Monday, November 28, 2011

देवयानी (33)

नोकरी बदलली. पण ती करणारी तर मीच होते ना? जे प्रॉब्लेम्स आधी होते ते ही नोकरी सुरू झाल्यावरही तसेच आहेत. अर्थात लग्न वगैरे करण्याचा विचारच मी आता सोडून दिलेला आहे. जेवढं काही माझ्या वाट्याला त्याबाबतीत यायचं होतं तेवढं भल्या बुऱ्या मार्गाने मला मिळालेलं आहे. मै और मेरी तनहाई, आम्हा दोघींचीच जोडी कायम राहणार बहुतेक असं मी गमतीनं बऱ्याचदा म्हणते. आणि तेच खरं होणार आहे. असं लिहिताना मनाला थोडंसं बोचतं. पण पुन्हा विषाची परीक्षा घेण्यापेक्षा ही कधीमधी मनाला लागणारी बोच परवडली.

आई आहे तोपर्यंत आई आणि तिच्यानंतर मी एकटी असं मी माझं आयुष्य काढणार आहे. नशिबाने चांगली नोकरी असल्याने वेळ बरा जातो. दिवसा जगाशी लढाई करून रात्री एकटीच मी माझ्या आरामखुर्चीत वाइनचे घोट घेत बसते तेव्हा जीव कसनुसा होतो. नाही असं नाही. पण त्यावर आता काही उपाय नाही. आई होण्याची तीव्र इच्छा मात्र मनात अजूनही आहे. पण हे सगळं आत्याला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं ह्या धाटणीचं आहे.

कुमारी मातांचा प्रश्न कधी मधी पुरवण्यांतून चघळला जातोच. कधी वाटतं आपणही असं काहीतरी करावं. डोनर स्पर्म घेऊन आपलं स्वतःचं मूल जन्माला घालावं आणि मग त्याला किंवा तिला वाढवावं. पण हल्ली ना, माझी कुणाशी भांडण्याची ताकत आणि इच्छा दोन्हीही खूप कमी झालेय. समाजाशी मी गेली अनेक वर्ष भांडतेय. अजून किती भांडू? मग वाटतं नकोच तसलं काही धाडसी. त्यापेक्षा आपण बरं आपली आरामखुर्ची बरी. आई स्वयंपाक करते मी पैसे कमावते आमच्या दोघींचं बरं चाललंय.

पण मध्ये एक सुंदर घटना घडली. एका कॉर्पोरेट फंक्शनला सिंधूताई सकपाळ ह्यांना पाहण्याचा, ऐकण्याचा योग आला. मला मोठी मजा वाटली. सगळी त्यांची मुलंच. आणि त्या सगळ्यांच्या आई. आई होण्यासाठी मूल जन्माला घालण्याची काय गरज आहे? हा एक वेगळाच विचार मनात आला. अर्थात स्वतःचं मूल होणं ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी तो उपाय नव्हे. पण माझ्यासारखी बाई जिला आई व्हायचंय पण होऊ शकत नाही तिनं हा पर्याय का स्वीकारू नये? त्या क्षणी वाटलं की सोडून द्यावं आपलं हे जग आणि जावं त्यांच्याबरोबर आणि एक आई म्हणून काढावं उरलेलं आयुष्य. किती उदात विचार आहे हा नाही का?

पण सर्वसामान्य माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे. आपण ते एक पाऊल उचलू शकत नाही. मला माहितेय की मी खरंच त्या आश्रमात गेले तर मला माझ्या आयुष्यात खूप आनंद मिळेल, पण मला खूप आनंदाबरोबर माझी आरामखुर्चीही हवी आहे. हातात उंची वाइनचा ग्लासही हवा आहे. एसी गाडीही हवी आहे आणि इतर सर्व सुखसोयीही हव्या आहेत. ते कसं काय जमायचं? नुसतं समाजकार्यच नाही, पण उद्या मी खरंच मूल दत्तक घ्यायचं ठरवलं तरी त्या मुलाला किंवा मुलीला पूर्ण न्याय मी देऊ शकणार आहे का हे मला ठरवावं लागेल. त्यासाठी लागणार वेळेची कमिटमेंट मला द्यावी लागेल.

पण ही एक संधी आहे, आयुष्याला एक दिशा देण्याची आणि ती मी सहजासहजी दवडणार नाही. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात दैवाने मला भरभरून दिलं, नाऊ इटस हाय टाइम आय गेट माय शेअर इन माय पर्सनल लाईफ. अजून काही अपेक्षा नाहीतच.

- देवयानी

Friday, November 18, 2011

देवयानी (32)

तो गेला तसा माझ्या डोळ्यातून एक अश्रू निसटलाच. गालावर ओघळला. तो शँपेनचे ग्लास भरून आला. मी रडतेय हे त्याला कळलं पण ते त्याला कळलं हे मला कळलं नाही. दिवसभर कामाच्या गडबडीत मी अप्सेट आहे हे त्याच्या लक्षात आलं नसावं किंवा माझ्यावरच प्रेझेंटेशनचं एवढं प्रेशर होतं की त्या ओझ्याखाली डोळ्यातनं एखादा अश्रूही मी बाहेर पडू दिला नव्हता. मला एकटीला माझ्या रूमच्या चार भिंतीत जे करायचं होतं ते आता नकळत प्रीतमच्या समोर झालं.

तो माझ्या शेजारी येऊन बसला तेही मला समजलं नाही. त्याने खांदे हालवून मला जागं केलं मी त्याच्याकडे पाहिलं नि माझा बांध फुटला. पुढची कित्येक मिनिटं मी नुसती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होते. पहिला भर ओसरल्यावर त्याने मला विचारलं की काय झालं. मी त्याला सकाळच्या मनीषच्या फोनबद्दल सांगितलं. त्याने लग्न करायला नकार दिला होता. का? तर मी अनुरागबरोबर शरीरसंबंध ठेवले होते म्हणून. अर्थात त्याचं काही चुकलं असं मला अजिबात वाटत नाही. आजही. चूक माझी होती. मी त्याला आधीच हे सगळं सांगायला हवं होतं. मी साखरपुडा झाल्यावर त्याला सांगितलं. त्याला ते पटणं न पटणं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न होता. त्यामुळे त्याचं नाहीच चुकलं. माझंच चुकलं.

