Thursday, May 29, 2008

आनंदीआनंद आणि मी

मैत्री कशी, कुठे, कुणाशी व्हावी काय सांगता येतंय? पुण्यामध्ये आले तेव्हा मित्र कॅटेगरीमध्ये असणारी एकही व्यक्ती नव्हती. आल्यापासून शोधत होते मैत्र. पण ती काय चण्याची डाळ आहे की गेले किराणा दुकानात आणि घेतली एक किलो? तसंच माझं झालं. शोधत राहिलं की मिळत नाही आणि ध्यानीमनी नसताना अलगद पदरी पडतं.

आगाऊपणे मला बंगाली का? म्हणून विचारणारा तो. तो नको, फारच रुक्ष वाटेल सतत तो म्हटलं तर. एखादं छानसं नावच देऊन टाकूया त्याला इथल्यापुरतं. काय बरं? हं, आनंद म्हणूया. तर मला हा आनंद भेटला. मुंबईचा, मराठी आणि मराठीत बोलायची अजिबात लाज न वाटणारा. मग झालीच की मैत्री. ह्याला म्हणायचं काखेत कळसा आणि गावाला वळसा. बरं माझ्या समोरच बसतो तो. म्हणजे मध्ये क्यूबिकलची भिंत आणि पलीकडे तो. पण कळलाच नाही मला तो. भिंती, कमी असलेली अंतरं किती वाढवून टाकतात ना?

कंपनी असली आणि ती चांगली असली तर किती बरं वाटतं ना? नाहीतर एकटीने जा चहाला, सहसा एकटी नाहीच पण इतरांच्याबरोबर गेलं तरी मला एकटंच वाटायचं. आपल्याला नाही ब्वा रस, नव्या टेक्नॉलॉजीच्या गप्पा ठोकण्यात. त्यापेक्षा मस्त एखाद्या पुस्तकावर बोलावं. झालंच तर गाणं आहे, कविता आहेत. त्यामुळे माझं आणि आनंदचं जमतं. तो अजिबात कामाबद्दल बोलत नाही. स्वतः कलाकार आहे असं नाही, पण आवड आहे. विचारत राहतो, हे कसं करता, ते कसं करता, पडदा कसा पडतो, विंग कशाला असतात. फुटकळ प्रश्न, पण मला माझ्या कंफर्ट झोनमध्ये असल्यासारखं वाटतं.

आणि बरं मुंबईचा आहे, पण पुणं सगळं पाठ आहे. मग काय सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हादडणे आणि भटकणे हा कार्यक्रम चाललाय. परवाच आम्ही वैशाली मध्ये गेलो. मस्त आहे हं. म्हणजे मुंबईच्या दही बटाटा पुरीची चव नाही त्या एसपीडीपीला पण हेही नसे थोडके. अजून दोनतीन ठिकाणी जाऊन आले. युनिव्हर्सिटी खूप छान आहे. ओशो पार्कपण आवडला. घरी टीव्ही नाही. मग करायचं काय? भटका. आता कायनेटिकही आहे. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालतो.

हे झालं ऑफिसमधलं. गेल्या आठवड्यापासून एक नवा उद्योग सुरू केलाय. माझ्या बाबांचे एक मित्र आहेत इथे. सहज बोलत बोलता ते असं म्हणाले की ते सकाळी बॅडमिंटन खेळतात. मी लगेच त्यांना विचारलं मी येऊ का म्हणून? ते म्हणाले जरूर. तिथे जायला सुरवात केलेय. ह्या वेळी मुंबईहून येताना माझी जुनी रॅकेट विथ नवं गटिंग घेऊन आलेय. गेले दोन दिवसतरी रेग्युलर आहे. आता पाहूया किती दिवस चालतं हे फॅड.

