Thursday, May 31, 2012

साठी आणि पिंजरा

बाबाची साठी झाली. साठ वर्ष जगणं हे काही त्याच्यासाठी कर्तृत्व नव्हे. आयुष्यात त्याचं एक तत्त्व आहे. ते मला खूप आवडतं. कुठे पोचलात हे जितकं महत्त्वाचं तितका प्रवास किती मस्त झाला हेही महत्त्वाचं. ह्या त्याच्या तत्त्वामुळे आम्ही कधी काळी मुंबईहून गोव्याला पोचायला पाच पाच दिवस घेतलेले आहेत. अर्थात ते दिवस सरले, ते रस्तेही सरले. आयुष्याच्या नागमोडी रस्त्यात वेगवेगळी वळणं येतंच गेली. बाबाची साठी हा असाच त्या रस्त्यावरचा एक थांबा.

वाढदिवस साजरा वगैरे करणं हे त्याला अजिबात मानवत नाही. म्हणून वर्षभर आधीपासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं. एकदमच अचानक मी आणि विन्या एकाच वेळी भारतात कसे आलो अशी शंका येऊ नये म्हणून ह्या सुट्टीचा प्लॅन चांगला वर्षभर आधीपासून केला होता. सगळ्या नातेवाइकांना, बाबाच्या खास मित्रांना आधीपासूनच वेळ आणि जागा सांगून ठेवलेली होती.
त्याला अजिबात कल्पना येऊ नये म्हणून खास माझ्या सासऱ्यांची मदत घेतली. त्यांनी चक्क विन्याला आमच्या फार्म हाऊसवर पनवेलला घेऊन जायचा (खोटा खोटाच) बेत आखला. विन्याला नेणार म्हणजे मलाही जाणं क्रमप्राप्तंच होतं. सगळी तयारी अशी चाललेली होती.

सकाळी उठल्या उठल्याच आम्ही सगळ्यांनी त्याला विश वगैरे केलं. आम्ही आणलेली गिफ्ट्स देऊन टाकली. मुद्दाम माझा नवरा आमच्या घरी आला, त्यानंही बाबाला विश केलं आणि मी आणि विन्या त्याच्यासोबत निघालो. संध्याकाळपर्यंत बरीच तयारी करायची होती. आम्ही तिघेही खरेदी करत फिरत होतो. सईला सासूबाईंकडे ठेवलं.

संध्याकाळी आई बाबाला म्हणाली चला चौपाटीवर फिरायला जाऊ. चौपाटी हा बाबाचा वीक पॉइंट आहे. आमच्या घरापासून चौपाटी म्हणजे अगदी पाच मिनिटाचा रस्ता. बाबा बरोबर अगणित वेळा मी चौपाटीवर गेलेय. चौपाटीची भेळ खात खात त्याचं तत्त्वज्ञान ऐकायचं ही गंमत वेगळीच. आई त्याचं काही ऐकून घेत नाही. आणि त्याला माझ्यापेक्षा दुसरा चांगला ऑडिअन्स नाही. वर भेळेचं ऍट्रॅक्शन असायचंच.
असो तर चौपाटीला जायला बाबा नाही म्हणणं शक्यच नव्हतं. ते तिथे पोचले तसे एकेक करून बाबाचे मित्र, काही नातेवाईक आम्ही सगळे जमलो. त्याला खरंच धक्का बसला. केक कापला. मोठ्याने सगळ्यांनी हॅपी बर्थ डे म्हटलं आणि अगदी लहान मुलासारखे फुगेही हवेत सोडले. खूप मजा आली.

सगळी आवरासावर करून आम्ही चालत घरी येत होतो. विन्या आणि आई पुढे होते. मी आणि बाबा आणि माझ्या कडेवर सई असे आम्ही तिघं मागे होतो. कधी नव्हे तो बाबा भावुक झाल्यासारखा मला वाटला. तो बोलायचा थांवला की समजावं की काहीतरी गडबड आहे. मग मीच त्याला काही बाही विचारत बसले. म्हटलं काय रे बाबा इतकी आम्ही तुझी साठी दणक्यात साजरी केली, कसं काय वाटलं?

