Thursday, December 6, 2007

मी, नाटक आणि ती

गेल्या आठवड्यात आमच्या नाटकाबद्दल काही लिहिता आलं नाही, आणि ह्या आठवड्यात लिहिण्यासारखं काही विशेष घडलं नाही, म्हणून आता नाटकाबद्दलंच लिहिते.


ह्या महिन्याची एकांकिका बरी झाली. म्हणजे तशी चांगलीच झाली, पण "आपली आपण करी जो स्तुती तो सर्व जगी मूर्ख मानावा" असं कोणीतरी, बहुतेक रामदासांनी, म्हटलेलं आहे, म्हणून एकांकिका बरी झाली असं म्हणायचं. तसं रामदासांचं सगळंच मला पटत नाही. ते "टवाळा आवडे विनोद" म्हणतात. म्हणजे सगळे मराठी नाटकवाले आणि त्यांचे प्रेक्षक टवाळंच झाले की हो. असो, तर आमची एकांकिका बरी झाली.


माझा रोल तसा वेगळा नव्हता. म्हणजे रोल चांगला होता. पण तो माझ्यासारखाच होता. म्हणजे माझ्याच वयाची मुलगी, प्रेमात पडते वगैरे वगैरे. त्याच्यामुळे कमी मेहेनत घ्यावी लागली. अर्थात, कामच्या व्यापामुळे ते माझ्या पथ्यावरंच पडलं. शंभरात पंच्याण्ण्व वेळा असतं तसं हे नाटकही पुरुषप्रधानच होतं. म्हणजे जे काही नाट्य बिट्य घडू शकतं ते पुरुषांच्या बाबतीतच घडू शकतं. स्त्रीया फक्त मम म्हणायला. असं काहीसं. बहुदा नाटकात, विषेशतः एकांकिकांमध्ये स्त्री लेखकांची, किंवा लेखकांची वानवा आहे. दिग्दर्शनातही तेच. त्यामुळे असेल, पण अशीच परिस्थिती आहे.


असो मेली, सांगायचा मुद्दा काय तर साधा रोल होता, करायला मजा आली. जबाबदारी कमी, गंमत जास्त. दिरेक्टरच्या शिव्या कमी, ओव्या जास्त.


एक मी असते, माझ्यासारखीच, तिला एक तो भेटतो, काजूवडीसारखा (संदर्भ न लागल्यास मागचे ब्लॉग वाचणे). त्याला मी आवडते, मला तो आवडतो आणि आम्ही प्रेमात पडतो.


जे माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात घडायला पाहिजे ते सगळं नाटकात घडतं. शेवटी नाटक इज अ फॅन्टसी. मग मी माझी फॅन्टसी नाटकातच जगून घेते. तीच होऊन जाते. समोरचा मुलगा समोरचा राहतच नाही. तो माझा काजूवडी होतो. प्रत्यक्षातल्या उर्मी रेषा बनून चेहेऱ्यावर उमटतात. उमटलेल्या रेषा प्रेक्षकांना त्यांच्या उर्मींची जाणीव करून देतात. कधी प्रकट झालेल्या, कधी प्रकट न झालेल्या आणि नाटक प्रेक्षकांना भावतं. everyone lives their fantacy, मी, तो आणि प्रेक्षक सुद्धा. तेव्हा नाटक चांगलं होतं. भावतं.


आणि माझ्यासाठी नाटक म्हणजे त्याहीपेक्षा काही जास्त आहे. कल्पना करा. अर्ध्या पाऊण तासासाठी का होईना, आपण स्वतःला विसरायचं. स्वतःची नोकरी, कुटुंब, मुलं, समस्या, राग, लोभ, अहंकार सगळं विसरायचं. आणि जो रोल करायचा असेल ती व्यक्ती व्हायचं. राणी, भिकारीण, बायको, मुलगी, वेष्या काहीही. मग माझे विचार, माझं व्यक्तिमत्त्व, माझ्यावर झालेले संस्कार हे सगळं सोडून मला त्या व्यक्तीसारखं वागणं भाग होतं. परकाया प्रवेश वगैरे जे म्हणतात ना तसं काहीसं. Getting into shoes of someone else.


मग बाकीच्या जगाचं अस्तित्व पुसलं जातं. समोरचा अंधार, डोक्यावरचे लाईटस आणि आपण. मध्येच प्रेक्षकांतून येणारी हास्याची लकेर किंवा कान फुटतील इतकी जाणवणारी निःशब्द शांतता. ह्यांचंच एक वेगळं विश्व. एक फॅन्टसी, एक नाटक, एक आयुष्य. पार्श्वसंगीत, पार्श्वसंगीत नव्हे, माझ्या भावना, डोळ्यातून ओघळणाऱ्या, रडणाऱ्या, भेकणाऱ्या, हसणाऱ्या, वेडावणाऱ्या, धुंद आणि मी नव्हे, ती, जीचा रोल मी करतेय.


नाही ना काही कळलं? त्या जाणीवा व्यक्त करण्यासारख्या नाहीतच मुळी. किंवा त्या व्यक्त करण्याईतकी माझी भाषा संपन्न नाहीये. शेवटी काय भा.पो. ना? (भा.पो. म्हणजे भावना पोहोचल्या), मग ठीक.

6 comments:

राफा said...

आपली आपण करी जो स्तुती तो सर्व जगी मूर्ख मानावा" >> बहुतेक रामदासच.. 'मीटर' मॅच होतयं ! :)

आधीची पोस्ट वाचली ती मनापासून लिहिल्यामुळे - म्हणजे असं वाटतंय - छान सहज उतरली आहेत. (रविवार आणि सैतान, मी आणि क्ष व्यक्ती)

(ह्या पोस्टला 'दोन लेख आणि मी' हे शिर्षक फिट्ट होईल :) )

keep writing !

Nandan said...

perfect bha. po.

सर्किट said...

saheeye.. marathi rangabhumila ata ek takadwaan abhinetri miLanar tarr. :)
keep writing..

HAREKRISHNAJI said...

आपणास स्वारस्थ असल्यास
स्वामी हरीदास संगीत संमेलन

१५ डिसेंबर ते १९ डिसेंबर - ओडीसी, कथ्थक, मोहीनी अट्ट्म, भरत नाट्यम, कुचीपुडी, आदी नुत्य प्रकार
२० ते २४ डिसेंबर - शास्त्रीय गायन व वादन (सरोद, तबला, गिटार, व्हायोलीन, पखावाज्, सतार )


रोज संध्याकाळी ६ वाजता, रोज जवळ जवळ ६ कलाकार, आयोजक - सुर सिंगार संसद,
स्थळ - विद्यापिठ विध्यार्थी भवन , बी रोड, चर्चगेट, मुंबई.

संवादिनी said...

Rahul,

Thanks for the compli. I am trying to write Manapasun. Hope it works.

Sarkit,

Tasa kahi nahiye

Nandan,

Bha Po he bara zala

Harekrishnaji,

I will be there at least on one of the evenings. May be in the later part.

-Sam

Sneha said...

mastach ga.... mihi natakavali... tyamule bha po.... :)
atta khup miss karatey sagal... i want to do smthing....