Thursday, April 2, 2009

जॉर्जी

काल संध्याकाळी ऑफिस सुटता सुटता जॉर्जी भेटली. तिला पाहिलं ना की मला फुलपाखराची आठवण येते. एकतर अतिशय सुंदर निळे डोळे आहेत तिचे. सोनेरी केस आणि अगदी उमललेल्या फुलासारखं टवटवीत हसणं. नाकी डोळी एकदम नीटस आणि मनाने खूप चांगली. अवखळ, मस्तीखोर पण कामातही हुशार. अशा ह्या उत्साहाच्या कारंज्याला दुष्काळानं गाठलं असं म्हणावा असा तिचा चेहरा झालेला.

बाईंचं काहीतरी बिनसलं होतं. तशा आम्ही काही फार जवळच्या नव्हे. मी इथे येऊन जेवढे दिवस झाले तेवढीच आमची ओळख. एकत्र काम करतो म्हणून झालेली. पण मग थिएटरची तिची आवड आणि माझी नाटकाची आवड असेल किंवा उगाचच निष्कारण बोलत बसण्याची सवय असेल आमची थोडीशी घसट वाढली, पण तरीही तीच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल मला आणि माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल तिला काहीच माहीती नव्हती. तरीसुद्धा न राहवून मी तिला विचारलंच काय झालं म्हणून.

खोटंखोटं हसून ती काही नाही कामाचा ताण आहे वगैरे बोलली. लिफ्टमधून आम्ही एकत्रच उतरलो. उतरल्यावर आमचे रस्ते वेगळे आहेत म्हणून मी तिला बाय म्हणून वळले आणि चालायला लागले. तितक्यात तिने पाठून हाक मारली. म्हणाली काय करणारेस घरी जाऊन? काही खास? म्हटलं अजिबात नाही. मला काहीही करण्यासारखं नाहीये घरी. म्हणाली चल लेटस हॅव्ह अ ड्रिंक. म्हटलं बाई, मला एखदं ड्रिंकसुद्धा झेपत नाही. मी नुसती कंपनी द्यायला येते. म्हणाली चालेल.

जवळच्याच एका कॅफेमध्ये आम्ही दोघी शिरलो. रस्त्याच्या जवळचं, काचेला खेटून असलेलं एक मस्त टेबल पकडलं. आग्रह करून करून शेवटी मला तिने एक कॉकटेल घ्यायला लावलंच. कुठल्या कुठच्या आम्ही दोघी. पण मैत्रीणीच्या अधिकाराने तिने मला आग्रह केला आणि मलाही मोडवला नाही. बराच वेळ तिथे बसलो होतो. जॉर्जी पीत होती, सिगरेट ओढत होती आणि बोलत होती.

धरणाचे दरवाजे उघडावेत आणि बदाबदा पाणी कोसळावं तसं बोलली. तिचा देश, तिचं शहर, तिची आई. घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणारा बाप. दारू पिणारा, दारूच्या नशेत बायका पोरांना बडवून काढणारा. म्हटलं काय वेगळं आहे गं तुमच्या आणि आमच्या देशात? जिथे पुरुष आहे, दारूचा अतिरेक आहे, तिथे बाईचं मार खाणं आलंच. मग देश कुठलाका असेना? एकेक पाव खाऊन दिवस काढलेत तिने लहानपणी, पावाबरोबर मांसाचा तुकडा मिळाला म्हणजे एकदम मेजवानी असं काहीसं जगणं. साम्यवादाचा पगडा, मग त्यातून झालेली सुटका, मोकळा श्वास. शिकण्यासाठी लंडनला येणं, तिथून इथे येणं. किती मोठा प्रवास तिचा. मी अवाक होऊन ऐकत होते जॉर्जी बोलत होती.

वाक्या वाक्याला बापाबद्दलचा, स्वतःच्या देशाबद्दलचा राग. नको नको त्या शिव्या देणं. पण तिला थांबवण्याची ताकत माझ्यात नव्हती. आणि तिचं काय चूक होतं? मुलांच्या पावाचे पैसे दारूत उडवणाऱ्या बापाला शिव्या नाही द्यायच्या तर काय? मला माझा बाबा आठवला. एकदा मी बाबाला खूप हट्ट केला होता. मला एकदम महागातले वॉटर कलर्स हवे होते. तेव्हा आमची परिस्थिती उगाचंच पैसे फुकट घालवण्याइतकी चांगली नव्हती. पण मला नाही म्हणाला नाही तो. खरंतर साधे रंग घेऊन देता आले असते. पण दोन गोष्टींपुढे त्याला काहीही मोठं नव्हतं, एक म्हणजे कलेची जोपासना आणि दुसरं म्हणजे त्याची लाडकी मुलगी. ज्या गोष्टी सहजच मिळत जातात त्याचं कौतूक वाटत नाही हेच खरं.

बराच वेळ आम्ही बोलत होतो. संध्याकाळ सरून रात्र झाली, गाडी विषयांचे रूळ बदलत होती पण एकच समान धागा तो म्हणजे तिचा बाप. तिने मला विचारलं बाबाबद्दल. मी काय सांगणार? तिला अजून वाईट वाटेल असं मला काहीच बोलायचं नव्हतं म्हणून मी टाळंटाळ करत होते. पण तिने काढून घेतलंच माझ्याकडून.

