Thursday, March 27, 2008

मी आणि माझं आभाळ

काल अजून एक इंटरव्ह्यू झाला. हल्ली आठवड्याला एकदोन होतायत त्यामुळे त्याबद्धल काही लिहिण्यासारखं नाहीच आहे. हल्ली इंटरव्ह्यू वाढलेत ह्याचं कारण म्हणजे, मी, मुंबईच हवी, ही माझी नोकरीची अट कमी केलेली आहे. गेलाबाजार पुणं तरी मिळावं एवढीच अपेक्षा आहे. तसं लांब जायला काही हरकत नाही, पण पुण्यावरून कसं? कधीही घरी पळता येईल. नाही म्हटलं तरी मराठी. चेन्नई, कलकत्त्यापेक्षा कधीही जवळचं वाटतंच.

गेले बरेच दिवस ह्या विषयावर आमच्या घरी चर्चासत्र घडत होती. म्हणजे मी एकटीने जाऊन नोकरीसाठी परगावी राहावं का? आई म्हणे अजिबात नको. हल्ली काय एकेक ऐकायला येतं? तिच्यावर हल्लीच्या नव्या हिंदी सिनेमांचा प्रचंड परिणाम झालाय. आपली मुलगी वाईट संगतीला तर नाही ना लागणार ही तिची भीती.

बाबांनी तरी माझी बाजू घ्यावी की नाही? तेही नाही. ते म्हणे, उद्या तुझं लग्न होणार आणि मग तू जाणार तोपर्यंत तरी तू इथे राहा. उद्या लग्न कुठल्या शहरात होईल माहित नाही. मग तेवढा सहवास मिळेलच असं नाही. मला एवढा राग आला ना त्यांचा. नेहमीसारखं बोलणंच बंद केलं मी. फक्त कामापुरतं. त्यांना बहुतेक वाईट वाटलं.

विन्या म्हणे सुंठीवाचून खोकला गेला. म्हणाला जायचंच असेल तर परदेशी जा. हे पुणंबिणं नको. पुणं तेथे सगळंच उणं. स्कूटर चालवता येणार नाही रस्त्यात म्हणाला. अतिरेकी बायकांसारखे बुरखे घालून स्कूटर चालवायला लागेल.

असं तिघांनी मिळून नकारघंटाच लावली.

आताशा मला वाटायला लागलंय की थोडं स्वतंत्र व्हायला हवं. म्हणजे घरात मला कसली बंदी आहे असं नव्हे. पण आपलं एक वेगळं आभाळ असावं असं प्रत्येकाला वाटतंच ना. स्वप्नांचे पंख लावावेत आणि द्यावं झोकून. सोडावं आपलं गाव, आपलं घरटं. उडावं उंचच उंच. अर्थात घरट्यावरचं प्रेम त्यामुळे कमी होणार नाहीच. पण नवे अनुभव, नव्या शक्यता, जबाबदाऱ्या, प्रॉब्लेम्स, सोल्युशन्स. सगळं कोरं करकरीत नवं हवंय.

मग मी काय केलं? वाद घालणं बंद केलं आणि तडक आजीचं घर गाठलं. आजीचं घर म्हणजे मामाचं घर. आईची आई. बाबांची आई कधीच गेली. तिचं आभाळ अजून वेगळं. तर आजीकडे गेले. सगळ्यात मोठी नात म्हणून आजीची मी लाडकी आहे.

तिला सांगितलं. तिसऱ्या जनरेशन चे प्रॉब्लेम्स, दुसऱ्या जनरेशनला कळत नाहीत, पण पहिल्या जनरेशनला कळतात हे कसं काय? तिला माझं म्हणणं पटलं. लगेच फोन लावला तिने आईला आणि चांगली ओरडली. आईला लग्नाआधी नोकरी करायची होती. दादा नाही म्हणाले. तेव्हा, आता मी जशी भांडतेय, तशी ती आजीशी आणि दादांशी भांडली होती.

एकदा हाय कमांडनी आदेश काढला की मग आमच्याकडे काही चालत नाही. आजी हो म्हणाली आणि सगळा विरोध मावळला.

