Friday, December 2, 2011

देवयानी (34)

सरतेशेवटी ...

माझ्या मनातली जी सल होती, बोच होती, ती मी इथे उतरवण्याचा प्रयत्न केला. वाचताना कदाचित माझी दयाही आली असेल काही जणांना. पण हा एक आयुष्याचा दुखरा कोपरा आहे. सगळं आयुष्यच दुःखी आहे असं नव्हे. विशेषतः माझ्या कामाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत मी अतिशय समाधानी आहे. मी आणि माझे मित्र मैत्रिणी आमच्या बिझी शेड्यूल्स मधून वेळ काढून भेटत असतो, मजा करीत असतो. आयुष्य अगदीच टाकाऊ आहे असं नाही. आपण नेहमी आपली दुःखच उगाळत राहतो आणि सुखांसाठी देवाचे आभार मानायचे राहून जातात तसंच काहीसं हा ब्लॉग लिहिताना झालं माझं.

लिहिताना सुरुवात काही वेगळंच डोक्यात ठेवून केली होती. लिहिण्याचा ओघात एकेक घडी उलगडत गेली. काही गोष्टींकडे मागे वळून बघताना तटस्थपणे पाहता आलं. त्या क्षणी मला त्या व्यक्तीचा आलेला राग किती अवाजवी होता हे बऱ्याच वेळा जाणवलं. अनेकदा लिहायचा कंटाळा आला. वाचायचाही नक्की आला असेल, पण अनेकदा अगदी मध्यरात्रीपण मी काही पोस्टस लिहिले. तेव्हा लिहायचंच होतं असं झालं.

शमाने मला इथे लिहायची परवानगी दिली म्हणून तिचे खूप खूप थँक्स. माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर एवढ्या लोकांनी मी लिहिलेलं वाचलं नसतं आणि दुसरं म्हणजे तिने ज्या पद्धतीने लिहिलं त्याच्याशी सुसंगत काहीशीच ही संकल्पना होती. आता तिनं पुन्हा एकदा लिहायला सुरवात करावी आय ऍम डाइंग टू रीड यू शमा.

आणि सर्व वाचकांचे, आणि मुद्दाम कमेंट लिहून कळवणाऱ्यांचे खूप खूप आभार. तुमच्या प्रोत्साहनानेच मला इतकं लिहितं केलं. चैतीस पोस्ट एवढ्या पटापट नाहीतर मी उभ्या जन्मात लिहिले नसते.

माय लास्ट वर्डस ऑन धिस ब्लॉग?

आय विल मिस यू ऑल. :)

- देवयानी

Monday, November 28, 2011

देवयानी (33)

नोकरी बदलली. पण ती करणारी तर मीच होते ना? जे प्रॉब्लेम्स आधी होते ते ही नोकरी सुरू झाल्यावरही तसेच आहेत. अर्थात लग्न वगैरे करण्याचा विचारच मी आता सोडून दिलेला आहे. जेवढं काही माझ्या वाट्याला त्याबाबतीत यायचं होतं तेवढं भल्या बुऱ्या मार्गाने मला मिळालेलं आहे. मै और मेरी तनहाई, आम्हा दोघींचीच जोडी कायम राहणार बहुतेक असं मी गमतीनं बऱ्याचदा म्हणते. आणि तेच खरं होणार आहे. असं लिहिताना मनाला थोडंसं बोचतं. पण पुन्हा विषाची परीक्षा घेण्यापेक्षा ही कधीमधी मनाला लागणारी बोच परवडली.

आई आहे तोपर्यंत आई आणि तिच्यानंतर मी एकटी असं मी माझं आयुष्य काढणार आहे. नशिबाने चांगली नोकरी असल्याने वेळ बरा जातो. दिवसा जगाशी लढाई करून रात्री एकटीच मी माझ्या आरामखुर्चीत वाइनचे घोट घेत बसते तेव्हा जीव कसनुसा होतो. नाही असं नाही. पण त्यावर आता काही उपाय नाही. आई होण्याची तीव्र इच्छा मात्र मनात अजूनही आहे. पण हे सगळं आत्याला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं ह्या धाटणीचं आहे.

कुमारी मातांचा प्रश्न कधी मधी पुरवण्यांतून चघळला जातोच. कधी वाटतं आपणही असं काहीतरी करावं. डोनर स्पर्म घेऊन आपलं स्वतःचं मूल जन्माला घालावं आणि मग त्याला किंवा तिला वाढवावं. पण हल्ली ना, माझी कुणाशी भांडण्याची ताकत आणि इच्छा दोन्हीही खूप कमी झालेय. समाजाशी मी गेली अनेक वर्ष भांडतेय. अजून किती भांडू? मग वाटतं नकोच तसलं काही धाडसी. त्यापेक्षा आपण बरं आपली आरामखुर्ची बरी. आई स्वयंपाक करते मी पैसे कमावते आमच्या दोघींचं बरं चाललंय.

पण मध्ये एक सुंदर घटना घडली. एका कॉर्पोरेट फंक्शनला सिंधूताई सकपाळ ह्यांना पाहण्याचा, ऐकण्याचा योग आला. मला मोठी मजा वाटली. सगळी त्यांची मुलंच. आणि त्या सगळ्यांच्या आई. आई होण्यासाठी मूल जन्माला घालण्याची काय गरज आहे? हा एक वेगळाच विचार मनात आला. अर्थात स्वतःचं मूल होणं ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी तो उपाय नव्हे. पण माझ्यासारखी बाई जिला आई व्हायचंय पण होऊ शकत नाही तिनं हा पर्याय का स्वीकारू नये? त्या क्षणी वाटलं की सोडून द्यावं आपलं हे जग आणि जावं त्यांच्याबरोबर आणि एक आई म्हणून काढावं उरलेलं आयुष्य. किती उदात विचार आहे हा नाही का?

पण सर्वसामान्य माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे. आपण ते एक पाऊल उचलू शकत नाही. मला माहितेय की मी खरंच त्या आश्रमात गेले तर मला माझ्या आयुष्यात खूप आनंद मिळेल, पण मला खूप आनंदाबरोबर माझी आरामखुर्चीही हवी आहे. हातात उंची वाइनचा ग्लासही हवा आहे. एसी गाडीही हवी आहे आणि इतर सर्व सुखसोयीही हव्या आहेत. ते कसं काय जमायचं? नुसतं समाजकार्यच नाही, पण उद्या मी खरंच मूल दत्तक घ्यायचं ठरवलं तरी त्या मुलाला किंवा मुलीला पूर्ण न्याय मी देऊ शकणार आहे का हे मला ठरवावं लागेल. त्यासाठी लागणार वेळेची कमिटमेंट मला द्यावी लागेल.

पण ही एक संधी आहे, आयुष्याला एक दिशा देण्याची आणि ती मी सहजासहजी दवडणार नाही. माझ्या प्रोफेशनल आयुष्यात दैवाने मला भरभरून दिलं, नाऊ इटस हाय टाइम आय गेट माय शेअर इन माय पर्सनल लाईफ. अजून काही अपेक्षा नाहीतच.

- देवयानी

Friday, November 18, 2011

देवयानी (32)

तो गेला तसा माझ्या डोळ्यातून एक अश्रू निसटलाच. गालावर ओघळला. तो शँपेनचे ग्लास भरून आला. मी रडतेय हे त्याला कळलं पण ते त्याला कळलं हे मला कळलं नाही. दिवसभर कामाच्या गडबडीत मी अप्सेट आहे हे त्याच्या लक्षात आलं नसावं किंवा माझ्यावरच प्रेझेंटेशनचं एवढं प्रेशर होतं की त्या ओझ्याखाली डोळ्यातनं एखादा अश्रूही मी बाहेर पडू दिला नव्हता. मला एकटीला माझ्या रूमच्या चार भिंतीत जे करायचं होतं ते आता नकळत प्रीतमच्या समोर झालं.

तो माझ्या शेजारी येऊन बसला तेही मला समजलं नाही. त्याने खांदे हालवून मला जागं केलं मी त्याच्याकडे पाहिलं नि माझा बांध फुटला. पुढची कित्येक मिनिटं मी नुसती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होते. पहिला भर ओसरल्यावर त्याने मला विचारलं की काय झालं. मी त्याला सकाळच्या मनीषच्या फोनबद्दल सांगितलं. त्याने लग्न करायला नकार दिला होता. का? तर मी अनुरागबरोबर शरीरसंबंध ठेवले होते म्हणून. अर्थात त्याचं काही चुकलं असं मला अजिबात वाटत नाही. आजही. चूक माझी होती. मी त्याला आधीच हे सगळं सांगायला हवं होतं. मी साखरपुडा झाल्यावर त्याला सांगितलं. त्याला ते पटणं न पटणं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न होता. त्यामुळे त्याचं नाहीच चुकलं. माझंच चुकलं.

आधी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा वर्तुळ पूर्ण करून मी जिथून सुरुवात केली तिथे पोचले. दैवाने मला इतका दगा इतक्या सातत्याने का द्यावा? मीच का? बाकी जग सुखी असताना माझ्या एकटीच्याच बाबतीत हे पुन्हा पुन्हा का व्हावं ह्या विचाराने डोकं बधिर झालं. मला पार्टनर हवा होता, मला सेटल व्हायचं होतं, मला मूल हवं होतं. आता काहीही मिळणार नव्हतं. पुन्हा एक लढाई, विजयाचा घास तोंडात पडतोय असं वाटत असताना पुन्हा जिव्हारी लागणारा पराभव, पुन्हा तेच जीव लावण्याच्या जागा शोधणं, जीव लावणं आणि मन मोडणं. मीच का?

ह्या वेळी मी दैवासमोर हरणार नव्हते. मला हवं ते सुख मला ओरबाडून घ्यायचं होतं. प्रीतमच्या खांद्यावरून मी माझी मान उचलली आणि ओठ त्याच्या ओठावर टेकले. मला हे सगळं सगळं विसरून जायचं होतं. मला हरायचं नव्हतं. एकदा तरी मला जिंकायचं होतं आणि मी जिंकले होते. अफूची गोळी घ्यावी तसं माझं दुःख मी रात्रभर का होईना विसरले. सकाळी उठले तेच डिप्रेशन मध्ये, काल मूर्खासारखं मी काय करून बसले होते? ऑफ ऑल द पीपल प्रीतम? मला राहून राहून मिषूचा आणि त्याच्या मुलीचा चेहरा आठवत होता. मी त्यांची केवढी मोठी गुन्हेगार होते. मला सुख मिळत नाही म्हणून मी दुसऱ्याचं ओरबाडून घेतलं होतं. इतकी नीच मी कशी झाले?

असो, त्या चुकीबद्दल मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कधीच म्हणजे कधीच नाही. मराठीत एक म्हण आहे कळतं पण वळत नाही. तसं माझं झालं होतं. आणि ही चूक मी एकदा नाही तर अनेकदा निलाजरेपणे केली. मिषू माझी मैत्रीण आहे आणि माझी तिच्याप्रती काही जबाबदारी आहे हे मी मनाशी घोकत राहायचे. झालं गेलं गंगेला मिळालं पण पुन्हा ही चूक करता कामा नये असं दिवस रात्र स्वतःला समजावर राहायचे, पण प्रीतम जवळ आला की हे सगळे बंध गळून पडायचे मी फक्त त्या ऍनिमल इन्स्टिंक्टला शरण जायचे. अफूची गोळी. त्यातून मनाला आणि शरीराला मिळणारी एक प्रचंड हाय आणि तिचा अंमल उतरल्यावर येणारं डिप्रेशन ह्या चक्रातून मी दिवसेंदिवस फिरत होते.

ह्या सगळ्याचा माझ्या शरीरावर परिणाम व्हायला लागला. वजन खूप कमी झालं, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आली. मेकअपचे थर वाढले. डॉक्टरी इलाजांनीही काही सुधारणा झाली नाही. शेवटी मला एका मानसोपचारतज्ज्ञाकडे जायला लागलं. ती खूप छान आहे. तिने मला बोलतं केलं. हे सगळं जे माझ्या मनात कोंडून राहिलेलं होतं ते मोकळं झालं. अक्षरशः ठणकणारं गळू फुटलं की कसं बरं वाटतं तसं मला वाटलं. तिच्या मदतीने माझी गाडी हळू हळू पूर्वपदावर आली. प्रीतमशी संबंध पूर्णपणे तोडून टाकण्यापर्यत माझं मनोधैर्य वाढलं. अर्थात मी त्याच्याशी अजिबात न बोलणं शक्य नाही कारण त्याच्याशी नाही तरी मिषूशी मला आठवड्यातून किमान एकदातरी बोलावंच लागतं.

त्याच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून मी पुन्हा मार्केटिंगमधून डिलिव्हरी मध्ये आले. अगदी कुणाला आवडत नाही ती अर्ली मॉर्निंग शिफ्ट घेतली. चारच्या ठोकायला काम सुरू करायचं आणि दुपारी एक वाजता ऑफिस सोडायचं. पुन्हा आयुष्यात अशी चूक करण्यासाठी रात्रीच ठेवायच्या नाहीत असं मी ठरवलं. सगळ्या रात्री सकाळी लवकर उठण्याच्या चिंतेत जाळून टाकल्या. झोंबीसारखं आयुष्य जगले. जगापासून स्वतःला तोडून घेतलं आणि आपल्याच पाशात गुरफटत राहिले.

काळ हाच सर्वांवरचा एकमेव इलाज आहे. इथे ह्या ब्लॉगवर लिहायला सुरुवात केल्यानंतर मी विंफो सोडली. दुसऱ्या एका कंपनीत महत्त्वाची पोस्ट मला मिळाली. प्रीतम दूर जाणार होता, आवडीचं काम करायला मिळणार होतं. आयुष्यातला एक चॅप्टर बंद होणार होता.

- देवयानी

देवयानी (31)

आधी ठरल्याप्रमाणे बरोबर मी आणि प्रीतम सिंगापूरला पोचलो. दुसऱ्याच दिवशी ऑफिसात जाऊन आमच्या टीममधल्या सिंगापूरच्या ऑफिसमधल्या तीन टीम मेंबर्सची मीटिंग घेतली. आणि प्रेझेंटेशनच्या वेळची स्ट्रॅटेजी ठरवली. प्रेसेंटेशनचे तीन भाग केले. सुरवातीचा भाग त्या तिघांपैकी एकावर सोपवला. मधला भाग माझा. जिथे सर्वात जास्त ऑडिअन्स झोन आऊट होण्याची शक्यता होती आणि तिसरा कमर्शिअल्स डिस्कस करणारा भार प्रीतम करणार होता.

कामाची वाटणी झाल्यावर आम्ही आपापल्या तयारीला लागलो. हे प्रेसेंटेशन देणं म्हणजे एखादा स्टेज शो करण्याच्या बरोबरीचं काम आहे. निदान माझ्या साठी तरी. मी माझं स्क्रिप्ट पूर्ण लिहून घेते, पाठ करते आणि तसंच्या तसं म्हणते. पाठ करून म्हणणं सोपं आहे, पण तुम्ही ते पाठ केलंय हे लोकांना कळू न देणं आणि ते एकदम उत्स्फूर्त असल्याचं भासवणं कठीण आहे. तसंच सगळं स्क्रिप्ट प्रमाणे होतं असं नाही. गाडी कधी कधी रुळावरून घसरते. ती पुन्हा रुळावर आणावी लागते. कोणताही भाग कंटाळवाणा होणार नाही हे पाहावं लागतं. ऍट द सेम टाइम बोलणं फार उथळ वाटणार नाही ह्याचीही काळजी घ्यायला लागते. समोर मोठमोठी लोकं बसलेली असतात, त्यांचे इगोज, त्या कंपनीचं इंटर्नल पॉलिटिक्स ह्या सगळ्याचा विचार करूनच एकेक शब्द बोलावा लागतो.

त्या दिवशी खूप उशीरापर्यंत मी हे सगळं करत राहिले. प्रीतम शेवटी मला बळजबरीनंच हॉटेलवर घेऊन गेला. दिवसभर मला एकदाही मनीषची आठवण आली नव्हती. रात्री बिछान्यावर पडल्यावर मात्र अचानक त्याचं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व जाणवलं. त्याच्याबरोबर मला जे काही तास घालवायला मिळाले होते त्याची उजळणी करण्यातच समाधान मानायचं होतं. त्याची वेळ ते भारताची वेळ आणि भारताची वेळ ते सिंगापूरची वेळ अशी गणितं मांडत तो पोचला असेल का ह्याचा अंदाज बांधत बसले. पोचला तर नक्कीच होता पण त्याचा फोन आला नाही. तो फोन करणार होता, पण आला नाही. पोचला ना व्यवस्थित?

पुन्हा पुन्हा माझा भारतातला फोन काढून टेक्स्ट मेसेज आलाय का ते पाहिलं. आता मात्र मला काळजी वाटायला लागली. कॉम्प्युटर सुरू केला. त्याचे फ्लाईट डिटेल्स माझ्याकडे होते. फ्लाईट स्टेटस चेक केलं तर फ्लाईट बरोबर लँड झालं होतं. पण मग असं वाटलं की पोचल्या पोचल्या लगेच तो फोन कसा करणार होता? मग त्याची रात्र झाली आणि त्याच्याइथे आता उजाडलं तर माझी रात्र झालेली, त्यामुळे बहुतेक नसेल केला फोन. उद्या तसाही महत्त्वाचा दिवस होता. सकाळपासून मला अजिबात वेळ मिळणार नव्हता. फोन आला असता तरीही मला तो घेता येणार नव्हता, म्हणजे थोडक्यात अजून दोन दिवस बोलणं होणार नव्हतं. पण मेल तरी करायचा ना एक. विचारांच्या चक्रात गुरफटून कधी झोप लागली ते कळलंच नाही.

महत्त्वाची मीटिंग किंवा प्रेझेंटेशन असेल तेव्हा मला रात्रभर अर्धवट झोप येते सतत कामाचं काहीतरी डोळ्यासमोर दिसत राहत. त्या रात्रीही तसंच चाललं होतं. अचानक फोन वाजला. फोन वाजतोय हे कळायला थोडा वेळ गेला. डोळे किलकिले करून फोन उचलला मनीषचा होता. सकाळचे पाच वाजलेले होते. त्याही अर्धवट झोपेत बहुतेक माझ्या चेहऱ्यावर हासू फुललं असणार. आम्ही बोललो, तो जास्त बोलला, मी ऐकत होते. मी फोन ठेवला आणि बाहेरून गडगटाचा मोठा आवाज झाला. तो दिवसच असा होता. खिडकीचा पडदा सारून बाहेर पाहिलं तर पाऊस कोसळत होता.

मी अगदी यंत्रवत तयार झाले. वेळेवर प्रीतमचा फोन आला. मी बरीचशी डिसओरिएंटेड होते. पण जे बोलणं चाललं होतं त्यात एका दुसऱ्याच लेव्हलला मी इन्व्हॉल्व्हही होते. हे असं दोन वेगळ्या लेव्हल्सना दोन वेगळे विचार तेवढ्याच तीव्रतेने मनात येणं खूप धोकादायक होतं. पण मला गत्यंतर नव्हतं. अगदी यंत्रासारखी मी प्रीतमबरोबर तिथं गेले. आमची टीम मीटिंग झाली, सगळ्यांची पुन्हा एकदा उजळणी झाली. माझं काम महत्त्वाचं होतं. हो किंवा नाही ह्यातलं अंतर माझ्या प्रेझेंटेशनने ठरणार होतं. ह्या वर्षीची टार्गेट्स, माझी, प्रीतमची आणि त्या तिघांचीही माझ्यावर अवलंबून होती. एक चूक आणि सगळं पाण्यात जाऊ शकलं असतं. मला एकदम भडभडून आलं. काय झालं माझं मलाच समजलं नाही, पण जे काही होत होतं ते मी तसंच आत खोल दाबून ठेवलं. अगदी नेहमीसारखी बोलत राहिले.

प्रेझेंटेशनची वेळ झाली. सुरवात झाली बॅटन माझ्याकडे आलं. मी पाठ केलेलं तसं बोलले. काय बोलले, कसं बोलले हे तेव्हा मला काही समजलं नाही. ट्रान्स हा शब्द योग्य आहे. सगळा वेळ मी ट्रान्स मध्ये होते. मध्ये कुणी काय प्रश्न विचारले? मी काय उत्तरं दिली मला काही काही आठवत नाही. माझ्यानंतर प्रीतमचं प्रेझेंटेशन झालं आणि प्रपोसलचे फायनलिस्ट जाहीर झाले. आमचं नाव त्यात होतं. आता खरी मजा सुरू होणार होती. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं. संध्याकाळी आम्ही पाचही जणं सेलेब्रेट करायला म्हणून पब मध्ये गेलो. तिथेही काय झालं मला काहीही कळलं नाही. जे समोर येत होतं ते मी खात होते, पीत होते, बोलतही होते. पण मन मात्र वेगळ्याच विश्वात होतं.

