Thursday, June 26, 2008

मिशन इंपॉसिबल आणि हम पांच

दिल्लीला येऊन एक आठवडा होऊन गेला. एका आठवड्याने परत जायला मिळेल असं येताना वाटलं होतं तो फुगा फुटला. प्रोजेक्ट आताच सुरू झालाय आणि अजून किमान एक महिना माझं काम असेल. कदाचित त्याहून अधिक. आनंदाची गोष्ट हीच की क्लायंट चांगला आहे. त्यांनी चक्क दोन छानसे तीन बेडरूमचे फ्लॅट आमच्यासाठी भाड्याने घेतलेत.

आम्ही पाच जणं आहोत आणि मोठा साहेब सहावा. मोठा म्हणजे खूपच मोठा साहेब आहे तो. पण चांगला आहे. टकलू आहे पण तरीही हँडसम. बरीच वर्ष अमेरिकेला राहून परतलाय म्हणून इंग्रजी जरा इस्टाइलमध्ये बोलतो इतकंच. आमच्या कंपनीत खूप मोठ्या हुद्द्यावर आहे. ह्या हिमालयासमोर आम्ही सगळे अगदी मलबार हिलच्या टेकडीसारखे आहोत.

पण आमच्या सगळ्यात त्यातल्या त्यात उंच टेकडी म्हणजे अनु. तिचं पूर्ण नाव अनुसया का काहीतरी आहे. त्यापुढे अनु बरं वाटतं. तिला ह्या कंपनीत तीन वर्ष काढून झालीत. ती आणि मी दोघीही फंक्शनल. फंक्शनल कंसल्टंट चा शिकलेला नवा शॉर्ट फॉर्म फंकी. तर आम्ही दोघी फंकी. अजून नीटसा अंदाज आलेला नाही नक्की कशी आहे त्याचा. पण बोलायला, वागायला बरी वाटते. ती आमच्या टीमची पुढारी. लीडर. आता पुढारी आले म्हणजे राजकारण येणार की काय? कल्पना नाही. सो फार सो गुड.

आम्ही दोघी फंकी आणि अजून तिघं टेकी. तिघेही मुलं. दुःखाने विशद करायची गोष्ट अशी की एकही इंटरेस्टिंग नाही. एक मल्याळी ख्रिश्चन. त्याचं लग्न नुकतंच झालंय. बायको केरळात आहे. नेहमी तिचीच स्वप्न बघत असतो. तिच्याबद्दलच बोलत असतो. चांगला वाटतो पण खूप डिप्लोमॅटिक आहे. ओठावर एक आणि मनात एक असा वाटतो. अजून तरी माझा अंदाज बरोबर आहे असं मला काहीही आढळलेलं नाही. म्हणून सध्या मी त्याला संशयाचा फायदा देणार आहे. ह्याचं नाव टॉम.

दुसरा मराठी आहे. नागपुरकडचा असावा. पण मराठी आहे, म्हणून जवळचा वाटतो. त्याच्याशी चांगली मैत्री झालेय. नाव नीतिन. लग्न झालंय. बायको पुण्याला. एक लहान मुलगापण आहे त्याला. हा त्यातल्या त्यात अनुभवी टेकी. म्हणून तो टेकींचा पुढारी.

शेवटचा उडीया आहे. कृष्णा उर्फ क्रिश. भुवनेश्वरचा. सिंगल अँड लुकिंग. ह्याच्यापासून सावधान! असं मला माझ्या मनाने पहिल्या दिवशीच सांगितलंय, म्हणून मी जरा लांब लांबच आहे त्याच्यापासून. पण पुन्हा आतापर्यंत तरी त्याने माझ्या संशयाला पुष्टी देण्यासारखं काहीही केलेलं नाही. म्हणून मीही त्याला संशयाचा फायदा देत आहे. मला नाही म्हणा उगाचच नको ते वाटून घेण्याची जुनी खोड आहेच.

आणि आमच्या घराच्या काळजीवहनासाठी आहे दुबे. त्याचं नाव दुबे नाहीच आहे. पण त्याला पाहिल्यावर मॉन्सून वेंडिंगमधला दुबे आठवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून त्याचा दुसरा नामकरण सोहोळा केलाय, तो हा दुबे. पोरगेलसाच आहे. पण मनापासून कामं करतो. हा भेटल्यावर भय्या लोकांबद्दलची माझ्या मनातली आढी थोडी कमी झालेय.

