Thursday, November 22, 2007

मी आणि क्ष व्यक्ती

भेटले, अखेरीस भेटले.

माझी पहिली रन, की पहिली विकेट, स्कोअरबोर्ड वर लागली. बहुतेक विकेटच. पण विन्या म्हणाल्याप्रमाणे माझा डिनर बिनर काही सुटला नाही जिप्सी मधे. (तुम्हाला काही बोध होत नसेल तर मागचा ब्लॉग वाचा. तो वाचल्यावर तुम्हाला कळेल मी काय लिहितेय ते.)

तर त्याचं झालं असं, की मागे लिहिल्याप्रमाणे मी त्या "चांगल्या स्थळाला" भेटले. त्याला आपण सोयीसाठी क्ष व्यक्ती म्हणूया. मातोश्रींच्या समाधानासाठी सर्वप्रथम क्ष साहेबांना फोन केला. नशीबाने त्याला बाहेर दोघांनीच भेटायची कल्पना आवडली. तो दादरचा असल्याने आणि शिवाजी पार्क हा आमच्या ग्रूप चा जुना अड्डा असल्याने तिथेच भेटायचं ठरलं.


म्हणजे काय? की क्ष जर एकदम पकावू निघाला तर निदान अड्ड्यावर तरी कोणी भेटेल. एक तीर दो शिकार असा आपला माझा सूज्ञ विचार.

तर ठरल्याप्रमाणे ऑफिसमधून लवकर (?) निघून मी मीनाताईंच्या पुतळ्यासमोर हजर झाले. जरी क्ष चा फोटो पाहिला होता तरी त्याला मी ओळखेनच ह्याची खात्री नव्हती, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या पोरा बाळांचं (पोरी बाळींचं स्त्रीलिंगी रूप) सूक्ष्म निरिक्षण मी चालवलं होतं. त्याचे दुष्परिणाम दिसू लागताच मी ते थांबवलं, क्ष मला नक्की ओळखेल ह्या अशेवर. मग येणाऱ्या जाणाऱ्या नाना नानींकडे बघत बसले. त्यांना अशी संधी मिळालीच नसेल बहुतेक, एकट्यानीच लग्न ठरण्याआधी भेटण्याची. तेही करून झालं, मग मीनाताईंकडेच बघत बसले. शेवटी फोन करायचा विचार केला. मग म्हटलं आपणंच कशाला आतूर वगैरे झालोय असं दाखवा.

तितक्यात तिथे सलील दिसला. सलील म्हणजे आमच्या नाटकाच्या ग्रूप मधला मुलगा. म्हटलं क्ष येईपर्यंत टाईंमपास मिळाला. पण आता मात्र फार म्हणजे फारच उशीर व्हायला लागला. फोन बाहेर काढला आणि फोन नंबर ऑफिसच्या इ-मेलमध्ये राहिल्याचं लक्षात आलं. आता थांबण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. तेवढ्यात माझाच फोन वाजला. क्ष चाच होता.

क्ष - हॅलो, मी क्ष बोलतोय. संवादिनी आहेत का?
मी - (आता माझ्या मोबाईल वर फोन करून मलाच मी आहे का असं विचारण्यात काय पॉइंट आहे?) हो मी - (आम्हीच) आहे (आहोत)
क्ष - अहो, मी तुमची वाट पाहतोय शिवाजी पार्क ला तुम्ही आहात कुठे?
मी - मीनाताईंच्या बाजूला
क्ष - कोण ताई?
मी - मीनाताई ठाकरे.
क्ष - ओहो, सॉरी. विसरलोच. काय झालं, मी पण तिथेच होतो पण मला तुम्ही दिसला नाहीत आणि पंधरा दिवसांसाठीच इंडियाला आल्यामुळे माझ्याकडे मोबाईल नव्हता. मग परत घरी जावून फोन करावा लागला. समोरच राहतो मी.
मी - बर मग येतोस ना आता? (की सगळं फोनवरंच बोलायचं? आडनावाला जागला अगदी. बाजूच्या स्टॉल वरून फोन नाही केला. घरी जावून केला. आता त्याचं आडनाव इंग्रजी "इ" ने संपणारं असणार हे सूज्ञांस सांगणे न लगे)
क्ष - हो येतो येतो. तुम्ही थांबा. आलोच


शेवटी क्ष आला. सुरवातीलाच मी त्याला मला अहो जाहो करू नको म्हणून सांगितलं. त्याने ते निमुटपणे एकलं. मग भारतात उकाडाच कसा आहे आणि त्याला त्याचा त्रासच कसा होतोय हे मला एकावं लागलं. उकाड्याच्या त्रासाचा आणि भारताबाहेर राहणाऱ्या लोकांचा अर्थाअर्थी काही संबंध आहे का? त्याच्याइतकाच उकाड्याचा त्रास मलाही होतो हे मी त्याला सांगितलं.

एकंदरीत काय तर पहिल्या पाचच मिनिटांत "तो हा नव्हेच" हे माझ्यापुरतं ठरलंच होतं. आमचा ग्रूप पलिकडे बस स्टॉपच्या बाजूला चौपाटीकडे बसला असणार. तिथे जायची मला घाई होती. बिचारा क्ष खूप मनापासून बोलत होता. बहुदा त्याला मी आवडले असं वाटलं. आणि तसा तो काही वाईट मुलगा नव्हता. चांगला होता, सभ्य होता. भारताला शिव्या देणं सोडलं तर अदर्वाईज डिसेंट वाटला.