आधी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा वर्तुळ पूर्ण करून मी जिथून सुरुवात केली तिथे पोचले. दैवाने मला इतका दगा इतक्या सातत्याने का द्यावा? मीच का? बाकी जग सुखी असताना माझ्या एकटीच्याच बाबतीत हे पुन्हा पुन्हा का व्हावं ह्या विचाराने डोकं बधिर झालं. मला पार्टनर हवा होता, मला सेटल व्हायचं होतं, मला मूल हवं होतं. आता काहीही मिळणार नव्हतं. पुन्हा एक लढाई, विजयाचा घास तोंडात पडतोय असं वाटत असताना पुन्हा जिव्हारी लागणारा पराभव, पुन्हा तेच जीव लावण्याच्या जागा शोधणं, जीव लावणं आणि मन मोडणं. मीच का?

ह्या वेळी मी दैवासमोर हरणार नव्हते. मला हवं ते सुख मला ओरबाडून घ्यायचं होतं. प्रीतमच्या खांद्यावरून मी माझी मान उचलली आणि ओठ त्याच्या ओठावर टेकले. मला हे सगळं सगळं विसरून जायचं होतं. मला हरायचं नव्हतं. एकदा तरी मला जिंकायचं होतं आणि मी जिंकले होते. अफूची गोळी घ्यावी तसं माझं दुःख मी रात्रभर का होईना विसरले. सकाळी उठले तेच डिप्रेशन मध्ये, काल मूर्खासारखं मी काय करून बसले होते? ऑफ ऑल द पीपल प्रीतम? मला राहून राहून मिषूचा आणि त्याच्या मुलीचा चेहरा आठवत होता. मी त्यांची केवढी मोठी गुन्हेगार होते. मला सुख मिळत नाही म्हणून मी दुसऱ्याचं ओरबाडून घेतलं होतं. इतकी नीच मी कशी झाले?

असो, त्या चुकीबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कधीच म्हणजे कधीच नाही. मराठीत एक म्हण आहे कळतं पण वळत नाही. तसं माझं झालं होतं. आणि ही चूक मी एकदा नाही तर अनेकदा निलाजरेपणे केली. मिषू माझी मैत्रीण आहे आणि माझी तिच्याप्रती काही जबाबदारी आहे हे मी मनाशी घोकत राहायचे. झालं गेलं गंगेला मिळालं पण पुन्हा ही चूक करता कामा नये असं दिवस रात्र स्वतःला समजावर राहायचे, पण प्रीतम जवळ आला की हे सगळे बंध गळून पडायचे मी फक्त त्या ऍनिमल इन्स्टिंक्टला शरण जायचे. अफूची गोळी. त्यातून मनाला आणि शरीराला मिळणारी एक प्रचंड हाय आणि तिचा अंमल उतरल्यावर येणारं डिप्रेशन ह्या चक्रातून मी दिवसेंदिवस फिरत होते.

ह्या सगळ्याचा माझ्या शरीरावर परिणाम व्हायला लागला. वजन खूप कमी झालं, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आली. मेकअपचे थर वाढले. डॉक्टरी इलाजांनीही काही सुधारणा झाली नाही. शेवटी मला एका मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला लागलं. ती खूप छान आहे. तिने मला बोलतं केलं. हे सगळं जे माझ्या मनात कोंडून राहिलेलं होतं ते मोकळं झालं. अक्षरशः ठणकणारं गळू फुटलं की कसं बरं वाटतं तसं मला वाटलं. तिच्या मदतीने माझी गाडी हळू हळू पूर्वपदावर आली. प्रीतमशी संबंध पूर्णपणे तोडून टाकण्यापर्यत माझं मनोधैर्य वाढलं. अर्थात मी त्याच्याशी अजिबात न बोलणं शक्य नाही कारण त्याच्याशी नाही तरी मिषूशी मला आठवड्यातून किमान एकदातरी बोलावंच लागतं.

त्याच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून मी पुन्हा मार्केटिंगमधून डिलिव्हरी मध्ये आले. अगदी कुणाला आवडत नाही ती अर्ली मॉर्निंग शिफ्ट घेतली. चारच्या ठोकायला काम सुरू करायचं आणि दुपारी एक वाजता ऑफिस सोडायचं. पुन्हा आयुष्यात अशी चूक करण्यासाठी रात्रीच ठेवायच्या नाहीत असं मी ठरवलं. सगळ्या रात्री सकाळी लवकर उठण्याच्या चिंतेत जाळून टाकल्या. झोंबीसारखं आयुष्य जगले. जगापासून स्वतःला तोडून घेतलं आणि आपल्याच पाशात गुरफटत राहिले.

काळ हाच सर्वांवरचा एकमेव इलाज आहे. इथे ह्या ब्लॉगवर लिहायला सुरुवात केल्यानंतर मी विंफो सोडली. दुसऱ्या एका कंपनीत महत्त्वाची पोस्ट मला मिळाली. प्रीतम दूर जाणार होता, आवडीचं काम करायला मिळणार होतं. आयुष्यातला एक चॅप्टर बंद होणार होता.

- देवयानी

देवयानी (31)

आधी ठरल्याप्रमाणे बरोबर मी आणि प्रीतम सिंगापूरला पोचलो. दुसऱ्याच दिवशी ऑफिसात जाऊन आमच्या टीममधल्या सिंगापूरच्या ऑफिसमधल्या तीन टीम मेंबर्सची मीटिंग घेतली. आणि प्रेझेंटेशनच्या वेळची स्ट्रॅटेजी ठरवली. प्रेसेंटेशनचे तीन भाग केले. सुरवातीचा भाग त्या तिघांपैकी एकावर सोपवला. मधला भाग माझा. जिथे सर्वात जास्त ऑडिअन्स झोन आऊट होण्याची शक्यता होती आणि तिसरा कमर्शिअल्स डिस्कस करणारा भार प्रीतम करणार होता.

