Thursday, August 28, 2008

जाणं, राहणं आणि गुंता

काल घर सोडायला हवं होतं. म्हणजे सांगितलं तसंच होतं की बुधवारी निघायचं. सोमवारपासून जोरदार तयारी चालू होती. खरेदी तर दिल्लीहून परतल्यापासून थांबतच नाहीये. त्यात परदेशी कामाला जायचं असल्याने कंपनीने काही जास्त अलावन्स दिलाय. कुणी खरेदी करायला असेच पैसे दिले तर कोण सोडेल. अगदी शेवटच्या पैपर्यंत तो अलावन्स मी संपवला. त्याची बिलंही पाठवून दिली.

पुढचा प्रोजेक्ट ट्रेनिंगचा प्रोजेक्ट आहे. नेहमीप्रमाणे मी काय करणार आहे ह्याची मला अजिबात कल्पना नाहीये. त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे एकच महिना तिथे जायचंय. मग काही दिवस भारतात परत यायला मिळणारे. पण ट्रेनिंगचा प्रोजेक्ट असल्याने, आम्ही सर्व प्रेसेंटेबल दिसणं आवश्यक आहे. त्या प्रकारचे फॉर्मल्स खरेदी करणं आलं. ब्लेझर वगैरे बाप जन्मात कधी घातलं नव्हतं ते आता घालायला लागेल. गंगा वाहतेच आहे तर हात धुऊन घ्या म्हणून माझी उंची दीड इंचाने वाढवणारे हिल्स आणि गिरगावात राहणाऱ्या मुलीच्या मानाने तोकडे वाटणारे (तरीही चांगलेच लांब) असे स्कर्टस घेऊन झाले. अर्थात घेतानाच दोन सेमी फॉर्मल घेतलेत, म्हणजे ऑफिसात आणि ऑफिसाबाहेर चालतील.

गेला आठवडाभर आई नुसती सुटलेय. माझ्या पाककलेच्या ज्ञानात दर रोज काही ना काहीतरी भर पडतेय. मी आईला म्हटलं, मला हे सगळं काही लक्षात राहणार नाही. तर म्हणाली, राहील. करून करूनच येतं. तिथे गेल्यावर बाहेरचं खाऊ नको. घरीच बनवत जा. तब्बेतीला चांगलं नाही बाहेरचं. मी हो म्हटलं. ही बाबाची पॉलिसी. आई जे म्हणेल त्याला तो हो म्हणतो. आणि स्वतः शेवटी हवं तेच करतो. मीही तसंच करते आणि विन्याही तसंच करतो.

मला कधी कधी खूप वाईट वाटतं आईचं. ती एवढं करते आमच्या सगळ्यांसाठी आणि आम्ही तिला सीरियसली घेत नाही. बाबाची पण चूक आहे. तोपण सतत तिची थट्टा करत राहतो आणि आम्हीपण. पण तरीही ती आमचं मनापासून करते. आम्ही सल्ले मानत नाही माहीत असूनही सल्ले देते. वाईट वाटलं की मग मी दोन दिवस शहाण्यासारखं वागते. तिला उलटून बोलत नाही. तिने सांगितलेलं ऐकते, पण दोन दिवसांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

तर आईने सगळं किराणा मालाचं दुकान खरेदी करून आणलंय. मी तिला म्हटलं आई वीसच किलो नेता येतं. तर म्हणते असूदे. नाही मावलं तर घरी वापरता येईल पण मावत असेल तर ऐन वेळी दुकानात जायला नको. मी आपलं बरं म्हटलं.

काल निघायचं होतं. परवापासूनंच घरात निरोपाची भाषा चालली होती. बाबा म्हणाला मला, नीट राहा, शहाण्या मुलीसारखी राहा, फोन करत जा, अगदी रोज नाही जमला तरी आठवड्यातून एकदा तरी कर. मेल रोज कर. त्याच्या डोळ्यात दिसतं की आभाळ भरून आलंय म्हणून. मन भरून येणं हा संसर्गजन्य रोग आहे. मग मला त्याची बधा झाली नाही तरच नवल.

खरंतर घरापासून दूर राहूनंच मी आता परत आलेय. पहिल्यांदाच एकटी कुठे जातेय असं नव्हे. बाहेर एकटं राहायची भीती आहे, अनुभव नाही असं अजिबात नाही. तरीही मला दिल्लीला जाताना जितकं हळवं व्हायला झालं होतं तितकंच कालही झालं.