घरी गेले नंतर तर आई बाजूला घेऊन म्हणाली. हे बघ, आजी म्हणतेय म्हणून मी तुला परवानगी देतेय. पण उद्या भलतीकडे कुठे नोकरी मिळाली तर सांभाळून राहा. वाईट मित्रमंडळींपासून दूर राहा. लहान वयात काही कळत नाही काय चांगलं काय वाईट ते. दोनदा विचार कर काहीही करण्याआधी. मला खुदकन हसायला आलं. म्हटलं आई अजून मला कोणीही नोकरी दिली नाहीये. अत्तापासूनच एवढी चिंता. खरंच जायला लागलं तर काय होईल?

विन्या पुन्हा म्हणाला. ते पुणं सोडून काहीही बघ हं ताई. तू अतिरेकी आहेस, पण अतिरेकी दिसलीस तर जाम वाईट वाटेल मला.

बाबांना मनातून माझं पटलं होतंच. त्यांनी चक्क मला इंटरनेटवर सॉरी कार्ड पाठवलं. खाली लिहिलं होतं.

"उडणाऱ्या पिलाचे पंख बांधून ठेवल्याबद्दल पिलाच्या बाबाकडून सॉरी"

- संवादिनी

Thursday, March 20, 2008

मी, ती आणि फुलपाखरू

लाटा. भरती आणि ओहोटीच्या. म्हणजेच का आयुष्य?

एक दिवस येतो. उनाड फुलपाखरासारखा. वाटतं आपणही फुलपाखरू व्हावं. ह्या फुलावरून त्या फुलावर जावं. शोषून घ्यावा सगळा मध. फुलपाखराचं आयुष्य ते किती? दोन दिवस? मग ह्या दोन दिवसात पर्वा कुणाची करायची आणि का? आपण आपल्या मस्तीत जगावं आणि आपण आपल्या मस्तीत मरावं.

आपण मरावं? खरंच आपण मरू का? सगळं जग मर्त्य आहे हे माहित आहे. पण मीसुद्धा? हो खरंच मीसुद्धा. मग मी घाबरावं का मरणाला? सगळेच मरणार. कुणाच्या मरणाला घाबरायचं मी? माझ्या? का?

आप मरे जग बुडे.

आपण मेलो तर संपलंच ना सगळं. मग भीती कुणाच्या मरणाची. इतर फुलपाखरांच्या?

दुपरचे दोन वाजलेत. मी ऑफिसला गेलेच नाहीये. प्रचंड उकडतंय. शरीराला आणि मनालाही. वरचा पंखासुद्धा हैराण वाटतोय ह्या उकाड्यानं. बाबा घरी नाही. आईसुद्धा नाही. बाबा गेलाय तयारी करायला. आई त्यांच्याकडे. विनय त्याच्या कामाला गेलाय.

ते एक वेगळं फुलपाखरू. जग बुडलं तरी काही फरक पडायचा नाही त्याला.

आणि मी इथं बसलेय काहीही न करता. माझ्याच तंद्रीत. आठवणींची जळमटं झाडत बसलेय. आठवणींना जळमटं म्हणायचं का? किती जवळच्या असतात काही आठवणी. पण जळमटंच. ज्या आठवणी रडू आणतात, त्या जळमटांसारख्याच झाडून टाकायला हव्यात. मी त्वेषाने झाडू फिरवतेय, पण जळमटं काही तुटेनात. उलट मीच त्या जळमटांत गुरफटंत चाललेय. असह्य होतं सगळं

आणि मग, ती असहायता बाहेर पडते, एक थेंब बनून, डोळ्यातून. एक मग दुसरा मग तिसरा.

आई मला बोलवायला येते. माझी असहायता कुणाला दिसू नये म्हणून मी त्या तिघांना पुसून टाकते. बाहेर जाते.

अंगणामध्ये गर्दी असते. त्यात बाबाही असतो. विनूही असतो. तो दिसल्यावर मला उगाचंच बरं वाटतं. तपशील पुसट होत जातात. डोळ्यांच्या काचांवर धुकं जमतं. आई बाजूलाच असते. जरा आधार वाटतो. खरा मला बाबा हवा असतो कारण मला रडायचं असतं मनसोक्त. पण तो खाली अंगणात असतो. काहीबाही काम करीत.

राम बोलो भाई राम.

संगीतात आकंठ बुडून जाणारी मी, ह्या खर्जातल्या सुरांनी विषण्ण होते.

तिला घेऊन जात असतात. तीच. माझी कुणीही नसलेली ती. शांत झोपलेली असते. सगळ्या विवंचनेतून सुटलेली. एखाद्या फुलपाखरासारखी.

