Thursday, October 9, 2008

To be or not to be..

To be or not to be, that is the question;
Whether 'tis nobler in the mind to suffer
The slings and arrows of outrageous fortune,
Or to take arms against a sea of troubles,
And by opposing, end them. To die, to sleep;

जगावं की मरावं हा एकंच सवाल. जगाच्या उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळीचा तुकडा होवून जगावं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर?

अजून आठवतं. सहा वर्षाची असेन मी तेव्हा. हे स्वगत सुरू झालं की मला एकदम रडायलाच यायचं. मी विंगेत असायचे. बहुतेक माझ्या एंट्रीला थोडा अवकाश पण असायचा. पण विसरून जायला व्हायचं आपण कोण ते. एकदम खरीच आजोबांची ढमी झाले असं वाटायचं आणि आपल्या आजोबाचं हे काय झालं म्हणून डोळ्यात पाणी यायचं. नाटकातल्या आईचा आणि बाबांचाही खूप खूप राग यायचा. खरंतर मला ते काम करायला मिळालं कारण नाटकातल्या माझ्या आईबाबांची मी खरी खुरी मुलगी होते. पण तरीही मला राग यायचाच. माझ्याच आई बाबांचा.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे, शेक्सपिअरला वेगळ्या अर्थाने पडलेला हा प्रश्न, मला आज वेगळ्या अर्थाने पडतो आहे.

आपण का लिहितो असा प्रश्न कधी कुणीतरी विचारला होता. तेव्हा मी लिहिलं होतं की मला माझं आयुष्य डॉक्युमेंट करून ठेवायचंय म्हणून मी लिहिते. पण आज बऱ्याच दिवसांनी कुठेतरी मनातून कळतंय की मी खरंच का लिहिते. लिहिता लिहिताच मी कशी आहे हे थोडंसं मलाही उलगडायला लागलेलं आहे. त्यात सगळ्यात लख्खपणे मला जाणवली ती माझी व्हल्नरॅबिलिटी. ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द मला सुचला नाही. मी अतिशय व्हल्नरेबल आहे. आणि ते वारंवार ह्या ब्लॉगवर उघडही झालेलं आहे.

पण बाहेरच्या जगात आपली व्हल्नरॅबिलिटी उघड झाली तर चालेल का? नाही. जग ही एक मोठी पॉलिटिकल जागा आहे. आपण सगळेच तिथे एक मुखवटा घेऊन वावरत असतो. मीही एक मुखवटा घेऊन तिथे वावरते. तो मुखवटा एका धीट, कॉन्फिडंट, गो गेटर मुलीचा आहे. ते नाटक मी योग्यतेने पार पाडते. कुणाला पत्ता देखील लागू देत नाही माझ्या व्हल्नरॅबिलिटीचा. म्हणजे माझा जो पिंड आहे तो मी दडपून टाकते. माझी सेन्सिटिव्हिटी पुरून टाकते आणि मग उरते एक भयाण ठसठस. ज्वालामुखीची. ती ठसठस आणि हा ब्लॉग ह्याचा खूप गहिरा संबंध आहे.

आपण जे आहोत तसं वागण्याचा बोलण्याचा हा एक प्रयत्न आहे असं आज मला वाटतं. ती व्हल्नरंबिलिटी, जी मी कुणाकडेच उघड करू शकत नव्हते, ती मी इथे उघड करत राहिले. ती माझी गरजच बनली. वाचकांना ती आवडायला लागली. हो. व्हल्नरॅबिलिटीच. म्हणजे माझ्या व्हल्नरॅबिलिटिचं ग्लोरिफिकेशन इथे व्हायला लागलं. तेही मला आवडायला लागलं. तुमचे सल्ले, तुमच्या कमेंट्स ह्यांची मी ऍडिक्ट बनले. पण ह्या सगळ्याचा पायाशी होती ती मनातली ठसठस, जी दडपण्यासाठी एक मुखवटा मी घातला होता बाहेरच्या जगात. आणि गंमत म्हणजे ती उघड करण्यासाठीही मी एक मुखवटा घातला संवादिनीचा.

पण आता माझ्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. मी त्याला भेटणं, त्याने मला विचारणं आणि माझा होकार हे सगळं ह्या ब्लॉगने पाहिलं. पण आता जेव्हा मला तो मिळाला आहे. त्याच्यापासून लपवण्यासारखं काही नसावं अशी एक इच्छा आहे आणि अपेक्षाही आहे. ह्याचाच अर्थ ही व्हल्नरॅबिलिटी उघड करायची संधी मला ह्यापुढे मिळत राहील.

