Monday, October 17, 2011

देवयानी (25)

श्रेयाचं लग्न ही माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट होती. ती तर माझी सख्खी मैत्रीण होतीच, पण तिचा नवरा पीयुष हा देखील माझा चांगला मित्र झालेला होता. लग्नाला बनारसला यायचंच असं मात्र तिनं निक्षून सांगितलं. प्रीतमला ऑफिसच्या कामासाठी परदेशी जायचं होतं. अर्थात तो तसाही आला असता असं नाही. पण त्याला आयतंच कारण मिळालं. मला असं काही कारण नव्हतं आणि मुळात मला तिच्या लग्नाला जायचंच होतं. घरात सगळा पसारा पडलेला होता म्हणून पाय निघत नव्हता.

आणि तिथे मला ओळखणारी ती एकटीच होती. तिला ओळखणारे खूप जण होते, त्यामुळे सतत मला एंटरटेन करणं तसंही तिला शक्य नव्हतंच. त्यामुळे माझं थोडं जाऊ का नको असं होत होतं. शेवटी हिय्या करून मी जायचं ठरवलंच. सोमवार ते शुक्रवार सुटी घेतली. लग्न शुक्रवारी होतं. सगळं आवरून मी रविवार संध्याकाळच्या विमानानं परत येणार होते. बनारसला विमानतळावर उतरले आणि माझ्या नावाची पाटी घेऊन ड्रायव्हर उभाच होता. इथपासून जो राजेशाही थाट सुरू झाला विचारू नका.

श्रेया खरी लखनऊची पण नवऱ्याचं गाव बनारस म्हणून लग्न बनारसमध्ये झालं. इतक्या दूरवरून हे दोघं मुंबईत आले आणि त्यांचं जमलं मुंबईला पण घरं एकाच राज्यात, म्हटलं तर विमानाने अर्ध्या तासावर. असो, त्यामुळे त्यांचं सगळं वऱ्हाड ताज "बेनारस" मध्ये उतरलेलं होतं. श्रीमंती असावी तर अशी. श्रेयाला मी आधीच खूप कटकट केली होती की मला एकटीला सोडू नको, म्हणून श्रेयाची रूम पार्टनर मी होते. खूप मजा केली आम्ही. त्यांचे एकावर एक कार्यक्रम. प्रत्येक कार्यक्रमासाठी खास बनारसी साड्या घेतल्या. खाण्या पिण्याची चंगळ होतीच.

श्रेयाच्या घरचेही सगळे खूप छान होते. प्रत्येकातच एक खानदानीपण होता. श्रेयाचं ते खानदानी सुंदर असणं कुठून आलं असावं त्याचा अंदाज तिथे आला. तिथे खरं संगीत वगैरे वगैरे काहीही होत नाही, पण हल्ली आपल्या मराठी लग्नात जसं हे सगळं होतं तसं तिथेही होतं. मेहेंदी, हलदी, संगीत असे एकावर एक कार्यक्रम झाले.

संध्याकाळी ह्या अशा जायच्या. जमलंच तर सकाळी मी बाहेर फिरायला जायचे. अगदी आपण मुंबईत आवडीने खातो ते बनारसी पानंही खाल्लं. पण ते काही आवडलं नाही. काशी विश्वनाथाचं मंदिर पाहिलं. अगदी लोकं नको नको सांगत असतानाही जाऊन पाहिलं. गाडी आतापर्यंत नेणं म्हणजे मोठं कठीण काम होतं. सगळीकडे चिखल आणि घाण. अगदी कसतरीच वाटलं. गंगेचे घाट मात्र आवडले, समोरच्या बाजूने. आपल्या बाजूचा घाट गलिच्छ वाटतो पण समोरच्या बाजूचा खूप छान वाटतो. मागे कुणीतरी सांगितलं होतं की इथे अर्धवट जळकी प्रेतं टाकतात गंगेत. ती काही मला दिसली नाहीत. एकदा वाटलं निदान पाय तरी पाण्यात बुडवावेत, पण धीर झाला नाही.

गुरवारी रात्री मोठा समारंभ होता. शुक्रवारी संध्याकाळी लग्न. खूप मजा करून आम्ही दोघी हॉटेलच्या रूमवर परतलो. श्रेयाला म्हटलं कसं वाटतंय? ती काही बोललीच नाही. मीच विचार करत राहिले, कसं वाटत असेल लग्नाच्या आधीच्या रात्री. पहिला विचार माझ्या मनात आला तो म्हणजे उद्यापासून प्रायव्हसी नाही. दुसऱ्या कुणाबरोबरतरी सतत राहायचं. आणि ह्या विचारावर माझं मलाच हसायला आलं. बराच वेळ आम्ही दोघी गप्पा मारत बसलो. तिची लव्ह स्टोरी तिनं (पुन्हा) मला सांगितली. मीही नव्यानं ऐकल्यासारखी पुन्हा ऐकली. तिला जे हवं ते तिला मिळालं म्हणून मला मनापासून आनंद झाला. पण मला जे हवं ते मला का मिळू नये असं वाटून दुःखही झालं.

श्रेयाचा बहुतेक डोळा लागला होता मीही अर्धवट ग्लानीत होते, आणि माझा फोन खणखणला.

- देवयानी

No comments: