Thursday, December 13, 2007

१२ डिसेंबर आणि मी

काही तारखा मनाच्या कॅलेंडरमध्ये नेहेमीच मार्क केलेल्या असतात. तशीच ही तारीख १२ डिसेंबर. वाढदिवस लक्षात न राहण्याचा अवगूण माझ्यात ठासून भरलेला आहे. विनूचा लक्षात आहे. आई बाबांचा आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस एकाच महिन्यात असल्याने नेहेमी थोडा गोंधळ उडतो. बाकी मैत्रीणींचे वाढदिवस मी नेहेमी विसरते. पण १२ डिसेंबर नाही.

खरंतर माझ्या जगात ह्या दिवसाला आता काहीच महत्त्व नाही. फार फारतर एखादा इ-मेल किंवा ऑर्कूट्वर स्क्रॅप बस. पण कधीतरी महत्त्व होतं. कधी म्हणजे? फार फार पूर्वी. जेव्हा मी शाळेत होते तेव्हा.


आठवीत किंवा नववीत असेन तेव्हा. ते वय विचित्रच असतं ना? म्हणजे आपण मोठ्या तर झालेल्या नसतो, पण मोठं झाल्यासारखं वाटत असतं. पौगंडावस्था. माझी आजीच्या शब्दकोषात ह्याला एक चांगला शब्द होता. अशा मुलांना ती "आडबाप्या" म्हणायची. पण मुलींना? मी विचारलं होतं तिला ती म्हणाली, माहीत नाही, पण आडबाई म्हणायला हरकत नाही. तस असं हे आड whatever वय.


परिकथेतल्या स्वप्नांना शक्यतेचे कोंब फुटायला लागलेले असतात. प्रेम, प्रेम जे काय म्हणतात ते एकदा चाखून पाहायचं असतं. उत्सुकता असते, दडपण पण असतं. मी अनुभवलंय. म्हणजे कुणावर प्रेम वगैरे बसण्याचे ते दिवस नसतातंच. कारण आपल्य स्वतःच्या आवडी निवडीच आपल्याला नक्की माहीत नसतात. पण प्रेमात पडणं मात्र अनुभवायचं असतं. अशा नेमक्या वेळी आपल्याला तो दिसतो.


आता एका शाळेत म्हणजे लहानपणापासूनच त्याला बघितलेलं असतं. पण आता जसा तो उलगडतो तसा पूर्वी कधी उलगडलेला नसतो. त्याचा तो चष्मा, गोड स्माईल वगैरे सगळं दिसायला लागलेलं असतं. तसा तो हुषार असतोच. खेळात अगदीच आघाडीवर नसला तरी बिघाडीवरही नसतो. हळुहळू तो आवडायला लागतो. अं हं. तो आवडण्यापेक्षा त्याच्या प्रेमात पडण्याची कल्पना आवडायला लागते.


मनातली ही कल्पना कोणत्यातरी बेसावध क्षणी शब्दात उतरते. नाही. अजून त्याला सांगायचं धैर्य झालेलं नसतं. पण हे आपलं गुपित अलगद मैत्रिणींना समजतं. मग सुरू होते चिडवा चिडवी. लटका राग.
कसा कोण जाणे मग त्याला ह्या गोष्टीचा वास लागतो. मग तोही प्रेमात पडतो, प्रेमात पडण्याच्या संकल्पनेच्या. दिवस जातात आठवडे जातात. महिने जातात. कधीतरी शाळेची पिकनिक निघते. गाण्याच्या भेंड्या सुरू होतात. मैत्रिणी तिला आणि मित्र त्याला चिडवत राहतात.


शेवटी तो तिला प्रपोज करतो. आता शब्द आठवत नाहीत पण ती हो म्हणतंच नाही. फक्त हसते. हो कसं म्हणायचं हेसुद्धा तिला माहित नसतं. कोणी तरी आपल्या प्रेमात पडलंय ही किती सुखावणारी भावाना आहे हे तेव्हा कळतं.