तासा दीड तासाने आमचे सिंगापुरमधले कलीग होते ते घरी जायला निघाले. आम्हाला हॉटेलवर ड्रॉप करून ते गेलेसुद्धा. त्या क्षणी मला कधी एकदा माझ्या रूममध्ये जाऊन एकटी होतेय, ह्या जगापासून वेगळी होतेय असं झालेलं होतं. माझी आणि प्रीतमची रूम बाजू बाजूलाच होती. मला माझ्या दरवाज्यापाशी सोडून तो पुढे जाणार इतक्यात तो मला म्हणाला की चल जरा अजून थोडा वेळ गप्पा मारू. लेटस हॅव्ह सम शँपेन. मला खरंतर नको असं जोरात ओरडून सांगावंसं वाटत होतं पण मी हो म्हणाले. त्याच्या मागोमाग त्याच्या रूममध्ये शिरले. सोफ्यावर बसले. प्रीतम बार फ्रीजकडे गेला

- देवयानी

Tuesday, November 15, 2011

देवयानी (30)

हे सगळं सोपं होतं. म्हणजे मी मला स्वतःला समजावणं की टाइम इज रनिंग आऊट. पण लग्न करण्यात एक मोठी अडचण होती. ती म्हणजे मला आवडेल आणि आयुष्य सोबत घालवावंस वाटेल असा नवरा मिळणं. कळत नकळत मी गेली काही वर्ष तो लाईफ पार्टनर शोधत होतेच. पण नाही मिळाला. आता कसा मिळणार होता? शेवटी मी मॅट्रिमोनिअल साईटवर नाव नोंदवलं. तेव्हा हा प्रकार तसा अनोळखी होता. हल्ली सर्रास मुलं मुली ह्या साईट्स वापरात. पण दुसरा काही उपाय नव्हता. म्हणून शेवटी प्रोफाइल तयार केली.

मला अगदी आपण नोकरीसाठी कसा बायो डेटा बनवतो त्याचीच आठवण झाली. हळू हळू काही मुलं ऍप्रोच व्हायला लागली. पण हे सगळं विचित्र होतं. म्हणजे मुलाला आपण स्वतःचा नंबर द्यावा तर मुलगी आगाऊ आहे असं मूलगावाले म्हणणार. जर आईचा दिला तर आईचे जातिधर्माचे क्रायटेरिआ आड येणार. अर्थात ते शेवटी आड येणार होतेच. माझी माझ्या नवऱ्याकडून असलेली अपेक्षा आणि माझ्या आईच्या माझ्या नवऱ्याकडून असलेल्या अपेक्षा ह्यांचा लघुतम सामाईक विभाजक शून्य होता (एकही नाही) त्यामुळे असा मुलगा कधी मला मिळेल आणि माझं लग्न जमेल अशी पुसटशीही आशा मला नव्हती.

पण कधी कधी अशक्य वाटणाऱ्या घटना पटकन घडून जातात. अमेरिकेत बरीच वर्ष शिकलेला, स्थिर स्थावर झालेला, आणि आता लग्नासाठी मुली शोधणारा, वयाने माझ्या वाढलेल्या वयापेक्षाही वाढलेला, दिसायला सुंदर, वाटायला सुशील, सुसंस्कारित आणि पंधरा दिवसासाठीच भारतात येणारा, आई वडिलांनी शॉर्टलिस्ट केलेल्या वीस मुलींना दिवसाला पाच ह्या रेटनी चार दिवसात बघणारा, त्यातला पाच मुलींची पाचव्या दिवशी सेकंड राउंड घेणारा आणि त्यातल्या दोन मुलींची सहाव्या दिवशी थर्ड राउंड घेऊन आठवड्याच्या आत मुलगी पसंत करणारा आणि पुढच्या आठवड्याच्या आत साखरपुडा करून अमेरिकेला पुन्हा जायची घाई असलेला मनीष मला भेटला.

त्याच्या वीसाच्या पाच, पाचाच्या तीन आणि तिनातली एक इतका माझा प्रवास झाला आणि पुढच्या तीन दिवसात साखरपुडाही झाला. आयुष्याचा इतका मोठा निर्णय मी मनीषबरोबर जवळ जवळ दोन तास वीस मिनिटं घालवून घेतला. अर्थात त्यात चुकण्यासारखं काहीही नव्हतं. मनीष जेन्युइनली साधा होता. प्रचंड शिकलेला होता. बराच पगार मिळवणाऱ्या बायकोला अजिबात गर्व होऊ न देण्याइतका दणदणीत पगार त्याला होता. तसंही मी अमेरिकेला गेल्यावर काम करू शकणार नव्हतेच त्यामुळे पगाराचा प्रश्न नव्हताच. पण एकंदरीत नाव ठेवण्यासारखं काही नव्हतं. वर आमची जात, पोटजात सारखी होती, गोत्र वेगवेगळी होती, पत्रिका जुळत होती. ग्रहताऱ्यांना आमची युती एकदम मान्य होती. आईला मान्य होती. आणि नाही म्हणण्यासारखं मला त्यात काही वाटलं नाही.

साखरपुडा झाला. चार दिवसांनी मनीष अमेरिकेला परत जायचा होता. मलाही पुढच्या आठवड्या ऑफिसच्या कामासाठी सिंगापुराला जायचं होतं. शक्य होईल तेवढा वेळ आम्ही एकत्र घालवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तो पुण्याचा आणि मी मुंबईची त्यामुळे अजून प्रॉब्लेम्स. मला एकच गोष्ट मनातून खात होती. त्याला अनुराग बद्धल मी काहीही सांगितलं नव्हतं. अनुराग जरी माझ्या आयुष्यातून मुळासकट मी उखडून टाकला होता तरी त्याच्याबरोबर घालवलेल्या दिवसांची भुतं मला सहजासहजी सोडणार नव्हती.अनुरागबरोबर जे झालं ते मनीषला न सांगता लपवून ठेवणं मला चुकीचं वाटत होतं.

मनीष अमेरिकेला गेला त्या दिवशी आम्ही मुंबईत तो अमेरिकेला जाण्याआधी शेवटचं भेटलो. ताज महाल पॅलेसमध्ये सी लाउंज म्हणून एक सुंदर रेस्टॉरंट आहे. तिकडे मी त्याला घेऊन गेले होते. चाचपडत, अडखळत शेवटी मी त्याला अनुरागबरोबर जे झालं ते सगळं सांगितलं. अख्खा वेळ मी त्याची रिऍक्शन बघत होते. तो अजिबात चिडला, रागावला नाही. शांतपणे त्याने ऐकून घेतलं. ठीक आहे, एवढं फक्त म्हणाला. मनावरचा ताण एकदम उतरला. पुढचा वेळ माझ्यासाठी छान गेला. मी त्याला एअरपोर्टवर सोडायलाही गेले. त्याचे पुढचे दोन दिवस प्रवासात जाणार होते. मी ही दोन दिवसांनी सिंगापुराला जाणार होते, त्यामुळे त्यानेच मला शक्य होईल तेव्हा माझ्या मोबाईलवर फोन करायचं ठरलं.

तो गेला. पुढचे दोन दिवसही फुलपाखरासारखे उडून गेले. सिंगापुराला आमचं एक अतिशय महत्त्वाचं प्रपोसल होतं. तिथले तीन लोक ह्या प्रपोसलवर काम करीत होते. मी आणि प्रीतम इथून जाणार होतो. आमच्या टार्गेट्स च्या दृष्टीने जीवन मरणाची लढाई होती. त्यात माझाही मूड एकदम मस्त काम करण्याचा होता. कधी नव्हे ते मला काहीतरी टँजिबल फ्युचर दिसत होतं. खूप छान होते ते दिवस.

- देवयानी

देवयानी (29)

कामाचा धडाका लागला होता. खूप ट्रॅव्हलिंग चाललं होतं. बट आय वॉज एंजॉयिंग. एकतर माझ्याबरोबर नेहमी प्रीतम असायचा. टु बी फेअर, त्याच्यासोबत मी असायचे. कारण त्याचं तिथे असणं जास्त महत्त्वाचं होतं. तो बॉस होता आणि मी त्याच्या हाताखाली काम करीत होते. पण असं फॉर्मल रिलेशन आमच्यात कधी निर्माण झालंच नाही. कारण एकत्र काम करण्याआधी आम्ही चांगले मित्र होतो. अर्थातच आम्ही जास्त वेळ एकमेकांसोबत घालवत असू. आता ऑफिसमध्ये ह्याची चर्चा सुरू झाली. प्रीतम आणि देवयानीचं काहीतरी लफडं चाललंय.

अशा गोष्टींची मला सवय होती आणि अजूनही आहे. मुळात बाई प्रगती करतेय हेच बऱ्याच जणांना खुपतं. बाईकडून हरलेलं नाही चालत अजूनही पुरुषाला. मग कंपनीमधलं इंटर्नल पॉलिटिक्स चालू होतं. चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात, ऐकल्या जातात आणि त्यावर विश्वासही ठेवला जातो. हे फक्त बायकांच्या बाबतीत होतं असं नाही. हे सर्वांच्याच बाबतीत होतं, पण मुलींच्या, विशेषतः अविवाहित, वय उलटून चाललेल्या आणि यशस्वी मुलींच्या बाबतीत हे सर्व करण्यासाठी एक सोपा विषय उपलब्ध आहे. तो म्हणजे लफडं. थोडं थोडं माझ्या कानावर आलेलं होतं. पण मी कधीच अशा गोष्टी सीरियसली घेतल्या नाहीत.

प्रीतमला काय वाटेल हे मात्र राहून राहून माझ्या मनात यायचं. उगाच माझ्यामुळे मिषू आणि त्याच्यात वाद व्हायला नकोत. शिवाय मिषूही माझी मैत्रीणच होती. पण ह्या गोष्टी बोलायच्या तरी कशा? पण उगाचच मन खात राही. शेवटी एकदा मी हिय्या करून मिषूला जाऊन भेटले. तिला सांगितलं की असं काही कंपनीमध्ये चाललंय. तुझ्या कानावर काही आलं तर प्लीज विश्वास ठेवू नकोस. असं काही नाहीये. मी तिला हे सांगितल्यावर ती खो खो हसायला लागली. कारण तिला प्रीतमने सगळंच अगोदर सांगितलेलं होतं.

मनावरचं दडपण दूर झालं पण तरीदेखील आमच्या वागण्या बोलण्यातला मोकळे ढाकळेपणा बऱ्यापैकी कमी झाला. एकतर कुणालाही काहीही बोलायची संधी द्यायची नव्हती आणि दुसरं म्हणजे राईचा पर्वत करणारी जमात आमच्या कंपनीत मुबलक होती अजूनही आहे. त्यामुळे काय अफवा पसरतील ह्याची काही गॅरेंटी नव्हती.

घरी आईची भुणभूण चालूच होती. लग्न कर लग्न कर. मलाही मनातून आतून वाटत होतं की आता बस ही धावपळ, दगदग. चांगला जोडीदार निवडावा, लग्न करावं आणि सेटल व्हावं. एक स्त्री म्हणून आयुष्यात पुरुष असणं जरूरीचं वाटत होतंच, पण अलीकडे, म्हणजे जशी माझ्या मैत्रिणींची मुलं मोठी व्हायला लागली, तशी आपल्यालाही एक मूल असावं ही इच्छा प्रबळ व्हायला लागली. त्यासाठीचा एकमेव राजमार्ग म्हणजे लग्न करणे. शिवाय आई होण्यासाठी वयाची मर्यादाही माझ्या डोक्यात पिंगा घालीत होतीच. अर्थात चाळीशीपर्यंत मुलं झालेल्या बायका माझ्या ओळखीच्या होत्या. पण वयाबरोबर बाळ होण्याची कमी होत जाणारी शक्यता आणि कॉंप्लिकेशन्स होण्याची वाढत जाणारी शक्यता ह्यामुळे तिशी जेमतेम पार करत असतानासुद्धा आपल्याकडचा वेळ कमी होत चालल्याची जाणीव मनाला व्हायला लागलेली होती.

- देवयानी

Thursday, November 10, 2011

देवयानी (28)

कामाचा झपाटा चांगलाच वाढला. आधी मी डोमॅस्टिकमध्ये होते. खूप खूप फिरले. दिल्ली, कलकत्ता दर पंधरवड्याला एकदा होत होतं. दिल्लीची मिजास मला खूप आवडायची. अजूनही आवडते. तिथल्या माणसात एक नॅचरल ऍरोगन्स आहे. तो खरा आवडू नये पण का कोण जाणे मला आवडतो. कलकत्त्याची गोष्टच वेगळी. तसे कलकत्त्याचे दोन भाग वाटले एक अजूनही कलोनिअल इरामधला आणि एक पूर्णपणे वेगळा, गलिच्छ. एकीकडे कलेचं माहेरघर, दुसरीकडे लाल रंगाचं कॉम्युनिस्ट शहर. रवींद्रनाथांचं शहर आणि बंकीमदांचंसुद्धा. ज्योती बासूंचं आणि सौरभ गांगुलीचंही.

कामाचा व्याप असायचाच पण फिरायलाही मिळायचं. एकदा अशी क्लायंट मीटिंग आटोपून क्लायंट कंपनीच्या एका मॅनेजरबरोबर मी बोलत बोलत बाहेर पडत होते. बोलता बोलता सहज शांतिनिकेतनचा विषय निघाला. तर तो म्हणाला की तू अजून दोन दिवस असशील तर एक पौष मेला की पौष फेस्टीवल असतं त्याला जाऊ शकशील. पुढच्या दहा मिनिटात त्यानंच मला घेऊन जायचं कबूल केलं. एक तीर, दो शिकार. शांतिनिकेतन तर पाहायला मिळणारंच होतं. आणि आमचं प्रपोसल ऍक्सेप्ट होणार की रिजेक्ट होणार हे ठरवणाऱ्या लोकातल्या एका महत्त्वाच्या माणसाबरोबर अख्खा दिवस घालवायला मिळणार होता. त्याला मी आवडले तर त्याला विंफोचं प्रपोसलही आवडणार होतं.

आय मस्ट से, वुमेन हॅव्ह ऍन अपर हँड सेलींग टू मेल डॉमिनेटेड टॉप मॅनेजमेंट. मेल काँपिटिशनला जेवढा टाइम डिसिजन मेकर्सबरोबर मिळत नाही तेवढा मला मिळतो. अजून काही वर्ष तरी नक्कीच मिळत राहील. असो पण ऑल दॅट इज पार्ट ऑफ द गेम. टॉप मॅनॅजमेंट इज नेव्हर फिमेल डॉमिनिटेड.

असो, तर ह्या माणसाबरोबर मी तिथे गेले. माझ्या अपेक्षेपेक्षा शांतिनिकेतन खूपंच वेगळं निघालं. म्हणजे शांतता अपवादानंच होती तिथे. नुसते टूरिस्ट्स आणि स्टॉल्स, गर्दी, गोंधळ. खाणं उत्तम होतं आणि कंपनीही वाईट नव्हती. दिवस चांगला गेला. परत उगाच दोन दिवस कलकत्त्याला काहीही न करता राहायला मिळालं. वर आमचं प्रपोसल ऍक्सेप्ट झालं हे वेगळं सांगायला नकोच.

दिल्लीहून अगदी असंख्यवेळा मी ताजमहालला गेलेले आहे. त्या जागेची मजाच काही और आहे. लोकं तिथं जोडप्याने जातात. मला एकटीलाच तिथे खूप छान वाटतं. अर्थात जोडीनं जायला जोडी असावी लागते. तेव्हा तरी ती नव्हती. पण तरी संधी मिळाली की ताजमहाल पाहायचाच.

माझ्या बाबांची खात्री होती की ते शंकराचं देऊळ आहे म्हणून. गमतीचा भाग म्हणजे ते कधीही तिथे गेलेले नव्हते. तरी खात्री पूर्ण. त्यामुळे ताजमहाल पाहताना बाबांची आठवण यायची. अजूनही येते. मग उगाच खरंच देवळासारखं काही दिसतंय का ते पाहायचं. कधी मुमताज व्हायचं, कधी शाह जहान व्हायचं, कधी औरंगजेबही व्हायचं. कधी लीडरमधला दिलीप कुमार व्हायचं, कधी वैजयंती माला व्हायचं, कधी रफी व्हायचं आणि कधी लता व्हायचं. कधी तो संगमरवर व्हायचं, कधी यमुना व्हायचं, कधी यमुनेतलं प्रतिबिंब व्हायचं. एक वेगळीच एनर्जी त्या जागेमध्ये आहे. कुणी ते बांधलं हे मला माहीत नाही, पण ज्याने बांधलं, ज्याला अशी कल्पना सुचली की असा ताज महाल बांधता येईल आणि तो निरतिशय सुंदर दिसेल, त्याच्या सृजनशीलेला त्रिवार नमस्कार.

काम वाढत होती. चांगले रिसल्टस दिसायला लागलेले होते. आणि माझी पब्लिसिटी करायला प्रीतम होता. आठ दहा महिन्यातच कामाचं चीज झालं. मला डोमेस्टीकमधून इंटरनॅशनल मध्ये टाकलं. अर्थात विंफो खूप मोठी कंपंनि होती आणि आहे. सर्वच महत्त्वाच्या देशात आमची ऑफिसेस आहेत. तिथे राहणारे लोक, तिथे आमच्यासाठी काम करतात, पण तरीही इंडियातून स्टाफला बऱ्याचदा तिथे सेल्स एफर्टसाठी जायला लागतं. बरं इंटरनॅशनल बिझनेस मध्येही बरेच भाग आहेत. प्रीतम आमच्या डिव्हिजनचा एशिआ पॅक हेड होता. अर्थातच मी त्याच्याबरोबर कामाला सुरुवात केली.

ते दिवस अतिशय सुंदर दिवस होते. एक तर प्रीतमकडून मला पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्याला तोंडावर मी काही नाही पटलं तर सांगू शकत होते आणि त्या गोष्टीचा त्याला राग येणार नव्हता. त्याच्याकडून अनंत गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. तो फार ऑर्गनाइज्ड आहे. व्हाईट बोर्ड त्याची सर्वात आवडती मॅनेजमेंट ऍक्सेसरी आहे. मी खूप इंपल्सिव्ह आहे. माझ्या डोक्यातून आलेली कल्पना सर्वोत्तम आहे असा माझा ठाम समज आसतो. आम्ही दोघं एकत्र काम करायला लागल्यावर माझी रॉ क्रिएटिव्हीटी आणि त्याचं कंट्रोल्ड प्रोजेक्शन ह्याचा सुंदर मिलाफ झाला. कुठे मला पुढे करायचं आणि कुठे मला शील्ड करायचं हे त्याला बरोबर कळतं. काकांकडून शिकलेला मंत्र. आपल्या टीममधले लोकं काय करू शकतात ह्यापेक्षा काय करू शकत नाहीत हे लीडरला माहीत असणं आवश्यक आहे. प्रीतम हा मंत्र जगतो.

एनीवे मी प्रीतमबद्दल लिहीत राहिले तर अशीच रात्र उलटून जाईल.

- देवयानी

Monday, November 7, 2011

देवयानी (27)

एक आवर्तन पूर्ण करून मी पुन्हा जिथून सुरवात केली तिथेच पोहोचले. ही आयुष्याची फार मोठी गंमत आहे. आपण पळत राहतो, पण दिशा ठरवायचा हक्क आपल्याला नसतो. माझं नशीब असं होतं आणि अजूनही आहे, की ते मला गोल गोल फिरवत राहतं. मी आकांताने धावायचा प्रयत्न करते, पण राहून राहून त्याच त्याच ठिकाणी पोचत राहते. ऑफिस असो नाहीतर घर. काहीतरी वेगळं करायला जावं आणि त्या वेगळ्या कशावर तरी जिवापाड जीव लावावा तर नशिबाचा फेरा असा की मी पुन्हा त्याच वळणावर उभी.

बाबा गेल्यावर आईमध्ये मात्र खूप फरक पडला. ती माझ्याशी खूप चांगलं वागायला लागली. मीही तिच्याबरोबर आधीपेक्षा खूपंच कंफर्टेबल होते. माणूस हा एक नंबरचा पॉलिटिकल प्राणी आहे. अगदी आपल्या रक्ताच्या नातेवाईकांशीसुद्धा तो कळत नकळत राजकारण करत असतो. हेतूत नसेलही पण आपोआप तसं घडत जातं. बाबांच्यापाठी मी घरातला कर्ता पुरुष झाले. माझ्याशी वाकड्यात जाणं आईला कठीण होतं. मध्ये मध्ये ती माझ्या लग्नाचा विषय काढायची. पण पूर्वीसारखा अट्टहास आणि आदळ आपट नव्हती. ह्याचं एकमेव कारण म्हणजे माझं असणं ही तिची गरज झालेली होती. तिचं असणं ही माझी गरज होती का? मला नाही म्हणायचा मोह होतोय, पण खूप जास्त विचार केला तर त्या क्षणी ती माझ्या खूप दूर असूनही सर्वात जवळची होती. बाकी सर्वांना कोण ना कोण होतं. श्रेयाला तिचा नवरा होता, प्रीतमला त्याची फॅमिली होती. मला कुणीच नव्हतं आणि आईलाही. त्यामुळे मी आणि आई अशी एकदम हायली अनलाइकली अलायन्स झाली.

