Friday, November 30, 2007

दिवाळी, ऑफिस आणि नाटक

सगळ्या लढाया पार पाडत शेवटी नाटकाचा प्रयोग पार पडलाच (पार पडला म्हणजे नाटक पार पडेल आहे असं नव्हे. तशी आमची नाटकं उभी कमी राहतात आणि पडतात जास्त, असो). दिवाळी, त्यात ऑफिसमध्ये वाढलेलं काम, हे सगळं सांभाळत शेवटी एकांकिका झाली आणि म्हणूनच आता लिहायला थोडा वेळ मिळतोय.


नशीब इतकं चांगलं की ह्यावेळी तालमींचा हॉल ऑफिसच्या जवळ होता. मग काय? संध्याकाळी साडेसहा सातला मी ऑफिसमधून गुल व्हायचे. नऊ वाजता परत. मग पुन्हा उशीरापर्यंत काम, मग रात्री ड्राइव्ह करत घरी. परत सकाळी ऑफिस. त्यात तालमीला उशीरा येते म्हणून आमचा डिरेक्टर माझ्या नावानी कांदे सोलणार. माझा रोलही त्याने कट केला त्यामुळे. दुसरा कमी महत्त्वाचा रोल दिला. त्याचंही बरोबरच आहे म्हणा. माझ्या ऑफिसची काळजी त्याने का करावी?


नुसता कल्लोळ झाला होता डोक्यात. घरी काय तर दिवाळीची तयारी. दर वेळी कंदिल करायला जेपींना (बाबांना) मी मदत करते. ह्यावेळी विनूने केली. आईचा आग्राह. फराळ करायला शीक. मी लाख शिकेन पण मी बनवलेला फराळ खाऊन दाखवेल असा "माँ का लाल" जन्माला यायचाय म्हणावं. नाही म्हणायला थोडे लाडू वळून दिले तिला. तेवढंच तिचं समाधान.


मग दिवाळीचे दिवस. पहिल्या दिवशी नव्हतीच सुट्टी. पण दांडी मारली. ह्यावेळी आमच्या चाळीत मोठा कंदिल बनवायची टुम निघाली. मग काय रात्रभर जागरण. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी उशीरापर्यंत (आठ वाजेपर्यंत. हा आमच्याकडचा उशीर) झोपते म्हणून आईचा ओरडा खाल्ला. पण कंदिल बाकी झकास झाला. रात्री काय सही दिसत होता.


रंगांची उधळण, त्या पणत्या, फुलबाज्या, फटाक्यांचा वास, थोडासा फराळ, विन्याने दिलेली भाऊबीज. वाह! मजा आली दिवाळीला. जेपींनी आईला पाडव्याला नवी साडी घेतली. भाऊबीजेला सगळी भावंड जमली. मजा आली. माझ्या लग्नाची काळजी आत्यांनाही भेडसावू लागल्याचं त्यांनी वारंवार, चुकवता येणार नाही अशा पद्धतीने उघड केलं. मी ते हसण्यावारी नेलं, पण किती दिवस?

तर तेवढा भाग सोडला तर दिवाळी जोरदार झाली. मोठ्या रांगोळ्या काढल्या. गेरू सारवताना हमखास मी माझा ड्रेसही सारवते, ते यंदाही चुकलं नाही. मी वळलेले लाडू गोल नसल्याचं विन्यानी मला पुन्हा पुन्हा सांगितलं. अर्थात त्याचा तो धंदाच आहे, त्याला तो तरी काय करणार? पण भाऊबीज झकास. "झोंबी" दिलं ह्यावेळी. मस्त आहे. मी वाचलंय पण पुस्तक आपल्या मालकीचं झालं की जास्त जवळचं वाटतं, नाही?

दिवाळी संपली आणि ऑफिसमध्ये महिन्याचा गो लाईव्ह जवळ यायला लागला. ह्या महिन्यात दहा लोकेशन्स आहेत. त्यामुळे त्याची कामं लागलेली होतीच. शिवाय मागच्या महिन्यात लाइव्ह गेलेल्या लोकेशन्सचे लोकं पीडायला असतातंच. त्यांचं काही चूक नाही म्हणा. भांडी घासताना एकदम राखुंडीच्या ऐवजी डिशवॉशर दिला तर काय अवस्था होईल रामा गड्याची? तीच गत त्यांची झालेय. गो लाईव्ह च्या दिवशी बहुदा रात्र ऑफिसमध्ये काढावी लागणार असं दिसतंय.

