Friday, November 30, 2007

दिवाळी, ऑफिस आणि नाटक

सगळ्या लढाया पार पाडत शेवटी नाटकाचा प्रयोग पार पडलाच (पार पडला म्हणजे नाटक पार पडेल आहे असं नव्हे. तशी आमची नाटकं उभी कमी राहतात आणि पडतात जास्त, असो). दिवाळी, त्यात ऑफिसमध्ये वाढलेलं काम, हे सगळं सांभाळत शेवटी एकांकिका झाली आणि म्हणूनच आता लिहायला थोडा वेळ मिळतोय.


नशीब इतकं चांगलं की ह्यावेळी तालमींचा हॉल ऑफिसच्या जवळ होता. मग काय? संध्याकाळी साडेसहा सातला मी ऑफिसमधून गुल व्हायचे. नऊ वाजता परत. मग पुन्हा उशीरापर्यंत काम, मग रात्री ड्राइव्ह करत घरी. परत सकाळी ऑफिस. त्यात तालमीला उशीरा येते म्हणून आमचा डिरेक्टर माझ्या नावानी कांदे सोलणार. माझा रोलही त्याने कट केला त्यामुळे. दुसरा कमी महत्त्वाचा रोल दिला. त्याचंही बरोबरच आहे म्हणा. माझ्या ऑफिसची काळजी त्याने का करावी?


नुसता कल्लोळ झाला होता डोक्यात. घरी काय तर दिवाळीची तयारी. दर वेळी कंदिल करायला जेपींना (बाबांना) मी मदत करते. ह्यावेळी विनूने केली. आईचा आग्राह. फराळ करायला शीक. मी लाख शिकेन पण मी बनवलेला फराळ खाऊन दाखवेल असा "माँ का लाल" जन्माला यायचाय म्हणावं. नाही म्हणायला थोडे लाडू वळून दिले तिला. तेवढंच तिचं समाधान.


मग दिवाळीचे दिवस. पहिल्या दिवशी नव्हतीच सुट्टी. पण दांडी मारली. ह्यावेळी आमच्या चाळीत मोठा कंदिल बनवायची टुम निघाली. मग काय रात्रभर जागरण. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी उशीरापर्यंत (आठ वाजेपर्यंत. हा आमच्याकडचा उशीर) झोपते म्हणून आईचा ओरडा खाल्ला. पण कंदिल बाकी झकास झाला. रात्री काय सही दिसत होता.


रंगांची उधळण, त्या पणत्या, फुलबाज्या, फटाक्यांचा वास, थोडासा फराळ, विन्याने दिलेली भाऊबीज. वाह! मजा आली दिवाळीला. जेपींनी आईला पाडव्याला नवी साडी घेतली. भाऊबीजेला सगळी भावंड जमली. मजा आली. माझ्या लग्नाची काळजी आत्यांनाही भेडसावू लागल्याचं त्यांनी वारंवार, चुकवता येणार नाही अशा पद्धतीने उघड केलं. मी ते हसण्यावारी नेलं, पण किती दिवस?

तर तेवढा भाग सोडला तर दिवाळी जोरदार झाली. मोठ्या रांगोळ्या काढल्या. गेरू सारवताना हमखास मी माझा ड्रेसही सारवते, ते यंदाही चुकलं नाही. मी वळलेले लाडू गोल नसल्याचं विन्यानी मला पुन्हा पुन्हा सांगितलं. अर्थात त्याचा तो धंदाच आहे, त्याला तो तरी काय करणार? पण भाऊबीज झकास. "झोंबी" दिलं ह्यावेळी. मस्त आहे. मी वाचलंय पण पुस्तक आपल्या मालकीचं झालं की जास्त जवळचं वाटतं, नाही?

