विमानतळावर उतरले आणि माझ्यावर अचानक बरीच लोकं चाल करून आली आणि आपण मुंबईत नसल्याचं प्रकर्षानं जाणवलं. सगळे दिल्ली चे ठग मला (आणि इतरांनादेखील) ठगवण्यासाठी फिल्डिंग लावून बसलेले. अर्थात मीपण मुंबईत तयार झालेली असल्याने त्यांना भीक न घालता प्रीपेड टॅक्सीच केली.
गेला आठवडाभर दिल्ली अभी दूर नही चाललेलं. एकदाची येऊन पोचलेच. अर्थात दिल्ली काही मला नवी नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी मी दिल्लीला आलेली आहे. कधी आईबरोबर, तिच्या कामासाठी. बाबा खास सव्हीस जानेवारीची परेड पाहायला घेऊन आला होता तेव्हाची. इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या ऑडिटोरिअमध्ये कडकडून टाळ्या वाजवणारी.
पण आजची दिल्ली खूप वेगळीच वाटली. एकटी अशी मी दिल्लीला कधी आलेच नाहीये म्हणून असेल. पोचले दिल्लीत पण मनातून मुंबई जाईना. मुंबई तर मुंबई, अगदी पुणंपण आठवत राहिलं. पुण्याला येऊन फार दिवस नाही झालेत पण आता परत जायला मिळेलच असं नाही. इथे आठवड्यासाठी म्हणून पाठवलंय. पण जातानाच सायबाने सांगितलंय की कदाचित महिनाही लागू शकेल. वर अजून काही प्रोजेक्टसंबंधी बोलणी चालू आहेतच. दरम्यानच्या काळात तिथे नंबर लागला तर थेट तिथेच जावं लागेल.
बरं पुण्याला सगळी गंमत जंमत होती. इथे तसं काही नाहीये. भरपूर काम माझी वाट पाहतंय. दर आठवड्याला घरी जाता येणार नाही. आनंदी नाही आणि आनंदही. उगाचच हाताकडे बघत राहिले. नवं नेलपॉलिश लावायचं राहूनंच गेलं.
बराच वेळ विचार करत होते की ही गोष्ट लिहावी का? पण शेवटी हिय्या करून लिहितेय. मला बॉसने सांगितलं की सोमवारी पोचायचं दिल्लीला. आनंद झाला तसं वाईटही वाटलं. शुक्रवारी परत घरी जायचं होतं, म्हणून गुरुवारी सेलेब्रेशन करायचं ठरलं. आनंदकडे. आनंदी होती. ऑफिसातली अजून दोघं तिघं होती. आनंदीचा भाऊही होता. मजा आली. माझ्या जाण्याच्या नावाखाली धांगडधिंगा, बाकी काही नाही. खूप उशीरापर्यंत बसले होते सगळे. घरी जायला निघालो. आनंद म्हणाला मी सोडतो तुला, एकटी जाऊ नको म्हणून. पण माझं घर एक एकदम जवळ आहे तिथून. म्हटलं मी एकटीच जाते. सगळे खाली पोचलो. आनंदीला अच्छा करून मी कायनेटिक सुरू करायला गेले तर ती हटून बसली. कशीबशी मेन स्टँडला लावून किक मारायला सुरवात केली आणि लक्षात आलं की टायर पंक्चर आहे. झालं. आता काय करणे?साहेबांना फोन केला. साहेब उचलेनात. म्हणून पुन्हा वर गेले.
आनंदने दरवाजा उघडला. नेहमीसारखी माझी व्यवस्थित खेचून झाल्यावर साहेब तयार होऊन निघाले माझ्यासोबत. मला म्हणाला गाडी इथेच ठेव. मी पंक्चर काढून तुझ्या बिल्डिंगच्या खाली लावून ठेवीन, तू यायच्या आधी. म्हटलं ठीक. घरी पोचल्यावर म्हटलं ठीके आता भेटू उद्या. तर म्हणाला चल एक कॉफी मारू. वर आलो कॉफी केली. तो उगाचच काहीतरी बोलत राहिला. मला झोप येत होती पण त्याचं मन मोडवत नव्हतं म्हणून बसलेले. शेवटी एकदाचा तो निघाला. दरवाज्याशी पोचल्यावर म्हणाला विसरणार नाहीस ना मला? म्हटलं काय रे जास्त झालेय का तुला? तुला कशी विसरेन. काहीच बोलला नाही. मी वाट पाहत राहिले तो कधी निघतो त्याची.
