Monday, May 30, 2011

देवयानी (14)

आताशा जीवनाला एक दिशा मिळायला लागलेली होती. अर्थातच ती अनुरागचीच होती. अभ्यास, कॉलेज हे नावापुरताच राहिलं होतं. दिवस न दिवस आम्ही एकत्र घालवायला लागलो. बऱ्याचदा तो मला घरून, म्हणजे जवळच्या रेल्वे स्टेशनवरून पिक करीत असे. मग दिवसभर आम्ही ह्या ना त्या ठिकाणी भटकत राहू. बऱ्याचदा शॉपिंग, खाणं पिणं ह्यात वेळ घालवत असू. त्याच्याकडे पैशाने भरलेला बॉटमलेस पिट असल्यासारखा तो वागे. हल्ली हल्ली माझाही संकोच चेपलेला होता.

काही वेळा तोही माझ्या घरी येऊन गेला. अर्थात आमच्या घरी त्याला इंप्रेस करण्यासारखं काहीही नव्हतं. तुम्हारे पास गाडी है, बंगला है, लेकीन मेरे पास मा है असं म्हणण्याचीही माझी परिस्थिती नव्हती. म्हणजे गरीब माणसाचे काही इगो पॉइंटस असतात तेही माझ्याकडे नव्हते.

त्यातला एक म्हणजे फॅमिली व्हॅल्यूज. तसे अनेक आहेत. म्हणजे गरीबांना रात्री छान झोप लागते, श्रीमंतांना लागत नाही. गरीब नेहमी सच्चे असतात. वगैरे वगैरे. मला तर ह्या सगळ्या भंपक गोष्टी वाटतात. दोन वेळा जेवायला नाही मिळालं तर लागेल का हो झोप गरीबाला? ह्या महिन्याचं रेशन घेण्याइतकेही पैसे हातात नाहीयेत हे माहीत असलेल्या गृहीणीला लागेल का हो झोप? किंवा नोकरी गेल्येय, पुढच्या महिन्यापासून पैसा आणायचा कुठून हा प्रश्न पडलेल्या माणसाला लागेल का झोप?

कुठेतरी ह्या काळातंच माझी मध्यमवर्गीय मानसिकता बदलत गेली असावी असं मला वाटतं. पैसा सबकुछ नव्हे. पण पैसा जीवनात काही सुखसोयी आणू शकतो, ज्याने आपलं जीवन सुसह्य होतं. म्हणजे सोशालिस्ट मेंटालिटी कडून कॅपिटॅलिस्ट मेंटॅलिटीकडे. अर्थात मी दुसऱ्या टोकाला पोचलेले नाहीये. मी ह्या दोन स्कूल ऑफ थॉटसच्या कुठेतरी मध्ये आहे असं वाटतं आणि मनापासून वाटतं की मी जन्मभर तिथेच राहावं.

असो पुन्हा बरंच विषयांतर केलं. बारावीचं वर्ष आणि एफ वायचं, एस वायचं वर्ष ही माझ्या आयुष्यातली खूप सुंदर वर्ष होती. ह्याचं सगळं श्रेय अनुरागचं. अभ्यास, पुस्तकं, मार्क्स ह्या पलीकडेही काही जग असतं आणि त्या जगात वावरण्याचा माणसाला त्याच्या आयुष्यात आणि प्रोफेशनल लाइफमध्येही फायदा होऊ शकतो. शब्दात व्यक्त करू शकणार नाही इतका आनंद मला ह्या वर्षांनी दिला.

मेक ओव्हर, मेक ओव्हर जो म्हणतात ना तो माझ्या ह्या तीन वर्षांत झाला. माझा वॉर्डरोब बदलला, हेअर स्टाइल, शूज, सगळं सगळं बदललं. हा सगळा बदल अनुरागमुळे. अर्थात पुढे मी अजूनही बदलले. पण तरीही काकूबाई सदरात मोडणारी मी आजू बाजूच्या माझ्या वयाच्या मुलींसारखी तरी दिसायला लागले, बोलायला, हसायला लागले. रस्त्यातून जाताना पुरुषांच्या नजरा वळून वळून माझा पाठलाग करायला लागल्या. आणि खरं सांगते, ते सगळं मला आवडत होतं. अजूनही माझ्याकडे कुणी वळून बघितलं ही मनातला अहं कुठेतरी सुखावतोच.

अर्थात ह्यालाही मर्यादा आहे. डोळ्यात पाहणारे पुरुष मला आवडतात. पण सहसा डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमत असलेला पुरुष विरळा आहे. तो खेळ मजेदार आहे. डोळ्यात डोळे घालून एखाद्याने आव्हान द्यावं. तिनं ते आव्हान स्वीकारावं आणि पहिली नजर कोण हटवतो ह्यावर पराभव ठरावा. अशा स्पर्धेत पराभव स्वीकारायला मला नक्की आवडलं असतं पण वारंवार तसं घडलं नाही. किळसवाणी नजर शरीरावरून फिरवणारेच अधीक. त्यांची मला कीव येते. डिप्राइव्हड हा एकंच शब्द त्यांना चपखल बसतो. अर्थात त्या मागची सोशिओ इकॉनॉमिक कारणं बरीच आहेत. वाईट नजरेनं बघणाऱ्याला तो बघतो म्हणून त्याला वाईट ठरवणंही चुकीचंच आहे. तो तसं का करतो हेही कुठेतरी, विशेषतः भारतात, आणि त्यातही मुंबईसारख्या शहरात, तपासून बघण्याची आवश्यकता आहे. पण ते सगळं नंतर कधीतरी.

सांगायचा मुद्दा हा होता की ह्या दोन वर्षात माझ्यात अमूलाग्र बदल झाले. ते बदल सुखावणारे होते, आपण कुणालातरी हव्याशा वाटतो, ह्या फिलींगमध्ये जो आनंद आहे ना, तो अवर्णनीय आहे. तो मी इतकी वर्ष चखलेला नव्हता, तो आता मिळायला लागलेला होता.

होता होता सेकंड इयरची परीक्षा अगदी जवळ आलेली होती. माझा आभ्यास नेहमीसारखाच अनुरागमय होण्यापासून उरलेल्या वेळात रडत खडत चाललेला होता. अनुरागचा वाढदिवस हा साधारण वार्षिक परीक्षेच्या आधी येत असे. गेली दोन वर्ष त्याने मला सेपरेट ट्रीट दिलेली होती. पण यंदा त्याने मला प्रत्यक्ष त्याच्या बर्थडे पार्टीला येण्याचं आमंत्रण दिलं. त्याच्या मित्रांमध्ये त्याने मला विशेष मिसळू दिलेलं नव्हतं. पण गेली दोन वर्ष आम्ही इतके एकमेकांसोबत होतो की थोडीफार ओळख झालेलीच होती. मरीन ड्राइअव्हच्या एका आलिशान हॉटेलमध्ये पार्टी ठेवलेली होती. बरीच मोठमोठी माणसं येणार होती. त्यात आपण अगदी अलिबागवरून आल्यासारख्या दिसू असं मला उगाचंच वाटत होतं.

- देवयानी

Tuesday, May 24, 2011

देवयानी (13)

बारावीची परीक्षा झाली. मार्क यथा तथाच मिळाले. पण माझ्या मानसिकतेत इतका बदल झालेला होता की पास होणं हेच माझं उद्दिष्ट होतं. ते तर नक्कीच झालं होतं. अनुराग म्हणाला तशी मला बी. एस्सी. ला ऍडमिशनही मिळाली होती. मनात कुठेतरी अजूनही रिसर्चमध्ये जायचं होतंच. पण त्याला अजून चांगली तीन वर्ष होती. तोपर्यंत डोक्यावर कसलंच ओझं घेण्याची गरज नव्हती. अनुरागची सोबत होतीच. दिवसेंदिवस मी त्याच्या अधिकाधिक जवळ जात होते. त्याच्या मनात तसं काही नसणार ह्याची मला खात्री होती. पण केवळ त्याच्याबरोबर असण्यानेच मला एवढा आत्मविश्वास वाटत असे की (त्याला) नको त्या विषयावर बोलून मला त्याला कायमचं गमवायचं नव्हतं.

आजच्या माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये हा प्रश्न वारंवार माझ्यासमोर उभा राहतो. एखाद्या माणसाशी कुठेतरी ओळख होते. विमानात म्हणा, सेमिनारमध्ये म्हणा. त्याच्याकडून चांगला बिझनेस मिळण्याचं पोटेन्शिअल दिसत असतं. पण बऱ्याच वेळा तुम्ही विकायला लागलात की समोरचा माणूस एकदम गार्ड घेऊन उभा राहतो. खरंतर त्याचं नुकसान नसतं काही, पण केवळ समोरचा माणूस आपलं ऍडव्हांटेज घेऊ पाहातय ह्या विचारानेच तो सतर्क होतो आणि संबंध बिघडतात.

अनुरागबाबतंही असंच होण्याची शक्यता होती. मी त्याला सांगितलं असतं की तो मला आवडतो तर कदाचित तो माझ्यापासून तुटला असता, दूर गेला असता. म्हणूनंच माझ्या मनातलं मी त्याला सांगायचं टाळलं. टाळतंच आले. त्याच्याशी मैत्री असणंसुद्धा माझ्यासाठी स्वर्गसूख होतं.

दिवस जात गेले. एक दिवस त्याने मला घरी बोलावलं. पुन्हा त्यातून मी नको ते, किंवा मला हवे ते अर्थ काढायला लागले. कदाचित आई वडिलांशी ओळख वगैरे करून द्यायची असेल, म्हणून बोलावलं असेल. घाबरतंच मी त्याच्या घरी गेले. मलबार हीलवरच्या एका आलिशान बिल्डिंगच्या सगळ्यात शेवटच्या दोन मजल्यावरचं पेंटहाऊस हे त्याचं घर होतं. माझी कित्येक घरं विकली असती तरी असं एक घर येऊ शकणार नव्हतं. घरात फक्त नोकर चाकर होते. आई वडील कुठे दिसले नाहीत. मी त्याला त्यांच्याबद्दल विचारलं नाही आणि त्यानं आपणहून काही सांगितलं नाही. उंची फर्निचर, सामान सुमान ह्यानीच घर भरलेलं होतं. आपण कुठेही बसलो तरी आपल्यामुळे ते फर्निचर खराब होईल असं वाटावं इतकं सगळं झाकपाक होतं.

अर्थातंच अनुरागला तसं वाटत नव्हतं. घरात शिरताच मी चपला काढल्या तर तो म्हणाला चपला काढायच्या नाहीत. पण खालचं कार्पेट? बाहेरून आपण आणलेली धूळ? नोकर आहेत ना हे त्याचं उत्तर. त्याची खोली (त्या रुमला खोली म्हणणं म्हणजे महालाला हॉस्टेल म्हटल्यासारखं आहे) प्रशस्त होती. समोर खूप झाडं आणि त्याच्याही पलीकडे अरबी समुद्र दिसत होता. रुममध्ये स्वतःचा टी. व्ही, काँप्युटर, एसी आणि बरंच काही.

एक क्षणभर मला वाटलंही. समजा आपण ह्याच्याशी लग्न केलं तर हे सगळं आपलं होईल ना? दुसऱ्याच क्षणी तसं काही होण्याची शक्यता नाही ही रिऍलिटी डोळ्यासमोर चमकली. पण तो एक क्षणही असा ढगांवर तरंगवणारा होता.

