शाळेत होते तेव्हाची गोष्ट. माझी शाळा घरापासून फार लांबही नाही आणि फार जवळही नाही. रमत गमत चालत गेलं तर पंधरा मिनिटं, भरभर चालत गेलं तंर दहा मिनिटं. शाळा दुपारची असायची तेव्हा. एकाच्या ठोक्याला सुरू व्हायची सहाच्या ठोक्याला संपायची. साधारण साडेतीनला मधली सुट्टी व्हायची. सगळ्या मैत्रिणी डबा आणायच्या, पण बहुतेक वेळा मी घरी पळायचे. अर्ध्या तासाची मधली सुट्टी, म्हणजे दहा मिनिटं जायला, दहा यायला आणि मध्ये दहा मिनिटं घरी, चहा प्यायला.
मी एकलकोंडी होते, मैत्रिणी आवडायच्या नाहीत असं अजिबात नाही. पण घरी जायचं एक ऍट्रॅक्शन होतं. वीस मिनिटाची धावाधाव करून घरी घालवलेली दहा मिनिटं मोलाची वाटायची.
दिल्लीहून घरी पोचले गेल्या आठवड्यात. खरंतर पंधरा ऑगस्ट दिल्लीत साजरा करायचा विचार होता. आई, बाबा उत्तरेतच होते. ते तिथून दिल्लीला येणार होते. पण ऐन वेळी सगळं रद्द केलं. कारण मला घरी जायचं होतं. घरापासून दूर इतके दिवस राहिले मग अजून चार दिवस चालू शकलं असतं. माणसाची माया माणसांना बोलावते असं म्हणतात. घराची मायाही माणसांना बोलावते हे अनुभवलं.
दिवस मजेत गेले, पण जसा सोमवार आला तसं घराबाहेर पडणं जीवावर यायला लागलं. ऑफिसमध्ये जाऊन काही कागदपत्र द्यायची होती, काही फॉरमॅलिटीज पुऱ्या करायच्या होत्या, ते सगळं केलं, पण संध्याकाळी परत घरी आले. करमलंच नाही तिथे. आनंद अमेरिकेला गेलाय. तो भेटला नाही. आनंदी भेटली. घाईत होती आणि मीही. पण तिथे गेल्यावर बरं वाटलं. जुनं काहीतरी पुन्हा भेटल्याचा आनंद.
आईच्या आग्रहाखातर अजून एका मुलाला भेटले. मुलगा चांगला आहे. दिल्लीला असताना रोज फोन, चॅट चालू होतं. महिन्याभराने मी परत आले की पुन्हा भेटायचं ठरवलंय. कनेक्शन वाटलं असंही नाही आणि वाटणारच नाही असंही नाही, असं दोघांचही मत पडलं. निदान, मला त्याच्याशी ह्या विषयावर फ्रीली बोलता येतंय हेही नसे थोडके. आणि अत्ता वेळ कुणाला आहे ह्या भानगडीसाठी?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई बाबा आणि विन्याबरोबर पूर्वीसारखी मजा करता आली. विनाकारण (म्हणजे विन्यामुळे) भरपूर हॉटेलिंग झालं. गप्पा झाल्या. आजीकडे जाऊन आले. उरल्या सुरल्या मैत्रिणींना भेटले. दोन अडीच महिने केलं नाही ते सगळं केलं. पण कुठेतरी एक बोच मनाला लागून राहिली होती. माझ्याच नाही, सगळ्यांच्याच. सगळी धावपळ चालली होती, एका आठवड्यात मागचे दोन आणि पुढचा एक महिना बसवायची.
