Wednesday, July 20, 2011

देवयानी (17)

ती रात्र अनुराग माझ्या कडेच राहिला. सभ्य घरातल्या मुलीने खूप अभिमानाने सांगायची गोष्ट नाही ही, पण त्या रात्री आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. पण खरं सांगू? तर त्यात असभ्य असं काही होतं असं तेव्हा आणि आजही मला वाटत नाही. शरिराची गरज ही न भागवता दडपून टाकणे म्हणजे सभ्यता का? मी त्याच्या आणि त्याने आमच्या जवळ येण्याने कुणाचं काही वाईट केलं का? मग आम्ही केलं ते असभ्य कसं?

गेली बरीच वर्ष मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधते आहे. प्रेम आणि शारिरिक आकर्षण ह्या एका मागोमाग जाणाऱ्या गोष्टी नाहीत का? नक्कीच आहेत. पण तुम्ही चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडलात तर? मग त्या वेळी तुम्ही ज्या व्यक्तीवर खरं खुरं मनापासून प्रेम करत होता त्या व्यक्तीबरोबर भौतिक सुखाची परमावधी गाठण्याचा केलेला प्रयत्न भ्रष्ट किंवा असभ्य कसा काय असू शकतो? मला पूर्ण कल्पना आहे की ह्या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत, पण तरीही मला पडलेल्या ह्या बेसिक प्रश्नाचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही. फिरून फिरुन मुद्दा विवाहबाह्य किंवा विवाहपूर्व ह्या शब्दावर येतो. आणि लग्न ह्या संस्थेला दिलेलं अवाजवी महत्त्व मला आजही मान्य नाही.

असो तो वेगळाच मुद्दा झाला. पण आम्ही जे काही केलं ते माझ्या बाजूने तरी पूर्ण समर्पण होतं. प्रेमात पडल्यावर आपलं अस्तित्व विसरून जाणं हेच महत्त्वाचं. आणि मी तेच करत होते. संस्कृतीरक्षकांची बजबजपुरी झालेल्या आपल्या देशात मात्र माझं वागणं बेताल, असभ्य आणि अणखी बरंच काही होतं. ही गोष्ट माझ्या आई वडिलांना माझ्या नातेवाईकांना कळली तर गहजब होणार होता. अनुराग सकाळी गेला पण तो गेल्यानंतर मला इतकं अपराधी वाटायला लागलं. त्यात घरी मी एकटी. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. सभ्य घरातल्या मुलींनी ज्या पायऱ्या कधीच उतरायच्या नसतात त्या मी एक एक करीत सगळ्या उतरले होते.

दुसऱ्या रात्रीच मला सणसणून ताप चढला. पुढचा बरोबर महिना मी हंथरुणाला खिळून होते. बरेच दिवस साध्या तापाची औषधं, मग चाचण्या. शेवटी मलेरिया झाल्याचं निष्पन्न झालं. कसं कळलं मलेरियाच्या जंतूंना की मी तेव्हा व्हल्नरेबल होते म्हणून? निसर्गाचं हे मला कौतूक वाटतं. survivor senses survival. पण ह्या मलेरियात माझी परीक्षा बुडाली. वर्षभर काही अभ्यास केलेला नव्हता त्यामुळे स्कॉलर मुलं आजारी पडूनसुद्धा पास वगैरे होतात ते होणं मला शक्य नव्हतं. मी परीक्षेला जाणंच टाळलं. अंगावर पांघरूण घेऊन झोपून काढले परीक्षेचे दिवस.

अनुरागशीही भेट झालेली नव्हती. ती व्हावी असं मला वाटतही नव्हतं. स्वतःचीच स्वतःला (काहीही कारण नसताना) लाज वाटत होती. घरी सतत आई असल्याने तो येऊ शकत नव्हता. त्याने यायचा प्रयत्नही खूप केला असेल असं मला वाटत नाही. माझ्या घरी फोनही नव्हता, त्यामुळे त्याचा फोन येण्याचा प्रश्नच नव्हता. ह्या सगळ्या प्रकरणातून बाहेर यायला मला दोन तीन महिने लागले.

पुन्हा मी अनुरागला भेटले तो दिवस मला चांगला आठवतो. त्याने झाल्या प्रकाराबद्दल माझी माफी मागितली. मी त्याला सांगितलं की ते विसरून आपण पुढे जाऊ. माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे, आपण आपल्या आई वडिलांना सांगून टाकू त्याबद्दल म्हणजे लपवा छपवीचा प्रश्न येणार नाही. त्यावर चक्क त्याने माझी नजर टाळली. अनुराग भेटल्यापासून एकदाही अशी त्याने माझी नजर टाळलेली नव्हती. तो म्हणाला देवी, मला तू खूप आवडतेस, पण आपलं लग्न नाही होऊ शकत. माझे आई वडील ते कधीही होऊ देणार नाहीत, कारण माझं लग्न हाही त्यांच्यासाठी एक बिझनेस असेल, योग्य माणसाशी करण्याचा.