तर अशी ही आमची टीम. नवा डाव सुरू. नवा राजा, नव्हे राणी. आणि नव्या राणीची मी जुनीच सबऑर्डिनेट.

क्लायंटचेही काही लोकं आहेत. काही चांगले काही वाईट. पण त्यातली एक बंगाली मुलगी मला खूप आवडलेय. तिचं नाव कला. म्हणजे तिला म्हणतात कला. काय मस्त नाव आहे नं? कला. आर्ट. आणि नावाप्रमाणेच कलाकार मुलगी आहे. रविंद्रसंगीत म्हणून दाखवणार आहे ती मला. टिपीकल बंगाली मुलींसारखी नाजूक आणि दिसायला खूप सुंदर. धारदार बुद्धी आणि जीव ओवाळून टाकावा असे डोळे. अगदी थेट कोकणा सेनसारखे. तशी ज्युनिअर आहे पण हुशार आहे.

काम तर जोरात सुरू झालेलंच आहे. मला पहिल्यांदा कसं वाटलं माहितेय? कुणी तुम्हाला अंधाऱ्या खोलीत सोडलं आणि सांगितलं, की ह्या खोलीत कुठच्या एका कोपऱ्यात एक दरवाजा आहे आणि तो उघडणारा रिमोट खोलीत कुठेही असू शकेल. कुणालाच माहीत नाही. दोन महिन्यात दरवाजा उघडून दाखवा. तसंच वाटलं. दरवाजा उघडायचा हे माहीत आहे, दोन महिने आहेत हेही माहीत आहे. पण कसा? ते स्वतः शोधून काढायचं. कठीण आहे पण तितकंच चॅलेंजिंग.

सुरवातीला कठीण गेलं पण आता त्या खोलीच्या लांबीरुंदीचा अंदाज यायला लागलाय. आणि तिथे आपण एकटेच नाही अजून दहा बारा जणं आहेत हा दिलासापण मिळतोय. सकाळी उठणे, दुबेने दिलेला नाश्ता करणे, ऑफिसात जाणे, काम काम काम, मग कुठूनतरी मागवलेलं जेवणे, पुन्हा काम काम काम, संध्याकाळी घरी एखादा फोन वगैरे कामाच्या मधे, मग रात्रीचं जेवण मागवणे ऑफिसातच, आणि बाराच्या सुमाराला घरी जाऊन बिछान्यावर टेकणे.

हेक्टिक आहे, टायरिंग आहे, पण सॅटिस्फायिंग आहे. सगळेच आम्ही नवे आहोत. जोश आहे. स्वतःला सिद्ध करायची जिद्द आहे. अर्थात नुसती जिद्द असून काम भागत नाही. जिद्दीला क्षमतेची जोड असणंही आवश्यक आहे. आम्हाला कळतंय की काही बाबतीत आमच्या क्षमता कमी आहेत. काही बाबतीत आमचं संख्याबळ कमी आहे. पण त्याही स्थितीत पुढं जाण्याचे प्रयत्न चालले आहेत.

आमच्या बॉसचं तर पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा आहे. त्याला पाहिल्यावरच जाणवलं, खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर आमच्या कंपनीसाठी एक नवी इंडस्ट्री मार्केट म्हणून उघडू शकेल. त्यामुळे स्टेक्स आर हाय. असं बॉस नेहेमी म्हणत असतो. आम्ही मात्र त्याच्या नकळत ह्या प्रोजेक्टला "मिशन इंपॉसिबल" असं नाव दिलेलं आहे.

उद्या थोडा श्रमपरिहार म्हणून क्लायंटतर्फे पबमध्ये पार्टी आहे. त्याचीच वाट बघतेय मी आतुरतेने.

कधी कधी ना मला एकदम गंमत वाटते ह्या सगळ्या प्रकाराची. प्रोजेक्ट चॅलेंजिंग आहे, सॅटिस्फायिंग आहे हे कबूल. पण कशासाठी? आम्ही एवढं पोटतिडकीने काम करतो? आम्हाला जास्त पैसे मिळतात का ते करण्याचे? नाही? मग कशासाठी हा जिवाचा आटापिटा. ना आम्ही कंपनीचे मालक, ना आमचा बॉस. फायदा मालकांचा होणार, मग आम्ही आमच्या घरचंच कार्य असल्यासारखं का खपतोय?