मला काही कळायच्या आत एकदम गुडघ्यांवर बसून माझा हात हातात घेतला. मला जे नको होतं तेच घडणार होतं. आता हा मला प्रपोज करणार. मग मी ह्याला नाही म्हणणार, मग ते नेहमीचं रडगाणं. मग समजावणं. न दुखावता दुखावणं. हे सगळं लख्ख दिसायला लागलं. माझी नाराजीही चेहऱ्यावर स्पष्ट दिसली असेल कोण जाणे. दिल्लीचं डिक्लेअर झाल्यापासून मला असं होईल असं वाटत होतं. आणि शेवटी ते घडलंच.
दोन क्षण त्याने कसलातरी विचार केला. मग हाताकडे बघत म्हणाला कसलं फडतूस नेलपॉलिश लावलंय. दिल्लीला जाताना तरी चेंज कर.
हसावं की रडावं? माझ्या मनातलं कसं बरोबर ओळखलं त्याने. काही लोकं इतकी निरागस असतात ना, की त्यांचा चेहराच आपल्याला सगळी गोष्ट सांगतो. त्याचा चेहराही सगळी गोष्ट सांगत होता. मी न बोलता त्याला घरात घेतलं. त्याने न विचारताच ह्या घडीला प्रेम, लग्न वगैरे मला करायचं नाही. तू चांगला मुलगा आहेस, आपण मित्र आहोत पण धिस इज समथिंग डिफरंट, असे घिसे पिटे डायलॉग्स बोलत गेले. तो ऐकत गेला. शेवटी मी थांबले. माझं बोलायचं तेवढं बोलून झालं. तो उठला. दारापर्यंत गेला. जाताना वळला मात्र. म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदल मात्र. जड पावलाने त्याला पायऱ्या उतरताना बघून मलाच रडायला आलं.
दुसऱ्या दिवशी दबकत दबकतंच त्याच्यासमोर गेले, तर तो पूर्वीसारखाच अगदी काही झालं नाही असा माझ्याशी बोलला. दिवसभर मला खूप वाईट वाटलं. तो माझ्याशी बोलला नसता. चिडला असता, ओरडला असता तरी जितकं वाईट वाटलं नसतं, तितकं त्याच्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून मला वाटलं. मुंबईला एकत्रच आलो. सगळा प्रवास मी गप्प आणि तो नेहमीप्रमाणे. शेवटी निरोप घेताना मीच त्याला सॉरी म्हटलं. नेहमीचं त्याचं खळखळून हसला. म्हणाला तू कशाला सॉरी. मीच सॉरी. तुझ्यासाठी. चांगला चान्स हातचा घालवला राव तुम्ही. असं म्हणून पुन्हा जोरात हसला आणि जायला निघालासुद्धा. मी तशीच बघत राहिले त्याच्याकडे. दोन पावलं चालून परत आला.
म्हणाला, तेवढं नेलपॉलिश बदलून जा. उगाच आठवण येईल माझी. निघून गेला.
खडूने गिरगिटलेली पाटी हाताने कितीही पुसली तरी स्वच्छ होत नाही ना तसं झालं माझं पहिले दोन दिवस. हळूहळू मन रुळावर आलं. आता नेलपॉलिशही बदलायला हवं!
- संवादिनी
15 comments:
Sam.....
bagh nelpolish badalayachi kharach kaa garaj aahe?
...Sneha
संवादिनी... तुझे सगळेच लेख मी वाचले आहेत. याआधीच्या लेखातली तुझी खिन्नता मनाला अंर्तमूख करुन गेली.
तुझे विचार आत्मकेंद्री नाहीत, तर त्यात आजुबाजुच्या जगाच सुक्ष्म अवलोकन आहे, त्याची मिमांसा आहे.. मला ते भावले..!
प्रत्यॆकाचेच एक क्षितिज आहे, त्याच्या सीमा दुसरा कोणीच रेखू शकत नाही. टीकांतून होणारे बदल तुझ्या लेखाणीत सामावुन घे.
तुझ्या लेखाणासाठी मनःपुर्वक शुभेच्छा..!
खरंच बदलायलाच हवं का पण नेलपॉलिश? बघ ब्वॉ. कधी कधी उग्ग्गाच असले नखरे करतो आपण. :)
काय पण...माझं वय झालं असंच वाटलं..किंचित बालीश, पपी लव्ह, स्वप्नाळु..