माझ्या बाबांचे मित्र म्हणजे माझ्या वयाचं कोणी त्यांच्या बरोबर खेळत नसणारंच. पण पहिल्याच दिवशी त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी ओळख झाली. तीही रोज खेळते पण ह्या लोकांबरोबर नाही. त्यांचा ग्रुप वेगळा. असली गट्टी जमलेय ना तिच्याशी की सांगायची सोय नाही. म्हणजे आम्ही भेटून दोनच दिवस झालेत असं वाटतंच नाही. काल तिच्या घरी गेले होते. अगदी माझ्या घरीच गेल्यासारखं वाटलं. काका काकू, तिचा भाऊ आणि ती. एकदम घरचीच आठवण झाली. पण आताशा आठवणी येऊन मन उतू जात नाही. आठवण येते तशीच जाते.

तर असे हे माझे दोन नवे मित्र. आनंद, आणि तिला आनंदी म्हणूया. कारण माझ्या लिखाणात नक्कीच ह्या दोघांचा पुन्हा पुन्हा उल्लेख होणारे. नशीब माणसाला कुणा कुणाची भेट घालून देतं बघा. मी कुठे होते? हे दोघं कुठे होते? आम्ही भेटलो कसे? आणि आम्ही एकमेकांचे मित्र झालो कसे? आता त्यांच्या मित्रांशी ओळख होईल, ते माझे मित्र होतील आणि मैत्र वाढत जाईल. कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं कोण जाणे.

ऑफिसमध्ये काम नाही, सहज एकदा जीटॉक उघडून बसले होते, तर एका ब्लॉगरने हॅलो केलं, त्याच्याशी थोडा वेळ बोलले तर अजून एका ब्लॉगमैत्रिणीने हॅलो केलं, जितका वेळ ऑनलाईन राहिले तितका वेळ एकेक लोकं भेटत गेले. खूप छान वाटलं. आपण ज्या लोकांचं लेखन वाचतो, त्या लोकांशी बोलताना त्यांचे वेगळे पैलू सापडतात असं वाटलं. वेळ इतका छान जातो. आपण एकटे आहोत ही भावनाच विसरायला होते. हे आणखी एक मैत्र.

मुंबईला ह्या वेळी मुद्दाम सकाळी आमच्या नाना नानी ग्रुपला आणि माझ्या समुद्राला भेटायला गेले. जग्गू नाही भेटले. खरं मला त्यांना खूप सांगायचं होतं, कसं काय झालं पुण्याला आणि मी कसं मॅनेज केलं ते. खूप खूश झाले असते. त्यांना फोन केला. गुडघे दुखतायत म्हणाले. पुढच्या आठवड्यात भेटून येईन. आईलाही जरा बरं नव्हतं. सर्दी खोकला आणि तपासारखं वाटत होतं. पण आता बरंय म्हणाली फोनवर.

एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागलेय आताशा की माझी एक्सक्लूसिव्ह विश्व तयार व्हायला लागलीत. मुंबईचं विश्व वेगळं, पुण्याचं वेगळं, पुण्याला ऑफिसचं वेगळं, ऑफिसआधीचं वेगळं, ऑफिस नंतरचं वेगळं, आणि घरी गेल्यावर माझ्या एकटीचं एक अजूनच वेगळं विश्व. पूर्वी ह्या सगळ्यात एक सुसूत्रता होती. पण आता म्हणजे मीच माझ्या वेगवेगळ्या विश्वात वेगवेगळी वागायला लागलेय असं वाटतं. अगदी नाटकातल्यासारखं. प्रसंगाला अनुरूप. कप्पे आहेत हवाबंद. ह्या भागाचा त्या भागाशी संबंध नाही आणि त्याचा ह्याच्याशी.

का?