- संवादिनी

Thursday, June 19, 2008

दिल्ली आणि नेलपॉलिश

विमानतळावर उतरले आणि माझ्यावर अचानक बरीच लोकं चाल करून आली आणि आपण मुंबईत नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं. सगळे दिल्ली चे ठग मला (आणि इतरांनादेखील) ठगवण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले. अर्थात मीपण मुंबईत तयार झालेली असल्याने त्यांना भीक न घालता प्रीपेड टॅक्सीच केली.

गेला आठवडाभर दिल्ली अभी दूर नही चाललेलं. एकदाची येऊन पोचलेच. अर्थात दिल्ली काही मला नवी नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी मी दिल्लीला आलेली आहे. कधी आईबरोबर, तिच्या कामासाठी. बाबा खास सव्हीस जानेवारीची परेड पाहायला घेऊन आला होता तेव्हाची. इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या ऑडिटोरिअमध्ये कडकडून टाळ्या वाजवणारी.

पण आजची दिल्ली खूप वेगळीच वाटली. एकटी अशी मी दिल्लीला कधी आलेच नाहीये म्हणून असेल. पोचले दिल्लीत पण मनातून मुंबई जाईना. मुंबई तर मुंबई, अगदी पुणंपण आठवत राहिलं. पुण्याला येऊन फार दिवस नाही झालेत पण आता परत जायला मिळेलच असं नाही. इथे आठवड्यासाठी म्हणून पाठवलंय. पण जातानाच सायबाने सांगितलंय की कदाचित महिनाही लागू शकेल. वर अजून काही प्रोजेक्टसंबंधी बोलणी चालू आहेतच. दरम्यानच्या काळात तिथे नंबर लागला तर थेट तिथेच जावं लागेल.

बरं पुण्याला सगळी गंमत जंमत होती. इथे तसं काही नाहीये. भरपूर काम माझी वाट पाहतंय. दर आठवड्याला घरी जाता येणार नाही. आनंदी नाही आणि आनंदही. उगाचच हाताकडे बघत राहिले. नवं नेलपॉलिश लावायचं राहूनंच गेलं.

बराच वेळ विचार करत होते की ही गोष्ट लिहावी का? पण शेवटी हिय्या करून लिहितेय. मला बॉसने सांगितलं की सोमवारी पोचायचं दिल्लीला. आनंद झाला तसं वाईटही वाटलं. शुक्रवारी परत घरी जायचं होतं, म्हणून गुरुवारी सेलेब्रेशन करायचं ठरलं. आनंदकडे. आनंदी होती. ऑफिसातली अजून दोघं तिघं होती. आनंदीचा भाऊही होता. मजा आली. माझ्या जाण्याच्या नावाखाली धांगडधिंगा, बाकी काही नाही. खूप उशीरापर्यंत बसले होते सगळे. घरी जायला निघालो. आनंद म्हणाला मी सोडतो तुला, एकटी जाऊ नको म्हणून. पण माझं घर एक एकदम जवळ आहे तिथून. म्हटलं मी एकटीच जाते. सगळे खाली पोचलो. आनंदीला अच्छा करून मी कायनेटिक सुरू करायला गेले तर ती हटून बसली. कशीबशी मेन स्टँडला लावून किक मारायला सुरवात केली आणि लक्षात आलं की टायर पंक्चर आहे. झालं. आता काय करणे?साहेबांना फोन केला. साहेब उचलेनात. म्हणून पुन्हा वर गेले.

आनंदने दरवाजा उघडला. नेहमीसारखी माझी व्यवस्थित खेचून झाल्यावर साहेब तयार होऊन निघाले माझ्यासोबत. मला म्हणाला गाडी इथेच ठेव. मी पंक्चर काढून तुझ्या बिल्डिंगच्या खाली लावून ठेवीन, तू यायच्या आधी. म्हटलं ठीक. घरी पोचल्यावर म्हटलं ठीके आता भेटू उद्या. तर म्हणाला चल एक कॉफी मारू. वर आलो कॉफी केली. तो उगाचच काहीतरी बोलत राहिला. मला झोप येत होती पण त्याचं मन मोडवत नव्हतं म्हणून बसलेले. शेवटी एकदाचा तो निघाला. दरवाज्याशी पोचल्यावर म्हणाला विसरणार नाहीस ना मला? म्हटलं काय रे जास्त झालेय का तुला? तुला कशी विसरेन. काहीच बोलला नाही. मी वाट पाहत राहिले तो कधी निघतो त्याची.

