Thursday, June 26, 2008

मिशन इंपॉसिबल आणि हम पांच

दिल्लीला येऊन एक आठवडा होऊन गेला. एका आठवड्याने परत जायला मिळेल असं येताना वाटलं होतं तो फुगा फुटला. प्रोजेक्ट आताच सुरू झालाय आणि अजून किमान एक महिना माझं काम असेल. कदाचित त्याहून अधिक. आनंदाची गोष्ट हीच की क्लायंट चांगला आहे. त्यांनी चक्क दोन छानसे तीन बेडरूमचे फ्लॅट आमच्यासाठी भाड्याने घेतलेत.

आम्ही पाच जणं आहोत आणि मोठा साहेब सहावा. मोठा म्हणजे खूपच मोठा साहेब आहे तो. पण चांगला आहे. टकलू आहे पण तरीही हँडसम. बरीच वर्ष अमेरिकेला राहून परतलाय म्हणून इंग्रजी जरा इस्टाइलमध्ये बोलतो इतकंच. आमच्या कंपनीत खूप मोठ्या हुद्द्यावर आहे. ह्या हिमालयासमोर आम्ही सगळे अगदी मलबार हिलच्या टेकडीसारखे आहोत.

पण आमच्या सगळ्यात त्यातल्या त्यात उंच टेकडी म्हणजे अनु. तिचं पूर्ण नाव अनुसया का काहीतरी आहे. त्यापुढे अनु बरं वाटतं. तिला ह्या कंपनीत तीन वर्ष काढून झालीत. ती आणि मी दोघीही फंक्शनल. फंक्शनल कंसल्टंट चा शिकलेला नवा शॉर्ट फॉर्म फंकी. तर आम्ही दोघी फंकी. अजून नीटसा अंदाज आलेला नाही नक्की कशी आहे त्याचा. पण बोलायला, वागायला बरी वाटते. ती आमच्या टीमची पुढारी. लीडर. आता पुढारी आले म्हणजे राजकारण येणार की काय? कल्पना नाही. सो फार सो गुड.

आम्ही दोघी फंकी आणि अजून तिघं टेकी. तिघेही मुलं. दुःखाने विशद करायची गोष्ट अशी की एकही इंटरेस्टिंग नाही. एक मल्याळी ख्रिश्चन. त्याचं लग्न नुकतंच झालंय. बायको केरळात आहे. नेहमी तिचीच स्वप्न बघत असतो. तिच्याबद्दलच बोलत असतो. चांगला वाटतो पण खूप डिप्लोमॅटिक आहे. ओठावर एक आणि मनात एक असा वाटतो. अजून तरी माझा अंदाज बरोबर आहे असं मला काहीही आढळलेलं नाही. म्हणून सध्या मी त्याला संशयाचा फायदा देणार आहे. ह्याचं नाव टॉम.

दुसरा मराठी आहे. नागपुरकडचा असावा. पण मराठी आहे, म्हणून जवळचा वाटतो. त्याच्याशी चांगली मैत्री झालेय. नाव नीतिन. लग्न झालंय. बायको पुण्याला. एक लहान मुलगापण आहे त्याला. हा त्यातल्या त्यात अनुभवी टेकी. म्हणून तो टेकींचा पुढारी.

शेवटचा उडीया आहे. कृष्णा उर्फ क्रिश. भुवनेश्वरचा. सिंगल अँड लुकिंग. ह्याच्यापासून सावधान! असं मला माझ्या मनाने पहिल्या दिवशीच सांगितलंय, म्हणून मी जरा लांब लांबच आहे त्याच्यापासून. पण पुन्हा आतापर्यंत तरी त्याने माझ्या संशयाला पुष्टी देण्यासारखं काहीही केलेलं नाही. म्हणून मीही त्याला संशयाचा फायदा देत आहे. मला नाही म्हणा उगाचच नको ते वाटून घेण्याची जुनी खोड आहेच.

आणि आमच्या घराच्या काळजीवहनासाठी आहे दुबे. त्याचं नाव दुबे नाहीच आहे. पण त्याला पाहिल्यावर मॉन्सून वेंडिंगमधला दुबे आठवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून त्याचा दुसरा नामकरण सोहोळा केलाय, तो हा दुबे. पोरगेलसाच आहे. पण मनापासून कामं करतो. हा भेटल्यावर भय्या लोकांबद्दलची माझ्या मनातली आढी थोडी कमी झालेय.

तर अशी ही आमची टीम. नवा डाव सुरू. नवा राजा, नव्हे राणी. आणि नव्या राणीची मी जुनीच सबऑर्डिनेट.

क्लायंटचेही काही लोकं आहेत. काही चांगले काही वाईट. पण त्यातली एक बंगाली मुलगी मला खूप आवडलेय. तिचं नाव कला. म्हणजे तिला म्हणतात कला. काय मस्त नाव आहे नं? कला. आर्ट. आणि नावाप्रमाणेच कलाकार मुलगी आहे. रविंद्रसंगीत म्हणून दाखवणार आहे ती मला. टिपीकल बंगाली मुलींसारखी नाजूक आणि दिसायला खूप सुंदर. धारदार बुद्धी आणि जीव ओवाळून टाकावा असे डोळे. अगदी थेट कोकणा सेनसारखे. तशी ज्युनिअर आहे पण हुशार आहे.