पण एकंदरित तो मझ्या टाईप चा नव्हता. नाटक त्याला आवडत नाही. शास्त्रीय संगीत तर नाहीच नाही. मग लग्न झालं तर माझं कसं होणार? त्यामुळे एकदम सगळं नो नोच झालं माझं पहिल्यापासून. मला म्हणाला तो जिप्सीत जाऊया का? मीच नको म्हटलं. डाएट्वर आहे असं खोटंच सांगितलं आणि आता जिम लाही जायचं तेव्हा निघायला हवं असंही सांगितलं. बिचाऱ्याला वाईट वाटलं.

शेवटी एकदा माझी सुटका झाली. पाठी आमचं संभाषण ऐकून मीनाताईंचा पुतळा हसत होता असं उगाचंच मला वाटलं.

कट्ट्यावर गेले. तिथं सलील आणि अजून दोघं चंगूमंगू होते. मुली कोणीच नव्हत्या. माझा मूडही नव्हता. सरळ ८४ पकडली. घरी आले.

आईला सांगितलं की मला मुलगा आवडला नाही. मलाच वाईट वाटलं. म्हणजे एखादी व्यक्ती चांगली नाही असं म्हणण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला? क्ष ला नाही ऐकून नक्कीच वाईट वाटणार आहे, मला माहीत आहे, पण त्याला नाही म्हणणारी मी कोण? मी असे कोणते मोठे दिवे लावलेत?


अर्थात त्याच्याशी लग्न करणं मला अशक्य आहे. तो वाईट आहे म्हणून नाही पण आमच्या आवडी वेगवेगळ्या आहेत म्हणून. हे सगळं त्याला कोण सांगणार आई म्हणाली पत्रिका मागू आणि जुळत नाही म्हणून सांगू.

मला संताप आला ह्या सगळ्या प्रकाराचा. उद्या मला मुलगा आवडला एखादा आणि त्यानी असं पत्रिका जुळली नाही म्हणून नको असं सांगितलं तर? माझं डोकं नक्कीच फिरेल. बाबांना सांगितलं. ते म्हणाले नाही तर सांगावच लागेल फक्त सौम्यपणे सांगायचं म्हणून पत्रिका. विन्या म्हणाला, ताई तू क्ष ला तिथेच सांगायचं ना? पण कसं?

शेवटी दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून मी क्ष ला फोन केला. त्याला सांगितलं खरं कारण. म्हणजे थोडसंच खरं सांगितलं, नाटक आणि शास्त्रिय संगीत म्हणजे माझा जीव आहे. तेच त्याला आवडत नाही मग पुढे कसं होणार? समजुतदार निघाला. हो म्हणाला आणि फोन ठेवला. त्याच्यापेक्षा मला नाही म्हणण्याचं वाईट जास्त वाटलं.

तर असा हा लग्नपुराणातला वरसंशोधन खंडातला प्रथमोध्याय संपला. हरये नमः, हरये नमः


- संवादिनी

10 comments:

सर्किट said...

अरेरे. बरं जाऊ दे. विकेट नाही पडली तुझी उलट रन लागली स्कोअरबोर्डावर. :) "हरये नम:"म्हणताना गणपतीला एक तुळशीचं पानही दे वाहून! बाकी ते मीनाताईंचं तिथे असणं झकास लिहीलंयस!
कमीत कमी रन्स करून औट हो अशी शुभेच्छा!

HAREKRISHNAJI said...

होता है ! कभी कभी ऐसा भी होता है !!

Better luck next time

btw

The Indian Music Group, St.Xavier college मधे An Evening with Young Artist हा कार्यक्रम आहे.
Shri Ankit Bhat (Sitar) Shri Parth SArkar (Flute ), Shri Kunal Gunjal (Santoor)

Amey said...

मागची "पोस्ट" वाचून कळत नाहीये,की असे अनेक अध्याय यावेत म्हणावे का better luck next time...

तरीपण, इथे चांगल्या-वाईटाचा प्रश्न नसतो. शेवटी तुमचे विचार कितपत जुळतात ते महत्वाचे.

मातातातांच्या मते - हा संधी नवीन आहे. :D

संवादिनी said...

सर्किट - तुझं म्हणणं कदाचित खरंही असेल. पण मला खरंच रन काढणं नाही आवडलं. कदाचित विकेट गेली तर चालेल पण रन काढण्याची वेळ पुन्हा येऊ नये असं वाटतं.

हरेकृष्णाजी - पार्थ आणि कुणाल ला मी ऐकलं आहे. अंकित ला नाही. पण का कार्यक्रम बहुदा चुकेल. सांगितल्याबद्दल धन्यवाद

अमेय - माझी अवस्था काही वेगळी नाही.

Amey said...

शेवटी स्वत:हून कोणी शोधायचे म्हणजे त्या पण रन्स असतात ना?

कदाचित हा पहिला गेम असेल जिथे सगळे जण विकेट फेकायला एका पायावर तयार असतात ;)

Anamika Joshi said...

lihinyachya style varun tu pakki haDachi blogger disateyes, navakhepaNachya khuNahi nahit tuzya posTs madhye.. mag ha samvaadini navacha naQuab kaa? :)

संवादिनी said...

samvaadini navacha naqab nakkich aahe, he tar me philyach blog madhe lihilay.....pan hadachi blogger nahi.....jashi me mazi diary lihin, tasa ithe lihite....pan mhanunach pen name asana avashyak vatata....karan sagalya goshti tumhi tumachi identity sangun jahir karu shakat nahi......at the same time, i am trying to be true.....so i have to decide....either i write facts or i disclose my true identity...what wud u like? facts irrespective of who i am or tailored facts knowing who i am?

Sam

सर्किट said...

I agree with Sam's argument. Writing with a nickname really frees you from some uneasy hesitations!

Dhananjay said...

Hmmm... Maza anubhav kahi salla dyava evadha nakkich nahi. Shubheccha!

a Sane man said...

:)