आतापर्यंत लिहिण्याचं मोटिव्हेशन जे होतं ते यापुढे नसेल. मग मी लिहीत राहावं की थांबावं?

टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन.

- संवादिनी

18 comments:

Unknown said...

hmm.. tu lihit rahavis asa tar vatatch.. pan tujhi 'blogvar' express karaychi garaj kami zali asnare he anubhavatun mahitiy.. :)

hakkacha shrota milala ki asa honarch!

teva tula jeva manapasun lihavasa vatel tevach lihi! amhi vat pahu..

Enjoy!!

Asha Joglekar said...

अगदी आत्ताच नाही पण लिहीत राहाण्याची गरज केंव्हा तरी जाणवेलच.

Anonymous said...

काही दिवसांपुर्वी ऑफ़ीसमधल्या एका सहकारणीने या ब्लॉगची लिन्क मला पाठवली तेव्हा वाचत गेलो. गेले काही दिवस नियमित वाचतही आहे.लिहिण्याची शैली सोपि सहज आहे पण दुर्दैवाने साम्गावस वाटत आहे की अनेक पोस्टवरुन वाटत आहे की हा एका ’सुप्रसिद्ध’मराठि ब्लॉगरच्या लिखाणाचा नकलेचा प्रयत्न वाटतो.ज्याला आम्ही आपपसात ’गरिबांची ***’ बनण्याचा प्रयत्न चालला आहे अस म्हणतो.मी त्यांची सगळी पोस्ट अनेकदा वाचलेली असल्याने हे जाणवले.या पोस्ट वरुन आता ते कन्फ़र्मच झालं. खर तर हे पोस्ट आता आणि असच येणार हे अपेक्षीत च होते.काही तरी ओरिजिनल लिहा की राव.

Anonymous said...

अमेयराव, बरोबर पॉइंट आहे तुमचा. पण तीच सुप्रसिद्ध ब्लॉगर व्यक्तीच ह्या वेगळ्या नावाने लिहीत नसेल कशावरून? ऑनलाइन वावरताना टोपणनावानेच वावरायची फॅशन झाली आहे. आणि आपण काही बोलायचीही सोय नाही - कारण आवडत नसेल तर वाचू नका, चालायला लागा, आमंत्रण नव्हतं दिलं, हा माझा ब्लॉग आहे इथे मी जे पाहिजे ते लिहू शकते - अशी उत्तरे फेकून गप्प केलं जातं.

अनिकेत भानु said...

ही काय भानगड आहे?

अनिकेत भानु said...

Oh! तुम्ही लोक Tulip बद्दल बोलताय का? आत्ताच चारपाच post वाचले त्या blogचे. साम्य आहे बुवा!

Anonymous said...

Duplicate ID aso kivha konachya style chi copy aso ... who cares? As long as lihilela original ahe, interesting ahe ani entertaining ahe..toparenta loka vachnar. So enjoy people. Uagach kees kadhu naka. :)

Anonymous said...

priy anonym,
konachya style chi copy keleli asel tar te original kase asel?

Anonymous said...

to be or not to be? ha prashna hya blog chya babatit mala vicharashil, tar mi uttar dein "not to be". tu hya blog cha lavkarat lavkar tuzya hatanech galaa ghotalelaa pahayala mala awadel.

Anonymous said...

priy Anuja...contents tar original ahet na? Ani asa baghshil tar barech Quarter life crisis madhun janare (Ani vachun relate karnare suddha) bloggers hyach style ni lihitat. Ma itka originality cha ka ohapoh?

As I said before does anybody really care? :)

Anonymous said...

मला या ब्लॉगमधे व बाकीच्या कोणत्याच ब्लॉग मधे साम्य वाटले नाही. लिखाण चांगले आहे, लेखिकेने लिहीत रहावे असे वाटते. मुळ गरज संपली असे लेखिकेला वाटत असेल तर लेखक कधीच अशा गोष्टींची गरज आहे म्हणुन लिहीतोय असे होत नाही हे सांगावेसे वाटते. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Sumedha said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

संवादिनी तु उगाचच ह्या सगळ्यान्ना मोकळं रान दिलं आहेस अनानिमस लिहायला बंदी कर परत. आणि असंच छानछान लिहीत रहा आम्ही आवडीने वाचतो तु लिहीलेलं सगळं छान असतं.