रांगणाऱ्या मला पटकन कडेवर उचलून घेणारी ती, दुपारी दंगा करून तिची झोपमोड केली म्हणून मला ओरडणारी ती, तिच्या मुलाला भाऊबिजेला राखी बांधते म्हणून माझं कौतूक करणारी ती, माझ्यासाठी न चुकता वांग्याची भाजी आणून देणारी ती, दोन दात बाहेर काढून प्रेमळपणे हसणारी ती, कुणाच्या लग्नात मुलाकडची असूनही मुलीची पाठवणी होताना रडणारी ती, प्रेमळ ती, घाबरट ती, शरणागत ती.

शेवटच्या आजारात हॉस्पिटलमध्ये असाहाय झालेली ती आणि तिची असहायता माझ्या डोळ्यात उतरवणारे ते तीन पुसलेले थेंब.

मी बघत राहते. पांढरं कोरं करकरीत कापड. इतकं करकरीत की बांबूत घुसवताना करकरणारं. करकचून बांधलेली सुतळ. अबीर, बुक्का, फुलांच्या माळा. डोक्याला लावलेलं ठसठशीत कुंकू. आणि ती जायला निघते.

पुन्हा ते कर्णकर्कश संगीत. तिचा मुलगा पुढे. बाबा चटकन पुढे होतो एक बाजू पकडतो. एवढा पहाडासारखा कणखर माझा बाबा, पण त्याच्याही एका डोळ्यात पाणी चमकतं. त्याच्या मोठ्या बहिणीसारखी ती.

ती निघून जाते. आई बायकांच्या घोळक्यात सामील. मी तिथेच. एकटी.

फुलपाखरू पण एकटं.

दोन घटका सगळीकडे सामसूम असते.

बाहेरून गोड खिदळण्याचा आवाज येतो. मी बाहेर जाते. तिची नात जोरजोरात खिदळत असते. दोन वर्षाची ती. तिला काय समज?

तेही एक फुलपाखरू. मीही. बाबाही, आईही आणि विनयही. सगळेच. बांबू बांधणारे, पांढरं कापड करकरवणारे, अबीर बुक्का सांडणारे आणि ते कर्णकर्कश्श संगीत म्हणणारे.

आणि सगळे एकटे.

- संवादिनी

Thursday, March 13, 2008

मी, वाढदिवस आणि आई

आईचा वाढदिवस झाला. मला माझा स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला अजिबात आवडत नाही. पण इतरांचा मात्र मनापासून आवडतो. आपण असं सेंटर ऑफ अटेन्शन झालेलं मला नाही आवडतं. आणि माझा वाढदिवस हे एक प्रकारचं खाजगी प्रकरण आहे असंच मला वाटतं. अर्थात मी जे फंडे माझ्या वाढदिवसाला लावते ते दुसऱ्यांच्या वाढदिवसाला लावत नाही. म्हणूनच घरातल्या बाकी तिघांचेही वाढदिवस जोरात साजरे व्हावेत असं मला मनापासून वाटतं.

तसा आईच्या वाढदिवसालासुद्धा. तिला गिफ्ट काय द्यायचं, इथपासून साजरा कसा करायचा इथपर्यंत, सगळ्या तयाऱ्या गेले काही दिवस चालू होत्या अर्थात तिला थांगपत्ता न लागू देता. सुटीच्या वारी वाढदिवस असल्याने बरंच होतं.

सगळं काही प्लॅनप्रमाणे सुरू झालं म्हणजे सकाळी लवकर उठून विन्याने चहा करायचा आणि मग आईला उठवायचं. चहा त्याने केला, पण तो करताना मला दहा वेळा उठवून पंधरा प्रश्न विचारले. आणि वाढदिवसाचं सार्वजनिक कार्य असल्याने नेहमीप्रमाणे मला त्याच्यावर उचकता आलं नाही. अर्थात मी काही चहा एक्स्पर्ट नव्हे. पण त्याच्यापेक्षा मी दहा पंधरा कप जास्तच बनवले असतील म्हणून माझा सल्ला. आयता चहा झकासंच होतो तसा विनयचाही झाला. मग बाबांनी त्यांच्या जेपी स्टाइलमध्ये जाहीर केलं की आज आईला स्वैपाकघरात बंदी.