- संवादिनी

Thursday, May 22, 2008

काल आणि आज

नव्याच्या नवलाईने जुन्याच्या नसण्याचं दुःख हळूहळू बोथट होत जातं. नाही? नव्या ऑफिसात आले तेव्हा पहिले दोन दिवस जुनं ऑफिसच आठवत राहिलं. जुहूचा तो समुद्रकिनारा, वाऱ्यावर डोलणारी नारळाची झाडं. जुहू तारा रोडवरची माझी डबल डेकर बस. आमची टीम, बुटकोबा, सगळं सगळं आठवत राहिलं. हळूहळू इथे रुळायला लागले. पहिल्यांदा नकोशी वाटणारी ती मशीनची फुकट कॉफी आता आवडीची झालेय. नुसतीच कॉफीच नाही, तर एरवी ब्लॅक टी ला नाकं मुरडणारी मी हौसेनं आता ब्लॅक टी विथ लेमन घ्यायला लागलेय.

माझ्या काकाचा एक मित्र आहे. त्याची जुनी कायनेटिक त्याने मला दिलेय वापरायला. त्यामुळे खूप मस्त वाटतंय. म्हणजे त्या पुण्याच्या बसेस आणि रिक्षा नकोच. त्यापेक्षा आपलं वाहन असलेलं बरं. तसं रूटीन पण सेट झालंय. सकाळी सकाळी उठून ऑफिसात धडकणे. जर मेल वेल चेक करून ब्रेकफास्ट. काम अक्षरशः काहीही नाही. मी बाकावर आहे सध्या. म्हणजे बेंचवर. त्यामुळे टिवल्या भावल्या करणे, दुपारी जेवणे आणि संध्याकाळी घरी जाणे. स्वैपाक करायचा कंटाळाच आहे. पण एकटीला जाऊन रात्रीचं बाहेर जेवायला बरं नाही वाटत म्हणून फोन वरून ऑर्डर देणे आणि घरी येऊन ते खाणे, की झाली झोपायची वेळ.

तरी हा लॅपटॉप सोबतीला आहे म्हणून नाहीतर मी वेडीच झाले असते. कारण इथे टी. व्ही देखील नाहीये. पण कालच ऑफिसमध्ये काही पुस्तकं विकायला ठेवली होती. मराठीही होती. बरं वाटलं. एकदोन चाळून पाहिली. छावा घेतलं. खूपच छान आहे. आणि मला एकदा पुस्तक आवडलं की त्याचा फडशा पडायला वेळ लागत नाही. बहुतेक मुंबईला जायच्या आत संपेल.

पण हे सॉफ्टवेअर कंपनीचं विश्व भन्नाट आहे. जो तो स्वतःला विकतोय, विकायचा प्रयत्न करतोय. बॉसला काम, की आम्हाला कामाला लावणं. आमचं काम, आम्हीच अमुक एक कामाला कसे योग्य आहोत हे सिद्ध करणं आणि इतरांवर कुरघोडी करून ते काम स्वतःसाठी मिळवणं. कारण शेवटी तुम्ही किती पैसे कंपनीला मिळवून देता ह्यावर कंपनी तुम्हाला किती बोनस देईल हे अवलंबून आहे. मला एकदम विचित्र वाटलं पहिल्यांदा. आता सवय होतेय. म्हणजे नाही जरी आवडलं तरी करून घ्यायला लागतेय.

काही लोकांच्या ओळखी झाल्या. माझ्यासारख्याच बाकांवर बसलेल्यांना काही उद्योग नाहीये. मग आम्ही काहीजणं टवाळक्या करत बसलेलो असतो. मराठी टक्का खूप कमी आहे. पण माझं मराठी मराठी नाहीच आहे. आपल्याला कोणतीही भाषा बोलणारी चांगली कंपनी चालते. पण मैत्री म्हणावी अशी नाही. ट्रेनमध्ये लांबच्या प्रवासाला निघालेले लोकं कसे टाइम पास करण्यापुरतं बोलतात. तसंच काहीसं.