बऱ्याचदा कॉर्पोरेट विश्व रुथलेस, इमोशनलेस वाटतं. पण खरं सांगायचं तर तेच नियम लावून आणि मोडून आपण आपली आयुष्यही जगत असतो. तिथे पैसा मिळवणं हे एकमेव साध्य असतं, आपल्या आयुष्यात कदाचित स्टॅबिलिटी, सेक्स, प्रेम, ममता, बिलाँगिंग ह्याचा ट्रेड ऑफ आपण करीत असतो. काहीतरी घेत असतो, त्या बदल्यात काहीतरी देत असतो. आणि कदाचित आपल्यालाच गिल्टी फिलिंग येऊ नये म्हणून त्याला गोंडस नावं देत असतो. आई वडिलांना दैवत मानतो, बायकोला लक्ष्मी मानतो आणि त्यांची पूजा बांधतो.

असो माझे हे विचार मला स्वतःलाच कधी कधी खूप रुक्ष आणि कोरडे वाटतात. पण कदाचित माझ्या आयुष्यात काही दिल्याशिवाय मला काही मिळालेलं नाही म्हणूनही असेल. कदाचित ह्या जगात खरोखरच एकमेकांवर कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारे असतील. पण मग असं असेल तर नवऱ्याचे दुसऱ्या बाईशी संबंध आहेत हे लक्षात आल्यावर बायकोला राग का यावा? आपण सोडून आपल्या नवऱ्याने दुसऱ्या कुणावरही प्रेम करू नये ही अपेक्षाच नाही का? आणि ही अपेक्षा नवऱ्याने पूर्ण करावी ह्यासाठी आपण त्याच्या अपेक्षा पूर्ण करत राहणं हा ट्रेड ऑफ नाही का?

ही डीबेट कंटिन्यू करण्यात काही अर्थ नाही. कारण मी इथे मायनॉरिटी मध्ये असेन ह्यात वादच नाही.

तर असे हे ट्रेड ऑफ्स शोधत शोधत माझं आयुष्य चाललेलं होतं. आईमुळे घरी गेल्यावर जेवण काय बनवायचं, रविवारी घर साफ करायला वेळ कुठून काढायचा, हे जे एकटी राहताना प्रश्न पडले असते ते पडणं बंद झालं. स्वतःला अधिकाधिक वेळ देता यायला लागला. गेले काही दिवस धावपळ दगदग ह्याच्यामुळे व्यायामाकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं होतं. आत नियमितपणे मी ऑफिसच्या जीममध्ये जायला लागले. फिटनेस वाढला की मला स्वतःबद्दल एक कॉंफिडन्स येतो. मला वाटतं सर्व बायकांचं असंच असतं. आपण एक शतांश टक्क्याने जरी चांगल्या दिसायला लागलो तर मनाला उभारी येते. माझंही तसंच झालं.

पुन्हा एकदा आयुष्यात रिकामपण यायला लागणार असं वाटत असतानाच एक मस्त गोष्ट घडली. फायनली विंफोनं मला बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये घेतलं. अर्थात त्यासाठी फक्त आणि फक्त प्रीतमच कारणीभूत होता. त्यानेच वरती पाठपुरावा केला होता माझ्यासाठी. डिलिव्हरीमधून सुटल्याने मला अतिशय बरं वाटलं. दिवस दिवस कॉम्प्युटरच्या समोर बसून काढणं फारच त्रासदायक होतं. ते सुटणार होतं. इंटरनॅशनल बिझनेस, त्यासोबत येणार हाय फ्लाइंग लाईफ, फिरणं, मोठमोठ्या एक्झेक्युटिव्हजच्या समोर प्रेसेंटशन्स देताना येणार ऍड्रेनलीन रश, कोणत्याही लीगल किंवा इल्लीगल ड्रगने येऊ शकत नाही अशी यशस्वी सेलनंतर येणारी झिंग, आणि त्याचबरोबर फेल्युअरने येणारं जगबुडी झाल्यासारखं डिप्रेशन.

सेलिंग इज इनडीड अ रोलर कोस्टर ऍड आय वॉज लाइक अ किड डाइंग टू गेट इन.

- देवयानी

Wednesday, November 2, 2011

देवयानी (26)

लखनऊ, कलकत्ता, दिल्ली आणि मुंबई एवढा मोठा प्रवास करून मी मुंबईला उतरले. रात्रभर झोप झाली नव्हती डोकं चांगलंच ठणकत होतं. टॅक्सी करून कशीबशी घरी पोचले. घरात शिरले तर समोरंच जमिनीवर बाबांचा मृतदेह ठेवला होता. नाका कानात कापसाचे बोळे घातले होते. मला एकदम भडभडून उलटी होईल असं वाटलं. कोंकणातले नातेवाईक सगळे आलेले होते.

कार्डिऍक अरेस्ट. गुरवारी संध्याकाळी बाबांना हार्ट अटॅक आला. माझा फोन अनेकदा वाजूनही मी उचलला नाही. मला त्या गोंधळात आवाज जाणं शक्यच नव्हतं. घरचा फोन तीनदा येऊन गेल्याचं दिसलं पण पुन्हा फोन करावासा वाटला नाही. उद्या करू म्हणून मी झोपले. इतक्या आनंदात मी ती संध्याकाळ घालवली आणि माझे बाबा इथे मरण पावलेले होते. ते असताना त्यांचं माझ्यावर किंवा माझं त्यांच्यावर कणभरही प्रेम असेल असं मलाही वाटलं नसतं. पण आज त्यांना असं पाहून खूप वाईट वाटलं. खरं रडूही आलं असतं. पण अश्रू डोळ्यापर्यंतच येऊन थांबले.

संध्याकाळी हे झालं तेव्हा आई एकटी होती. आमचे शेजारी डॉक्टर आहेत. त्यांना बोलावलं. त्यांनी सांगितलं की ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हालवलं तर काही होऊ शकेल, पण पोचेपर्यंतच बाबा गेले होते. माझ्यासाठी बॉडी थांबवली होती. मला खूप गिल्टी वाटलं. कसेही असले तरी माझे वडील होते ते. नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडताना मी फक्त आईला सांगून गेले होते. बाबांना येते एवढं जरी मी म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण ना मी सांगितलं ना त्यांनी विचारलं.

असो पुढचा पंधरवडा अतिशय निराशेमध्ये गेला. माणसं समाचाराला येत होती. आई तेच रडगाणं गात होती. तिची ती टेप ऐकून माझा जीव नकोसा झाला होता. चीड येत होती पण तिचं कौतुकही वाटत होतं. प्रत्येक वेळी ती तितक्याच प्रमाणे बाबांबद्दल बोलत होती. टोचून बोलण्याशिवाय आणि घरचा पैसा समाजसेवेच्या नावाखाली खर्च करण्याशिवाय आयुष्यभर त्यांनी काहीही केलं नाही, तरीही तिचं त्यांच्यावर निःसीम प्रेम होतं, ते मला दिसलं. प्रत्येक वेळी त्यांना जरा लवकर हॉस्पिटलात नेलं असतं तर ते वाचले असते, हेही ती तितक्याच आशेने म्हणत होती. जसं काही हा सगळा प्रसंग रिवाइंड करता येईल आणि बाबांना लवकर हॉस्पिटलात घेऊन जाता येईल.

सगळे दिवस, त्याची उस्तपास्त. दोन आठवडे गेले आणि मी आईला म्हटलं की मी आता निघते. मला वाटतं, ही शक्यता अजून तिच्या डोक्यात आलेली नव्हती. आता तिला एकटीला राहायला लागणार होतं. तिच्या डोळ्यात ती भीती मला दिसली. तिची नजर टाळत मी माझी बॅग उचलली आणि जिना उतरले. टॅक्सी केली आणि माझ्या घरी पोचले. नव्या कोऱ्या करकरीत घरावर आणि घरातल्या सामानावर तीन आठवड्यात धुळीची पुटं जमलेली होती. मी वेड लागल्यासारखं घर साफ केलं. पंधरा दिवसांचा एवढा शीण आला होता, पण तो घालवायलाच की काय, मी देहभान विसरून घर साफ केलं. नक्की काय साफ करत होते मी?

अंघोळ केली, कपाट उघडलं आणि माझ्या आवडत्या रेड वाइनने ग्लास भरला. आरामखुर्ची बाल्कनीत ठेवली आणि त्याच्यावर झोके देत देत, समुद्राकडे बघत संध्याकाळ घालवली. मनात सतत बाबांचेच विचार येत होते. त्यांनी मला अगदी बिचारं करून टाकलं होतं, शाळेत, कॉलेजात. पण तरीही ते गेल्याचं मला दुःख होत होतं. वाइन पोटात गेली आणि पंधरा दिवस अडलेला बांध फुटला. अगदी धाय मोकलून मी रडले. मी का रडले हे मला सांगता येणार नाही. बाबा गेले म्हणून मी रडले, मला बाबा कधी भेटलेच नाहीत म्हणून मी रडले. की जेवढे मिळत होते तेवढेही घेण्याचे कष्ट मी घेतले नाहीत म्हणून मी रडले?

इतकी विचित्र अवस्था झाली होती माझी. की मी तशीच घर लॉक करून खाली उतरले आणि टॅक्सी करून पुन्हा माझ्या जुन्या घरी आले. आईला म्हटलं की आई तू माझ्याबरोबर राहायला चल. मी हे का केलं? मला माहीत नाही. ज्या आईपासून दूर पळण्यासाठी मी इतकी दिवस तरसले होते त्याच आईला मी स्वतः माझ्या घरी बोलवत होते. ती नाही म्हणाली. त्यानं तर मला आणखीनच वाईट वाटलं. जन्मभर नवऱ्यावर अवलंबून राहिलेली बाई ही. हिचं कसं एकटीने होणार होतं? साधी ट्यूब बदलायची तर काय करायचं असतं हेही तिला ठाऊक नव्हतं.

दुसऱ्या दिवशी माझं सामान आवरून मीच माझ्या जुन्या घरी परत आले.

- देवयानी

Monday, October 17, 2011

देवयानी (25)

श्रेयाचं लग्न ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट होती. ती तर माझी सख्खी मैत्रीण होतीच, पण तिचा नवरा पीयुष हा देखील माझा चांगला मित्र झालेला होता. लग्नाला बनारसला यायचंच असं मात्र तिनं निक्षून सांगितलं. प्रीतमला ऑफिसच्या कामासाठी परदेशी जायचं होतं. अर्थात तो तसाही आला असता असं नाही. पण त्याला आयतंच कारण मिळालं. मला असं काही कारण नव्हतं आणि मुळात मला तिच्या लग्नाला जायचंच होतं. घरात सगळा पसारा पडलेला होता म्हणून पाय निघत नव्हता.

आणि तिथे मला ओळखणारी ती एकटीच होती. तिला ओळखणारे खूप जण होते, त्यामुळे सतत मला एंटरटेन करणं तसंही तिला शक्य नव्हतंच. त्यामुळे माझं थोडं जाऊ का नको असं होत होतं. शेवटी हिय्या करून मी जायचं ठरवलंच. सोमवार ते शुक्रवार सुटी घेतली. लग्न शुक्रवारी होतं. सगळं आवरून मी रविवार संध्याकाळच्या विमानानं परत येणार होते. बनारसला विमानतळावर उतरले आणि माझ्या नावाची पाटी घेऊन ड्रायव्हर उभाच होता. इथपासून जो राजेशाही थाट सुरू झाला विचारू नका.

श्रेया खरी लखनऊची पण नवऱ्याचं गाव बनारस म्हणून लग्न बनारसमध्ये झालं. इतक्या दूरवरून हे दोघं मुंबईत आले आणि त्यांचं जमलं मुंबईला पण घरं एकाच राज्यात, म्हटलं तर विमानाने अर्ध्या तासावर. असो, त्यामुळे त्यांचं सगळं वऱ्हाड ताज "बेनारस" मध्ये उतरलेलं होतं. श्रीमंती असावी तर अशी. श्रेयाला मी आधीच खूप कटकट केली होती की मला एकटीला सोडू नको, म्हणून श्रेयाची रूम पार्टनर मी होते. खूप मजा केली आम्ही. त्यांचे एकावर एक कार्यक्रम. प्रत्येक कार्यक्रमासाठी खास बनारसी साड्या घेतल्या. खाण्या पिण्याची चंगळ होतीच.

श्रेयाच्या घरचेही सगळे खूप छान होते. प्रत्येकातच एक खानदानीपण होता. श्रेयाचं ते खानदानी सुंदर असणं कुठून आलं असावं त्याचा अंदाज तिथे आला. तिथे खरं संगीत वगैरे वगैरे काहीही होत नाही, पण हल्ली आपल्या मराठी लग्नात जसं हे सगळं होतं तसं तिथेही होतं. मेहेंदी, हलदी, संगीत असे एकावर एक कार्यक्रम झाले.

संध्याकाळी ह्या अशा जायच्या. जमलंच तर सकाळी मी बाहेर फिरायला जायचे. अगदी आपण मुंबईत आवडीने खातो ते बनारसी पानंही खाल्लं. पण ते काही आवडलं नाही. काशी विश्वनाथाचं मंदिर पाहिलं. अगदी लोकं नको नको सांगत असतानाही जाऊन पाहिलं. गाडी आतापर्यंत नेणं म्हणजे मोठं कठीण काम होतं. सगळीकडे चिखल आणि घाण. अगदी कसतरीच वाटलं. गंगेचे घाट मात्र आवडले, समोरच्या बाजूने. आपल्या बाजूचा घाट गलिच्छ वाटतो पण समोरच्या बाजूचा खूप छान वाटतो. मागे कुणीतरी सांगितलं होतं की इथे अर्धवट जळकी प्रेतं टाकतात गंगेत. ती काही मला दिसली नाहीत. एकदा वाटलं निदान पाय तरी पाण्यात बुडवावेत, पण धीर झाला नाही.

गुरवारी रात्री मोठा समारंभ होता. शुक्रवारी संध्याकाळी लग्न. खूप मजा करून आम्ही दोघी हॉटेलच्या रूमवर परतलो. श्रेयाला म्हटलं कसं वाटतंय? ती काही बोललीच नाही. मीच विचार करत राहिले, कसं वाटत असेल लग्नाच्या आधीच्या रात्री. पहिला विचार माझ्या मनात आला तो म्हणजे उद्यापासून प्रायव्हसी नाही. दुसऱ्या कुणाबरोबरतरी सतत राहायचं. आणि ह्या विचारावर माझं मलाच हसायला आलं. बराच वेळ आम्ही दोघी गप्पा मारत बसलो. तिची लव्ह स्टोरी तिनं (पुन्हा) मला सांगितली. मीही नव्यानं ऐकल्यासारखी पुन्हा ऐकली. तिला जे हवं ते तिला मिळालं म्हणून मला मनापासून आनंद झाला. पण मला जे हवं ते मला का मिळू नये असं वाटून दुःखही झालं.

श्रेयाचा बहुतेक डोळा लागला होता मीही अर्धवट ग्लानीत होते, आणि माझा फोन खणखणला.

- देवयानी

Wednesday, October 12, 2011

देवयानी (24)

हं. करेक्ट. आय नीडेड सम फोकस.

आणि मला स्वतःच्या घरात जायचंच होतं. मागे बांद्र्याला जागा पसंत करूनही शिफ्ट झाले नव्हते. हीच योग्य वेळ होती. घरापासून दूर आणि ऑफिसच्या जवळ ह्या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या असत्या. दुसऱ्याच दिवशीपासून मी कामाला लागले. कुठे कुठे कोणते प्रोजेक्ट्स चालू आहेत, काय स्टेजला आहेत, भाव काय आहे? वेळ बरा जायला लागला. विकेंडला माझ्या आणि प्रीतमच्या सगळीकडे चकरा. श्रेया लग्नाच्या गडबडीत होती. तिचं लग्न दोन महिन्यांवर येऊन ठेपलेलं. त्यामुळे तिची मदत काही झाली नाही.

असं करता करता शेवटी घर नक्की झालं. दहाव्या मजल्यावरचा अगदी मोठा नसला तरी टू बेडरूमचा फ्लॅट. समोर लांबवर समुद्र दिसणार होता. मी मस्त तिथे एकटी राहणार होते. आईची कटकट नसणार होती. बाबांचा अबोला नसणार होता. एकटीने राहायचं आणि काय वाटेल ते करायचं. बस, हे माझ्यासाठी पुरेसं होतं. इ. एम. आय खूप जास्त होणार होता, पण माझ्या पगारात आरामात भागणार होतं. तसंही घर भाड्याने घेतलं असतं तर थोडी रक्कम भाड्यापोटी गेलीच असती ना?

सगळं जमून आलं आणि मी तो तयार फ्लॅट घेतला देखील. सगळंच स्वप्नवत झालं. आईला अजिबात आवडलं नाही. बाबांना आवडेल ह्याची काही शक्यताच नव्हती. मी मूव्ह झाले. माझं सामान घरातून बाहेर काढताना सगळ्या जुन्या आठवणी दाटून आल्या. घरातून बाहेर पडताना आईच्या डोळ्यात पाणी आलं. बाबांना मी निघते असं म्हणाले. ते पेपर वाचत होते. माझ्याकडे त्यांनी पाहिलंही नाही नुसती मान हालवली. त्यांना नमस्कार करायला मी वाकणार होते पण नाही वाकले. आईला खरं असं माझ्या लग्नात रडायचं होतं. पण ते आता जमणार नव्हतं.

मी टॅक्सीत बसले आणि मला हमसा हमशी रडायला आलं. आयुष्यातला एक चॅप्टर कायमचा संपला असं वाटलं. माझं बालपण, कॉलेज, अनुराग, आजी आजोबा, मराठे काका, सगळं. पण आपण त्या पिंजऱ्यातून बाहेर पडलो ह्याचा आनंदही झाला. माणसाचं मन मोठं विचित्र असतं. असतं ते आपल्याला कधीच नको असतं. आणि ते जेव्हा सुटतं हातातून तेव्हा आपण त्याचाच विचार करीत राहतो. तसंच माझं झालं.

पुढचा आठवडा मी ऑफिसमध्ये रजा टाकली होती. मिषू रोज मदतीला यायची माझ्या. मला तिने घर लावायलाच नाही तर सजवायलाही मदत केली. तिची रंगसंगतीची जाण खूप छान आहे. त्या आठवड्यात माझी तिच्याशी छान मैत्री झाली. प्रीतम माझा मित्र असला तरी तो ऑफिसमधला. त्याचं घरचं रूप तसं ओळखीचं नव्हतं. मिषूच्या बोलण्यात सतत त्याचा उल्लेख व्हायचा. सुहानीचं त्याच्यावर किती प्रचंड प्रेम आहे. आणि बाबाला लेकीशिवाय कसं करमत नाही ह्याचे किस्से.

कशी गंमत असते बघा, आपण एखाद्याला ऑफिसात भेटतो. त्याच्या तिथल्या वागण्यावरच आपलं मत बनतं त्याच्याविषयीचं. पण हा जो कोपरा आहे फॅमिलीचा, तो कधीच उघड होत नाही. प्रीतम एकदम मला वेगळाच वाटायला लागला, म्हणजे ऑफिसात एवढा कमांडिंग, फोकस्ड, कॉर्पोरेट वाटणारा प्रीतम घरी मात्र एकदम साधा सुधा घरेलू माणूस होता. मला त्याचा हेवा वाटला आणि मिषूचाही. आणखी माणसाला आयुष्यात काय लागतं? दिवसभर दमून भागून घरी गेल्यावर आपल्या माणसाच्या कुशीत शिरणं? आपल्या छकुलीला छातीशी कवटाळणं? का आपण असं साधं सोपं सूख सोडून पळत्याच्या मागे लागतो.

असो, तो आठवडा खूप छान गेला. मिषूसारखं आपणंही हाऊस वाइफ व्हावं असं उगाचच वाटायला लागलं. घर नीट नेटकं ठेवावं, नवऱ्याचं कौतुक करावं, एक छोटंसं पिलू असावं असं पुन्हा पुन्हा वाटायला लागलं. त्या विचारामागे मी लागण्याइतका वेळ मात्र मला मिळाला नाही. कारण ऑफिस जॉईन केलं आणि परत श्रेयाच्या लग्नासाठी म्हणून बनारसला जावं लागलं.

- देवयानी

Monday, October 10, 2011

देवयानी (23)

झाल्या प्रकाराने मला खूप मनस्ताप झाला. दुःख झालं असं खरंच नाही म्हणता येणार, कारण हा मुलगा ही एक शक्यताच होती माझ्यासाठी. अनुरागसारखं नव्हतं. त्या वेळी खरं दुःख झालं होतं, कारण मी मनापासून त्याच्यावर प्रेम करीत होते. पण आतामात्र आपण किती बावळट आणि दूधखुळे आहोत असं वाटायला लागलं.

अर्थात सर्व प्रॉब्लेम्सवर एकच जालीम इलाज आहे. तो म्हणजे टाइम. तेवढा वेळ जाणं आवश्यक असतं आणि मग गाडी रुळावर येते. ऑफिसच्या कामात काही विशेष प्रगती नव्हती. घरी तर माझा काही संबंध नसल्यासारखंच मी वागायचे. माझं सगळं सोशल लाईफ म्हणजे श्रेया आणि प्रीतम होते. श्रेयाचं लग्न ठरलेलं होतं. प्रीतमच झालेलं होतं, त्याला एक छकुलीसुद्धा होती. साहजिकच मला त्यांचा जितका वेळ हवा होता तितका ती दोघं देऊ शकत नसत.