सुटीच्या दिवशी सकाळी पेपरसाठी आमच्या घरात शब्दशः मारामारी होते पण आज नाही. मी स्वतःहून जाऊन तिला हवा तो पेपर घेऊ दिला. तिने मराठी पेपर घेतला. डी.एन.ए. च्या झकपक आफ्टर अवर्स पुरवण्या विन्याकडे सरकवून मला उरलेला पेपर मिळाला. इंग्रजी पेपर वाचायला मला आवडत नाही. पण आज कुणाला काही सांगायची सोय होती का?

बाबांनी पोह्यांचा घाट घातला होता. मी त्यांना आडून आडून फ्रेंच टोस्ट किंवा ऑम्लेट किंवा तत्सम सोपे पदार्थ करायचा सल्ला दिला होता पण तो त्यांनी धुडकावला. रुचिरात बघून कांदे पोहे कुणी केलेले तुम्ही ऐकलेत. बाबांनी केले. आणि ते सपशेल फसले. अर्धे जळून पातेल्यालाच चिकटले. आणि आईला आज स्वैपाकघरात बंदी. मग सगळी निस्तरपट्टी माझ्या वाट्याला लागली. बाबा जाऊन चक्क स्कूटरवरून जाऊन इडली घेऊन आले.

दुपारची महत्त्वाची जबाबदारी माझी होती. ती म्हणजे स्वैपाकाची. माझ्यासारखी बल्लवाचारीण असल्यावर काय बनवायचं हा मोठा प्रश्न. कारण जे बनेल ते खाता आलं पाहिजे, बनवायला एकदम सोपं हवं आणि नंतरची निस्तरपट्टी कमीत कमी हवी. ह्या सगळ्या अटी पाळत पाळत शेवटी पावभाजी ठरली. तरी हा दुपारी जेवायला खायचा पदार्थ नाही, असा मोडता विन्याने घातलाच. माझी स्वस्तात सुटका झालेली त्याला कधीच पाहवत नाही. पण शेवटी, प्रॉपर जेवायचे पदार्थ फेल जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बाबांनी मला पाठिंबा दिला. पावभाजी झकास झाली. थोडी तिखट झाली. त्यामुळे पाण्याबरोबर खावी लागली. मला खूप आवडली. आईला माहीत नाही आवडली का. पण ती म्हणाली तरी, नाक पुसत पुसत.

संध्याकाळी मी आई बाबांसाठी पिक्चरची तिकिटं काढली. ती दोघं तिथं गेली. विन्या क्रिकेट खेळायला (बाबांच्या शब्दात उकिरडा फुंकायला) गेला. मग घरात काय आम्ही दोघंच मी, और मेरी तनहाई. मग काय? जश्या अक्सर करतो, तश्या आम्ही बाते करीत बसलो.

एक दिवस आई किचनमध्ये नाही तर किती गोंधळ उडाला. गोष्टी चुकत नाहीत तोपर्यंत त्या बरोबर चालल्यात हे कळतंच नाही. किती कष्ट आहेत किचन सांभाळण्यात? अशा दिवशीच ते कळतं. वळेल तेव्हा खरं.

वाटलं जेवढं ती माझ्यासाठी करते तेवढं मी तिच्यासाठी करते का? तिचं ऐकते का? तिच्या बोलण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष का करते? मग फोटो काढून बसले जुने. एक आई बाबांचा तरुणपणाचा फोटो आहे. मी अगदी पाच सहा वर्षांची असेन तेव्हा. खूप आवडतो मला. आईच्या डोळ्यात जिद्द दिसते एक. संसार उभा करायची. पिचून गेली असेल का ही जिद्द आमचं करता करता?

मग जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत गेल्या. मला शाळेत घेऊन जाणारी आई. इतर मुलांच्या आया मधल्या सुट्टीत येतात, पण माझी आई नाही म्हणून तिच्याकडे रडणारी मी. माझ्यासाठी कुणाशीतरी भांडणारी आणि भांडण्याचा मुळात पिंडच नसल्याने डोळ्यात आलेलं पाणी लपवणारी आई, अभ्यास घेणारी आई, ओरडणारी आई, माझ्याशी भांडणारी आई. असे काही विचार आले की एकदम रडायला येतं. लाटांवर लाटा येत राहतात अगदी भरती ओसरेपर्यंत.

अगदी तारे झमीन पर मधल्या इशान सारखं...

मै कभी बतलाता नही, पर अंधेरेसे डरता हूं मै मा.
युं तो मै, दिखलाता नही, पर तेरी परवाह करता हूं मै मा.

