Thursday, September 25, 2008

प्रश्न, उत्तर आणि बेड्या

हा माझा इथला अखेरचा आठवडा. काम संपलं असं म्हणू शकत नाही कारण प्रोजेक्ट चालू राहणारंच आहे. मी एकटीच परत चाललेय. पुढच्या मुक्कामाची कागदपत्र तयार होईपर्यंत मला इथे पाठवली होती. ती तयारी होत आलेली आहे. मलाही इथे कंटाळा आलेलाच होता. घराची ओढ होतीच आणि त्याला भेटायचीही.

तो म्हणजे बाबाच्या सीसीआय मधल्या मित्राचा मुलगा. मी दिल्लीला जायच्या आधी बाबा मला हिंदू जिमखान्यावर डिनर ला घेऊन गेला होता. तिथेच बाबाने त्याला आणि त्याच्या आई बाबांनाही बोलावलं होतं. उद्देश हा होता की आमची ओळख व्हावी आणि त्यातून पुढे काही जमलं तर बघावं. पण बाबाने मला असं काहीही सांगितलं नव्हतं. हॅरी पॉटर थोडासा इंडियन झाला, त्याने थोडा वेगळा चस्मा लावला आणि थोडासा तो गंभीर झाला तर कसा दिसेल? तसा दिसला तो मला. म्हणजे बघून आवडला. पण त्यात सीरियस काहीच नव्हतं.

अर्थात आम्ही एकाच वयाचे म्हणून बोलायला लागलो. म्हणाला जिमखान्याला चक्कर मारून येऊया का? नक्कीच. बोलता बोलता तो उलगडत गेला. खरंतर मीच बोलत होते, पण ऐकणंसुद्धा अर्थपूर्ण असू शकतं की नाही? खूप छान वाटलं त्याच्याबरोबर बोलून. खूप नम्र वगैरे वाटला. मी असं केलं नि मी तसं केलं अशा बढाया मारणाऱ्यातला नाही. इतरांचं कौतुक करणारा, माझं कौतुक करणारा असा वेगळाच पण रोमँटिक नाही.

दुसऱ्या दिवशी बाबाने मला सगळा प्लॉट सांगितला. मला तशी थोडी कल्पना आलीच होती. तेव्हा हे सगळं ब्लॉगवर लिहावं असं खूप वाटलं, पण नाही लिहिलं. तेव्हाची परिस्थितीच अशी होती की अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागला नसता.

आम्ही पुन्हा दोघंच भेटलो. विसाव्या मजल्यावरून मुंबई खूपच सुंदर दिसत होती. काचेच्या भिंतीशेजारचं टेबल, क्वीन्स नेकलेस आणि माझ्यासमोर तो. अजिबात मोठ्याने न बोलणारा. मोजकंच बोलणारा पण योग्य ते बोलणारा. त्याचं तिथे ते असणं, बोलणं इतकं भारावणारं होतं की माझा माझ्यावरचा ताबा सुटतोय की काय असं वाटायला लागलं. हाच का तो? ज्याच्याबरोबर माझं अख्खं आयुष्य जाणार? त्याने मला घरी सोडलं तेव्हाही मी मंतरल्यासारखीच झाले होते. त्याने मला तो प्रश्न विचारला नाही. मी विचारण्याचा प्रश्न नव्हताच, पण त्याने विचारल्याशिवाय मी उत्तर देणार नव्हते हेही नक्की ठरवलं.

कदाचित त्याला मी आवडले नसेन? असेनही. पण त्याचं जग माझ्या जगासारखं असेल का? माझं जग वेगळंच आहे. माणसांनी बनलेलं आहे ते. नाती माझ्यासाठी लाख मोलाची आहेत. पैसा तितकासा नाही. बाबाने स्वतःच्या वागण्यातून हे आम्हाला शिकवलंय. उंबरठ्याशी नाळ कधीही न तोडण्याची त्याची वृत्ती उंबरठे ओलांडूनही आमच्यात मुरली आहेच. तो, त्याचे आई, बाबा, सगळं छान आहे. घरही छान आहे. प्रभादेवी म्हणजे गिरगावापासून फार लांब नाही.