बाबाबद्दल बोलायला लागले की मला थांबताच येत नाही, इतका त्याचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे. ती सगळं कौतूकाने ऐकून घेत होती. कुठेही असुया किंवा दुसऱ्याकडे आहे ते आपल्याकडे नाही ह्याचं वाईट वाटणं दिसलं नाही. मग मीही सगळ्या आठवणी सांगितल्या तिला. बाबाच्या गमती, त्याचं पेटी वाजवणं, नाटकं. मग आई, विन्या. म्हणाली भेटलं पाहिजे सगळ्यांना. म्हटलं चल भारतात. म्हणाली नक्की.

बराच उशीर व्हायला लागला होता. उद्या ऑफिसही होतं. तिला आणि मलाही आणि जॉर्जीची अवस्था काही फार चांगली नव्हती. अजून पीत बसली तर मलाच तिला घरी पोचवायला लागलं असतं. म्हणून मीच जरा आवराआवरीची भाषा करायला लागले. तिच्याही ते लक्षात आलं, आम्ही बाहेर पडलो. मला ट्रेनने जाणं शक्य होतं पण जॉर्जीला ते जमेलसं मला वाटेना. मीच तिला टॅक्सीने जायचं सुचवलं. मी खरं सोडलं असतं तिला पण आमची घरं एकदम विरुद्ध दिशेला आहेत, म्हणून वाटूनही तसं म्हटलं नाही.

तिला टॅक्सी मिळाली आणि मला हुश्श वाटलं. तशी ती ठीकच होती. मला बहुतेक उगाचंच भीती वाटत होती. टॅक्सी निघाली आणि मी उलट्या दिशेने चालायला लागले. स्टेशन काही लांब नव्हतं. मी रस्ता क्रॉस करते न करते तोच माझ्या बाजूला एक टॅक्सी थांबली आणि चक्क जॉर्जी आतून उतरली.

शांतपणे चालत ती माझ्यापर्यंत आली. मला म्हणाली, तू ऑफिसमध्ये मला विचारलंस ना की काही प्रॉब्लेम आहे का म्हणून? आणि मी काही नाही म्हणाले. ते खोटं होतं. आज सकाळी मला माझ्या आईचा फोन आला होता, काल रात्री माझा बाप मेला. काय बोलावं हेच मला कळेना. ती एकटक माझ्याकडे बघत होती. तिच्या उजव्या डोळ्यातून एकच अश्रू गालावर ओघळला तशीच ती वळली आणि टॅक्सीत बसून गेलीसुद्धा.

उगाचंच ग्रेस आठवले आणि "ती गेली तेव्हा रिमझिम सुद्धा" घरी जाऊन पहाटेपर्यंत ऐकत बसले. कसा का असेना बाप होता. तो सुधारेल, आपल्याला वडलांचं प्रेम देईल, ही भाबडी आशा होती बहुतेक. ती काल तिच्यासाठी संपली. तो ओघळलेला एक अश्रू बहुतेक त्या दुःखाचाच होता.

एक माणूस गेला. पण नातं संपलं का? की सुंभाच्या न जळलेल्या पिळासारखं हे नातं कायमचं जॉर्जीला त्रास देत राहणार?

- संवादिनी

11 comments:

Sameer said...

SM: Extremely touching.

Sneha said...

angavar kata aala .. barach kahi aathaval...je kuthetarii kappyat ghatta bad karun thevalay...

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

खरं आहे. खपली चढते वरुन पण कळत नाही, जखम आतून भळभळतेच आहे.

Bhagyashree said...

oh.. kata ala angavar... hi ashi natee sagli complicated ch!

Maithili said...

Altimate.
kharetar ajoon kaahi shabd naahiyet mazyakade hya post sathi, pan kharech angaavar kaata aala ekdam.
babanch nust gharat asanech kevadhe aashvasak asate na? I m nt alone ase feeling asate. maitree hou shakate ti babanshich aaishi aaichach naat asate kaayam. konaachyahi aayushyat hi BABANCHI jaaga rikaami asane kitti trasdayak asel yaachi kalpanach naahi karavate mala.

Dk said...

सुंभाच्या न जळलेल्या पिळासारखं हे नातं कायमचं जॉर्जीला त्रास देत राहणार?>> ह्म्म्म ह्याला काही अंत नाही. मला खेद वाटतोय पण हे असच राहणार कायम तिच्या लक्षात.

तुला मेल केली आहे.

सखी said...

हे पोस्ट वाचून एक ओळ आठवली, ’नात्यांना ठाउक असते हे चालत जाणे नसते, वळणावर जाताना मग हळूच बघणे असते.’
देश बदलला तरी अश्रूंचा खारटपणा तसाच रहातो बहुतेक.

HAREKRISHNAJI said...

आता आपण कुठेशी असता ?

मी रेश्मा said...

Jabardast...............
Sundar aahe lekK

रवींद्र said...

जॉर्जी वाचले. खरेतर संवादिनी ब्लॉगला प्रथमच
भेट दिली. लिखाणाची स्टाइल आवडली.असेच लिहित रहा. आम्हा वाचकांनाही आनंद मिळूदे.

रवींद्र said...

जॉर्जी वाचले. खरेतर संवादिनी ब्लॉगला प्रथमच भेट दिली. लिखाणाची स्टाइल आवडली.असेच लिहित रहा. आम्हा वाचकांनाही आनंद मिळूदे.