ह्या गो लाईव्ह ची एक गम्मत आठवली. लोकेशन्स चे लोकं ट्रेनिंगला येतात, त्यांच्यात दिल्लीच्या आसपासनं आलेला एक मुलगा होता. दोन दिवस माझी सेशन्स होती. एकदा चहा पिताना मला म्हणाला, "दीदी, जे गोलाय गोलाय क्या है?". आता दिदी म्हणायचं माझं वय आहे का? मी त्याला माझ्या मराठमोळ्या राष्ट्रभाषेत म्हटलं " गोलाय? ये तो मैने पयली बार सुना है" मग तो म्हणाला तुमचे साहेब लोक लोकेशन ला येऊन कितीतरी वेळा बडबडून गेले. मग आता दिदी च्या नात्याने त्याला सगळं गो लाइव्ह प्रकरण समजावलं.

गम्मत वाटली कितीतरी वेळा आपण लोकांना गृहित धरतो. की त्यांना अमुक गोष्ट माहीत आहे. नुस्त ऑफिसमध्येच नाही तर जनरली, घरी, बाजारात, दुकानात. ही गृहितकं सोडायला हवीत. माझ्यापुरतं तरी मी ठरवलंय. कठीण आहे. पण प्रयत्न करीन.

नाटकाबद्धल पण लिहायचंय, पण आज नको पुढच्या वेळी.

Thursday, November 22, 2007

मी आणि क्ष व्यक्ती

भेटले, अखेरीस भेटले.

माझी पहिली रन, की पहिली विकेट, स्कोअरबोर्ड वर लागली. बहुतेक विकेटच. पण विन्या म्हणाल्याप्रमाणे माझा डिनर बिनर काही सुटला नाही जिप्सी मधे. (तुम्हाला काही बोध होत नसेल तर मागचा ब्लॉग वाचा. तो वाचल्यावर तुम्हाला कळेल मी काय लिहितेय ते.)

तर त्याचं झालं असं, की मागे लिहिल्याप्रमाणे मी त्या "चांगल्या स्थळाला" भेटले. त्याला आपण सोयीसाठी क्ष व्यक्ती म्हणूया. मातोश्रींच्या समाधानासाठी सर्वप्रथम क्ष साहेबांना फोन केला. नशीबाने त्याला बाहेर दोघांनीच भेटायची कल्पना आवडली. तो दादरचा असल्याने आणि शिवाजी पार्क हा आमच्या ग्रूप चा जुना अड्डा असल्याने तिथेच भेटायचं ठरलं.


म्हणजे काय? की क्ष जर एकदम पकावू निघाला तर निदान अड्ड्यावर तरी कोणी भेटेल. एक तीर दो शिकार असा आपला माझा सूज्ञ विचार.

तर ठरल्याप्रमाणे ऑफिसमधून लवकर (?) निघून मी मीनाताईंच्या पुतळ्यासमोर हजर झाले. जरी क्ष चा फोटो पाहिला होता तरी त्याला मी ओळखेनच ह्याची खात्री नव्हती, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पोरा बाळांचं (पोरी बाळींचं स्त्रीलिंगी रूप) सूक्ष्म निरिक्षण मी चालवलं होतं. त्याचे दुष्परिणाम दिसू लागताच मी ते थांबवलं, क्ष मला नक्की ओळखेल ह्या अशेवर. मग येणाऱ्या जाणाऱ्या नाना नानींकडे बघत बसले. त्यांना अशी संधी मिळालीच नसेल बहुतेक, एकट्यानीच लग्न ठरण्याआधी भेटण्याची. तेही करून झालं, मग मीनाताईंकडेच बघत बसले. शेवटी फोन करायचा विचार केला. मग म्हटलं आपणंच कशाला आतूर वगैरे झालोय असं दाखवा.