पुढच्या आठवड्यात मी पुढच्या मुक्कामाला जाईन. नवं शहर, नवी जागा, नवी माणसं, नवं काम आणि नवं स्वातंत्र्य. घरी असताना सतत असं वाटतंय की माझी जागा इथे नाही. मला आता परत निघायचंय, उडायचंय. दिल्लीत होते तेव्हाही मी उडत होते, पण आपलं घरटं आहे आणि महिन्या दोन महिन्यानी आपण परत तिथे पोचू असा दिलासा होता. अता पुढच्या वर्षभराचा कार्यक्रम लागलेला आहे. घरी असूनही आठवड्यानी परत जायचंय ह्याचंच दुःख जास्त वाटतंय.
विनूला विचारलं मी की विन्या मिस केलंस का रे मला? तर म्हणाला, अजिबात नाही. सुठीवाचून खोकला गेला. गम्मत करत होता तो, पण मला वाईट वाटलं, त्याला कळलं. मग सॉरी म्हणाला. आईची खरेदीची घाई चाललेली. तिथे हे मिळणार नाही आणि ते मिळणार नाही म्हणून भंडावून सोडलंय. आमचं सगळं किचन बहुतेक बॅगेत कोंबून देणारे मला.
बाबाचं काय लिहू. बऱ्याच दिवसांनी त्याच्याशी मनमोकळं बोलताना एवढं बरं वाटलं सांगू? एवढा चांगला बाबा असताना महिनोन महिने आपण त्याच्यापासून दूर राहायचं म्हणजे शिक्षाच आहे मला.
त्याला मी म्हटलं, बाबा तू एवढा छान बोलतोस, लिहून काढ ना सगळं, मी टाईप करून देईन तुला. त्याच्या गमती जमती, कॉलेजमधले किस्से, चळीतले किस्से. एक अख्खं पुस्तक होईल तयार. तर म्हणाला, कारकुनांचं काम लिहिण्याचं. अनुभवलेलं जे आहे ते गेलं. गंगेला मिळालं. त्याच्या पोकळ आठवणी काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ दुसरं काहीतरी छान अनुभवण्यात घालवायचा. बऱ्याच दिवसांनी मला त्याचं हे पटलं नाही. मी वाद घातला. मग म्हणाला, समज तू एखाध्या अत्तराचा वास घेतलास, तर तुला तो सुवास कसा होता हे तसंच्या तसं लिहिता येईल? तू लिहिशील मोगऱ्यासारखा होता. पण मोगऱ्याचा प्रत्येकाला आलेला अनुभव वेगळा आहे. त्यामुळे वाचणाऱ्याला मोगऱ्याचा जो अनुभव आला तो तुला आला असावा असं त्याला वाटणार. पण तो तुझा ओरिजिनल अनुभव नाहीच ना? मग लिहिण्याचा सगळा खटाटोप कशासाठी?
तो म्हणतो ते बरोबर आहे आणि नाहीही.
दुपारी एकटीच गॅलेरीत उभी होते. माझ्याच शाळेतली एक चिंगी, लाल रिबिनी बांधलेल्या दोन वेण्या उडवत कुठेतरी चालली होती. कुठेतरी का? नक्की मधली सुट्टी असणार आणि ती घरीच चालली असणार. मला वाटलं मीही तिच्यासारखीच आहे. मधल्या सुट्टीत घरी अलेली. उद्या परवा ही सुट्टी संपेल आणि मी पुन्हा शाळेत निघून जाईन जगाच्या. तिथे नवे मित्र असतील, नवं शिक्षण असेल, पण घरात मिळणारे दोन निवांत क्षण. आईच्या हातचे मोदक, बाबाची विस्डम आणि विन्याची टशन काहीही नसेल.
पण मीही येत जाईनच की मधल्या सुट्टीत, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा?
- संवादिनी
13 comments:
"विनाकारण (म्हणजे विन्यामुळे)"
"तो म्हणतो ते बरोबर आहे आणि नाहीही."
"एका आठवड्यात मागचे दोन आणि पुढचा एक महिना बसवायची."
सहिये...
All the best... :)
संवादिनी,
नेहमीप्रमाणेच एक सुंदर पोस्ट. अशीच लिहीत जा.