कारण सर्वांनाच माहितेय की ही सोबत काही दिवसांचीच आहे. पुढे नवा प्रोजेक्ट नवं राज्य, नवा राजा आणि नवी प्रजा. मग मैत्री करायचे कष्ट आतापासून कशाला घ्या? बरं मीच कशी ग्रेट आणि मीच कसा फंडू, हे सांगायची अहमहमिका लागते. मी आपलं ऐकते. शेवटी सगळेच बोलले तर ऐकायचं कोणी? त्यामुळेच असेल, पण लोकं स्वतःहून माझ्याशी बोलायला येतात. आपल्या स्वतःचं स्वतःबद्दलचं बोलणं, दुसऱ्या कुणीतरी शांतपणे ऐकून घेणं ही खरोखरच माणसाची गरज आहे का हो?

आमचे साहेब तसे बरे आहेत. चक्क मराठी आहेत. मला अहो जाहो करतात. मी त्यांना नको सांगितलं तरी ऐकत नाहीत. माझ्यासाठी स्थळ शोधतायत. अंहं, ते स्थळ नव्हे, त्यांच्या परिभाषेत, स्थळ म्हणजे प्रोजेक्ट आणि त्यांचं काम वधूवर सूचक मंडळासारखं.

आज बुधवार आला. उद्याचा एक गुरुवार गेला की मग आलाच शुक्रवार. इंद्रायणी - घर - शनिवार - रविवार - इंद्रायणी - पुणं आणि मग पाच दिवस आणि चार रात्रींसाठी एक वेगळंच विश्व. मागणी आणि पुरवठ्याच्या तालावर नाचणारं. एक मार्केट इकॉनॉमी. डिमांड आणि सप्लाय. मोर द डिमांड मोर द प्राइस, मोर द सप्लाय, लेस द प्राइस. आणि मग चालणारी चढाओढ, माझी डिमांड जास्त कशी आणि माझ्या स्किल्स चा सप्लाय कमी कसा? आणि म्हणून माझी किंमत जास्त कशी?

मीही नकळत कधी ह्यात ओढली जाते. मग अधेमधे कुठेतरी लक्षात येतं. आपण तसे नाहीच मुळी. कशाला तसं वागायचा प्रयत्न करायचा? हाथी चले अपनी चाल प्रमाणे आपण चालत राहायचं. आमचे एक सर नेहमी सांगायचे. पैशाच्या अपेक्षेनं काही करू नका. जे काही कराल ते सर्वोत्तम करा. पैसा तुमच्याकडे चालत येईल. जितकं तुम्ही त्याच्या मागे लागाल तितकं दूर पळेल. बघूया सरांचं तत्त्वज्ञान काळाच्या कसोटीवर उतरतं का ते?

पण ह्या सगळ्यातसुद्धा जवळचे वाटावे असे लोकही आहेत. मी जिथे राहते तिथल्या शेजारच्या काकू. म्हणाल्या कधीही कंटाळा आला तर आमच्याकडे येत जा. टी. व्ही. बघायला. जेवायला. खूप बरं वाटलं. ऑफिसातही एक इंटरेस्टिंग मुलगा भेटला. मी मराठी पेपर वाचत बसले होते, तर मागून आला आणि म्हणाला तू बंगाली आहेस का म्हणून? मला जरा विचित्रंच वाटलं, अगदी मराठी वाचता येत नसलं तरी देवनागरी आहे स्क्रीनवर एवढं तरी समजतंच ना? मी नाही म्हटलं. तसा म्हणाला, मला वाटलंच, तू मराठी असणार म्हणून. बंगाल्यांना अजून मराठी वाचता कुठे येतं? साहेब स्वतः मराठी. ओळख करून घेण्याची ही अनोखी पद्धत पाहिल्यावर माझी खात्री होती की ये भिडू मुंबईकाही है. आणि तसंच झालं. पण त्याच्याविषयी पुढच्या वेळी. उद्या काम नसलं तरी ऑफिसला तर जायचंच आहे म्हणून आता झोप.