तितक्यात तिथे सलील दिसला. सलील म्हणजे आमच्या नाटकाच्या ग्रूप मधला मुलगा. म्हटलं क्ष येईपर्यंत टाईंमपास मिळाला. पण आता मात्र फार म्हणजे फारच उशीर व्हायला लागला. फोन बाहेर काढला आणि फोन नंबर ऑफिसच्या इ-मेलमध्ये राहिल्याचं लक्षात आलं. आता थांबण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. तेवढ्यात माझाच फोन वाजला. क्ष चाच होता.

क्ष - हॅलो, मी क्ष बोलतोय. संवादिनी आहेत का?
मी - (आता माझ्या मोबाईल वर फोन करून मलाच मी आहे का असं विचारण्यात काय पॉइंट आहे?) हो मी - (आम्हीच) आहे (आहोत)
क्ष - अहो, मी तुमची वाट पाहतोय शिवाजी पार्क ला तुम्ही आहात कुठे?
मी - मीनाताईंच्या बाजूला
क्ष - कोण ताई?
मी - मीनाताई ठाकरे.
क्ष - ओहो, सॉरी. विसरलोच. काय झालं, मी पण तिथेच होतो पण मला तुम्ही दिसला नाहीत आणि पंधरा दिवसांसाठीच इंडियाला आल्यामुळे माझ्याकडे मोबाईल नव्हता. मग परत घरी जावून फोन करावा लागला. समोरच राहतो मी.
मी - बर मग येतोस ना आता? (की सगळं फोनवरंच बोलायचं? आडनावाला जागला अगदी. बाजूच्या स्टॉल वरून फोन नाही केला. घरी जावून केला. आता त्याचं आडनाव इंग्रजी "इ" ने संपणारं असणार हे सूज्ञांस सांगणे न लगे)
क्ष - हो येतो येतो. तुम्ही थांबा. आलोच


शेवटी क्ष आला. सुरवातीलाच मी त्याला मला अहो जाहो करू नको म्हणून सांगितलं. त्याने ते निमुटपणे एकलं. मग भारतात उकाडाच कसा आहे आणि त्याला त्याचा त्रासच कसा होतोय हे मला एकावं लागलं. उकाड्याच्या त्रासाचा आणि भारताबाहेर राहणाऱ्या लोकांचा अर्थाअर्थी काही संबंध आहे का? त्याच्याइतकाच उकाड्याचा त्रास मलाही होतो हे मी त्याला सांगितलं.

एकंदरीत काय तर पहिल्या पाचच मिनिटांत "तो हा नव्हेच" हे माझ्यापुरतं ठरलंच होतं. आमचा ग्रूप पलिकडे बस स्टॉपच्या बाजूला चौपाटीकडे बसला असणार. तिथे जायची मला घाई होती. बिचारा क्ष खूप मनापासून बोलत होता. बहुदा त्याला मी आवडले असं वाटलं. आणि तसा तो काही वाईट मुलगा नव्हता. चांगला होता, सभ्य होता. भारताला शिव्या देणं सोडलं तर अदर्वाईज डिसेंट वाटला.


पण एकंदरित तो मझ्या टाईप चा नव्हता. नाटक त्याला आवडत नाही. शास्त्रीय संगीत तर नाहीच नाही. मग लग्न झालं तर माझं कसं होणार? त्यामुळे एकदम सगळं नो नोच झालं माझं पहिल्यापासून. मला म्हणाला तो जिप्सीत जाऊया का? मीच नको म्हटलं. डाएट्वर आहे असं खोटंच सांगितलं आणि आता जिम लाही जायचं तेव्हा निघायला हवं असंही सांगितलं. बिचाऱ्याला वाईट वाटलं.

शेवटी एकदा माझी सुटका झाली. पाठी आमचं संभाषण ऐकून मीनाताईंचा पुतळा हसत होता असं उगाचंच मला वाटलं.

कट्ट्यावर गेले. तिथं सलील आणि अजून दोघं चंगूमंगू होते. मुली कोणीच नव्हत्या. माझा मूडही नव्हता. सरळ ८४ पकडली. घरी आले.