त्याच्या बेडच्या बाजूला दोन सिंगल सिटर सोफे होते, त्यातल्या एकावर मी बसून बाहेरचं दृष्य बघत होते. माझी जवळ जवळ तंद्री लागलेली होती. अनुराग पाठून आला आणि त्याने खांद्यावर टॅप केलं. मी त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने मला समोर पाहायला सांगितलं. समोर भिंतभर आरसा होता. त्यात मी सोफ्यावर बसलेले दिसत होते आणि माझ्यापाठी तो उभा होता. सोफ्यावर ठेवलेले हात त्यानं उचलले आणि दोन्ही हातांनी माझ्या चष्म्याच्या दोन काड्या धरल्या आणि डोळ्यावरून चस्मा उतरवला.

मला ह्या सगळ्याचा अर्थ कळेना. मी वळून त्याच्याकडे पाहिलं. गाडी चुकीच्या रुळावर तर चढत नाही ना असं एक क्षणभर वाटलं. पण तरीही ते सुखदंच होतं. त्याने मला पुन्हा समोर पाहायला सांगितलं, चस्मा समोरच्या कॉफी टेबलवर ठेवला आणि हात पुन्हा सोफ्यावर ठेवले. तो ते माझ्या खांद्यावर ठेवेल असं मला वाटलं होतं. खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याने त्याचे हात माझ्या खांद्यावर ठेवावे असं मला न वाटूनही वाटलं. सेकंद दोन सेकंद अशी संभ्रमात गेली असतील नसतील आणि तो मला म्हणाला देवी तू चस्मा नको लावूस बघ किती सुंदर दिसतेस.

माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाने तू सुंदर दिसतेस असं दिलेलं हे पहिलं काँप्लिमेंट. अगदी मोरपिसासारखं मी जपून ठेवलंय ते. खरंतर मला चस्म्याशिवाय अंधूकंच दिसत होतं. पण तो म्हणाला होता ते चूक असणं शक्यच नव्हतं. तिथून थेट आम्ही काँटॅक्ट लेन्सेस घ्यायला गेलो. मला परवडण्यासारखं नव्हतं, पण अनुरागला नक्कीच परवडण्यासारखं होतं. चस्मा डोळ्याचा गेला तो तिथेच. अर्थात लेन्सेस लावल्या तरी रात्री घरी चस्मा लावायला लागायचाच पण पब्लिक लाइफमध्ये पुन्हा कधीही चस्मा लावला नाही. दोन वर्षापूर्वी लेझर आय करेक्शन करून घेतलं आणि आता तर होता नव्हता तो सगळा चस्मा गेला.

ह्याचं सगळं क्रेडिट मात्र अनुरागलाच. त्यानं त्या दिवशी माझ्या डोळ्याचा चस्मा काढला नसता तर कदाचित आजही तो माझ्या डोळ्याला असता.

- देवयानी

Monday, May 16, 2011

देवयानी (12)

मी वळले तशी त्यानी मला पुन्हा हाक मारली. तू इस्टला चाललीस ना? तो म्हणाला. ह्याला कसं कळलं ते मला कळेना. पण मी काही त्याला विचारलं नाही. नुसतंच हो म्हटलं. मग म्हणाला की मीही तिथेच चाललोय, एकत्र जाऊया. तुलाही सोबत होईल. खरं सांगायचं तर माझी इनिशिअल रिऍक्शन होती, नको. पण काहीही ठामपणे म्हणण्याचा आत्मविश्वासंच माझ्यात नव्हता. मी काहीच म्हणाले नाही आणि तो माझ्याबरोबर येऊन चालायला लागला.

मला घरी पोचायला साधारण वीस मिनिटं तरी लागायची चालत. तितक्या वेळात त्याच्याबद्दल सर्व काही त्याने मला सांगितलं. तो कॉमर्सवाला होता. कॉमर्सवाला म्हटल्यावर माझा आत्मविश्वास जरा वाढला. म्हणजे मार्क नक्की माझ्यापेक्षा कमी असणार. कशी गंमत आहे. आपण कुणाशी बोलतो तेव्हा तो वरचढ की आपण अशी तुलना आपोआप मनात सुरू होते. निदान माझ्यातरी होते. अजूनही होते. मग ती व्यक्ती वरचढ वाटली तर मला बोलताना थोडं टेन्शन येतं आणि मी वाटले तर आत्मविश्वास वाढतो. तसा तेव्हाही वाढला.

त्याला काही शिक्षण, अभ्यास वगैरे ह्यात विशेष रस वाटला नाही. जावंच लागतं म्हणून तो कॉलेजात येत असे. मग इतक्या रात्रीपर्यंत तो लायब्ररीत काय करत होता असं मी त्याला विचारलं, त्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली. उडवा उडवीची उत्तरं देणं हा अनुरागचा स्वभावंच होता. पण त्याच्या व्यक्तीमत्वातंच एक भुरळ पाडण्याची क्षमता होती. तशी त्याने मला भुरळ पाडली आणि मी त्याच्याबरोबर चालत राहिले. तो जे काही बोलेल ते ऐकत राहिले, तो जे विचारेल त्याची उत्तरं देत राहिले. आमच्या बिल्डिंगच्या नाक्यावर पोचले तसं माझं घर आलं असं खोटंच सांगितलं त्याला. दोन कारणं होती. आमच्या बिल्डिंगमधल्या कुणी त्याला पाहायला नको आणि मी नक्की कुठे राहते हे त्याला कळायला नको.

किती भाबडेपणा हा? पुढे अनेकवेळा तो घरी येऊन गेला. तोच काय अनेक मित्र घरी येऊन गेले. तिथे आणि इथेही. हळूहळू ती भीतीही चेपली. लोकं काय बोलतंच असतात. म्हणून आपण जगणं थांबवायचं का?