Thursday, May 15, 2008

वाघ आणि बेडूक

आपलं भोवताल बदललं की आपण बदलतो की नाही? बहुतेक बदलतो. गेल्या पोस्टपर्यंत मी माझ्या घरात माझ्या टेबलवर आईने बनवून दिलेला गरम गरम चहा भुरकत भुरकत लिहीत होते. आज मी इथे एकटीच आहे. कधीतरी गरम होती, असा जरासुद्धा संशय येऊ न देणारी इडली आहे, आंबट ढाण सांबार आणि तिखट जाळ चटणी. अर्थात त्या दोघांच्या वाटेलाही मी जात नाहीये हा मुद्दा वेगळा, पण ह्यामुळे माझं लिखाणसुद्धा थंडगार होऊन जाणार असं वाटतंय.

असो, सांगायचा मुद्दा हा, की आमचं पार्सल पुण्यनगरीत येऊन पोहोचलं, सगळंच धक्कादायक आहे. अजूनही मी सावरतेय.

पहिल्या दिवशी सकाळी सकाळी इंद्रायणीने इथे पोहोचले. ऑफिसतर्फे पहिल्या दोन ट्रिपा स्पॉन्सर्ड आहेत, त्यामुळे एसी चेअरकारनी आले. पण खिडक्या उघडता येणाऱ्या डब्यांची मजा इथे नाहीच. निसर्गाचा रंग कसा लख्ख दिसायला हवा. जसा आहे तसा. मध्ये ती टींटेड काच आली, की सगळं सपक दिसायला लागतं. त्याच रंगात असल्यासारखं.

आधीच मला नव्या नोकरीचं टेन्शन, त्यात एवढ्या लवकर उठायची नसलेली सवय, त्यामुळे झोपेतच शिवाजीनगरला उतरले. सामान काही जास्त बरोबर नेलंच नव्हतं कारण आई बाबा गाडीने विकेंडला पोहोचणार होते, माझ्या सामानासकट. पहिला धक्का. पुण्यातला रिक्षावाला माझ्याशी हिंदीत बोलला. आणि तो मराठी होता हे त्याच्या उच्चारांवरून स्पष्ट कळत होतं. म्हणजे मी मराठी दिसत नाही की काय? काळे डोळे सोडले तर बाकी सगळंच एकदम चित्पावनी. त्यामुळे पुण्यातले लोकं आपल्याला पुणेकरंच समजतील असा एक फाजिल समज झाला होता, तो त्या पुणेरी रिक्षावल्याने माझ्याशी हिंदीत बोलून चुकीचा सिद्ध करून दाखवला.

असो, हा धक्का फारसा धक्कादायक नव्हता. खरा धक्का तर पुढेच बसला. ऑफिसात शिरून एच आर डिपार्टमेंटमध्ये शिरले. एक अतिशय नकोसा वाटावा असा माणूस बसलेला. बोलण्यात उर्मटपणा, उपकार करतोय असा वागत होता. त्याला जाऊन माझं नाव वगैरे सांगितलं, मेडिकल करायची वगैरे तेही सांगितलं. त्यानंतर तो मला जे काही म्हणाला ते ऐकून झीट येऊन पडायचीच वेळ आली. तो म्हणाला की त्याला कोणी कळवलंच नाहीये की मला रिक्रूट केलंय म्हणून.

मनात म्हटलं, अरे माणसा, मी माझी सोन्यासारखी नोकरी सोडून, सकाळी सकाळी उठून, तडफडत तडफडत, इथे येऊन पोचले आणि तू मला म्हणतोस की तुला कोणी सांगितलंच नाहीये की मी येणारे म्हणून? मी म्हणजे ऑलमोस्ट रडणारंच होते, पण कसंबसं रोखलं. शेवटी नावात घोटाळा झाल्याचं कळलं. साठ्ये चं चक्क शेट्टी? पण शेवटी मीच ती, हे ऐकून मला हायसं वाटलं.