मी त्याला म्हटलं की असेना का त्यांचा विरोघ. माझ्या आई वडिलांचाही असेल. पण तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर प्रेम असेल तर आपल्याला काय अशक्य आहे. मला अजिंक्य वाटणारा अनुराग साधा लिंबू टिंबू खेळाडू म्हणून स्पर्धेत उतरायलाही तयार नव्हता. त्याला लढायचंच नव्हतं. कदाचित त्याला हवं ते त्याला मिळालं होतं. कदाचित आकर्षण तितकंसं उरलेलं नव्हतं. कदाचित मला त्याला फक्त वापरून फेकून द्यायचं होतं? ह्या प्रश्नांची उत्तरं मी त्याला विचारली नाहीत आणि त्यानं मला सांगितली नाहीत. त्यानंतर मी त्याच्या आजूबाजूला असले तरी खूप दूर गेलेले होते.

पण तो मला एक जखम देऊन गेला. जशी कचानं देवयानीला दिली होती ना तशीच. खपली न धरणारी, सतत खुपणारी एक जखम. विषानं विष मरतं असं म्हणतात. मीही तसंच काहीसं केलं. हाती नसलेल्या पैशाची उधळपट्टी. बडे बापके बेटे असलेल्या मुलांची मैत्री, पार्टीज, दारू, सगळं सगळं केलं. अनुरागबरोबर शरीरानं जवळ येणं मला अजिबात किळसवाणं वाटत नाही पण त्याने मला नाकारल्यावर मी जे केलं ते नक्कीच किळसवाणं आणि हीन पातळीला जाणारं होतं. उधळणारे मित्र मिळाल्यावर पैशाची कमतरता पडणार नव्हतीच.

अनुरागबरोबरच्या अनुभवातून मी एक गोष्ट नक्कीच शिकले. पुरुषाला इंटरेस्टेड ठेवायचं असेल तर डू नॉट गेट टू क्लोज टू हिम. नुसता दरवाजा किलकिला ठेवायचा, सताड उघडायचा नाही. ह्या एका वाक्यावर मी तीन वर्ष मजेत (? ) काढली.

त्यापुढे काय झालं ते आधी सविस्तर लिहिलं आहेच. प्रोफेशनल लाइफ बद्दल लिहिता लिहिता इतक्या पर्सनल गोष्टींवर येऊन पोचले. आता पुन्हा जिथे माझी गोष्ट सोडली होती तिथून पुढे लिहायला लागेन. गेले बरेच दिवस लिहिता आलं नाही आणि जेव्हा लिहिणं शक्य होतं तेव्हा हे सगळं लिहावं की लिहू नये ह्याचा विचार करण्यात वेळ गेला. त्यामुळे क्षमस्व.

- देवयानी

6 comments:

Anonymous said...

hussshhh zala tula wel...

Anonymous said...

kiti vat bhaghachi navin bhagasathi

Anonymous said...

hmmm...all guys are like this. ALL. didn't you get angry on him? Am glad, you found other ways to keep you busy (doesn't matter if its right or wrong), else it could be depressing. very very depressing. You havn't wrote much about your state of mind after Anurag's reply...

Anonymous said...

Devyani,

TU state madhun geli ahes me sudha, khuthe tari tujhyat mhajhe pratibimb pahat ahe, kahi ferfarastil evdech, pan tujha blog vachun ujalani hot ahe swatachya manachi, aayushyachi, natyachi, keep it up.

Anonymous said...

finally 17th part ........

uffff ,,,

its sad ,,, manala pil padala asel sagalyaach haluvaar bhavana kuskaralyaa gelya asatil na :( :( :(

keep writing we are waiting for next part ,,, rite guys?

देवयानी said...

स्टेट ऑफ माइंड बद्दल लिहिण्याइतकी सेन्सिटिव्ह तेव्हा मी नव्हतेच. एक प्रकारचं बधीरपण आलं होतं मला. अर्थात खूप वाईट वाटलं. कुठेतरी आपण फसवल्या गेलो असंही वाटलं. प्रेमभंगाचं दुःख होतंच. पण त्याही पलीकडे मी अनुरागला ओळखण्यात चूक केली ह्याचं वाईट वाटलं. पण माझा स्वभावच असा आहे किंवा झाला आहे की निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली की आपोआपच मी निबर, बधीर होऊन जाते. माझ्या कामामुळे निराश होण्याचे प्रसंग वारंवार येतात, तेव्हाही असंच होतं. अर्थात त्यावेळचा प्रसंग आणि कामामुळे नैराश्य येणं ह्या तुलना करण्यासारख्या गोष्टी नाहीत. पण एकंदरीत तो कप्पा बंद करून कायमचा सील करून टाकायाचा असं तेव्हा झालं. एक विचित्र ऍरोगन्सही आला होता. शक्य होईल तेव्हा जगाच्या पार्श्वाभागावर लाथ मारण्याचा स्वभाव झाला होता. दुसऱ्याला दुःख देऊन आपलं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न म्हणायचा आणखी काय.