SM: Loved the analogy of 'maddhli sutti'!
interesting read. Enjoy your 'madhli sutti' at home and have fun and excitement in your next assignment.
"विनाकारण (म्हणजे विन्यामुळे)"
मस्तच...
खुप छान..एकदम जमून आलेल्या सायीच्या दह्यासारखं झालय पोस्ट...
मस्तचं लिहीलं आहेस! खूप गोष्टी अगदी मला सध्या वाटताय्त तश्या लिहिल्या आहेस!
जियो...
हे खरं संवादिनीसारखं पोस्ट....
तू म्हणतेस ते सगळं अनुभवलंय, अनुभवतोय...पटलं नि आपलंच वाटलं हे वेगळं सांगायला नकोच...
प्रत्येकाला अत्तराचा सुगंध वेगळाच खरा...पण म्हणून आपल्याला तो कसा वाटला हे सांगायचंच नाही म्हणजे फार झालं...असंच सांगत रहा...
हा आता कसं मला जुन्या संवादिनीला भेटल्या सारख वाटतय!! आधीची पोस्ट्स मी वाचलेली नाहीत फक्त शीर्षक तेवढं वाचलय... वाचीन ह्या शनिवारी... बाकी मधली सुट्टी संपली का?? :P
Deep
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.
छान! असंच निखळ लिहीत रहा!
ata jaswandi cha post vachala...tya reference varun tuza blog ughadala.....masta lihilays....asa hota khara....
tula kho dilay
मस्तच लिहितेस गं! खूप आवडलं हे पोस्ट! माझी, “मधली सुट्टी.” ह्यावेळी फारच लांबल्यामुळे आता घरची सॉलिड भूक लागलीये, पण काय करणार? आता शाळा संपवून एकदमच घरी जाईन म्हणते...
आमच्याकडे उलटे वाद असतात, बाबा म्हणतात, तू माझे अनुभव चांगल्या भाषेत लिही. आणि माझं म्हणणं, की तुमचे अनुभव तुमचेच आहेत, तर ते मला कसे लिहिता येतील?
sundar lihila ahes. awadala.
@ मेघना, अनिकेत, पूनम - थँक्स.
@ समीर - धन्यवाद. मधली सुट्टी मस्त एंजॉय केली. आणि सुदैवाने थोडं एक्स्टेंशनही मिळालंय.
@ संवेद - तुझी कमेंट खूप आवडली. त्या कमेंटलाच एक कमेंट द्यावी इतकी चांगली आहे.
@ जास्वंदी - तुला वाटतंय ते मलाही कधीतरी वाटणारे आणि त्याची भीती मला अत्तापासून वाटतेय. ऑल द बेस्ट.
@ निमिष - माझं म्हणणं सांगायचा असंच आहे. बाबाचं म्हणणं नाही सांगायचा कारण, त्याने माझा अनुभव नक्की कोणता हे लोकांना कळणार नाही. त्यांच्याच जुन्या अनुभवांची वाचणाऱ्याला आठवण होईल, म्हणून. पण मलाही त्याचं म्हणणं पटलं नाही.
@ दीप - मला मध्ये मध्ये झटके येतात, जमत नाही ते करून बघायचे. म्हणून..
@ सुमेधा - थँक्स. तुझ्या खो खो मधल्या दोन्ही कविता खूप आवडल्या.
@ कोहम - तुझी कमेंट वाचून खूप बरं वाटलं. तुझा व्लॉग मी नेहेमी वाचते, न चुकता. आताचा पोस्टपण खूप सही आहे. आणि चक्क मला खो दिल्याबद्दल धन्यवाद.
@ विशाखा - वाह, शाळा संपत आली का तुझी. माझी पुन्हा सुरू होणारे. आतापासूनच मी परत कधी येणार त्याचं काउंट डाऊन सुरू केलंय.
Post a Comment