच. मी नेहमीप्रमाणे प्रेसेंटेशन बनवत होते. दोन दिवस अवकाश होता आणि काकांनी बाँब टाकला.

ते म्हणाले मी प्रेसेंटेशन करायचं. मला हा धक्काच होता. पण मनातून छानही वाटत होतं. ताबडतोब हातावर पैसे ठेवले आणि म्हणाले जा वेश पालटून ये. गोऱ्या पाहुण्यांसमोर त्यांचाच ड्रेस हवा ना? मला काय वाटलं कोण जाणे, पण मी त्यांना म्हटलं की आपण सगळ्या प्रेसेंटेशनला थोडा कल्चरल टच देऊया. थोडे रंग, थोडं म्युसिक, थोडी चव आणि बराच भारतीयपणा. आपण त्यांच्यासारखेच आहोत असं दाखवण्यापेक्षा, आम्ही तुमच्यासारखे आहोतंच, आम्हाला तुमची भाषा येतेच, तुमची वागण्याची पद्धत येतेच पण त्याबरोबर आम्ही आमच्याही काही गोष्टी घेऊन येतो, तुमचं चांगलं आणि त्यात भरीस आमचं चांगलं असं मिळून आपण पुढे जाऊया. ती काकांना आवडली. मी पंजाबी ड्रेस घालून प्रेसेंटेशन केलं. कॉल सेंटरमध्ये कमावलेला अमेरिकन ऍक्सेंट होताच. all in all it was a hit. आम्हाला आमचा पहिला क्लायंट मिळाला आणि सोबत भरपूर इन्व्हेस्टमेंट सुद्धा.

मला इंग्लिश चांगलं बोलता येतं आणि म्हणून काकांनी ते महत्त्वाचं प्रेसेंटेशन मला करायला दिलं. बॉसला सगळं काही आलं पाहिजे असं मुळीच नाही. चांगला बॉस कोणता? रादर चांगला बिझनेसमन कोणता? ज्या व्यक्तीला आपल्याला चांगलं काय करता येत नाही हे माहीत असतं आणि ते करण्यासाठी तो योग्य लोकांची निवड करतो तो. काकांना मी हे करू शकीन असं का वाटलं हे ना मी त्यांना विचारलं ना त्यांनी मला सांगितलं. पण जे झालं ते सही झालं. मुळात सेकंड इयर बी एस सी ला माझा जो आत्मविश्वास बुडाला होता ना, तो कुठेतरी मला परत मिळाला.

आणि हो मला पगारात पहिली राइजही मिळाली.

- देवयानी (5)

Saturday, April 16, 2011

देवयानी (4)

हं, तर डॉट कॉम बबल बर्स्ट झाला आणि माझी नोकरी गेली. प्रत्येक लाइफस्टाइलची सवय व्हायला वेळ लागते. सतत घरी बसून राहणं, काही काम धंदा नसणं आणि घरातल्यांची बोलणी खाणं ह्याची सवय व्हायला काही वेळ गेला. पण मग झाली सवय. आधी मी भांडण वगैरे करायचे. मग लक्षात आलं, जोपर्यंत घरी हात पसरावे लागत नाहीत तोपर्यंत आवाज वर करून बोललेलं चालतं. एकदा का पैसे मागायची वेळ आली की मग आवाज आणि मान खाली घालूनच राहावं लागतं. महत्त्वाचा धडा आहे बरं का हा.

कधी कधी मलाच कसंतरी वाटायचं की माझं आणि माझ्या आईवडलांचं नातं किती खोटं आहे, कृत्रिम आहे. मी घरी राहते कारण मला दुसरीकडे कुठेच जाता येत नाही. जाता येणार नाही असं नाही, पण सगळ्या गोष्टी फिरून पुन्हा पैशापाशीच येतात ना? जसं तुरुंगात फुकट बाळंतपणं होतात म्हणून गरीब बायका गरोदर राहिल्यावर फुटकळ गुन्हे करून अटक करून घेतात, तसंच कितीही नाही आवडलं, तरी एक हक्कचं चलनी नातं माझ्याकडे होतं. मुलगी असल्याचं, आणि मी कितीही नाही आवडले तरी मला वाऱ्यावर सोडणं त्यांनाही शक्य नव्हतं. मी म्हटलं तशी, काही दिवसांनी, मला काहीही न करण्याची आणि त्यांना मला पोसण्याची सवय व्हायला लागलेली होती.

अगदी उशीरापर्यंत झोपावं, ब्रेकफास्टला आईच्या बोलण्यासोबत काही बाही खावं. कितीही ओरडली माझ्या नावानं तरी माझं जेवण ती बनवणारंच होती, ते दुपारी कधीतरी कंटाळा आला की जेवायचं, रात्री बाबांबरोबर पीन ड्रॉप सायलेन्समध्ये अजून एक जेवण. नशिबाने वडिलांनी लहानपणीच जिमखान्याची लाइफ मेंबरशिप घेऊन टाकलेली. आजी गेल्यावर. आजी माझी मेंबर होती, तिची मेंबरशीप माझ्या वाट्याला आली. तिथं संध्याकाळी जायला लागले. थोडा का होईना वेळ बरा जायचा, वर जरा हवापालट.

