Monday, December 13, 2010

सई

घड्याळाच्या काट्याची टिकटिक. कधीपासून चाललेली. सेकंद गेली, मिनिटं गेली, तास गेले. त्याची टिकटिक असंबद्ध चाललेली. घटका भरण्याची वाट बघत आम्ही दोघी. एक ती आणि एक मी. एकमेकींना आधार देत, एकमेकींवर चिडत, रडत, भेकत, विनवण्या करत, सरकणाऱ्या एकेक सेकंदाशी प्राणपणाने लढत, गेलेल्या एकेक सेकंदाचा हिशेब मांडत बसलेल्या.

तिचं आणि माझं नातंच असं होतं. नातं होतं हे खरंच. त्याला नाव होतं हेही खरंच. पण तरीही ते कधी उलगडलं नव्हतं. कदाचित मला ते उलगडल्याचा आभास निर्माण झाला होता. तलवारीसारखं हे नातं. एका बाजूला मूठ, दुसऱ्या बाजूला धारधार पातं. आयुष्यभर ह्या नात्याची मूठ पकडून मी बसलेले. पातं धरायला लागलं की मुठीत असताना वाटलेली संरक्षक तलवार संहारक वाटायला लागते. तसंच आमचं नातंही. मला कळलेलं पण न कळलेलंही.

आम्ही दोघी अगदी जीवश्च, कंठश्च मैत्रिणी. कशी झाली मैत्री? कुठे झाली? केव्हा झाली? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधावीत असंही मला कधी वाटलं नाही. तिला वाटलं असेल, नसेल, कल्पना नाही. पण मैत्रिणींनी एकमेकींना द्यायचे सगळे ताप, मनस्ताप आम्ही एकमेकींना दिलेले. कधी तिचा रागही आलेला. तिलाही माझा नक्कीच आला असेल. माझा आनंद तिचा होता, माझी दुःख तिची होती, माझं घर, माझी माणसं सगळी सगळी तिचीही होती. तिचं घर, तिची माणसं सगळी सगळी माझी होती. तिचा विचार माझा होता. माझी असणं तिचं होतं आणि तिचं असणं माझं होतं.

तिला आवडेल ते न आवडूनही मी खायचं आणि मला आवडेल ते न आवडूनही तिनं खायचं. मला गाणं आवडतं, म्हणून ते तिलाही आवडावं हा माझा हट्ट. मग तासंतास चांगलं चुंगलं गाणं तिला ऐकावंच लागायचं. तिला आवडायचं की नाही कोण जाणे. पण ऐकायची बिचारी.

कुणी सांगे, ती फार स्वप्नाळू आहे. असेलही. तिचं जग आपल्या जगापेक्षा खूप वेगळं होतं. तिथं ती तिच्या मर्जीची मालकीण होती. वाटेल तसं जागावं, वाटेल तेव्हा झोपावं, वाटेल ती स्वप्न बघावीत. तिच्यामुळे कदाचित मीही स्वप्नाळू झाले. माझी स्वप्न तिची झाली, तिची स्वप्न माझी झाली.

सेकंद गेली, मिनिटं गेली, तास गेले, दिवस गेले, महिने गेले. तिची आणि माझी मैत्री अधिकच घट्ट होत गेली. पण तरीही घटका भरण्याची वाट बघत आम्ही दोघी. एक ती आणि एक मी. एकमेकींना आधार देत, एकमेकींवर चिडत, रडत, भेकत, विनवण्या करत, सरकणाऱ्या एकेक सेकंदाशी प्राणपणाने लढत. मध्यरात्रीच्या चंद्रानं आम्हाला बेभान केलं की उधाणाच्या भरतीच्या लाटा किनाऱ्यावर फुटाव्यात तशा वेदनेच्या लाटा शरीरावर झेलताना आम्हा दोघींचा आणि काळाचा संपर्क तुटला कोण जाणे. किती वेळ तसाच गेला कळलंच नाही. चक्रातून चक्रात, चक्रातून चक्रात, चक्रातून चक्रात आम्ही फिरत राहिलो. वेड लागायची पाळी आलेली, पण तरीही तेव्हा पुसटसा अभिमन्यू आठवला. चक्रव्यूहातून बाहेर न पडणारा. एक क्षण डोळ्यात पाणी आलं. पण दुसऱ्याच क्षणी मनानं आणि शरीरानंही, तिच्या आणि माझ्याही, अभिमन्यू व्हायचं नाकारलं. चक्रव्यूह फुटलं.

सुटका झाली तशी ती बेंबीच्या देठापासून ओरडायला लागली. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. कुणीतरी तिचा इवलासा देह माझ्या छातीवर आणून ठेवला.

घड्याळाची टिकटिक पुन्हा जाणवली. आता कसलाही हिशेब मांडायचा नव्हता.