मी मुंबई सोडली आणि आमचं रेग्युलर चॅटिंग व्हायला लागलं. हा मिडिआ त्रासदायक छान आहे. त्या दोन महिन्यात आम्ही एकमेकांना जसे उलगडलो तसे कदाचित रोज भेटूनही उलगडलो नसतो. पुन्हा मुंबईला गेले, पुन्हा त्याला भेटले. मग इथे आले. फोनाफोनी चालूच होती. आणि त्याने मला शेवटी सांगितलं ही वॉंटस टू मॅरी मी. जोपर्यंत प्रश्न विचारला नव्हता तोपर्यंत सगळं छान होतं. मुंबईला भेटू तेव्हा सविस्तर ह्याबाबत बोलू असं सांगून मी वेळ टाळली.

खरंच मी लग्नाला तयार आहे का? मला तो आवडला, पण लग्नाच्या जोखडात स्वतःला गुंतवून घ्यायला मी खरंच तयार आहे का? भांडून, झगडून करिअरसाठी मी घराबाहेर पडले. नशिबाचे फासे चांगले पडत गेले, प्रगती झाली. मुंबईत चार वर्षाच्या नोकरीत जेवढा अनुभव नाही आला तो गेल्या सहा महिन्यात मिळाला. उद्याची चिन्ह आशादायक आहेत. दोनंच आठवड्यात मी पुढच्या मोठ्या मुक्कामाला जाईन. तिथे मोठी जबाबदारी, मोठं शिक्षण, मोठा अनुभव. आपण काहीतरी कंस्ट्रक्टीव्ह करत आहोत हे फिलिंग? ते सगळं सोडून देऊ? नाही म्हटलं तरी लग्न म्हटलं म्हणजे नवऱ्याच्या दावणीला बांधून घेणं आलं. नोकरी करू शकेन पण मुंबई सोडू शकेन का? तडजोड करावीच लागेल आणि लग्न झाल्यावर तडजोड करायची जबाबदारी फक्त मुलीच्याच अंगावर पडते ना?

मला खूप मोठं व्हायचंय मग आताच माझ्या पायात मी लग्नाच्या बेड्या अडकवून घेऊ का? बरं त्याला माझ्यासाठी टांगवत ठेवणं मला मान्य नाही. उद्या मी ज्या प्रोजेक्टवर जाणार आहे तिथे किमान दोन वर्ष राहावं लागेल असं सांगितलंय. एवढे दिवस तो थांबेल? माहीत नाही. विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आलेय.

मला वाटायचं की आय ऍम समवन हू कॅन हॅव द केक अँड इट इट टू. बट आय गेस आय कांट.

- संवादिनी

Thursday, September 18, 2008

सिंदबाद, द्रौपदी आणि तिठा

काम नसण्याचा प्रचंड कंटाळा कधी तुम्हाला आलाय? मला सध्या भयंकर कंटाळा येतोय, काहीच करायला नसण्याचा. तसा म्हणायला माझा दिवस इथे साडेचारच्या ठोक्याला सुरू होतो. पहाटेच्या साडेचारच्याच. बरोबर साडेचाराला "थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले" चा गजर सुरू होतो. हे गाणं साधारण दोन ते तीन वेळा ऐकल्यावर मी उठते आणि जो काही वेळ उरला असेल त्या वेळात तयार होऊन आमची स्कूल बस पकडायला धावते. स्कूल बस म्हणजे आम्हाला ऑफिसला नेण्यासाठी कंपनीने दिलेली व्हॅन.