असो, तो गेला पण रात्रभर माझ्या मनात धिंगाणा घालत राहिला. मी अशी बावळट, हा इतका देखणा. माझ्याकडे कुणा मुलाने हसून पाहिलेलंही मला आठवत नव्हतं. हा चक्क आला, बोलला, मला घरी सोडून गेला. का केलं असावं त्यानं? विचारांचं चक्र रात्रभर चालू होतं. सकाळी उठून क्लासला जायला निघाले. आरशासमोर उभं राहून स्वतःला एका वेगळ्याच नजरेने पाहिलं. आपणंही सुंदर दिसू शकतो असा आत्मविश्वास त्या क्षणी मला सर्वप्रथम जाणवला.

पुढे तो रोजच भेटत गेला. अनुराग आजूबाजूला असला की मला एकदम फुलपाखरासारखं वाटायचं. मुळात मला एक आउटलेट मिळालं. हळू हळू मीही त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागले. मनातलं दुःख त्याच्यासमोर सांडू लागले. तो तर प्रचंड बोलका होताच. तो ज्या ज्या काही गोष्टी मला सांगे त्या माझ्यासाठी स्वप्नवतंच होत्या. एक लिहिलंच नाही. तो मराठी नव्हता, पण तरीही माझ्या लंगड्या इंग्लिशची त्याने मला कधी जाणीव करून दिली नाही. माझ्याशी तो हिंदीत बोलायचा. त्याचं इंग्लिश चांगलं होतं. मग मी मुद्दाम त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागले. बोलून बोलून मलाही सवय व्हायला लागली.

त्याचे वडील मोठे बिझनेसमन होते. आय मीन आहेत. born with silver spoon in mouth वगैरे जे लिहितात ना, ते अनुराग प्रत्यक्ष होता. स्वतःची गाडी त्या काळीही होती. अभ्यासाची चिंता नव्हती. पास झाल्यावर बापाचा बिझनेस जॉइन करायचा होता. पण एवढं सगळं असूनही माझ्याशी मात्र तो एकदम चांगला वागत असे. बऱ्याच वेळा तो कॅटीनमध्ये, हॉटेलात यायचा आग्रह करी. पण माझ्याजवळ त्याच्याइतका खुर्दा कधीच नसायचा. मग मी टाळंटाळ करायचे. मग तो काहीतरी कारणाने ट्रीट म्हणून मला घेऊन जायचा, दोघांचे पैसे भरायचा. हळू हळू मलाही त्या सगळ्याची सवय लागली. आवडायला लागलं.

आग्दी स्पष्ट शब्दात सांगायचं तर मला तो अतिशय आवडायला लागला. त्यातल्या त्यात बरे कपडे, केस शक्यतो मोकळे सोडणं, थोडा मेक अप, अगदी मी नवा चस्माही घेतला. जाडा चस्मा फेकून दिला. अनुरागसाठी चांगलं दिसणं, काही ना काही कारणाने त्याच्या अवती भवती असणं मला आवडायला लागलं. आमची मैत्री चांगलीच वाढली. पण ती आमच्या दोघांचीच होती. त्याने मला कधी त्याच्या मित्र मैत्रिणींच्या टोळक्यात येऊ दिलं नाही. मी बऱ्याचदा त्याला विचारलंही, पण तो सारवा सारवीची उत्तरं द्यायचा. ती लोकं चांगली नाहीत असं म्हणायचा. पण तरीही तो त्यांच्यात का जातो ह्यावर त्याच्याकडे उत्तर नसायचं.

पण ह्या सगळ्याने एक मात्र झालं. अभ्यास, मार्क ह्याचा जो ताण माझ्यावर आला होता तो कुठच्या कुठं पळाला. अनुराग मला म्हणायचा की तुला नाही ना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं, मग कशाला टेन्शन घेतेस? पास व्हायचं फक्त की पुढच्या वर्गात ऍडमिशन मिळणारंच आहे. सिनिअर कॉलेजमध्ये कर काय अभ्यास करायचा तो. मलाही ते पटायचं. त्यामुळे सहाजिकंच अभ्यासावरचा फोकस उडाला. जमतंय तेवढं करायचं. आताशा क्लासेस बंक करणं रुटीन झालं होतं. अनुराग मला आधी सांगून ठेवायचा अमुक एक वेळेला भेटायचं मग तेव्हा जगबुडी झाली तरी मी त्याला भेटायचेच. अर्थात मला तो आवडत असला तरी त्याला माझ्यापेक्षा खूप चांगल्या मुली मिळणार होत्या. त्याच्या ग्रूपमध्ये होत्याही. त्यामुळे आवडणं, ह्या पलीकडे काही होऊ शकेल असं मला वाटलं नव्हतं.

- देवयानी

Thursday, May 12, 2011

देवयानी (11)

कॉलेजचे सुरवातीचे दिवस असे त्रासाचे, डिप्रेसिंग गेले. अर्थात जे काही जमत होतं, जसं काही स्मजत होतं, त्याच्या आधारावर आलेल्या परीक्षांना सामोरं जाणं होतंच. अपुरी तयारी, सतत अभ्यासाचा ताण आणि तो ताण मोकळा करण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नसणं. बहुदा साडेसाती साडेसाती म्हणतात ती हीच असावी. आणि खरोखरच ती माझ्याबरोबर सात आठ वर्ष तरी राहिलीच, अगदी मराठे काकांची ओळख होईपर्यंत. अर्थात आताही मला सुखी माणसाचा सदरा किंवा बाईची साडी बिडी मिळालेय असं नव्हे, पण ते दिवस खरंच कठीण होते.