कामाची वाटणी झाल्यावर आम्ही आपापल्या तयारीला लागलो. हे प्रेसेंटेशन देणं म्हणजे एखादा स्टेज शो करण्याच्या बरोबरीचं काम आहे. निदान माझ्या साठी तरी. मी माझं स्क्रिप्ट पूर्ण लिहून घेते, पाठ करते आणि तसंच्या तसं म्हणते. पाठ करून म्हणणं सोपं आहे, पण तुम्ही ते पाठ केलंय हे लोकांना कळू न देणं आणि ते एकदम उत्स्फूर्त असल्याचं भासवणं कठीण आहे. तसंच सगळं स्क्रिप्ट प्रमाणे होतं असं नाही. गाडी कधी कधी रुळावरून घसरते. ती पुन्हा रुळावर आणावी लागते. कोणताही भाग कंटाळवाणा होणार नाही हे पाहावं लागतं. ऍट द सेम टाइम बोलणं फार उथळ वाटणार नाही ह्याचीही काळजी घ्यायला लागते. समोर मोठमोठी लोकं बसलेली असतात, त्यांचे इगोज, त्या कंपनीचं इंटर्नल पॉलिटिक्स ह्या सगळ्याचा विचार करूनच एकेक शब्द बोलावा लागतो.

त्या दिवशी खूप उशीरापर्यंत मी हे सगळं करत राहिले. प्रीतम शेवटी मला बळजबरीनंच हॉटेलवर घेऊन गेला. दिवसभर मला एकदाही मनीषची आठवण आली नव्हती. रात्री बिछान्यावर पडल्यावर मात्र अचानक त्याचं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व जाणवलं. त्याच्याबरोबर मला जे काही तास घालवायला मिळाले होते त्याची उजळणी करण्यातच समाधान मानायचं होतं. त्याची वेळ ते भारताची वेळ आणि भारताची वेळ ते सिंगापूरची वेळ अशी गणितं मांडत तो पोचला असेल का ह्याचा अंदाज बांधत बसले. पोचला तर नक्कीच होता पण त्याचा फोन आला नाही. तो फोन करणार होता, पण आला नाही. पोचला ना व्यवस्थित?

पुन्हा पुन्हा माझा भारतातला फोन काढून टेक्स्ट मेसेज आलाय का ते पाहिलं. आता मात्र मला काळजी वाटायला लागली. कॉम्प्युटर सुरू केला. त्याचे फ्लाईट डिटेल्स माझ्याकडे होते. फ्लाईट स्टेटस चेक केलं तर फ्लाईट बरोबर लँड झालं होतं. पण मग असं वाटलं की पोचल्या पोचल्या लगेच तो फोन कसा करणार होता? मग त्याची रात्र झाली आणि त्याच्याइथे आता उजाडलं तर माझी रात्र झालेली, त्यामुळे बहुतेक नसेल केला फोन. उद्या तसाही महत्त्वाचा दिवस होता. सकाळपासून मला अजिबात वेळ मिळणार नव्हता. फोन आला असता तरीही मला तो घेता येणार नव्हता, म्हणजे थोडक्यात अजून दोन दिवस बोलणं होणार नव्हतं. पण मेल तरी करायचा ना एक. विचारांच्या चक्रात गुरफटून कधी झोप लागली ते कळलंच नाही.

महत्त्वाची मीटिंग किंवा प्रेझेंटेशन असेल तेव्हा मला रात्रभर अर्धवट झोप येते सतत कामाचं काहीतरी डोळ्यासमोर दिसत राहत. त्या रात्रीही तसंच चाललं होतं. अचानक फोन वाजला. फोन वाजतोय हे कळायला थोडा वेळ गेला. डोळे किलकिले करून फोन उचलला मनीषचा होता. सकाळचे पाच वाजलेले होते. त्याही अर्धवट झोपेत बहुतेक माझ्या चेहऱ्यावर हासू फुललं असणार. आम्ही बोललो, तो जास्त बोलला, मी ऐकत होते. मी फोन ठेवला आणि बाहेरून गडगटाचा मोठा आवाज झाला. तो दिवसच असा होता. खिडकीचा पडदा सारून बाहेर पाहिलं तर पाऊस कोसळत होता.

मी अगदी यंत्रवत तयार झाले. वेळेवर प्रीतमचा फोन आला. मी बरीचशी डिसओरिएंटेड होते. पण जे बोलणं चाललं होतं त्यात एका दुसऱ्याच लेव्हलला मी इन्व्हॉल्व्हही होते. हे असं दोन वेगळ्या लेव्हल्सना दोन वेगळे विचार तेवढ्याच तीव्रतेने मनात येणं खूप धोकादायक होतं. पण मला गत्यंतर नव्हतं. अगदी यंत्रासारखी मी प्रीतमबरोबर तिथं गेले. आमची टीम मीटिंग झाली, सगळ्यांची पुन्हा एकदा उजळणी झाली. माझं काम महत्त्वाचं होतं. हो किंवा नाही ह्यातलं अंतर माझ्या प्रेझेंटेशनने ठरणार होतं. ह्या वर्षीची टार्गेट्स, माझी, प्रीतमची आणि त्या तिघांचीही माझ्यावर अवलंबून होती. एक चूक आणि सगळं पाण्यात जाऊ शकलं असतं. मला एकदम भडभडून आलं. काय झालं माझं मलाच समजलं नाही, पण जे काही होत होतं ते मी तसंच आत खोल दाबून ठेवलं. अगदी नेहमीसारखी बोलत राहिले.

प्रेझेंटेशनची वेळ झाली. सुरवात झाली बॅटन माझ्याकडे आलं. मी पाठ केलेलं तसं बोलले. काय बोलले, कसं बोलले हे तेव्हा मला काही समजलं नाही. ट्रान्स हा शब्द योग्य आहे. सगळा वेळ मी ट्रान्स मध्ये होते. मध्ये कुणी काय प्रश्न विचारले? मी काय उत्तरं दिली मला काही काही आठवत नाही. माझ्यानंतर प्रीतमचं प्रेझेंटेशन झालं आणि प्रपोसलचे फायनलिस्ट जाहीर झाले. आमचं नाव त्यात होतं. आता खरी मजा सुरू होणार होती. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं. संध्याकाळी आम्ही पाचही जणं सेलेब्रेट करायला म्हणून पब मध्ये गेलो. तिथेही काय झालं मला काहीही कळलं नाही. जे समोर येत होतं ते मी खात होते, पीत होते, बोलतही होते. पण मन मात्र वेगळ्याच विश्वात होतं.