एकलकोंडेपण तर ठरलेलं होतं. पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात अशी स्टेज यायला लागली की नथिंग इंटरेस्टिंग वॉज हॅपनिंग. असेच आम्ही एकदा प्रीतमच्या घरी जमलेले होतो. मी श्रेया तिचा नवरा आणि प्रीतमची फॅमिली. प्रीतमची बायको मिष्टी. नावाप्रमाणेच अतिशय गोड. एकतर बंगाली असल्याने एक जन्मजात नजाकत तिच्यात होती. लांब सडक केस, कुणाही मुलीला, मलाही हेवा वाटावे असे. आणि ती मोठं लाल भडक कुंकू लावायची. आमचीही बऱ्यापैकी ओळख झाली होती. माझ्या एखाद्या मैत्रिणीसारखीच मला ती होती. आणि त्या दोघांची मुलगी सुहानी. ही सुहानीतर माझी खूप लाडकी. तिलाही मी खूप आवडायचे. देवी आंटी, देवी आंटी म्हणून हाक मारायची मला. आंटी ऑड वाटायचं मला पण काय आहे, वय कुणासाठीही थांबत नसतं, कधी कधी मला ती वॉर्निंग बेलसारखी वाटायची.

एखादा वाइनचा ग्लास रिता झाला की माणसं बोलायला लागतात. मार्केटिंगमध्ये हे वन पेग टेक्निक मी खूप वापरलंय, वापरतेही. पण एकाचा दोन करू द्यायचा नाही, आपलं काम होईपर्यंत. दोन झाले की फोकस जातो. मीही स्वतः एकाच्या वर कधीच जात नाही. बिझनेस मीटिंगला तर शक्यतो नाहीच. तर असा वाइनचा ग्लास रिकामा झाला आणि मी बोलती झाले आयुष्यात कसं फ्रस्ट्रेशन आलंय वगैरे वगैरे. श्रेयाचा नवरा म्हणाला मिड लाईफ क्रायसेस असेल, म्हटलं हॅलो अजून तिशी येतेय माझी. इतक्यात मिड लाईफ क्रायसिस कसली. मिषू म्हणाली तू लग्न कर आता. आताशा ते मला पटत होतं पण मुलगा कुठून आणू? श्रेया म्हणाली गिव्ह इट सम टाइम. प्रीतम म्हणाला, घर का घेत नाहीस तू? यू विल हॅव सम फोकस बिफोर थिंग्ज गेट सॉर्टेड

हं. करेक्ट. आय नीडेड सम फोकस.

- देवयानी

Wednesday, October 5, 2011

देवयानी (22)

दरम्यानच्या काळात मी याहू चॅटवर जायला लागले. प्रथम उत्सुकता होती म्हणून आणि मग व्यसन लागलं म्हणून. खरं सांगायचं तर ह्या चॅट साईट्ससारखी दुसरी टुकार जागा नाही. त्यातही केवळ शारीरिक गरजा इतरत्र भागत नाहीत म्हणून त्यासाठी तिथे येणारे महाभागच अधिक. पण मला तिथलं काय आवडलं तर सेंटर ऑफ अटेन्शन होणं. लोकं तुमच्या भर भरून मागे लागतात बोलण्यासाठी शंभरातले नव्याण्णव जरी टुकार असले तरी एक चांगली व्यक्ती बोलायला मिळाली तर वेळ बरा जातो. मुळात माझ्यासारख्या पूर्णपणे एकट्या पडलेल्या मुलीसाठी हे खूपंच छान होतं. बरं आपण काय बोलतो, कसं बोलतो, कशाबद्दल बोलतो ह्याचं काही बंधन नव्हतं. तुमच्या बोलण्यावरून लोक तुम्हाला जज करणार नसतात आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलणं सोडून त्या माणसाला अगदी इग्नोरही करू शकता.

हळू हळू मी तिथे गुंतत गेले. जितकी जास्त गेले तितकी जास्त गुरफटले. पुन्हा पुन्हा जाऊ लागले. एका मुलाशी बरेच दिवस बोलत होते. तो खूप चांगला वाटला. मोठ्या कंपनीत नोकरीला, पगार चांगला वगैरे वगैरे. आम्ही एकमेकांना एकमेकांचे फोटोही पाठवले. त्याच्याकडे व्हिडिओ कॅम होता त्यावर मी त्याला पाहिलं. एकमेकांशी आम्ही व्हॉईस चॅटवर बोललो देखील. त्याने माझ्याकडे माझा नंबर मागितला. मीही थोडे आढे वेढे घेऊन त्याला दिला. मला त्रास होईल असं काहीच तो करणार नव्हता ह्याची मला खात्री होती. एक दिवस त्याने मला भेटूया का म्हणून विचारलं. मीही हो म्हटलं.

वेळ ठरवून आम्ही भेटलो. तो जसा वाटला होता तसाच होता. छान. एकदा भेटलो, दोनदा भेटलो, तीनदा भेटलो. फोन आणि चॅटतर रोजचंच झालं होतं. आपण कोणत्या माध्यमातून भेटलो ह्याचं भान माझं थोडं सुटत चाललेलं होतं. श्रेया आणि प्रीतमला मी हे सगळं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडून चिडवा चिडवी चालू असे. अजूनतरी माझं त्याच्यावर प्रेम वगैरे नव्हतं. पण मी त्यापासून खूप दूर होते असंही नाही.

बोलता बोलता एकमेकांची खूप ओळख झाली विश्वास वाढला. पावसाळा चालू होता, वातावरण छान कुंद असायचं. फोनवर बोलता बोलता त्याने एकदा प्रश्न टाकला. लोणावळ्याला जाऊया विकेंडला? दोन दिवस जाणं मला शक्य नव्हतं आणि असतं तरीही मी काही एकट्या त्याच्याबरोबर ओव्हरनाइट जाणार नव्हते. हो नाही करता करता शेवटी शनिवारी माथेरानला जायचं ठरलं. दस्तुरीला गाडी लावून आत चालत जायचं आणि परत बाहेर चालत यायचं आणि संध्याकाळी घरी परत. बेत छान होता. माथेरान माझी खूप आवडती जागा आहे. रोमँटिक. लाल रस्ते, छड्या, घोडेवाले, आणि झाडांचा हिरवा रंग.

दिवस मोठा मजेत गेला. आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या, भरपूर मजा केली. अगदी कॉलेजच्या पिकनिकला खेळतात तशा गाण्याच्या भेंड्याही खेळलो. दिवस मावळतीला झुकला तसे आम्ही माघारी फिरलो. असं दिवसभर खूप मजा केली की संध्याकाळी एक वेगळीच हुरहुर लागते, तसं काहीसं झालं होतं. पाय दुखत होते, दिवस संपला होता, परत रोजच्या रामरगाड्यात परत जायचं होतं. आम्ही दोघंही शांत होतो.

अचानक तो मला म्हणाला, देवी तू मला आवडतेस. काय बोलावं मला सुचेना. मलाही तो आवडत होताच पण असा एक्सप्रेस होकार द्यायची माझी तयारी नव्हती. मी काहीच बोलले नाही. पण त्याने मला तसं निरुत्तर राहू दिलं नाही. अखेरीस मीही मान्य केलं की तोही मला आवडतो. अख्खा दिवस आम्ही एकत्र होतो पण चुकूनही त्याने मला स्पर्श केला नव्हता. त्याने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला आणि माझा हात हातात धरला. एक क्षण मला अनुरागचीच आठवण झाली. सगळं सगळं आठवलं आणि मी त्याचा हात झिडकारला. त्याला नक्की काय झालं ते कळलं नाही. मग आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता गाडीत जाऊन बसलो.

तो गाडी सुरू करणार इतक्यात मी त्याला थांबवलं. अनुराग बरोबर जे काही झालं होतं ते मी त्याला अजून सांगितलं नव्हतं. अथ पासून इति पर्यंत मी त्याला सगळं सांगितलं. सगळं शांतपणे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला की एवढं टेन्शन घेऊन नकोस, हल्ली सगळेच तसं करतात, आपणही करू. मी विचारात हरवले होते, माझी तंद्री लागलेली होती. त्यानं पुढं वाकून माझ्या ओठावर त्याचे ओठ टेकवले तेव्हाच मला ते समजलं. तो क्षण मी वर्णन करू शकत नाही इतका किळसवाणा होता. एका क्षणात मनात कित्येक विचार येऊ शकतात पहा. मला स्वतःचीच किळस वाटली, कीव वाटली, वाईट वाटलं, त्याचा राग आला. मी माझ्या मनातला एक दुखरा कोपरा त्याच्यापुढे उघड केला आणि त्याला त्याचं काहीच नव्हतं. आपणंही करू? व्हॉट द फक?

असो, मी तशीच गाडीतून उतरले जी पहिली टॅक्सी उभी होती तिच्यात बसले आणि नेरळ स्टेशनला आले. ट्रेनने घरी आले. एकदाही तो मागे आला का हे पाहिलं नाही. पुन्हा त्याला फोन केला नाही, चॅट केलं नाही, मेलही नाही. हे सगळंच फार वाईट होतं. पुरुष हे असेच असतात आणि त्यांच्याकडून ह्यापेक्षा चांगलं काही अपेक्षितंच नाही का? असं वाटायला लागलं. रात्रभर रडत राहिले.

- देवयानी

Thursday, September 29, 2011

देवयानी (21)

श्रेयाच्या सोबतीने माझे विंफोमधले दिवस जरा बरे चालले होते. कामाचा ताण एकंदरीतच नसल्याने स्वतःच्या आयुष्याबद्दल विचार करायला वेळ मिळाला होता. मागे बांद्र्याला बघून ठेवलेलं घर भाड्याने घ्यायचं राहूनंच गेलेलं होतं, पण कुठेतरी मनात स्वतःचं वेगळं घर असावं आणि आपण एकटं राहावं हे होतंच. आई बाबांच्या घरी माझं अस्तित्व तसं नगण्यच होतं.

बऱ्याच वेळा माझ्या शिफ्ट्स असत. त्यातही सकाळची खूपदा असे. ऑफिसमधून आले, जेवले की झोपून जायचं. आठवडा असा वेगवेगळ्या वेळी झोपून, उठून, काम करून, जेवून खाऊन घालवल्यावर, सतत ड्रग्ज घेतल्यासारखी अवस्था व्हायची. सतत चोवीस तास तुम्हाला झोपच येत राहिली आणि झोपायला तुम्ही बेडवर पडलात की झोप आलीच नाही तर कशी अवस्था होते तशी माझी अवस्था होती. झोंबी हा एकच शब्द त्या स्थितीचं वर्णन करू शकेल त्यामुळे घरची कामं फंक्शन्स वगैरे पूर्ण बंद होतीच.

बाबा मला कधीच काही बोलले नाहीत. त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही की अबोला धरून बसायचं ही त्यांची चिडण्याची पद्धत तर मनासारखं काही झालं नाही की घरात आदळ आपट करायची ही आईची. दोघांनाही मी नकोशी झालेले होते आणि खरं सांगायचं तर मलाही ते नकोसे झाले होते. आज हे लिहिताना मला आनंद होतोय असं नाही, पण ह्या सगळ्याला जबाबदार तरी कोणाला धरणार? कुठेतरी आमच्यात दरी पडत गेली हे खरं आणि ती वाढतंच गेली.

माझ्या बऱ्याच मैत्रिणींची लग्न झालेली होती, ज्यांची झाली नव्हती त्यांची जमलेली होती. ऑफिसमधल्याही बऱ्याच मुलींची लग्न झालेली होती. श्रेयाचं लग्न झालं नसलं तरी तिला स्टेडी गोइंग बॉय फ़्रेंड होता. मला मात्र कुणीच नव्हतं. त्या काळामध्ये खूपदा एकटं वाटे. आपलाही एक जोडीदार असावा असं खूप वाटे. इतरांना त्यांच्या जोडीदाराबरोबर पाहिलं की खूप हेवाही वाटे. अशातच कुठेतरी वाटायला लागलं की आपणही लग्न करावं.

आई कित्येक वर्ष माझ्या मागे लागलेलीच होती. आताशा नातेवाईकांनी तो विषय काढणं सोडून दिलं होतं. मी पूर्णपणे काम आणि त्याच्या अनुषंगाने मिळणारा पैसा ह्याच्या आहारी गेलेली आहे असंच सर्वांचं मत होतं. ऑफिसमधल्या असेल, इतर ओळखीतल्या असेल, पुरुषांची नजर बदलत चाललेलीही मला जाणवली. हिचं काही लफडं नाही, लग्न झालेलं नाही, बिचारी. सोपं सावज आणि थोडीशी समाजसेवा असा पुरुषांचा ऍप्रोच होत असलेला मला दिसला.

पण ह्या सर्वातून बाहेर पडण्यासाठी जोडीदार शोधण्यासाठी लागणारा वेळ आणि ठिकाण मला माहीत नव्हतं. ऑफिसमधली जी काही थोडी थोडकी चांगली मुलं होती, त्यांची लग्न झालेली होती किंवा होऊ घातलेली होती. बरं नुसता मुलगा चांगला असून चालणार नव्हतं, त्याचा पगार, हुद्दा ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा सरस असणं आवश्यक होतं. आईला स्थळ वगैरे शोधायला सांगणं मला जमणार नव्हतं. कुठल्या विवाह मंडळात स्वतः नाव नोंदवणं हा माझ्यासाठी टॅबू होता.

असं करता करता शेवटी इंटरनेटचं माध्यम मला सापडलं. मॅट्रिमोनिअल साईट्स नुकत्याच नावा रूपाला येत होत्या. त्यातल्या एका साईटवर मी नाव नोंदवलं, पैसेही भरले. हे सगळं माझ्या आई वडिलांच्या नकळत होतं, त्यामुळे ह्यातून काही जमून आलंही असतं तरी ते घरच्यांच्या गळी उतरवणं कठीण जाणार होतं. काही संपर्क होत होते पण कॉंक्रीट काही घडत नव्हतं. अर्थात मी फार डेस्परेट होते असं नव्हे.

- देवयानी

Wednesday, August 10, 2011

देवयानी (20)

विन्फोमधली सुरवात अशी डळमळीतच झाली. एवढी मोठी कंपनी. एवढे महान तिचे अध्यक्ष आणि बसवराजसारखी माणसं तिथे बसवून ठेवलेली. समोरच्याला सतत टाकून बोलायची, छोटं ठरवायची सुपारी ह्या माणसाला दिलेली होती, असा तो वागायचा. सगळ्यात तिटकारा मला त्याचा येत असे जेव्हा तो मी काम करत असताना माझ्या पाठी येऊन उभा राही आणि स्क्रीनकडे पाहत राही. अतिशय गोंधळून जायचे मी तो असला की. माझी काही चूक तर होत नाही ना अशी भीती आणि चूक झालीच तर लगेच तिच्यावर बोट ठेवायला हा तयार. त्यातल्या त्यात बहुदा मुलगी असल्याने माझ्या वाट्याला त्याचं हे मागे येऊन उभं राहणं जास्तच येत होतं हे माझ्या लक्षात आलं.

मी एकटी नव्हते. बऱ्याच इतर मुलींकडूनही हीच तक्रार ऐकली. खरं सांगू खूप किळसवाणं वाटायचं. केवळ तो माझा बॉस आहे म्हणून हे मी खपवून घेत होते. अर्थात त्यानं ह्यापेक्षा काही आगळीक केली नाही. नाहीतर नसतं सहन केलं.

बसवराजबरोबर काम करता करता विन्फोची थोडीफार माहिती आणि पॉलिटिकल जडणघडण मात्र मला कळली. बऱ्याच वेळा त्याच्या सोबत मीटिंग्जना जायची वेळ यायची. त्याची सोबत कितीही त्रासदायक, तापदायक, कंटाळवाणी असली तरी कळत नकळत तो मला कंपनीचं पॉलिटिक्स समजावून सांगत होता. नो मॅन इज यूसलेस इन बिझनेस असं कुठेतरी वाचलेलं आहे. अतिशय समर्पक वाक्य आहे. कोण तुम्हाला काय देऊन जाईल हे सांगता येत नाही. तसंच आजचे शत्रू हे उद्याचे मित्र आणि आजचे मित्र हे उद्याचे शत्रू होऊ शकतात त्यामुळे प्रत्येकाशी सांभाळूनच वागावं लागतं.

माझं बसवराजबरोबर काम करणं असंच होतं. ऑपॉर्च्युनिस्ट. मला सोबत घेऊन फिरायला त्याला आवडायचं. मला त्याच्यासोबत जायला आवडलं नाही तरी हे जे ग्यान मला त्याच्याकडून मिळायचं त्यासाठी मी (खोटम खोटम) हसत हसत त्याच्याबरोबर जायचे. डोळा मारल्यानं काही वेळा कामं लवकर होतात, हा माझा अनुभव आहे. अर्थात शब्दशः नव्हे.

आमच्या कंपनीचं विन्फोमध्ये मर्ज होणं पूर्ण झालं होतं. कस्टमर रिलेशन्स हँड ओव्हर झाली होती. बसवराजला थोडा मस्का मारून मी तिथेच राहायचा प्रयत्न केला पण तो फळला नाही. मधले काही दिवस लायिंग लो गेले. पुढे काय चा प्रश्न आ वासून उभा होता. काकांकडे एकेक पायरी मी भराभर चढलेले होते, त्यामुळे अचानक आयुष्यातलं थ्रिल वगैरे निघून गेलं असं वाटायला लागलं. हाती कामाचा पुष्कळ वेळ होता. करण्यासारखं काही विशेष नव्हतं, ते सहा आठ महीने तसे वाईटंच गेले.

पण त्या काळात दोन चांगल्या गोष्टी घडल्या. मला डिलिव्हरी एफिशिएन्सीच्या एका टुकार इन हाउस प्रोजेक्टवर टाकलेलं होतं. मला पगार देत होते आणि काम काही नव्हतं म्हणून बहुदा असेल, कारण मी काकांकडे फक्त सेल्स सेल्स आणि सेल्सचंच काम करीत होते. विकलं की आमचं काम झालं. डिलिव्हरी वॉज नॉट माय हेडेक. आता ह्या प्रोजेक्टवर मी कशी आणि काय व्हॅल्यू ऍड करणार होते ते भगवंतालाच ठाऊक. पण मला तिथे टाकलं आणि मला तिथे पुन्हा एकदा श्रेया भेटली. तीच श्रेया जी मला अमेरिकेला भेटलेली होती. तेव्हा आम्ही काँपिटिटर्स होतो, पण तरीही तिची मला खूप मदत झाली होती. ती श्रेया.

माणसाचे ऋणानुबंध कसे असतात पहा. अमेरिकेत एकटी असताना तिचा केवढा आधार मला वाटला होता. का? कारण सांगता येत नाही. तिने माझ्यासाठी खूप काही केलं होतं असंही नाही. फक्त आपल्याशी बोलायला कुणीतरी आपल्यासारखं आहे ह्याचाच केवढा आधार वाटला होता मला. आणि आता, विन्फोमध्ये, माझी शीड फाटलेल्या जहाजासारखी अवस्था झालेली असताना, पुन्हा एकदा ती मला भेटली. श्रेया. काकांच्या अनुपस्थितीत माझ्या फ़्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून श्रेयाच होती.

अतिशय हेवा वाटावं असं कॉंप्लेक्शन. डोळ्यावरचा अभ्यासून लुक देणार चष्मा. लांबसडक काळे केस आणि नेहमी भारतीय पोशाख घालणारी ही लखनवी सुंदरी, मुंबईच्या गर्दीत मला भेटली हे विधीलिखितंच. श्रेया नसती तर माझं काय झालं असतं कोण जाणे. आमच्या ह्या प्रोजेक्टच्या काळातच आम्हाला ते खाडीसमोरच्या कोपऱ्यावरच सीसीडी मिळालं. भंगारातली जहाजं, मॅंग्रोव्हज सगळं सगळं सगळं अगदी तसंच होतं. माझ्या अनेक प्रश्नांना तिनं उत्तरं दिली. माझे अनेक प्रश्न हे मुळात प्रश्नच नाहीत हेदेखील तिनं मला पटवून दिलं.

आणि दुसरी चांगली किंवा वाईट गोष्ट म्हणजे प्रीतम भेटला. प्रीतमविषयी नंतर कधीतरी.

- देवयानी

Wednesday, August 3, 2011

देवयानी (19)

विंफो हे एक वेगळंच जग होतं. आतापर्यंतची माझी कंपनी म्हणजे दादरची भाजी गल्ली असेल, तर विंफो म्हणजे अख्खी मुंबई होती. सगळंच निराळं आणि अजस्र होतं. शंभर लोकं असलेल्या कंपनीत आणि पन्नास हजार लोकं असलेल्या कंपनीत जो फरक असायला हवा तोच आमच्या कंपनीत आणि विंफोमध्ये होता. त्यांच्या पन्नास हजारात आमच्या शंभर लोकांचा पालापाचोळा होणं अगदी स्वाभाविक होतं. पण तरीही हार मानायची नव्हतीच.

