Friday, December 28, 2007

प्राक्तन आणि चिल पिल

आमच्या चाळीत सध्या एक नवं खूळ आलंय. सकाळी काही ना काहीतरी व्यायाम करायचा. म्हणजे तसं हे सुरू होऊन तीन चार आठवडे झालेत पण किती दिवस टिकेल काय सांगा म्हणून आधी लिहिलं नाही.


आमच्या घरातल्या चक्क चारही लोकांनी भाग घ्यायचा ठरवला. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या आठवड्यात बरेच आरंभशूर including विन्या बाद झालेले आहेत. आई घरच्या कामापुढे वेळ काढू शकत नाहीये आणि ते काम करतानच तिचा भरपूर व्यायाम होत असल्याने तिला फिरायला वगैरे जाण्याची गरज नाही हे तिला लक्षात आलंय. त्यामुळे राहता राहिले दोघं रिकामटेकडे सकळीक, जेपी (बाबा) आणि मी.


बरोब्बर सहा वाजता जेपी मला गदागदा हलवून घराबाहेर पडतात. त्या भूकंपसदृष्य अनुभवामुले मला उठावंच लागतं. मी साडेसाहाला बाहेर पडते. मग ते चर्चगेटला बसलेले असतात मी पॉइंटापर्यंत जाऊन येईपर्यंत बसतात आणि मग आम्ही एकत्र घरी.


जेपींचे बरेच मित्र आहेत तिथे. त्यांना उगीचंच माझी वाट पाहत बसायला लागतं. म्हणून हल्ली आम्ही वेगवेगळे येतो. त्याहीपेक्षा मला एक माझा ग्रूप मिळालाय. चार आजोबा आणि दोन आजी आणि मी. पॉइंटाला बसतात ते बऱ्याच वेळा. पाच दिवस रोज बघून हसायला लागले. सहाव्या दिवशी चक्क मला त्यांनी जिलबी खायला बोलावलं. बरोबर ओळखलंत. गुज्जूच. पण सगळे नाहीत दोन मराठी आजोबा आहेत. आणि जिलबी म्हणजे माझा weak point मग काय झाली दोस्ती


मस्त वाटतं त्यांना भेटून. आपलं बघा एक विश्व असतं. त्याला आपण चौकटी पाडून घेतो. विटांच्या भिंती बांधतो म्हणजे बाहेरचं काही दिसत नाही. कधी काही लोकं काचेच्या भिंती लावतात. पण डोळ्याला पट्टी बांधून घेतात. मलाही तसंच वाटलं त्यांच्याकडे बघून. आपण फार फार स्वयंकेंद्रीत वगैरे झालोय असं वाटायला लागलं मला. कामात बिझी असलेली मुलं, सुना, नातवंडं, आपल्या संसारात रमलेल्या मुली ह्यांना वेळ कुठाय ह्या जुन्या खोडांकडे बघायला? प्रत्येकाची काही व्यथा आहे. पण जिलबीच्या बकाण्यात दडपून टाकतात. मीही असं करेन का? म्हणजे जेपी, आई, लग्न झाल्यावर सगळ्यांना विसरेन का? माझ्याच जगण्यात मश्गुल होऊन जाईन मी?

बाबांना विचारलं, म्हटलं, बाबा तुम्हाला असं वाटतं का की नवी पिढी जुन्या पिढीकडे लक्ष देत नाही वगैरे. ते म्हणाले प्राक्तन आहे. तुम्ही आणि आम्ही वेगळे आहोत. वयाचा फरक आहे. वयामुळे विचारांत फरक आहे. माझ्या आणि माझ्या वडिलांच्यातही होता, त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्याही होता तेव्हा कदाचित त्यांनाही वाटलं असेल नवी पिढी नालायक आहे म्हणून. ते त्याचं प्राक्तन. आता हे आमचं प्राक्तन आणि वाईट वाटून घेऊ नकोस कराण उद्या असंच तुमचंही प्राक्तन असेल काहीतरी. मग काय करणार? त्याची सल मनात ठेऊन जगणार का आनंदाने जगणार?