दोन सेकंद तो काही बोललाच नाही. मी त्याला विचारलं. काय झालं? गप्प का झालास? मग म्हणाला खरं खरं उत्तर देऊ तुझ्या प्रश्नाचं की खोटं? म्हटलं एकदम खरं खरं दे.

म्हणाला सुखोत्सवे असा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे.

एवढं बोलला आणि माझ्या हातातनं सईला त्यानं घेतलं. तिच्याशी घरी पोचेपर्यंत तो खेळत राहिला. मी मात्र यंत्रासारखी त्यांच्या मागून चालत होते.


- संवादिनी

Thursday, May 24, 2012

दुसरी आई आणि पहिली आई

नवरा बारा गावं फिरत असतो, खाण्यापिण्याची आबाळ, प्रवासाचा त्रास आणि बारा गावची वेगवेगळी हवा. त्यात थंडी वाढायला लागलेली. परत आला तोच अंगात ताप घेऊन. बरं शनिवार रविवार झाल्यावर त्याला परत बाहेरगावी जायचं होतं. पण अंगावर दुखणं काढायची सवय आणि प्रचंड आवड त्याला आहे, त्यामुळे दोन दिवस शांतपणे बिछान्यात पडून आराम करायचा सोडून हा बागेत काम करीत बसला. सोमवार उजाडला तसा मी आणि माझी मुलगी झोपेतून उठायचा आत निघून सुद्धा गेला.


नेहमीप्रमाणे मी थोड्या वेळानं उठले. माझ्या छकूला तिच्या डे केअरमध्ये सोडून मला कामावर जायचं असतं, त्यामुळे सकाळची धावपळ फार असते. पण उठले तेच अंगात कणकण घेऊन. दुखण्याची चिंता करायला वेळ कुणाकडे होता? पटापट आवरून सईला तिच्या ठिकाणी सोडलं आणि मी कामावर पळाले.

दुपारपर्यंत सर्दीचा चांगलाच त्रास व्हायला लागला. नवऱ्याचा फोन येऊन गेला. त्याचीही तब्येतीची कुरकूरच होती. दुपारी एक महत्त्वाची मीटिंग होती, तोपर्यंत आपल्याला बरं नाहीये ह्याची जाणीव फारशी नव्हती, पण ती मीटिंग पार पडली आणि मी माझ्या डेस्कवर परत आले आणि मग लक्षात आलं की अंग चांगलंच फणफणलं होतं. घरी जाणं आवश्यकंच होतं. पण आता घरी गेले तर सईला आणायला परत बाहेर पडावं लागलंच असतं. बर नवऱ्याचा ताप मला आला, माझा तिला आला तर?

जुजबी औषध घेतलं आणि तशीच काम करीत राहिले. अर्ध्या तासातच सईच्या डे केअरमधून फोन आला. सईलाही ताप चढलाय आणि नेमकी मी तिच्या बॅगेत पॅनॅडॉल ठेवायची विसरले होते. इथले नियम असे की मुलगी तापाने फणफणली तरी चालेल पण डे केअरचे लोकं स्वतः औषध देत नाहीत. जर तिच्या पालकांनी औषध सोबत दिलं असेल तेच औषध ते देऊ शकतात. तसंही तिला ताप आहे म्हटल्यावर मला ताबडतोब जाणं भाग होतं.

ऑफिसात उद्या येत नाही म्हणून सांगून मी बाहेर पडले. सईला चांगलाच ताप भरलेला होता. पोरगी अगदी मलूल होऊन गेली होती. एरवी तिला आणायला गेलं की तिच्या बोबड्या भाषेत आज काय काय केलं हे सांगायचा तिला कोण उत्साह. पण आज मात्र बिचारी खांद्यावर डोकं टाकून पडून राहिली. डे केअरमध्ये त्यांनी शेवटचा ताप बघितला तेव्हा चाळीस होता. त्यामुळे पहिलं तिला घरी जाऊन पॅनॅडॉल (म्हणजे भारतातलं मेटॅसीन वगैरे) द्यायलाच हवं होतं.

घरी जाऊन तिला औषध दिलं. मीही घेतलं. साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी तिचा ताप थोडा उतरायला हवा होता. तो उतरायच्या ऐवजी आणखीनंच चढला. संध्याकाळ झालेली होती आमचे डॉक्टर बंद. नवऱ्याला फोन केला. त्याने इंटरनेटवरून एका मेडिकल सेंटरचा पत्ता काढला. धावत धावत तिथे गेले तर तिथल्या डॉक्टरीण बाईंनी ताप जास्त असला तरी काळजी करण्याचं काही कारण नाही असं सांगून बोळवण केली. घरी येऊन पुन्हा ताप पाहिला तर बेचाळीस डिग्रीज होता.