मला काही कळायच्या आत एकदम गुडघ्यांवर बसून माझा हात हातात घेतला. मला जे नको होतं तेच घडणार होतं. आता हा मला प्रपोज करणार. मग मी ह्याला नाही म्हणणार, मग ते नेहमीचं रडगाणं. मग समजावणं. न दुखावता दुखावणं. हे सगळं लख्ख दिसायला लागलं. माझी नाराजीही चेहऱ्यावर स्पष्ट दिसली असेल कोण जाणे. दिल्लीचं डिक्लेअर झाल्यापासून मला असं होईल असं वाटत होतं. आणि शेवटी ते घडलंच.

दोन क्षण त्याने कसलातरी विचार केला. मग हाताकडे बघत म्हणाला कसलं फडतूस नेलपॉलिश लावलंय. दिल्लीला जाताना तरी चेंज कर.

हसावं की रडावं? माझ्या मनातलं कसं बरोबर ओळखलं त्याने. काही लोकं इतकी निरागस असतात ना, की त्यांचा चेहराच आपल्याला सगळी गोष्ट सांगतो. त्याचा चेहराही सगळी गोष्ट सांगत होता. मी न बोलता त्याला घरात घेतलं. त्याने न विचारताच ह्या घडीला प्रेम, लग्न वगैरे मला करायचं नाही. तू चांगला मुलगा आहेस, आपण मित्र आहोत पण धिस इज समथिंग डिफरंट, असे घिसे पिटे डायलॉग्स बोलत गेले. तो ऐकत गेला. शेवटी मी थांबले. माझं बोलायचं तेवढं बोलून झालं. तो उठला. दारापर्यंत गेला. जाताना वळला मात्र. म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदल मात्र. जड पावलाने त्याला पायऱ्या उतरताना बघून मलाच रडायला आलं.

दुसऱ्या दिवशी दबकत दबकतंच त्याच्यासमोर गेले, तर तो पूर्वीसारखाच अगदी काही झालं नाही असा माझ्याशी बोलला. दिवसभर मला खूप वाईट वाटलं. तो माझ्याशी बोलला नसता. चिडला असता, ओरडला असता तरी जितकं वाईट वाटलं नसतं, तितकं त्याच्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून मला वाटलं. मुंबईला एकत्रच आलो. सगळा प्रवास मी गप्प आणि तो नेहमीप्रमाणे. शेवटी निरोप घेताना मीच त्याला सॉरी म्हटलं. नेहमीचं त्याचं खळखळून हसला. म्हणाला तू कशाला सॉरी. मीच सॉरी. तुझ्यासाठी. चांगला चान्स हातचा घालवला राव तुम्ही. असं म्हणून पुन्हा जोरात हसला आणि जायला निघालासुद्धा. मी तशीच बघत राहिले त्याच्याकडे. दोन पावलं चालून परत आला.

म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदलून जा. उगाच आठवण येईल माझी. निघून गेला.

खडूने गिरगिटलेली पाटी हाताने कितीही पुसली तरी स्वच्छ होत नाही ना तसं झालं माझं पहिले दोन दिवस. हळूहळू मन रुळावर आलं. आता नेलपॉलिशही बदलायला हवं!

- संवादिनी

Thursday, June 12, 2008

.

गेल्या शुक्रवारी सकाळी उत्साहाने ब्लॉग उघडला. मला एक निकटचा वाटलेला अनुभव ब्लॉगवर टाकलेला. वाटलं वाचणाऱ्यांना तो आवडेल. ब्लॉग आवडला अशा काही कमेंट्स येतील. हावरटपणे सकाळी ब्लॉग उघडून पाहिला. कमेंट्स वाचल्या. आणि खूप वाईट वाटलं. अगदी मनापासून.

