Tuesday, September 14, 2010

कालच्या आईची आजची आई

ह्यावेळी गणपतीची वेगळीच मज्जा झाली. बाबा तिथे आणि आई इथे माझ्यासोबत. बाबानी उकडीच्या मोदकापासून सगळं काही स्वतः बनवलं. त्याची प्रॅक्टिस म्हणून बरेच वेळा उकडीचे मोदक बनवले. बऱ्याच वेळा फसले पण करून करून जमले एकदाचे. बाबाला म्हटलं फोटो काढून ठेव आणि किचनमध्ये लाव. लोकं कसे आपण मारलेल्या प्राण्यांच्या तोंडाची ट्रॉफी करून दिवाणखान्यात लावतात तसं.

मोदक करणे म्हणजे काय प्रकरण आहे हे मी गेली दोन वर्ष अनुभवतेय. कधी खोबरं जास्त तर कधी गूळ कमी. त्यात इथे मोदकांचं स्पेशल पीठ मिळत नाही त्यामुळे कव्हरपण हवं तसं होत नाही, अशी अनेक कारणं मी मोदक चांगले न होण्यासाठी देत आलेली आहे. पण ह्या वर्षी त्याच फ्रोजन कोकोनट आणि तांदळाच्या पिठाचे आईने मोदक केले. आईच्या हातची चव वेगळीच. काहीही साहित्य असूदे, मोदक चांगलेच होणार.

मला खूप वाईट वाटत होतं आईला इथे बोलावून घेताना. गणपती आणि बाबा घरी एकटा, हे काही बरोबर नव्हतं पण गणपतीपर्यंत आईचं इथे येणं पुढं ढकलणंही शक्य नव्हतं. पण गुरवारी रात्री श्रीमंत विनोबा घरी हजर. रविवारी सुटी टाकली त्याने. शुक्रवार शनिवार तशीही सुटी असतेच त्याला. बाबाला एकदम सरप्राइज दिलं त्यानं. तो बिलकुल मॅच्युअर्ड नाही असं माझं आपलं पक्कं मत. पण कधीतरी अशा गरजेच्या वेळी एकदम शहाण्या बाळासारखा कुठूनतरी उपटतो, म्हणून त्याचं कौतुकही वाटतं. त्याच्या उभ्या आयुष्यात, मी त्याच्या केलेल्या, एका हातावर मोजता येण्याइतक्या, कौतुकांपैकी हे एक.

दुपारी मी आणि आई इथल्या वुलवर्थमध्ये जाणार होतो. वुलवर्थ म्हणजे इथलं आमचं लाडकं वाण्याचं दुकान उर्फ सुपरमार्केट. पण दुपारी मला थोडं बरं वाटत नव्हतं. आई म्हणाली की बरं नसेल वाटत तर अजिबात यायचं नाही. मी जाते म्हणून. आधी मी नाहीच म्हणत होते मी. कारण तशी एकटी ती इथे फिरली नाहीये. इंग्रजीचा तिचा बिलकुल प्रॉब्लेम नाहीये पण हे लोकं काय बोलतात ते भारतातल्या अट्टल इंग्रजाच्याही डोक्यावरून जाऊ शकतं. वर तिला एकटीला तिथे जाणं जमेल का, बरोबर वस्तू कुठून उचलायच्या हे समजेल का? मग बरोबर बाहेर येऊन पिशव्या हातावर वागवत एवढं चालत ती येईल का? ह्या प्रश्नांनी हैराण झाले. तरी तिनं हट्टच मांडला. मग तिला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या. पुन्हा पुन्हा दिल्या. शेवटी एकदाची ती एकटी गेली आणि ती येईपर्यंत माझ्या जीवाला घोर.

ती गेली आणि मला माझीच मी आठवले. कॉलेजची परीक्षा असेल किंवा सीएची असेल, पण घरातून बाहेर पडेपर्यंत आईच्या सूचना चालू असायच्या. पेनं घेतलीस ना? पट्टी घेतलीस ना? शांतपणे पेपर लिही. स्कूटर हळू चालव. सिग्नल्सकडे लक्ष दे. पहिले सगळा पेपर वाच, मग उत्तरं लिही. मग मी आईला म्हणायचे, आई मला कळतंय, उगाच टेन्शन देऊ नकोस. मग बिचारी गप्प बसायची आणि मग मी घरी येईपर्यंत तिची उलाघाल चालू असायची. पेपर चांगला गेला असं मी तिला सांगेपर्यंत तिचं कशात लक्ष लागायचं नाही.

गंमतच वाटली. काळ बदलला, स्थळ बदललं की माणसांचे रोल्सही बदलतात. ती मला जसं सगळं पुन्हा पुन्हा सांगायची तसंच मी तिला सांगत राहिले. मी येईपर्यंत तिला जशी काळजी वाटायची तशीच ती येईपर्यंत मला वाटत राहिली. काल मुंबईत मी मुलीच्या रोलमध्ये होते आज इथे मी तिची आई असल्यासारखी वागले.