Thursday, July 24, 2008

गुड न्यूज आणि त्रांगडं

एक गुड न्यूज.

सोमवारी आमच्या मिशन इंपॉसिबलचा दी डे आहे. आमच्या परीने जे करता येईल ते सगळं केलेलं आहे. बहुतेक काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत.

पण खरी गंमत तर पुढे आहे. दिल्लीमध्ये राजकीय गरमागरमी चालू असताना, आम्ही इथे असून त्यापासून दूर कसे राहू शकू? आमच्या प्रोजेक्टमध्ये सोमवारापासून सत्तापालट आहे. जुन्या लीडला डच्चू देण्यात आला आहे आणि अस्मादिकांना लीडपदाची सूत्र हाती घ्यायचा आदेश मिळालेला आहे. उरलेले दोन आठवडे मी लीड असेन. इतकंच नव्हे तर ह्या प्रोजेक्टनंतर इथेच एक नवा प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे. त्यात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी काम करावं अशी क्लायंटची फर्माइश आहे.

ही झाली बातमी.

आता ह्यामागचं राजकारण. आम्ही इथे आलो तेव्हा मी होते ह्या कंपनीतली एक नवखी नोकर आणि ती होती अनुभवी. साहजिकच ती पुढारी झाली. पण अनुभवी असणं आणि पुढारी असणं ह्यात फरक आहे की नाही? स्वतःचं काम स्वतः करणं आणि दुसऱ्यांकडून ते करून घेणं ह्यात फरक आहे.

मुळात पुढाऱ्याविषयी जनतेला प्रेम वाटायला हवं. विश्वास वाटायला हवा. आमच्या पुढारणीच्या हे गावीही नव्हतं. ती आम्हा सगळ्यांना आणि क्लायंटलाही गृहीत धरून चाललेली होती. माझ्या आणि तिच्या दुर्दैवाने आमच्या दोघांचं फील्ड सेम. मग साहजिकच तुलना होत गेली. मी फार हुशार आहे असं नाही. हवंतर वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणूया, पण मी वरचढ ठरत गेले. आमच्या टीमलाही हे दिसत होतं, क्लायंटलाही हे दिसत होतं. कुठेतरी आपण कमी पडतोय ह्याची जाणीव तिला व्हायला लागली आणि तिथेच माशी शिंकली.

तिचं उणं लोकांना दिसावं म्हणून मी हे करीत नव्हते. हे आपोआप होत होतं. पण तिच्या मनात ते बसलं. मी हे सगळं मुद्दाम करतेय असं तिने स्वतः ठरवून टाकलं. आणि सुरू झालं एक युद्ध. अर्थातच तिचं पारडं जड होतं. सगळे प्रोजेक्ट रिव्ह्यू तिच्याकडून वर जात होते. ऑन फील्ड काहीही होत असलं तरी ती सांगेल तो इतिहास होणार होता. मला मानसिकरीत्या खच्ची कसं करता येईल ह्याचाच ती विचार करायला लागली आणि त्यातून जन्माला आलं राजकारण. ते इतक्या खालच्या थराला गेलं, की मी क्लायंट साइडच्या एका बड्या अधिकाऱ्याशी लगट करत असते अशी अफवाही पसरवली गेली.

इथे लिहिलं नव्हतं, पण खूप त्रास झाला. मी जवळ जवळ प्रोजेक्ट सोडून निघून जाणार होते. इतक्या हलक्या दर्जाचं राजकारण मी कधी अनुभवलं नव्हतं. पण माझे इतर कलीग्ज मदतीला धावून आले. त्यांनी मला समजावलं. ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि देअर वॉज अ डिफरंट मी आफ्टर दॅट. मी माझी लढाई स्वतः खेळले आणि जिंकले.

जेव्हा मला ही बातमी समजली की तिला डच्चू दिलाय, मला खूप आनंद झाला. थोडी "ग"ची बाधाही, खोटं कशाला बोलू? तिथेच प्रोफेशनॅलिझम सुटला. सगळं व्यक्तीगत झालं.

रात्री घरी फोन केला. जे चाललं होतं ते अर्थात घरी माहीत होतंच. सगळे खूश झाले. आई फक्त म्हणाली, जास्त हवेत उडू नकोस. आता संपलं ना सगळं? मग जाऊन बोल तिच्याशी. मला अजिबात तिच्याशी बोलायची इच्छा नव्हती.