आईला सांगितलं की मला मुलगा आवडला नाही. मलाच वाईट वाटलं. म्हणजे एखादी व्यक्ती चांगली नाही असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? क्ष ला नाही ऐकून नक्कीच वाईट वाटणार आहे, मला माहीत आहे, पण त्याला नाही म्हणणारी मी कोण? मी असे कोणते मोठे दिवे लावलेत?


अर्थात त्याच्याशी लग्न करणं मला अशक्य आहे. तो वाईट आहे म्हणून नाही पण आमच्या आवडी वेगवेगळ्या आहेत म्हणून. हे सगळं त्याला कोण सांगणार आई म्हणाली पत्रिका मागू आणि जुळत नाही म्हणून सांगू.

मला संताप आला ह्या सगळ्या प्रकाराचा. उद्या मला मुलगा आवडला एखादा आणि त्यानी असं पत्रिका जुळली नाही म्हणून नको असं सांगितलं तर? माझं डोकं नक्कीच फिरेल. बाबांना सांगितलं. ते म्हणाले नाही तर सांगावच लागेल फक्त सौम्यपणे सांगायचं म्हणून पत्रिका. विन्या म्हणाला, ताई तू क्ष ला तिथेच सांगायचं ना? पण कसं?

शेवटी दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून मी क्ष ला फोन केला. त्याला सांगितलं खरं कारण. म्हणजे थोडसंच खरं सांगितलं, नाटक आणि शास्त्रिय संगीत म्हणजे माझा जीव आहे. तेच त्याला आवडत नाही मग पुढे कसं होणार? समजुतदार निघाला. हो म्हणाला आणि फोन ठेवला. त्याच्यापेक्षा मला नाही म्हणण्याचं वाईट जास्त वाटलं.

तर असा हा लग्नपुराणातला वरसंशोधन खंडातला प्रथमोध्याय संपला. हरये नमः, हरये नमः


- संवादिनी

Thursday, November 15, 2007

प्रश्न उत्तर आणि जिप्सी

प्रत्येक प्रश्नाला एखादं उत्तर असलंच पाहिजे का?

माझ्या मते हो. एखद्या प्रश्नाला उत्तरंच नसेल तर तो प्रश्न म्हणवून घ्यायच्या लायकीचाच नाही. असलेलं उत्तर सापडत नसेल तर गोष्ट वेगळी. त्याचा शोध घेण्यात एक मजा आहे. पण प्रश्नाला उत्तर नसेलंच तर त्याची उत्तरं शोधण्यात श्रम वाया घालवून स्वतःला मनस्ताप करून घेण्यात काय मजा आहे?

असाच एक उत्तर नसलेला प्रश्न. आता लग्न का करत नाही?

मुळात माझ्यासाठी हा प्रश्नच नाही. मला जोपर्यंत लग्न करावंसं वाटत नाही तोपर्यंत मी करणार नाही. पण केवळ करिअर च्या दृष्टीने काहीच करण्यासारखं उरलं नाही. नोकरी मिळाली, टिकली, चांगली चाललेय, म्हणून लग्न करणं मला शक्य नाही. पण सांगायचं कुणाला?

काल पुन्हा एकदा एक "चांगलं" स्थळ (आमच्या मातातातांच्या मते) सांगून आलं. म्हणे एकदा बघून घ्यायला काय हरकत आहे? काय बघायचं? मुलाचा चेहरा? त्याच्या आई वडलांचा चेहेरा? त्याचा पगार? शिक्षण? आणि मग काय इक्वेशन्स मांडत बसायचं?


थोडा दिसायला कमी आहे पण पगार चांगला आहे. पासिंग स्कोअर. करून टाका लग्न. किंवा दिसायला स्मार्ट आहे. बोलण्यात जरा कमी वाटतो, पण वडिलओपार्जित पैका आहे. पासिंग स्कोअर, करून टाका लग्न. किंवा मुलगा बोलायला दिसायला छान आहे, शिक्षण कमी आहे. नापास. नका करू लग्न. हे काय X = Y इतकं सोपं गणित आहे का?