तासा दीड तासाने आमचे सिंगापुरमधले कलीग होते ते घरी जायला निघाले. आम्हाला हॉटेलवर ड्रॉप करून ते गेलेसुद्धा. त्या क्षणी मला कधी एकदा माझ्या रूममध्ये जाऊन एकटी होतेय, ह्या जगापासून वेगळी होतेय असं झालेलं होतं. माझी आणि प्रीतमची रूम बाजू बाजूलाच होती. मला माझ्या दरवाज्यापाशी सोडून तो पुढे जाणार इतक्यात तो मला म्हणाला की चल जरा अजून थोडा वेळ गप्पा मारू. लेटस हॅव्ह सम शँपेन. मला खरंतर नको असं जोरात ओरडून सांगावंसं वाटत होतं पण मी हो म्हणाले. त्याच्या मागोमाग त्याच्या रूममध्ये शिरले. सोफ्यावर बसले. प्रीतम बार फ्रीजकडे गेला

- देवयानी

Tuesday, November 15, 2011

देवयानी (30)

हे सगळं सोपं होतं. म्हणजे मी मला स्वतःला समजावणं की टाइम इज रनिंग आऊट. पण लग्न करण्यात एक मोठी अडचण होती. ती म्हणजे मला आवडेल आणि आयुष्य सोबत घालवावंस वाटेल असा नवरा मिळणं. कळत नकळत मी गेली काही वर्ष तो लाईफ पार्टनर शोधत होतेच. पण नाही मिळाला. आता कसा मिळणार होता? शेवटी मी मॅट्रिमोनिअल साईटवर नाव नोंदवलं. तेव्हा हा प्रकार तसा अनोळखी होता. हल्ली सर्रास मुलं मुली ह्या साईट्स वापरात. पण दुसरा काही उपाय नव्हता. म्हणून शेवटी प्रोफाइल तयार केली.

मला अगदी आपण नोकरीसाठी कसा बायो डेटा बनवतो त्याचीच आठवण झाली. हळू हळू काही मुलं ऍप्रोच व्हायला लागली. पण हे सगळं विचित्र होतं. म्हणजे मुलाला आपण स्वतःचा नंबर द्यावा तर मुलगी आगाऊ आहे असं मूलगावाले म्हणणार. जर आईचा दिला तर आईचे जातिधर्माचे क्रायटेरिआ आड येणार. अर्थात ते शेवटी आड येणार होतेच. माझी माझ्या नवऱ्याकडून असलेली अपेक्षा आणि माझ्या आईच्या माझ्या नवऱ्याकडून असलेल्या अपेक्षा ह्यांचा लघुतम सामाईक विभाजक शून्य होता (एकही नाही) त्यामुळे असा मुलगा कधी मला मिळेल आणि माझं लग्न जमेल अशी पुसटशीही आशा मला नव्हती.

पण कधी कधी अशक्य वाटणाऱ्या घटना पटकन घडून जातात. अमेरिकेत बरीच वर्ष शिकलेला, स्थिर स्थावर झालेला, आणि आता लग्नासाठी मुली शोधणारा, वयाने माझ्या वाढलेल्या वयापेक्षाही वाढलेला, दिसायला सुंदर, वाटायला सुशील, सुसंस्कारित आणि पंधरा दिवसासाठीच भारतात येणारा, आई वडिलांनी शॉर्टलिस्ट केलेल्या वीस मुलींना दिवसाला पाच ह्या रेटनी चार दिवसात बघणारा, त्यातला पाच मुलींची पाचव्या दिवशी सेकंड राउंड घेणारा आणि त्यातल्या दोन मुलींची सहाव्या दिवशी थर्ड राउंड घेऊन आठवड्याच्या आत मुलगी पसंत करणारा आणि पुढच्या आठवड्याच्या आत साखरपुडा करून अमेरिकेला पुन्हा जायची घाई असलेला मनीष मला भेटला.

त्याच्या वीसाच्या पाच, पाचाच्या तीन आणि तिनातली एक इतका माझा प्रवास झाला आणि पुढच्या तीन दिवसात साखरपुडाही झाला. आयुष्याचा इतका मोठा निर्णय मी मनीषबरोबर जवळ जवळ दोन तास वीस मिनिटं घालवून घेतला. अर्थात त्यात चुकण्यासारखं काहीही नव्हतं. मनीष जेन्युइनली साधा होता. प्रचंड शिकलेला होता. बराच पगार मिळवणाऱ्या बायकोला अजिबात गर्व होऊ न देण्याइतका दणदणीत पगार त्याला होता. तसंही मी अमेरिकेला गेल्यावर काम करू शकणार नव्हतेच त्यामुळे पगाराचा प्रश्न नव्हताच. पण एकंदरीत नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. वर आमची जात, पोटजात सारखी होती, गोत्र वेगवेगळी होती, पत्रिका जुळत होती. ग्रहताऱ्यांना आमची युती एकदम मान्य होती. आईला मान्य होती. आणि नाही म्हणण्यासारखं मला त्यात काही वाटलं नाही.

साखरपुडा झाला. चार दिवसांनी मनीष अमेरिकेला परत जायचा होता. मलाही पुढच्या आठवड्या ऑफिसच्या कामासाठी सिंगापुराला जायचं होतं. शक्य होईल तेवढा वेळ आम्ही एकत्र घालवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तो पुण्याचा आणि मी मुंबईची त्यामुळे अजून प्रॉब्लेम्स. मला एकच गोष्ट मनातून खात होती. त्याला अनुराग बद्धल मी काहीही सांगितलं नव्हतं. अनुराग जरी माझ्या आयुष्यातून मुळासकट मी उखडून टाकला होता तरी त्याच्याबरोबर घालवलेल्या दिवसांची भुतं मला सहजासहजी सोडणार नव्हती.अनुरागबरोबर जे झालं ते मनीषला न सांगता लपवून ठेवणं मला चुकीचं वाटत होतं.

मनीष अमेरिकेला गेला त्या दिवशी आम्ही मुंबईत तो अमेरिकेला जाण्याआधी शेवटचं भेटलो. ताज महाल पॅलेसमध्ये सी लाउंज म्हणून एक सुंदर रेस्टॉरंट आहे. तिकडे मी त्याला घेऊन गेले होते. चाचपडत, अडखळत शेवटी मी त्याला अनुरागबरोबर जे झालं ते सगळं सांगितलं. अख्खा वेळ मी त्याची रिऍक्शन बघत होते. तो अजिबात चिडला, रागावला नाही. शांतपणे त्याने ऐकून घेतलं. ठीक आहे, एवढं फक्त म्हणाला. मनावरचा ताण एकदम उतरला. पुढचा वेळ माझ्यासाठी छान गेला. मी त्याला एअरपोर्टवर सोडायलाही गेले. त्याचे पुढचे दोन दिवस प्रवासात जाणार होते. मी ही दोन दिवसांनी सिंगापुराला जाणार होते, त्यामुळे त्यानेच मला शक्य होईल तेव्हा माझ्या मोबाईलवर फोन करायचं ठरलं.