फक्त आई म्हणाली म्हणून मी तिच्याकडे गेले. रूमचा दरवाजा नॉक केला. काहीच रिस्पॉन्स नाही. पुन्हा नॉक केला. थोड्या वेळाने तिने दरवाजा उघडला. मला बघून ती शॉक्डच झाली. गेला आठवडा आम्ही फक्त मेलमधूनच बोलतोय. तिने मला आत बोलावलं. मी तिच्या बेडवर जाऊन बसले. काय बोलावं काही सुचत नव्हतं. तिला ते सगळं सहन झालं नाही आणि ती एकदम रडायलाच लागली. मग मलाही भरून आलं. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती अजून रडायला लागली. मी तिला सॉरी म्हटलं आणि माझ्या मनात तिच्याविरुद्ध काहीही नाही असंही सांगितलं. ती अजूनच रडायला लागली.

मग मलाही रडायला आलं. मी तिला सगळं पहिल्यापासून सांगितलं. मी तिच्याविरुद्ध कुठेही चुगल्या केल्या नाहीत हेही सांगितलं. तिला खूप वाईट वाटत होतं. मग मात्र तिने माझ्याविरुद्ध केलेल्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. पण त्या अफवेबद्दल मात्र ती काहीच बोलली नाही. मी तिला स्पष्ट तसं विचारलं तर तिने स्वतःच्या मुलीची शपथ घेऊन सांगितलं की तिने असं काहीही केलं नाही म्हणून.

मी तिला माझा हात दिला. तिनेही तो हातात घेतला आणि मनापासून सॉरी म्हणाली. ते मला तिच्या डोळ्यात दिसलं. असा रडत रडत आमच्या भांडणाचा सुखांत झाला. ती ह्या आठवड्यानंतर प्रोजेक्ट सोडून जाईल आणि मी तिची जागा घेईन असं वरून कळलं.

आनंद झाला पण तिच्यासाठी खूप वाईट वाटलं. आई म्हणाली म्हणून मी तिच्याशी बोलले. नाहीतर हा द्वेष मनात कायम राहिला असता, तिच्या आणि माझ्याही. हेच जर आम्ही आधी केलं असतं तर? तिच्या मनात असलेले माझ्याविषयीचे गैरसमज आणि माझ्या मनात असलेले तिच्याविषयीचे गैरसमज आम्ही रोखठोक एकमेकींना विचारले असते तर? नक्कीच हे सगळं ह्या थराला पोचलं नसतं.

असो, एक धडा मिळाला. वरवर माझं काहीही चुकलेलं नाहीये. पण आपली चूक नसेल तरीही आपण पुढाकार घेऊन बोलायला काय हरकत आहे? बोलूनही काही फरक पडला नाही तर गोष्ट वेगळी.
सगळं त्रांगडं झालंय आता. मलाच गिल्टी फीलिंग येतंय. आनंद तर होतोय, पण दुसऱ्या कुणालातरी खाली खेचून तो मिळालाय असं वाटतंय. आई म्हणाली तेच खरं, पाय जमिनीवरच ठेवायला हवेत, यशातही आणि अपयशातही.

हल्ली जरा माझे पोस्टस ऍब्सर्ड होतायत का? कारण मी जे लिहिते ते न वाचता पोस्ट करतेय, वेळ नाहीये म्हणून. ऱ्हस्व दीर्घाच्या चुका आणि टायपोजसाठी क्षमस्व. हल्ली लिहिण्यासारखंही फार घडत नाहिये असं वाटायला लागलंय. त्यामुळे काहीतरी साहित्यिक वगैरे लिहावं असं वाटायला लागलेलं आहे. कसं लिहायचं माहीत नाही, जमेल का माहीत नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? म्हणून पुढच्या आठवड्यात नो दैनंदिनी. पुढच्या आढवड्यात काहीतरी साहित्यिक वगैरे. बाबा म्हणतो, की कलाकृती कळली नाही की तिचं फार कौतूक होतं. बघुया, न समजणारं काही लिहिता येतंय का ते.

- संवादिनी

18 comments:

suchiti said...

Hi dear!
Mi oficela ale ki tuza blog ughdte.Je tu lihle ahes te sagle mazya babtit pan ghadle ahe 2 mahinyanpurvi.
Apan aple kam imandarine karayche ani ashya lokanbaddal kahi vait vatun ghayyche nahi .
Tu lihites khup sunder.
Congaratulation for taem leader
and all the best for ur new project.
Bye and TC

Deep said...

काँग्रट्स! लीडरबाई. जे काही लिहिताय ते अजुन तरी आवडतय कारण कदाचित चुकीच असेल पण सहज, सोप, आणी सुंदर लिखाण!

मलाच गिल्टी फीलिंग >>> घ्या आता ह्यात तुझी काहीही चुक नसतना गिल्टी फीलिंग?

काहीतरी साहित्यिक वगैरे लिहावं>> मग लिहावं की आम्ही ?(स्वता:ला आदरार्थी संबोधून:)) ते वाचूदीपक
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

Sneha said...

hmm :) congras!

Jaswandi said...