काल पुन्हा हाच वाद रंगला. अर्थातच तो आई विरुद्ध मी असा होता. विनू (माझा भाऊ) माझ्या बाजूने आणि JP (बाबा) न्यायाधीश. पण जर आमची आई परवेझ मुशर्रफ असेल तर JP म्हणजे न्यायमूर्ती डेगर. म्हणजे न्यायाची अपेक्षा न केलेलीच बरी.

त्यांचं म्हणणं मी आता लग्न करावं. आमचं म्हणणं मी आताच लग्न करण्याची काहीही गरज नाहीये.


त्यांचं म्हणणं वय वाढत चाललंय. माझं म्हणणं लग्न केलं म्हणून वय वाढायचं थांबणार नाही. त्यांचं म्हणणं वय वाढल्यावर चांगली मुलं मिळणार नाहीत (कारण ती आधीच खपलेली असतात). माझं म्हणणं चांगली म्हणजे काय?


त्यांचं म्हणणं, शिक्षण नोकरी सगळं झालं आता थांबायचं कशाला? माझं म्हणणं इतकी वर्ष शिक्षण झालं, आता नोकरी चालू आहे, पण मला जे करायचं ते मी कधी करणार? नाटक, गाणं. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी (म्हशीसारखी म्हणा हवं असेल तर) मी गोल गोल फिरतेय. लग्न लावून देऊन मला दुसऱ्या घाण्याला जुंपून घ्यायचं नाहीये. माझ्या पॅशन्स कधी परस्यू करायच्या मी? लग्न झाल्यावर?

बाबांना माझं म्हणणं पटतं. आईलाही पटत असेल. मला खत्री आहे. पण तिच्या पिढीचे संस्कारच असे आहेत की पटून सुद्धा ती पटवून घेऊ शकत नाही. कालही तसंच झालं.

बाबा नंतर मला म्हणाले, विचार कर. तुला घालवून द्यायची नाहीये किंवा तुझा कंटाळाही आला नाहीये. पण काही गोष्टी कधी ना कधी कराव्याच लागतात आणि त्या योग्य वेळी झालेल्याच बऱ्या असतात. मी बरं म्हटलं. आईला जाऊन सॉरी म्हणाले. तिला म्हटलं मला थोडा वेळ दे. ती हो म्हणाली.
आजचं मरण उद्यावर ढकललं.

आता मी लग्न का करत नाही? भांडणापूर्वी माझ्यासाठी प्रश्नही नसलेलं हे वाक्य माझ्या मनात प्रश्नचिन्ह उमटवत राहतं. माझ्याकडे खरंच उत्तर नाही.


मला तिची बाजू कळते पण वळत नाही हेही तितकंच खरं.


मी हा मुद्दा माझ्या सबकॉन्शस माईंड मध्ये डंप करून काहीही होणार नाही. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? मला मुलं आवडत नाहीत का? आवडतात. चांगला दिसणारा मुलगा दिसला आणि नजरानजर झाली तर हृदयाची धडधड वाढतेच. किंवा एखाद्या हुशार फ्लुएंट बेलणाऱ्या मुलाशी बोलताना मी आकर्षित होतेच. पण आकर्षण वेगळं, लग्न वेगळं. क्रश असणं वेगळं आणि प्रेम असणं वेगळं.


आणि ह्या लग्न ठरवण्याच्या खेळात तर फार फार तर बघितलेल्या मुलावर क्रश होऊ शकतो. दोन भेटीत प्रेम कसं होईल?

ही भीती आहे का माझ्या मनात? फसलं तर हे सगळं. आईला मी एकदा विचारलं होतं. फसलं तर ठरवलेलं लग्न. ती म्हणाली, माझं (म्हणजे तिचं) काय फसलं? आता ह्यावर काय बोलणार?

बाबांना म्हटलं, बाबा मला अशी भीती वाटते की ठरवलेलं लग्न फसलं तर? ते म्हणाले, तुझं बरोबर आहे. फसू शकतं. पण म्हणून तू जन्मभर लग्नच नाही का करणार? मला म्हणाले तूच शोध तुझा नवरा. तसं झालं तरीही लग्न फसू शकतंच. मग काय करशील? नो रिस्क नो गेन. आणि तुला ही रिस्क कधी ना कधी घ्यावी लागणारंच आहे. मग त्यापासून पळून काय फायदा?