तो गेला. पुढचे दोन दिवसही फुलपाखरासारखे उडून गेले. सिंगापुराला आमचं एक अतिशय महत्त्वाचं प्रपोसल होतं. तिथले तीन लोक ह्या प्रपोसलवर काम करीत होते. मी आणि प्रीतम इथून जाणार होतो. आमच्या टार्गेट्स च्या दृष्टीने जीवन मरणाची लढाई होती. त्यात माझाही मूड एकदम मस्त काम करण्याचा होता. कधी नव्हे ते मला काहीतरी टँजिबल फ्युचर दिसत होतं. खूप छान होते ते दिवस.

- देवयानी

देवयानी (29)

कामाचा धडाका लागला होता. खूप ट्रॅव्हलिंग चाललं होतं. बट आय वॉज एंजॉयिंग. एकतर माझ्याबरोबर नेहमी प्रीतम असायचा. टु बी फेअर, त्याच्यासोबत मी असायचे. कारण त्याचं तिथे असणं जास्त महत्त्वाचं होतं. तो बॉस होता आणि मी त्याच्या हाताखाली काम करीत होते. पण असं फॉर्मल रिलेशन आमच्यात कधी निर्माण झालंच नाही. कारण एकत्र काम करण्याआधी आम्ही चांगले मित्र होतो. अर्थातच आम्ही जास्त वेळ एकमेकांसोबत घालवत असू. आता ऑफिसमध्ये ह्याची चर्चा सुरू झाली. प्रीतम आणि देवयानीचं काहीतरी लफडं चाललंय.

अशा गोष्टींची मला सवय होती आणि अजूनही आहे. मुळात बाई प्रगती करतेय हेच बऱ्याच जणांना खुपतं. बाईकडून हरलेलं नाही चालत अजूनही पुरुषाला. मग कंपनीमधलं इंटर्नल पॉलिटिक्स चालू होतं. चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात, ऐकल्या जातात आणि त्यावर विश्वासही ठेवला जातो. हे फक्त बायकांच्या बाबतीत होतं असं नाही. हे सर्वांच्याच बाबतीत होतं, पण मुलींच्या, विशेषतः अविवाहित, वय उलटून चाललेल्या आणि यशस्वी मुलींच्या बाबतीत हे सर्व करण्यासाठी एक सोपा विषय उपलब्ध आहे. तो म्हणजे लफडं. थोडं थोडं माझ्या कानावर आलेलं होतं. पण मी कधीच अशा गोष्टी सीरियसली घेतल्या नाहीत.

प्रीतमला काय वाटेल हे मात्र राहून राहून माझ्या मनात यायचं. उगाच माझ्यामुळे मिषू आणि त्याच्यात वाद व्हायला नकोत. शिवाय मिषूही माझी मैत्रीणच होती. पण ह्या गोष्टी बोलायच्या तरी कशा? पण उगाचच मन खात राही. शेवटी एकदा मी हिय्या करून मिषूला जाऊन भेटले. तिला सांगितलं की असं काही कंपनीमध्ये चाललंय. तुझ्या कानावर काही आलं तर प्लीज विश्वास ठेवू नकोस. असं काही नाहीये. मी तिला हे सांगितल्यावर ती खो खो हसायला लागली. कारण तिला प्रीतमने सगळंच अगोदर सांगितलेलं होतं.

मनावरचं दडपण दूर झालं पण तरीदेखील आमच्या वागण्या बोलण्यातला मोकळे ढाकळेपणा बऱ्यापैकी कमी झाला. एकतर कुणालाही काहीही बोलायची संधी द्यायची नव्हती आणि दुसरं म्हणजे राईचा पर्वत करणारी जमात आमच्या कंपनीत मुबलक होती अजूनही आहे. त्यामुळे काय अफवा पसरतील ह्याची काही गॅरेंटी नव्हती.

घरी आईची भुणभूण चालूच होती. लग्न कर लग्न कर. मलाही मनातून आतून वाटत होतं की आता बस ही धावपळ, दगदग. चांगला जोडीदार निवडावा, लग्न करावं आणि सेटल व्हावं. एक स्त्री म्हणून आयुष्यात पुरुष असणं जरूरीचं वाटत होतंच, पण अलीकडे, म्हणजे जशी माझ्या मैत्रिणींची मुलं मोठी व्हायला लागली, तशी आपल्यालाही एक मूल असावं ही इच्छा प्रबळ व्हायला लागली. त्यासाठीचा एकमेव राजमार्ग म्हणजे लग्न करणे. शिवाय आई होण्यासाठी वयाची मर्यादाही माझ्या डोक्यात पिंगा घालीत होतीच. अर्थात चाळीशीपर्यंत मुलं झालेल्या बायका माझ्या ओळखीच्या होत्या. पण वयाबरोबर बाळ होण्याची कमी होत जाणारी शक्यता आणि कॉंप्लिकेशन्स होण्याची वाढत जाणारी शक्यता ह्यामुळे तिशी जेमतेम पार करत असतानासुद्धा आपल्याकडचा वेळ कमी होत चालल्याची जाणीव मनाला व्हायला लागलेली होती.

- देवयानी

Thursday, November 10, 2011

देवयानी (28)

कामाचा झपाटा चांगलाच वाढला. आधी मी डोमॅस्टिकमध्ये होते. खूप खूप फिरले. दिल्ली, कलकत्ता दर पंधरवड्याला एकदा होत होतं. दिल्लीची मिजास मला खूप आवडायची. अजूनही आवडते. तिथल्या माणसात एक नॅचरल ऍरोगन्स आहे. तो खरा आवडू नये पण का कोण जाणे मला आवडतो. कलकत्त्याची गोष्टच वेगळी. तसे कलकत्त्याचे दोन भाग वाटले एक अजूनही कलोनिअल इरामधला आणि एक पूर्णपणे वेगळा, गलिच्छ. एकीकडे कलेचं माहेरघर, दुसरीकडे लाल रंगाचं कॉम्युनिस्ट शहर. रवींद्रनाथांचं शहर आणि बंकीमदांचंसुद्धा. ज्योती बासूंचं आणि सौरभ गांगुलीचंही.