आईने, विन्याने सुट्टी घेतली होती. दुपारी जेवणं झाल्यावर मात्र मला अगदी असं वाटायला लागलं की मरूदे ती नोकरी. इथेच राहावं मजेत. मुंबईत नोकऱ्यांची कमी नाही. कशाला उगाचच घरापासून दूर राहून स्वतःला त्रास करून घ्यायचा. तरीही शेवटची आवरा आवर चाललेली होती. संध्याकाळचं विमान होतं. तिनाच्या सुमाराला घरातून निघायचं होतं. पासपोर्ट एअरपोर्टवर मिळायचा होता. आणि साधारण अडीच वाजता फोन आला, व्हिसा झाला नाही, आज जाता येणार नाही.

दुसऱ्या कुणाचं असं झालं असतं तर मला वाटलं असतं काय पचका झाला. माझ्या बाबतीत झालं, तेव्हा मात्र मला असं काहीही वाटलं नाही. झाला असेल तर थोडा आनंदच झाला. एक दिवस अजून घरी राहायला मिळणार म्हणून. फोन करणारा असंही म्हणाला, की उद्या जर काम झालं नाही व्हिसाचं तर रविवारीच होईल, कारण शुक्रवार, शनिवार तिथे सुट्टी आहे.

एकीकडे वाटलं, उद्या यायलाच हवा. दुसरीकडे वाटलं, नकोच यायला, तेवढं जाणं अजून लांबेल. जायचं तर आहे पण घरी राहायचं पण आहे.

असा सगळा गुंता आहे.

- संवादिनी

Thursday, August 21, 2008

मी आणि मधली सुट्टी

शाळेत होते तेव्हाची गोष्ट. माझी शाळा घरापासून फार लांबही नाही आणि फार जवळही नाही. रमत गमत चालत गेलं तर पंधरा मिनिटं, भरभर चालत गेलं तंर दहा मिनिटं. शाळा दुपारची असायची तेव्हा. एकाच्या ठोक्याला सुरू व्हायची सहाच्या ठोक्याला संपायची. साधारण साडेतीनला मधली सुट्टी व्हायची. सगळ्या मैत्रिणी डबा आणायच्या, पण बहुतेक वेळा मी घरी पळायचे. अर्ध्या तासाची मधली सुट्टी, म्हणजे दहा मिनिटं जायला, दहा यायला आणि मध्ये दहा मिनिटं घरी, चहा प्यायला.

मी एकलकोंडी होते, मैत्रिणी आवडायच्या नाहीत असं अजिबात नाही. पण घरी जायचं एक ऍट्रॅक्शन होतं. वीस मिनिटाची धावाधाव करून घरी घालवलेली दहा मिनिटं मोलाची वाटायची.

दिल्लीहून घरी पोचले गेल्या आठवड्यात. खरंतर पंधरा ऑगस्ट दिल्लीत साजरा करायचा विचार होता. आई, बाबा उत्तरेतच होते. ते तिथून दिल्लीला येणार होते. पण ऐन वेळी सगळं रद्द केलं. कारण मला घरी जायचं होतं. घरापासून दूर इतके दिवस राहिले मग अजून चार दिवस चालू शकलं असतं. माणसाची माया माणसांना बोलावते असं म्हणतात. घराची मायाही माणसांना बोलावते हे अनुभवलं.

दिवस मजेत गेले, पण जसा सोमवार आला तसं घराबाहेर पडणं जीवावर यायला लागलं. ऑफिसमध्ये जाऊन काही कागदपत्र द्यायची होती, काही फॉरमॅलिटीज पुऱ्या करायच्या होत्या, ते सगळं केलं, पण संध्याकाळी परत घरी आले. करमलंच नाही तिथे. आनंद अमेरिकेला गेलाय. तो भेटला नाही. आनंदी भेटली. घाईत होती आणि मीही. पण तिथे गेल्यावर बरं वाटलं. जुनं काहीतरी पुन्हा भेटल्याचा आनंद.