विनय ला विचारलं. तो म्हणाला ताई भंकस नको. इतक्यात काय लग्न. आय विल मिस यू यार. मग मी भांडू कोणाशी? डोळ्यात पाणी आलं माझ्या. मग म्हणाला, चिल! जास्त डोक्याला ताप करून घेऊ नको. मुलगा आवडला, चांगला वाटला तर पुढचा विचार कर. अतापासूनच नेगेटिव्ह राहू नकोस.

विनू भांडला कितीही तरी सल्ला बरोबरच देतो. कधी कधी मोठ्या भावासारखा.


त्याचं मी एकलं आईला सांगितलं की मी मुलाला भेटायला तयार आहे. पण सगळ्या फौजेसह नाही. जसं मी माझ्या एखाद्या मित्राला भेटते तसंच. तो दादरला राहतो. तेव्हा शिवाजी पार्क कट्टा उत्तम. आई खूष, बाबा येऊन मला थॅंक्स म्हणून गेले.

मी एकटीच विचार करीत उभी होते. विन्या आला म्हणाला चिल यार! कमसे कम जिप्सीत डिनर तरी सुटेल ना तुझा? आता ह्याच्याशी माझं भांडण होईल नाहीतर काय?

पण कांदा पोह्यांएवजी जिप्सी नक्कीच वाईट नाही. काय?

तकदीर में जो होगा वो देखा जायेगा.

- संवादिनी

Monday, November 5, 2007

खाज, सूख आणि बोच

दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष. किती दिवस मी हेच काम करत राहणार आहे? हा प्रश्न मनात अनेकवेळा येतो.

का? खरंतर वाईट असं काहीच नाहीये. म्हणजे कंपनी चांगली, पगार चांगला, बरेचसे लोकही चांगले, समुद्रकिनारी ऑफिस, चार्टर्ड अकौंटन्टला जितपत क्रिएटिव्ह जॉब मिळू शकेल तितपत जॉब. मग आणखी काय पाहिजे?

कॉलेजमधे असताना नाटकात कामं करायचे. दिवस रात्र केलेल्या तालमी. अजून आठवतं आय. एन. टी. च्या नाटकासाठी सिलेक्शन ला गेले होते. डिरेक्टरने माझी ऑडिशन न घेताच मला निवडली होती. आनंद आणि भीती. मलाच का सिलेक्ट केली एकही वाक्य न म्हणता? काही वेडंवाकडं तर नसेल ना डोक्यात त्याच्या? घाबरत घाबरतंच पहिल्या तालमीला गेले. पहिला उतारा वाचला आणि तो असा उचकला माझ्यावर? ज्या ज्या म्हणून शिव्या देता येत असतील त्या त्या दिल्या. अरे मुलगी म्हणून तरी जीभ आवरेल की नाही तुझी? ढसाढसा रडले होते मी. निघून आले तिथून. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेले, पण पुन्हा कधीच रडले नाही. डिरेक्टर लोकं असतातंच सर्किट, त्यांना काही मनावर घ्यायचं नसतं.

वाटायचं आपण तर बाबा क्रिएटिव्ह फिल्ड मधे जाणार. आय.एन.टी., मग यवसायिक नाटक, मग मराठी सिरियल्स, मग हिंदी, जमलंच तर चित्रपट. शेखचिल्लीच्या गगन भराऱ्या दुसरं काय? कॉमर्स ला जाऊन क्रिएटिव्ह फिल्ड?

जहाँ पनांनी (म्हणजे बाबांनी) ऑर्डर काढली. सी.ए. इज अ मस्ट. मीही काय विरोध वगैरे केला नाही. कारण नाटक चालू राहणारंच होतं. अजूनही आहे. पण व्यवसाय म्हणून नाही. खाज म्हणून. खाज आल्यावर खाजवल्याने जेवढं समाधान मिळतं तेवढं अजूनही मिळतंच नाटकातून. पण मग ती ओढाताण. ऑफिसमधून सुटा ते तालमीला जा, मग उशिरा घरी. आई कावणार, JP कावणार नाहीत पण जरा लवकर येत जा सांगणार.