आपण सगळेच का लिहितो? का वाचतो? आपल्याला आपल्या लिहिण्यातून आणि वाचनातून काही आनंद मिळतो म्हणून. माझ्या ब्लॉगवर मला वाटेल तसं, मला सुचेल तसं लिहिता यावं, माझ्या कुवतीप्रमाणे म्हणून हा ब्लॉग सुरू केला. माझ्या लिखाणाची उडी सरड्याप्रमाणे कुंपणापर्यंतच आहे हेही माहीत होतं. मग तरीही का लिहायला सुरवात केली? कारण आपली जी गोष्ट आहे ती कोणत्याही आडपडद्याशिवाय सांगावी. कठीण वाटलं हे करणं, म्हणून स्वतः पडद्याआड राहायचं ठरवलं.

सुरवातीला प्रतिसाद चांगला मिळाला. माझा हुरूपही वाढला. दर आठवड्याला लिहीत गेले. सुरवातीला दर आठवड्याला दाद देणारी मंडळी हळूहळू बाजूला झाली आणि ते अपेक्षितही होतं. कारण आहे काय हो माझ्या ब्लॉगमध्ये मी सोडून? ना कलात्मक भाषा, ना सृजनशील विषय. बऱ्याच वेळा मी लिहिलेलं मला स्वतःलाही आवडलं नाही, तर इतरांनी त्याला दाद द्यावी ही अपेक्षाच चूक आहे. त्यामुळे कुण्या एका मुलीने केलेली स्वयंकेंद्रित बडबड कितीशी आकर्षक असणार? आणि कोण ती वाचणार? ज्यांना ती आवडली नाही त्यांनी अगदी आवडली नाही असं जरी लिहिलं असतं ना, तरीसुद्धा वाईट वाटलं नसतं. कारण तसा हट्ट कधीच नव्हता.

पण गेले काही आठवडे जे चाललंय ते मला स्वतःला फार अस्वस्थ करणारं आहे. केवळ मी पडद्याआड राहणं पसंत करते, म्हणून मी कुणीतरी खोटारडी आहे, लोकांना फसवायला मी इथे असं करते, अशा प्रकारच्या काही तिरक्या कमेंट्स आणि इ-मेल्स मला यायला लागले. पहिल्यांदी मी हे हसण्यावारी नेलं. पण प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतंच चाललंय आणि ह्या कालच्या कमेंट्स म्हणजे त्यावरचा कळस झाला.

तुम्हाला वाटत असेल ना, मी हे जे लिहितेय ते खरं घडलेलंच नाहीये, सगळं काल्पनिक आहे. तर तसं समजा. लिहिलेलं वाचून पाच मिनिटं करमणूक तरी होते ना, तेवढी करून घ्या आणि सोडून द्या. मी कोण? मला पडद्याआड राहायला का आवडतं? आणि तसं मला आवडतं म्हणजे मी खोटारडी, असे विचार आणि आरोप कृपया करू नका. ह्याचा खूप त्रास होतो. मनापासून सांगतेय. तुम्हाला अतिशय क्षुल्लक वाटूही शकेल पण मला होतो.

जसं कुणी म्हणालं की एखादा सीए निकम्मा असेल तरच त्याची अवस्था माझ्यासारखी किंवा ह्या ब्लॉगमधल्या हिरॉइनसारखी होईल. म्हणजे मी माझ्या मनातली काही सल सांगितली, त्याची किंमत शून्य? वर मीच खोटारडी. मी सीए नाहीच आणि मला सीए लोकांच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल काहीच माहीत नसल्याने मी मारलेली थाप पचली नाही अशा आशयाची कमेंट माझ्याच ब्लॉगवर?

बरं कमेंट्स मॉडरेशन वर ठेवणं माझ्या स्वतःच्या तत्त्वात बसत नाही. मला आवडेल ते पब्लिश करायचं आणि मला न आवडेल ते दाबून टाकायचं ही ठोकशाही झाली. आणि आपण सर्वच जबाबदार व्यक्ती आहोत. लोकं जबाबदारीनं नोंदी करतील अशी अपेक्षा ठेवणं काही चूक नाही. काही लोकांनी सुचवलं की कमेंट्स मॉडरेशनवर टाकाव्यात. पण त्रास कमेंट लोकांना दिसल्यावर नाही होत. त्रास ती कमेंट मी जेव्हा पहिल्यांदा वाचते तेव्हा होतो. ती इतर वाचतात की नाही हा मुद्दाच गौण आहे.

