Friday, February 8, 2008

मी आणि माझी (न मिळालेली) नवी नोकरी

बायो डेटा वेबसाईट्वर टाकून दोन दिवस नाही झाले तर फोन यायला सुरुवात झाली. तसा नोकरी शोधण्याचा अनुभव मला शून्य. कारण CA झाल्या झाल्या ही नोकरी चालत आली. मीही जास्त विचार न करता जॉइन केलं. आठवडे, महिने, वर्ष झाली. तोच डेस्क, तेच चेहरे, तशीच कामं. अर्थात कुठे कंटाळवाणं झालं नाही. आधीचा बॉस जाम पिडू होता, पण हा बुटकोबा आल्यापासून मस्त चाललं होतं. नोकरी बदलायची इच्छाही कधी मनात आली नव्हती आणि सगळं सूख बोचलं म्हणून आता नोकरी बदलायची.


परवाच एक फोन आला इंटरव्ह्यू साठी. हाय हॅलो वगैरे झालं.


ती - आता बोलू शकतो का आपण?
मी - हो चालेल ना. (मला कधीही बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कामच नाहीये जास्त)
ती - जरा तुझ्या अनुभवाबद्दल सांगशील?
मी - बेडकीला जेवढं फुगता येईल त्या प्रमाणात माझा अनुभव अगदी फुलवून (की फुगवून) सांगितला
ती - वाह! फारंच छान!
मी - थॅंक यू (बऱ्याच थापा पचलेल्या दिसतायत)
ती - आता आमचे डोमेन एक्स्पर्ट तुम्हाला प्रश्न विचारतील.

मी - हो चालेल ना (मग ही का मला प्रश्न विचारत होती इतका वेळ? मरा, आता सगळ्या थापा बाहेर पडणार)
तो - एक अधिक एक किती? (प्रश्न प्रतिकात्मक. खरे नव्हेत)
मी - दोन.
तो - बरोब्बर. छान. (इतका सोपा प्रश्न तर मला यायला हवाच ना?)
तो - बरं पाच गुणिले दोन?
मी - अम्म...... बहुतेक दहा
तो - खूपच छान. (नोकरी मिळालीच बहुतेक)
तो - एकविस भागिले सात?
मी - खरंतर मी अशा प्रकारची कामं केली नाहीयेत म्हणून निटसं सांगता येत नाही.
तो - तीन. (स्टडी मटेरिअल नीट वाचायला हवं. मलाही तीनच वाटत होतं. जाऊदे. माणूस चांगला दिसतोय. बोलतोय तरी गोड गोड. देईल नोकरी)
मी - मलाही तसंच वाटलं, पण कॉंफिडन्स नव्हता
तो - बरं. आता सांग. तेरा गुणिले एकोणीस भागिले सतरा.
मी - .....
तो - अशा प्रकारची कामं करणारी लोकं आम्हाला हवीत.
मी - ..... (आता काय करू? नाही येत सांगितलं तर नोकरी जाणार, पण उत्तर तर येतंच नाहीये)
तो - तेरा गुणिले एकोणिस भागिले सतरा?
मी - ....... मला असं वाटतं..... म्हणजे..... असा अंदाज...... म्हणजे..... साधारण बारा ते पंधरा च्या मध्ये असेल बहुतेक....... असं मला वाटतं......
तो - ......
मी - हॅलो

तो - हे बघ, तुला काय वाटतं हे माझ्या दृष्टीने नगण्य आहे, बरोबर उत्तर काय आहे ते सांग. किंवा येत नाही म्हणून सांग. (आयला, चिडलाच हा?)
मी - मी अशा प्रकारचं काम केलेलं नाही, म्हणून मला वाटतं असं म्हंटलं (मी पण चिडलेच थोडीशी)
तो - .......

ती - बरं. टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. आता मला सांग तुझा पगार किती?
मी - दहा रुपये.
ती - दहा रुपये? (आवाजात आश्चर्य लपत नाही)
मी - हो
ती - अपेक्षा किती आहे?
मी - तेरा रुपये
ती - बरं (अगदी तुच्छतेने. म्हणजे येत तर काही नाही पण पगार भरपूर पाहिजे अशा आविर्भावात)
ती - आम्ही कळवू तुला सगळे इंटरव्ह्यू झाल्यावर.
मी - बरं
ती - खडाक
मी - खडाक - हुश्श्य..... सुटले.

असा इंटरव्ह्यू झाल्यावर जे व्हायचं तेच झालं. साभार नकाराचा फोन आला. अर्थात त्यांचं काही चुकलं नाही म्हणा. त्यांना जे काम येणारी व्यक्ती हवी होती ती मी नव्हतेच. पण वाईट वाटतंच ना?

संध्याकाळी घरी पोचले तर बाबा एकटेच होते. मजल्यावरही कुणी दिसलं नाही. हात पाय धुवून बाबांसमोर येऊन बसले. त्यांना कळलंच की काहीतरी बिनसलंय माझं. मग त्यांनी उगिचच शेअर मार्केट च्या गप्प सुरू केल्या. टी.व्ही. लावू का म्हणाले. मी काहीच बोलले नाही. मग माझ्या बाजूला येऊन बसले आणि खांद्यावर हात ठेवला. मग मला राहवलं नाही. अगदी लहान मुलीसारखी मी मनापासून रडले. त्यांच्याच शर्टाला डोळे पुसले. मग त्यांना झाला प्रकार सांगितला.


सगळं शांतपणे ऐकून झाल्यावर मला म्हणाले मोठं नुकसान झालं. मी म्हटलं, एवढं काही नाही. मी ही नोकरी घेतली असती असं नाही. पण नकाराचं वाईट वाटलं.