जाता जाता एक वर्ष गेलं. रडत खडत अकरावी पास झाले. कितवा नंबर वगैरे ह्याचा विचारही करण्याजोगे मार्क नव्हते. बुडत्याला काडीचा आधार तसे काठावरचे मार्क घेऊन मी पास झाले. रिसल्ट घेऊन घरी आले. घरी कुणीही नव्हतं. कित्येक तास मी एकटीच बसून होते. विचार करत. तहान भूक हरपली होती. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. दहावीचा निकाल ते अकरावीचा निकाल ह्यात इतका फरक कसा पडला? ह्याचाच विचार करीत बसले. अकरावी पार पडल्याचं थोडं बरं वाटत होतं, पण बारावीचा डोंगर पुढे दिसत होता. कुणी अकरावीचे मार्क विचारत नाही, पण बारावीनंतर नक्की विचारणार, त्यात असे मार्क असले तर काय उत्तर द्यायचं?

आई बाबा घरी आले. अर्थातच रिसल्टबद्दल त्यांनी विचारलं. तो क्षण मला तसाच्या तसा आठवतोय. काय उत्तर द्यायचं? पण दोन क्षणांच्यावर थांबून चालणार नव्हतं. दिलं उत्तर. मारली थाप. दोघांपैकी कुणीही माझा रिसल्ट बघायला मागणार नव्हतं. इतर कोणत्या मार्गाने त्यांना तो कळणंही शक्य नव्हतं. मार्क ऐकले, आई काहीच बोलली नाही. काही बोलली नाही ह्याचा अर्थ मार्क चांगले आहेत असा होता. बाबा म्हणाले बारावीची तयारी चाललेय ना व्यवस्थित? मी हो म्हटलं. विषय संपला. गेलं वर्षभर मी कोणत्या मानसिक अवस्थेतून जात होते हे मी त्यांना सांगू शकले नाही तसं तेही कधी मला विचारू शकले नाहीत. अजूनही मी तेव्हा काठावर पास झाले होते हे त्यांना माहीत नाही. केवढं मोठं खोटं आणि केवढं मोठं दुर्दैव त्या मुलीचं आणि तिच्या पालकांचं? पालकांशी खरं बोलायची हिंमत त्या मुलीत आली नाही. ती तिच्या अंगी यावी म्हणून तिच्या पालकांनी कधी प्रयत्नही केले नाहीत.

आज आयुष्यात अनेकदा खोटं बोलायचा प्रसंग येतो. येतो म्हणजे खोटं बोलणं हा माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहे. अगदी धादांत खोटं नाही, पण अर्धसत्य तरी बोलावंच लागतं. प्रसंगी नरो वा कुंजरोवा करावं लागतं. दर वेळी खोटं बोललं की माझ्या अकरावीच्या रिसल्टची आठवण येते. खरंतर ती उभ्या आयुष्याच्या तुलनेत खूप क्षुल्लक बाब आहे. पण कुठेतरी अजूनही मी त्यांच्याशी खरं बोलले नाही हे बोचत राहातं.

असो, तर अशाप्रकारे अकरावी पार पडली. बारावीचं कॉलेज, क्लासेस करता करता दिवस कसे सरून जायचे कळायचं नाही. पण ज्वालामुखी खदखदत होताच. आल्या दिवसागणिक ताण वाढत होता. परीक्षेला अवकाश असला तरी गेल्या दिवसासरशी ती जवळ येतंच होती. घरातलं वातावरण तसंच मचूळ होतं. घरी जितकं कमी राहता येईल तितकं बरं असं म्हणून मी कॉलेजातंच वेळ काढायला लागले.

माझा असावा असा ग्रूप तोपर्यंत माझा नव्हता. कुणाशी सख्खी मैत्री नव्हती. कॉलेजाबाहेर घर सोडून दुसरी जाण्यासारखी जागा नव्हती. मग काय? कॉलेजातंच बसून राहायचं. सकाळचे क्लासेस, मग एकही लेक्चर, प्रॅक्टिकल्स न चुकवता कॉलेज, सगळं आटपलं की आठ वाजेपर्यंत लायब्ररी. काही मुलं नंतरही बसत तिथे, पण आमच्या कॉलेजपासून माझ्या घरापर्यंत जाणारा रस्ता फार सेफ नव्हता. त्याच्यामुळे मी आठाला निघायचे. रस्त्यावर तेव्हा बर्यापैकी गर्दी असते. मध्ये इस्ट वेस्ट जाणारा एकांडा पूल होता. तो पार करताना मात्र भीती वाटायची. मग मी स्टेशनात गाडी यायची वाट पाहत बसायचे. गाडी आली की कुणी ना कुणितरी वेस्ट इस्ट जाणारं असायचं. मग त्यांच्या पाठोपाठ मी जात राहायचे.

अशीच एकदा मी आठ वाजता लायब्ररीमधून निघाले. आमच्या कॉलेजातून बाहेर पडताना एक मोठ्ठं लॉन लागतं. ते पार केल्यावर गेट आणि मग मेन रोडला लागणारा रस्ता. लॉन पार करून मी गेटच्या दिशेने निघाले तेवढ्यात पाठून हॅलो हॅलो करून कुणीतरी ओरडत आलं. मला अंधारत निटसं दिसलं नाही, पण मी वळून पाहत होते. कॉलेजच्या बाहेर पडलेली नसल्याने भीती वगैरे काही वाटायचा प्रश्न नव्हता. हळू हळू ती आकृती माझ्यासमोर येऊन थांबली. जवळ आला तसं माझ्या लक्षात आलं की तो कुणीतरी मुलगा होता. खरं सांगायचं तर तो अतिशय देखणा होता.

माझं पेन लायब्ररीत राहिलं होतं आणि तो द्यायला तो माझ्या पाठी धावत आला होता. मला मी पेन बाहेर काढलेलंच आठवत नव्हतं. कारण मी काही लिखाण करतंच नव्हते आणि वाचताना पुस्तकात करायच्या खुणा मी पेन्सिलीने करत असे. पण त्याने दिलेलं पेन माझ्यासारखंच होतं. म्हणजे रेनॉल्डसचं. म्हटलं असेल. म्हणून मी ते घेतलं. थँक्स म्हटलं. मग त्याने मला त्याचं नाव सांगितलं. त्याला आपण अनुराग म्हणूया. कारण त्याचं खरं नावंही असं स्वप्नीलंच होतं. मीही त्याला माझं नाव सांगितलं आणि मी घरी जायला वळले.