दिवाळी संपली आणि ऑफिसमध्ये महिन्याचा गो लाईव्ह जवळ यायला लागला. ह्या महिन्यात दहा लोकेशन्स आहेत. त्यामुळे त्याची कामं लागलेली होतीच. शिवाय मागच्या महिन्यात लाइव्ह गेलेल्या लोकेशन्सचे लोकं पीडायला असतातंच. त्यांचं काही चूक नाही म्हणा. भांडी घासताना एकदम राखुंडीच्या ऐवजी डिशवॉशर दिला तर काय अवस्था होईल रामा गड्याची? तीच गत त्यांची झालेय. गो लाईव्ह च्या दिवशी बहुदा रात्र ऑफिसमध्ये काढावी लागणार असं दिसतंय.

ह्या गो लाईव्ह ची एक गम्मत आठवली. लोकेशन्स चे लोकं ट्रेनिंगला येतात, त्यांच्यात दिल्लीच्या आसपासनं आलेला एक मुलगा होता. दोन दिवस माझी सेशन्स होती. एकदा चहा पिताना मला म्हणाला, "दीदी, जे गोलाय गोलाय क्या है?". आता दिदी म्हणायचं माझं वय आहे का? मी त्याला माझ्या मराठमोळ्या राष्ट्रभाषेत म्हटलं " गोलाय? ये तो मैने पयली बार सुना है" मग तो म्हणाला तुमचे साहेब लोक लोकेशन ला येऊन कितीतरी वेळा बडबडून गेले. मग आता दिदी च्या नात्याने त्याला सगळं गो लाइव्ह प्रकरण समजावलं.

गम्मत वाटली कितीतरी वेळा आपण लोकांना गृहित धरतो. की त्यांना अमुक गोष्ट माहीत आहे. नुस्त ऑफिसमध्येच नाही तर जनरली, घरी, बाजारात, दुकानात. ही गृहितकं सोडायला हवीत. माझ्यापुरतं तरी मी ठरवलंय. कठीण आहे. पण प्रयत्न करीन.

नाटकाबद्धल पण लिहायचंय, पण आज नको पुढच्या वेळी.

4 comments:

Abhijit Bathe said...

दिवाळी आणि ईन जनरल धांदल लेखनात सही आलिए! ओह btw - हे गो लाईव्ह प्रकरण काय आहे?

सर्किट said...

गुड पोस्ट! त्या सार्वजनिक आकाशकंदीलाचा फोटो अपलोड करायचा होतास नां! आम्हीही तुमच्या सर्वांच्या हस्तकलेचं कौतुक केलं असतं.

बाठे, तुम्ही तिला ’दीदी’ म्हणून हाक मारली तरच ती ’गो लाईव्ह’ चा अर्थ सांगेल! ;-)

Amey said...

दीदी, नाटक पार पडल्याबद्दल ("पार" पडल्याबद्दल नाही) अभिनंदन!

लग्नाच्या गोष्टी एकदा नातेवाईकांनी सुरू केल्या, की आता मजा आहे. अजून धावा काढायला तयार रहा ;)

संवादिनी said...

अभिजीत - गो लाइव्ह प्रकरण, वाटतं तितकं गंभीर नाहीये. एकदा एका साईटला सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंट तशस्वी झाली झाली की इतर साइटस ना ते डिप्लॉय केलं जातं. प्रत्येक लोकेशन च्या डिप्लॉयमेंट डेट ला गो-लाइव्ह डेट असं म्हणतात, पण सामान्य कारकुनाला त्याचा अर्थ कोणी सांगतच नाही, तर त्याला कळायचं तरी कसं?

सर्किट - फोटो काढला असता तर नक्की चिकटवला असता. ते राहूनच गेलं बघुया पुढच्या वर्षी तो कंदिल माझ्या नशिबात आहे का ते? असेल तर पुढच्या वर्षी नक्की. आणि दिदी नाही म्हटलं तरी चिकटवीन फोटो.

अमेय - नाटकाबद्धल ह्या आठवड्यात लिहिलंय. इतक्यात धावा काढायची किंवा विकेट काढायची किंवा फेकायची संधी नाहीये. नो न्यूज इज द बेस्ट न्यूज.