Sneha said...

sam ol kadhi asates?

सिनेमा पॅरेडेसो said...

या सगळ्याकडे दुर्लक्ष कर. त्याचा त्रास तुलाच होईल.तुझं लिखाण ओरिजनल आहे,हे कुणाला सांगण्याची गरजच नाही.ज्याला जे, जसं वाटतंय त्याला वाटू देत.लिखाण बंद मात्र करू नकोस.

Tulip said...

मला नाईलाजाने काही स्पष्टीकरणं देणं भाग पडतय इथे माझं नाव घेतलं गेलं म्हणून. बेल्हे म्हणताहेत ती सुप्रसिद्ध ब्लॉगर मी असा माझा दावा अजिबातच नाहीये. फक्त त्यानंतर लगेच खाली अनिकेत ने माझं नाव घेतलय तेव्हा मला हे स्पष्ट करणं जरुरीचे वाटतेय की माझा या ब्लॉगशी कसल्याहीप्रकारे संबंध नाहीये. मी दुसर्या नावाने ही पोस्ट्स लिहिन हा हास्यास्पद आरोप जुहि दिक्षितांनी का केला असावा हे त्यांनाच माहीत.संवादिनी साठे तिची पोस्ट्स लिहिताना माझ्या पूर्वीच्या पोस्ट्सची कॉपी करतात का करत नाही्त,करत असतील तर का हे संवादिनी साठेंनाच माहीत असणार. तेव्हा तो मुद्दा माझ्या दृष्टीने गौण.

पुढील वाटचालीस शुभेच्छा.

अनिकेत भानु said...

वाटलंच होतं इथं अशी रणधुमाळी माजणार! अर्थात ह्या ब्लॉगला ते काही नवीन नाही म्हणा.

बरे ट्युलिपबाई, आम्ही आपले नाव घेतले कारण वरच्या लोकांनी जे लिहीले होते, त्यावर विचार केल्यावर ते obvious वाटले. आता हे लोकपण असले पकाऊ आहेत ना! आरोप कसे clearly state केले पाहिजेत. नाहीतर वाचणार्‍यांचा गोंधळ उडतो. आणि समजा कोण्या एका वाचणार्‍याला असं वाटलं...की आपण स्वतः वाचून ह्या ब्लॉगची "त्या सुप्रसिद्ध ब्लॉग"शी तुलना करून पाहूया, तर ती बिचारी व्यक्ती काय सगळे ब्लॉग वाचीत फिरेल काय? म्हणून आम्ही आपले नाव लिहून टाकले. रागावू नका. निदान तुमच्या उत्तराने बेल्ह्यांचा प्रश्न निकालात निघाला. आमच्या लाडक्या जुहीताई मात्र जाम cynical आहेत. आणि त्यांचा cynicism जाम infectious आहे खरा. त्यांनी सोडलेला कीडा आमच्या डोक्यात अजूनही वळवळतोय. ह्या infectious cynicism ला next level ला नेत मी असा आरोप करतो, की संवादिनी, ट्युलीप आणि जुही दीक्षीत ह्या तीन्ही एकच व्यक्ती असून ब्लॉगची लोकप्रियता वाढवण्यासाठी हा फार्स केलाय. आता कोणीतरी खो घेऊन मी आणि ह्या सर्व व्यक्ती एकच आहेत असा आरोप करावा! शेवटी सगळी blogger population वजा एक व्यक्ती एकच होतील.

असो.

मी काय म्हणतो, ज्या प्रश्नाचे उत्तर माहित आहे, तो प्रश्न कशाला विचारावा? "मी पुढे लिहू की नको?" असं विचारलं तर कोण काय उत्तर देईल हे काय तुला माहित नव्हतं? तुझा blog follow करणार्‍यांपैकी कोणीही, कोणकोण काय comment लिहील ते guess करू शकत होतं. Post पाहिल्यावर वाटलंच होतं, जुहीताई परत येणार म्हणून. कोण लिहीण्याचा आग्रह करणार, कोण इच्छा नसेल तर नको लिहूस असं म्हणणार, हे माहित नव्हतं का? तू स्वतःच्या profile वर interests मधे "people" लिहीतेस, एवढं नको कळायला?