- देवयानी

Friday, May 6, 2011

देवयानी (10)

कॉलेजचा पहिला दिवस अजूनही स्पष्ट आठवतो. शाळेत असेपर्यंत मी वर्गातल्या सो कॉल्ड हुशार मुलांपैकी एक होते. पण ह्या कॉलेजात माझ्याइतके मार्क मिळालेले अनेक लोक होते. शाळेत वासरात लंगडी गाय शहाणी होती, म्हणून तिचा तोरा होता. पण आता गायींच्याच कळपात आल्यावर लंगड्या गायीकडे कोण लक्ष देणार? भारताचा व्हॉइसरॉय परत इग्लंडला गेला की त्याला जशी स्वतःची ट्रंक स्वतः उचलायला लागायची तसं माझं झालं. आधी म्हटल्याप्रमाणे मी प्रचंड बुजरी आहे. मोठ्या चस्म्याच्या आणि त्याहून भाल्या मोठ्या पुस्तकांच्या आड मी माझं बुजरेपण लपवत असे. ह्या नवीन कळपात आल्यावर मी अजूनंच बुजरी झाले.

सध्या मी जे काम करते, ते काम करणं बुजऱ्या लोकांसाठी नाहीच आहे. सतत लोकांना भेटणं, बोलणं, मोठमोठी फंक्शन्स सेमिनार अटेंड करणं, कधी मधी एखादा पेपर प्रेसेंट करणं. सेल्स प्रेसेंटेशन्स तर अगणीत. हे सगळं करणं त्या मुलीला, चस्मा लावणाऱ्या, शक्य होतं का? म्हटलं तर होतं, म्हटलं तर नव्हतं. ती, म्हणजे मीच आज हे सगळं करते आहे. पण माझ्या नशीबाने माझ्या आयुष्यात जे चांगले वाईट लोकं आले त्यांच्यामुळे हे झालं. आपल्या शिक्षणातलं मला हे नेहेमी खुपतं. का नाही आपली शिक्षणपद्धती बुजऱ्या मुलांना धीट व्हायला शिकवत?

असो, पुन्हा विषयांतर झालं. तर अशी मी कॉलेजात पोचले. आमच्या शाळेतल्या एकूण दोन मुली आणि एक मुलगा ह्या कॉलेजात आले. पैकी मुलगी दुसऱ्या वर्गात पडली. मी आणि तो मुलगा एका वर्गात. पण शाळेत असताना मुलांशी बोलणं हे माझ्यासाठी अशक्यच होतं. खरं सांगायचं तर बोलावसं वाटायचं नाही असं नाही. त्या वयात ते स्वाभाविकच आहे, पण कसलीतरी भीती मनात होती. भीती ही सर्वांच्याच पाचवीला पुजलेली असते. तशी ही मुलं माझी चेष्टा तर करणार नाहीत ना? मला हसणार तर नाहीत ना? अशी भीती माझ्या मनात असायची, त्यामुळे एवढ्या मोठ्या वर्गात एकमेव ओळख असलेल्या मुलाशी ओळख दाखवणंही मला जमलं नाही. त्यात मराठी मिडियममध्ये शिक्षण झालेलं. त्यामुळे इंग्लीश वाक्याची तयारी मनात करून मगंच बोलता यायचं. त्यामुळे दुसऱ्या कुणाशी ओळख करून घेणंही कठीण होतं.

माझ्या आई वडिलांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं नाही, ह्याचा प्रचंड राग मला कॉलेजमधल्या पहिल्या दोन वर्षांत आला. गणित, विज्ञान, सगळं मराठीत झालेलं, अचानक इंग्रजी येणं कठीण होतं. मराठीत माहीत असलेले शब्द, इंग्रजीत वाचले की त्याचा अर्थ कळत नसे. मग डिक्शनरी काढा. अशा अनंत अडचणी येत राहिल्या. घरून काही मदत होईल असं नव्हतंच. वडील त्यांच्या कामात. आईचं शिक्षण बीए. तिला विज्ञानाचा ओ की ठो माहीत नव्हता. अर्थात मी आर्टसला गेले असते तरी तिला काही विचारण्यासारखी परिस्थिती असती असं नाही.

कोपऱ्यात सापडलेल्या मांजरीसारखी माझी अवस्था झालेली. स्वतःच स्वतःबद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या होत्या. अमुक एक मार्क मिळालेच पाहिजेत. वर्गात पहिल्या तिनात असलंच पाहिजे. वगैरे वगैरे. स्पष्ट शब्दात सांगायचं तर अकरावीत असं काही साध्य करण्याची माझी परिस्थिती नव्हती. पुस्तक वाचून त्याचा अर्थ कळेपर्यंत अनेक दिवस जात. वर्गात शिकवलेलं नीट कळत नसे. कळलं नाही तर भर वर्गात उठून उभं राहून ते विचारावं इतकं धाडस नव्हतं. किंबहुना आपण सांगितलेलं वर्गातल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला न कळण्याची शक्याता आहे हेच मुळी शिकवणाऱ्यांचा गावी नव्हतं. चांगले मार्क घेऊन आलेली मुलं इथे आलेली आहेत, ती हुशार असणार, त्यांना सगळं येतं. ह्याच गृहितकावर तिथल्या शिक्षणाची थिअरी आधारलेली होती.