आता मात्र माझा धीर सुटायला लागला. मी नवऱ्याला पुन्हा फोन केला. त्यालाही टेन्शन आलं. तो म्हणाला ताबडतोब गाडीत घाल आणि हॉस्पिटलला ने म्हणून. मलाही पटलं. हॉस्पिटलला गेले. तिथे सगळ्या टेस्ट झाल्या, एक्सरे काढला आणि पुन्हा काहीच झालं नाही असं डॉक्टरनं सांगितलं. पण दरम्यानच्या काळात त्यांनी दिलेल्या औषधाने सईचा ताप कमी झाला. पूर्ण उतरला नसला तरी कमी झाला ह्यातच मला बरं वाटलं.


मध्यरात्रीनंतर मी घरी परतले. सईला दूध पाजून झोपवलं आणि मी सोफ्यावर अंग टाकलं तेव्हा लक्षात आलं की माझं अंग प्रचंड दुखतंय, तापही चढलेला होता. मी माझं औषध घेतलं बराच वेळ एकटीच बसून राहिले. मनात नको नको ते विचार येत राहिले. का आपण आपला स्वतःचा आणि आपल्या मुलांचा असा छळ करतो. आपला देश, आपली माणसं सोडून असं भरकटलेलं आयुष्य जगतो उपटसुंभासारखे? मनातल्या मनात नवऱ्यालाही लाखोली वाहिली. तेवढ्यात मोबाईल वाजला.


आवाजाने सई उठणार म्हणून कपाळावर आठ्याच उमटल्या. नशिबाने ती उठली नाही. आईचा फोन होता. नवऱ्याने घरी फोन करून सगळं सांगितलं होतं. पहिलं वाक्य आई काय म्हणाली असेल तर बाळा कशी आहेस? ते ऐकलं आणि मला हमसाहमशी रडायलाच आलं. एकदम माझं लहानपण आठवलं, माझी आजारपणं आठवली. तेव्हा कदाचित माझ्याही आईला बरं वाटत नसेल पण तिनं तिचं दुखणं विसरून माझी सेवा केली असेल. आजही तिला माझीच काळजी लागलेली.

तिचं आईपण समजण्यासाठी मला स्वतःला आई व्हायला लागलं, तोपर्यंत मला समजलंच नव्हतं आई काय चीज असते ते,

- संवादिनी

Thursday, May 17, 2012

स्वप्न आणि सत्य

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नुकतीच माझी सी. ए. ची परीक्षा झालेली होती. करण्यासारखं काहीच नव्हतं. नाही म्हणायला आर्टिकलशिप चालू होती, पण त्यात काही लक्ष लागत नव्हतं. एका रविवारी मी आई आणि बाबा क्लबवर गेलो होतो. तिथे जाणं मला काही नवीन नव्हतं. मुंबईचे हुज हु तिथे असायचे. अर्थात बाबा म्हणायचा कि हे काही त्याचं कर्तुत्व नव्हे. त्याच्या बाबाचं. असो सांगायचा मुद्दा असा कि तिथे कधी मधी सेलिब्रिटी लोकांचं दर्शन व्हायचं. काही बाबाच्या ओळखीचेही होते.

त्या दिवशी आम्हाला सिनेमा क्षेत्रात प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती भेटली. अर्थात ते बाबाच्या ओळखीचे असल्याने थोड्या गप्पा झाल्या. माझा विषय निघाल्यावर मी नाटकात वगैरे कामं करते, गाणं म्हणते वगैरे आईने उगा सांगून टाकलं. काय त्यांच्या डोक्यात आलं कोण जाणे, ते म्हणाले एका नाटकाची ऑडिशन चाललेय. तुला इच्छा असेल तर ये. तसंही काही दुसरं हातात नव्हतं, मी जायचं ठरवलं. काही मुलं मुली आलेले होते. त्या गर्दीत खरं सांगायचं तर मी बुजून गेलेले होते, पण तरी मोठा धैर्याधाराचा आव आणून मी तिथे उभी होते. एक एक करत माझा नंबर आला. मला आत बोलावलं. काय रोल आहे ते सांगितलं. रोल साधासाच होता. काय दोन चार वाक्य दिली होती हातात ती मी म्हटली आणि मी घरी आले.