बाकी हे सगळं खरं आहे की fiction आहे, हा मुद्दा गौण आहे. खरं असेल तर ठीकच, पण fiction आहे असंच गृहित धरा की! मग ह्या ब्लॉगकडे सरळसरळ दर गुरूवारी पुढला भाग येणारा weekly soap opera म्हणून पाहता येईल. आणि लोक तसे एकता कपूरच्या serials मधेही involve होतात...त्यात कोणी मेलं, की खरी व्यक्ती सोडा आपल्याच घरचं कोणी गेल्यासारखे सुतकी चेहरा करतात.

आणि तुझ्या मूळ प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं, तर मी असं म्हणेन की जर हे सगळं खरं असेल, तर लिहायची गरज वाटत नसल्यास लिहू नकोस. उगीच लिहायचं म्हणून लिहीलं तर माझ्यासारखा पाट्या टाकणारा ब्लॉग होईल तुझा.

अर्थात जर fiction असेल तर गोष्ट वेगळी. चालू द्या की! छान चाललंय!

आणि हो! जे ठरवशील ते एकदाच ठरव. महिनाभर न लिहून नंतर लिहायला लागलीस तर मी आणि माझ्या लाडक्या जुहीताई दर आठवड्याला येऊन publicity stunt म्हणून हिणवू तुला. अर्थात आत्ता न लिहायचं ठरवून नंतर काही महिने अथवा वर्षांनी लिहावंसं वाटलं तर दुसराच ब्लॉग चालू करण्याचा option आहेच तुझ्याकडे.

पब्लिक blogging जाम seriously घेतं राव! तुम्ही इथंवर ही लांबलचक पकाव comment वाचताय ह्यावरून हेच सिद्ध होतं.

संवादिनी said...

@ भाग्यश्री - होय गं. हक्काचा श्रोता मिळाला की लिहिण्यासारखं काही उरतंच नाही. एकदम पटलं. पण ह्या आठवड्यात तरी लिहिणारंच आहे. पण लिहावंसं वाटतंय म्हणून नव्हे. लिहावं लागतंय म्हणून.

@ आशाताई - तुमचं म्हणणं बरोबरही असेल. अनुभवातून जे शिकता येतं ते शिकायला पुष्कळ वर्ष लागतील.

@ अमेय - लिहिण्याची शैली सहज वाटली आणि ते आपण इथे येऊन मला कळवलंत याबद्दल आभार. बाकी राहिलं ओरिजिनल लिहिण्याचं. ते राहिलं प्रतिभासंपन्न सुप्रसिद्ध ब्लॉगर्सकडे. मी बालभारतीच्या पुस्तकासारखं लिहिते तेव्हा मला जरी असं वाटत असलं की मी ओरिजिनल लिहिते तरी तुमच्यासारख्या बहुश्रुत लोकांना वाटणारंच की मी गरीबांची "बालभारती" बनण्याचा प्रयत्न करतेय म्हणून. मी तर म्हणते ज्यांना ज्यांना शाळेत मराठी शिकवलंय त्या सगळ्यांनाच असं वाटू शकेल. कारण माझं लिखाण हे "कमल नमन कर" एवढंच किंबहुना त्याहीपेक्षा बाळबोध आहे.

@ जुही - "ऑनलाईन वावरताना टोपणनावानेच वावरायची फॅशन झाली आहे" हो बाई आहे खरी पण स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारायचे नसतात, स्वतःचं घर पहिलं फुटतं. आणि तू तर हल्ली माझी जीवा भावाची मैत्रीण झालेयस. तुला कोण चालता व्हा म्हणून सांगणार? तू इथे ये मला यथेच्छ शिव्या दे. माझं काहीही म्हणणं नाही. फक्त दुसऱ्यांच्या नावाने शिमगा करू नको इथे येऊन. भांडाभांड करू नको एवढी माफक अपेक्षा आहे. माझी खास मैत्रीण म्हणून तेवढं करशील ना?

@ अनिकेत - उशीरा का होईना तुला भानगड काय आहे ते कळलं हे वाचून बरं वाटलं. राहता राहिलं ट्यूलिप सुप्रसिद्ध असण्याचं. हे खऱ्याहूनही खरं आहे. साम्य असण्याचं? मला माहीत नाही. बहुदा नसावं. खरंतर हास्यास्पद आहे. कुणी म्हटलं बाबा सैगल हा सैगलची कॉपी करतो तर कसं हसायला येईल तसंच.