तारे जमीन पर मध्ये इशान अवस्थीचं बोर्डिंग स्कूलमध्ये जे झालं तेच माझं कॉलेजात होत होतं. चारही बाजूंनी कोंडी होणे म्हणजे काय हे मी अनुभवलंय. स्वतःच्या आणि इतरांच्या स्वतःबद्धलच्या अपेक्षा पूर्ण न होणं, हे एका पंधारा सोळा वर्षाच्या मुलीवर केवढं संकट असेल. त्यात शरीर एका वेगळ्या अवस्थेतून जात असतं, हालवून सोडणारे आतर्बाह्य बदल होत असतात. बरं कुणाकडे मन मोकळं करावं तेही नाही. घरी आईशी काही बोललं तर ती मलाच ओरडणार, वडिलांशी बोलायची सोयंच नव्हती, बरं जवळचे कुणी मित्र मैत्रिणी असतील तर तसंही नाही. मग काय करायचं, मनातल्या मनात कुढत बसायचं.

ह्या गोष्टी एकंदतीत जगण्यावरंच मळभ आणतात. ह्यालाच डिप्रेशन म्हणतात हे पुढं मोठं झाल्यावर कळलं. उगाच नाही छोट्या छोट्या मुली, मुलं पंख्याला फास लावून आत्महत्या करतात. माझ्या सुदैवाने आत्महत्या करावी, किंवा अत्महत्या करणे हाही एक पर्याय असू शकतो, हे माझ्या मनातही आलं नाही. कुणी सांगावं मी काय करून बसले असते?

अशा अवस्थेत सापडलेल्या मुलांचं काय होतं? दोन पर्याय असतात. एक म्हणजे स्वतःला सावरणं आणि असल्या परिस्थितीला तोंड देणं. पण हे करायला कुणाचातरी आधार लागतो. वडिलधाऱ्यांचा, मित्रांचा, मैत्रिणींचा, शिक्षकांचा किंवा मुळातंच तुम्ही कणखर असणं आवश्यक असतं. हे घडलं नाही तर काय घडू शकतं? न्यूनगंड. मी चांगली नाहीच आहे, मी ढ आहे, मी बावळट आहे, मला काहीच धड करता येत नाही, मला अक्कल नाही, असं स्वतःच स्वतःला पटवून द्यायचं, थोडक्यात परिस्थितीला शरण जातेय असं खोटंच स्वतःला भासवायचं आणि हातावर हात ठेऊन बसून राहायचं.

मीही अगदी तसंच केलं.

- देवयानी

Thursday, May 5, 2011

देवयानी (9)

आता थोडंसं आणखी मागे जाते. लिहिण्याचा क्रम ठरवून लिहिलं असतं तर फार बरं झालं असतं, पण मध्येच मला वाटायला लागलं की फक्त प्रोफेशनल लाइफ आणि प्रॉब्लेम्सबद्दल लिहिताना, थोडं पर्सनल लिहिणं आवश्यक आहे. अगदी खूप जुनं नाही लिहिणार, म्हणजे शाळा वगैरे. पण कॉलेजचा मात्र आधी उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या आयुष्यावर खूप मोठा पगडा आहे.

तसा माझ्यावर बऱ्याच लोकांचा पगडा आहे. किंबहुना माझं व्यक्तिमत्व असंच आहे की मी सहज कुणाच्याही भजनी लागते. जे दिसतं तेच खरं असतं अशी स्वतःची समजूत करून देण्याचा भाबडेपणा माझ्यात आहे. पण ह्याच भाबडेपणामुळे अनेकदा हात पोळले गेले. एकदा जीभ पोळली की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो ह्या न्यायाने मग सगळंच खोटं वाटायला लागतं. जे खरं आहे त्याच्यावरही संशय घेतला जातो.

पण अगदी कॉलेजच्या आधी म्हणजे खूप लहान असताना, अगदी बाळ असतानासुद्धा, कुणी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले असतील तर ते माझ्या आजोबांनी. आजोबा माझे प्रचंड हुषार होते, वाचनाचं त्यांना प्रचंड वेड. त्यांची पुस्तकं अजूनही कधी घरी गेले तर मी उघडून बसते. फार नव्हती, पण जी होती ती फार छान छान होती. थोडक्या पैशावर संसार चालवायचे त्यांचे दिवस, त्यात पुस्तकासारख्या चैनीसाठी पैसा आणायचा कुठून?

त्यांनी अगदी बाराखडीपासून मला शिकवलं. आकडे शिकवले. त्याचा पुढे काय उपयोग झाला किंवा झाला नाही मला माहिती नाही, पण ह्या सगळ्यामुळे आजोबा माझे डियर फ्रेंड झाले. खरंतर आजोबांचा धाक प्रचंड होता. माझे बाबापण त्यांना घाबरत, पण मला मात्र ते कधी ओरडले नाहीत. अर्थात त्यांच्या नजरेतंच जरब होती, त्यामुळे त्यांना ओरडण्याची वेळ फार वेळा मी येऊ दिली नाही. आजोबा गेले तो दिवस मला अंधूक आठवतो. ते परतंच येणार नाहीत हे शक्यच नाही असं मी माझ्या मैत्रिणीला सांगितलेलंही आठवतं. मोठ्यांच्या जगातले नियम छोट्यांना कुठे लागू पडतात? अगदी मध्ये संदीप खरेची कविता ऐकली, मी पप्पाचा ढापून फोन, त्यात तो मुलगा नाही का बाप्पाला सांगतो, आमच्या अप्पांना परत धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे. तेव्हासुद्धा अजोबांची खूप आठवण आली.