आणि तिथेच पुन्हा लक माझ्या कोर्टात पडलं. तिथे माझी शशिकांत मराठे ह्यांच्याबरोबर ओळख झाली. ते अजुनही जिमखान्यावर येतात, एखाद रविवार अजूनही त्यांची भेट हटकून होते. मराठे काकाही तेव्हा माझ्यासारखेच बेकार होते. पण त्यांची स्टोरी माझ्यापेक्षा वेगळी आहे. त्यांची नोकरी बिकरी काही गेली नव्हती. मुळात ते नोकरी करीतंच नव्हते. दर पाचेक वर्षांनी नवा धंदा सुरू करणे हाच त्यांचा धंदा आहे. नवा बिझनेस सुरू करायचा, वाढवायचा आणि एका स्टेजला तो पोचला की विकून टाकायचा. त्या सुमाराला ते नव्या बिझनेसची जुळणी करत होते.

रोज बघून बघून ओळख झाली. एकमेकांकडे बघून हसणं आणि मग कधी बोलणं. एकदा म्हणाले चल कॉफी प्यायला. शेवटचं कुठल्याही कॅफेमध्ये जाऊनही काळ लोटला होता, मी त्यांचं आमंत्रण आनंदाने स्वीकारलं. बोलता बोलता मी काहीच करत नाही आणि ते बरच काही करतात हे एकमेकांच्या लक्षात आलं. असाच महिनाभर गेला असेल, आणि एक दिवस ते मला म्हणाले मी तुला नोकरी देतो, करणार का? मी कसली नोकरी, काय नोकरी काहीही नं विचारता ताबडतोब हो म्हटलं.

अडीच हजार रुपये पगार होता. रिसेप्शनिस्ट कम सेक्रेटरी कम ऑफिस अटेंडंट, कम झाडूवाली, कम एव्हरीथिंग. अक्षरशः त्या ऑफिसात मी झाडूही मारला आहे. अगदी छोटंसं ऑफिस होतं. टोकाला काकांचं केबीन होतं, बाहेर माझी खुर्ची आणि टेबल आणि टेबलासमोर दोन खुर्च्या. आलेल्या व्हिजिटर्सना बसायला. पण जनरली कुणीच ऑफिसात येत नसे. काकाच बाहेर जात मिटिंगांसाठी. ऑफिसचं सगळं मी बघायचं. काकांचं चेकबुक सही केलेल्या कोऱ्या चेक्ससहित आणि कॅश माझ्याकडे असे. पण कधीही त्यातले दोन पैसे लाटावेत असं नाही वाटलं. मी ज्या विचित्र परिस्थितीत तेव्हा होते, सहा महिन्यापूर्वीचं माझं आयुष्य आणि आताची ही नोकरी ह्यात जमीन आसमानाचा फरक होता. जबाबदारीचा. जबाबदारी अंगावर पडली आणि मी तिच्यात गुरफटून गेले. गुरफटून का? बहुतेक मी तिच्या आणि ती माझ्या प्रेमातंच पडलो म्हणा ना, इतके की त्यांनंतर आम्ही एकमेकींची साथ बिलकुल सोडली नाही.

कुणी म्हटलंय आठवत नाही, पण selecting right boss is very important for your career. बरेचसे लोकं, अगदी मीही कधी असा विचार केला नव्हता. आपण काम, पैसे, ऑफिसची जागा, शहर, ह्या सगळ्यांची गणितं मांडत असतो, पण आपण कुणासाठी काम करणार आहोत, ह्याचा विचार फार लोकं करत नाहीत. काकांकडून ही एक गोष्ट मी शिकले. you need someone to champion you to the world. काका championed me to the world.

तो सगळाच प्रवास मोठा इंटरेस्टिंग आहे. कुठेतरी कधीतरी कसलंतरी चांगलं काम मी केलं असेल, की ज्यामुळे माझं जग पालटून गेलं. नुकतंच बावीस लागलं असेल तेव्हा, त्यामुळे डोक्यावर कसलीच चिंता नव्हती. घरापासून आठ तास दूर राहता यावं आणि त्याचे महिन्याला अडीच हजार मिळावे ह्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नव्हती. कसलाही विचार न करता मी एक पाऊल टाकलं. ज्या वेळी ते पाऊल टाकलं ती वेळ खरच चांगल्या मुहुर्ताची असावी, कारण अजाणतेपणे घेतलेला हा निर्णय माझ्या आतापर्यंतच्या प्रोफेशनल लाइफ मधला सर्वोत्तम होता.


- देवयानी (4)

Friday, April 15, 2011

देवयानी (3)

काही लोकं मला वर्कोहोलिक म्हणतात. पण मला स्वतःला तसं अजिबात वाटत नाही. सकाळी चारला ऑफिसला पोचणे हा कुणाचा छंद कसाकाय असू शकतो? तसा तो माझाही नाही. पण बऱ्याचदा काय होतं, की आवडत नसूनही गोष्टी करायला लागतात. तोंडल्याची भाजी खाणे, जवळ जवळ रोज कितीही आळस आला तरी जिमखान्यावर जाऊन येणे तसंच सकाळी उठून ऑफिसला जाणे. पण माझ्या कामाच्या वेळांमुळे मी भलतीच करिअर ओरिएंटेड वगैरे वगैरे असल्याचा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे.