आणि दिवसा ऑफिसमधे बसून ह्या सगळ्याचा मी विचार करणार. जसा अत्ता करतेय. कामं राहणार आणि माझा बॉस मला शिव्या देणार. अता तो मला फायर करताना इतका विनोदी दिसतो. एक तर तो आहे पाच फूट. किडकिडीत. मला त्याच्या फायरिंग चं टेन्शन यायच्या एवजी हसायला येतं. मग तो मला विचारतो, हसायला काय झालं? मग मी सांगणार, प्लीज तू मला फायर करू नको, तुला ते जमत नाही. मग तो म्हणणार, उद्यापासून दोरीच्या उड्या मारतो, आणि चहाला घेऊन जाणार. म्हणजे तात्पर्य काय? तर काम काही होणार नाही.

असेच दिवस, अशीच वर्ष. लग्न झाल्यावर कदाचित शहर बदलेल. पण स्क्रीप्ट हेच राहणार ना? डेबिट व्हॉट कम्स इन ऍन्ड क्रेडिट व्हॉट गोज आऊट. क्रिएटिव्हीटीच्या दृष्टीने सगळंच तोट्यात.

मला असे गहन (मझ्या दृष्टीने) प्रश्न पडले की मी बाबांना विचारते. त्यांना कधी पडले होते का प्रश्न. ते म्हणाले सूख सुखासुखी मिळालं की टोचतं.

त्यांचं खरंही असेल. देवाच्या दयेने फार लवकर मला स्थिरता आली. नोकरीची पैशाची. मग सूख बोचायला लागतं का? की आयुष्यात काही थ्रील राहत नाही म्हणून ते बोचतं? माहीत नाही.

आहे काही उपाय?

Thursday, November 1, 2007

रविवार आणि सैतान

रविवार.....

काय बरं करावं आज? झोपावं नुस्त दिवसभर. ते शक्य नाही. कारणं अनेक आहेत. पण त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जहाँ पनांना ते रुचत नाही. JP म्हणजे आमचे बाबा. नाही, "आमचे" हा शब्द मी स्वतःला आदरार्थी म्हणून वापरलेला नाही. कारण ते खरोखरच "आमचे" म्हणजे माझे आणि मी ज्याला भाऊ म्हणते अश्या नतदृष्ट मुलाचे वडील आहेत. लहान भावंड असतातच की नाही नत.... जाऊदे. ते पुन्हा कधीतरी...

दुसरं कारण म्हणजे हिंदी सिनेमात हिरॉईन्सची जशी मोठ्ठी घरं असतात तसं आमचं घर नाही. चाळीत राहिल्याने, आणि मुलीची "जात" (हे एक अजब प्रकरण आहे. मुलीची जात. मुलाची जात असा शब्दप्रयोग कधी एकलाय?) असल्याने, लवकर लवकर उठून काहीही न करता बसून राहणे हा माझा रविवारच उद्योग आहे.

तसा मधून मधून मला मरीन ड्राइव्ह ला फिरायला जाण्याचा अटॅक येतो. नाही असं नाही. पण सहसा ह्या रोगची लक्षणं सोमवारी दिसून येतात. मंगळ्वार बुधवारकडे हा ज्वर वाढतो आणि बुधवारकडे उतरतो. म्हणजे रविवारी मी खडखडीत बरी. देवाच्या कृपेने वजनाच्या काट्याला माझं वजन पेलताना फरसे कष्ट होत नाहीत त्यामुळे मीही व्यायाम वगैरे फारसं मनावर घेत नाही. नाही म्हणायला मी तळवलकरांकडे जायला सुरूवात केली होती. पण ती गम्मत पुन्हा कधीतरी.

तर सकाळ अशी आळसात गेल्यावर दुपारचं जेवण. मग पुन्हा एकदा आपली जात पात सांभाळत वामकुक्षी वगैरे जी म्हणतात ना ती.