मी इथे फक्त एक महिना आहे. दोन आठवडे झालेत आणि दोन आठवडे अजून आहेत. मला स्टॉप गॅप म्हणून इथे पाठवलं असल्याने मला कुणी काही काम दिलेलंच नाही. मग माझं काम म्हणजे मदतनिसाचं. कुणाला काही मदत हवी असेल तर ती करायची. नको असेल तर लोकसत्ता, म. टा., जीटॉक ह्यांच्या साहाय्याने वेळ काढायचा. पण हे सगळं चालतं साधारण दहा वाजेपर्यंत. साडेदहाला ट्रेनिंग सुरू होतं. आणि माझं सो कॉल्ड कामही.

तुम्ही टी. व्ही वरचे गेम शोज बघत असाल तर तुम्हाला माझा रोल साधारण लक्षात येईल. त्यांनी नाव दिलंय असिस्टंट ट्रेनर. पण जसं टी. व्ही. वर गेम शोजमध्ये मार्क सांगायला, उगाचच हसायला आणि नुसतंच इथे तिथे मिरवायला एक सुंदरी ठेवलेली असते, तसंच काहीसं माझं काम (सुंदर वगैरे नसूनही). म्हणजे असिस्टंट असल्याने मेन ट्रेनर ट्रेनिंग देतो. (मुळात मला येतंय कुठे काही दुसऱ्याला शिकवायला? ). माझं काम ट्रेनिंग मटेरिअल वाटणं, एक्सरसाइज शीटस वाटणं आणि इन जनरल अडल्या नडलेल्याला मदत करणं. तेही सगळं ठीक आहे. पण खरी गोची तर पुढे आहे.

ट्रेनर म्हणून मला स्टेजवर बसायला लागतं. पहिला अर्धा पाऊण तास लोकं लक्ष देऊन ट्रेनिंग घेतात. मग इथे तिथे बघायला लागतात. जांभया देतात. लोकांना जांभया देताना बघून मलाही भरपूर जांभया येतात. पण इतक्या लोकांसमोर आपल्याच कंपनीच्या ट्रेनरच्या ट्रेनिंगमध्ये जांभया तरी कशा देणार?

माझंही ट्रेनिंगमधलं लक्ष उडतं आणि विचारांचं चक्र सुरू होतं. काय म्हणून मी इथे आहे? हेडकाउंड? कंपनीला एका माणसाला असिस्टंट म्हणून बसवलं की पैसे मिळतात म्हणून? इथपासून ते समोर बसलेल्या एखाद्या अरबाने पांढऱ्या च्या ऐवजी पिंक झगा घातला आणि डोक्याला फ्लोरोसंट रिंग घातली तर तो कसा दिसेल इथपर्यंत.

मध्ये एक लंचचा म्हणून ब्रेक असतो. म्हणजे अनॉफिशिअल. रमादान मध्ये इथे बोलायलाही तोंड उघडताना भीती वाटते, खाण्याचं सोडाच. एक पँट्री आम्हा काफरांसाठी उघडी ठेवलेली असते. तिच्यात सगळ्यांनी कोंडून घ्यायचं. दरवाजा घट्ट लावायचा आणि आपापले डबे काढायचे. सख्त ताकीद अशी की जेवणाचा वास येईल असं काहीही आणायचं नाही. म्हणजे पाव आणि त्यात जे जे काही घालता येईल ते. मी भारतातून आणलेले बेसनाचे लाडू अजून संपले नाहीयेत. मी रोज लंचला एक लाडू, एक फळ आणि मेथीचे ठेपले खातेय. मला सॅड्विच खाऊन भयंकर वीट आलाय.

यथावकाश आमचं काम संपतं. साधारण साडेतिनाला आमची स्कूलबस परत येते. घरी नेऊन सोडते. मग संध्याकाळी आम्ही कॉर्निशला फिरायला जातो. कॉर्निश म्हणजे इथला मरीन ड्राइव्ह. मस्त वाटतं. संध्याकाळ झाली की थोडा गारठा पण वाटतो. पण अंधार पडायच्या आत आम्ही घरी येतो. मग तिथे खूपच गर्दी वाढते. म्हणजे उपास सुटल्यावर. घरी आलो की जेवण. ते झालं की मात्र मी माझ्या खोलीत पळते.

