Thursday, February 28, 2008

मँगलोर, तो आणि पंचावन्न पाढे

काल परत आले. आम्ही सगळेच आलो. मागच्या पोस्ट मध्ये लिहिलं नाही पण तोही मँगलोरला आला होता. त्याच्या डिपार्टमेंटच्या कामासाठी.

खूप मजा आली आणि नाहीही. तो खरंच खूप चांगला आहे. खूप गप्पा मारल्या त्याच्याशी मी. भटकलो खूप. त्याचं आजोळ आहे मँगलोर! आणि जुनं घरपण आहे त्याच्या आजोबांचं. तिथे तो घेऊन गेला. बीचवर घेऊन गेला. म्हणजे मला एकटीलाच नाही, सगळ्यांनाच. पण त्याच्याशी खूप छान मैत्री झाली. रविवारी म्हणाला फिश खायला जाऊ. बाकी सगळे कट्टर व्हेजी लोकं. मग दोघंच गेलो.

ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. जी व्यक्ती तुम्हाला आवडते तिच्यासोबत एक संध्याकाळ घालवायला मिळणं ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?

पहिली धडधड, त्यात वेंधळेपणा करणं, हेही मी साग्रसंगीत केलं, नेहेमीप्रमाणे. मग हळूहळू तो बोलत गेला आणि मीही. माझं घर, आई, बाबा, विनय, माझी चाळ, माझी शाळा, मैत्रिणी, पुस्तकं, नाटक, गाणं, सगळं सगळं.

तोही बोलत गेला. त्याच्याबद्दल. त्याच्या बायकोबद्दल!

हो. त्याचं लग्न झालंय. गेल्याच वर्षी. आधी चौकशी..

जाऊदे. काय लिहू आणि काय नाही? मला तो आवडतो. त्याचं बोलणं, वगणं, हसणं, गाणं, खिदळणं. सगळं सगळं मनापासून आवडतं. पण त्याने काहीही फरक आता पडणार नाही. पुढचे सगळे रस्तेच खुंटलेत.
फार वाईट अवस्था झाली माझी तिथे. अचानक लक्षच उडालं सगळ्यातलं. तो काय बोलतोय मी काय बोलतेय? काय खातेय? खातेय ते चांगलं आहे की वाईट? काही काही कळत नव्हतं. हॉटेलवर परत आले तर रडायचीसुद्धा खोटी. माझी रूम पार्टनर होतीच. मग काय? खोटं खोटं हसत सांगावं लागलं फिश खूप आवडलं म्हणून.

रात्रभर झोप नाही. सतत डोक्यात तेच चालू होतं. तो मिळणार नाही म्हणून दुःख की मी सपशेल गंडले म्हणून दुःख? ते शेवटपर्यंत कळलं नाही. खरंतर मी त्याला पुरेशी ओळखत नव्हतेच प्रेम बीम करायला, मग मी का गुरफटत गेले?

पण मग विचार केला. जर मला माहीत असतं की त्याचं लग्न झालंय आधीच, तरीही आवडलाच असता ना तो मला? म्हणजे एक चांगला मित्र झालाच असता ना? नाही झालाच तो चांगला मित्र माझा. सगळंच मोठं विचित्र आहे. मी स्वतःलाच समजवू शकत नाहीये की मी त्याच्याशी मैत्री करू शकतेच ना? देअर कॅन बी लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे लग्न. लाईफ पार्टनर वगैरे अशक्य आहे. ते तर मी कधीच डोक्यातून काढलं आहे. पण ते नाही म्हणून अजिबात बोलायचंच नाही असं थोडीच आहे? आणि त्याला बिचाऱ्याला तर यातलं काही माहीत सुद्धा नाही.

प्रेमभंग नाही म्हणता येणार पण जवळपासचं काहीतरी अनुभवायला मिळालं. खूप त्रास झाला. पण मलाच बरं वाटलं. मी स्थितप्रज्ञपणे विचार करू शकले म्हणून.

घरी गेल्यावर आई म्हणाली. तिच्या मैत्रिणीने एक स्थळ सुचवलंय म्हणून. फोटो पसंत आहे त्यांना भेटायचंय. खरंतर डोक्यात तिडीक जायला हवी होती, पण चक्क बरं वाटलं. आपण कुणालातरी आवडलो ही भावना अशा वेळी हात देते. आईने फोटो दाखवला. मुलगा चांगला वाटला. पण तो परदेशी आहे. आई वडील येणारेत त्याचे, जर मला फोटो आवडला तर. मी सांगितलं आईला, नीट बघते आणि सांगते.