आणि बरं फारंच थोडे लोकं दहावी झाल्यानंतर त्यांना काय व्हायचंय असं विचारल्यावर जे उत्तर देतात, तेच होतात. दहावी झाल्यावर मला काय व्हायचं होतं? सायंटिस्ट हे माझ्या लिस्टवरचं हॉट फेवरिट होतं. मी अगदी यंग सायंटीस्ट च्या परीक्षा वगैरे दिलेल्या होत्या. कुणाला माहीत असेल तर BCTS, MCTS आणि मग सर्वात शेवटी NCTS अशा चढत्या भाजणीने परीक्षासुद्धा दिल्या होत्या. सगळं एकदम फिट्ट होतं. बी. एस्सी, एमेस, पीएचडी. एकदम लाइनीत शिस्तीने होणार होतं.

पण.

हा पण बघा सगळं आपलं प्लॅनिंग बिघडवून टाकतो. कॉलेजात गेले आणि गाडी रुळावरून घसरली. इतकी की सेकंड इयरला पुन्हा बसायची वेळ आली. कॉलेज हा कदाचित एका दुसऱ्या लेखाचा विषय होईल. कारण इतकी अपरिमित धमाल, आनंद आणि इतकं अपरिमित दुःख सहा वर्षाच्या माझ्या कॉलेज लाइफमध्ये मी अनुभवलं. की असं दहा शब्दात ते लिहिणं कठीण आहे. मी आज जशी आहे, बरी, वाईट त्यात त्या सहा वर्षांचा खूप मोठा वाटा आहे. फक्त पंजाबी ड्रेस ते थाय बेअरिंग ड्रेस इतका पल्ला मी या सहा वर्षात गाठला.

पण त्यामुळे झालं काय, की हवे तितके मार्क ग्रॅज्युएशनला पडले नाहीत. अर्थात फिकीर कुणाला होती? मला फक्त एकंच दिसत होतं की ह्या शिक्षणाच्या कटकटीतून सुटका. आईबापाकडे लाचारासारखं पैसे मागणं, मग गेल्या वेळी त्यांनी दिलेल्या पैशाचा त्यांनी हिशेब मागणं आणि मग सहाजिकच ग्रूपमधल्या इतरांपेक्षा आपण गरीबच आहोत असा गंड. मग घरच्यांवर रागावणं, भांडणं हे सगळं लागून आलं. बरं बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही ना? आणि सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं नाही आणता येत. मग मित्रमैत्रिणींसमोर थोडासा अपमान. ह्या सगळ्यातून सुटायचं होतं. आणि त्यासाठी एकंच मार्ग होता.

नोकरी.

कॉलेल्जातले बरेचसे मित्र हायसो होते, त्यामुळे नोकरी मिळवणं तितकंसं कठीण नव्हतं. त्या सुमाराला जरा बरं इंग्रजी बोलणाऱ्या मुला मुलींना कॉल सेंटरमध्ये सहज नोकरी मिळत असे, मलाही मिळाली. मोजून दहा हजार रुपये खणखणून वाजवून पहिला पगार घेतला. माझ्या बाबांना पंचवीस वर्ष लागली तिथं पोचायला तिथं मी एका फटक्यात पोचले. शिक्षण बिक्षण सगळं झूट आहे. पैसा हे फक्त सत्य आहे असं वाटायला लागलं.

हातात पैसा आल्यावर खर्च वाढले, हॉटेलिंग वाढलं, पब्स सुरू झाले. नोकरीच्या पहिल्या सहा महिन्यातंच दहा हजारही कमी पडायला लागले. पुन्हा चिडचिड, पुन्हा त्रास. खर्चाची बघा एक गंमत असते. जोपर्यंत आपण तो करत नाही तोपर्यंत तो आपल्या ताब्यात असतो, एकदा आपण तो खर्च केला की मग आपण त्याच्या ताब्यात जातो. जी ऐश वाटायची, ती गरज वाटायला लागते. बरं खर्च करायचं व्यसन हे एक व्यसन आहे, बाकीही प्रलोभनं आहेतंच की. दारू आहे, चरस आहे, अगदीच पैसे खुळखुळत असतील तर कोकेनदेखील आहे.

पण माझं नशीब चांगलं होतं. होतं नाही अजूनही आहे म्हणून डॉट कॉम बबल बर्स्ट झाला. टू थाउजंड ते टू थाउजंड टू. आमचं कॉल सेंटर पूर्णपणे अमेरिकन टेलेकॉम कंपन्यावर टेकलेलं होतं. ते पडले तसे टेकून पडलेले आम्हीही पडलो. धडाधड नोकऱ्या गेल्या. सहा महिने घरी बसायची वेळ आली. काम नाही, काम नाही म्हणून पैसे नाहीत. बरं मित्रांकडे मागावेत तर त्यांचीही परिस्थिती माझ्यासारखीच. त्यामुळे बाहेर जाणं बंद झालं. घरी स्वतःला डांबून घेतलं. आई घरीच असते माझी. रात्रंदिवस तिचं तोंड बघायचं, तिची बोलणी ऐकायची, बाबांनी बोलणं कधीच टाकलं होतं.

टाइम सॉल्व्हज मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स, पण ते मग कधीतरी...