घरी फोन करते. बाबा असतोच. कधी विन्या असतो. आईला सध्या खूप काम आहे तिला रोज उशीर होतोय. उशीरा फोन केला तरी ती कधी कधी भेटत नाही. बाबा मला दिवसभरात घडलेलं सगळं सगळं सांगतो. मग मीही सांगत राहते ट्रेनिंगच्या गमती जमती. रमादान ची गंमत. आमच्या बिल्डिंगमध्ये इफ्तार होता त्याला गेलेले त्याची मजा सांगितली. सगळं झाडून खाल्लं. खाल्ल्यावर विचारायचा प्राणी कोणता होता म्हणून. बाबाला सगळं सांगते पण आईला नाही सांगत. तिला उगाच चिंता लागून राहणार मुलीचा धर्म बुडाला म्हणून.

घरचा फोन झाला की त्याला मिस्ड कॉल द्यायचा. मग तो फोन करतो. तो खास उशीरापर्यंत ऑफिसमध्ये थांबतो, कारण फोन फुकट. मग मी आणि तो खूप वेळ बोलत राहतो. बाबाला ऐकवलेली टेप पुन्हा त्याला पूर्ण ऐकायला लागते. तो ऐकायला वाघ आहे. मी कितीही बडबड केली तरी त्याला अजिबात कंटाळा येत नाही. तो फार बोलत नाही. पण नेमकं बोलतो. विचार करायला लावणारं बोलतो. कधी मला गाणं म्हणायचा आग्रह करतो. मीही जास्त आढेवेढे न घेता एखादं छानसं गाणं म्हणते. मग मी त्याला गाणं म्हणण्याचा आग्रह करते आणि तो ऐकतोही. हम दिल दे चुके सनम मधल्या वनराज सारखं थेट. पण मला आवडतं त्याचं गाणं. निदान म्हणतो तरी.

रोज रात्री आयुष्य असं तिठ्यावर येऊन थांबतं. आपण सगळेच असतो कधी ना कधी एखाद्या तिठ्यावर उभे? दोन वाटा समोर दिसत असतात आणि दोन्हीही आकर्षक, हव्या हव्याश्या वाटणाऱ्या. एक वाट सिंदबादची असते. धाडसाने भरलेली, जग दाखवणारी, आव्हानात्मक, स्व जोपासणारी आणि दुसरी वाट असते स्वार्पणाची, स्व विसरायला लावणारी, द्रौपदीची, सीतेची, समर्पणाची. स्व जोपासणं ही जशी माझी गरज आहे तशीच विरघळून जाणं हीदेखील माझी गरज आहे. विचारात झोप विस्कटून जाते आणि पुन्हा "थोडी सागर निळाई" सुरू होते.

मग मी पुन्हा घाईने उठते. उठताना फक्त मनाला एकंच समजावते.

विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू ह्या वळणावर, ह्या वळणावर..

- संवादिनी

Thursday, September 11, 2008

बाप्पा आणि मी

ही गणेश चतुर्थी वेगळीच होती.

....गणेश चतुर्थीच्या आदला दिवस. संध्याकाळची धामधूम आहे. रस्त्यात गर्दी. दुकानं सजलेली. खरेदी चाललेली. आम्ही चौघं मादुस्करांच्या गणपतीच्या कारखान्याच्या समोर उभे आहोत. समोरच्या हातगाडीवर एक गणपतीची मोठी मूर्ती ठेवलेय. समोर काही वाद्य वाजतायत. आम्ही दुकानाच्या समोर उभे. मदुस्करांकडे कधीच बुकिंग करून ठेवलंय. गणपतीची मूर्ती बाबाच्या हातातल्या पाटावर बसते. बाबा पुढे आम्ही तिघं मागे. माझ्या हातात झांजा. बाबा ओरडतो गणपती बाप्पा मोरया....