"मी कुठं म्हटलं तुझं नुकसान झालं म्हणून?" ते म्हणाले.
"मग?"
"बाळा, नुकसान त्यांचं झालं, तुला 'नाही' म्हणून. मला एक सांग, तू मूर्ख म्हणून CA ला मेरिटमध्ये आलीस? मूर्ख म्हणून तुला सध्याच्या कंपनीने नोकरी दिली?"
"..."
"आपला आत्मविश्वास घालवून बसायचं नाही. प्रत्येक व्यक्ती तिच्या जागी चांगलीच असते. गरज आहे ती त्या व्यक्तितला चांगलेपणा ओळखायची. तारे जमीन पर पाहिलास ना?"

मग मी तशीच त्यांच्यासोबत बसून राहिले. ते बोलत गेले, त्यांच्या नोकरीच्या कथा. त्यांचे अनुभव, त्यांच्या चुका. खरं सांगते आजपर्यंत अनेकदा ऐकलंय. पण ते पुन्हा सांगायला लागले तरी ऐकत राहावसं वाटतं. पण त्याबद्दल पुढच्या वेळी लिहीन, आता खूप उशीर झालाय.

11 comments:

सर्किट said...
This comment has been removed by the author.
सर्किट said...

’अशावेळी’ खरंतर समजूतदारपणे आणि सांत्वनपर बोलायला पाहिजे, जसं की तुझ्या बाबांनी केलं. पण माझा अनुभव असा आहे, की अधूनमधून असे उगाचच इण्टर्व्ह्यू देत राहिले पाहिजेत. म्हणजे आपल्याला मार्केट मध्ये काय चाललंय, आपली तिथे लेव्हल किती आहे, आणि आपण कुठे कमी पडतोये, ते कळतं. आणि वेळीच कळलं की फ़ारसा उशीर होवू न देता आपण हातपाय हलवून स्वत:चं ज्ञान अपडेटेड ठेवायला लागतो. कॉम्प्लॅसण्ट होण्यापेक्षा असं इन्सेक्युअर फ़ील करून शिकत रहाणं केव्हाही फ़ायद्याचं.

असा पहिला धक्का जोरात बसतो, मग नंतर ’धीरे से’ बसायला लागतात - आणि मग आपण उगाचच दिलेले इण्टरव्ह्यू चांगले जायला लागून तिकडून उगाचच ऑफ़र्स यायला लागतात! पण आपण तर गंमत म्हणून दिलेला असतो तो, मग आपण त्यांची ऑफ़र निष्ठूरतेने ठुकरावून देतो. अशावेळी लय गारगार वाटतं. अशावेळी "गंमत म्हणून इण्टर्व्ह्यू देणं" काहीकाळ थांबवलं तरी चालतं.

लढ.!

Yashodhara said...

संवादिनी, सर्किट सांगतोय ते खरय. आजच मी एका झँगटॅंग कंपनीची ऑफर ठुकरावून लावली :D तूही करशील, नोकरीमैदान जवळच असत गं!!! :) गुड लक!!

Bhagyashree said...

khup chan post..babani sangitlela patla..! mi nit relate karu shakle..gng thru same interview sessions.. ani nakaracha dhakka kharach motha asto! pan neways ladhat raha! aplyala kay yet nahi, he tari nakkich kalta interviews madhun..
liked ur blog.. keep writing!!

Amey said...

खरंय... नोकरी न मिळणे आणि मिळालेली नोकरी न करण्याचा निर्णय आपण घेणे ह्यात खूप फ़रक आहे. अगदीच सरळ सांगायचे झाले, तर "माज" आपण केला की तो सहज पचवता येतो.

Samved said...

१) अत्यंत अनपेक्षितरित्या हा ब्लॉग मिळाला
२) आज दिवसभर रिव्ह्यु करुन जीव आंबला होता
३) निस्त्राण अवस्थेत तुझा ब्लॉग वाचला आणि जीवात जीव आला
४)डोकं दुखणं थोडं कमी झाल्यासारखं वाटलं म्हणून मागचे सगळे लेख वाचले
५) आता मला भयंकर बरं वाटतय...

कसलीही जड विशेषणं (तुम्ही उच्च दर्जाचं लिहीता इ.इ.) न वापरता ब्येष्ट! असं सांगुन टाकतो

Monsieur K said...

tujhe tey pratikaatmak prashna aani tya-tya veles manaat yenaare vichaar - ekdam aavadle! :)

dont worry, keep searching! u'll get the job u want pretty soon.

Meghana Bhuskute said...

मला का नव्हता हा ब्लॉग माहीत? कसलं धमाल मस्त लिहितेस तू? मस्तच.

संवादिनी said...

@ सर्किट - तुझं म्हणणं एकदम पटलं. अरे त्या दिवशी बाबा मला समजावायला तसं बोलले. मग दुसऱ्या दिवशी म्हणालेच. काय आलं नाःइ ते शिकून घे. इंटरव्ह्यू तर देत राहणारच आहे, हळूहळू नाही ऐकायचीही सवय होईल. आणि होपफुली नाही म्हणायची सुद्धा.

@ यशोधरा - मेरा नंबर कब आएगा?

@ अमेय - मला पण इच्छा आहे एकदा नोकरीला नाही म्हणण्याचा माज करण्याची. बघुया कसं जमतं ते.

@ केतन - थँक्स.

@ भाग्यश्री, संवेद आणि मेघना - तुमच्या कमेंट वाचल्यावर खूप बरं वाटलं. कौतूक कोणाला आवडत नाही? थँक्स.

Yogini said...

hey.....

tu khup mast lihites.....

wel kasa gela te kalalach nahi :)

VAibhAV said...

Jam Bhari
Awadla aaplyala