एकंदरीत ह्या सगळ्या प्रकारात मला काही विशेष रस वाटला नव्हता. त्यामुळे आमच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे हा वृत्तांत रात्री घरी सांगितल्यावर आणि ह्या सगळ्या प्रकारावर भरपूर हास्य विनोद करून मी झोपी गेले. दोन दिवस काहीही झालं नाही तेव्हा मीही नाद सोडून दिला. तिथे बऱ्याच मुली होत्या, त्यांचा अनुभवही कदाचित जास्त असेल, मला तसा चान्स नव्हता. वर रोलही आजुबाजुचाच होता. माझ्यापुरता विषय संपला.

अजून महिन्याभराने सी. ए. चा निकाल लागला. कॅम्पस राउंड सुरु होत्या. आणि अचानक मला त्या सिनेमावाल्या काकांचा फोन आला. काहीही न सांगता त्यांनी मला भेटायला बोलावलं. का बोलावलं असेल हा विचार करत करतंच मी गेले. काका भारी चिंतेत वाटले. ते म्हणाले कि नाटक आठवड्यावर येऊन ठेपलंय, मुहूर्ताचा शो ठरलाय आणि ऐन वेळी नाटकाच्या हिरोईननं माघार घेतलेली आहे. आणि मी ते काम करावं अशी गळ त्यांनी मला घातली. मुळात मला मेन रोलच्या ऑडीशानला बोलावाल्म्च नव्हतं त्यामुळे हे कसं काय झालं ह्याचा विचार करीत करीतच मी घरी आले.

आई बाबांना विचारलं. दोघांनाही मी हि संधी सोडू नये असं वाटलं. त्यानंतरचे पाच दिवस सही गेले. सगळे गाजलेले नट, पण सगळे मला सांभाळून घेत होते. तयारी मस्त चाललेली होती. माझा स्वतःचा confidence खूप वाढलेला होता. दिवसभर तालमी करून दमून भागून रात्री परत आले कि बिछान्यावर पडल्या पडल्या भविष्याची स्वप्न पडायला लागली. हे नाटक, नाटकाचे येणारे रिव्ह्यूज, माझं कौतुक, मग अजून एखादं नाटक, मग सिनेमा, मराठी, हिंदी. मोठं करिअर मोठी स्वप्न. दोन दिवसावर पहिला प्रयोग आलेला, सगळं सुरळीत चालू होतं.

सहाव्या दिवशी मी तालामिला पोचले आणि बघते तर काय, जिने पाच दिवस आधी नाटकातून अंग काढून घेतलेलं होतं ती बया हजर. मला पाहताच सिनेमावाले काका पुढे आले. मला आत मेकप रुममध्ये घेऊन गेले. चांगल्या शब्दात त्यांनी मला सांगितलं कि ती मुलगी परत आलेली आहे. तिनं महिनाभर तालमी केलेल्या आहेत. तू नवखी आहेस. तू अभिनय शिकलेली नाहीस. नाटकाच्या यशाच्या दृष्टीने तिनंच काम केलं तर जास्त बरं होईल. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. गेले पाच दिवस मी ह्या नाटकासाठी मर मर कष्ट केले आणि आज ह्यांनी मला खड्यासारखं बाजूला काढून टाकलं? मी फक्त हो म्हणाले. पुढच्या नाटकात मात्र ते मलाच घेणार असंहि म्हणाले. मी मान हलवली आणि बाहेर आले. काल माझ्यासोबर काम करणारे सगळे आज तिच्याबरोबर होते. त्यांच्यासाठी जणू माझं अस्तित्वच नव्हतं.

मी घरी आले. घरी कुणीच नव्हतं. हताश मनाने मी तशीच वेड्यासारखी बसून राहिले. बऱ्याच वेळानं बाबा आला. त्याला सगळं सांगितलं आणि मात्र अनावर झालं आणि रडू कोसळलं. त्यानं मला रडू दिलं. पहिला भार ओसरला तसा तो उठला. आतमध्ये गेला आणि काहीतरी घेऊन आला. ती एक कॅसेट होती. बीटल्सची होती, त्यावर जॉन लेननचा फोटो होता आणि खाली त्याचं वाक्य होतं.