- देवयानी (3)

Saturday, April 9, 2011

देवयानी (2)

कॅफे कॉफी डे मध्ये येऊन काहीतरी करत बसण्याची माझी ही पहिलीच वेळ नाही. इथे येऊन कित्येक वेळा मी वाट्टेल ती कामं केली आहेत. ठिकाणंच असं मस्त आहे. समोर खाडीचा शार समुद्र आहे, त्याच्या अलीकडे मॅंग्रोव्हज. डाव्या बाजूला लांबवर भंगारात काढलेले ट्रॉलर्स रस्टिक फील आणतायत. माझी ही कितवी कॉफी? ठाऊक नाही. असं लिहिण्याची पद्धत आहे, पण माझी पहिलीच आहे. दुसरी कॉफी सीसीडीतली तरी मी पिऊ शकत नाही. पण ही जागाच जबरदस्त आहे. दोन रस्त्यांची टोकं बरोब्बर इथे येऊन मिळतात आणि आपण असे कोपऱ्यावरून बाहेरचं दृश्य बघत बसतो. सही.

हं तर मी लिहितं होते इथे येऊन वाट्टेल ती कामं करण्याबद्दल. अगदी अगदी. ऑफिसातली प्रेसेंटेशन्स असूदेत किंवा मिड लाईफ क्रायसिसवर, जी माझ्या आयुष्यात यायची असावी पण आधीच आल्यासारखी वाटते, त्यावर प्रीतमबरोबर केलेली डिसकशन्स, (प्रीतम हे नाव अगदीच बुळचट वाटतं ना? हं, त्याचं खरं नावही असंच बुळचट आहे. आय ऍम रिअली सॉरी इफ युअर नेम इज प्रीतम) किंवा श्रेयाबरोबर पाहिलेले इथले अगणित सूर्योदय, किंवा अगदी इंटरनेट मित्रांबरोबर केलेलं गॉसिप, किंवा आपण मुंबईत आहोत हे विसरण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा पुन्हा येणं.

माझ्या ऑफिसपासून ही जागा फारशी लांब नाही. चालत म्हटलं तर पंधरा मिनिटं असतील बहुतेक. पण चालत आलंयच कोण? ऑफिसातल्या असंख्य बॉसेसच्या असंख्य गाड्या काय फक्त ड्रायव्हरांना दिवसभर झोपण्यासाठी असतात की काय? त्यातल्या डझनभर ड्रायव्हरांचे फोन माझ्याकडे असतात. अशा प्रसंगी उपयोगाला येतात. डुअर टू डुअर लिफ्ट मिळते. येता जाता त्यांच्याशी दोन शब्द बोललं की झालं. माहीतच असेल की आज दादांना (ड्रायव्हारांसाठीचा खास शब्द. अगदीच म्हातारा ड्रायव्हर असेल तर मामा) बोलवायचं आहे, तर थोडं लाडात येऊन हसायचं. झालं की काम. तशी मी फार स्वार्थी बाई आहे. पण हसू इथे तिथे उगाचच सांडत बसण्याची भलतीच वाईट खोड मला आहे. अशी कधी कधी ती उपयोगाला येते.

आणि ड्रायव्हर, टॅक्सी ह्यांचा माझ्या आयुष्याशी एकदम घनघोर संबंध आहे. नाही नाही, माझ्या वडिलांनी टॅक्सी चालवून माझं शिक्षण बिक्षण नाही केलं. ना मी कुणा टॅक्सीवाल्याच्या प्रेमात बिमात पडले. पण तरीही घनघोर संबंध असायचं कारण म्हणजे माझी नोकरी. मी एका बीपीओमध्ये काम करते.

असं मी कुणाला म्हटलं, की अर्धा क्षणही न दवडता लोकं मला विचारतात, अच्छा, म्हणजे कॉल सेंटरमध्ये काम करतेस वाट्टं? आणि वेगवेगळी लोकं हाच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारतात बरं का. तरुण मुलगा असेल, तीशीपर्यंतचा, तर समोरचं काम सोपं आहे असा लुक. तीशीनंतरचा लग्न बिग्न झालेला बाप्या असेल आणि बायको नसेल सोबत, तर आपण कॉलसेंटरमधल्या मुलींबद्दल ऐकतो ते सगळं खरं असेल का? असा लुक. बायको असेल सोबत तर जनरली नवरे हा प्रश्न विचारतच नाहीत आणि लग्न झालेली बाई असेल तर कॉल सेंटर हे कॉल सेंटर नसून कॉल गर्ल सेंटर असल्यासारखा लुक देऊन हा प्रश्न विचारते.

पण मी सांगत वेगळंच होते. ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र माझं नकारार्थी आहे. मी कॉल सेंटरमध्ये नाही काम करत, पण त्याचाच एक नॉन ग्लॅमरस भाऊ किंवा बहीण आहे, त्यात काम करते. पण तरीही माझं काम, क्लायंटांच्या तालावर नाचतं (नाही नाही डान्सबार सुद्धा नाही) आणि कामाची वेळसुद्धा. सकाळी चारला काम सुरू करायचं म्हणजे टॅक्सीवाल्यांशी, ड्रायव्हरांशी घनघोर संबंध येणारंच ना. रोज सक्काळी मी कुणाचं तोंड पहिलं पाहत असेल तर तो ड्रायव्हर. बहुदा पहिलं मी माझंच तोंड पाहत असेन, पण अर्ध्या झोपेत असल्याने ते रजिस्टर होत नसावं. पण आमच्या बिल्डिंगच्या लाकडी जिन्यावर चपलांचे होणारे आवाज, लोकांना न उठवण्याइतपतच ठेवण्याच्या प्रयत्नात माझी झोप उडते आणि मग मी ज्या व्यक्तीला पाहते तो म्हणजे माझा सकाळचा ड्रायव्हर. आणि त्याची पेंगुळलेली अवस्था पाहून, तो मला नीट ऑफिसपर्यंत सोडेल ना? ह्या विचाराने माझी आणखीनंच झोप उडते.