कामाचा व्याप असायचाच पण फिरायलाही मिळायचं. एकदा अशी क्लायंट मीटिंग आटोपून क्लायंट कंपनीच्या एका मॅनेजरबरोबर मी बोलत बोलत बाहेर पडत होते. बोलता बोलता सहज शांतिनिकेतनचा विषय निघाला. तर तो म्हणाला की तू अजून दोन दिवस असशील तर एक पौष मेला की पौष फेस्टीवल असतं त्याला जाऊ शकशील. पुढच्या दहा मिनिटात त्यानंच मला घेऊन जायचं कबूल केलं. एक तीर, दो शिकार. शांतिनिकेतन तर पाहायला मिळणारंच होतं. आणि आमचं प्रपोसल ऍक्सेप्ट होणार की रिजेक्ट होणार हे ठरवणाऱ्या लोकातल्या एका महत्त्वाच्या माणसाबरोबर अख्खा दिवस घालवायला मिळणार होता. त्याला मी आवडले तर त्याला विंफोचं प्रपोसलही आवडणार होतं.

आय मस्ट से, वुमेन हॅव्ह ऍन अपर हँड सेलींग टू मेल डॉमिनेटेड टॉप मॅनेजमेंट. मेल काँपिटिशनला जेवढा टाइम डिसिजन मेकर्सबरोबर मिळत नाही तेवढा मला मिळतो. अजून काही वर्ष तरी नक्कीच मिळत राहील. असो पण ऑल दॅट इज पार्ट ऑफ द गेम. टॉप मॅनॅजमेंट इज नेव्हर फिमेल डॉमिनिटेड.

असो, तर ह्या माणसाबरोबर मी तिथे गेले. माझ्या अपेक्षेपेक्षा शांतिनिकेतन खूपंच वेगळं निघालं. म्हणजे शांतता अपवादानंच होती तिथे. नुसते टूरिस्ट्स आणि स्टॉल्स, गर्दी, गोंधळ. खाणं उत्तम होतं आणि कंपनीही वाईट नव्हती. दिवस चांगला गेला. परत उगाच दोन दिवस कलकत्त्याला काहीही न करता राहायला मिळालं. वर आमचं प्रपोसल ऍक्सेप्ट झालं हे वेगळं सांगायला नकोच.

दिल्लीहून अगदी असंख्यवेळा मी ताजमहालला गेलेले आहे. त्या जागेची मजाच काही और आहे. लोकं तिथं जोडप्याने जातात. मला एकटीलाच तिथे खूप छान वाटतं. अर्थात जोडीनं जायला जोडी असावी लागते. तेव्हा तरी ती नव्हती. पण तरी संधी मिळाली की ताजमहाल पाहायचाच.

माझ्या बाबांची खात्री होती की ते शंकराचं देऊळ आहे म्हणून. गमतीचा भाग म्हणजे ते कधीही तिथे गेलेले नव्हते. तरी खात्री पूर्ण. त्यामुळे ताजमहाल पाहताना बाबांची आठवण यायची. अजूनही येते. मग उगाच खरंच देवळासारखं काही दिसतंय का ते पाहायचं. कधी मुमताज व्हायचं, कधी शाह जहान व्हायचं, कधी औरंगजेबही व्हायचं. कधी लीडरमधला दिलीप कुमार व्हायचं, कधी वैजयंती माला व्हायचं, कधी रफी व्हायचं आणि कधी लता व्हायचं. कधी तो संगमरवर व्हायचं, कधी यमुना व्हायचं, कधी यमुनेतलं प्रतिबिंब व्हायचं. एक वेगळीच एनर्जी त्या जागेमध्ये आहे. कुणी ते बांधलं हे मला माहीत नाही, पण ज्याने बांधलं, ज्याला अशी कल्पना सुचली की असा ताज महाल बांधता येईल आणि तो निरतिशय सुंदर दिसेल, त्याच्या सृजनशीलेला त्रिवार नमस्कार.

काम वाढत होती. चांगले रिसल्टस दिसायला लागलेले होते. आणि माझी पब्लिसिटी करायला प्रीतम होता. आठ दहा महिन्यातच कामाचं चीज झालं. मला डोमेस्टीकमधून इंटरनॅशनल मध्ये टाकलं. अर्थात विंफो खूप मोठी कंपंनि होती आणि आहे. सर्वच महत्त्वाच्या देशात आमची ऑफिसेस आहेत. तिथे राहणारे लोक, तिथे आमच्यासाठी काम करतात, पण तरीही इंडियातून स्टाफला बऱ्याचदा तिथे सेल्स एफर्टसाठी जायला लागतं. बरं इंटरनॅशनल बिझनेस मध्येही बरेच भाग आहेत. प्रीतम आमच्या डिव्हिजनचा एशिआ पॅक हेड होता. अर्थातच मी त्याच्याबरोबर कामाला सुरुवात केली.

ते दिवस अतिशय सुंदर दिवस होते. एक तर प्रीतमकडून मला पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्याला तोंडावर मी काही नाही पटलं तर सांगू शकत होते आणि त्या गोष्टीचा त्याला राग येणार नव्हता. त्याच्याकडून अनंत गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. तो फार ऑर्गनाइज्ड आहे. व्हाईट बोर्ड त्याची सर्वात आवडती मॅनेजमेंट ऍक्सेसरी आहे. मी खूप इंपल्सिव्ह आहे. माझ्या डोक्यातून आलेली कल्पना सर्वोत्तम आहे असा माझा ठाम समज आसतो. आम्ही दोघं एकत्र काम करायला लागल्यावर माझी रॉ क्रिएटिव्हीटी आणि त्याचं कंट्रोल्ड प्रोजेक्शन ह्याचा सुंदर मिलाफ झाला. कुठे मला पुढे करायचं आणि कुठे मला शील्ड करायचं हे त्याला बरोबर कळतं. काकांकडून शिकलेला मंत्र. आपल्या टीममधले लोकं काय करू शकतात ह्यापेक्षा काय करू शकत नाहीत हे लीडरला माहीत असणं आवश्यक आहे. प्रीतम हा मंत्र जगतो.