आईच्या आग्रहाखातर अजून एका मुलाला भेटले. मुलगा चांगला आहे. दिल्लीला असताना रोज फोन, चॅट चालू होतं. महिन्याभराने मी परत आले की पुन्हा भेटायचं ठरवलंय. कनेक्शन वाटलं असंही नाही आणि वाटणारच नाही असंही नाही, असं दोघांचही मत पडलं. निदान, मला त्याच्याशी ह्या विषयावर फ्रीली बोलता येतंय हेही नसे थोडके. आणि अत्ता वेळ कुणाला आहे ह्या भानगडीसाठी?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई बाबा आणि विन्याबरोबर पूर्वीसारखी मजा करता आली. विनाकारण (म्हणजे विन्यामुळे) भरपूर हॉटेलिंग झालं. गप्पा झाल्या. आजीकडे जाऊन आले. उरल्या सुरल्या मैत्रिणींना भेटले. दोन अडीच महिने केलं नाही ते सगळं केलं. पण कुठेतरी एक बोच मनाला लागून राहिली होती. माझ्याच नाही, सगळ्यांच्याच. सगळी धावपळ चालली होती, एका आठवड्यात मागचे दोन आणि पुढचा एक महिना बसवायची.

पुढच्या आठवड्यात मी पुढच्या मुक्कामाला जाईन. नवं शहर, नवी जागा, नवी माणसं, नवं काम आणि नवं स्वातंत्र्य. घरी असताना सतत असं वाटतंय की माझी जागा इथे नाही. मला आता परत निघायचंय, उडायचंय. दिल्लीत होते तेव्हाही मी उडत होते, पण आपलं घरटं आहे आणि महिन्या दोन महिन्यानी आपण परत तिथे पोचू असा दिलासा होता. अता पुढच्या वर्षभराचा कार्यक्रम लागलेला आहे. घरी असूनही आठवड्यानी परत जायचंय ह्याचंच दुःख जास्त वाटतंय.

विनूला विचारलं मी की विन्या मिस केलंस का रे मला? तर म्हणाला, अजिबात नाही. सुठीवाचून खोकला गेला. गम्मत करत होता तो, पण मला वाईट वाटलं, त्याला कळलं. मग सॉरी म्हणाला. आईची खरेदीची घाई चाललेली. तिथे हे मिळणार नाही आणि ते मिळणार नाही म्हणून भंडावून सोडलंय. आमचं सगळं किचन बहुतेक बॅगेत कोंबून देणारे मला.

बाबाचं काय लिहू. बऱ्याच दिवसांनी त्याच्याशी मनमोकळं बोलताना एवढं बरं वाटलं सांगू? एवढा चांगला बाबा असताना महिनोन महिने आपण त्याच्यापासून दूर राहायचं म्हणजे शिक्षाच आहे मला.

त्याला मी म्हटलं, बाबा तू एवढा छान बोलतोस, लिहून काढ ना सगळं, मी टाईप करून देईन तुला. त्याच्या गमती जमती, कॉलेजमधले किस्से, चळीतले किस्से. एक अख्खं पुस्तक होईल तयार. तर म्हणाला, कारकुनांचं काम लिहिण्याचं. अनुभवलेलं जे आहे ते गेलं. गंगेला मिळालं. त्याच्या पोकळ आठवणी काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ दुसरं काहीतरी छान अनुभवण्यात घालवायचा. बऱ्याच दिवसांनी मला त्याचं हे पटलं नाही. मी वाद घातला. मग म्हणाला, समज तू एखाध्या अत्तराचा वास घेतलास, तर तुला तो सुवास कसा होता हे तसंच्या तसं लिहिता येईल? तू लिहिशील मोगऱ्यासारखा होता. पण मोगऱ्याचा प्रत्येकाला आलेला अनुभव वेगळा आहे. त्यामुळे वाचणाऱ्याला मोगऱ्याचा जो अनुभव आला तो तुला आला असावा असं त्याला वाटणार. पण तो तुझा ओरिजिनल अनुभव नाहीच ना? मग लिहिण्याचा सगळा खटाटोप कशासाठी?

तो म्हणतो ते बरोबर आहे आणि नाहीही.