असो. मी सांगत होते काय आणि सांगत बसले काय. माझं हे असं पिठाच्या गिरणीसारखं असतं. पट्टा चालू. गव्हाचं पीठ का तांदळाचं हा विचार नाही. गिरणी चालू राहणं महत्त्वाचं. तसं माझं होतं. पहिल्या पोस्टात माझा दिनक्रम वगैरे लिहिणार होते, पण कॉफीही संपलेय आणि डोळ्यावर झोपही यायला लागलेय, तेव्हा इथेच थांबलेलं बरं.

पुढच्या पोस्टापासून खरी सुरवात, पहिला डाव भुताचा किंवा देवाचा. ह्या काँट्रोव्हर्सीबद्धल पुन्हा लिहीन कधीतरी

buttermilk - english शब्द roman मध्ये न लिहिता देवनागरीत लिहिले तर वाचायला सोपे जातात हे सुचवल्याबद्दल thank you.

- देवयानी (2)

Wednesday, April 6, 2011

Hi

नमस्कार, संवादिनीचा गेला post वाचला. first reaction होती की makes no sense. पण जरा विचार केला आणि मलाच ही कल्पना आवडली. एखादा कट्टा किंवा चावडी असावी, तसा हा blog. मनात असाही विचार आला की तिच्या ब्लॉगवरून कशाला लिहा, आपलाच नवा ब्लॉग काढला तर? पण जर कुणी ready viewership देत असेल तर ती का नाकारा?

माझा स्वतःचा blog आहे आणि मी लिहिलेलं वाचणारे लोकंही आहेत. पण जे तिथे लिहिता येत नाही ते, अगदी मनातलं, खोलवरंचं, खुपणारं (खुपते तिथे गुप्ते मध्ये मला कधी बोलावणार? ) ते लिहावं म्हणून इथल्या शाळेत admission घेतली. संवादिनीने (मला माहीत आहे तुझं नाव शमा आहे किंवा सुषमा आहे, पण तुला संवादिनी सोडून दुसरं काहीच म्हणावंसं वाटत नाही. खरंच!) परवानगी दिली आणि here I am.

pen name आहे देवयानी. देवयानी का? मी शाळेत असताना ययाती वाचलं. तेव्हा वाचलेली देवयानी अगदी ठसलीच मनावर. मुलं म्हणतात ना हल्ली, मुली जाम attitude दाखवतात. ते attitude मला देवयानीत कुठेतरी दिसलं. तेव्हा पक्कं वाटायचं, शर्मिष्ठा चांगली, सभ्य, marriage material. पण आपल्याला बा देवयानीसारखं व्हायचं. चुका करायच्या, पण मनस्वी करायच्या.

तसं काही झालं नाही. खरं तसं शर्मिष्ठा किंवा देवयानी किंवा यती किंवा ययातीही खऱ्या आयुष्यात होणं कठीणच आहे. फार फार तर कच होणं त्यातल्या त्यात सोपं. पण blog वर काहीही होणं एकदमच सोप्पं आहे. म्हणून हे नाव घेतलं. ह्या नावात एक romanticism आहे. कचासाठी बापाशी भांडणारी, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याने विश्वासघात केल्यावर चक्क त्याला विसरून ययातीच्या प्रेमात पडणारी देवयानी अद्भुतच नाही का?

आता ययाती तसं पुसटसंच आठवतं. पुन्हा वाचायचा प्रयत्न केला तर शब्द लागत नाहीत. खोटं कशाला सांगा, मी पुन्हा वाचायचा प्रयत्नच केला नाही. काळ बदलतो तसे आपणही बदलतो. तशी मीही बदलले. स्वतःला आरशात पाहिल्यावर, डोळ्याला चस्मा लावू adolescent वयात ययाती वाचणारी, दोन वेण्या घालणारी, पुस्तकातला शब्दन शब्द घासून घासून पाठ करणारी, वेडी गबाळी मी होते ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. कुठेतरी हा प्रवास romantic होता. (बरोबर मराठी शब्द आठवत नाही, पण ह्या romantic चा प्रेमाशी काहीही संबंध नाही. काव्यमय चालेल का? कवित्व वरून? ) खडतर आहे. फार काही special नाहीये, पण माझ्यासाठी super duper आहे. अर्थात अर्धवट आहे, पुढचा रस्ता invisible आहे. मागे जाणं अशक्य आहे. एकंदरीत सगळं confusing आहे.

त्या सर्वाची संगती लावायचा हा एक वायफळ प्रयत्न.

- देवयानी (1)

Tuesday, February 22, 2011

फ्लॉप आयडिआ - ब्लॉग चालवायला देणे आहे

ब्लॉग चालवायला देणे आहे

माझ्या ब्लॉगला आलाय माझा कंटाळा. पूर्वी नियमित लिहायचे. आता नियमितपणे लिहिणं ही कल्पनातीत गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा न हालवलेला निर्विकार चेहरा पाहायची वेळ आली की फार वाईट वाटतं. काल असंच बिचाऱ्या ब्लॉगकडे पाहत असताना ही कल्पना सुचली. अर्थात ती किती वास्तव किंवा अवास्तव आहे हे हा पोस्ट टाकल्यावरच कळेल.