:)

साहित्यिक लिहीणारेस का? आम्हाला न कळेल असं?
.... शुभेच्छा!!
फक्त आत्ताची संवादिनी अगदी आम्हाला आमच्या एखाद्या जिवलग मैत्रिणीसाठी वाटते, भलं थोर काहीतरी लिहुन आमच्यापासुन दुर जाऊ नको! :)

a Sane man said...

congrats and all the best...

ni chhanach tar aahet posts..sahitya kay na kaLnarach asata? ni tu je he lihites te kay sahitya nahi?...jarahi paTalela nahiye he...

ni te guilty feeling...aaplya changulpaNacha side-effect aahe to...durlaksh kar! :)

Silence said...

साहित्यीक लिहीणार असाल तरी दैनंदीनीच्या गोष्टीही लिहीत रहा. रोजच घडणार्या साध्या सुध्या गोष्टीही तुम्ही इतक्या छान मांडता की वाचायला खूप मजा येते.

अनिकेत said...

बुद्धीबळात समोरच्याला चारी मुंड्या चित केलं तर वाईट वाटून काय घ्यायचं त्यात? इट्स नथिंग पर्सनल.

तुला तिची मैत्रीण आणि ज्युनिअर म्हणून राहणं आवडलं असतं का आत्ता आहे ती परिस्थिती?

आणि सध्या तरी हा प्रकार कमी असेल, पण हायरारकीत जेवढं वर जाशील, तेवढं हे वाढेलचं ना. नंतरनंतर तुझी प्रोफाईल फोकस्ड होईल, दोन पायर्‍यातला फरक वाढल्याने वरच्याला खाता येणार नाही, स्पेशलायझेशनमुळे एकंदर बाहेरच्या संधी आत्तापेक्षा कमी होतील. मग तुझ्या पायरीवरच्यांनाच खावं लागेलं ना...

आणि यात चुकीचं काय आहे, आपण तीन-चार वेगवेगळ्या भूमिका बजावतो, प्रत्येकात सर्वोत्तम असल्याचा प्रयत्न केला तर बरोबरचं आहे. आपली लायकी आहे तेवढं मिळायलाच पाहिजे. आणि जे लोक ते मिळू देणार नाहीत अशा लोकांना रूथलेसली बाजूला करायलाच पाहिजे.

मला तरं खरंच हा पोस्ट अबसर्ड वाटला. आनंद नाही तरी "जॉब वेल डन" असं समाधान वाटायला पाहिजे. वाईट काय वाटून घ्यायचं.

मी तुझे इतरही पोस्ट वाचले. सगळेच असे इमोशनल होते. एक अनाहूत सल्ला देतो. Are you sure this blog is not taking a toll on your personality? The blog should be a reflection of your feelings, and not the other way round. कितीही म्हटलंस तरी लिहिताना थोडाफार विचार करून लिहावं लागतं. ह्या जरा वेगळ्या भूमिकेत जास्तच तर शिरली नाहीस ना? In your best interest, जरं हे असं काही पोस्ट करणं तुझी thinking process change करत असेल तर you better quit. साहित्यिक वगैरे लिहीन म्हणतेस तसं लिही. तुझं करिअर, कुटुंब या गोष्टी तुझ्यासाठी महत्त्वाच्या असाव्यात. साहित्यिक लिहायला लागलीस तर माझ्यासारख्या चार भोचक लोकांच्या गॉसिपला खाद्य मिळणार नाही, एवढचं.

Bhagyashree said...

hey congrats! :)
guilty builty vatneka nai. :D

ani e plz.. tu far sahityk lihu nayes asa mala vatta.. sahityik cha dhaska ghetlay mi ajkal.. kahihi na kalnara lihitat loka. tujhyasarkhe je sadha saraL lihitat tech mala awdta.. lihun nakki bagh, pan samjel asa lihi bai.. :( nahi samjla tar mi nakki marathi ahe na asa prashn padto mala!

जूही दिक्षित said...
This comment has been removed by the author.
जूही दिक्षित said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

He ani adhich pos vachala.. he sagala farch khota khota vatayla lagalay ata.. var mhantalya pramane kalpanashakti farach jorat ahe..

Anonymous said...

अरे हो, एक मंगलोर ट्रिप, एक प्रॉस्पेक्टिव्ह बॉयफ्रेण्ड मॅरिड निघणं, आणि दुसरा तुझ्या प्रेमात पडून त्याने तुला ऑलमोस्ट प्रपोज करणं, हे ही त्याच ६/८ महिन्यात >>>>
Juhi, asata kahi kahi lokancha nasheeb jorat.. Fakta picture madhech nahi ho ghadat ashya goshti... :P

म्येघना said...
This comment has been removed by a blog administrator.
म्येघना said...
This comment has been removed by a blog administrator.
संवादिनी said...

