Thursday, July 3, 2008

स्वातंत्र्य आणि एक कन्फेशन

जेव्हा मी खूप लहान होते तेव्हाची गोष्ट. पहिली दुसरीत असेन तेव्हा. बोलण्यामध्ये एकदम पुढे होते तेव्हा मी. साहजिकच, गाणी म्हणणं, भाषणं करणं, ह्यासाठी नेहमी निवड व्हायची. असाच एकदा गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यासाठी प्रत्येकाने घरून तयारी करून या असं शाळेत सांगितलं. आपल्या मुलीने अशा कार्यक्रमात चमकावं ही आईची जबरदस्त इच्छा. झालं, ती एक छान गोष्टीचं पुस्तक घेऊन आली. लहानपणी मला हातात पुस्तक मिळालं की ते क्रेयॉन्सने रंगवून काढायचं हा माझा छंद होता. त्यामुळे हे पुस्तक मला मिळालं असतं, तर त्याचा कधीच मी रंग दे बसंती करून टाकला असता. म्हणून आईने ते माझ्यापासून लपवून ठेवलं.

मीही हुशार मला ते कुठे ठेवलंय ते दिसलं. स्टूलवर उभं राहून कपाटाला चावी लावून वगैरे ते मी मिळवलं. घरी आजी होती फक्त. तिला बिचारीला काय कल्पना मी काय करतेय ह्याची? ते पुस्तक मी रंगवलं मात्र नाही. नुसतंच पाहिलं. मिळत नव्हतं तोपर्यंत हवंहवंसं वाटणारं पुस्तक, एकदा पहिल्यावर तितकंसं आकर्षक राहिलं नाही. मी ते तसंच कुठेतरी टाकून दिलं आणि खेळायला गेले.

संध्याकाळी भाषणाची तयारी करून घेण्यासाठी आईने कपाट उघडलं तर पुस्तक नाही. माझ्या ते लक्षात आलं, पण मी पुस्तक कुठे टाकलंय हे मलाही आठवेना. आईला नक्कीच कळलं की पुस्तक मी घेतलंय, पण आता ते हरवलं हे जर तिला कळलं तर मात्र माझी धडगत नव्हती. तिने मला विचारलं की तू पुस्तक घेतलंस का? मी हो म्हटलं. तिने का घेतलंस विचारलं, आता काय सांगा? मी ठोकलं, बाईंनी बघायला मागितलं शाळेत म्हणून नेलं. मग ती म्हणाली कुठंय ते? पुन्हा नवी थाप. म्हटलं शाळेत ते फाटलं. मग फाटलं तर फाटकं पुस्तक कुठाय? अजून एक थाप, मी तिथेच टाकून दिलं. हे सगळं आईचा ओरडा वाचवण्यासाठी.

ते पुस्तक मीही विसरले आणि आईही. भाषण चांगलं झालं, बक्षीस मिळालं आणि अचानक एके दिवशी साफ सफाई करताना बाबाला ते पुस्तक सापडलं. अजून देवापुढे उभी राहून रडत रडत पुन्हा मी कधी कधी खोटं बोलणार नाही, असं म्हणणारी मी मला आठवतेय. ही आठवण कायमची कोरली गेली मनावर आईचा मार, मग हे कन्फेशन.

आई भयंकर चिडली होती. बाबा मला नंतर म्हणाला होता. काळजी करू नको, मीपण खोटं बोलल्याबद्दल आजोबांचा मार खाल्लाय. सगळेच चुकतात कधी ना कधी. पण सगळेच चूक मान्य करीत नाहीत. जे करतात, ते पुढे जातात, जे नाही करत, ते चुकाच करत राहतात. तेव्हापासून कन्फेशन ही माझी गरज झालेय.