आमचं ऑफिस बंद करण्यात येणार होतं आणि विंफोच्या अवाढाव्य ऑफिसमध्ये आम्हा सर्वांचं स्थलांतर होणार होतं. त्यामुळे मला आणि माझा एक कलीग, दोघांना पहिल्या दिवसापासूनंच थेट विंफोमध्ये बोलावलं होतं. खरंतर इथेच मला ते थोडं खटकलं. जुन्या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून विंफोनं मला घेतलं होतं. जुन्या कंपनीचं ऑफिस मायग्रेट करणं, जुन्या बच्चे कंपनीला ( आमच्या स्टाफला आम्ही बच्चे कंपनी म्हणत असू, कारण सगळे खरंच बच्चे होते. अगदी मीसुद्धा) नव्या ऑफिसात स्थीर स्थावर करण्याचं काम खरंतर आम्हाला देणं आवश्यक होतं. पण त्याजागी दुसऱ्याच कुणाचीतरी नेमणूक झाली होती.

आम्ही दोघं थोडेसे दबकतंच ऑफिसात शिरलो. ह्युमन रिसोर्सेस मॅनेजरला जाऊन भेटलो. त्याच्यासाठी आम्ही म्हणजे दिवसाला जॉइन होणाऱ्या पन्नास लोकांपैकी एक होतो. त्यानं आम्हाला अजिबात भाव दिला नाही. थोड्या वेळाने आम्हाला भेटायला कुणीतरी बडा ऑफिसर येईल असं त्यानं सांगितलं. कोण येईल, कधी येईल हे सांगायची पद्धत विंफोमध्ये नव्हती बहुतेक.

असो, ते सगळे सोपस्कार पार पडल्यावर आम्हाला दोघांना एक रिकामा कोपरा देण्यात आला. आजू बाजूला बऱ्याच मोकळ्या जागा दिसत होत्या. बहुतेक आमची बच्चे कंपनी तिथे बसायची होती. हे सगळं होईपर्यंत लंच झाला. त्याला मी आणि मला तो एवढेच ओळखीचे होतो. त्यामुळे एकमेकांची साथ सोडता येत नव्हती. पुढे काय हे कुणीच आम्हाला अजून सांगितलं नव्हतं.

खरं तर थोडी मोकळीक मिळाल्यानं आम्हालाही बरं वाटलं. करण्यासारखं काहीच नव्हतं. समोरचा डेस्कटॉप चालू करण्यासाठी लॉगीन आयडी नव्हता. मग उगीचंच इथून तिथे फिरत राहिलो. कुठे काय काय आहे ते पाहून घेतलं. पण हे सगळं किती वेळ करणार ना? दुपारी तीन चार वाजले तशी मी परत ह्युमन रिसोर्सेस मॅनेजरला भेटायला गेले. म्हटलं आम्ही करायचं काय? त्यानं गडबडीनं दोन तीन फोन फिरवले. कुणाशीतरी कोणत्यातरी अगम्य भाषेत (बहुतेक तेलुगु) बोलून झाल्यावर त्याने आम्हाला परत जागेवर जायला सांगितलं.

मोठ्या आशेने आम्ही पुन्हा बंद काँप्युटरच्या स्क्रीनकडे पाहत बसलो. शेवटी एकदाचा एक ऑफिस बॉय आमची नावं शोधत आला. त्याच्या मागोमाग आम्ही दुसऱ्या एका मजल्यावर ज्याला भेटायचं त्याच्या ऑफिसच्या दिशेने निघालो. बाहेरच्या बाईनं आम्हाला बसायला सांगितलं. दारावर पाटी होती बसवराज पाठक. नाव तर जबरदस्त होतं, माणूसही जबरदस्त होता हे मग कळलं. दहा मिनिटं झाली, पंधरा मिनिटं झाली, अर्धा तास झाला, बसवराज आतंच बसलेला आणि आम्ही बाहेर बसलेलो. आता मात्र माझा पेशन्स कमी व्हायला लागला. मी पुन्हा पुन्हा बाहेरच्या बाईला बसवराजाला आमची आठवण करायची विनंती करत होते. ती गोड हसून सॉरी म्हणत होती आणि अणखी थोडाच वेळ अशी लटकी गळ घालीत होती.

मी तरी काय करणार होते? जे जे होईल ते ते पाहावे असं म्हणत वाट बघत बसले. शेवटी एकदाचा बसवराजाचा दरवाजा किलकिला झाला. आतून टक्कल पडलेला, उरलेल्या केसांना आणि मिशांना कलप लावलेला. अतिशय गॉडी टाय लावलेला एक नववृद्ध बाहेर आला. आम्ही लगेच उठून उभे राहिलो. आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून तो सेक्रेटरीकडे गेला. तिने बहुदा त्याला आमच्याबद्दल सांगितलं, त्यानं एकदा आमच्याकडे पाहिलं. आम्ही बहुदा कसनुसं हसलो. तो परत बाईशी बोलला आणि निघून गेला.

मी पुढे जाऊन बाईला विचारलं. ती पुन्हा हसून (? ) म्हणाली की सरांना अर्जंट मिटिंगला जावं लागलं, तुम्ही उद्या सकाळी पुन्हा या. ते लंचपर्यंत ऑफिसमध्ये आहेत. ते तुम्हाला भेटतील.

असा गेला माझा विंफोमधला पहिला दिवस.

तो बाय चान्स असा गेलेला नव्हता. तो तसा मुद्दाम घडवून आणला होता. आमच्या कंपनीत आमचा तोरा मोठा होता. आमच्या माना आणि नांग्या वेळीच मोडायचा हा प्रकार होता. तुम्ही किती क्षुल्लक आहात, यःकश्चित आहात, निरुपयोगी आहात हे आधी जाणवून द्यायचं, तुमच्या मनात एक इंफिरिऑरिटी कॉंप्लेक्स निर्माण करायचा आणि मग तुम्हाला थोडं बरं वागवायचं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? माझी लायकी नसूनही मला माझी कंपनॉ बरी वागवते. आमच्या बाबतीत विंफोचा हाच डाव होता.

मग अगदी आग्रह करकरून विंफोनं आम्हा दोघांना मागून का घेतलं होतं? माझीतर इथे येण्याचीही इच्छा नव्हती. मला काकांबरोबर काम करायचं होतं.

विंफोनं आमची कंपनी घेतली ह्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचा एक मोठा प्रॉस्पेक्ट आमचा कस्टमर होता. आमचा पोर्टफोलिओ मर्यादित होता. पण तो कस्टमर विंफोला मिळाला तर बरंच क्रॉस सेलिंग करणं शक्य होतं. हा त्यांचा फायदा होता. पण आम्हा दोघांपैकी एकाला समोरच्या एखाद्या कंपनीनं उचललं असतं तर कदाचित आमच्याबरोबर कस्टमरही जंप झाला असता. तो कस्टमर गेला तर विंफोच्या हाती धुपाटणंच लागलं असतं. म्हणून आम्हा दोघांना त्यांनी उचललं. चार सहा महिन्यात त्यांना नवी माणसं कस्टमरच्या समोर बसवायची होती. ते काम एकदा फत्ते झालं की मग आम्हाला कुठेही फेकून देता येणार होतं.

हे पॉलिटिक्स फक्त मोठ्या कंपन्यातंच शिकायला मिळतं. तुम्ही ते शिकता किंवा मागे राहता. माझ्या बाबतीत मागे राहण्याचीच शक्यता अधिक होती.

- देवयानी

Wednesday, July 27, 2011

देवयानी (18)

अनुराग प्रकरणानंतर मला आलेलं डिप्रेशन आणि त्यानंतर मराठे काकांची ओळख, त्यांच्याकडे काम करणं, कंपनी मोठी करणं ह्याबाबत मी आधीच लिहिलेलं आहे. भारतातल्या एका नामांकित आयटी कंपनीकडून (आपण तिला विन्फो म्हणूया) आम्हाला टेक ओव्हरची ऑफर आली. आम्हाला असं मी उगाचच लिहितेय. मी जवळ जवळ स्वतःला कंपनीचा अविभाज्य भाग समजायला लागलेले होते. पण प्रत्यक्षात मात्र मी कंपनीची साधी नोकरच होते.

अशी भावना आपल्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण करणं हे खरं महत्त्वाचं. मोठ्या कंपन्या मोठ्या का होतात आणि काही छोट्या कंपन्या मोठ्या कधीच का होत नाहीत ह्यामागचं कारण हेच असावं. काकांकडून मी हे सगळं शिकले. पगार फार दिला नाही त्यांनी मला, पण हा ठेवा खूप मोठा आहे. आता आठवलं म्हणून लिहिते. काका कधी काळी दिनू रणदिव्यांच्या लेक्चर्सना वगैरे जायचे, तेव्हाची त्यांची आठवण.

आपल्या एंप्लॉइज मध्ये ओनरशिप कशी निर्माण करावी ह्याचं उदाहरण. रणदिवे म्हणाले की माझा पिऊन जेव्हा माझ्याकडे रजा मागतो, तेव्हा ती रजा द्यायलाही मी खळखळ करतो. रजा देतो पण दोन-चार दिवस कमी करूनच देतो. खरंतर तो पिऊन चार दिवस कामावर आला नाही तर कंपनीचं नुकसान होणार नसतं, पण केवळ मी त्याला म्हटलं की बाबा इतके दिवस नको घेऊ रजा, तुझ्यावाचून अडतं इथे, की त्याला कंपनीत आपलं काही महत्त्व आहे हे जाणवतं. हे तो, घरी जाऊन त्याच्या बायका पोरांना सांगतो. ह्या बोस्ट करण्यात त्याला प्रचंड सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्यांतूनच तो त्याचं काम ओन करायला लागतो.

मला स्वतःला बॉसने माझ्यावाचून अडतं असं म्हटलं तर खूप बरं वाटतं. बाकी काही झालं नाही तरी निदान तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाला थोडं बरं तरी वाटेल असं केल्याने? अशा अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले आणि म्हणूनच कंपनी विकायचा निर्णय झाला तेव्हा मी काकांना म्हटलं की मी पुढे त्याच्याबरोबरच काम करेन. जे काय देतील तो पगार मला चालेल.

पण जशी जशी बोलणी पुढे जायला लागली, तशा एकेक गोष्टी उकलत गेल्या आणि सरतेशेवटी काकांनी चक्क मला सांगितलं की मला विन्फोमध्ये जावंच लागेल. आमच्या छोट्याश्या कंपनीतली एक की एंप्लॉयी म्हणून मी विन्फोमध्ये काम करावं असा विन्फोचा आग्रह होता. अर्थात, काका विन्फोमध्ये न जाता बाहेर पडणार होते, त्यामुळे उरलेल्या लोकांपैकी जी लोकं क्लायंट रिलेशनशिप्स सांभाळतात ती विन्फोला हवी होती. त्या काही लोकांत मीही होते. मी काकांशी त्या दिवशी भांड भांड भांडले. अगदी मनापासून भांडले. पण त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही.

पुढे वर्षभराने मात्र त्यांनी मला सांगितलं की त्यावेळी विंन्फोसारख्या मोठ्या कंपनीत जाणं माझ्या एकंदरीत करिअरच्या दृष्टीनं चांगलं होतं. स्टार्ट अप्स मध्ये काम करणं वाईट नाही पण आधी मोठ्या कंपनीत काम करणं आवश्यक आहे. मला महत्त्वाची पोस्ट मिळणार होती. अजून चांगला अनुभव मिळणार होता. म्हणून काकांनी मला चक्क विन्फोमध्ये माझ्या मनाविरुद्ध ढकलली. अजूनही काका त्यांचे विन्फोमधले जे मित्र आहेत त्यांना म्हणतात. आमच्या मुलीला सांभाळा, मुलगी गुणी आहे पण माहेरी लाडा कोडात वाढलेय. तिला सासुरवास देऊ नका.

असे आमचे काका. इतकं देऊन ठेवलंय त्यांनी की ह्या आयुष्यात तरी ते फेडू शकत नाही. एका अर्थानं अजूनही ते माझे फ़्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड आहेतच पण त्यांच्याबरोबर काम केलं तो काळ माझ्या आयुष्यातला खूप चांगला काळ होता.

असो, अखेरीस तो दिवस आला आणि मी विन्फोच्या दरवाज्यात थोडी धाकधूक, थोडा अभिमान, थोडा उत्साह आणि बराचसा दडपण घेऊन पहिल्या दिवसाच्या पहिल्या प्रवेशासाठी उभी राहिले.

- देवयानी

Wednesday, July 20, 2011

देवयानी (17)

ती रात्र अनुराग माझ्या कडेच राहिला. सभ्य घरातल्या मुलीने खूप अभिमानाने सांगायची गोष्ट नाही ही, पण त्या रात्री आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. पण खरं सांगू? तर त्यात असभ्य असं काही होतं असं तेव्हा आणि आजही मला वाटत नाही. शरिराची गरज ही न भागवता दडपून टाकणे म्हणजे सभ्यता का? मी त्याच्या आणि त्याने आमच्या जवळ येण्याने कुणाचं काही वाईट केलं का? मग आम्ही केलं ते असभ्य कसं?

गेली बरीच वर्ष मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधते आहे. प्रेम आणि शारिरिक आकर्षण ह्या एका मागोमाग जाणाऱ्या गोष्टी नाहीत का? नक्कीच आहेत. पण तुम्ही चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडलात तर? मग त्या वेळी तुम्ही ज्या व्यक्तीवर खरं खुरं मनापासून प्रेम करत होता त्या व्यक्तीबरोबर भौतिक सुखाची परमावधी गाठण्याचा केलेला प्रयत्न भ्रष्ट किंवा असभ्य कसा काय असू शकतो? मला पूर्ण कल्पना आहे की ह्या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत, पण तरीही मला पडलेल्या ह्या बेसिक प्रश्नाचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही. फिरून फिरुन मुद्दा विवाहबाह्य किंवा विवाहपूर्व ह्या शब्दावर येतो. आणि लग्न ह्या संस्थेला दिलेलं अवाजवी महत्त्व मला आजही मान्य नाही.

असो तो वेगळाच मुद्दा झाला. पण आम्ही जे काही केलं ते माझ्या बाजूने तरी पूर्ण समर्पण होतं. प्रेमात पडल्यावर आपलं अस्तित्व विसरून जाणं हेच महत्त्वाचं. आणि मी तेच करत होते. संस्कृतीरक्षकांची बजबजपुरी झालेल्या आपल्या देशात मात्र माझं वागणं बेताल, असभ्य आणि अणखी बरंच काही होतं. ही गोष्ट माझ्या आई वडिलांना माझ्या नातेवाईकांना कळली तर गहजब होणार होता. अनुराग सकाळी गेला पण तो गेल्यानंतर मला इतकं अपराधी वाटायला लागलं. त्यात घरी मी एकटी. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. सभ्य घरातल्या मुलींनी ज्या पायऱ्या कधीच उतरायच्या नसतात त्या मी एक एक करीत सगळ्या उतरले होते.

दुसऱ्या रात्रीच मला सणसणून ताप चढला. पुढचा बरोबर महिना मी हंथरुणाला खिळून होते. बरेच दिवस साध्या तापाची औषधं, मग चाचण्या. शेवटी मलेरिया झाल्याचं निष्पन्न झालं. कसं कळलं मलेरियाच्या जंतूंना की मी तेव्हा व्हल्नरेबल होते म्हणून? निसर्गाचं हे मला कौतूक वाटतं. survivor senses survival. पण ह्या मलेरियात माझी परीक्षा बुडाली. वर्षभर काही अभ्यास केलेला नव्हता त्यामुळे स्कॉलर मुलं आजारी पडूनसुद्धा पास वगैरे होतात ते होणं मला शक्य नव्हतं. मी परीक्षेला जाणंच टाळलं. अंगावर पांघरूण घेऊन झोपून काढले परीक्षेचे दिवस.

अनुरागशीही भेट झालेली नव्हती. ती व्हावी असं मला वाटतही नव्हतं. स्वतःचीच स्वतःला (काहीही कारण नसताना) लाज वाटत होती. घरी सतत आई असल्याने तो येऊ शकत नव्हता. त्याने यायचा प्रयत्नही खूप केला असेल असं मला वाटत नाही. माझ्या घरी फोनही नव्हता, त्यामुळे त्याचा फोन येण्याचा प्रश्नच नव्हता. ह्या सगळ्या प्रकरणातून बाहेर यायला मला दोन तीन महिने लागले.

पुन्हा मी अनुरागला भेटले तो दिवस मला चांगला आठवतो. त्याने झाल्या प्रकाराबद्दल माझी माफी मागितली. मी त्याला सांगितलं की ते विसरून आपण पुढे जाऊ. माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे, आपण आपल्या आई वडिलांना सांगून टाकू त्याबद्दल म्हणजे लपवा छपवीचा प्रश्न येणार नाही. त्यावर चक्क त्याने माझी नजर टाळली. अनुराग भेटल्यापासून एकदाही अशी त्याने माझी नजर टाळलेली नव्हती. तो म्हणाला देवी, मला तू खूप आवडतेस, पण आपलं लग्न नाही होऊ शकत. माझे आई वडील ते कधीही होऊ देणार नाहीत, कारण माझं लग्न हाही त्यांच्यासाठी एक बिझनेस असेल, योग्य माणसाशी करण्याचा.

मी त्याला म्हटलं की असेना का त्यांचा विरोघ. माझ्या आई वडिलांचाही असेल. पण तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर प्रेम असेल तर आपल्याला काय अशक्य आहे. मला अजिंक्य वाटणारा अनुराग साधा लिंबू टिंबू खेळाडू म्हणून स्पर्धेत उतरायलाही तयार नव्हता. त्याला लढायचंच नव्हतं. कदाचित त्याला हवं ते त्याला मिळालं होतं. कदाचित आकर्षण तितकंसं उरलेलं नव्हतं. कदाचित मला त्याला फक्त वापरून फेकून द्यायचं होतं? ह्या प्रश्नांची उत्तरं मी त्याला विचारली नाहीत आणि त्यानं मला सांगितली नाहीत. त्यानंतर मी त्याच्या आजूबाजूला असले तरी खूप दूर गेलेले होते.

पण तो मला एक जखम देऊन गेला. जशी कचानं देवयानीला दिली होती ना तशीच. खपली न धरणारी, सतत खुपणारी एक जखम. विषानं विष मरतं असं म्हणतात. मीही तसंच काहीसं केलं. हाती नसलेल्या पैशाची उधळपट्टी. बडे बापके बेटे असलेल्या मुलांची मैत्री, पार्टीज, दारू, सगळं सगळं केलं. अनुरागबरोबर शरीरानं जवळ येणं मला अजिबात किळसवाणं वाटत नाही पण त्याने मला नाकारल्यावर मी जे केलं ते नक्कीच किळसवाणं आणि हीन पातळीला जाणारं होतं. उधळणारे मित्र मिळाल्यावर पैशाची कमतरता पडणार नव्हतीच.

अनुरागबरोबरच्या अनुभवातून मी एक गोष्ट नक्कीच शिकले. पुरुषाला इंटरेस्टेड ठेवायचं असेल तर डू नॉट गेट टू क्लोज टू हिम. नुसता दरवाजा किलकिला ठेवायचा, सताड उघडायचा नाही. ह्या एका वाक्यावर मी तीन वर्ष मजेत (? ) काढली.

त्यापुढे काय झालं ते आधी सविस्तर लिहिलं आहेच. प्रोफेशनल लाइफ बद्दल लिहिता लिहिता इतक्या पर्सनल गोष्टींवर येऊन पोचले. आता पुन्हा जिथे माझी गोष्ट सोडली होती तिथून पुढे लिहायला लागेन. गेले बरेच दिवस लिहिता आलं नाही आणि जेव्हा लिहिणं शक्य होतं तेव्हा हे सगळं लिहावं की लिहू नये ह्याचा विचार करण्यात वेळ गेला. त्यामुळे क्षमस्व.

- देवयानी

Thursday, June 23, 2011

(पुन्हा) हाय

हाय,

गेले दोन आठवडे बरंच ट्रॅव्हल होतं. काल रात्रीच परत आले. पुढचे दहा बारा दिवसही पुन्हा फिरावं लागेल असं दिसतंय. त्यामुळे लिखाणाला थोडा उशीर होतोय. अत्यंत सॉरी. त्याबरोबरंच मी ज्याविषयी लिहीत होते त्याविषयीच पुढे लिहावं की त्रासदायक विषय टाळून पुढे जावं ह्याचाही विचार करीत होते. कदाचित ते सगळं अतिरंजित वाटण्याचीही शक्यता आहे. अर्थात अजून विचार करतेच आहे.

पण लवकरंच लिहीन. तुमचे मेल्स संवादिनी ने मला फॉरवर्ड केले. इतकं कोणी वाचत असेल असं खरंच वाटलं नव्हतं. खूप बरं वाटलं.

सी यू

- देवयानी

Friday, June 10, 2011

देवयानी (16)

मग काय मला वाटलं, मी त्याला म्हटलं, कटिंग घेणारेस? तो नाही म्हणणार नाही हे मला माहीत होतं. तो हो म्हणाला. मग पुढचा अर्धा तास आम्ही गाडी पार्क करण्यात घालवला. आमच्या घराच्या जवळ गाडी लावायला मिळणं हे कर्मकठीण होतं. उतरलो तसा तो म्हणाला कुठल्या टपरीवर? मी चालत राहिले तसा तोही चालत राहिला. मी आमच्या बिल्डिंगमध्ये शिरायला लागले. अनुराग माझ्या बाबांना भयंकर घाबरायचा. त्यामुळे तो आत शिरायलाच तयार होईना. आई बाबा कोकणात गेलेत हे त्याला सांगितलं तेव्हा कुठे तो यायला तयार झाला.

