Thursday, October 1, 2009

सीमोल्लंघन

परवा दसरा झाला. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ह्याचं महत्त्व. हा साडेतीन मुहूर्त हा काय प्रकार आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे वगैरे मला अजूनही माहीत नाही. पण दसऱ्याला बरीच लग्न दर वर्षी लागत असतात हा मुख्य मुद्दा. लग्नानंतरचा पहिला दसरा. लग्नानंतरचे पहिल्या वर्षीचे जे काही सण आहेत ते सगळे आमचे इथेच व्हायचेत. म्हणजे थोडक्यात जी काही पहिल्या सणाची मजा असते ती हुकलेय.

माझ्या घरी म्हणजे माहेरीपण दसऱ्याचं काही वेगळं महत्त्व नव्हतंच. घरच्या घरी साधी पूजा, दुपारी पणशीकरांचे श्रीखंड, मग मस्त झोप आणि संध्याकाळचा घरीच करायचा टाइम पास. ह्यात गप्पा, गाणी ते नुसतंच बसून राहणं सगळं सगळं आलेलं. जग कसं बदलतं. मी आणि माझा भाऊ आणि आई बाबा असं आमचं चौरस घर. प्रत्येकाचा कोपरा वेगळा, पण दुसऱ्यांच्या कोपऱ्यांकडे बघत उभा असलेला. प्रत्येकाचं महत्त्व तेच नेमकं, नव्वद अंशाचं आणि त्यावर घराचा तोल बरोबर सांभाळलेला. चौरसाचा त्रिकोण आणि त्रिकोणाची सरळ रेषा कधी झाली हे कुणालाच समजलं नाही. असेच काहीसे डिप्रेसिंग विचार येत राहिले.

तसं काम होतंच, त्यामुळे दिवस कसा गेला कळलं नाही. पण नेमकं नवऱ्याला कामानिमित्त बाहेरगावी जायला लागलेलं. एवढ्या मोठ्या घरात एकटी मी. बरं इथल्या घरांची गंमत आहे. लाकडी असल्याने मधून मधून करकरल्याचे आवाज येतात. आणि ते आवाज मोजत मोजतंच माझी रात्र जाते. झोपायचं राहूनंच जातं. कधी एखादा पोसम छपरावर येऊन आपलं नृत्यकौशल्य दाखवतो तर कधी घोंघावणारा वारा माझी झोप उडवतो. खूपच बोर झालं. मग सरळ फोन उचलला आणि आजीला फोन लावला.

भारतातही खूप असं कंटाळवाणं वाटलं की मी सरळ आजीकडे जायचे. आजी म्हणजे आईची आई. तिच्या घरी दुपारच्या सुमाराला जायचं आणि तिला चहा करायला सांगून मस्त चहा पिता पिता गप्पा ठोकायच्या असं कित्येक वेळा केलंय. अगदी परीक्षेच्या दिवसात तर खासंच. कारण दुपारी इतकी झोप यायची की स्कूटी काढून थेट आजीकडे.

फोन केला बराच वेळ गप्पा मारल्या. तिला म्हटलं असं सणाच्या वेळी खूप कंटाळा येतो वगैरे वगैरे. तर म्हणे कशी, तुझ्या आजोबांची नात शोभतेस. ते आणि आजी त्यांच्या कोंकणातल्या गावातून इकडे आले. आजोबांना सतत आठवण यायची गावाची, घराची, थोडीशी शेती होती त्याची. आंब्यांची, फणसांची, नारळी, फोफळीच्या झाडांची. आंब्यांना तर त्यांनी नावं दिली होती एकेक. नावानेच बोलायचे आंब्यांबद्दल. इतका जिव्हाळा होता आणि एकदम सगळं सोडून मुंबईला आले. म्हणाली तुमचं तरी दुसरं काय आहे. कोंकणातून त्या काळी मुंबईला येणं म्हणजे आजच्या काळी परदेशी जाण्यासारखंच होतं. त्यांनी तेव्हा सीमोल्लंघन केलं, तुम्ही आता केलं.

हो म्हणाले. पण एक विचित्र विचार घुमत राहिला डोक्यात. माणसं सीमोल्लंघन का करतात? दसरा आहे म्हणून? नसलेलं काही मिळविण्यासाठी? काही सिद्ध करण्यासाठी? पूर्वीच्या काळी राजे रजवाड्यांनी हेच केलं. आम्हीही आता हेच करतोय. पण का? कशासाठी? असे प्रश्न त्यांनी आणि आम्ही विचारलेत का? कधी वाटतं आपण उगीच हातचं सोडून पळत्याच्या मागे लागतो. कधी वाटतं, प्रवाही असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. नक्की काय बरोबर? काय चूक? आमच्या कक्षांच्या सीमा ओलांडून साजरा केलेला दसरा अधिक चांगला की घरच्यांसोबत पणशीकरांचं श्रीखंड खाऊन साजरा केलेला अधिक चांगला? असले बेसिक पण उत्तर न देता येणारे प्रश्न पडतात. तेव्हाही तसंच झालं.

बराच वेळ अशी वैचारिक लंगडी घातल्यावर एकदाची झोप लागली. पण झोप लागते न लागते तोच मोबाईल खणखणला. त्रासानेच उचलला, पण बरं झालं उचलला, भावाचा होता. मग झोप विसरून खूप वेळ गप्पा मारल्या. त्याला म्हटलं काय रे दसरा कसा साजरा केलास? म्हणाला ताई, चिल. दसराच साजरा करायचा असता तर भारतातच राहिलो नसतो का? म्हणाला व्हेन इन रोम लिव्ह लाइक रोमन, नॉट लाइक सोमण. म्हटलं हुश्शार आहेस तू.