Life is something that happens while you are busy making other plans.

त्यानं माझ्या हारातली कॅसेट घेतली आणि स्टीरीओवर लावली देखील. ह्याउप्पर त्याने मला काही समजावलं नाही. पण एकही वाक्य न बोलता खूप काही समजावलं.

अर्थात म्हणून मी स्वप्न बघणं सोडलं नाही. आणि मी कधीही न बघितलेली स्वप्न सत्यात उतरवायचं आयुष्यानं थांबवलं नाही.
 
 
 - संवादिनी


Thursday, May 10, 2012

प्रश्न आणि उत्तर

मध्ये एक खासंच गंमत झाली. लिहावी का लिहू नये असा विचार बऱ्याच वेळा आला. शेवटी मनाचा हिय्या करून लिहायचंच ठरवलं. काही गोष्टी खूप हळूवार असतात पण आपल्या संसाराच्या, कामाच्या रगाड्यामध्ये कुठेतरी हरवून गेलेल्या असतात. एखाद्या जिवलग पुस्तकावर धुळीची पुटं साचली की त्या जीवलगाचं अस्तीत्वच विसरायला होतं, तसंच काहीतरी. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे.

आमच्या शाळेच्या दहावीच्या वर्गाचं रियुनिअन झालं. खरंतर मी ह्या शाळेतली उपरी. नववीच्या वर्षात मी ह्या शाळेत आले आणि दहावीत बाहेर पडले. बऱ्याच वर्षांनी आम्ही सर्वजणं भेटलो. अगदी काही लोकांना तर मी शाळा सोडल्यावर पहिल्यांदा पाहिलं.

त्यातलाच एक तो. तिशीच्या आसपास, डोळ्यावरचा चस्मा तसाच. वजन बऱ्यापैकी वाढलेलं. एका मुलाचा बाप झाल्यावर जो संथपणा आपोआपच पुरुषाच्या देहबोलीत येतो तो आलेला. बरच काही बदललेलं. फक्त एक गोष्ट मात्र तशीच. त्याची स्माइल. पण एक मात्र नक्की आता तो माझ्यासाठी तितकासा महत्त्वाचा न राहिलेला आणि बहुदा मीही त्याच्यासाठी. पण ज्या हळूवार आठवणींच्या प्लॅशबॅकमध्ये तो मला घेऊन गेला आणि कदाचित मीही त्याला घेऊन गेले त्या महत्त्वाच्या.

मी नवीनच शाळेत यायला लागलेले होते. फार कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. जुन्या मुलींचे आपापले ग्रूप्स होते. त्यांच्या ग्रूप्समध्ये घुसायला मिळणं कठीण होतं. मलाही नवी शाळा फारशी आवडलेली नव्हती. दोन वर्ष कशीबशी काढायची आणि आपण आपलं बाहेर पडायचं हे मी स्वतःला सतत पढवत होते. मघाशी म्हणाले, तो आमच्याच सोसायटीत राहणारा. कधीमधी चुकून रस्त्यात भेट व्हायला लागली. कधी शाळेत एकत्र जायला लागलो.

पण हा मोठा मजेशीर होता. काही बोलायचाच नाही. मीच आपली त्याला काहीबाही विचारत राहायचे आणि अगदीच नाईलाज म्हणून हा उत्तरं द्यायचा. मित्रांबरोबर तो असताना मी समोरून आले की नजर टाळायचा. मला गंमतच वाटायची. मग मी मुद्दाम तो त्याच्या मित्रांसोबत असताना त्याला जाऊन उगाचंच अभ्यासाचं काहीतरी विचारायचे. एकदम वरमून जायचा तो. पण एकटा असेल तर मात्र अगदी एक क्षण का होईना वर बघून हसायचा.