@ सुचिती - थँक्स अ लॉट. मीही तेच करायचा प्रयत्न करतेय. काम इमानदारीत करण्याचं आणि त्याचं चांगलं फळंही मिळतंय. मुळात तिच्याशी बोलल्याने सगळी कटुता निघून गेलेय, विच इज रिअली गुड.

@ दीप - किती स्तुती ही? हं चूक नाही हे खरं, पण तरीही सुखांत हवाहवासा वाटतोच ना आपल्याला.

@ स्नेहा - थँक्स. नॉट जस्ट फॉर कमेंट, फॉर एव्हरीथिंग.

@ जास्वंदी - तूही मला जिवलग मैत्रिणीसारखीच वाटतेस, मी काहीही लिहिलं तरी मैत्रीतून आता सुटका नाही.

@ निमिष - हं, चांगुलपणाचा साइड इफेक्ट. असू शकेल. पण आपलं ते आपल्याला नेहमीच चांगलं वाटतं. खूप सब्जेक्टिव्ह आहे हे. अरे हो, हल्ली मला वाटायला लागलंय, मी लिहितेय ते साहित्यच आहे, आणि फार चांगलं नसलेलं.

@ सायलेन्स - सायलेन्स मोडून बोलल्याबद्दल थँक्स. अहो जाहो नको प्लीज. नेहमीचं नक्कीच लिहिणार आहे, पण स्वतःची टिमकी दर आठवड्याला वाजवायला नको असं हल्ली वाटायला लागलंय.

@ अनिकेत - अरे प्रत्यक्षात मीही अशीच वागले. नथिंग पर्सनल अशी. पण आत कुठेतरी वाटत राहतंच ना, की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला. "Are you sure this blog is not taking a toll on your personality?". नाही. तसं काही नाही, कारण ब्लॉगवर लिहिते ते मनातलं आहे. आपण प्रत्यक्षात वावरताना मनातल्या भावना मनातच दडपून वावरत असतो नाही का? ब्लॉगवर लिहिते ते मनातलं, जे प्रत्यक्षात माझ्या वागण्यातून दिसत नाही. खंबीरपणाचे, व्यवहारीपणाचे मुखवटे चढवायला लागतातच जगात वावरताना. पण ह्या ब्लॉगवर तसं काही बंधन नाही. हा ब्लॉग माझी थिंकिंग प्रोसेस आहे, जशी आहे तशी.

@ भाग्यश्री - साहित्यिक लिहिणं मला जमत नाही हेच खरं. आजचा पोस्ट पक्का फसलाय.

@ मेघना - कुणाच्या नादी लागतेयस? मी रिप्लाय करतेय कारण सायलेन्स इज ट्रीटेड ऍज ऍक्सेप्टन्स. कौतुकाबद्दल थँक्स.

@ जूही - प्रथम तुझ्या नावातला "दी" दीर्घ आहे की ऱ्हस्व? मला दीर्घ वाटला बाई. तुझी कमेंट वाचल्यावर मला एकदम माधुरी चावलाची आठवण झाली. तू कोण तिची? मुळात काहीतरी गडबड आहे. मी सीए होऊन सहा महिने झाल्याची माहिती (जिथून कुठून तुला मिळाली) ती चुकीची आहे. मला सीए होऊन अर्सा उलटलाय. हवं तर ५ नोव्हेंबर २००७ चं माझं पोस्ट वाच. मला वाटतं चार पाच वर्ष भांडी घासल्यानंतर एखादी सर्वसामन्य कल्पनाशक्ती आणि विनोदबुद्धी असलेली व्यक्ती कमनशीबी असूनही लीड होऊ शकेल ना?

बरं सहा महिन्यात एकदा मंगलोरला जाऊन येणं ह्यात काय विशेष? तुलाही जमेल, प्रयत्न करून बघ. आणि बाई तू कुठल्या युगात वावरतेस? माधुरी चावला मला म्हणाली की ती हातरुमाल बदलावे तसे बॉयफ्रेंडस बदलते आठवड्याला? सहा महिन्या दोन असफल प्रकरणं म्हणजे काहीच नाही. आणि प्रकरणं असफल होणं हे जर तुला लक वाटत असेल, तर बाई माझं सगळं लक तुला मिळो. मग तर झालं?

@ दोन्ही ऍनॉनिमस - तुम्ही जूहीचे कोण? अहो तुम्हाला खोटं वाटतंय ना? तुमच्यापुरतं खोटंच आहे असं समजा. त्याच्यामुळे पुन्हा काही खोटं वाटलं तर प्लीज कळवू नका कारण सगळं खोटंच आहे, हे मी आताच सांगून ठेवते तुम्हाला. उगाचच कशाला तुम्हाला डोक्याला ताण.

जूही दिक्षित said...
This comment has been removed by the author.
सर्क्यीट said...
This comment has been removed by a blog administrator.
Samved said...

Hey Congrats for your promotion