कुणाला वाटत असेल की संवादिनीच्या मार्फत संवाद साधावा तर जरूर samvaadini@gmail.com वर मेल पाठवा.

अटी दोनच

१) फक्त स्त्रियांसाठी
२) सांगण्याची गोष्ट असावी.

बस.

अर्थात कुणी म्हणेल की आम्ही स्वतःचा ब्लॉगच काढू. ते खरंच आहे. पण तरीही मनात आलं, ब्लॉगवर टाकलं. काहीच नाही झालं पुढचे काही दिवस तर समजा, फ्लॉप आयडिआ.

Thursday, January 27, 2011

कल्याण

सध्या आमच्याकडे प्रचंड धामधुमीचे दिवस आहेत. सईकडे पाहता पाहता अगदी नाकी नऊ येतात. रात्रीची झोप दुरापास्त नाही म्हणता येणार, पण तुटक झालेली आहे. त्यात कुंभकर्णाशीच लग्न केलंय असा भास व्हावा अशी परिस्थिती असल्याने, इकडनं किंवा तिकडनं काही मदत होण्याची शक्यता नाहीच. आणि आमची गंमत वेगळी आहे. सईला झोपवून मला स्वतःला झोप येईपर्यंत पुन्हा तिची जागं होण्याची वेळ झालेली असते. झोप येईपर्यंत रात्र रात्र करायचं काय हा प्रश्न असतो.

परत सई का रडते हा एक मोठा परिसंवादाचा विषय जेव्हा जेव्हा ती रडते तेव्हा होतो. आईला, बाबाला, मला आणि कुंभकर्णाच्या मावस भावाला सर्वांनाच तिच्या रडण्याचं कारण वेगवेगळं आहे असं वाटतं. मग कारणमीमांसेतच बराचसा वेळ निघून जातो. मग तिचं रडं थांबवण्याच्या कॢप्त्या शोधून काढायचं काम जोरात चाललंय.

गुगलबाबा आहेतच. कुणी सांगितलं हेअरड्रायरचा आवाज लहान मुलांना झोपायला मदत करतो कारण त्यांना म्हणे पोटात असताना तसाच आवाज येतो. बाबा मला गाणं म्हणायला सांगतो. उगाचच. माझा रियाज इतका झालेला नाहीये की माझ्या गाण्याने ती झोपण्याऐवजी अजून जागी होऊन रडायला लागण्याची शक्यता आहे. तिच्या बापाने, म्हणजेच कुंभकर्णाच्या मावस भावाने चक्क आयफोन ऍप्लिकेशन शोधून काढलं तिला झोपवण्यासाठी. त्यातून हृदयाच्या ठोक्यांसारखा आवाज येतो. त्याने म्हणे बाळं झोपतात. एका मैत्रिणीनं एक सीडी आणून दिली. बाळाच्या रडण्याचे पाच प्रकार आणि प्रत्येक वेळी बाळ का रडतंय हे कसं ओळखायचं ते शिकवणारी.

एक ना एक अनेक साधनं उपलब्ध आहेत. पण आमच्या राजकन्येवर कशाचाच काहीच परिणाम होत नाही. मी बाबाला विचारलं की आम्ही कसे होतो? मजा आहे ना. आपल्या स्वतःलाच आपण कसे होतो हे आठवत नाही. बाबा म्हणाला की मी लहानपणी तानपुरा लावला किंवा संवादिनीवर सूर धरला की एकटक बघत बसायचे आणि रडायचं विसरून जायचे. हा प्रयोग सईवर झालेला आहे, पण तिच्यावर काही तानपुऱ्याचा फारसा परिणाम झाला नाही.

परवा बाबा म्हणाला कल्याण लावून बघ. कल्याण म्हणे लहान मुलांच्या मनावर चांगले संस्कार करतो. म्हटलं बरं आहे. माझ्या कडच्या ज्या काही सीडीज आहेत त्यातून शोधून एक सीडी काढली. तेवढ्यात आईनं जोरात हाक मारली म्हणून बाहेर गेले. आई काँप्युटरवर पेपर वाचीत होती. मी बाहेर गेले तशी ती म्हणाली भीमसेन जोशी गेले.

काळजात चर्र झालं. मी त्यांना कधीही भेटलेले नाही, कधी त्यांच्याशी बोललेले नाही. पण माझ्याच आयुष्यातलं काहीतरी हरवल्याचा एक क्षण भास झाला. अगदी बाबाच्या मांडीवर बसून मी त्यांचं गाणं ऐकलेलं आहे. माझ्या जन्माच्या खूप खूप आधीपासून माझ्या बाबाच्या जन्माच्याही आधीपासून ते गात होते. मला त्यांचं गाणं तर आवडायचंच पण त्याहीपेक्षा आवडायच्या त्यांच्या भावमुद्रा. गाण्यामध्ये समरसून जाणं पण तरीही अलिप्त असणं. पिसाळलेल्या घोड्याला काबूत आणावं तसं बैठकीला आणि श्रोत्यांच्या मनाला काबूत ठेवणारा त्यांचा सूर आणि त्यांची नजर. सगळं क्षणार्धात नजरेसमोरून गेलं.