सध्यातरी मी सरळ रेषेत विचार करू शकेन कशाबद्धलही असं वाटत नाहीये. कुणी चांगली शंभर ठिपके शंभर ओळींची नक्षीदार रांगोळी काढायला घेतली आणि ती पूर्ण व्हायच्या आतच वाऱ्यावर उधळली गेली, तर काढणाऱ्याला कसं वाटेल? तसंच काहीसं मला वाटलं. रांगोळी पुन्हा काढता येईल, दहादा काढता येईल, पण ती अशीच जमेल ह्याची काय खात्री?

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.


- संवादिनी

Thursday, February 21, 2008

मँगलोर आणि मंजूनाथाची कृपा

आपल्याला वाटतं आपण एकटे असतो. कुणाचीतरी सोबत असावी असं वाटत असतं. पण ती सोबत खूप खूप दूर आहे हे माहीत असतं. सगळं कसं बेचव, निरस वाटत राहतं.

आणि कसल्या चाव्या फिरतात कोण जाणे?

आले मंजूनाथाच्या मना तेथे कोणाचे चालेना. अचानक वसंत बहरतो, कळ्यांची फुलं होतात, फुलांच्या सुगंधाने आसमंत दरवळतो, सूर्यसुद्धा शीतल वाटायला लागतो, दिवसा चांदण्यांची स्वप्न पडतायत की काय असं वाटायला लागतं. पण ते स्वप्न नसतंच मुळी. आपणंच आपल्या हाताला चिमटा काढून बघतो. आणि दुखलेल्या चिमट्याच्या वळातच आपल्याला सर्वाधिक सूख मिळतं. कारण जे अशक्य वाटत असतं ते घडतं.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?

आता एवढंच. पुढच्या आठवड्यात मुंबईत आले की सविस्तर लिहिणं होईलंच.

Thursday, February 14, 2008

मी आणि बाबा

आपण ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडू शकतो असे थोडेच जण असतात. माझ्यासाठी माझे बाबा तसेच आहेत. खरंखरं सांगायचं तर मला आईपेक्षा बाबा जवळचे वाटतात. म्हणजे आई आवडत नाही असं नाही. पण बाबा इज समवन स्पेशल. लहानपणापासूनच मला त्यांचा ओढा जास्त. आरडाओरड्याचं काम आईचं. ती म्हणते तसा सगळा वाईटपणा तिनं घ्यायचा. आणि त्यावर मलम लावायला बाबा. त्यामुळे नाही म्हटलं तरी बाबांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाच.

पण ते आहेतच तसे. त्यांना काही चुकतंय असं वाटलं तर ते फक्त त्यांना तसं वाटतंय हे सुचवतात. कुणाची चूक आहे. कशी सुधारायची वगैरे निर्णय ते माझ्यावर सोपवतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी केलेल्या चुका ते आम्हाला सांगतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. स्वतःच्या चुका मान्य करणं किती कठीण आहे.

ह्या रविवारी मी दुपारी नाटकाच्या तालमीवरून आले. चहा पीत निवांत लोकरंग वाचत बसले होते. चार साडेचार झाले असतील. तर हे आले. उगाचच नाटक कुठपर्यंत आलंय वगैरे चौकश्या केल्या. मग म्हणाले चल पाणी पुरी खायला जाऊ. मी कशाला नाही म्हणतेय. आईला विचारलं, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणाली. विनयला क्रिकेट खेळायला जायचं होतं, त्यामुळे तो आला नाही.

सहा वाजता मी आणि बाबा गेलो बाहेर. पाणी पुरी खाल्ली, नेहमीप्रमाणे एक प्लेट झाल्यावर दुसरी अर्धी अर्धी खाल्ली. मग म्हणाले चल कॉफी पिऊ. म्हटलं चला. नेहमी मी म्हणते कॉफी कॉफी. आज हे म्हणतायत तर जाऊया. सीसीडी मध्ये गेलो. तिथे माझी मैत्रीण भेटली, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आली होती. आणि मी आमच्या तातांसोबत. जरा ऑकवर्ड झालं. का? माहीत नाही? कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो, म्हणून असेल.

मी माझी नेहमीची ट्रॉपिकल आईस्बर्ग घेतली. थंडीचं कारण देत बाबांनी मलाच कोणती तरी गरम गरम कॉफी ऑर्डर करायला सांगितली. एकात एक विषय गुंफत त्यांनी तो माझ्या करिअर आणि लग्नावर आणून सोडला. मला कळलंच नाही. मी त्यांना सांगितलं मला इतक्यात लग्न करायचं नाही. ते म्हणाले ठीक आहे, कधी करायचंय? म्हटलं माहीत नाही. मग हसत हसत म्हणाले, ठीक आहे.

