Thursday, January 24, 2008

मी आणि तो

लिहिण्याचा बॅकलॉग भयंकर वाढत चाललाय. आता नवं वर्ष उलटून किती दिवस गेले पण अजून माझं लिखाण तिथेच रेंगाळतंय. गेल्या आठवड्यातंच खरंतर लिहिणार होते, पण जरा जास्तंच झालं असतं म्हणून आता लिहिते.

ह्या वेळी एकतीस तारखेला आमच्या ऑफिसची पार्टी होती. जुहूलाच होती. अर्थात विनयभंग वगैरे झाले तेव्हा आम्ही सगळे, सगळ्यांचं माहीत नाही पण मी तरी घरी शांत झोपले होते. आम्ही नववर्ष संध्याकाळीच साजरं केलं. तर ह्या पार्टी निमित्ताने सगळ्या डिपार्टमेंटची लोकं एकत्र आली.

नवी गर्दी मिळाली की चेहेरे शोधण्याचं काम फक्त मुलंच करतात असं नाही. माझ्यासारख्या काही मुलीही त्यात सहभागी असतातंच की. अर्थात माझं दुर्दैव असं आहे की मी ज्या डिपार्टमेंटला काम करते तिथे पस्तिशीच्या खालचं कुणी फिरकंतच नाही. CA असल्याचा साइड इफेक्ट आहे हा. त्यामुळे दुसऱ्या डिपार्टमेंटातून नजर फिरवणं आलंच.

काही बरे चेहेरे दिसले, पण एक विशेष. चेहेरा म्हणण्यापेक्षा एक विशेष माणूस भेटला. दिसायला तर चांगला होताच, पण बोलायलाही छान वाटला.

मला नेहेमीप्रमाणे गाणं म्हणण्याचा आग्रह झालाच आणि आपल्याला काय स्टेज आणि श्रोते मिळाले की कॅसेट सुरू. मग एका साहेबाने एका डुएटची फर्माइश केली. आता साहेब लोकांना कोण समजावणार की डुएट दोघं गातात म्हणून. मी म्हंटलं सर हे डुएट आहे, तर त्यांनी चक्क "त्या"ला आग्रह केला गाणं म्हणण्याचा. म्हणजे हा गातो पण? डुएट छान झालं, माझा आवाज कापत होता इतकंच, पण त्याला काही पर्याय नव्हता.

नंतर सगळा वेळ नजर त्यालाच शोधत राहिली. खरंतर मुद्दाम नाही, पण तो काय करत असेल, त्याचे मित्र कोणते? (त्यात एखादा ओळखीचा आहे का?), तो कसा बोलतो, कसा हसतो, सबकॉन्शसली मी माझ्या एक्स्पेक्टेशन्स मॅच करत गेले. काही मॅच झाल्या, काही नाही, शेवटी तडजोड ही करावी लागणारच कधी ना कधी, असं म्हणून तो उद्योगही सोडला. आनंद ह्याचाच आहे, की मी मोकाट इथे सगळं लिहू शकतेय. एरवी कुणाला सांगितलं असतं?

म्हंटल्या गाण्यासरशी ओळख झालीच. नाव कळलं, मराठी असल्याचंही कळलं. बरं वाटलं. कोब्रा नाही हेही कळलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही, गाणं म्हणतो म्हणजे जेपींनाही (बाबांना) नाही, त्यांना मराठी पुरे आहे. विन्याचा तर प्रश्नच नाही. राहता राहिली आई. ती फार जातीनिष्ठ आहे, तेव्हा तिला मॅनेज करणं कठीण.

ह्याला काय म्हणतात? सुतावरून स्वर्ग गाठणे.

पण मला तो आवडला. एकंच प्रॉब्लेम आहे. मिशी! मला बिलकूल आवडणार नाही नवऱ्याने मिशी बिशी ठेवलेली. पण ते सगळं नंतर.

क्रश तरी नक्कीच आहे. प्रेमाचं काही माहीत नाही. बघुया पुढे काय घडतं ते.

9 comments:

Dhananjay said...

interesting :) all the best !! :p

HAREKRISHNAJI said...