....थर्माकोलचा ढीग समोर पडलाय. विन्या आमचा लीडर, कारण आईकडून चित्रकला त्याने उचललेय. त्याच्या मनात मखर केव्हाच तयार झालेलं. मी म्हणजे त्याची मदतनीस. हरकाम्या. अगदी जा आईकडून खळ घेऊन ये, ते कागदाची फुलं बनव, थर्माकोल काप, तो मखर जोडत असताना दोन्ही बाजूंनी ते धर, असली फुटकळ कामं करायला. आज त्याचा दिवस आहे, मग मी त्याला उलटून बोलणार तरी कशी? चाळीच्या अंगणात सगळी मुलं गणेशोत्सवाचं मखर बनवतायत. तिथलेही विनोबा हेच. मग मला कामाला लावून तो खाली जातो, त्यांना कामाला लावून वर येतो. मध्येच आई येऊन बघून जाते. तिच्यासमोर मात्र त्याचं काही चालत नाही. ती म्हणाली रंग बदल, आकार बदल काहीही बदल तरी तो मुकाट्याने ऐकतो. बाबा दारावरती माळ लावतोय. त्यातला कुठलासा दिवा लागत नाहीये. तो विन्याला पकडतो आणि बाहेर जाऊन दुसरा बल्ब घेऊन यायला सांगतो. माझं मखर कुठेतरी चुकतं. विन्या संधी मिळाल्यासरशी खेकसतो आणि बाहेर पडतो. गणपती परवावर आणि मखर जस्ट सुरू झालंय. मी पटकन शेजारी जाऊन तयारी बघून येते. त्यांचं मखर पूर्ण. मला टेन्शन....

....गणेश चतुर्थीची संध्याकाळ. मी स्कूटरवर. दुपारचं जेवण सुस्ती आणणारं. मोदकाची चव अजूनही जिभेवर. उकडीचे मोदक. आईने बनवलेले उत्तम, पण आजीच्या हाताची चव काही औरच. सहा साडेसहाला लोक यायला सुरुवात होते, त्याआधी मी आजीकडे पोचते. आजी वाट बघतेच आहे. पटकन समोर देवाला नमस्कार करते. आजीकडची मूर्ती आमच्यापेक्षा थोडी छोटी आहे. पण मादुस्करांचीच आहे. डोळे अगदी आमच्या बप्पांसारखेच आहेत. तेवढ्यात आजी आतून माझ्यासाठी केलेले मोदक गरम करून आणून देते. मामी आतून तूप घेऊन येते. मोदकाची शेंडी मी फोडते, आतमध्ये तूप पडतं. मोदक पोटात जातो. कितीही पोट भरलं असलं तरी आजीच्या मोदकाला मी नाही म्हणूच शकत नाही. मोदक संपतात न संपतात तर आजी निवगऱ्या घेऊन येते. गोड मोदक आणि तिखट निवगऱ्या ह्यांचं काँबिनेशन भलतंच सही.....

....गणपतीच्या दुसऱ्या दिवसाची सकाळ. तानपुरा सुरात लागलाय. तोडीचे आलाप असे काही जमून जातात की देवालाच माहीत. घरातलं ते वातावरण, धुपाचा वास, कापराचा वास, समोर बसलेली गणपतीची मूर्ती, सगळं सगळं खोल आतून कुठूनतरी सुरांची निर्मिती करतं. अगदी उचंबळून आल्यासारखे आलाप येतात. सरसरून ताना येतात आणि डोळे पाणावतात. साक्षात गुरुचं गाणं असं विद्येच्या देवतेच्या समोर ऐकणं ह्यापेक्षा सुंदर काय असू शकेल. खरंतर मीही गाणं म्हटलेलं असतं. पण ह्या अनुभवाची तुलना त्या अनुभवाशी होणंसुद्धा शक्य नसतं. मी फक्त स्तंभित होऊन अनुभवत राहते.....