गोरा गोमटा, काळा काड्यांचा चस्मा. विखुरलेले केस आणि तेच ते क्यूट स्माईल. ते वयच वेगळं असतं. प्रेम म्हणजे काय असू शकतं ह्याचा फक्त अंदाज यायला लागलेला असतो. प्रेमात पडावसं वाटत असतं पण का कोण जाणे प्रेमात पडणं भयंकर वाईट कृत्य आहे असंही वाटत असतं. मी प्रेमात पडले होते असं नक्कीच म्हणणार नाही. पण त्याचं माझ्यासोबत असणं. हसणं, शब्दाला शब्द एवढंच बोलणं हे कुठेतरी आवडायला लागलेलं. आणि त्यालाही.

वर्गात ह्या गोष्टीचं गॉसिपतर भयंकर चालायचं. मग थोडी चिडवा चिडवी, भांडणं हे सगळं आलंच. बरं तिच्या मनातलं त्याच्यापर्यंत आणि त्याच्या मनातलं तिच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तिच्या मैत्रिणींनी आणि त्याच्या मित्रांनी घेतलेली असते. अशी सगळी धमाल चालू असताना एक दिवस माझ्या मैत्रिणीनी मला निरोप दिला. गणिताच्या क्लासच्या आधी अर्धा तास त्यानं बोलावलंय.

मनात खूप धाकधूक होती. एकतर दहावीची परीक्षा डोक्यावर आलेली. अभ्यासाचं टेन्शन होतं. पण कुठेतरी हे सगळंही हवं हवसं वाटणारं होतं. तो बहुतेक आज मला विचारणार होता. विचारणार म्हणजे प्रपोज करणार होता. जावं की न जावं? शेवटी मनाचा हिय्या करून जायचं ठरवलं. आई बाबा कामावर गेलेले होते. आजीला खोटंच सांगितलं आज लवकर बोलावलंय आणि बाहेर पडले. माझ्या घरापासून साधारण पाचव्या मिनिटाला मी क्लासच्या इथे पोचायचं. पण त्या पाच मिनिटात किमान पाच हजार वेळा छाती धडधडली असेल. जे होत होतं ते हवसं होतं आणि नकोसंही.

तो तिथे आधीच आलेला होता. मी आले आणि त्याच्या बाजूला जाऊन बसले. तो जबरदस्त टेन्शनमध्ये होता. खरंतर तिथे अर्धा तास आधी जाणं हाच होकार होता आता फक्त त्याने मला विचारायचं मी हो म्हणायचं इतकंच शिल्लक होतं. ऍड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. पण प्रश्न विचारायला तो इतका घाबरला की त्याने प्रश्न विचारलाच नाही. मी न विचारता उत्तर द्यायचा प्रश्नच नव्हता. अर्धा तास संपून गेला आणि दहावीचं वर्षही.

कॉलेज वेगळं, विषय वेगळे. पुढे ते लोकं मुंबई सोडून गेले. कुठे गेले कधी गेले काही पत्ता लागला नाही. आज हा असा अनेक वर्षांनी भेटला. आम्ही खूप गप्पा मारल्या. हसलो, खिदळलो. आमच्या त्या इअवल्याश्या जगातून बाहेर पडल्यावर आम्ही किती काय काय केलं ह्याचे हिशेब मांडत बसलो. अगदी निरोपाचं बाय बाय करायची वेळ आली. तू मला तेव्हा का विचारलं नाहीस रे? असं अनेकदा त्याला विचारावंसं वाटलं पण नाही विचारू शकले. न विचारलेल्या प्रश्नाचं त्यानं उत्तर देण्याचा प्रश्नच नव्हता.

तेव्हा त्यानं एक विचारलं नाही आणि आता मी दुसरं. पण काही प्रश्न बहुदा असे अनुत्तरीतच ठेवण्यात गंमत असावी.



- संवादिनी



Saturday, May 5, 2012

आवर्तन

होते एक रान, त्याच्या दूर दूर वाटा
कंच माणिकाचे खण, त्याच्या नादावल्या छटा.

आले वादळ जोमाचे, फांदी फांदीवर घासे
एक ठिणगी सुसाटे, कसे नशिबाचे फासे

रान जळे रान पळे, त्याची सल कोणा कळे
इथे राख तिथे राख, मध्ये झरा भळभळे

त्या राखेतून एक, पक्षी उडे गगनात
पान उडे रान उडेउडे मन तरारत

वाटा दूर दूर जाती. छटा पुन्हा नादावीती 
पुन्हा भरारले रान, झाले आवर्तन पूर्ण

 - संवादिनी