Friday, June 10, 2011

देवयानी (16)

मग काय मला वाटलं, मी त्याला म्हटलं, कटिंग घेणारेस? तो नाही म्हणणार नाही हे मला माहीत होतं. तो हो म्हणाला. मग पुढचा अर्धा तास आम्ही गाडी पार्क करण्यात घालवला. आमच्या घराच्या जवळ गाडी लावायला मिळणं हे कर्मकठीण होतं. उतरलो तसा तो म्हणाला कुठल्या टपरीवर? मी चालत राहिले तसा तोही चालत राहिला. मी आमच्या बिल्डिंगमध्ये शिरायला लागले. अनुराग माझ्या बाबांना भयंकर घाबरायचा. त्यामुळे तो आत शिरायलाच तयार होईना. आई बाबा कोकणात गेलेत हे त्याला सांगितलं तेव्हा कुठे तो यायला तयार झाला.

वरती गेलो मी चहा केला. मग बराच वेळ गप्पा मारत बसलो. तास दीड तास असेल, पण अनुरागबरोबर पंधरा मिनिटं घालवली तरी मी अख्खा दिवस त्याच्याबरोबरच होते असं मला वाटे. तास दीड तास तर खूपंच झाला. शेवटी तो जायला निघाला. बराच उशीर झाला होता. त्याचा वाढदिवस असूनसुद्धा त्याच्यापेक्षा मीच जास्त साजरा केला तो. बाहेर पडताना मी त्याला विचारलं की कोण कोण येणारे पार्टीला म्हणून. तो म्हणाला नाहीये आज पार्टी. आय ऍम अलोन ऍट होम.

अनुरागला असा भावनाविवश होताना मी पाहिलंच नव्हतं. आय ऍम अलोन ऍट होम. त्याचं हे वाक्य आणि त्याचा तो चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. एकटं असणं म्हणजे काय कठीण काम असतं, हे तेव्हा मला माहीत नव्हतं. पुढे अनेकदा एकटं राहण्याचे, एकटेपणामुले डिप्रेशन येण्याचेही प्रसंग आले. तेव्हा त्याचं काय होत असेल ते आता कळतं मला.

म्हणजे? ह्याला काय रिऍक्ट व्हायचं ते मला कळलं नाही. तो पुन्हा आत आला. पहिल्यापासून सगळं सांगितलं मला. जे मला त्याच्या इतक्या बरोबर असूनही त्यानं कळू दिलं नव्हतं. आई वडिलांमधलं तुटत गेलेलं नातं. दोघांचं सतत बाहेर फिरत राहणं. सकाळी आईचा फोन आला, वडिल तेही विसरले. मोठाल्या घरात नोकरांच्या सोबतीनं वाढला तो. पुढे बोर्डिंग स्कूल, तिथलं एकतेपण वेगळं. बराच वेळ बोलत होता. मी फक्त ऐकत होते. शेवटी बोलून बोलून थकला बहुतेक. थांबला. पुढे काय बोलावं हे मला कळेना. इतकं सगळं दुःख आतमध्ये दाबून हा बाहेरून इतका हसतमूख कसा?

शेवटी तोच उठला म्हणाला जायला हवं. मला वाटतं साडेआठ नऊ झाले असावेत. मीच त्याला विचारलं आता कुठे जाणारेस, तर म्हणाला घरीच. मी म्हटलं थांबतोस का? मी काहीतरी जेवायला बनवते. दोघं जेऊ मग जा. नाहीतरी घरी जाऊन काहीतरी ऑर्डरच करणार ना? तो ठीक म्हणाला.

तेव्हा आणि आताही मी काही ग्रेट कुक नाहीये. शेवटी भुर्जी पाव करायचं ठरलं. नशीबाने घरात अंडी होती आणि बाबांनी सकाळी आणलेला पावही होता. मग मात्र तो पुन्हा नॉर्मल झाला. खूप वेळ गप्पा झाल्या वेळेचा हिशेबच राहिला नाही. अचानक तो म्हणाला, देवी एक सिगरेट ओढली तर चालेल का? सिगरेट? आणि आमच्या घरी? शक्यच नव्हतं. रात्रीचे दहा साडेदहा वाजून गेलेले असतील. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी हळूच बाहेर जाऊन पाहिलं. शेजारच्या काकूंचा दरवाजा बंद झालेला होता. त्यामुळे त्यांच्या नकळत वर गच्चीवर जाणं शक्य होतं. बऱ्याचदा बिल्डींगमधली पोरं गच्चीवर रात्री जमत असत, म्हणून अनुरागला घरीच सोडून मी वर जाऊन पाहून आले. ऑल क्लिअर होतं.

मग अनुरागला गच्चीवर घेऊन गेले. बहुतेक अमावस्या किंवा असपासचा दिवस होता, आकाश निरभ्र होतं आणि चांदण्यांचा सडा शब्दशः पडलेला होता. तरी रिस्क नको म्हणून आम्ही दोघं टाकीच्या मागच्या बाजूला जाऊन उभं राहिलो. अनुरागनं सिगरेट पेटवली. तेव्हा त्या क्षणी मला फार असं मुक्त वगैरे वाटलं. सिगरेटचा वास नाका तोंडात पुर्वीही गेलेला होता, रस्त्यावर, बस स्टॉपवर तो अगदी नकोसा वाटत असे पण आज इथे मात्र तो हवा हवासा वाटला. तो ओढत असलेली सिगरेट मी त्याच्या हातातून घेतली आणि तोंडाला लावून सरळ एक झुरका घेतला. जोरात ठसका लागला, डोळ्यातून पाणी आलं. कुणाला ऐकू जाईल अशी भीतीही वाटली. दुसरा झुरका मात्र तितकासा त्रासदायक नव्हता. मग तिसरा, चौथा, किती झाले कुणास ठाऊक. बराच वेळ आम्ही बोलत बसलो. अनुरागकडे एक चपटी धातूची बाटली होती. ती काढून त्याने त्यातली दारू प्यायला सुरवात केली. मीही प्रयत्न केला पण मला ना त्याची जव आवडली ना त्यामुले घशाला होणारी जळजळ.