तुझ्या स्टोरीत हिरोची एन्टरी झाल्यापासून या सिनची वाट बघत होतो आणि शेवटी जसं वाटलं तसंच झालं. टप्पा क्र. १ पर्यंत तर ठीक आहे. निदान टप्प क्र. २ तरी बदल नाही तर खैर नाही...
hey sahi!
ho mhanali asatis tar jast sahi vatla asta :)
pan tu nahi mhantlas mhanaje vyavasthit vichar karunch mhanali asashil! kahi kahi baabtit ghai na kelelich bari!!
hmm.... mala sukhant awdatat..pan kadhi kadhi aplyala vait vatat astanahi dukkhant karavach lagto! barach familier experience..
delhi sathi shubhecha!
अजून एक हळूवार पोस्ट. . .हो/नाही म्हणणं हा वैयक्तीक प्रश्न आहे. . .पण याचा अर्थ विचार करून निर्णय घेतलेला असणार. . .आणि सारासार विचार करून ठाम निर्णय घेतला असेल तर त्यासारखे दुसरे सुख नाही. . .नाही तर परत sms, फोनकॉल्स, ईमेल्स, सेंटी फॉर्वर्डस् वगैरे चालूच रहातं. . दिवसाचा(रात्रीचा) अर्धा वेळ याच प्रकारात जातो. . .
कंबख्त इश्क. . .
असो. . .
अमित
अब दिल्ली दुर नही ...
आणि हो मी मुळचा मुंबईचाच.
Pranam,
Gud one. more audible than earlier posts.
Regards..
chhan lihilayes hmm..
ani barr zala Delhi la nighun gelis. karan Punyatalya bloggers ni tuze contact details magayala suruwat keli asati, ani ugach panchayit zali asati. Delhi tasa safe ch aahe gg..
Hmmm that was expected!! mhnje Aanand tula vicharto ki tu bengoli aahes ka?? tevha pasun mla vaatl ki there might be somthing going on.... mg vaatl tu te personal mhnun lihinaar nahis. but finally tu lihilys.. well hokar/ nkar hya tuzya personal gosti aahet pn ka kon jaane mla vaatle hote ki tu ho mhnsheel aani shodh smpun gost smpel 1ka haapy note vr.. ki aani raja rani sukhaane nandu lagle... but seems more twist in this estory :)
aaani aata kaay tu orkut profile band krnaar... (kelihee ashil... so mla hi mulgi kon te nidan orkut/ facebok vr bghnyaachee iicha hoti... i mean ajun he aahe pn .. jo hota hai acche ke liye hota hai... kdachit girgaavaat/ mumbait kuthehee bhetsheel kaay mahit???) tu aata prtisaadhee lihinaar nahis?? that's bad... well i hope after some time you may think on it...
Well keep writing... Saglikde ANDIANND psrude... :)
"Honest people are never touchy about the matter of being trusted."
taa. k. mingrgee bdl mafi asavi pn marathi phowont udun gelay mazya comp madhun..
काही लोकं इतकी निरागस असतात ना, की त्यांचा चेहराच आपल्याला सगळी गोष्ट सांगतो >>>>>
agadi agadi... :)
Sahi lihilays baki... Keep it up.. !! Ani ho Delhi madhe Japun raha..:)
@ स्नेहा - हं. सध्यातरी गरज वाटत आहे. चूक की बरोबर माहीत नाही पण
@ स्मिता - तुमचा अभिप्राय वाचून खूप बरं वाटलं. लिहीत राहण्याचा विचार आहे. पण आता कामाचा व्यापही खूपच वाढलाय. जमेल तसं नक्की लिहिणार आहे पण.
@ मेघना - कधी कधी नाही. मला तर वाटतं बऱ्याच वेळा की मी नेहेमीच नखरे करते. पण चूक काय आणि बरोबर काय ह्याचं उत्तर सापडत नसेल तर मी "चूक" ला झुकतं माप देते. म्हणूनही असेल.
@ संवेद - तू हल्ली फार कोड्यात बोलायला लागलाय्स बुवा. हा टप्पा क्र. दोन कुठचा? माझ्या मते त्या गोष्टीला एकच टप्पा होता आणि तो पार पडला. पुन्हा त्यात गुरफटायचं नाही असं ठाम ठरवून टाकलंय.