आणि हे प्रेमप्रेकरण तिथेच संपतं. कारण त्यात पुढे काही होण्यासारखं नसतंच मुळी. शाळा संपते, दोघांचं कॉलेज वेगवेगळं असतं. विश्व विस्तारतात आणि जुनी विश्व अवास्तव, खुजी वाटायला लागतात. ह्या विश्वातून त्या विश्वात जाताना होणाऱ्या गदारोळात ही प्रेमात पडल्याची भावना विरून जाते.


आता तो कधी कधी तिला मेल करतो. ती त्याला उत्तर देते. वाढदिवस, त्याचा आणि त्याच्या लग्नाचा, ती विश करते. अर्थात लग्नाचा वाढदिवस आता लक्षात राहत नाही पण वाढदिवस मात्र राहतो.
कारण त्या मंतरलेल्या दिवसात त्याच्या वाढदिवसाला कधीतरी तिने स्वतःच्या हाताने काढलेलं स्केच दिलेलं असतं कुठल्याश्या हिंदी चित्रपटाच्या कॅसेटवरच्या चित्राचं. अर्थात तो चित्रपट म्हणजे प्रेमकथा असते.


ती तो चित्रपट आणि ते स्केच दोन्हीही विसरलेली असते. त्याच्याकडे अजूनही ते जपून ठेवलेलं असावं असं मात्र तिला का कोण जाणे वाटत राहतं. फक्त तो दिवस तिच्या लक्षात राहतो १२ डिसेंबर.


तसाच हा दिवस माझ्याही लक्षात राहिला. १२ डिसेंबर. आठवून वाटतं. किती वेडी होते मी तेव्हा. नाही. हा सगळा वयाचा परिणाम. पण जे काही घडलं ते मी मनापासून एन्जॉय केलं. ते महत्त्वाचं. पात्र कोण होती हे महत्त्वाचं नाही. अनुभव महत्त्वाचा.

कधी कधी वाटतं, काहीच जरी कळत नसलं तरी त्या दिवसातलं प्रेम किंवा क्रश किंवा whatever खरा असावा, कारण त्याला मोजमापं नसतात. पगाराची, उंचीची, जातीची, वयाची, शरीराची. कदाचित तेच खरं असेल. कुणी सांगावं?

9 comments:

Anonymous said...

> कधी कधी वाटतं, काहीच जरी कळत नसलं तरी त्या दिवसातलं प्रेम किंवा क्रश किंवा whatever खरा असावा, कारण त्याला मोजमापं नसतात. पगाराची, उंचीची, जातीची, वयाची, शरीराची. कदाचित तेच खरं असेल. कुणी सांगावं?

हे मात्र अगदी खर!
व्यवहाराचा स्पर्श झाल्यावर शहाणपण येत (?)... पण निरागसता (? की मुर्खपणा) कायमचा दुरावतो!

लेख अतिशय आवडला.

HAREKRISHNAJI said...

किती छान वर्णन केले आहेत त्या वेळचा अवस्थेच. ते वयच तसे असते, स्वप्नात गुंगुन जाण्याचे, पण त्या वेळचे क्षण मात्र निरंतर लक्षात रहातात.

सर्किट said...

क्लास! सुरेख! :)

Dhananjay said...

chhan lekh! Asach kahitari malapan athavala. 'Shala' kadambarichi pan athavan zali.

Abhijit Bathe said...

सही है बाप!....

Amey said...

तो आवडण्यापेक्षा त्याच्या प्रेमात पडण्याची कल्पना आवडायला लागते.

त्या वयातच काय, अनेकदा हेच जास्त खरे असते.

संवादिनी said...

Thanks all for the comments.....

Sam

a Sane man said...
This comment has been removed by the author.
a Sane man said...

I have started reading your blog of late and cannot stop reading all the previous posts...too good...

'ShaLa" ya Milind Bokilanchya pustakacha saransh aahe kahisa he post mhanje....surekh!