उगाचच मला त्यांना त्या मिशीवाल्याबद्दल सांगावंसं वाटलं. मग विचार केला आता नको. अजून नीट ओळखही नाही त्याची. जाऊदे. मग मीच त्यांना त्यांच्या कॉलेजातल्या मैत्रिणींबद्दल विचारलं. तसं अनेकदा ऐकलंय पण बाबा सांगायला लागले की ऐकायला मजा येते. तेपण बिंधास्त एखाद्या मित्राला सांगावं तसं त्यांचं तरुणपण मला, विन्याला सांगतात.

एकंदरीत काय तर संध्याकाळ मजेत गेली. पण एक वॉर्निंग देऊनच. कारण जेव्हा बाबा कॉफी प्यायला घेऊन जातात आणि एखादा विषय काढतात. समजावं की आता खरंच काहीतरी ऍक्शन घेणं जरूरीचं आहे. ते काही बोलणार नाहीत, पण त्यांना काय म्हणायचंय हे बरोबर त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंच. त्यांच्या हसण्यातून. तिढा वाढत चाललाय. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ही? सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी "आई" म्हणते. चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला? शेवटी आई आहे ती.

आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेले तर एक मोठा धक्का. पुढच्या आठवड्यात मँगलोरला जायचंय कामाला. अजून मी ऑफिसच्या कामाला, शिवडी, वाशी आणि नरिमन पॉइंट सोडून कुठेही गेले नाहीये आता एकदम मँगलोर. तिथे म्हणे नवं ऑफिस सुरू झालंय तिथे ट्रेनिंग द्यायचंय. खरंतर आमच्या बुटकोबाला (साहेबाला) सांगितलं होतं जायला. पण तो साहेब असल्याने त्यांनी पार्सल मला पास केलं.
कोंकण रेल्वे ने जायचं हेच त्यातल्या त्यात बरं आहे. आम्ही चार जण आहोत आणि काही लोकं विमानानं येणार आहेत. आम्ही पडले तळा गाळातले कामगार म्हणून आम्ही रेल्वेने. पण कोंकणात जायचं तर विमानापेक्षा रेल्वेचीच मजा.

एकंदरीत वादळ गिरगावात आलं तरी मी मँगलोर ला असेन, त्यामुळे आनंदातच आहे.

पुढच्या आठवड्यात गुरुवारी मी तिकडे असेन. कदाचित ब्लॉग लिहिता येणार नाही. पण इंटरनेट मिळालं तर काहीतरी पोस्ट करीनच.

आणि हो. हॅपी व्हलेंटाईन्स डे!!

मला शिवसेना आवडते पण आज शिवसेना मुर्दाबाद! व्हॅलेंटाइन झिंदाबाद!

ज्यांना त्यांचे व्हालेंटाइन्स आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाहीत (उदाहरणार्थ मी) त्यांना ऑल द बेस्ट!!



- संवादिनी

Friday, February 8, 2008

मी आणि माझी (न मिळालेली) नवी नोकरी

बायो डेटा वेबसाईट्वर टाकून दोन दिवस नाही झाले तर फोन यायला सुरुवात झाली. तसा नोकरी शोधण्याचा अनुभव मला शून्य. कारण CA झाल्या झाल्या ही नोकरी चालत आली. मीही जास्त विचार न करता जॉइन केलं. आठवडे, महिने, वर्ष झाली. तोच डेस्क, तेच चेहरे, तशीच कामं. अर्थात कुठे कंटाळवाणं झालं नाही. आधीचा बॉस जाम पिडू होता, पण हा बुटकोबा आल्यापासून मस्त चाललं होतं. नोकरी बदलायची इच्छाही कधी मनात आली नव्हती आणि सगळं सूख बोचलं म्हणून आता नोकरी बदलायची.


परवाच एक फोन आला इंटरव्ह्यू साठी. हाय हॅलो वगैरे झालं.


ती - आता बोलू शकतो का आपण?
मी - हो चालेल ना. (मला कधीही बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कामच नाहीये जास्त)
ती - जरा तुझ्या अनुभवाबद्दल सांगशील?
मी - बेडकीला जेवढं फुगता येईल त्या प्रमाणात माझा अनुभव अगदी फुलवून (की फुगवून) सांगितला
ती - वाह! फारंच छान!
मी - थॅंक यू (बऱ्याच थापा पचलेल्या दिसतायत)
ती - आता आमचे डोमेन एक्स्पर्ट तुम्हाला प्रश्न विचारतील.