हे सगळं लिहायचं कारण म्हणजे असंच एक कन्फेशन. शनिवारी रात्री क्लाएंटने पबमध्ये पार्टी ऍरेंज केली होती. मी फक्त वाइन पिते. तेसुद्धा घरच्यांच्या सोबत. एकटी, मित्र-मैत्रिणींसोबत, ऑफिसमध्ये कधीच मी प्यायले नव्हते. पण त्या दिवशी काय वाटलं कोण जाणे? घरी जायचं नव्हतं, आईचा धाक नव्हता, बाबाची नजर नव्हती. म्हटलं आपण घरी एखादा ग्लास आईबाबांबरोबर घेतो, इथेही एखादा घ्यायला काय हरकत आहे. गप्पा गप्पांमध्ये आग्रह झाला, दुसरा ग्लास झाला.

त्यानंतर सगळे डान्स करायला लागले, मीही गेले. पण डान्स केल्यावर काय झालं मला कळलंच नाही. माझा पूर्ण कंट्रोलच गेला. म्हणजे अक्षरशः झेलपाटायला लागले मी. नाटकाचे डायलॉग्ज काय म्हटले, पूर्णपणे गॉन केस. अनुनी घरी आणलं सांभाळून. दुसऱ्या दिवशी सगळे जणं चेष्टा करीत होते माझी. तशी म्हटलं तर गंमत होती, पण आतून मी पूर्ण हादरून गेले होते.

आपण कोण आहोत? आपण काय करायला इथे आलो आहोत? आणि आपण काय करतो आहोत? ह्या प्रश्नांनी दिवसभर माझा पिच्छा पुरवला. घरी फोन केला तेव्हा बाबाने विचारलं पार्टी कशी झाली. मी सांगितलं चांगली झाली, बाकी काही बोलले नाही. आईनेही विचारलं तिलाही काही सांगितलं नाही. इकडचं, तिकडचं बोलत राहिले. फोन ठेवला आणि मला एकदम रडायलाच आलं. मी तसं करायला नको होतं. मला स्वातंत्र्य हवं होतं, ते मला मिळालं, पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग मी केला. खूप वाईट वाटलं, एकटीच कुढत बसले होते बराच वेळ.

शेवटी हिय्या करून घरी फोन केला. आईने उचलला. ती काही बोलायच्या आतच मी जे घडलं ते तसंच्या तसं तिला सांगितलं. ती एक शब्द बोलली नाही आणि बाबाला फोन दिला. बाबाने शांतपणे ऐकून घेतलं, मग असं करू नको तसं करू नको, असं काहीबाही सांगत राहिला. अगदी आईसारखं. त्याला खूप काळजी वाटली असणार. आणि ते इतके दूर काही भलतं सलतं झालं तर. एकदम हळवा झाला असणार तो. शेवटी आईने फोन घेतला. म्हणाली झालं ते झालं. चूक झालं की योग्य झालं ते तुला कळलेलंच आहे. तेवढं लक्षात ठेवून राहा. तुला आता अमुक करू नको तमुक करू नको हे सांगायचं तुझं आणि आमचं दोघांचंही वय नाहीये, त्यामुळे बहकून जाऊ नको. मोकळ्या हवेतही माणसं गुदमरून गेल्याची अनेक उदाहरणं आहेत.

एवढंच बोलली आणि फोन ठेवला. मला खूप वाईट वाटलं, पण एकीकडे बरंही वाटलं. मला नेहमी स्पून फीडिंग करणारी माझी आई मला म्हणाली, की मी माझे निर्णय घ्यायला सक्षम आहे. नेहमी बाबा जसा बोलतो तशी आज आई बोलली. एकदम मला पटेल असं. चूक न दाखवता चूक दाखवणारं आणि मला मोकळीक आणि जबाबदारी दोन्ही देणारं. खूप काही बोलावंसं वाटत होतं. पण कुणाशी? माझ्या टीम मेंबरना मी केलं त्यात काही वावगं वाटलंच नाही. मग एकटीच रडत बसले.