@ जास्वंदी - हं. घाई न केलेलीच बरी हे खरं. आणि मी जेव्हा कधी ज्या कुणाला हो म्हनीन ना (किंवा कुणी मला हो म्हणेल), इथे नक्की लिहीन. पण सध्यातरी तशी शक्यता वाटत नाहीये. आईपण सध्या शांत आहे, नव्या नोकरीमुळे. पण ती पुन्हा केव्हा पेटेल सांगता येत नाही.
@ भाग्यश्री - होय. वाईट तर वाटतंच गं. कुणाला दुखावण्याचा आपल्याला खरं तर काय अधिकार? पण तरीसुद्धा मन घट्ट करून दुखवावं लागतं तसंच काहीसं होतं माझं. मलाच वाईट वाटत राहतं कित्येक दिवस. माझीच चूक होती का? मीच त्याला तसं वाटू दिलं का? असं वाटून मन खात राहतं.
@ एक्स्ट्रोपल्सर - अरे पूर्ण दिवस आणि अर्ध्या रात्री सगळ्या कामातच जातायत सध्या त्यामुळे सेंटी स्टफला वेळ नाही. पण फोन चालू आहेत. पण फक्त मैत्रीखातर. बाकी काही नाही.
@ हरेकृष्णाजी - दिल्ली दूर नव्हे फारच जवळ आहे माझ्या सध्या. आणि तुम्ही मुंबईचे असून पुण्याची इतकी स्तुती कशी बरं करता?
@ आशीष - हं. तुला हे लिखाण आवडलं हे वाचून बरं वाटलं आणि तू कमेंटही लिहिलीस हे पाहून अजूनच.
@ विदुषी - थँक्स. पुणंही एकदम सेफ आहे. आणि इथले सगळेच ब्लॉगर्स समजुतदार आहेत. एकदा सांगितलं की त्यांना पटतं, त्यामुळे पुण्यातही काही प्रॉब्लेम नव्हता. आणि दिल्लीतही नाही. अर्थात दिल्लीत सध्या मी सोडून इतर मराठी ब्लॉगर्स नाहीत असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे.
@ दीप - मलाही तसं वाटत होतं. पण तो इतका चांगला मुलगा आहे की केवळ मला तसं वाटतं म्हणून मी त्याला दूर ठेवणं मला आवडलं नसतं. पण असं कधीतरी होईल ह्याची कल्पना होती आणि तयारीही होती. बाय द वे. तुला मी ऑर्कूटवरही दिसले नसते, कारण ऑर्कूटवर बाजाच्या पेटीचं चित्र लावलं होतं. म्हणजेच संवादिनी. सो यु आर नॉट मिसिंग मच अँड एनिवे यू आर नॉट मिसिंग मच.
@ पराग - हो दिल्लीत एकदम जपून आहे. पाच सहा जणं असल्याने तशी भीती नाही. आणि मजाही येतेय.
कारण ऑर्कूटवर बाजाच्या पेटीचं चित्र लावलं होतं. >>> आता ते मी कसं शोधणार??(waisebhee naam spel krna kaafee kthen hai!) :) सो यु आर नॉट मिसिंग मच अँड एनिवे यू आर नॉट मिसिंग मच.>>>?? अहो... इथे काही तरी स्सॉल्ल्लीड गैरसमज :)झालेला दिसतोय!!
I was jst curious that's it! Please.. nothin personal & no hard feelings. :) Anyways good stuff @ youe eng. blog keep it up!
दीप
"often in the real world, it is not the smart that get ahead but the bold"
-robert kiyoski
माझा आणि आधिच्या ऍनॉनिमसांचा काही संबंध नाही हे डिस्क्लेमर आधीच करून टाकतो. . .
पण मला तू खूप आवडलीस. . .आनंदला नाही म्हणल्याबद्दल पुरूषसुलभ आसुरी आनंद वाटला. . माझी अशी एखादी मैत्रीण का नव्हती किंवा का नाही याचं खरंच वाईट वाटतंय. .
आता कन्फेशन, तुझ्या लेखांमधून तयार झालेल्या तुझ्या इमेजवरून तुझ्यावर भयंकर क्रश आहे आपला. . .तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही, माहीत करून घेण्याची धडपड करणार नाही पण तू किंवा तुझ्यासारखीच कोणी आयुष्यात यावी अशी इच्छा आहे. प्रेयसी व नंतर सहधर्मचारिणी असावी तर तुझ्यासारखी, असं मनापासून वाटतंय. .
Post a Comment