ज्यांना संवादिनी पटली त्यांचे आभार, ज्यांना ती नाही पटली त्यांचेही आभार. वाचणाऱ्यांचे आभार, न वाचणाऱ्यांचेही आभार. न चुकता कमेंट्स टाकणाऱ्यांचे आभार, तुम्हा सगळ्या ब्लॉगर्सचे आभार, कारण खूप चांगलं चांगलं वाचायला मिळालं. अगदी रोजच्या आयुष्यातले व्हावेत असे तुम्ही सगळे जण झालात. माझ्यासाठी भांडलातसुद्धा. भरून पावले. असाच लोभ इतरांवर ठेवा. फक्त उद्या कुणी माझ्यासारखं पडद्यामागे राहून लिहायचं ठरवलं तर त्यांना खोटारडे ठरवून, त्यांच्यावर संशय घेऊन, तुमच्यापासून दूर ठेवू नका, तोडू नका. एवढीच विनंती.


धन्यवाद!

- संवादिनी

Thursday, June 5, 2008

ते तिघं आणि आम्ही तिघं

मिळतं ते नको असणं आणि नसलेलं हवं असणं हा मनुष्यप्राण्याचा स्वभावधर्म आहे. मीही अमानूष कॅटेगरीतली नसल्याने, माझाही अनुभव काहीसा असाच आहे. काल नाकापर्यंत कामात बुडालेली असल्याने, एखादा दिवस बिनकामाचा आला तर किती मजा होईल असा वाटायचं, इथे आल्यापासून काही फुटकळ कामं सोडली तर तसं काहीही काम केलेलंच नाही. पहिल्यांदा मजा आली. आता त्याचाही कंटाळा यायला लागलाय. केवळ पगार मिळतो म्हणून त्या जागेत जायचं. जमेल तसा वेळ काढायचा.

सतत अनिश्चिततेची टांगती तलवार डोक्यावर. कुठे पाठवतील याची. पुणं म्हणजे, मी पुण्यातच राहीन हा जो माझा गैरसमज होता तो पूर्णपणे मावळलाय. म्हणे पुण्यात काही प्रोजेक्टस नाहीत. जास्तीत जास्त काम बेंगलोर, हैद्राबाद आणि चेन्नईला आहे. तिथेच बहुतेक जावं लागेल. रोज एक नवी बातमी. एकदा साहेब म्हणाले, अमेरिकेला जाशील का सहा महिने? पण आल्यावर सहा महिने चेन्नईला राहावं लागेल? ठीक म्हटलं. तिथे बायो डेटा पाठवला. क्लायंटने रिजेक्ट केला. मग युरोपातला एक प्रोजेक्ट होता. तिथलं काही कळलं नाही अजून. मग म्हणाले आठवडाभर दिल्लीला जाशील का? म्हटलं जाते. तिथूनही होकार आलेला नाही. एक आखातातला पण प्रोजेक्ट आहे, तिथेही नंबर लावून ठेवलाय माझा. रोज ती धाकधूक घेऊन ऑफिसात जायचं आणि नो न्यूज इज द बेस्ट न्यूज म्हणत घरी जायचं. खूप चिडचिड व्हायला लागलेय हल्ली.

आणि ह्या सगळ्याचा त्रास माझ्यापेक्षा आनंदला जास्त होतोय, कारण मी एवढं डोकं खाते त्याचं दिवसभर की विचारू नका. त्या दिवशी असंच झालं. भयंकर वैतागले होते. त्याला म्हंटलं, माझ्याबरोबर चल जरा. तर नाही म्हणाला. त्याचंही बरोबर आहे त्याला कामं असतात. तो बाकावर नाही. माला जरा रागच आला. तावातावाने आनंदीला फोन केला. तिचं ऑफिस जवळच आहे. साधारण पाच वाजत आलेले ती नक्की भेटेल असं वाटलं तिला फोन केला, ती उचलेना. खूप चिडचीड झाली.

मी थोडावेळ आनंदची वाट पाहिली, तो मिटींगमधून बाहेर पडण्याची काही चिन्ह नव्हती. वैतागून एकटीच खाली उतरले. म्हटलं सरळ सिनेमाला जाऊन बसू. म्हणून निघाले खरी. पण एकटीनेच कसं जाणार? बाजूला कोण असेल? नसत्या शंका यायला लागल्या. स्कूटरवर बसले खरी, पण जायचं कुठे हा मोठा प्रश्नच होता. म्हटलं बालगंधर्व ला जाऊन बघावं. तिथे गेले, तर तिथंही काही खास नव्हतं. चालत चालत संभाजी पार्कात गेले.