बाबाला सांगायला म्हणून आत गेले, तर बाबानं सीडी चालू केलेली. त्यांचाच कल्याण लागलेला. तोच तो धीरगंभीर खर्ज. सईचं रडं कसं कुणास ठाऊक त्या क्षणी मात्र थांबलेलं. माझ्या बाबांच्या मांडीवरून मी ऐकलेला अलौकिक माणूस ती कधीच माझ्यासोबत ऐकू शकणार नाही ह्याचं मला सर्वाधिक दुःख वाटलं. काळ बदलत जातो, माणसं बदलत जातात. बदलणाऱ्या काळाबरोबर हरवत चाललेली आपल्या जीवनातली श्रद्धास्थानं मात्र क्षणभर का होईना आपल्याला हळवं बनवून जातात.

Monday, December 13, 2010

सई

घड्याळाच्या काट्याची टिकटिक. कधीपासून चाललेली. सेकंद गेली, मिनिटं गेली, तास गेले. त्याची टिकटिक असंबद्ध चाललेली. घटका भरण्याची वाट बघत आम्ही दोघी. एक ती आणि एक मी. एकमेकींना आधार देत, एकमेकींवर चिडत, रडत, भेकत, विनवण्या करत, सरकणाऱ्या एकेक सेकंदाशी प्राणपणाने लढत, गेलेल्या एकेक सेकंदाचा हिशेब मांडत बसलेल्या.

तिचं आणि माझं नातंच असं होतं. नातं होतं हे खरंच. त्याला नाव होतं हेही खरंच. पण तरीही ते कधी उलगडलं नव्हतं. कदाचित मला ते उलगडल्याचा आभास निर्माण झाला होता. तलवारीसारखं हे नातं. एका बाजूला मूठ, दुसऱ्या बाजूला धारधार पातं. आयुष्यभर ह्या नात्याची मूठ पकडून मी बसलेले. पातं धरायला लागलं की मुठीत असताना वाटलेली संरक्षक तलवार संहारक वाटायला लागते. तसंच आमचं नातंही. मला कळलेलं पण न कळलेलंही.

आम्ही दोघी अगदी जीवश्च, कंठश्च मैत्रिणी. कशी झाली मैत्री? कुठे झाली? केव्हा झाली? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत असंही मला कधी वाटलं नाही. तिला वाटलं असेल, नसेल, कल्पना नाही. पण मैत्रिणींनी एकमेकींना द्यायचे सगळे ताप, मनस्ताप आम्ही एकमेकींना दिलेले. कधी तिचा रागही आलेला. तिलाही माझा नक्कीच आला असेल. माझा आनंद तिचा होता, माझी दुःख तिची होती, माझं घर, माझी माणसं सगळी सगळी तिचीही होती. तिचं घर, तिची माणसं सगळी सगळी माझी होती. तिचा विचार माझा होता. माझी असणं तिचं होतं आणि तिचं असणं माझं होतं.

तिला आवडेल ते न आवडूनही मी खायचं आणि मला आवडेल ते न आवडूनही तिनं खायचं. मला गाणं आवडतं, म्हणून ते तिलाही आवडावं हा माझा हट्ट. मग तासंतास चांगलं चुंगलं गाणं तिला ऐकावंच लागायचं. तिला आवडायचं की नाही कोण जाणे. पण ऐकायची बिचारी.

कुणी सांगे, ती फार स्वप्नाळू आहे. असेलही. तिचं जग आपल्या जगापेक्षा खूप वेगळं होतं. तिथं ती तिच्या मर्जीची मालकीण होती. वाटेल तसं जागावं, वाटेल तेव्हा झोपावं, वाटेल ती स्वप्न बघावीत. तिच्यामुळे कदाचित मीही स्वप्नाळू झाले. माझी स्वप्न तिची झाली, तिची स्वप्न माझी झाली.

सेकंद गेली, मिनिटं गेली, तास गेले, दिवस गेले, महिने गेले. तिची आणि माझी मैत्री अधिकच घट्ट होत गेली. पण तरीही घटका भरण्याची वाट बघत आम्ही दोघी. एक ती आणि एक मी. एकमेकींना आधार देत, एकमेकींवर चिडत, रडत, भेकत, विनवण्या करत, सरकणाऱ्या एकेक सेकंदाशी प्राणपणाने लढत. मध्यरात्रीच्या चंद्रानं आम्हाला बेभान केलं की उधाणाच्या भरतीच्या लाटा किनाऱ्यावर फुटाव्यात तशा वेदनेच्या लाटा शरीरावर झेलताना आम्हा दोघींचा आणि काळाचा संपर्क तुटला कोण जाणे. किती वेळ तसाच गेला कळलंच नाही. चक्रातून चक्रात, चक्रातून चक्रात, चक्रातून चक्रात आम्ही फिरत राहिलो. वेड लागायची पाळी आलेली, पण तरीही तेव्हा पुसटसा अभिमन्यू आठवला. चक्रव्यूहातून बाहेर न पडणारा. एक क्षण डोळ्यात पाणी आलं. पण दुसऱ्याच क्षणी मनानं आणि शरीरानंही, तिच्या आणि माझ्याही, अभिमन्यू व्हायचं नाकारलं. चक्रव्यूह फुटलं.

सुटका झाली तशी ती बेंबीच्या देठापासून ओरडायला लागली. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. कुणीतरी तिचा इवलासा देह माझ्या छातीवर आणून ठेवला.