बाकी सगळा दिवस मेडिकल, जॉइनिंग फॉरमॅलिटीज मध्ये गेला. संध्याकाळी अस्मादिक ह्या आमच्या गेस्ट हाउस वर पोहोचले. जुन्या कंपनीने वाईट सवयी लावलेल्या. तिथे म्हणजे राजेशाही कारभार, हवंतर राणीशाही म्हणा, पण इथे? एवढी मोठी ही कंपनी पण गेस्ट हाउस कसलं? एखाद्या कॉलेजचं हॉस्टेलही ह्यापेक्षा खूप चांगलं असेल. पुन्हा एकदा रडायलाच यायला लागलं. मी एवढी रडी आहे हे मला इथे आल्यावरच कळतंय.

जरा फ्रेश होऊन बाहेर पडले, घरी फोन केला. विन्याने उचलला. एकदम खूश झाला. त्याच्याशी थोडा वेळ बोलले, मग बाबाशी बोलले, आईशी बोलताना मात्र तिला सांगितलं म्हटलं शुक्रवारी नाही, उद्या परवाच या. इथे राहणं मला शक्य नाहीये इतकं टुकार गेस्ट हाउस आहे. हो नाही करता करता गुरुवार ठरला. गुरुवार म्हणजे उद्या ते इथे येतील. मग माझ्या काकाचा रिकामा फ्लॅट आहे, कचरा डेपोला, तिथे मी एकटी राहणार आहे, तिथे सगळं सेटिंग करतील आणि मग आम्ही शुक्रवारी सगळेच मुंबईला जाऊ. काय पण एरीआ आहे? कचरा डेपो?

बाबाने मला हा लॅपटॉप घेऊन दिला. मस्त आहे. आणि बॅकग्राउंड म्हणून आमचा चौघांचा फोटो लावून ठेवलाय, सिडनी ला घेतलेला. मी सीए झाल्यावर आम्ही ट्रीपला गेलो होतो तेव्हाचा. पाठी ऑपेरा हाऊस आहे. पण मी बघतच नाही तो. उगाचच आठवण येते आणि पुन्हा रडायला येतं. मला खरंच वाटलं नव्हतं, की एवढी सतत आठवण येईल, रडू येईल. अर्थात आता जरा बरं वाटतंय कारण उद्या सगळेच इथे येतील.

नेहमी कळपात राहणाऱ्या प्राण्याला एकदम एकटं राहायला सांगितलं तर कसं होईल? तसं माझं झालंय. ऑफिसात कुणी ओळखत नाही, एकदम जाऊन कुणाशी मैत्री करण्याचा माझा स्वभाव नाही. मित्रमंडळात खूप बडबडी असले तरी अनोळखी लोकांच्यात माझी एकदम भिजलेली मांजर होते. उगाचच हसायला टॅक्स पडत असल्यासारखा माझा चेहरा मग लंबाचौडा होतो. त्यामुळे पटकन ओळखी होत नाहीत, लोकांना मी कदाचित थोडी आखडूही वाटत असेन. सेल्फ रिअलायझेशन का काय ते म्हणतात ते हेच असेल? आपल्या डबक्यात शेर असलेला बेडूक, डबक्याबाहेर पडला की त्याला आपलं बेडूकपण जाणवतं. डबक्यात त्याला वाघ म्हणणारेच सगळे असतात आणि डबक्याबाहेर कुणी बेडूकही म्हणायला तयार नसतं.

तसा झालाय माझा डबक्याबाहेरचा बेडूक.

असं काही झालं की मला महाभारतामधला "मै समय हुं" वाला हरीश भिमाणीचा आवाज आठवतो. समय हेच सगळ्यावरचं एकमेव सोल्यूशन, परवापेक्षा काल, आणि कालच्यापेक्षा आज खूपच बरा वाटतोय. उद्या कदाचित इथलेही लोकं ह्या बेडकाला शेर शेर म्हणायला लागतील कुणी सांगावं?

- संवादिनी