.... गणेश चतुर्थीची सकाळ. बाबाने सोवळं नेसलेलं आईने सोवळ्याची साडी, नाकात नथ. मी आईचीच पण माझी आवडती साडी नेसलेली. नुकतीच पूजा होऊन गेलेली. अचानक खालून लेझिमचा आवाज येतो. मी पळत गॅलेरीत जाते. चाळीचा गणपती गेटपाशी पोचलेला. त्याच्यापुढे तीसेक मुलं मुली लेझीम खेळत. बाळ काकांच्या गाडीवर पुढे दोघंजणं बसलेले आणि त्यांच्या मध्ये गणपती. गणपती समोर दोन दोनच्या पंधरा जोड्या. सगळ्यात पुढे दोन्ही लाईनींच्या मध्ये, श्रीपाद शिटी वाजवत ताल देताना. आणि त्याच्याही पुढे अण्णा आणि राजा. अण्णांच्या हातात मोठा डफ आणि राजादादाच्या हातात तो वाजवायच्या काड्या. गाडीच्या मागेच लेझीम न खेळणारी इतर लोकं चालत येताना. त्यात एक अनोळखी पण ओळखीचा चेहरा. कुणाचातरी कुणीतरी. कधीतरी चाळीत येणारा. लंबा चौडा, गोरापान. शोभणारा कुर्ता पायजमा, धारदार नाक आणि मध्येच गॅलेरीकडे चोरून वळणारी नजर...

... आम्ही सगळे गाडीतून उतरतो. गाडी मी चालवतेय कारण बाप्पा बाबाच्या हातात. मामा आमची वाट बघत गॅलेरीत उभा. आम्हाला बघताच, तो आत जातो, त्यांच्या बाप्पाला उचलतो आणि घराबाहेर पडतो. आमचे गणपती एकत्रच जातात. दीड दिवसाच्या गणपतींची तुरळक गर्दी असते. पुढल्या वर्षी लवकर या. मोरया मोरया. भजनं म्हटली जातात, टाळ वाजत राहता. पावलं चालत राहतात. चौपाटीचा फिरत्या पायऱ्यांचा ब्रिज दिसला की पोटात कालवाकालव होते. तसेच आम्ही चौपाटीला पोचतो. दोन्ही बाप्पांना वाळूवर ठेवलं जातं. समोर एक खड्डा खणून त्यात कापूर घातला जातो. शेवटची आरती होते. प्रसाद वाटला जातो. मग गंभीर आवाजात बाबा देवाला पुन्हा लवकर यायचं आमंत्रण देतो. सगळं जग विसरायला होतं आणि गळ्यात एक आवंढा दाटून येतो. गणपती विसर्जन करून देणारी पोरं पुढे होतात. घासाघीस करायला लागतात. बाबा आणि मामा गणपती घेऊन समुद्राकडे निघतात. आतापर्यंत जातात. लांबवर मूर्ती दोनदा पाण्यात बुडवून बाहेर काढतात, तिसऱ्या वेळी नुसताच पाट बाहेर येतो. पाण्यात बुडी मारून बाबा गणपतीची म्हणून खालची वाळू उचलतो. पाटावर ठेवून परत येतो. तो पाट बघवत नाही. दर वर्षी गणपती जाताना असंच होतं. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावतात. ती संध्याकाळ एकदम भकास होऊन जाते....

पुन्हा पुन्हा ही चित्र डोळ्यासमोर येत राहतायत. माझ्या उण्या पुऱ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यात एकदाही गणपती हुकला नाही. पण ह्यावर्षी मी घरी नाही. घाबरत घाबरतंच माझ्याबरोबर आणलेली बाप्पांची छोटी मूर्ती आहे. तिची पूजा केली. बाहेर रमादान म्हणून उपास चाललेले. ऑफिस होतंच. मोदक काय, काहीही खायचं असेल तरी क्लायंटने उपकार म्हणून दिलेल्या एका खोलीत जाऊन खायचं. तीन दिवस मन सैरभैर झालं. पण सांगायचं कुणाला? बाप्पाच्या मूर्तीलाच ना?

खरंच ही गणेश चतुर्थी वेगळीच होती.

- संवादिनी