खूप म्हणजे खूप मला येत होती. किती वेळ तसा गेला माहीत नाही आम्ही परत घरी आलो. घरी आलो. त्याने आपलं जॅकेट उचललं आणि तो जायला निघाला. तो झेलपाटतंच होता. मला भीती वाटली, मी त्याला म्हटलं की थोडा वेळ थांब जरा दारूचा अंमल उतरू दे मग जा. तो बसला आणि खिशातून त्याने आणखी काहीतरी काढलं. हाताची मूठ उपडी केली आणि त्याच्यावर ती पावडर टाकली आणि एका श्वासासरशी नाकपुडीतून ती आत खेचली. थोडी अजून पावडर काढली आणि मलाही दिली.

त्याने खेचली तशी मीही ती नाकपुडीतून आत खेचली. एका दिवसात, सिगरेट दारू आणि अतिशय उच्चीचं कोक, असा माझा प्रवास झाला.

- देवयानी

8 comments:

aativas said...

मी तुमचे लेख वाचते आहे .. पण तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे ते कळत नाही .. हा माझा दोष असेलही!

गरीबी, हालअपेष्टा, दारिद्र्य, हिंसा .. इतक पाहिलंय समाजात की मध्यमवर्गीयांच 'मानसिक' दु:ख कृत्रिम वाटत मला .. ते कदाचित त्या त्या माणसांसाठी खर असेलही आणि आयुष्य उध्वस्त करणारही असू शकत हे मला मान्य आहे .. पण अनाथ मुल-मुली , वेश्यांची मुल-मुली, सुधारगृहातली मुल-मुली, झोपडपट्टीतली मुल-मुली यांच आयुष्य आपल्यापेक्षा कठीण असत ..

जे गेलं त्याला पकडून ठेवू नये यातचं शहाणपण असत ..

हा अर्थात अनाहूत सल्ला .. तुम्ही दुर्लक्ष कराल त्याकडे अशी आशा :-)

देवयानी said...

दुर्लक्ष करण्यासारखं त्यात काहीही नाही. मला काहीही संदेश वगैरे द्यायचा नाही. संदेश देणं किंवा आपल्या अनुभवातून दुसऱ्यांना शहाणपण देणं वगैरे फार भंपक गोष्टी आहेत असं माझं मत आहे. शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं आणि एकदा जळलं की पुन्हा जळणार नाही ह्याची सूज्ञ माणूस काळजी घेतोच.

तसंच दुःख हे दुःख आहे. त्याची तीव्रता स्वतः न अनुभवता तुम्ही कशी ठरवू शकता? दुःख पाहणं आणि दुःख स्वतः अनुभवणं ह्यात फरक असतो. गरीबांचं दुःख ते दुःख आणि इतरांचं दुःख ते कमी दुःख हे कसं काय? खरं तर आजच्या जगात मध्यमवर्गाची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी आहे. गरीबांचं दुःख तुमच्यासारख्या लोकांना कळतं. श्रीमंतांचं दुःख मॅनेज करण्याइतके पैसे त्यांच्याकडे असतात. अधल्यां मधल्यांनी काय करायचं?

प्रत्येकाचं आयुष्य कठीण असतं तितकंच सोपंही असतं. मारून मुटकून वेश्या व्यवसाय करायला लावलेल्या मुलीचं दुःख खरं आणि मध्यमवर्गीय घरातल्या वडिलधाऱ्या माणसांकडून अजाणत्या वयात शोषण केलं जाणाऱ्या मुलीचं दुःख खोटं किंवा कमी कसं? प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे, त्याची तुलना करणार तरी कशी?

अर्थात हे सगळे वैचारिक मतभेद. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही विचारलंत, आभारी आहे.

Anonymous said...

I can understand and relate to (some things) you are writing...its nice writing...if I would have read this 4 years back, i would have definitely thought like Aativas!
But Life is a great teacher! It takes you to such places, you have never thought of...
Ani 'Ekatepana' ha jyani experience kelay, tyalach kalel. :(...

Anonymous said...

एका दिवसात, सिगरेट दारू आणि अतिशय उच्चीचं कोक, असा माझा प्रवास झाला.

:o) shaabbass!! :)

Anonymous said...

hey I am regular reader of ur blog its a good oration.
I am nobody to suggest u, but don't do drugs.

Reshma Apte said...

khup sudar likhaan aani khup prachand experience aayushyaacha .........
kharay ,,, adhalya madhalyaanche kaay ..
waiting for next part ,.......
speechless ,,..

Anonymous said...

kiti ti vaat pahavi pudhalya bhagaachi?

Anonymous said...

pudhcha bhag kadhi??? its been 12 days...