दुपारी एकटीच गॅलेरीत उभी होते. माझ्याच शाळेतली एक चिंगी, लाल रिबिनी बांधलेल्या दोन वेण्या उडवत कुठेतरी चालली होती. कुठेतरी का? नक्की मधली सुट्टी असणार आणि ती घरीच चालली असणार. मला वाटलं मीही तिच्यासारखीच आहे. मधल्या सुट्टीत घरी अलेली. उद्या परवा ही सुट्टी संपेल आणि मी पुन्हा शाळेत निघून जाईन जगाच्या. तिथे नवे मित्र असतील, नवं शिक्षण असेल, पण घरात मिळणारे दोन निवांत क्षण. आईच्या हातचे मोदक, बाबाची विस्डम आणि विन्याची टशन काहीही नसेल.

पण मीही येत जाईनच की मधल्या सुट्टीत, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा?

- संवादिनी

Thursday, August 14, 2008

दुःखारंभ आणि दुःखांत

प्रवाही विचारांसारखं नदीचं पाणी वाहत होतं. पण तो प्रवाह माझ्या विचारांसारखा नव्हता. तो प्रवाह एखाद्या प्रगल्भ व्यक्तीच्या संपृक्त विचारांसारखा गर्भार होता. माझे विचार खळखळणाऱ्या पाण्यासारखे आहेत. कदाचित उथळही असतील.

पाण्याच्या बाजूला एक संगमरवरी इमारत उभी होती. भली मोठी, प्रचंड, पण छाती दडपून टाकणारी नाही. देहभान विसरायला लावणारी. कुणी बनवलं असेल हे अद्वितीय वास्तुशिल्प? एखाद्या चुंबकाकडे लोहकणानं आकर्षित व्हावं, तशी मी त्या इमारतीकडे खेचली गेले. त्या इमारतीच्या रुंद, चंद्रधवल, भिंतीला हात लागला तेव्हाच मी समाधानले. अगदी चुंबकाला चिकटलेल्या लोहकणाप्रमाणे.

कुणाचातरी स्पर्श मला जाणवला. खरंतर स्पर्श करणारं कुणी नव्हतं पण काहीतरी फार मोठं, मनाला स्पर्शून जात होतं. कुणाचेतरी बलदंड पीळदार स्नायू, लोहाराच्या भात्यासारखी वरखाली होणारी छाती, घणाचे घाव, घामाचा दर्प. नाही, दर्प नाही, गंध. प्रचंड, अत्युत्तम, सृजनशील काम करताना येणाऱ्या घामाला दर्प तरी कसा येईल? सुगंधच तो. निर्मितीचा.

कुणीतरी म्हटलेली प्रेमकाव्य. पण त्याला लावलेल्या दूरावरून ऐकू येणाऱ्या तराण्यासारख्या हृदयद्रावक चाली. मृत्यूचं दुःख, प्रेमाचं दुःख की दुःखावरचं प्रेम? तुटलेले हात, कळवळणारे आवाज, अमर्याद दुःख, असीम दुःख.

अत्युत्तम नवनिर्मितीला दुःखाचा शाप असावाच लागतो का?

आजूबाजूचं जग आपल्याच आनंदात होतं. मला त्याचं आश्चर्य वाटलं नाही. जगाला आश्चर्यचकित करणारं ते शिल्प. त्याच्या सान्निध्यात आल्यावर लोकांना आनंद झाला नाही तरच नवल. कुणी त्याची नजाकत डोळ्यात तर कुणी कायमची साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतं. कुणी प्रेमात पडलेले जीव, आपल्या प्रेमाला त्या शिल्पाची उपमा देण्यात मशगुल होते. मला आश्चर्य वाटत होतं ह्या गोष्टीचं की प्रेमाच्या ह्या भरजरी शालूला लावलेलं दुःखाचं ठिगळ लोकांना दिसत कसं नव्हतं?

चंद्रकिरणांसारखे असणारे चार मीनार माझ्याकडे पाहत होते. कदाचित कीव येत असेल त्यांना माझी. कारण मला तिथे आनंद कुठे दिसतंच नव्हता. विरहाचं दुःख. प्रियेच्या मृत्यूचं दुःख, आणि दुःखातून झालेली नवनिर्मिती. अप्रतिम सौंदर्याची आठवण म्हणून निर्माण केलेलं आणखी एक सौंदर्य. त्या सौंदर्यातून निर्माण झालेला अहंकार आणि त्या सौंदर्याची पुनरुक्ती कुठेही होऊ नये म्हणून अहंकारातून जन्मलेलं हजारो तुटल्या हातांचं दुःख. भळभळणाऱ्या जखमा आणि रक्ताच्या चिळकांड्या उडवणारं दुःख.

दुःखारंभ आणि दुःखांत.

ते चंद्रधवल शिल्प अचानक मला पांढुरकं वाटायला लागलं. अगदी साधारण. नपुंसक.

त्या दुःखाकडे पाठ फिरवून मी चालत राहिले. चालत चालत बरीच दूर आले. एका दुसऱ्या इमारतीपाशी पोचले. ह्या इमारतीच्या चिरा न चिरा लाल दगडातून तासलेला होता. मघा जाणवलेल्या पांढऱ्या रक्ताचा, लाल रंग वेगळा आणि हा लाल रंग वेगळा. उद्दाम, उन्मत्त, शासक लाल रंग.

आता मी लोहकण झाले नाही. आपल्याच तंद्रीत मी इमारतीत चालत गेले. इथेही इतर लोक होतेच. काय बघत होते कोण जाणे. मला मात्र उत्सुकता होती, पांढरं दुःख निर्माण करणाऱ्याचं दुःख बघायची.
वाट काढत काढत मी एका खोलीत पोचले. इथेच त्याचा अंत झाला होता म्हणे. पांढरं दुःख निर्माण करणाऱ्याचा. पण तिथलं दुःख वेगळंच होतं.

माणसाचं सर्वात सृजनशील काम कोणतं? दुसऱ्या माणसाला जन्माला घालणं. त्या जन्माला आलेल्या माणसावर जन्मदात्या माणसाचा केवढा जीव? आपला अंश, आपल्या मांसाचा गोळा म्हणून जन्माला आलेल्या माणसाला वाढवायचं. हे जन्मदात्याचं खरं शिल्प. त्या पांढुरक्या इमारतीहूनही सुंदर अशी ही कलाकृती. तीच जन्मदात्याचा जिवावर उठली तर? तसंच झालं त्याचं. त्याने जन्माला घातलेल्या मांसाच्या गोळ्यानेच डांबून ठेवलं त्याला.

खिडकीतून मी बाहेर पाहिलं. लांबवर नदीच्या काठी ते पांढरं शिल्प उभं होतं. चार मीनार, मधला गोल घुमट सगळं काही स्पष्ट दिसत होतं.

तुटलेले कळवळणारे हात, थोडेसे शांत झाल्यासारखे वाटले. हाच नियतीचा न्याय असावा. अप्रतिम वास्तू बनवणारे हात ज्या हातांनी तोडले, त्या हातांत बेड्या अडकवण्याचं काम, त्याच्या स्वतःच्या निर्मितीने, त्याच्या मुलाने करावं, हाच तो न्याय.

दुःखांत ते दुःखांत.

मनातलं मळभ सरलं. आसमंतात कवित्व तेवढं भरून राहिलं.

- संवादिनी

Thursday, August 7, 2008

शांतक्षण आणि ती

गिरगावांतलं एक मॅटर्निटी होम. लेबरमध्ये गेलेली एक आई. दरवाज्याबाहेर अधीरतेने फेऱ्या मारणारा एक बाबा. बराच वेळ लागलेला. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चाललेले. डॉक्टरांनी दिलेली तारीख देऊन सतरा दिवस झालेले. संध्याकाळची वेळ. बाबाच्या चेहऱ्याला चिंतेचं ग्रहण लागलेलं. आईच्या वेदनांची काळजी तर होतीच, पण नवीन येणाऱ्या जीवाचीही तितकीच काळजी होती.

बाहेर एक वेगळीच संध्याकाळ रंगात येत होती. कसलातरी उत्सव. लोकं भेटत होते, आनंद साजरा करीत होते. त्यांना चिंता होती वेगळीच घटका भरण्याची.

त्या आईची शर्थ चालली होती. चेहरा घामाने भिजून गेलेला. स्वतःची तिला पर्वा नव्हती, स्वतःच्या बाळाची मात्र होती. ह्या त्रासातून सुटका तर हवी होती, पण पराभवाचा विचारही तिच्या मनाला शिवत नव्हता. अचानक आजूबाजूचं विश्व गरगरा फिरायला लागलं, त्या आईने पराकाष्ठा केली. आता बाळाच्या रडण्याचा मंजूळ आवाज ऐकायला येणार होता. काहीच ऐकू आलं नाही. पुन्हा तिने प्रयत्न केला. शांतता. हळूच मान वर करून ती बघायचा प्रयत्न करीत होती पण काहीच दिसलं नाही. डॉक्टर हळूच तिच्या कानात म्हणाले, मुलगी आहे, पण रडत नाही. आम्ही प्रयत्न करतोय.