वरती गेलो मी चहा केला. मग बराच वेळ गप्पा मारत बसलो. तास दीड तास असेल, पण अनुरागबरोबर पंधरा मिनिटं घालवली तरी मी अख्खा दिवस त्याच्याबरोबरच होते असं मला वाटे. तास दीड तास तर खूपंच झाला. शेवटी तो जायला निघाला. बराच उशीर झाला होता. त्याचा वाढदिवस असूनसुद्धा त्याच्यापेक्षा मीच जास्त साजरा केला तो. बाहेर पडताना मी त्याला विचारलं की कोण कोण येणारे पार्टीला म्हणून. तो म्हणाला नाहीये आज पार्टी. आय ऍम अलोन ऍट होम.

अनुरागला असा भावनाविवश होताना मी पाहिलंच नव्हतं. आय ऍम अलोन ऍट होम. त्याचं हे वाक्य आणि त्याचा तो चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. एकटं असणं म्हणजे काय कठीण काम असतं, हे तेव्हा मला माहीत नव्हतं. पुढे अनेकदा एकटं राहण्याचे, एकटेपणामुले डिप्रेशन येण्याचेही प्रसंग आले. तेव्हा त्याचं काय होत असेल ते आता कळतं मला.

म्हणजे? ह्याला काय रिऍक्ट व्हायचं ते मला कळलं नाही. तो पुन्हा आत आला. पहिल्यापासून सगळं सांगितलं मला. जे मला त्याच्या इतक्या बरोबर असूनही त्यानं कळू दिलं नव्हतं. आई वडिलांमधलं तुटत गेलेलं नातं. दोघांचं सतत बाहेर फिरत राहणं. सकाळी आईचा फोन आला, वडिल तेही विसरले. मोठाल्या घरात नोकरांच्या सोबतीनं वाढला तो. पुढे बोर्डिंग स्कूल, तिथलं एकतेपण वेगळं. बराच वेळ बोलत होता. मी फक्त ऐकत होते. शेवटी बोलून बोलून थकला बहुतेक. थांबला. पुढे काय बोलावं हे मला कळेना. इतकं सगळं दुःख आतमध्ये दाबून हा बाहेरून इतका हसतमूख कसा?

शेवटी तोच उठला म्हणाला जायला हवं. मला वाटतं साडेआठ नऊ झाले असावेत. मीच त्याला विचारलं आता कुठे जाणारेस, तर म्हणाला घरीच. मी म्हटलं थांबतोस का? मी काहीतरी जेवायला बनवते. दोघं जेऊ मग जा. नाहीतरी घरी जाऊन काहीतरी ऑर्डरच करणार ना? तो ठीक म्हणाला.

तेव्हा आणि आताही मी काही ग्रेट कुक नाहीये. शेवटी भुर्जी पाव करायचं ठरलं. नशीबाने घरात अंडी होती आणि बाबांनी सकाळी आणलेला पावही होता. मग मात्र तो पुन्हा नॉर्मल झाला. खूप वेळ गप्पा झाल्या वेळेचा हिशेबच राहिला नाही. अचानक तो म्हणाला, देवी एक सिगरेट ओढली तर चालेल का? सिगरेट? आणि आमच्या घरी? शक्यच नव्हतं. रात्रीचे दहा साडेदहा वाजून गेलेले असतील. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी हळूच बाहेर जाऊन पाहिलं. शेजारच्या काकूंचा दरवाजा बंद झालेला होता. त्यामुळे त्यांच्या नकळत वर गच्चीवर जाणं शक्य होतं. बऱ्याचदा बिल्डींगमधली पोरं गच्चीवर रात्री जमत असत, म्हणून अनुरागला घरीच सोडून मी वर जाऊन पाहून आले. ऑल क्लिअर होतं.

मग अनुरागला गच्चीवर घेऊन गेले. बहुतेक अमावस्या किंवा असपासचा दिवस होता, आकाश निरभ्र होतं आणि चांदण्यांचा सडा शब्दशः पडलेला होता. तरी रिस्क नको म्हणून आम्ही दोघं टाकीच्या मागच्या बाजूला जाऊन उभं राहिलो. अनुरागनं सिगरेट पेटवली. तेव्हा त्या क्षणी मला फार असं मुक्त वगैरे वाटलं. सिगरेटचा वास नाका तोंडात पुर्वीही गेलेला होता, रस्त्यावर, बस स्टॉपवर तो अगदी नकोसा वाटत असे पण आज इथे मात्र तो हवा हवासा वाटला. तो ओढत असलेली सिगरेट मी त्याच्या हातातून घेतली आणि तोंडाला लावून सरळ एक झुरका घेतला. जोरात ठसका लागला, डोळ्यातून पाणी आलं. कुणाला ऐकू जाईल अशी भीतीही वाटली. दुसरा झुरका मात्र तितकासा त्रासदायक नव्हता. मग तिसरा, चौथा, किती झाले कुणास ठाऊक. बराच वेळ आम्ही बोलत बसलो. अनुरागकडे एक चपटी धातूची बाटली होती. ती काढून त्याने त्यातली दारू प्यायला सुरवात केली. मीही प्रयत्न केला पण मला ना त्याची जव आवडली ना त्यामुले घशाला होणारी जळजळ.

खूप म्हणजे खूप मला येत होती. किती वेळ तसा गेला माहीत नाही आम्ही परत घरी आलो. घरी आलो. त्याने आपलं जॅकेट उचललं आणि तो जायला निघाला. तो झेलपाटतंच होता. मला भीती वाटली, मी त्याला म्हटलं की थोडा वेळ थांब जरा दारूचा अंमल उतरू दे मग जा. तो बसला आणि खिशातून त्याने आणखी काहीतरी काढलं. हाताची मूठ उपडी केली आणि त्याच्यावर ती पावडर टाकली आणि एका श्वासासरशी नाकपुडीतून ती आत खेचली. थोडी अजून पावडर काढली आणि मलाही दिली.

त्याने खेचली तशी मीही ती नाकपुडीतून आत खेचली. एका दिवसात, सिगरेट दारू आणि अतिशय उच्चीचं कोक, असा माझा प्रवास झाला.

- देवयानी

Friday, June 3, 2011

देवयानी (15)

कितीही म्हटलं तरी मी उच्च मध्यमवर्गीयही नव्हते. फार फार तर मध्यम मध्यमवर्गीय म्हणता येईल, आणि अचानक अशा ठिकाणी मोठाल्या पार्टीला जायचं, त्या वेळी तरी माझ्यासाठी हे फारंच कठीण काम होतं. माणूस कसा बदलत जातो पाहा. किंवा त्याहीपेक्षा गोष्टी सवयीच्या व्हायला लागतात आणि मग त्या तसल्या मोठाल्या हॉटेलात जाण्याची भीड चेपते. सुरवातीला आपण वेटरशीही अदबीनं बोलत असतो, पुढे नाही म्हटलं तरी थोडे उर्मट होतोच. मला इथे येणं परवडतं असा थोडासा माज माणसात येतो, माझ्याततरी आला.

असो, तर मला भयंकर टेन्शन आलेलं होतं. मी अनुरागच्या मित्रांना ओळखत असले तरी त्यांच्यामध्ये बसून तास दोन तास घालवायची आवड आणि धैर्यही माझ्यात बिलकूल नव्हतं. मग तिथे जाऊन करायचं काय? परत असल्या हायसो पार्टीमध्ये घालण्यासारखे कपडेही माझ्याकडे नव्हते. रात्रभर विचार करून मी सकाळी सकाळी अनुरागला फोन केला. आमच्या घरी तेव्हा फोनही नव्हता. एकतर शेजारी जाऊन फोन करायला लागत असे नाहीतर बूथवर जाऊन. शेजारच्या काकू आणि बूथवरचा आंधळा माणूस दोघेही कान देवून ऐकत राहात. पण काकूंनी ऐकून, देवी मुलांना फोन करते हे बिल्डिंगभर होण्यापेक्षा बूथवरच्या आंधळ्यानं ऐकलं तर मला चालत असे. तसाही तो आंधळा असल्याने मी कोण हे त्याच्या लक्षात येत नसावं असा विश्वास किंवा अंधविश्वास मला होता.

तर मी अनुरागला सकाळी सकाळीच फोन केला. त्याला म्हटलं की बाबा मला येणं जमणार नाही. मला बरं वाटत नाहीये. रात्रभर झोप नाही लागली आणि बरंच काही. त्याने फक्त ऐकून घेतलं. मी फोन ठेवला आणि घरी आले. कॉलेजला जायचाही मूड नव्हता. आई बाबांची घरात लगबग चाललेली होती, त्यांना कोकणात माझ्या एका मामे बहिणीच्या लग्नाला जायचं होतं. मी अभ्यासाचं कारण सांगून त्यांच्याबरोबर जायचं टाळलं होतं. आता घरी एकटीलाच दिवस काढायला लागणार होता.

आई बाबा गेले आणि मी एकटीच घरी बसले होते. साधारण सकाळची अकरा साडेअकराची वेळ असेल आणि दारावर थाप पडली. आता खरं कुणी येण्यासारखं नव्हतं, दार उघडून पाहते तर समोर अनुराग. मला एकदम धक्काच बसला. हा आता इथे कसा? त्यात माझा भयंकर म्हणजे भयंकर अवतार होता. आंघोळही झालेली नव्हती. केस अस्ताव्यस्त होते. मला एकदम कसंतरीच वाटलं.

तो म्हणाला कशी आहेस आता? मी म्हटलं बरी आहे. मला काय झालंय? आणि जीभ चावली. मी त्याला, मला बरं नाहिये ही फोनवर ठोकलेली थाप मी विसरलेच होते, पण सकाळी फोनवर त्याला वाढदिवसाचं विश करायलाही मी विसरले होते. त्याची मला अनुरागने आठवण करून दिली. आता तर मला अगदीच शरमल्यागत झालं. पण अनुरागला त्याचं काही विषेश वाईट वाटलं नव्हतंच. त्याने मला फक्त सांगितलं की आपण बाहेर जातोय आणि त्याच्यासाठी मी आत जाऊन तयार होऊन येणारे. कुठे? कशासाठी? हे प्रश्न तेव्हा अनुरागसाठी माझ्या डिक्शनरीत नव्हते.

आम्ही बाहेर पडलो. संध्याकाळपर्यंत फिरत राहिलो. जेवण, शॉपिंग सगळं केलं. त्याने मला घरी परत सोडलं. गाडीतून मी उतरण्याआधी मला तो म्हणाला की भेटू पार्टीला. मी त्याला माझे प्रॉब्लेम्स सांगितले. मला कसं जमणार नाही तिथे येणं, ते मोठमोठे लोकं, मॅनर्स मला फार ऑकवर्ड होईल वगैरे वगैरे. माझं सगळं त्यानं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाला बरं, पार्टी कॅन्सल. गाडीच्या काचा बंद होत्या म्हणून मी काय म्हणून किंचाळले ते बाहेर ऐकू गेलं नाही. नाहीतर रस्त्यावरची लोकं काय झालं म्हणून गाडीकडे आली असती.

माझा एकंदर आवेश पाहून अनुराग फक्त हासत होता. मी चक्रावून त्याच्याकडे पाहातंच राहिले. शेवटी तोच बोलायला लागला, म्हणाला तूला मी ओळखत नाही का देवी? तुला तिथे तशा पार्टीजमध्ये नाही यायला आवडणार हे मला माहिती नाहिये का? मग मी कशाला तुला इन्व्हाइट करीन तिथे? मी फक्त तुझी गंमत केली. आणि अगदी धीर करून आलीही असतीस तरी आपण दोघंच गेलो असतो की तिथे जेवायला. फिरत्या रेस्टॉरंटमध्ये मजा आली असती तुझ्यासोबत. तू सकाळी म्हणालीस की मला बरं नाहिये तेव्हाच मी ओळखलं तुझं काय बिनसलंय ते. आणि जोरजोरात हसला.

छान. म्हणजे मी काल अख्खी रात्र जागून काढली ती उगाच. एक सेकंद मला त्याचा खूप राग आला, पण दुसऱ्याच क्षणी असं एकदम छान वाटलं. असे मूड स्विंग्ज कसे होतात, हे शब्दात पकडणं कठीण आहे, त्यासाठी बाईच असावं लागतं. हे सगळं, माझ्याबद्दलचं त्याला कसं कळलं? मी पार्टीला येणार नाही वगैरे? आणि म्हणून हा माणूस अख्खा दिवस, त्याचा स्वतःचा दिवस माझ्यासोबत घालवतो? त्याचे घरचे, त्याची मित्रमंडळी ह्यांना सोडून सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा माझ्यासाठी खर्च करतो. अशा मुलीसाठी की जी टेंशनमध्ये त्याला फोनवर विश करायलाही विसरली. हे असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा मनाला आणि शरीराला काय वाटतं ते अचूक शब्दात पकडणार तरी कसं?

त्याला मी फक्त थँक यू म्हणू शकले. आता मला गाडीतून उतरून घरी जायचं होतं, पण मी तशीच तंद्री लागल्यासारखी तिथे बसून राहिले.

- देवयानी

Monday, May 30, 2011

देवयानी (14)

आताशा जीवनाला एक दिशा मिळायला लागलेली होती. अर्थातच ती अनुरागचीच होती. अभ्यास, कॉलेज हे नावापुरताच राहिलं होतं. दिवस न दिवस आम्ही एकत्र घालवायला लागलो. बऱ्याचदा तो मला घरून, म्हणजे जवळच्या रेल्वे स्टेशनवरून पिक करीत असे. मग दिवसभर आम्ही ह्या ना त्या ठिकाणी भटकत राहू. बऱ्याचदा शॉपिंग, खाणं पिणं ह्यात वेळ घालवत असू. त्याच्याकडे पैशाने भरलेला बॉटमलेस पिट असल्यासारखा तो वागे. हल्ली हल्ली माझाही संकोच चेपलेला होता.

काही वेळा तोही माझ्या घरी येऊन गेला. अर्थात आमच्या घरी त्याला इंप्रेस करण्यासारखं काहीही नव्हतं. तुम्हारे पास गाडी है, बंगला है, लेकीन मेरे पास मा है असं म्हणण्याचीही माझी परिस्थिती नव्हती. म्हणजे गरीब माणसाचे काही इगो पॉइंटस असतात तेही माझ्याकडे नव्हते.

त्यातला एक म्हणजे फॅमिली व्हॅल्यूज. तसे अनेक आहेत. म्हणजे गरीबांना रात्री छान झोप लागते, श्रीमंतांना लागत नाही. गरीब नेहमी सच्चे असतात. वगैरे वगैरे. मला तर ह्या सगळ्या भंपक गोष्टी वाटतात. दोन वेळा जेवायला नाही मिळालं तर लागेल का हो झोप गरीबाला? ह्या महिन्याचं रेशन घेण्याइतकेही पैसे हातात नाहीयेत हे माहीत असलेल्या गृहीणीला लागेल का हो झोप? किंवा नोकरी गेल्येय, पुढच्या महिन्यापासून पैसा आणायचा कुठून हा प्रश्न पडलेल्या माणसाला लागेल का झोप?

कुठेतरी ह्या काळातंच माझी मध्यमवर्गीय मानसिकता बदलत गेली असावी असं मला वाटतं. पैसा सबकुछ नव्हे. पण पैसा जीवनात काही सुखसोयी आणू शकतो, ज्याने आपलं जीवन सुसह्य होतं. म्हणजे सोशालिस्ट मेंटालिटी कडून कॅपिटॅलिस्ट मेंटॅलिटीकडे. अर्थात मी दुसऱ्या टोकाला पोचलेले नाहीये. मी ह्या दोन स्कूल ऑफ थॉटसच्या कुठेतरी मध्ये आहे असं वाटतं आणि मनापासून वाटतं की मी जन्मभर तिथेच राहावं.

असो पुन्हा बरंच विषयांतर केलं. बारावीचं वर्ष आणि एफ वायचं, एस वायचं वर्ष ही माझ्या आयुष्यातली खूप सुंदर वर्ष होती. ह्याचं सगळं श्रेय अनुरागचं. अभ्यास, पुस्तकं, मार्क्स ह्या पलीकडेही काही जग असतं आणि त्या जगात वावरण्याचा माणसाला त्याच्या आयुष्यात आणि प्रोफेशनल लाइफमध्येही फायदा होऊ शकतो. शब्दात व्यक्त करू शकणार नाही इतका आनंद मला ह्या वर्षांनी दिला.

मेक ओव्हर, मेक ओव्हर जो म्हणतात ना तो माझ्या ह्या तीन वर्षांत झाला. माझा वॉर्डरोब बदलला, हेअर स्टाइल, शूज, सगळं सगळं बदललं. हा सगळा बदल अनुरागमुळे. अर्थात पुढे मी अजूनही बदलले. पण तरीही काकूबाई सदरात मोडणारी मी आजू बाजूच्या माझ्या वयाच्या मुलींसारखी तरी दिसायला लागले, बोलायला, हसायला लागले. रस्त्यातून जाताना पुरुषांच्या नजरा वळून वळून माझा पाठलाग करायला लागल्या. आणि खरं सांगते, ते सगळं मला आवडत होतं. अजूनही माझ्याकडे कुणी वळून बघितलं ही मनातला अहं कुठेतरी सुखावतोच.

अर्थात ह्यालाही मर्यादा आहे. डोळ्यात पाहणारे पुरुष मला आवडतात. पण सहसा डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमत असलेला पुरुष विरळा आहे. तो खेळ मजेदार आहे. डोळ्यात डोळे घालून एखाद्याने आव्हान द्यावं. तिनं ते आव्हान स्वीकारावं आणि पहिली नजर कोण हटवतो ह्यावर पराभव ठरावा. अशा स्पर्धेत पराभव स्वीकारायला मला नक्की आवडलं असतं पण वारंवार तसं घडलं नाही. किळसवाणी नजर शरीरावरून फिरवणारेच अधीक. त्यांची मला कीव येते. डिप्राइव्हड हा एकंच शब्द त्यांना चपखल बसतो. अर्थात त्या मागची सोशिओ इकॉनॉमिक कारणं बरीच आहेत. वाईट नजरेनं बघणाऱ्याला तो बघतो म्हणून त्याला वाईट ठरवणंही चुकीचंच आहे. तो तसं का करतो हेही कुठेतरी, विशेषतः भारतात, आणि त्यातही मुंबईसारख्या शहरात, तपासून बघण्याची आवश्यकता आहे. पण ते सगळं नंतर कधीतरी.

सांगायचा मुद्दा हा होता की ह्या दोन वर्षात माझ्यात अमूलाग्र बदल झाले. ते बदल सुखावणारे होते, आपण कुणालातरी हव्याशा वाटतो, ह्या फिलींगमध्ये जो आनंद आहे ना, तो अवर्णनीय आहे. तो मी इतकी वर्ष चखलेला नव्हता, तो आता मिळायला लागलेला होता.

होता होता सेकंड इयरची परीक्षा अगदी जवळ आलेली होती. माझा आभ्यास नेहमीसारखाच अनुरागमय होण्यापासून उरलेल्या वेळात रडत खडत चाललेला होता. अनुरागचा वाढदिवस हा साधारण वार्षिक परीक्षेच्या आधी येत असे. गेली दोन वर्ष त्याने मला सेपरेट ट्रीट दिलेली होती. पण यंदा त्याने मला प्रत्यक्ष त्याच्या बर्थडे पार्टीला येण्याचं आमंत्रण दिलं. त्याच्या मित्रांमध्ये त्याने मला विशेष मिसळू दिलेलं नव्हतं. पण गेली दोन वर्ष आम्ही इतके एकमेकांसोबत होतो की थोडीफार ओळख झालेलीच होती. मरीन ड्राइअव्हच्या एका आलिशान हॉटेलमध्ये पार्टी ठेवलेली होती. बरीच मोठमोठी माणसं येणार होती. त्यात आपण अगदी अलिबागवरून आल्यासारख्या दिसू असं मला उगाचंच वाटत होतं.

- देवयानी

Tuesday, May 24, 2011

देवयानी (13)

बारावीची परीक्षा झाली. मार्क यथा तथाच मिळाले. पण माझ्या मानसिकतेत इतका बदल झालेला होता की पास होणं हेच माझं उद्दिष्ट होतं. ते तर नक्कीच झालं होतं. अनुराग म्हणाला तशी मला बी. एस्सी. ला ऍडमिशनही मिळाली होती. मनात कुठेतरी अजूनही रिसर्चमध्ये जायचं होतंच. पण त्याला अजून चांगली तीन वर्ष होती. तोपर्यंत डोक्यावर कसलंच ओझं घेण्याची गरज नव्हती. अनुरागची सोबत होतीच. दिवसेंदिवस मी त्याच्या अधिकाधिक जवळ जात होते. त्याच्या मनात तसं काही नसणार ह्याची मला खात्री होती. पण केवळ त्याच्याबरोबर असण्यानेच मला एवढा आत्मविश्वास वाटत असे की (त्याला) नको त्या विषयावर बोलून मला त्याला कायमचं गमवायचं नव्हतं.