मी पुढे लिहू की नको असं मी कुणालाच विचारलेलं नाही. तो मला पडलेला प्रश्न आहे. बाकी दहा जणांनी नको लिहू म्हटलं आणि दोघांनी लिही म्हटलं तरी मी माझं उत्तर स्वतः शोधणार आहे. केवळ अमुक नको लिहू म्हणाला आणि तमुक लिही म्हणाली म्हणून नक्कीच लिहिणार नाही. एक साधा सोपा प्रयत्न होता मनातले विचार मांडायचा. त्याचा किती कीस पाडला तुम्ही लोकांनी?

@ ऍनॉनिमस - टिका न करणाऱ्या दोन कमेंट्स वाचून बरं वाटलं. निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं आहे. पण निंदकांच्या गराड्यात असताना, आपल्या बाजूनं बोलणारे लोक पाहिले की बरं वाटतं.

@ अनुजा - उद्या तुला माधुरी दीक्षित व्हायला आवडेल. म्हणून तू होणारेस थोडीच? तुला काय आवडेल हे मी तरी तुला विचारलं नव्हतं तरीही तू सांगितलंस, त्याबद्दल आभार. एक म्हण आठवली. स्वप्न हे जर घोडे असतील तर सगळेच भिकारी घोडेस्वार बनतील.

@ शशांक - माझ्यासारखंच आणखी कुणाचंही मत आहे हे वाचून बरं वाटलं.

@ स्नेहा - हल्ली मी ऑनलाईन येत नाही. बंदच करून टाकलंय.

@ सिनेमा - थँक्स फॉर द सपोर्ट

@ ट्यूलिप - तू स्वतः येऊन खुलासा केला म्हणून धन्यवाद. माझ्यावर कुणाचा विश्वास नाहीच, कदाचित तुझ्यावर असेल आणि ऐकतील लोकं.

राहता राहिलं मी तुझ्या पोस्टच्या कॉपी करण्याचं. तुझ्या कमेंटवरून तरी मला असंच वाटतंय की तुलाही पटलंय की मी तुझी कॉपी करते म्हणून.

एक आवडती ब्लॉगर म्हणून माझी अशी इच्छा आणि अपेक्षा होती की तू निःसंदिग्धपणे लिहिशील की मी कॉपी करत नाही म्हणून. पण तू संदिग्ध राहणं पसंत केलंस. वाईट वाटलं. आपण ओरिजिनल नाही असं कुणी म्हणणं ह्यासारखा कलाकाराला शाप नाही.

वर तो तुझा प्रश्न नाही आणि मीच त्याबद्दल बोलू शकेन असंही लिहिलंस. त्यामुळे मला त्याबद्दल बोलावंच लागेल. तू सुप्रसिद्ध ब्लॉगर आहेस ह्यात काहीच वाद नाही. पण जर कॉपीच करायची असेल तर तुझी का करीन? घरी असलेल्या हजार पुस्तकांतल्या शंभर लेखिकांची नाही करणार? हे सगळं प्रकरण झाल्यावर मी तुझा अख्खा ब्लॉग वाचून काढला. काही प्रसंग आपल्या आयुष्यांत त्याच क्रमाने घडले असतीलही पण तुझा घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि माझा ह्यात जमीन असमानाचा फरक आहे. शैलीत तर आहेच. मी एका वाक्याला एकंच वाक्य लिहिते कारण माझ्याकडे कलात्मकता वगैरे काही नाही. मी हो ला हो म्हणते आणि नाहीला नाही.

अमेयनी कॉपी करते असं म्हटल्याचं वाईट अजिबात नाही वाटलं. पण तू त्याला मूक समर्थन दिल्याचं मात्र वाटलं. हे सगळं कशासाठी? मुळात माझ्यावर लोकांचा एवढा लोभ का हेच मला कळत नाही. मी कुणाचं घोडं मारलंय? काही कळतंच नाही मला.

असो. लिहायचं नाही म्हणून एवढं लिहिलं. आज एक कॉपी करायचा प्रयत्न करणारे. तो वाच जमलं तर. कॉपी करायचा प्रयत्न किती केविलवाणा वाटतो एवढंच दाखवायचंय बाकी काही नाही. तुला जे शोभतं ते मला कसं शोभत नाही ते दाखवायचा एक प्रयत्न आहे.