Thursday, September 29, 2011

देवयानी (21)

श्रेयाच्या सोबतीने माझे विंफोमधले दिवस जरा बरे चालले होते. कामाचा ताण एकंदरीतच नसल्याने स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करायला वेळ मिळाला होता. मागे बांद्र्याला बघून ठेवलेलं घर भाड्याने घ्यायचं राहूनंच गेलेलं होतं, पण कुठेतरी मनात स्वतःचं वेगळं घर असावं आणि आपण एकटं राहावं हे होतंच. आई बाबांच्या घरी माझं अस्तित्व तसं नगण्यच होतं.

बऱ्याच वेळा माझ्या शिफ्ट्स असत. त्यातही सकाळची खूपदा असे. ऑफिसमधून आले, जेवले की झोपून जायचं. आठवडा असा वेगवेगळ्या वेळी झोपून, उठून, काम करून, जेवून खाऊन घालवल्यावर, सतत ड्रग्ज घेतल्यासारखी अवस्था व्हायची. सतत चोवीस तास तुम्हाला झोपच येत राहिली आणि झोपायला तुम्ही बेडवर पडलात की झोप आलीच नाही तर कशी अवस्था होते तशी माझी अवस्था होती. झोंबी हा एकच शब्द त्या स्थितीचं वर्णन करू शकेल त्यामुळे घरची कामं फंक्शन्स वगैरे पूर्ण बंद होतीच.

बाबा मला कधीच काही बोलले नाहीत. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही की अबोला धरून बसायचं ही त्यांची चिडण्याची पद्धत तर मनासारखं काही झालं नाही की घरात आदळ आपट करायची ही आईची. दोघांनाही मी नकोशी झालेले होते आणि खरं सांगायचं तर मलाही ते नकोसे झाले होते. आज हे लिहिताना मला आनंद होतोय असं नाही, पण ह्या सगळ्याला जबाबदार तरी कोणाला धरणार? कुठेतरी आमच्यात दरी पडत गेली हे खरं आणि ती वाढतंच गेली.

माझ्या बऱ्याच मैत्रिणींची लग्न झालेली होती, ज्यांची झाली नव्हती त्यांची जमलेली होती. ऑफिसमधल्याही बऱ्याच मुलींची लग्न झालेली होती. श्रेयाचं लग्न झालं नसलं तरी तिला स्टेडी गोइंग बॉय फ़्रेंड होता. मला मात्र कुणीच नव्हतं. त्या काळामध्ये खूपदा एकटं वाटे. आपलाही एक जोडीदार असावा असं खूप वाटे. इतरांना त्यांच्या जोडीदाराबरोबर पाहिलं की खूप हेवाही वाटे. अशातच कुठेतरी वाटायला लागलं की आपणही लग्न करावं.

आई कित्येक वर्ष माझ्या मागे लागलेलीच होती. आताशा नातेवाईकांनी तो विषय काढणं सोडून दिलं होतं. मी पूर्णपणे काम आणि त्याच्या अनुषंगाने मिळणारा पैसा ह्याच्या आहारी गेलेली आहे असंच सर्वांचं मत होतं. ऑफिसमधल्या असेल, इतर ओळखीतल्या असेल, पुरुषांची नजर बदलत चाललेलीही मला जाणवली. हिचं काही लफडं नाही, लग्न झालेलं नाही, बिचारी. सोपं सावज आणि थोडीशी समाजसेवा असा पुरुषांचा ऍप्रोच होत असलेला मला दिसला.

पण ह्या सर्वातून बाहेर पडण्यासाठी जोडीदार शोधण्यासाठी लागणारा वेळ आणि ठिकाण मला माहीत नव्हतं. ऑफिसमधली जी काही थोडी थोडकी चांगली मुलं होती, त्यांची लग्न झालेली होती किंवा होऊ घातलेली होती. बरं नुसता मुलगा चांगला असून चालणार नव्हतं, त्याचा पगार, हुद्दा ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा सरस असणं आवश्यक होतं. आईला स्थळ वगैरे शोधायला सांगणं मला जमणार नव्हतं. कुठल्या विवाह मंडळात स्वतः नाव नोंदवणं हा माझ्यासाठी टॅबू होता.

असं करता करता शेवटी इंटरनेटचं माध्यम मला सापडलं. मॅट्रिमोनिअल साईट्स नुकत्याच नावा रूपाला येत होत्या. त्यातल्या एका साईटवर मी नाव नोंदवलं, पैसेही भरले. हे सगळं माझ्या आई वडिलांच्या नकळत होतं, त्यामुळे ह्यातून काही जमून आलंही असतं तरी ते घरच्यांच्या गळी उतरवणं कठीण जाणार होतं. काही संपर्क होत होते पण कॉंक्रीट काही घडत नव्हतं. अर्थात मी फार डेस्परेट होते असं नव्हे.

- देवयानी