सांगा कसं जगायचं? रडत रडत की गाणी म्हणत?


मला ते बोलले ते फरसं काही कळलं नाही पण शेवटचा प्रश्न कळला.

मी लगेच उत्तर दिलं गाणी म्हणंत. मग म्हणाले चल एक छानसं गाणं म्हणून दाखव. मग त्यांचं आवडतं उगवला चंद्र पुनवेचा म्हटलं.

पटलं. गाणी म्हणंतच जगायला हवं.

मग आईला विचारलं. आई म्हणाली, एकदम बरोबर आहे. हल्लीच्या पिढीला मोठ्यांबद्दल काही आदरंच राहीलेला नाही. आम्ही सांगतो ते तुमच्या भल्यासाठीच ना? तरीही तुम्ही काहीही ऐकत नाही. गाडी आता मी तिच्या, मी लग्न करण्याच्या, आग्रहाला दाखवलेल्या कात्रजच्या घाटाच्या अंगाने जातेय हे बघून मी तो विषय आवरता घेतला.

विन्याला पण विचारलं. विन्या म्हणाला ताई टेक अ चिल पिल. तुला हे काय झालंय? आर यू ओके?

उद्या आमच्या नाना नानी ग्रूपला हा प्रश्न विचारते.

6 comments:

प्रशांत said...

छान. आवडला. हा लेखही आणि ब्लॉगही.
शुभेच्छा!
-प्रशांत

Abhijit Bathe said...

हाहा! सही लिहिलायस लेख. विषय नविन नाही पण जुनाच विषय स्वत:च्या युनिक अनुभवातुन (तसं म्हटलं तर हा अनुभव आणि त्यातुन निर्माण झालेले प्रश्न हे फारसे युनिकही नाहीत) इंटरेस्टिंग (आणि लेखातुन इंटरेस्ट थ्रुआऊट कायम ठेऊन) लिहिणं अवघड.

बाबांना गाणं म्हणुन दाखवणे - हा तर कळस! (विशेषत: बाबांचं "गाणं" ज्यांना ऐकायला लागतं अशा लोकांसाठी :)))

सर्किट said...

bhukampasadrush anubhav >> LOL.. :-D

pudhe post hi zakas lihila ahes. nana nani na jilebi chya mobadalyat goDavaa deta ala tar de. :)

संवादिनी said...

प्रशांत - आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. आपल्या आईंचा आणि आपलाही ब्लॉग वाचला. कविता आवडल्या हे वेगळं सांगायला नकोच.

अभिजित - तू म्हणतोस ते पटलं. अनुभव युनिक नाहिये. कधीकधी मनाला स्पर्शून गेलेलं आधीही कुणाच्या मनाला स्पर्शलं असेल हे उलगडतंच नाही. पण तरीही लिहायची सुरसुरी काही कमी होत नाही. प्रशंसेबद्धल धन्यवाद. तू इतक्यात काही लिहिलं नाहीस का? आधीचे लेख अप्रतीम आहेत.

सर्किट - अगदी माझ्या मनातलं बोललास. पण दुसऱ्या वेळी वाटतं की हा सगळा क्विड प्रो क्वो आहे. शुद्ध देवाणघेवाण. मला सकाळी टेकायला जागा मिळते, त्यांना माझ्यात त्यांची मुलं नातवंडं सापडतात, म्हणूनच खरं तर आम्ही भेटतो. कारणाशिवाय काही मनापासून कधी करणार मी?

HAREKRISHNAJI said...

आपली लिहिण्याची शैली सुरेख आहे, सहज , साधी पण मनाला भिडणारी

Prashant M Desai said...

sagale lekh ekdam sundar aahet..!! asech lihit raha.. best of luck..