आजच्या माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये हा प्रश्न वारंवार माझ्यासमोर उभा राहतो. एखाद्या माणसाशी कुठेतरी ओळख होते. विमानात म्हणा, सेमिनारमध्ये म्हणा. त्याच्याकडून चांगला बिझनेस मिळण्याचं पोटेन्शिअल दिसत असतं. पण बऱ्याच वेळा तुम्ही विकायला लागलात की समोरचा माणूस एकदम गार्ड घेऊन उभा राहतो. खरंतर त्याचं नुकसान नसतं काही, पण केवळ समोरचा माणूस आपलं ऍडव्हांटेज घेऊ पाहातय ह्या विचारानेच तो सतर्क होतो आणि संबंध बिघडतात.

अनुरागबाबतंही असंच होण्याची शक्यता होती. मी त्याला सांगितलं असतं की तो मला आवडतो तर कदाचित तो माझ्यापासून तुटला असता, दूर गेला असता. म्हणूनंच माझ्या मनातलं मी त्याला सांगायचं टाळलं. टाळतंच आले. त्याच्याशी मैत्री असणंसुद्धा माझ्यासाठी स्वर्गसूख होतं.

दिवस जात गेले. एक दिवस त्याने मला घरी बोलावलं. पुन्हा त्यातून मी नको ते, किंवा मला हवे ते अर्थ काढायला लागले. कदाचित आई वडिलांशी ओळख वगैरे करून द्यायची असेल, म्हणून बोलावलं असेल. घाबरतंच मी त्याच्या घरी गेले. मलबार हीलवरच्या एका आलिशान बिल्डिंगच्या सगळ्यात शेवटच्या दोन मजल्यावरचं पेंटहाऊस हे त्याचं घर होतं. माझी कित्येक घरं विकली असती तरी असं एक घर येऊ शकणार नव्हतं. घरात फक्त नोकर चाकर होते. आई वडील कुठे दिसले नाहीत. मी त्याला त्यांच्याबद्दल विचारलं नाही आणि त्यानं आपणहून काही सांगितलं नाही. उंची फर्निचर, सामान सुमान ह्यानीच घर भरलेलं होतं. आपण कुठेही बसलो तरी आपल्यामुळे ते फर्निचर खराब होईल असं वाटावं इतकं सगळं झाकपाक होतं.

अर्थातंच अनुरागला तसं वाटत नव्हतं. घरात शिरताच मी चपला काढल्या तर तो म्हणाला चपला काढायच्या नाहीत. पण खालचं कार्पेट? बाहेरून आपण आणलेली धूळ? नोकर आहेत ना हे त्याचं उत्तर. त्याची खोली (त्या रुमला खोली म्हणणं म्हणजे महालाला हॉस्टेल म्हटल्यासारखं आहे) प्रशस्त होती. समोर खूप झाडं आणि त्याच्याही पलीकडे अरबी समुद्र दिसत होता. रुममध्ये स्वतःचा टी. व्ही, काँप्युटर, एसी आणि बरंच काही.

एक क्षणभर मला वाटलंही. समजा आपण ह्याच्याशी लग्न केलं तर हे सगळं आपलं होईल ना? दुसऱ्याच क्षणी तसं काही होण्याची शक्यता नाही ही रिऍलिटी डोळ्यासमोर चमकली. पण तो एक क्षणही असा ढगांवर तरंगवणारा होता.

त्याच्या बेडच्या बाजूला दोन सिंगल सिटर सोफे होते, त्यातल्या एकावर मी बसून बाहेरचं दृष्य बघत होते. माझी जवळ जवळ तंद्री लागलेली होती. अनुराग पाठून आला आणि त्याने खांद्यावर टॅप केलं. मी त्याच्याकडे पाहिलं तसं त्याने मला समोर पाहायला सांगितलं. समोर भिंतभर आरसा होता. त्यात मी सोफ्यावर बसलेले दिसत होते आणि माझ्यापाठी तो उभा होता. सोफ्यावर ठेवलेले हात त्यानं उचलले आणि दोन्ही हातांनी माझ्या चष्म्याच्या दोन काड्या धरल्या आणि डोळ्यावरून चस्मा उतरवला.

मला ह्या सगळ्याचा अर्थ कळेना. मी वळून त्याच्याकडे पाहिलं. गाडी चुकीच्या रुळावर तर चढत नाही ना असं एक क्षणभर वाटलं. पण तरीही ते सुखदंच होतं. त्याने मला पुन्हा समोर पाहायला सांगितलं, चस्मा समोरच्या कॉफी टेबलवर ठेवला आणि हात पुन्हा सोफ्यावर ठेवले. तो ते माझ्या खांद्यावर ठेवेल असं मला वाटलं होतं. खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याने त्याचे हात माझ्या खांद्यावर ठेवावे असं मला न वाटूनही वाटलं. सेकंद दोन सेकंद अशी संभ्रमात गेली असतील नसतील आणि तो मला म्हणाला देवी तू चस्मा नको लावूस बघ किती सुंदर दिसतेस.

माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाने तू सुंदर दिसतेस असं दिलेलं हे पहिलं काँप्लिमेंट. अगदी मोरपिसासारखं मी जपून ठेवलंय ते. खरंतर मला चस्म्याशिवाय अंधूकंच दिसत होतं. पण तो म्हणाला होता ते चूक असणं शक्यच नव्हतं. तिथून थेट आम्ही काँटॅक्ट लेन्सेस घ्यायला गेलो. मला परवडण्यासारखं नव्हतं, पण अनुरागला नक्कीच परवडण्यासारखं होतं. चस्मा डोळ्याचा गेला तो तिथेच. अर्थात लेन्सेस लावल्या तरी रात्री घरी चस्मा लावायला लागायचाच पण पब्लिक लाइफमध्ये पुन्हा कधीही चस्मा लावला नाही. दोन वर्षापूर्वी लेझर आय करेक्शन करून घेतलं आणि आता तर होता नव्हता तो सगळा चस्मा गेला.

ह्याचं सगळं क्रेडिट मात्र अनुरागलाच. त्यानं त्या दिवशी माझ्या डोळ्याचा चस्मा काढला नसता तर कदाचित आजही तो माझ्या डोळ्याला असता.

- देवयानी

Monday, May 16, 2011

देवयानी (12)

मी वळले तशी त्यानी मला पुन्हा हाक मारली. तू इस्टला चाललीस ना? तो म्हणाला. ह्याला कसं कळलं ते मला कळेना. पण मी काही त्याला विचारलं नाही. नुसतंच हो म्हटलं. मग म्हणाला की मीही तिथेच चाललोय, एकत्र जाऊया. तुलाही सोबत होईल. खरं सांगायचं तर माझी इनिशिअल रिऍक्शन होती, नको. पण काहीही ठामपणे म्हणण्याचा आत्मविश्वासंच माझ्यात नव्हता. मी काहीच म्हणाले नाही आणि तो माझ्याबरोबर येऊन चालायला लागला.

मला घरी पोचायला साधारण वीस मिनिटं तरी लागायची चालत. तितक्या वेळात त्याच्याबद्दल सर्व काही त्याने मला सांगितलं. तो कॉमर्सवाला होता. कॉमर्सवाला म्हटल्यावर माझा आत्मविश्वास जरा वाढला. म्हणजे मार्क नक्की माझ्यापेक्षा कमी असणार. कशी गंमत आहे. आपण कुणाशी बोलतो तेव्हा तो वरचढ की आपण अशी तुलना आपोआप मनात सुरू होते. निदान माझ्यातरी होते. अजूनही होते. मग ती व्यक्ती वरचढ वाटली तर मला बोलताना थोडं टेन्शन येतं आणि मी वाटले तर आत्मविश्वास वाढतो. तसा तेव्हाही वाढला.

त्याला काही शिक्षण, अभ्यास वगैरे ह्यात विशेष रस वाटला नाही. जावंच लागतं म्हणून तो कॉलेजात येत असे. मग इतक्या रात्रीपर्यंत तो लायब्ररीत काय करत होता असं मी त्याला विचारलं, त्यावर त्याने उडवा उडवीची उत्तरं दिली. उडवा उडवीची उत्तरं देणं हा अनुरागचा स्वभावंच होता. पण त्याच्या व्यक्तीमत्वातंच एक भुरळ पाडण्याची क्षमता होती. तशी त्याने मला भुरळ पाडली आणि मी त्याच्याबरोबर चालत राहिले. तो जे काही बोलेल ते ऐकत राहिले, तो जे विचारेल त्याची उत्तरं देत राहिले. आमच्या बिल्डिंगच्या नाक्यावर पोचले तसं माझं घर आलं असं खोटंच सांगितलं त्याला. दोन कारणं होती. आमच्या बिल्डिंगमधल्या कुणी त्याला पाहायला नको आणि मी नक्की कुठे राहते हे त्याला कळायला नको.

किती भाबडेपणा हा? पुढे अनेकवेळा तो घरी येऊन गेला. तोच काय अनेक मित्र घरी येऊन गेले. तिथे आणि इथेही. हळूहळू ती भीतीही चेपली. लोकं काय बोलतंच असतात. म्हणून आपण जगणं थांबवायचं का?

असो, तो गेला पण रात्रभर माझ्या मनात धिंगाणा घालत राहिला. मी अशी बावळट, हा इतका देखणा. माझ्याकडे कुणा मुलाने हसून पाहिलेलंही मला आठवत नव्हतं. हा चक्क आला, बोलला, मला घरी सोडून गेला. का केलं असावं त्यानं? विचारांचं चक्र रात्रभर चालू होतं. सकाळी उठून क्लासला जायला निघाले. आरशासमोर उभं राहून स्वतःला एका वेगळ्याच नजरेने पाहिलं. आपणंही सुंदर दिसू शकतो असा आत्मविश्वास त्या क्षणी मला सर्वप्रथम जाणवला.

पुढे तो रोजच भेटत गेला. अनुराग आजूबाजूला असला की मला एकदम फुलपाखरासारखं वाटायचं. मुळात मला एक आउटलेट मिळालं. हळू हळू मीही त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागले. मनातलं दुःख त्याच्यासमोर सांडू लागले. तो तर प्रचंड बोलका होताच. तो ज्या ज्या काही गोष्टी मला सांगे त्या माझ्यासाठी स्वप्नवतंच होत्या. एक लिहिलंच नाही. तो मराठी नव्हता, पण तरीही माझ्या लंगड्या इंग्लिशची त्याने मला कधी जाणीव करून दिली नाही. माझ्याशी तो हिंदीत बोलायचा. त्याचं इंग्लिश चांगलं होतं. मग मी मुद्दाम त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागले. बोलून बोलून मलाही सवय व्हायला लागली.

त्याचे वडील मोठे बिझनेसमन होते. आय मीन आहेत. born with silver spoon in mouth वगैरे जे लिहितात ना, ते अनुराग प्रत्यक्ष होता. स्वतःची गाडी त्या काळीही होती. अभ्यासाची चिंता नव्हती. पास झाल्यावर बापाचा बिझनेस जॉइन करायचा होता. पण एवढं सगळं असूनही माझ्याशी मात्र तो एकदम चांगला वागत असे. बऱ्याच वेळा तो कॅटीनमध्ये, हॉटेलात यायचा आग्रह करी. पण माझ्याजवळ त्याच्याइतका खुर्दा कधीच नसायचा. मग मी टाळंटाळ करायचे. मग तो काहीतरी कारणाने ट्रीट म्हणून मला घेऊन जायचा, दोघांचे पैसे भरायचा. हळू हळू मलाही त्या सगळ्याची सवय लागली. आवडायला लागलं.

आग्दी स्पष्ट शब्दात सांगायचं तर मला तो अतिशय आवडायला लागला. त्यातल्या त्यात बरे कपडे, केस शक्यतो मोकळे सोडणं, थोडा मेक अप, अगदी मी नवा चस्माही घेतला. जाडा चस्मा फेकून दिला. अनुरागसाठी चांगलं दिसणं, काही ना काही कारणाने त्याच्या अवती भवती असणं मला आवडायला लागलं. आमची मैत्री चांगलीच वाढली. पण ती आमच्या दोघांचीच होती. त्याने मला कधी त्याच्या मित्र मैत्रिणींच्या टोळक्यात येऊ दिलं नाही. मी बऱ्याचदा त्याला विचारलंही, पण तो सारवा सारवीची उत्तरं द्यायचा. ती लोकं चांगली नाहीत असं म्हणायचा. पण तरीही तो त्यांच्यात का जातो ह्यावर त्याच्याकडे उत्तर नसायचं.

पण ह्या सगळ्याने एक मात्र झालं. अभ्यास, मार्क ह्याचा जो ताण माझ्यावर आला होता तो कुठच्या कुठं पळाला. अनुराग मला म्हणायचा की तुला नाही ना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं, मग कशाला टेन्शन घेतेस? पास व्हायचं फक्त की पुढच्या वर्गात ऍडमिशन मिळणारंच आहे. सिनिअर कॉलेजमध्ये कर काय अभ्यास करायचा तो. मलाही ते पटायचं. त्यामुळे सहाजिकंच अभ्यासावरचा फोकस उडाला. जमतंय तेवढं करायचं. आताशा क्लासेस बंक करणं रुटीन झालं होतं. अनुराग मला आधी सांगून ठेवायचा अमुक एक वेळेला भेटायचं मग तेव्हा जगबुडी झाली तरी मी त्याला भेटायचेच. अर्थात मला तो आवडत असला तरी त्याला माझ्यापेक्षा खूप चांगल्या मुली मिळणार होत्या. त्याच्या ग्रूपमध्ये होत्याही. त्यामुळे आवडणं, ह्या पलीकडे काही होऊ शकेल असं मला वाटलं नव्हतं.

- देवयानी

Thursday, May 12, 2011

देवयानी (11)

कॉलेजचे सुरवातीचे दिवस असे त्रासाचे, डिप्रेसिंग गेले. अर्थात जे काही जमत होतं, जसं काही स्मजत होतं, त्याच्या आधारावर आलेल्या परीक्षांना सामोरं जाणं होतंच. अपुरी तयारी, सतत अभ्यासाचा ताण आणि तो ताण मोकळा करण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नसणं. बहुदा साडेसाती साडेसाती म्हणतात ती हीच असावी. आणि खरोखरच ती माझ्याबरोबर सात आठ वर्ष तरी राहिलीच, अगदी मराठे काकांची ओळख होईपर्यंत. अर्थात आताही मला सुखी माणसाचा सदरा किंवा बाईची साडी बिडी मिळालेय असं नव्हे, पण ते दिवस खरंच कठीण होते.

जाता जाता एक वर्ष गेलं. रडत खडत अकरावी पास झाले. कितवा नंबर वगैरे ह्याचा विचारही करण्याजोगे मार्क नव्हते. बुडत्याला काडीचा आधार तसे काठावरचे मार्क घेऊन मी पास झाले. रिसल्ट घेऊन घरी आले. घरी कुणीही नव्हतं. कित्येक तास मी एकटीच बसून होते. विचार करत. तहान भूक हरपली होती. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. दहावीचा निकाल ते अकरावीचा निकाल ह्यात इतका फरक कसा पडला? ह्याचाच विचार करीत बसले. अकरावी पार पडल्याचं थोडं बरं वाटत होतं, पण बारावीचा डोंगर पुढे दिसत होता. कुणी अकरावीचे मार्क विचारत नाही, पण बारावीनंतर नक्की विचारणार, त्यात असे मार्क असले तर काय उत्तर द्यायचं?

आई बाबा घरी आले. अर्थातच रिसल्टबद्दल त्यांनी विचारलं. तो क्षण मला तसाच्या तसा आठवतोय. काय उत्तर द्यायचं? पण दोन क्षणांच्यावर थांबून चालणार नव्हतं. दिलं उत्तर. मारली थाप. दोघांपैकी कुणीही माझा रिसल्ट बघायला मागणार नव्हतं. इतर कोणत्या मार्गाने त्यांना तो कळणंही शक्य नव्हतं. मार्क ऐकले, आई काहीच बोलली नाही. काही बोलली नाही ह्याचा अर्थ मार्क चांगले आहेत असा होता. बाबा म्हणाले बारावीची तयारी चाललेय ना व्यवस्थित? मी हो म्हटलं. विषय संपला. गेलं वर्षभर मी कोणत्या मानसिक अवस्थेतून जात होते हे मी त्यांना सांगू शकले नाही तसं तेही कधी मला विचारू शकले नाहीत. अजूनही मी तेव्हा काठावर पास झाले होते हे त्यांना माहीत नाही. केवढं मोठं खोटं आणि केवढं मोठं दुर्दैव त्या मुलीचं आणि तिच्या पालकांचं? पालकांशी खरं बोलायची हिंमत त्या मुलीत आली नाही. ती तिच्या अंगी यावी म्हणून तिच्या पालकांनी कधी प्रयत्नही केले नाहीत.

आज आयुष्यात अनेकदा खोटं बोलायचा प्रसंग येतो. येतो म्हणजे खोटं बोलणं हा माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहे. अगदी धादांत खोटं नाही, पण अर्धसत्य तरी बोलावंच लागतं. प्रसंगी नरो वा कुंजरोवा करावं लागतं. दर वेळी खोटं बोललं की माझ्या अकरावीच्या रिसल्टची आठवण येते. खरंतर ती उभ्या आयुष्याच्या तुलनेत खूप क्षुल्लक बाब आहे. पण कुठेतरी अजूनही मी त्यांच्याशी खरं बोलले नाही हे बोचत राहातं.

असो, तर अशाप्रकारे अकरावी पार पडली. बारावीचं कॉलेज, क्लासेस करता करता दिवस कसे सरून जायचे कळायचं नाही. पण ज्वालामुखी खदखदत होताच. आल्या दिवसागणिक ताण वाढत होता. परीक्षेला अवकाश असला तरी गेल्या दिवसासरशी ती जवळ येतंच होती. घरातलं वातावरण तसंच मचूळ होतं. घरी जितकं कमी राहता येईल तितकं बरं असं म्हणून मी कॉलेजातंच वेळ काढायला लागले.

माझा असावा असा ग्रूप तोपर्यंत माझा नव्हता. कुणाशी सख्खी मैत्री नव्हती. कॉलेजाबाहेर घर सोडून दुसरी जाण्यासारखी जागा नव्हती. मग काय? कॉलेजातंच बसून राहायचं. सकाळचे क्लासेस, मग एकही लेक्चर, प्रॅक्टिकल्स न चुकवता कॉलेज, सगळं आटपलं की आठ वाजेपर्यंत लायब्ररी. काही मुलं नंतरही बसत तिथे, पण आमच्या कॉलेजपासून माझ्या घरापर्यंत जाणारा रस्ता फार सेफ नव्हता. त्याच्यामुळे मी आठाला निघायचे. रस्त्यावर तेव्हा बर्यापैकी गर्दी असते. मध्ये इस्ट वेस्ट जाणारा एकांडा पूल होता. तो पार करताना मात्र भीती वाटायची. मग मी स्टेशनात गाडी यायची वाट पाहत बसायचे. गाडी आली की कुणी ना कुणितरी वेस्ट इस्ट जाणारं असायचं. मग त्यांच्या पाठोपाठ मी जात राहायचे.

अशीच एकदा मी आठ वाजता लायब्ररीमधून निघाले. आमच्या कॉलेजातून बाहेर पडताना एक मोठ्ठं लॉन लागतं. ते पार केल्यावर गेट आणि मग मेन रोडला लागणारा रस्ता. लॉन पार करून मी गेटच्या दिशेने निघाले तेवढ्यात पाठून हॅलो हॅलो करून कुणीतरी ओरडत आलं. मला अंधारत निटसं दिसलं नाही, पण मी वळून पाहत होते. कॉलेजच्या बाहेर पडलेली नसल्याने भीती वगैरे काही वाटायचा प्रश्न नव्हता. हळू हळू ती आकृती माझ्यासमोर येऊन थांबली. जवळ आला तसं माझ्या लक्षात आलं की तो कुणीतरी मुलगा होता. खरं सांगायचं तर तो अतिशय देखणा होता.

माझं पेन लायब्ररीत राहिलं होतं आणि तो द्यायला तो माझ्या पाठी धावत आला होता. मला मी पेन बाहेर काढलेलंच आठवत नव्हतं. कारण मी काही लिखाण करतंच नव्हते आणि वाचताना पुस्तकात करायच्या खुणा मी पेन्सिलीने करत असे. पण त्याने दिलेलं पेन माझ्यासारखंच होतं. म्हणजे रेनॉल्डसचं. म्हटलं असेल. म्हणून मी ते घेतलं. थँक्स म्हटलं. मग त्याने मला त्याचं नाव सांगितलं. त्याला आपण अनुराग म्हणूया. कारण त्याचं खरं नावंही असं स्वप्नीलंच होतं. मीही त्याला माझं नाव सांगितलं आणि मी घरी जायला वळले.

- देवयानी

Friday, May 6, 2011

देवयानी (10)

कॉलेजचा पहिला दिवस अजूनही स्पष्ट आठवतो. शाळेत असेपर्यंत मी वर्गातल्या सो कॉल्ड हुशार मुलांपैकी एक होते. पण ह्या कॉलेजात माझ्याइतके मार्क मिळालेले अनेक लोक होते. शाळेत वासरात लंगडी गाय शहाणी होती, म्हणून तिचा तोरा होता. पण आता गायींच्याच कळपात आल्यावर लंगड्या गायीकडे कोण लक्ष देणार? भारताचा व्हॉइसरॉय परत इग्लंडला गेला की त्याला जशी स्वतःची ट्रंक स्वतः उचलायला लागायची तसं माझं झालं. आधी म्हटल्याप्रमाणे मी प्रचंड बुजरी आहे. मोठ्या चस्म्याच्या आणि त्याहून भाल्या मोठ्या पुस्तकांच्या आड मी माझं बुजरेपण लपवत असे. ह्या नवीन कळपात आल्यावर मी अजूनंच बुजरी झाले.