घड्याळाची टिकटिक पुन्हा जाणवली. आता कसलाही हिशेब मांडायचा नव्हता.

Tuesday, September 14, 2010

कालच्या आईची आजची आई

ह्यावेळी गणपतीची वेगळीच मज्जा झाली. बाबा तिथे आणि आई इथे माझ्यासोबत. बाबानी उकडीच्या मोदकापासून सगळं काही स्वतः बनवलं. त्याची प्रॅक्टिस म्हणून बरेच वेळा उकडीचे मोदक बनवले. बऱ्याच वेळा फसले पण करून करून जमले एकदाचे. बाबाला म्हटलं फोटो काढून ठेव आणि किचनमध्ये लाव. लोकं कसे आपण मारलेल्या प्राण्यांच्या तोंडाची ट्रॉफी करून दिवाणखान्यात लावतात तसं.

मोदक करणे म्हणजे काय प्रकरण आहे हे मी गेली दोन वर्ष अनुभवतेय. कधी खोबरं जास्त तर कधी गूळ कमी. त्यात इथे मोदकांचं स्पेशल पीठ मिळत नाही त्यामुळे कव्हरपण हवं तसं होत नाही, अशी अनेक कारणं मी मोदक चांगले न होण्यासाठी देत आलेली आहे. पण ह्या वर्षी त्याच फ्रोजन कोकोनट आणि तांदळाच्या पिठाचे आईने मोदक केले. आईच्या हातची चव वेगळीच. काहीही साहित्य असूदे, मोदक चांगलेच होणार.

मला खूप वाईट वाटत होतं आईला इथे बोलावून घेताना. गणपती आणि बाबा घरी एकटा, हे काही बरोबर नव्हतं पण गणपतीपर्यंत आईचं इथे येणं पुढं ढकलणंही शक्य नव्हतं. पण गुरवारी रात्री श्रीमंत विनोबा घरी हजर. रविवारी सुटी टाकली त्याने. शुक्रवार शनिवार तशीही सुटी असतेच त्याला. बाबाला एकदम सरप्राइज दिलं त्यानं. तो बिलकुल मॅच्युअर्ड नाही असं माझं आपलं पक्कं मत. पण कधीतरी अशा गरजेच्या वेळी एकदम शहाण्या बाळासारखा कुठूनतरी उपटतो, म्हणून त्याचं कौतुकही वाटतं. त्याच्या उभ्या आयुष्यात, मी त्याच्या केलेल्या, एका हातावर मोजता येण्याइतक्या, कौतुकांपैकी हे एक.

दुपारी मी आणि आई इथल्या वुलवर्थमध्ये जाणार होतो. वुलवर्थ म्हणजे इथलं आमचं लाडकं वाण्याचं दुकान उर्फ सुपरमार्केट. पण दुपारी मला थोडं बरं वाटत नव्हतं. आई म्हणाली की बरं नसेल वाटत तर अजिबात यायचं नाही. मी जाते म्हणून. आधी मी नाहीच म्हणत होते मी. कारण तशी एकटी ती इथे फिरली नाहीये. इंग्रजीचा तिचा बिलकुल प्रॉब्लेम नाहीये पण हे लोकं काय बोलतात ते भारतातल्या अट्टल इंग्रजाच्याही डोक्यावरून जाऊ शकतं. वर तिला एकटीला तिथे जाणं जमेल का, बरोबर वस्तू कुठून उचलायच्या हे समजेल का? मग बरोबर बाहेर येऊन पिशव्या हातावर वागवत एवढं चालत ती येईल का? ह्या प्रश्नांनी हैराण झाले. तरी तिनं हट्टच मांडला. मग तिला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या. पुन्हा पुन्हा दिल्या. शेवटी एकदाची ती एकटी गेली आणि ती येईपर्यंत माझ्या जीवाला घोर.

ती गेली आणि मला माझीच मी आठवले. कॉलेजची परीक्षा असेल किंवा सीएची असेल, पण घरातून बाहेर पडेपर्यंत आईच्या सूचना चालू असायच्या. पेनं घेतलीस ना? पट्टी घेतलीस ना? शांतपणे पेपर लिही. स्कूटर हळू चालव. सिग्नल्सकडे लक्ष दे. पहिले सगळा पेपर वाच, मग उत्तरं लिही. मग मी आईला म्हणायचे, आई मला कळतंय, उगाच टेन्शन देऊ नकोस. मग बिचारी गप्प बसायची आणि मग मी घरी येईपर्यंत तिची उलाघाल चालू असायची. पेपर चांगला गेला असं मी तिला सांगेपर्यंत तिचं कशात लक्ष लागायचं नाही.

गंमतच वाटली. काळ बदलला, स्थळ बदललं की माणसांचे रोल्सही बदलतात. ती मला जसं सगळं पुन्हा पुन्हा सांगायची तसंच मी तिला सांगत राहिले. मी येईपर्यंत तिला जशी काळजी वाटायची तशीच ती येईपर्यंत मला वाटत राहिली. काल मुंबईत मी मुलीच्या रोलमध्ये होते आज इथे मी तिची आई असल्यासारखी वागले.

Tuesday, July 13, 2010

पारिजात

अंगणी पारिजात फुलला

बहर तयाचा, काय माझीया, प्रीतीला आला

अंगणी पारिजात फुलला