काम तर जोरात सुरू झालेलंच आहे. मला पहिल्यांदा कसं वाटलं माहितेय? कुणी तुम्हाला अंधाऱ्या खोलीत सोडलं आणि सांगितलं, की ह्या खोलीत कुठच्या एका कोपऱ्यात एक दरवाजा आहे आणि तो उघडणारा रिमोट खोलीत कुठेही असू शकेल. कुणालाच माहीत नाही. दोन महिन्यात दरवाजा उघडून दाखवा. तसंच वाटलं. दरवाजा उघडायचा हे माहीत आहे, दोन महिने आहेत हेही माहीत आहे. पण कसा? ते स्वतः शोधून काढायचं. कठीण आहे पण तितकंच चॅलेंजिंग.

सुरवातीला कठीण गेलं पण आता त्या खोलीच्या लांबीरुंदीचा अंदाज यायला लागलाय. आणि तिथे आपण एकटेच नाही अजून दहा बारा जणं आहेत हा दिलासापण मिळतोय. सकाळी उठणे, दुबेने दिलेला नाश्ता करणे, ऑफिसात जाणे, काम काम काम, मग कुठूनतरी मागवलेलं जेवणे, पुन्हा काम काम काम, संध्याकाळी घरी एखादा फोन वगैरे कामाच्या मधे, मग रात्रीचं जेवण मागवणे ऑफिसातच, आणि बाराच्या सुमाराला घरी जाऊन बिछान्यावर टेकणे.

हेक्टिक आहे, टायरिंग आहे, पण सॅटिस्फायिंग आहे. सगळेच आम्ही नवे आहोत. जोश आहे. स्वतःला सिद्ध करायची जिद्द आहे. अर्थात नुसती जिद्द असून काम भागत नाही. जिद्दीला क्षमतेची जोड असणंही आवश्यक आहे. आम्हाला कळतंय की काही बाबतीत आमच्या क्षमता कमी आहेत. काही बाबतीत आमचं संख्याबळ कमी आहे. पण त्याही स्थितीत पुढं जाण्याचे प्रयत्न चालले आहेत.

आमच्या बॉसचं तर पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा आहे. त्याला पाहिल्यावरच जाणवलं, खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडून. हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर आमच्या कंपनीसाठी एक नवी इंडस्ट्री मार्केट म्हणून उघडू शकेल. त्यामुळे स्टेक्स आर हाय. असं बॉस नेहेमी म्हणत असतो. आम्ही मात्र त्याच्या नकळत ह्या प्रोजेक्टला "मिशन इंपॉसिबल" असं नाव दिलेलं आहे.

उद्या थोडा श्रमपरिहार म्हणून क्लायंटतर्फे पबमध्ये पार्टी आहे. त्याचीच वाट बघतेय मी आतुरतेने.

कधी कधी ना मला एकदम गंमत वाटते ह्या सगळ्या प्रकाराची. प्रोजेक्ट चॅलेंजिंग आहे, सॅटिस्फायिंग आहे हे कबूल. पण कशासाठी? आम्ही एवढं पोटतिडकीने काम करतो? आम्हाला जास्त पैसे मिळतात का ते करण्याचे? नाही? मग कशासाठी हा जिवाचा आटापिटा. ना आम्ही कंपनीचे मालक, ना आमचा बॉस. फायदा मालकांचा होणार, मग आम्ही आमच्या घरचंच कार्य असल्यासारखं का खपतोय?

- संवादिनी

8 comments:

Anand Sarolkar said...

"पण कशासाठी? आम्ही एवढं पोटतिडकीने काम करतो? आम्हाला जास्त पैसे मिळतात का ते करण्याचे? नाही? मग कशासाठी हा जिवाचा आटापिटा. ना आम्ही कंपनीचे मालक, ना आमचा बॉस. फायदा मालकांचा होणार, मग आम्ही आमच्या घरचंच कार्य असल्यासारखं का खपतोय?"

>> Karan comapny cha bhala jhala tarch tumcha honar, off cource 100% asa hoilch asa nahi pan probability jast ahe :)

All the best for your "Mission Impossible" :)

Sneha said...

sam anand mhaNatoy tyatahi tathya aahe pan satya kahi vegaLach asat... tulaa gavasel uttar mala aata gavasatay kahi dhage yetehet hatat....

best of luck 4 dat...

...Sneha

Monsieur K said...

for a minute, i thot if i am reading abt myself! have come to gurgaon, where i am staying in the client guest house with 4 other chaps. the chap (shud use the delhi word "chappu") @ the guest house has been treating us really well - have been having typical north indian b'fast n dinners :D
kaam prachand aahech... interacting with typical delhi/gurgaon ppl is fun!
loka ithe khup, khup aggressive aahet... pan majaa yet aahe :)
shanwaari pan kaam chaalu aahe.. had been to agra n mathura last sunday :D

well...enjoy ur stay @ delhi.. have fun :)

aniket vaidya said...