एनीवे मी प्रीतमबद्दल लिहीत राहिले तर अशीच रात्र उलटून जाईल.

- देवयानी

Monday, November 7, 2011

देवयानी (27)

एक आवर्तन पूर्ण करून मी पुन्हा जिथून सुरवात केली तिथेच पोहोचले. ही आयुष्याची फार मोठी गंमत आहे. आपण पळत राहतो, पण दिशा ठरवायचा हक्क आपल्याला नसतो. माझं नशीब असं होतं आणि अजूनही आहे, की ते मला गोल गोल फिरवत राहतं. मी आकांताने धावायचा प्रयत्न करते, पण राहून राहून त्याच त्याच ठिकाणी पोचत राहते. ऑफिस असो नाहीतर घर. काहीतरी वेगळं करायला जावं आणि त्या वेगळ्या कशावर तरी जिवापाड जीव लावावा तर नशिबाचा फेरा असा की मी पुन्हा त्याच वळणावर उभी.

बाबा गेल्यावर आईमध्ये मात्र खूप फरक पडला. ती माझ्याशी खूप चांगलं वागायला लागली. मीही तिच्याबरोबर आधीपेक्षा खूपंच कंफर्टेबल होते. माणूस हा एक नंबरचा पॉलिटिकल प्राणी आहे. अगदी आपल्या रक्ताच्या नातेवाईकांशीसुद्धा तो कळत नकळत राजकारण करत असतो. हेतूत नसेलही पण आपोआप तसं घडत जातं. बाबांच्यापाठी मी घरातला कर्ता पुरुष झाले. माझ्याशी वाकड्यात जाणं आईला कठीण होतं. मध्ये मध्ये ती माझ्या लग्नाचा विषय काढायची. पण पूर्वीसारखा अट्टहास आणि आदळ आपट नव्हती. ह्याचं एकमेव कारण म्हणजे माझं असणं ही तिची गरज झालेली होती. तिचं असणं ही माझी गरज होती का? मला नाही म्हणायचा मोह होतोय, पण खूप जास्त विचार केला तर त्या क्षणी ती माझ्या खूप दूर असूनही सर्वात जवळची होती. बाकी सर्वांना कोण ना कोण होतं. श्रेयाला तिचा नवरा होता, प्रीतमला त्याची फॅमिली होती. मला कुणीच नव्हतं आणि आईलाही. त्यामुळे मी आणि आई अशी एकदम हायली अनलाइकली अलायन्स झाली.

बऱ्याचदा कॉर्पोरेट विश्व रुथलेस, इमोशनलेस वाटतं. पण खरं सांगायचं तर तेच नियम लावून आणि मोडून आपण आपली आयुष्यही जगत असतो. तिथे पैसा मिळवणं हे एकमेव साध्य असतं, आपल्या आयुष्यात कदाचित स्टॅबिलिटी, सेक्स, प्रेम, ममता, बिलाँगिंग ह्याचा ट्रेड ऑफ आपण करीत असतो. काहीतरी घेत असतो, त्या बदल्यात काहीतरी देत असतो. आणि कदाचित आपल्यालाच गिल्टी फिलिंग येऊ नये म्हणून त्याला गोंडस नावं देत असतो. आई वडिलांना दैवत मानतो, बायकोला लक्ष्मी मानतो आणि त्यांची पूजा बांधतो.

असो माझे हे विचार मला स्वतःलाच कधी कधी खूप रुक्ष आणि कोरडे वाटतात. पण कदाचित माझ्या आयुष्यात काही दिल्याशिवाय मला काही मिळालेलं नाही म्हणूनही असेल. कदाचित ह्या जगात खरोखरच एकमेकांवर कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारे असतील. पण मग असं असेल तर नवऱ्याचे दुसऱ्या बाईशी संबंध आहेत हे लक्षात आल्यावर बायकोला राग का यावा? आपण सोडून आपल्या नवऱ्याने दुसऱ्या कुणावरही प्रेम करू नये ही अपेक्षाच नाही का? आणि ही अपेक्षा नवऱ्याने पूर्ण करावी ह्यासाठी आपण त्याच्या अपेक्षा पूर्ण करत राहणं हा ट्रेड ऑफ नाही का?

ही डीबेट कंटिन्यू करण्यात काही अर्थ नाही. कारण मी इथे मायनॉरिटी मध्ये असेन ह्यात वादच नाही.

तर असे हे ट्रेड ऑफ्स शोधत शोधत माझं आयुष्य चाललेलं होतं. आईमुळे घरी गेल्यावर जेवण काय बनवायचं, रविवारी घर साफ करायला वेळ कुठून काढायचा, हे जे एकटी राहताना प्रश्न पडले असते ते पडणं बंद झालं. स्वतःला अधिकाधिक वेळ देता यायला लागला. गेले काही दिवस धावपळ दगदग ह्याच्यामुळे व्यायामाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं होतं. आत नियमितपणे मी ऑफिसच्या जीममध्ये जायला लागले. फिटनेस वाढला की मला स्वतःबद्दल एक कॉंफिडन्स येतो. मला वाटतं सर्व बायकांचं असंच असतं. आपण एक शतांश टक्क्याने जरी चांगल्या दिसायला लागलो तर मनाला उभारी येते. माझंही तसंच झालं.

पुन्हा एकदा आयुष्यात रिकामपण यायला लागणार असं वाटत असतानाच एक मस्त गोष्ट घडली. फायनली विंफोनं मला बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये घेतलं. अर्थात त्यासाठी फक्त आणि फक्त प्रीतमच कारणीभूत होता. त्यानेच वरती पाठपुरावा केला होता माझ्यासाठी. डिलिव्हरीमधून सुटल्याने मला अतिशय बरं वाटलं. दिवस दिवस कॉम्प्युटरच्या समोर बसून काढणं फारच त्रासदायक होतं. ते सुटणार होतं. इंटरनॅशनल बिझनेस, त्यासोबत येणार हाय फ्लाइंग लाईफ, फिरणं, मोठमोठ्या एक्झेक्युटिव्हजच्या समोर प्रेसेंटशन्स देताना येणार ऍड्रेनलीन रश, कोणत्याही लीगल किंवा इल्लीगल ड्रगने येऊ शकत नाही अशी यशस्वी सेलनंतर येणारी झिंग, आणि त्याचबरोबर फेल्युअरने येणारं जगबुडी झाल्यासारखं डिप्रेशन.