रडत रडतंच माझ्या जवळच्या गणपती बाप्पाला सांगितलं, मी पुन्हा कधी, आईला त्रास होईल, बाबाला त्रास होईल, विन्याला मान खाली घालावी लागेल, असं बेजबाबदार वागणार नाही, म्हणून. अगदी थेट लहान असतानासारखं.

स्वातंत्र्य हे दुधारी तलवारीसारखं असतं हेच खरं.

- संवादिनी

15 comments:

abhijit said...

हे इतकं सगळं कन्फेस करायला पण धाडस लागतं. सलाम.

भाग्यश्री said...

ह्म्म, पोस्ट आवडलं सॅम..प्रांजळ आहे अगदी. कधी कधी अशा गोष्टी होतात,ज्याने खरंतर इतकं काही आकाश कोसळत नाही,तरी पण थोडसं तसंच वाटतं..आईबाबांशी बोललीस,मन मोकळं केलंस हे खरंच छान..
मला तुझी अशी पोस्ट्स आवडतात,ज्यात तुझं,तुझ्या आईबाबांच,विन्याचं असं जे मस्त रिलेशन दिसते ना,त्याला तोड नाही..त्या व्यक्तीरेखा आता आम्हाला पण कळू लागल्या कश्य आहेत त्या! आईचा सल्ला पण पटला.. :)

Sneha said...

hey sam
....
tu majhyasarakhi vaTalis atta mala wekdam... dudharii asat..paN niT aaNi saa.nbhalun rahil tar takad pan hote lakshat thev

i knw aani aata parat tujhyakadun asa kadhi tujhya nakalatahi hoNar nahi...

Samved said...

oh man...how can one be so transperant! It takes courage to admit mistakes. खरं सांगायचं तर आता नाही होत धीर असं वागायचा. मग कधी तत्वाचे मुलामे, कधी व्यावहारीक शहाणपण, कधी खालच्या-वरच्यांच्या सोई असं आड येत राहातं. अजूनही मळलेली नाहीस हे वाचून हल्कं वाटलं.

एक प्रॅक्टीकल सल्ला देऊ का? ऑफिस पार्ट्यांमधे (खरं तरं सल्ला मुलींसाठी-i know i am making a gender based statement)कधी ड्रींक्स घेऊ नयेत. खास करुन भारतात आणि ते ही दिल्ली भागात. तुला घाबरवायचा हेतू नाहीच पण चांगले भासणारे लोकही अचानक पलटतात. मी पाहीलेल्या केसेसनी मला चांगलाच धक्का दिलेला..काळजी पोटी फुकट सल्ला बाकी काही नाही

Ashwinis-creations said...

संवादिनी

तुझी प्रांजळ कबुली मनाला स्पर्श करुन गेली. खरंच असं सांगायला धाडस लागतं.
अशीच ट्रान्स्परंट राहा, पण भाबडेपणाचा शिक्का न बसता खंबीरही बन!

अश्विनी

Jaswandi said...

मुंबईत असताना केलेली adventures दरवेळी आई-बाबांना सांगाविशी वाटतात. अगदी तोंडावर येतात काही विषय निघाला तर... पण नाही सांगू शकत! दरवेळी एकच शंका येते की मला पुर्ण विश्वास आहे कि या पुढे मी काही चुक करणार नाहीये तशी मग आई-बाबांना सांगुन उगीच त्यांच्या मनाला टोचणी का? कन्फेशन करणं चांगलं असतं पण माझ्या बाबतीत कायम मी काही confess केल्यावर काही लोकांचा माझ्यावरचा विश्वासच कमी झाला!

तुझ्या बाबतीत असं काही होऊ नये! सांभाळुन राहा सॅम :)

Monsieur K said...

i agree with samved - moreso, i believe its not even gender-based. as a rule, avoid getting drunk with office colleagues - have seen people who feel ashamed the next day.

and yeah! it does take a lot of courage to admit you made a mistake, especially in front of your parents.
and even more courage & commitment to ensure that it doesnt happen again.

all the best.
take care.

xetropulsar said...