"पण कशासाठी? आम्ही एवढं पोटतिडकीने काम करतो? आम्हाला जास्त पैसे मिळतात का ते करण्याचे? नाही? मग कशासाठी हा जिवाचा आटापिटा. ना आम्ही कंपनीचे मालक, ना आमचा बॉस. फायदा मालकांचा होणार, मग आम्ही आमच्या घरचंच कार्य असल्यासारखं का खपतोय?"

कारण जर तुम्ही खूप काम केलतं आणि हा प्रॊजेक्ट सक्सेसफ़ूल झाला, तर तुम्ही एका नव्या उंचीवर जाता. तुमचं प्रमोशन होतं. नविन नोकरीसाठी वरच्या पोसिशन साठी जावू शकता.
ह्या सर्व कामाचा, कष्टांचा तुम्हालाच फ़ायदा होतो. तुम्ही स्वता:ला डेवलप करता.
तुमही सी. ए. झालात, त्यासाठी खुप कष्ट केलेत ना, सी.ए. अणि नुसता बि.कॊम. मधे फ़रक आहे ना? तोच फ़रक हा प्रोजेक्ट झाल्यावर तुम्ही आणि एक नुकताच पास झालेला सी.ए. मधे असेल. "अनुभव". काम करताना येणारे रन-टाईम प्रोब्लेम सोडवण्याची क्शमता.
असो. मी खूपच सुटलो....
लेख नेहमीप्रमाणॆ मस्त आहे. पुढील लेखाची वाट बघतोय.

अनिकेत वैद्य.

Samved said...

कामाच्या प्रेरणा फक्त पैसाच असते? बाकी कुणाला जमणार नाही म्हणून हे काम तुला दिलं संवादिनी असं म्हटलं तर तुझ्या इगोला चॅलेन्ज केल्यासारखं नाही वाटणार तुला? पैसा नक्कीच एक मोटीव्हेशन फॅक्टर असतो पण एका बिंदु पर्यंत. नाही तर सगळ्या श्रीमंत लोकांनी कामं थांबवली असती की..पुढचे बिंदु प्रत्येकासाठी वेगवेगळे. वेळ मिळाला तर कधी theory of X and theory of Y वाचून काढ. अर्थात theory of Y वर पुढे बरीच डेव्हलपमेन्ट झाली आहे म्हणा...
बाकी दिल्ली मुक्काम आवडलेला दिसतोय. ट्युलिपला सांगीतलं होतं तेच तुला सांगतोय..लोटस टेम्पल ला नक्की जाऊन ये. शक्यतो एकटी जा..जाऊन आल्यावर असं का म्हटलं ते कळेलच. आणि तिथलं चाट सोडऊ नको :)

Nile said...

hey nice description !
BTW that Krishna can be niceguy, ugich purvagrah kashala ??
just kiddin ... halkech ghe !
keep blogging ...

Bhagyashree said...

hmm post ahe chan, pan purvi sarkhi maja nahi ali..mahit nahi ka! kadachit thodasa nusta he he asa hotay sadhya asa lihlyasarkha vatla..'sanvadini touch' nahi ala!
neways i knw, tu asa tharvun kahi lihit nahis.. pan just vatla te sangitla! dont mind! :)

संवादिनी said...

@ आनंद - तेही बरोबरच आहे. पण मल कुठेतरी असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकारात थोडं एक्स्प्लॉयटेशन आहे, जब्बबदारी घेणाऱ्या लोकांचं. असो. ह्याला सध्यातरी काही उत्तर सापडत नाहीये.

@ स्नेहा - मला नाहीच सापडत उत्तर.

@ केतन - हं. एंजॉयिंग अ बिट तू मच आय गेस.

@ अनिकेत - म्हणतोस ते बरोबर आहे. ह्या प्रकाराला आपण कॉस्ट ऑफ एक्सपिरिअन्स म्हणूया. आणि अहो जाहो नको. मला खूप मोठ्ठी झाल्यासारखं वाटलं.

@ संवेद - ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेतात का लोकं. चॅलेंज असं म्हणायचं आणि राबवून घ्यायचं. दुसऱ्याच्या अहं ला स्वतःच्या फायद्यासाठी, असं नाही वाटत? लोटस टेंपलला जाणारे. पण एकटी जाईनच असं नाही. पण तो एकटेपणा अनुभवायचा प्रयत्न करीन. आणि हो. चाटतर सोडणार नाहीच. गोलगप्पे एवढे प्रीय झालेत. चाटही.

@ निले - तुझं म्हणणं चुकीचं नाहीये. ही इज नॉट बॅड. पण काही लोकं पाहताक्षणी डोक्यात जातात तसा तो होता. आणि मला ही वाईट सवय आहे, लोकांना पाहून ते कसे आहेत हे ठरवून टाकायची.

@ भाग्यश्री - नो प्रॉब्लेम. अगं नाही आवडलं म्हटलंस तरी हरकत नाही. खरंच काही लिहिण्यासारखं नव्हतं. मग म्हटलं प्रोजेक्टमधल्या लोकांबद्दल थोडंसं लिहावं. बाकी काही नाही.