दुसरा अध्याय सुरु झाला तर
"संदर्भ - तर असा हा लग्नपुराणातला वरसंशोधन खंडातला प्रथमोध्याय संपला. हरये नमः, हरये नमः "

पहीली नज़र, पहीली मुलाखा़त आता म्हणजे कांदेपोहेचा बेत बारगळाच म्हणायचा
शुभेच्छा.

सर्किट said...

:-) sahiyes tu tar.. DON ahes ekdum.. he kharach ghaDataye ki tuza ekaTicha ha STY aahe? :-p

tyala propose kasa karayacha tharavala ahes?

a Sane man said...

sahiye!!!

Abhijit Bathe said...

Haha - I couldnt wipe the smile off my face while reading it and even while writing this comment!
मला माझ्या बायकोला पहिल्यांदा भेटलो होतो त्याची आठवण झाली!
एनीवे अनाहुत सल्ला - ज्या काळात बायकोला भेटलो त्या काळात दिसेल त्याला २ वाक्य ऐकवायचो. तसा त्यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही (कशाचा असतो म्हणा), पण त्यांचा मला तरी उपयोग झाला -
१) Indecision is worse than wrong decision
2) Fear makes you hesitate. Hesitation makes worst of your fears come true.

तुझ्या बाबतीत ही वापरायची तर वापर नाहीतर फेकुन दे.
आणि हो -

लढ! :)

Jaswandi said...

hehe!
sahiye...

actually i liked it very very much cos first time kontya mulila itkya khulun tichya ashya crushbaddal sangtana aikatye! :)

n thanx tula jaswandi awadlyabaddal sangitla:)... ajun koni asa sangitlach navhta :|

पूनम छत्रे said...

vachalyabarobbarachi pahili pratikriya hoti- oh my god! kuthoon kuthe pochali hi.. :) mag vichar kela tevha janawala ki hota asa kadhi kadhi! :) :) mast lihila aahes.. all the best, result kaLav :)

sampoorn blog vachala tuza. khoop chaan shaili ahe tuzi lihayachi. awadali, keep it up :)

संवादिनी said...

@ सर्किट - मी डॉन? चांगलं आहे, शब्द आवडला. STY म्हणजे काय? हे शंभर टक्के खरं आहे. प्रपोज? इतक्यात? बापरे. अरे आवडणं वेगळं आणि ते त्याच्यासमोर मान्य करणं वेगळं. आणि तसाही मला प्रपोज करण्याचा अनुभव शून्य आहे. शिकावं लागेल.

@ अभिजित - तुझा सल्ला आवडला. ही दोन वाक्य नक्की लक्षात ठेवेन. वेळप्रसंगी उपयोगाला येतील.

@ जास्वंदी - कोणत्याही मुलीला असं मोकळेपणाने लिहिणं शक्यच नाही. मलाही नाही. फरक इतकाच आहे, की इथे, मला ओळखणाऱ्या कुणीही हे वाचलं तरी त्यांना कळणार नाही की हे मी लिहिलंय. चोरी पकडली जाणार नाही हे माहीत असेल तर चोरी केली हे सांगायला काही हरकत नाही? अर्थात ही काही चोरी नव्हे. हे आपलं उदाहरण.

@ पूनम - मलाही असंच वाटलं. कुठून कुठे पोहोचले मी. पण असंच होतं माझं. वाहाव्त जाते मी. मी आणि माझे विचार. टार्झनसारखा एक दोर सोडायचा आणि दुसरा पकडायचा. ह्या खेळात आपण कुठच्या कुठे येऊन पोहोचलो हे लक्षातच येत नाही. रिसल्ट ला भरपूर वेळ लागेल. पण कळवीन नक्की.

@ हरेकृष्णाजी - असं काही समजू नका. मला सुतावरून स्वर्ग गाठायची जुनी सवय आहे. थोड्या दिवसात कळेलंच.

@ धनंजन आणि सेन मॅन - थँक्स..

- Sam

स्नेहा said...

sanvadini bhannat aahes.... bhari aahe aaj furasatit tujhya sagalya post vaachalya... :)
aaj pasun mi tujha pankhaa jhale ga... :)