सॅम,

खरंय. . .ऑफिस पार्ट्यांमध्ये मुलींनी पिऊ नये हे खरंच. . .भारतातच नाही पण इथे परदेशातही. . .होतं काय की तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन एकदम बदलतो. . .काही लोकांशी रिलेशन्स फॉर्मलच असायला हवीत. .स्त्रीकडे बघण्याच्या पुरुषाच्या दृष्टीकोनाबद्दल तर बोलायलाच नको :(

तसेच आपली क्षमता आपल्याला माहीत पाहिजे. वाईनमध्ये अल्कोहोल भरपूर प्रमाणात असते. . .त्यामुळे वाईन व्यवस्थित चढते. .

यातून मार्ग म्हणजे. . ह्या गोष्टीची टोचणी कायम राहू दे. . .ही जखम बरी होऊ देऊ नकोस. . .जमेल तेव्हा स्वत:ला सांगत रहा की फार मोठी चूक झाली. .तरच स्वत:वर कंट्रोल ठेवता येईल.

स्वत:ला जर या गुन्ह्यातून मुक्त केलंस तर पुन्हा हेच होण्याची शक्यता आहे. . 'सो व्हॉट', 'डोन्ट केअर' ऍटिट्यूड बिलकूल नको. .

बाकी चिल. . .अनुभवात अजून एक भर. . बरंच काही शिकलीस यातून हे ही नसे थोडके. .:)

काळजी घे. . .तुझ्या प्रांजळपणाला मात्र सलाम. . हॅट्स् ऑफ. . मानलं. . .भयंकर कॉन्फिडन्स् लागतो सत्यकथनाला. .

अमित

भाग्यश्री said...

आधी कमेंट लिहीली तेव्हा हे वर सगळ्यांनी लिहीलेलं डोक्यातच नाही आलं! असं वाटलं ठीके होतं असं कधी कधी.. पण आता वाटतय असं होऊ नये.. वरच्या सगळ्यांची मतं पटली..

जास्वंदी, तुझं पण पटलं..दुर्दैवाने माझ्या बाबतीत पण तसंच होतं.. सो मी पण मोजुन मापूनच कन्फेस करते..स्पेशली मैत्रिणींबरोबर.. कदाचित माझं सांगण्याची पद्धत चुकत असेल.. पण नाहीच पोचत मला काय म्हणयचयं..

vidushi said...
This comment has been removed by the author.
vidushi said...

हम्म.. मस्तच.

गोष्टीला शेवटी गणपतीबाप्पा चा यशराज स्टाइल दिलेला 'टच' फार आवडला - एकदम डी.टी.पी.एच. मधून घेतल्यासारखा.

पण एक कळलं नाही, तू म्हणतेस, 'घरी आई-बाबा-विन्या सोबत वाईन घेणं वेगळं आणि ऑफिसच्या कलीग्जसोबत दिल्लीत घेणं वेगळं.' म्हणजे वाईन हा प्रकार भारतात लोकप्रिय होत चाललाये हे ऐकलं होतं, पण मुंबईकर मद्ध्यमवर्गीय को.ब्रा. कुटुंबात तिने गोडेतेलासोबत जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत जागा पटकावली असेल याची कल्पना नव्हती.

पण असू दे, छान लिहीलंयेस.

a Sane man said...

'दारू पिऊन आऊट होण्यातच आयुष्याचं सार्थक आहे', असं मानणारी जनता सर्वत्र दिसताना तुला ती चूक आहे असं वाटतंय, त्याबद्दल समाधान आणि चूक कबूल करण्याचं धैर्य शाबूत असल्याबद्दल कौतुक!

Deep said...

संवादिनी, नेहेमी सारखच छान! Even though it is confession...

Well here I wanted to tell you something...have Created one post of your titles coz I found it really funny! :)

पूनम छत्रे said...

hmm. chhaan lihilaM aahes.

संवादिनी said...