कधी कधी वाटतं, अत्ता सगळी मजा आहे. आई सगळं करत्येय. लग्न झाल्यावर? मला करायला लागेल हे सगळं. म्हणजे आमचे JP चांगले आहेत. येता जाता ते थोडी फार कामं करतातच. पण शेवटी सचिन तेंडुलकरचा वाटा आईचाच ना? ऑफिस, घरची कामं. दमून जाते बिचारी. पण काय करणार. बाईची "जात".

माझंही असंच होईल का? म्हणजे मी आईएवढी होईन तेव्हा तिच्याइतकीच मीही दमेन का? मुलगी सहा दिवस ऑफिसात काम करून दमते. तिला आराम पडावा म्हणून मी हळूच तिची कामं करून टाकेन का?. म्हणजे मी मुलीच्या रोलमध्येसुद्धा काही फार कामं करत नाही. पण माझीच. म्हणजे इस्त्री, गाद्या घालणं वगैरे? बहुतेक नाही करणार.

Hopefully तोपर्यंत "जाती"चा प्रभाव तितकासा राहिला नसेल. नवरोजीला जुंपेन कामाला.

मला कधी कधी ना तिच्या उत्साहाचं कौतूक वाटतं. सतत काम. घरचं, ऑफिसचं, आमचा त्रास, आमची भांडणं, सगळं सहन करून ही बाई हसतमूख असतेच कशी?

भविष्यातल्या प्रश्नांची चिंता अत्ताच कशाला करा. टाईम आएगा तभी देखेंगे.

अशा विचारातच संध्याकाळ येते. रविवारची संध्याकाळ. लागे हृदयी हुरहूर. संध्याकाळी एकावं. तेसुद्धा रविवारच्या. उद्याचं ऑफिस दिसतंय. ज्याला बघून अजिबात छान वाटत नाही असा आमचा बॉस डोळ्यासमोर. लोकं फिरायला जातायत. आपल्या नवऱ्याबरोबर, मुलांबरोबर. आता मी या कोणत्याच गटात मोडत नाही ना. म्हणजे, लग्न झालं नाही. म्हणून नवरा नाही. मुलं तर नाहीच नाहीत. बरं आई वडलांबरोबर फिरायला जाण्याचं वय नाही. आम्हाला ते मानवत नाही, आणि आमच्या मातातातांना तर ते अजिबातच मानवत नाही. बरोबरीच्या मैत्रिणींची लग्न जमली तरी आहेत नाहीतर झाली तरी आहेत. काहींना बाळं पण आहेत. (त्यातल्या एकाने मला मावशी अशी हाक मारली तेव्हा कसलं म्हातारं झाल्यासारखं वाटलं मला). म्हणजे थोडक्यात काय? तर रविवारी संध्याकाळी मी एक गटाबाहेरचा शब्द होऊन जाते.

म्हणूनच लागे हृदयी हुरहूर. वाटतं आपलाही एक तो असावा. खूप देखणा स्मार्ट वगैरे नको. फक्त गोड हसणारा असावा. म्हणजे एकदम गुळाची ढेप नको, पण ए. ए. स्वीटस च्या काजूवड्यांइतपत चालेल.

म्हणजे तसा तो कुठेतरी आहेच. मला माहीत नाही इतकंच. मग मनाचा वेडा खेळ. तो अत्ता काय करीत असेल? म्हणजे जो कोण तो आहे तो. जिथे तो आहे तिथे. त्याचा नाही पत्ता पण तो काय करत असेल ह्याची चिंता.

आमच्या JP ना मी विचारलं आईची ऑळख होण्याआधी त्यांचं असं व्हायचं का? ते म्हणाले, वाचन कर. रिकामे मन म्हणजे सैतानाची प्रयोगशाळा असते. माझ्या काजूवडीला एकदम सैतानच करून टाकला की हो त्यांनी. जाऊदे आमचे JP मोघले आझम मधल्या JP सारखेच आहेत. फक्त त्यांचा सलीम आणि सल्मा त्यांना फारसं मनावर घेत नाहीत इतकंच. हे मी काय लिहिलं? JP म्हणतात तेच खरं. रिकामं मन is equal to Saitan's Lab

- संवादिनी