आईचं आणि माझं कधीच विशेष पटलं नाही. ती वाईट आहे असं नाही, पण नाही आमचं विशेष जमलं. प्रत्येक गोष्टीत तिचं मत माझ्यावर लादायची तिला सवय आहे. अगदी लहानपणापासून. आणि गंमत अशी व्हायची की मला जे हवं असतं ते नेमकं तिला मी करावं असं वाटत नसतं. काही अपवाद सोडले तर असं नेहमीच होत आलेलं आहे, त्यामुळे नकळतंच तिच्या मनात माझ्याविषयी आणि माझ्या मनात तिच्याविषयी एक आढी निर्माण झालेली आहे. आम्ही दोघी एकमेकांशी बोलतो. एकत्र राहतो म्हणजे एकमेकांना टाळणं शक्य नसतंच, पण ती फक्त एक ऍडजस्टमेंट आहे असं मला आणि बहुतेक तिलाही वाटत असावं. नवरा बायकोतल्या ऍडजस्टमेंटबद्दल आपण वाचतो, किंवा सासू सुनेबद्दल वाचतो. पण तसंच काही आई आणि मुलीतही असू शकतं? अजूनही कधी कधी आमचं भांडण होतं. दोघीही आम्ही अगदी तावा तावानं भांडतो, मग शोवटी तिला नाही तर मला आवरत नाही आणि रडू फुटतं, मग भांडण थांबतं.

आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्त्यातला, आहे जरी पत्त्यातला तो नाही तसा पत्त्यातला. भाऊसाहेब पाटणकरांचा हा शेर माझ्या वडिलांना चपखल बसतो. आहे जरी पत्त्यातला नाही तरी पत्त्यातला. संसार केला, पण संसारात कधीही त्यांना आनंद मिळाला नाही. समाजसेवा हा त्यांचा छंद होता. त्यापायी त्यांनी खूप वेळ आणि पैसा आयुष्यात खर्च केला. मला काही कमी पडू दिलं असं मुळीच नाही, पण पाटी, पुस्तक, बरे कपडे ह्यापुढे मुलांची काही भावनीक गरज असते. त्यात आईचं आणि माझं कधीच चांगलं नव्हतं, बरं मला दुसरं भावंड नाही, सहाजिकंच माझा ओढा बाबांकडे अधिक होता. पण मला म्हणावा तसा प्रतिसाद कधीच मिळाला नाही. त्यांच्या मिटिंगा, त्यांचे दौरे चालू असत. त्यासाठी त्यांनी अनेकदा कामवरून सुट्टी घेतली असेल. पण मला कुठे फिरायला घेऊन गेलेत असं कधी झालं नाही. पुढे पुढे तर ते संन्यास घेतल्यासारखेच वागायला लागले. माझ्या आयुष्यात उलथापालथी झाल्या, पण टोचून बोलण्याशिवाय त्यांनी दुसरं काहीही केलं नाही. कधी मायेनं पाठीवर हात फिरवून दोन शब्द बोलले असतील? कधी आम्ही तिघांनी घरात मस्त गप्पा मारल्या असतील? एकत्र कधी फिरायला गेलो असू? असं कधी झालंच नाही.

शाळेत असताना मी कुढत बसायचे. एखाद्या मैत्रिणीने वाढदिवासाला घरी बोलावलं, तर तिच्या बाजूला केक कापताना तिचे आई बाबा आनंदाने उभे असलेले पाहून मला हेवा वाटायचा. माझ्या वाढदिवसाला, रव्याचा केक घरी व्हायचा. तो बाहेरून आणलेल्या केकसारखा कधीच लागत नसे. पैसे नव्हते असं नाही, पण मुलीचा आनंद ही जगातली सर्वात शुल्लक गोष्ट असल्यासारखे माझे वडील वागत.

खरंतर मुळात मी खूप संवेदनाशील आहे. पण ह्या सर्व गोष्टींनी मला एकदम बोथट बनवलं. एनजीओ, त्यात काम करणारे लोकं हे विलक्षण दांभिक असतात असं मला आजही वाटतं. लोकांच्या मुलांना सांभाळत फिरता ना तुम्ही? मग स्वतःच्या मुलांनाही तो आनंद द्या ना कधीतरी? असो, सगळे लोक असे नसतील, पण आपली मतं आपण जे अनुभवलं त्यावरूनंच होतात ना?

शाळेत असेपर्यंत मला जवळच्या अशा मैत्रिणी नव्हत्या. ज्या होत्या त्या काळाच्या ओघात दूर गेल्या, कधी भेटल्या तर हाय हॅलोच्या पुढे बोलायचं काय हा प्रश्न पडतो. त्यांची आयुष्यही खूप वेगळी आहेत. नवरा, मुलं आणि नोकरी ह्याच्या व्यापात त्या अडकलेल्या. शाळेत असेपर्यंत मी एकलकोंडीच होते. पुस्तकं, अभ्यास ह्याचाच मला नाद होता. भला मोठा चस्मा होता. मोठमोठाली वयाला न झेपणारी पुस्तकं वाचण्यात माझ्या आयुष्याचं सार्थक होतं. नशीबानं देवानं बरा मेंदू दिलेला. पुस्तकात वाचलेलं पाठ करून परीक्षेत लिहिता येत होतं. त्यामुळे मार्क्स चांगले मिळत होते. माणसाच्या फक्त स्मरणशक्तीचा विकास करणारी आपली शिक्षणपद्धती आहे. इतका lopsided growth झालेली मुलगी प्रचंड मार्क्स मिळवून दहावी पास होते, हेच कदाचित आपल्या शिक्षणपद्धतीचं अपयश आहे.

खरं हे सगळं लिहायचं नव्हतं. आपल्याच लोकांविषयी आपण इतकी टिका करणं चांगलं नाही, कल्पना आहे, पण ह्या गोष्टी लिहिल्याशिवाय मी आज आहे ती का झाले ह्याचं उत्तर मला स्वतःलाच मिळणार नाही म्हणून लिहिलं गेलं.

अशा पार्श्वभूमीची मी मुंबईतल्या एका अव्वल कॉलेजमध्ये सायन्सला ऍडमिशन घेतली. पुस्तकं वाचायचा, पाठ करायचा आणि पाठ केलेलं लिहायचा सराव होताच, त्यामुळे तीच modus operandi वापरून इथेही आपण so called यशस्वी होऊ असा मला अत्मविश्वास होता, पण व्हायचं वेगळंच होतं.

- देवयानी (9)