सध्या मी जे काम करते, ते काम करणं बुजऱ्या लोकांसाठी नाहीच आहे. सतत लोकांना भेटणं, बोलणं, मोठमोठी फंक्शन्स सेमिनार अटेंड करणं, कधी मधी एखादा पेपर प्रेसेंट करणं. सेल्स प्रेसेंटेशन्स तर अगणीत. हे सगळं करणं त्या मुलीला, चस्मा लावणाऱ्या, शक्य होतं का? म्हटलं तर होतं, म्हटलं तर नव्हतं. ती, म्हणजे मीच आज हे सगळं करते आहे. पण माझ्या नशीबाने माझ्या आयुष्यात जे चांगले वाईट लोकं आले त्यांच्यामुळे हे झालं. आपल्या शिक्षणातलं मला हे नेहेमी खुपतं. का नाही आपली शिक्षणपद्धती बुजऱ्या मुलांना धीट व्हायला शिकवत?

असो, पुन्हा विषयांतर झालं. तर अशी मी कॉलेजात पोचले. आमच्या शाळेतल्या एकूण दोन मुली आणि एक मुलगा ह्या कॉलेजात आले. पैकी मुलगी दुसऱ्या वर्गात पडली. मी आणि तो मुलगा एका वर्गात. पण शाळेत असताना मुलांशी बोलणं हे माझ्यासाठी अशक्यच होतं. खरं सांगायचं तर बोलावसं वाटायचं नाही असं नाही. त्या वयात ते स्वाभाविकच आहे, पण कसलीतरी भीती मनात होती. भीती ही सर्वांच्याच पाचवीला पुजलेली असते. तशी ही मुलं माझी चेष्टा तर करणार नाहीत ना? मला हसणार तर नाहीत ना? अशी भीती माझ्या मनात असायची, त्यामुळे एवढ्या मोठ्या वर्गात एकमेव ओळख असलेल्या मुलाशी ओळख दाखवणंही मला जमलं नाही. त्यात मराठी मिडियममध्ये शिक्षण झालेलं. त्यामुळे इंग्लीश वाक्याची तयारी मनात करून मगंच बोलता यायचं. त्यामुळे दुसऱ्या कुणाशी ओळख करून घेणंही कठीण होतं.

माझ्या आई वडिलांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं नाही, ह्याचा प्रचंड राग मला कॉलेजमधल्या पहिल्या दोन वर्षांत आला. गणित, विज्ञान, सगळं मराठीत झालेलं, अचानक इंग्रजी येणं कठीण होतं. मराठीत माहीत असलेले शब्द, इंग्रजीत वाचले की त्याचा अर्थ कळत नसे. मग डिक्शनरी काढा. अशा अनंत अडचणी येत राहिल्या. घरून काही मदत होईल असं नव्हतंच. वडील त्यांच्या कामात. आईचं शिक्षण बीए. तिला विज्ञानाचा ओ की ठो माहीत नव्हता. अर्थात मी आर्टसला गेले असते तरी तिला काही विचारण्यासारखी परिस्थिती असती असं नाही.

कोपऱ्यात सापडलेल्या मांजरीसारखी माझी अवस्था झालेली. स्वतःच स्वतःबद्दलच्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या होत्या. अमुक एक मार्क मिळालेच पाहिजेत. वर्गात पहिल्या तिनात असलंच पाहिजे. वगैरे वगैरे. स्पष्ट शब्दात सांगायचं तर अकरावीत असं काही साध्य करण्याची माझी परिस्थिती नव्हती. पुस्तक वाचून त्याचा अर्थ कळेपर्यंत अनेक दिवस जात. वर्गात शिकवलेलं नीट कळत नसे. कळलं नाही तर भर वर्गात उठून उभं राहून ते विचारावं इतकं धाडस नव्हतं. किंबहुना आपण सांगितलेलं वर्गातल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला न कळण्याची शक्याता आहे हेच मुळी शिकवणाऱ्यांचा गावी नव्हतं. चांगले मार्क घेऊन आलेली मुलं इथे आलेली आहेत, ती हुशार असणार, त्यांना सगळं येतं. ह्याच गृहितकावर तिथल्या शिक्षणाची थिअरी आधारलेली होती.

तारे जमीन पर मध्ये इशान अवस्थीचं बोर्डिंग स्कूलमध्ये जे झालं तेच माझं कॉलेजात होत होतं. चारही बाजूंनी कोंडी होणे म्हणजे काय हे मी अनुभवलंय. स्वतःच्या आणि इतरांच्या स्वतःबद्धलच्या अपेक्षा पूर्ण न होणं, हे एका पंधारा सोळा वर्षाच्या मुलीवर केवढं संकट असेल. त्यात शरीर एका वेगळ्या अवस्थेतून जात असतं, हालवून सोडणारे आतर्बाह्य बदल होत असतात. बरं कुणाकडे मन मोकळं करावं तेही नाही. घरी आईशी काही बोललं तर ती मलाच ओरडणार, वडिलांशी बोलायची सोयंच नव्हती, बरं जवळचे कुणी मित्र मैत्रिणी असतील तर तसंही नाही. मग काय करायचं, मनातल्या मनात कुढत बसायचं.

ह्या गोष्टी एकंदतीत जगण्यावरंच मळभ आणतात. ह्यालाच डिप्रेशन म्हणतात हे पुढं मोठं झाल्यावर कळलं. उगाच नाही छोट्या छोट्या मुली, मुलं पंख्याला फास लावून आत्महत्या करतात. माझ्या सुदैवाने आत्महत्या करावी, किंवा अत्महत्या करणे हाही एक पर्याय असू शकतो, हे माझ्या मनातही आलं नाही. कुणी सांगावं मी काय करून बसले असते?

अशा अवस्थेत सापडलेल्या मुलांचं काय होतं? दोन पर्याय असतात. एक म्हणजे स्वतःला सावरणं आणि असल्या परिस्थितीला तोंड देणं. पण हे करायला कुणाचातरी आधार लागतो. वडिलधाऱ्यांचा, मित्रांचा, मैत्रिणींचा, शिक्षकांचा किंवा मुळातंच तुम्ही कणखर असणं आवश्यक असतं. हे घडलं नाही तर काय घडू शकतं? न्यूनगंड. मी चांगली नाहीच आहे, मी ढ आहे, मी बावळट आहे, मला काहीच धड करता येत नाही, मला अक्कल नाही, असं स्वतःच स्वतःला पटवून द्यायचं, थोडक्यात परिस्थितीला शरण जातेय असं खोटंच स्वतःला भासवायचं आणि हातावर हात ठेऊन बसून राहायचं.

मीही अगदी तसंच केलं.

- देवयानी

Thursday, May 5, 2011

देवयानी (9)

आता थोडंसं आणखी मागे जाते. लिहिण्याचा क्रम ठरवून लिहिलं असतं तर फार बरं झालं असतं, पण मध्येच मला वाटायला लागलं की फक्त प्रोफेशनल लाइफ आणि प्रॉब्लेम्सबद्दल लिहिताना, थोडं पर्सनल लिहिणं आवश्यक आहे. अगदी खूप जुनं नाही लिहिणार, म्हणजे शाळा वगैरे. पण कॉलेजचा मात्र आधी उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या आयुष्यावर खूप मोठा पगडा आहे.

तसा माझ्यावर बऱ्याच लोकांचा पगडा आहे. किंबहुना माझं व्यक्तिमत्व असंच आहे की मी सहज कुणाच्याही भजनी लागते. जे दिसतं तेच खरं असतं अशी स्वतःची समजूत करून देण्याचा भाबडेपणा माझ्यात आहे. पण ह्याच भाबडेपणामुळे अनेकदा हात पोळले गेले. एकदा जीभ पोळली की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो ह्या न्यायाने मग सगळंच खोटं वाटायला लागतं. जे खरं आहे त्याच्यावरही संशय घेतला जातो.

पण अगदी कॉलेजच्या आधी म्हणजे खूप लहान असताना, अगदी बाळ असतानासुद्धा, कुणी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले असतील तर ते माझ्या आजोबांनी. आजोबा माझे प्रचंड हुषार होते, वाचनाचं त्यांना प्रचंड वेड. त्यांची पुस्तकं अजूनही कधी घरी गेले तर मी उघडून बसते. फार नव्हती, पण जी होती ती फार छान छान होती. थोडक्या पैशावर संसार चालवायचे त्यांचे दिवस, त्यात पुस्तकासारख्या चैनीसाठी पैसा आणायचा कुठून?

त्यांनी अगदी बाराखडीपासून मला शिकवलं. आकडे शिकवले. त्याचा पुढे काय उपयोग झाला किंवा झाला नाही मला माहिती नाही, पण ह्या सगळ्यामुळे आजोबा माझे डियर फ्रेंड झाले. खरंतर आजोबांचा धाक प्रचंड होता. माझे बाबापण त्यांना घाबरत, पण मला मात्र ते कधी ओरडले नाहीत. अर्थात त्यांच्या नजरेतंच जरब होती, त्यामुळे त्यांना ओरडण्याची वेळ फार वेळा मी येऊ दिली नाही. आजोबा गेले तो दिवस मला अंधूक आठवतो. ते परतंच येणार नाहीत हे शक्यच नाही असं मी माझ्या मैत्रिणीला सांगितलेलंही आठवतं. मोठ्यांच्या जगातले नियम छोट्यांना कुठे लागू पडतात? अगदी मध्ये संदीप खरेची कविता ऐकली, मी पप्पाचा ढापून फोन, त्यात तो मुलगा नाही का बाप्पाला सांगतो, आमच्या अप्पांना परत धाडून दे, नाहीतर फोन जोडून दे. तेव्हासुद्धा अजोबांची खूप आठवण आली.

आईचं आणि माझं कधीच विशेष पटलं नाही. ती वाईट आहे असं नाही, पण नाही आमचं विशेष जमलं. प्रत्येक गोष्टीत तिचं मत माझ्यावर लादायची तिला सवय आहे. अगदी लहानपणापासून. आणि गंमत अशी व्हायची की मला जे हवं असतं ते नेमकं तिला मी करावं असं वाटत नसतं. काही अपवाद सोडले तर असं नेहमीच होत आलेलं आहे, त्यामुळे नकळतंच तिच्या मनात माझ्याविषयी आणि माझ्या मनात तिच्याविषयी एक आढी निर्माण झालेली आहे. आम्ही दोघी एकमेकांशी बोलतो. एकत्र राहतो म्हणजे एकमेकांना टाळणं शक्य नसतंच, पण ती फक्त एक ऍडजस्टमेंट आहे असं मला आणि बहुतेक तिलाही वाटत असावं. नवरा बायकोतल्या ऍडजस्टमेंटबद्दल आपण वाचतो, किंवा सासू सुनेबद्दल वाचतो. पण तसंच काही आई आणि मुलीतही असू शकतं? अजूनही कधी कधी आमचं भांडण होतं. दोघीही आम्ही अगदी तावा तावानं भांडतो, मग शोवटी तिला नाही तर मला आवरत नाही आणि रडू फुटतं, मग भांडण थांबतं.

आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्त्यातला, आहे जरी पत्त्यातला तो नाही तसा पत्त्यातला. भाऊसाहेब पाटणकरांचा हा शेर माझ्या वडिलांना चपखल बसतो. आहे जरी पत्त्यातला नाही तरी पत्त्यातला. संसार केला, पण संसारात कधीही त्यांना आनंद मिळाला नाही. समाजसेवा हा त्यांचा छंद होता. त्यापायी त्यांनी खूप वेळ आणि पैसा आयुष्यात खर्च केला. मला काही कमी पडू दिलं असं मुळीच नाही, पण पाटी, पुस्तक, बरे कपडे ह्यापुढे मुलांची काही भावनीक गरज असते. त्यात आईचं आणि माझं कधीच चांगलं नव्हतं, बरं मला दुसरं भावंड नाही, सहाजिकंच माझा ओढा बाबांकडे अधिक होता. पण मला म्हणावा तसा प्रतिसाद कधीच मिळाला नाही. त्यांच्या मिटिंगा, त्यांचे दौरे चालू असत. त्यासाठी त्यांनी अनेकदा कामवरून सुट्टी घेतली असेल. पण मला कुठे फिरायला घेऊन गेलेत असं कधी झालं नाही. पुढे पुढे तर ते संन्यास घेतल्यासारखेच वागायला लागले. माझ्या आयुष्यात उलथापालथी झाल्या, पण टोचून बोलण्याशिवाय त्यांनी दुसरं काहीही केलं नाही. कधी मायेनं पाठीवर हात फिरवून दोन शब्द बोलले असतील? कधी आम्ही तिघांनी घरात मस्त गप्पा मारल्या असतील? एकत्र कधी फिरायला गेलो असू? असं कधी झालंच नाही.

शाळेत असताना मी कुढत बसायचे. एखाद्या मैत्रिणीने वाढदिवासाला घरी बोलावलं, तर तिच्या बाजूला केक कापताना तिचे आई बाबा आनंदाने उभे असलेले पाहून मला हेवा वाटायचा. माझ्या वाढदिवसाला, रव्याचा केक घरी व्हायचा. तो बाहेरून आणलेल्या केकसारखा कधीच लागत नसे. पैसे नव्हते असं नाही, पण मुलीचा आनंद ही जगातली सर्वात शुल्लक गोष्ट असल्यासारखे माझे वडील वागत.

खरंतर मुळात मी खूप संवेदनाशील आहे. पण ह्या सर्व गोष्टींनी मला एकदम बोथट बनवलं. एनजीओ, त्यात काम करणारे लोकं हे विलक्षण दांभिक असतात असं मला आजही वाटतं. लोकांच्या मुलांना सांभाळत फिरता ना तुम्ही? मग स्वतःच्या मुलांनाही तो आनंद द्या ना कधीतरी? असो, सगळे लोक असे नसतील, पण आपली मतं आपण जे अनुभवलं त्यावरूनंच होतात ना?

शाळेत असेपर्यंत मला जवळच्या अशा मैत्रिणी नव्हत्या. ज्या होत्या त्या काळाच्या ओघात दूर गेल्या, कधी भेटल्या तर हाय हॅलोच्या पुढे बोलायचं काय हा प्रश्न पडतो. त्यांची आयुष्यही खूप वेगळी आहेत. नवरा, मुलं आणि नोकरी ह्याच्या व्यापात त्या अडकलेल्या. शाळेत असेपर्यंत मी एकलकोंडीच होते. पुस्तकं, अभ्यास ह्याचाच मला नाद होता. भला मोठा चस्मा होता. मोठमोठाली वयाला न झेपणारी पुस्तकं वाचण्यात माझ्या आयुष्याचं सार्थक होतं. नशीबानं देवानं बरा मेंदू दिलेला. पुस्तकात वाचलेलं पाठ करून परीक्षेत लिहिता येत होतं. त्यामुळे मार्क्स चांगले मिळत होते. माणसाच्या फक्त स्मरणशक्तीचा विकास करणारी आपली शिक्षणपद्धती आहे. इतका lopsided growth झालेली मुलगी प्रचंड मार्क्स मिळवून दहावी पास होते, हेच कदाचित आपल्या शिक्षणपद्धतीचं अपयश आहे.

खरं हे सगळं लिहायचं नव्हतं. आपल्याच लोकांविषयी आपण इतकी टिका करणं चांगलं नाही, कल्पना आहे, पण ह्या गोष्टी लिहिल्याशिवाय मी आज आहे ती का झाले ह्याचं उत्तर मला स्वतःलाच मिळणार नाही म्हणून लिहिलं गेलं.

अशा पार्श्वभूमीची मी मुंबईतल्या एका अव्वल कॉलेजमध्ये सायन्सला ऍडमिशन घेतली. पुस्तकं वाचायचा, पाठ करायचा आणि पाठ केलेलं लिहायचा सराव होताच, त्यामुळे तीच modus operandi वापरून इथेही आपण so called यशस्वी होऊ असा मला अत्मविश्वास होता, पण व्हायचं वेगळंच होतं.

- देवयानी (9)

Thursday, April 28, 2011

देवयानी (8)

आयुष्य थोडं सोपं झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. ती पण एक गंमतच आहे. म्हणजे गोष्टी सोप्या होतायत असं वाटायला लागलं की काही ना काही कारणाने काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होतातच. असो, पण नव्या ऑफिसातले ते दिवस मात्र खूपच मजेत गेले. ऑफिसात तोरा मिरवायला मिळायचा. वर समोर जे दिसत होतं ते निर्माण करण्यात खारीचा वाटा का होईना आपला आहे हे पाहून अभिमान वाटत होता.

तीन क्लायंट आणि एकशेपन्नासचा हेडकाउंट झाल्यावर सहाजिकंच मार्केटमध्ये आमचं वजनही वाढलं. आतापर्यंत आम्ही कामं हुंगत फिरत होतो, अता कधीमधी एखाद्या कस्टमरची एंक्वायरी स्वतःहून यायला लागली. कंपनीचं काम वाढत होतं तसं माझंही काम वाढत होतं. दौरे वाढत होते. ह्या दरम्यान कधी मिळणार नाही इतकं फिरायला मिळालं. अगदी गल्फ, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, सगळीकडे फिरून आले. कामाची गडबड असायची पण तरीही वेळ काढून आणि मुख्य म्हणजे खिशात खुळखुळत असलेले स्वतःचे पैसे खर्च करून आजूबाजूची ठिकाणं पाहून आले.

प्रवासात आणखी एक छान गोष्ट होते, ती म्हणजे आपल्याला स्वतःला स्वतःचा असा वेळ मिळतो. आणि मला विचार करायला खूप आवडतं. एकंदरित आयुष्याबद्दल विचार करण्यात मी माझे बरेचसे प्रवास खर्च केले आहेत. पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या सांनिध्यात घालवलेली संध्याकाळ अगदी मला ताजमहालाची आठवण आणून गेली. आल्प्सची शिखरं कुठेतरी आपल्या धरमशालाची आठवण करून गेली. ह्या सगळ्या गोष्टी पाहताना मनात विचारांचं काहूर उडतं. मला थोडंसं फिलॉसॉफिकल पण व्हायला होतं. का आपण हे सगळं करत असतो? का जीवाच्या आकांताने आल्या दिवसाशी भांडत असतो? का शक्य नसतं आपल्याला त्या दिवसाच्या कुशीत विसावून आयुष्य सुखाने घालवणं?

असे अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करत राहणे. शिवाय पर्सनल फ्रंटवरही बऱ्याच गोष्टी घडत होत्या. आई बाबांचा लग्नासाठी तगादा लागलेला होता. मला तर लग्न करायचं नव्हतंच तेव्हा. करिअर ऐन भरात आलेलं होतं. आकाशाला गवसणी घालण्याची मनिषा होती. आणि लग्न लग्न तरी का करतात लोकं? मला तर वाटतं marraige is easiest way of insuring your life. प्रचंड इनसेक्युरिटी हे लग्न करण्याचं आणि लग्न न करण्याचंही महत्त्वाचं कारण आहे असं मला नेहमी वाटतं.

माझ्या ट्रीप्सच्या विचार करता करता मीही फिलॉसॉफिकल झाले. असो, तर आयुष्य असं छान चाललेलं होतं, आधी लिहिल्याप्रमाणे गोष्टी सोप्या होतायत असं वाटायला लागलं होतं. मी बांद्र्यात स्वतःचा फ्लॅट भाड्यानी घेणार होते. छोटंसं एक माझं घर करायचं होतं, एकटीचं का असेना पण माझं असणार होतं ते. घरापासून दूर जायचं हे तर मी ठरवलेलंच होतं, फक्त नोकरी मुंबईतच असल्याने ते कठीण झालेलं होतं. पण आता मात्र मला बाहेर पडायचंच होतं. जागा पाहून आले आणि नक्की करणार इतक्यात काकांनी आणखी एक धक्का दिला.

आमची कंपनी टेक ओव्हर करण्याची एक ऑफर आली. i must admit it was too good to be true at that time. इन्व्हेस्टर्सनि मिळून ठरवलं की कंपनी विकायची. आणि पुन्हा एकदा सोप्या होऊ घातलेल्या आयुष्यात एक ट्विस्ट आला. ही कंपनी खूपंच मोठी होती. आमची दीडशे लोकं म्हणजे किस झाडकी पत्ती होती त्यांच्यापुढे.

मला अजूनही आठवतंय मराठे काकांनी मला केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि ही बातमी सांगितली. ऑफर ऐकून मला धक्काच बसला. खरं सांगायचं तर मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. पण मग अचानक पुढे काय? हा प्रश्न निर्माण झाला. मी काकांना सांगितलं की मला त्यांच्याबरोबरंच काम करायचं आहे आणि त्यांचा जो काही नवा प्रोजेक्ट असेल त्यात मी त्यांच्याबरोबर काम करीन.

पुढे घडलं मात्र वेगळंच.

- देवयानी (8)