मिनिटभर तिथं सन्नाटा पसरला. एक क्षण शांततेचा सरला आणि बाळाने भोकांड पसरलं.

.........

एक आजी खूप आजारी होती. खूप म्हणजे खूप. तिच्या नातीला ती वेगळीच वाटायची आजारी पडल्यापासून. तिचे लाड करणारी, तिचं हवं नको बघणारी, तिच्या केसांना तेल लावून मस्त दोन चंपू वेण्या बांधणारी आजी खरी की गालफडं आत गेलेली, बिछान्यावरून उठूही न शकणारी, नातीला कधी मधी न ओळखणारी, आल्या गेल्याकडे रडून मरणासाठी भेकणारी ही आजी खरी.

कालच डॉक्टर येऊन गेलेले. नात खूप लहान होती. तिला कुणी काही सांगितलं नाही. तिनं आपल्या बाबाला विचारलं. बाबाच्या एका डोळ्यात चमकलेला एक अश्रू तिने पाहिला. पण बाबावर तिचा विश्वास होता. तो तिला म्हणाला, लवकरच आजी ह्या त्रासातून सुटेल. नातीला खूप आनंद झाला. पुन्हा आपली जुनी आजी आपल्याला मिळणार म्हणून ती खूश झाली. तिने आपल्या सगळ्या मैत्रिणींना पण सांगितलं.

आज सकाळापासूनच आजी तिच्याशी छान बोलत होती. डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम झाला असणार, नातीला वाटलं. तीपण मजेत आजीशी बोलत होती. दुपारी आजीने नातीला बोलावलं आणि पाणी मागितलं. नातीने आनंदाने आजीला पाणी आणून दिलं. समाधानाने आजी ते पाणी प्यायली. नातीला तिने जवळ बसवून घेतलं. थोडा वेळाने आजीला उचक्या यायला लागल्या, आजीची नजर छताकडे लागलेली. नातीने आजीला विचारलं की आजी अजून पाणी देऊ का? आजी काही बोललीच नाही, पण तिच्या उचक्या थांबल्या.

दुसरा क्षण शांततेचा गेला.

नात आजीचा हात घेऊन तशीच बसून राहिली. तितक्यात तिथे नातीचा बाबा आला. त्याच्या डोळ्यातलं पाणी तिला स्पष्ट दिसलं. त्याने तिचा हात सोडवला आणि तो तिला तिच्या लाडक्या काकूंकडे घेऊन गेला. मागाहून तिला कळलं की आजी देवाघरी गेली. पण तो आजीचा हात धरून घालवलेला एक शांत क्षण मात्र तिच्या डोक्यात कायमचा राहिला.

................

एक मुलगी, शांततेच्या मंदिरात बसलेली. सत्तावीस संगमरवरी पाकळ्यानी बनलेलं ते एक कमळ होतं. आणि त्या कमळाच्या पोटात ठासून भरली होती अशक्य शांतता. आवाज येत होते ते श्वासांचे, स्वतःच्या. डोळे मिटून ती बसली होती. सगळं लक्ष स्वतःच्या श्वासांवर एकवटलं होतं.

तिला अनुभवायची होती शांतता जी त्या कमळाबाहेर कुठेच नव्हती. बाहेर होतं एक अक्राळ विक्राळ जग, अशांत, सतत कशाच्यातरी पाठी पळणारं. धावतं, स्वतः धावणारं आणि तिलाही धावडवणारं. क्षणभर शांतता तिच्यात पाझरतेय की काय तिला वाटलं.

शांततेचा तिसरा क्षण.

पण शांततेच्या चौथ्याच क्षणी तिला असेच काही शांततेचे क्षण आठवले, आजीचा थंडगार हात आठवला, आईच्या बाबाच्या तोंडून अगणित वेळा ऐकलेली तिच्या न रडण्याची गोष्ट आठवली.

पुढचे शांततेचे क्षण मोजण्याचं भानही तिला राहिलं नाही.

- संवादिनी