@ ऍनॉनिमस - तुझी गेल्याच्या गेल्या पोस्टाची कमेंट वाचली. पहिला धक्का बसला, मग आश्चर्य वाटलं आणि नाऊ आय ऍम टेकिंग इट ऍज अ कॉंप्लिमेंट. मैत्रिण असणं/होणं अशक्य नाही. बाकीचं काही सांगता येत नाही.

@ अभिजित - कंफेस करायला धाडस लागतं? की हे सगळं लपवून ठेवायला लागतं. मला तर सांगून टाकल्यावर जेवढं छान वाटतंय, तसं न सांगता वाटलं नसतं, असंच वाटतंय.

@ भाग्यश्री - आईचा सल्ला शॉकींग होता. ती असं काही बोलेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. हल्ली जरा आई बाबाबद्दल जास्तच लिहितेय का मी? दूर असल्याचा परिणाम. हो. आणि मीपण मैत्रिणींसमोर मोजून मापूनच कंफेस करते.

@ स्नेहा - हं. बहुतेक होणार नाही. १००% खात्री कुणीच देऊ शकत नाही.

@ संवेद - धडा मलाही मिळालाय. तुझा सल्ला अगदी योग्य आहे. पटला. नक्कीच अमलात आणीन. आणि काळजी करतोस हे वाचून बरं वाटलं.

@ अश्विनी - ""भाबडेपणाचा शिक्का न बसता खंबीरही बन" अगदी माझ्या मनातलं बोललीस. ट्रान्सपरंट आणि भाबडेपणा ह्यांच्या सीमारेषा एकदम पुसट आहेत.

@ जास्वंदी - तू म्हणतेस ते एकदम योग्य आहे. विश्वास कमी होऊ शकतो. झालाही असेल माझ्या आईबाबांचा. पण त्यांच्याबाबतीत एक आत्मविश्वास आहे, की तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवतील, कारण त्यांना माहीत आहे की मला त्यांच्यापासून ह्या गोष्टी लपवून नाही ठेवता येत. मात्र इतरांच्या बाबतीत तू म्हणतेस ते १००% अचूक आहे.

@ केतन - मला तर असं वाटतं की ऑफिस पार्टीजना ड्रिंक्स ठेऊच नये, म्हणजे प्यायचा प्रश्नच येणार नाही.

@ अमित - "ह्या गोष्टीची टोचणी कायम राहू दे" बहुतेक राहील. ह्याहीपेक्षा काही भयंकर टोचणी लावणारी गोष्ट मी केली नाही तर

@ विदुषी - तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आमच्या घरीसुद्धा गोड्या तेलाच्या मापाने वाईन येत नाही. कदाचित माझ्या लिखाणातून तुझा असा समज झाला असेल की जसं आपण भाजी, आमटी करण्यासाठी रोज गोड्यातेलाची फोडणी देतो, तसे आम्ही सर्वजण घरी बसून रोज दारू पितो, तर मला तो दूर केलाच पाहिजे. हे जे मी वाईन पिण्याबद्दल लिहिलंय ते काही खास दिवशीच होतं. आणि असे खास दिवस वर्षातून दोन हातांच्या बोटावर मोजण्याइतकेही येत नाहीत. गैरसमज होईल असं लिहिल्याबद्दल क्षमस्व. तुला वाटलं ते एकदम योग्य आहे.

आणि यशराज वगैरे म्हणशील ना, तर तेसुद्धा कुठेतरी कुणाच्यातरी आयुष्यात घडलेले प्रसंगच उचलतात, त्यामुळे तसा योगायोग असू शकेल. पण खरं सांगायचं तर मी तो सिनेमा बघितला नाही अजून. पण आता बघायला कारण मिळालं.

@ निमिष - थँक्स. चूक झाली असं वाटलं खरं.

@ दीप - तुझा पोस्ट वाचला. आवडला. माझ्या पोस्टांची एवढी दखल घेतल्याबद्दल थँक्स.

@ पूनम - खूप थँक्स