तिथे नेहमीची संध्याकाळ चालली होती. कुणी फिरायला आलेले, कुणी प्रेम करायला आलेले, आणि कुणी माझ्यासारखेच काहीच करायला नाही म्हणून आलेले. बसून राहिले एकटीच. लोकांना बघत. त्यांच्या मनात काय चाललं असेल त्याचा अंदाज घेत.

बघता बघता एका ग्रूपने माझं लक्ष वेधून घेतलं. तिथे चौथरा आहे ना तिथे बसले होते. चौघं होते. तीन मुलगे, एक मुलगी. त्यांच्याकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे ते एकमेकांशी खाणाखूणांनी बोलत होते. माझं कुतुहल थोडंसं चाळवलं. मी त्यांच्या मागेच, त्यांच्याकडे पाठ करून बसले. ते एक अक्षरही बोलत नव्हते. खाणाखूणा आणि मध्येच एखादी ग्रंट. हळूहळू ते मुकबधीर आहेत हे मला समजलं. आणि ते काय बोलत असतील ह्याच्याविषयी माझ्या मनात प्रचंड कुतुहल निर्माण झालं.

गम्मत बघा. त्या बिचाऱ्यांना, ज्यांना बोलता आणि ऐकता येतं, ती लोकं काय बोलत असतील, ह्याचं कुतुहल नेहेमीच वाटत असेल. आणि आज त्यांच्या बाजूला बसून माझीही परिस्थिती तशीच झाली. पण माझी पाठ त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या खाणाखुणा मला दिसत नव्हत्या. मी मध्येच मान वळवून बघायचा प्रयत्न करीत होते. आणि त्यांच्यातल्या त्या मुलीशी पटकन माझी नजरानजर झाली. ती हसली. मीही हसले. मला एकदम ऑकवर्ड वाटलं. का कुणास ठाऊक पण मी वळले आणि चक्क त्यांच्याबाजूला जाऊन उभी राहिले. ती तिघंही माझ्याशी खाणाखुणांनी बोलायचा प्रयत्न करीत होती आणि मीही. नकळत मी त्यांच्यात कशी रमले मलाच कळलं नाही. ऐकू येत असूनसुद्धा आजूबाजूचं काहीही ऐकू येईनासं झालं. फक्त त्यांचे फेशिअल एक्स्प्रेशन्स. हातवारे एवढंच.

थोड्या वेळानं त्यांची जायची वेळ झाली. बहुदा ते तिथे भेटतात बऱ्याच्दा असं त्यांना सांगायचं होतं. निटसं कळलं नाही. मीही त्यांना पुन्हा विचारलं नाही. पण एक वेगळंच जग होतं त्यांचं. बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण हसता येतं, खिदळता येतं. खाणाखुणा करता येतात. लिप मुव्हमेंटस वरून समोरचा काय बोलतोय ह्याचा अंदाज घेता येतो.

एकदम मला बाबाची खूप आठवण झाली. तो काय म्हणाला असता हे पाहून? सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

जिला देवाच्या कृपेने, चांगलं गाणं म्हणता येतं ती मी, माझ्या क्षुल्लक समस्या घेऊन किती चिडचिडी होऊन तिथे गेले? आणि डोंगराएवढ्या समस्येचं ओझं डोक्यावर घेऊन जगणारे ते तिघं. त्यांना गाणं कधीच म्हणता येणार नाही असा शाप देवानं दिलेला, पण गाणं म्हटल्यासारखं आयुष्य जगत होती. हसत होती, एकमेकांची चेष्टाही करीत होती, अगदी माझ्यासारखं किंवा इतर कुणाहीसारखं आयुष्य जगायचा प्रयत्न करीत होती.

मी तिथेच बसून राहिले बराच वेळ. एकटीच. मोबाईल वाजायला लागला. आनंदचा होता. तो खूप सॉरी म्हणाला. मीही आढ्यतखोरपणा दाखवला नाही. आनंदीचाही फोन आला. ती म्हणाली, तीही पार्काजवळच आहे. ती आली. आनंदही आला. नेहमीच्या थट्टा म्हस्करीला ऊत आला. आमच्या तिघांच्या.

मी हसत होते, बोलत होते, पण मनात मात्र घर करून राहिले ते तिघं, अगदी घरी पोचेपर्यंत.

- संवादिनी