पण मला पटलं त्याचं थोडंसं. हे हॅविंग केक आणि इटिंग इट टू सारखं झालं. विच इज ऍन ऍबस्युल्युट इंपॉसिबिलिटी.

सीमा न ओलांडता सीमोल्लंघन करता येत नाही हेच खरं.

मग एकदम शांत झोप लागली.

10 comments:

Mugdha said...

Sakali sakali masta lekh vachayala milala... :)

Anonymous said...

संवादिनी
दर सणाला असे हे नक्राश्रू किती ढाळणार? आणि तरी तुमचा दसराही मुळात काही ’ग्रॅंड’ वगैरे तर साजरा करतच नव्हतात तुम्ही. मग इतके उसासे आणि प्रश्न कशाला? इतर अनेकांसारखे चाकोरीतले, परदेशात वगैरे जाऊन, एंजॉय करुन, पैसे मिळवून आयुष्य जगायचं तर आपणच ठरवलं आहे नं?... मग रिग्रेट्स कशाचे? बहुधा अगदी कोझी आणि लाडा-कौतुकात आतापर्यंतचा काळ घालविल्याचा परिणाम!

अनिकेत said...

लेख आवडला, मनातले विचार छानच मांडले आहेत तुम्ही, पण समहाऊ, ऍनोनीमसचे विचारही पटले. एक तर उडी मारायची नाही आणी मारली तर मागे बघायचे नाही. मागे बघत बघत उडी मारली तर..

छान लिहीता.. लिहीत रहा..

samc said...

dasaryala lagna? akshayya trutiya aaNi dasara yachyat thoDi gallat zaali nahi na?

Maithili said...

Sadeteen muhurt mhanaje varshatale ase "SADETEEN" divas ki jya divashi kuthalyahi veli muhurt n bhaghata shubh kary karata yete.
dasara, chaitra padava, divalicha padava aani akkshay tritiya( ha ardha) ase saadeteen muhurt aahet.
Jara AAJJIBAI sarakhe lihilay na mi. N E ways lekh changala aahe...

Mahendra said...

जुन्या गोष्टी आठवल्या की खरंच खुप बरं वाटतं.. चांगल्या आठवणी जरुर आठवाव्या, त्यामुळे नविन जीवनात जगण्याची उभारी मिळते. छान लिहिलंय..

Deep said...

व्हेन इन रोम लिव्ह लाइक रोमन, नॉट लाइक सोमण :D :D :D hahaha sahiyeeeeeeeeeeeeeee

wawa khary! aani maithililahi thanks sam tuzyasarkhch mala hi mahit navht 3.5 muhurtaach mhtw! BTW tikde tu shirkhand vagaire parcl magvun ghyaachs ki kinwa aai-babanaach bolaavun ghe tithe tyaanaahi jara badl kaay?

व्हेन इन रोम लिव्ह लाइक रोमन, नॉट लाइक सोमण!!!! hahaha

संवादिनी said...

@ मुग्धा - थँक्स गं.

@ ऍनॉनिमस - नक्राश्रू म्हणणं जरा अतिशयोक्ती आहे. पण पुनरावृत्ती आहे हे खरंच. कोझी आणि लाडा कोडाचा किती परिणाम माहीत नाही, पण जीव लावणाऱ्या लोकांचा परिणाम नक्कीच आहे. ज्या काही आठवणी आहेत त्या लोकांच्या अधिक आहेत, सणांच्या कमी. सण हे लोकांना भेटण्याचं फक्त निमित्त. परदेशात येऊन ऐषारामी आयुष्य जगणं म्हणजे मागे ठेवलेलं पूर्णपणे विसरून जाणंही नाही ना? आणि शेवटी मीही ती वस्तूस्थिती मान्य करतेच आहे ना. पण वस्तूस्थिती स्वीकारल्याने विचार बदलत नाहीत, आपण फक्त मनाच तात्पुरतं समाधान करून घेतो एवढंच

@ अनिकेत - धन्यवाद. तूम्हीच काय, मीदेखील ऍनॉनिमस ह्यांच्या विचारांशी सहमत आहे. पण जसं वर लिहिलं तसं विचार मनात येणं आणि मग आपण आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ स्वतःलाच कारणं देणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत

@ सॅम्सी - नाही गल्लत नाही झाली. दसऱ्यालाही बऱ्याचदा लग्न असतात.

@ मैथिली - आजीबाई सारखं नाही. उलट माहिती दिलीस हे बरंच झालं. पण एवढी माहिती मलाही होती. हेच दिवस का साडेतीन मुहुर्ताचे ते मला माहीत नव्हतं म्हणजे नाहीये अजूनही

@ महेंद्र - धन्यवाद

@ दीप - श्रीखंड मिळतं, पण माणसं मिळत नाहीत ना.

snigdha said...

dasaryala lagna???kadhi aikale nahi

anyways mudda to nahi.tumache sagale lekh wachale ani baryach diwasat tumhi kahich lihilela nahi plz punha liha na,plz
- snigdha

Vikram said...

khup divast kahi lihila nahit ? mi ek niyamit vahcak ahe.. silent prakaratla !

Please do write.