मी - हो चालेल ना (मग ही का मला प्रश्न विचारत होती इतका वेळ? मरा, आता सगळ्या थापा बाहेर पडणार)
तो - एक अधिक एक किती? (प्रश्न प्रतिकात्मक. खरे नव्हेत)
मी - दोन.
तो - बरोब्बर. छान. (इतका सोपा प्रश्न तर मला यायला हवाच ना?)
तो - बरं पाच गुणिले दोन?
मी - अम्म...... बहुतेक दहा
तो - खूपच छान. (नोकरी मिळालीच बहुतेक)
तो - एकविस भागिले सात?
मी - खरंतर मी अशा प्रकारची कामं केली नाहीयेत म्हणून निटसं सांगता येत नाही.
तो - तीन. (स्टडी मटेरिअल नीट वाचायला हवं. मलाही तीनच वाटत होतं. जाऊदे. माणूस चांगला दिसतोय. बोलतोय तरी गोड गोड. देईल नोकरी)
मी - मलाही तसंच वाटलं, पण कॉंफिडन्स नव्हता
तो - बरं. आता सांग. तेरा गुणिले एकोणीस भागिले सतरा.
मी - .....
तो - अशा प्रकारची कामं करणारी लोकं आम्हाला हवीत.
मी - ..... (आता काय करू? नाही येत सांगितलं तर नोकरी जाणार, पण उत्तर तर येतंच नाहीये)
तो - तेरा गुणिले एकोणिस भागिले सतरा?
मी - ....... मला असं वाटतं..... म्हणजे..... असा अंदाज...... म्हणजे..... साधारण बारा ते पंधरा च्या मध्ये असेल बहुतेक....... असं मला वाटतं......
तो - ......
मी - हॅलो

तो - हे बघ, तुला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने नगण्य आहे, बरोबर उत्तर काय आहे ते सांग. किंवा येत नाही म्हणून सांग. (आयला, चिडलाच हा?)
मी - मी अशा प्रकारचं काम केलेलं नाही, म्हणून मला वाटतं असं म्हंटलं (मी पण चिडलेच थोडीशी)
तो - .......

ती - बरं. टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. आता मला सांग तुझा पगार किती?
मी - दहा रुपये.
ती - दहा रुपये? (आवाजात आश्चर्य लपत नाही)
मी - हो
ती - अपेक्षा किती आहे?
मी - तेरा रुपये
ती - बरं (अगदी तुच्छतेने. म्हणजे येत तर काही नाही पण पगार भरपूर पाहिजे अशा आविर्भावात)
ती - आम्ही कळवू तुला सगळे इंटरव्ह्यू झाल्यावर.
मी - बरं
ती - खडाक
मी - खडाक - हुश्श्य..... सुटले.

असा इंटरव्ह्यू झाल्यावर जे व्हायचं तेच झालं. साभार नकाराचा फोन आला. अर्थात त्यांचं काही चुकलं नाही म्हणा. त्यांना जे काम येणारी व्यक्ती हवी होती ती मी नव्हतेच. पण वाईट वाटतंच ना?

संध्याकाळी घरी पोचले तर बाबा एकटेच होते. मजल्यावरही कुणी दिसलं नाही. हात पाय धुवून बाबांसमोर येऊन बसले. त्यांना कळलंच की काहीतरी बिनसलंय माझं. मग त्यांनी उगिचच शेअर मार्केट च्या गप्प सुरू केल्या. टी.व्ही. लावू का म्हणाले. मी काहीच बोलले नाही. मग माझ्या बाजूला येऊन बसले आणि खांद्यावर हात ठेवला. मग मला राहवलं नाही. अगदी लहान मुलीसारखी मी मनापासून रडले. त्यांच्याच शर्टाला डोळे पुसले. मग त्यांना झाला प्रकार सांगितला.


सगळं शांतपणे ऐकून झाल्यावर मला म्हणाले मोठं नुकसान झालं. मी म्हटलं, एवढं काही नाही. मी ही नोकरी घेतली असती असं नाही. पण नकाराचं वाईट वाटलं.

"मी कुठं म्हटलं तुझं नुकसान झालं म्हणून?" ते म्हणाले.
"मग?"
"बाळा, नुकसान त्यांचं झालं, तुला 'नाही' म्हणून. मला एक सांग, तू मूर्ख म्हणून CA ला मेरिटमध्ये आलीस? मूर्ख म्हणून तुला सध्याच्या कंपनीने नोकरी दिली?"
"..."
"आपला आत्मविश्वास घालवून बसायचं नाही. प्रत्येक व्यक्ती तिच्या जागी चांगलीच असते. गरज आहे ती त्या व्यक्तितला चांगलेपणा ओळखायची. तारे जमीन पर पाहिलास ना?"

मग मी तशीच त्यांच्यासोबत बसून राहिले. ते बोलत गेले, त्यांच्या नोकरीच्या कथा. त्यांचे अनुभव, त्यांच्या चुका. खरं सांगते आजपर्यंत अनेकदा ऐकलंय. पण ते पुन्हा सांगायला लागले तरी ऐकत राहावसं वाटतं. पण त्याबद्दल पुढच्या वेळी लिहीन, आता खूप उशीर झालाय.