तुझे सब है पता है ना मा. मेरी मां....

मग रात्री आई बाबा आल्यावर, मी आईला, खास कुणालाही न सांगता आणलेली भेट दिली. एक कॅन्व्हासची वही आणि स्केचींगची पेन्सिल. तिची चित्रकला खूप छान आहे. पण कुठे हरवून बसली कोण जाणे? ती देणगी दादांची. दादा म्हणजे आईचे बाबा. अप्रतिम चित्र काढायचे. तिला सांगितलं की चित्र काढ. मनात असेल ते काढ. खूप आनंद झाला तिला. मनापासून.

एकंदरीत वाढदिवस जोरात साजरा झाला.


- संवादिनी

Thursday, March 6, 2008

आजी, गाणं आणि दुःख

मला एकदम निराश बिराश वाटायला लागलं की दोनच गोष्टी मदतीला येतात. नाटक चालू असेल तर नाटक नाहीतर तानपुरा. अर्थात दुःखाची नवलाईही पाच दिवसाचीच असते. पहिले दोन दिवस आपल्याला वाटत होतं ते न घडण्याचं दुःख आणि उरलेले तीन बॅक टू नॉर्मल येण्यासाठी लागतात म्हणून.

रविवारी संध्याकाळी असंच डिप्रेसिंग वाटत होतं. हो नाही करता करता तानपुरा काढलाच. यमनाचे आलाप सुरू केले. "म" बरोबर लागतोय असं वाटलं. विनयला म्हटलं बस जरा तबला घेऊन. "ओरी आली पियाबिना" सुरू केलं. एवढं बरं वाटलं ना? सगळं सगळं विसरवून टाकायची जादू आहे संगीतात नाही? तो एक "नि", तो एक "म" बस्स. बाकी काही दिसतंच नाही डोळ्यापुढे.

तेवढ्यात बाबा आले, ते बसले, आई आली, तीही बसली. आमच्या मजल्यावरचे भावे काका आहेत त्यांनाही बाबांनी बोलावलं. ते उत्तम पेटी (खरंतर संवादिनी म्हणायला हवं) वाजवतात. बैठक जमली. अजूनही दोघं तिघं आली ऐकायला. मी काही फार गायले नाही. पण बाबांनी त्यांची हुकमी नाट्यगीतं म्हटली, देवाघरचे ज्ञात कुणाला, रम्य ही स्वर्गाहून लंका. मग मला खास भावेकाकांसाठी "का धरला परदेस" गायला लागलं. त्यांचं अतिशय आवडतं गाणं.

किती दिवस झाले अशी मैफल जमली नव्हती. ह्या मैफलीला ना उत्तम गायक ना श्रोते. आम्हीच गायक, आम्हीच वादक, आम्हीच सबकुछ. पण तरीही आनंद अगणित. वर्णनच करता येणार नाही. अर्थात बऱ्याच दिवसांनी झाली म्हणून मजा आली. दर रविवारी झाली असती तर कदाचित इतकी मजा आलीही नसती.

पण असं काही उत्स्फूर्तपणे घडलं की फार छान वाटतं. एकदम "जिप्सी". खावं, प्यावं, गाणी म्हणावीत, गप्पा माराव्यात, पुढच्या गावी जावं, पुन्हा तेच करावं. तो अभ्यास, ती नोकरी, लग्न, असल्या कटकटी कुणी निर्माण केल्या कुणास ठाऊक?

अर्थात आमच्या ह्या बैठकीची निस्तरपट्टी आईला करायला लागली. नाही म्हटलं तरी चहा पाणी करावंच लागतं.

असो तर सांगायचा मुद्दा हा, की रात्रीपर्यंत माझं डिप्रेशन कुठल्या कुठे पळालं. पुन्हा नवं वाटायला लागलं. आता नवं वाटायला लागलं म्हणजे काय? लिहिणं कठीण आहे.

उगाचंच आजीची आठवण आली. तिच्या भावंडांपैकी सगळे ह्या ना त्या प्रकारे शास्त्रीय संगीताशी जोडलेले. पण तिला काही जमलं नाही, एवढं वाईट वाटायचं तिला त्याचं. जाऊदे. आजी गेली तिच्याबरोबर तिला न जमलेलं गाणंही गेलं.

लाईफ जस्ट मूव्हस ऑन.

तिच्या गाण्यासाठी थांबलं नाही आणि माझ्या दुःखासाठीही.


- संवादिनी