सेलिंग इज इनडीड अ रोलर कोस्टर ऍड आय वॉज लाइक अ किड डाइंग टू गेट इन.

- देवयानी

Wednesday, November 2, 2011

देवयानी (26)

लखनऊ, कलकत्ता, दिल्ली आणि मुंबई एवढा मोठा प्रवास करून मी मुंबईला उतरले. रात्रभर झोप झाली नव्हती डोकं चांगलंच ठणकत होतं. टॅक्सी करून कशीबशी घरी पोचले. घरात शिरले तर समोरंच जमिनीवर बाबांचा मृतदेह ठेवला होता. नाका कानात कापसाचे बोळे घातले होते. मला एकदम भडभडून उलटी होईल असं वाटलं. कोंकणातले नातेवाईक सगळे आलेले होते.

कार्डिऍक अरेस्ट. गुरवारी संध्याकाळी बाबांना हार्ट अटॅक आला. माझा फोन अनेकदा वाजूनही मी उचलला नाही. मला त्या गोंधळात आवाज जाणं शक्यच नव्हतं. घरचा फोन तीनदा येऊन गेल्याचं दिसलं पण पुन्हा फोन करावासा वाटला नाही. उद्या करू म्हणून मी झोपले. इतक्या आनंदात मी ती संध्याकाळ घालवली आणि माझे बाबा इथे मरण पावलेले होते. ते असताना त्यांचं माझ्यावर किंवा माझं त्यांच्यावर कणभरही प्रेम असेल असं मलाही वाटलं नसतं. पण आज त्यांना असं पाहून खूप वाईट वाटलं. खरं रडूही आलं असतं. पण अश्रू डोळ्यापर्यंतच येऊन थांबले.

संध्याकाळी हे झालं तेव्हा आई एकटी होती. आमचे शेजारी डॉक्टर आहेत. त्यांना बोलावलं. त्यांनी सांगितलं की ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हालवलं तर काही होऊ शकेल, पण पोचेपर्यंतच बाबा गेले होते. माझ्यासाठी बॉडी थांबवली होती. मला खूप गिल्टी वाटलं. कसेही असले तरी माझे वडील होते ते. नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडताना मी फक्त आईला सांगून गेले होते. बाबांना येते एवढं जरी मी म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण ना मी सांगितलं ना त्यांनी विचारलं.

असो पुढचा पंधरवडा अतिशय निराशेमध्ये गेला. माणसं समाचाराला येत होती. आई तेच रडगाणं गात होती. तिची ती टेप ऐकून माझा जीव नकोसा झाला होता. चीड येत होती पण तिचं कौतुकही वाटत होतं. प्रत्येक वेळी ती तितक्याच प्रमाणे बाबांबद्दल बोलत होती. टोचून बोलण्याशिवाय आणि घरचा पैसा समाजसेवेच्या नावाखाली खर्च करण्याशिवाय आयुष्यभर त्यांनी काहीही केलं नाही, तरीही तिचं त्यांच्यावर निःसीम प्रेम होतं, ते मला दिसलं. प्रत्येक वेळी त्यांना जरा लवकर हॉस्पिटलात नेलं असतं तर ते वाचले असते, हेही ती तितक्याच आशेने म्हणत होती. जसं काही हा सगळा प्रसंग रिवाइंड करता येईल आणि बाबांना लवकर हॉस्पिटलात घेऊन जाता येईल.

सगळे दिवस, त्याची उस्तपास्त. दोन आठवडे गेले आणि मी आईला म्हटलं की मी आता निघते. मला वाटतं, ही शक्यता अजून तिच्या डोक्यात आलेली नव्हती. आता तिला एकटीला राहायला लागणार होतं. तिच्या डोळ्यात ती भीती मला दिसली. तिची नजर टाळत मी माझी बॅग उचलली आणि जिना उतरले. टॅक्सी केली आणि माझ्या घरी पोचले. नव्या कोऱ्या करकरीत घरावर आणि घरातल्या सामानावर तीन आठवड्यात धुळीची पुटं जमलेली होती. मी वेड लागल्यासारखं घर साफ केलं. पंधरा दिवसांचा एवढा शीण आला होता, पण तो घालवायलाच की काय, मी देहभान विसरून घर साफ केलं. नक्की काय साफ करत होते मी?

अंघोळ केली, कपाट उघडलं आणि माझ्या आवडत्या रेड वाइनने ग्लास भरला. आरामखुर्ची बाल्कनीत ठेवली आणि त्याच्यावर झोके देत देत, समुद्राकडे बघत संध्याकाळ घालवली. मनात सतत बाबांचेच विचार येत होते. त्यांनी मला अगदी बिचारं करून टाकलं होतं, शाळेत, कॉलेजात. पण तरीही ते गेल्याचं मला दुःख होत होतं. वाइन पोटात गेली आणि पंधरा दिवस अडलेला बांध फुटला. अगदी धाय मोकलून मी रडले. मी का रडले हे मला सांगता येणार नाही. बाबा गेले म्हणून मी रडले, मला बाबा कधी भेटलेच नाहीत म्हणून मी रडले. की जेवढे मिळत होते तेवढेही घेण्याचे कष्ट मी घेतले नाहीत म्हणून मी रडले?

इतकी विचित्र अवस्था झाली होती माझी. की मी तशीच घर लॉक करून खाली उतरले आणि टॅक्सी करून पुन्हा माझ्या जुन्या घरी आले. आईला म्हटलं की आई तू माझ्याबरोबर राहायला चल. मी हे का केलं? मला माहीत नाही. ज्या आईपासून दूर पळण्यासाठी मी इतकी दिवस तरसले होते त्याच आईला मी स्वतः माझ्या घरी बोलवत होते. ती नाही म्हणाली. त्यानं तर मला आणखीनच वाईट वाटलं. जन्मभर नवऱ्यावर अवलंबून राहिलेली बाई ही. हिचं कसं एकटीने होणार होतं? साधी ट्यूब बदलायची तर काय करायचं असतं हेही तिला ठाऊक नव्हतं.

दुसऱ्या दिवशी माझं सामान आवरून मीच माझ्या जुन्या घरी परत आले.

- देवयानी