Thursday, January 17, 2008

मी आणि माझे संकल्प

पुन्हा एकदा वर्ष संपलं.


म्हटलं, ह्या वर्षीचा लेखा जोखा मांडावा. मी गेल्या वर्षी काय केलं? तसं बरंच काही केलं आणि काहीच केलं नाही.

घराच्या आघाडीवर मी अक्षरशः काहीही केलं नाही. कधी बाबांचं टॅक्स रिटर्न भरून दे, आईला भाजी चिरून दे, विन्याच्या डिफिकल्टीज सोडव, असले फुटकंळ उद्योग केले, नाही असं नाही. पण ते सोडलं तर काहीही नाही. माझा पगार पण नाही. कारण तो माझ्या अकाउंट मध्ये जातो आणि त्यातून कधीच पैसे काढले जात नाहीत.


मग मी माझ्या घरासाठी काय केलं तरी काय गेल्या वर्षी? तशी माझ्याकडून काही अपेक्षा नाहीच, पण आपण ज्या संस्थेचा भाग आहोत आणि ज्या संस्थेच्या जिवावर आपण उड्या (फार उंच गेल्या नाहीत तरीही) मारतो, त्या संस्थेचं आपण काही देणं लागतो की नाही?

मला वाटतं माझा आळस नडतो. बऱ्याच वेळा वाटतं आईला मदत करावी. पण मग कोचावर बसून टी.व्ही. कोणी बघायचा. कोणीच बघत नाही, म्हणून त्याला (टी.व्ही. ला) वाईट वाटेल, म्हणून मी आपली टी.व्ही. बघत बसते. ते काही नाही. नव्या वर्षी केबल बंद. थोडं का होईना घरचं काम करायचं. थोडी बाबांनाही मदत करायची म्हणजे बिलं भरणं बँकेत जाणं असली कामं कधीतरी करायला काही हरकत नाही. आणि विन्याचं? छ्या त्याचं काही काम करायला नकोय, जमल्यास त्यानेच मला माझ्या कामात मदत करावी. तसा करतो तो मदत पण अजून.

हे झालं घरचं, नोकरी फ्रंटवर? सध्या नोकरी म्हणजे रुळावर चालणाऱ्या आगगाडीसारखी झालेय. रुळ सोडता येत नाही, दिशा बदलता येत नाही. रुळ नेतील तिथे जायचं. बदल हवाय एवढं नक्की. जग्गू (ओळखीसाठी मागील ब्लॉग वाचा) भेटल्यावर तर अजूनच जाणवलं, काहीतरी बदल हवाय आयुष्यात. त्यामुळे नव्या वर्षीचा संकल्प म्हणजे नोकरी बदलणे. जग्गूला सांगितलं तर ते काय खूष झाले. म्हणाले तुला लवकर समजलं. बऱ्याच जणांना रिटायर होताना समजतं. कठीण आहे पण. म्हणजे तिथले लोकं, ती जागा, माझा डेस्क आणि कंप्युटर सगळं सोडताना कसं वाटेल? आपलाच एक भाग सोडून चाललोय असं वाटेल. वाटूदे. आणखी एक अनुभव दुसरं काय?

नाटक आणि गाणं. गेलं वर्षभर बंद आहे गाणं. ह्या खात्यात शून्य मार्क. काही चांगले कार्यक्रम ऐकले हे खरं पण, रियाज अजिबात नाही. नवीन काही शिकणं तर नाहीच नाही. ठरलं. आजच बाईंना फोन करते आणि परत जायला सुरुवात करते. वेळ काढला नाही, तर वेळ मिळणार नाही हेच खरं.

नाटकाच्या दृष्टीने मात्र हे वर्ष प्लस. चार एकांकिका केल्या, खूप झाल्या. ह्याच्या उप्पर करणं काही शक्य नाही. एका सिरियलच्या शूटला पण गेले होते. पण एकंदरित ते मला झेपेलसं वाटत नाही. नाटक त्यापेक्षा खूपच छान. शूटींग भयंकर त्रासदायक आणि वेळकाढू प्रकार वाटला. आणि ती सिरियल कचऱ्याच्या टोपलीत गेली हे दुसरं. अर्थात एका एपिसोडमध्ये का होईना पण माझ्यासारख्या लोकांना घेतल्यावर सिरियल कचऱ्याच्या टोपलीतच जाणार.


आणि हो. शेवटचं राहिलंच. हा ब्लॉग सुरू केला. मजा वाटते लिहायला. डायरी लिहितेय असंच वाटतं. कोणाशी गप्पा माराव्यात तसं वाटतं आणि इतरांच्या प्रतिक्रिया वाचायला पण आवडतात. पुढच्या वर्षी इतर सगळे ब्लॉग वाचायचे हा संकल्प. काही चाळले मी. कवितांचं अमाप पीक आहे, त्यात काही चांगल्या कविता लपून जातात. गद्य पण काही इतकं सुंदर लिहितात की क्या बात है! त्यांच्यापुढे माझा ब्लॉग म्हणजे एखाद्या सुंदर कादंबरीसमोर जनरल लेजर. असो जनरल लेजर तर जनरल लेजर, माझ्यासारख्या मुलीला हेही नसे थोडके.

जेपींना (बाबांना) विचारलं की त्यांचा संकल्प काय नव्या वर्षीचा. तर म्हणाले, कोणताही संकल्प करायचा नाही, हाच त्यांचा संकल्प. कारण त्यांच्या मते त्यांनी एखादा संकल्प केला की तो हटकून पुरा होत नाही. मग विनूला विचारलं. तर म्हणाला ताई, बस इक सनम चाहिये आशिकी के लिये. हाच माझा संकल्प. कप्पाळ माझं. आशिकी करतायत. मग आईला विचारलं. ती म्हणाली, माझं (म्हणजे माझंच) लग्न करून देणे. नेहमीप्रमाणे जास्त काही न बोलता मी तिथून सटकले.


अजून थोडं लिहायचं होतं पण आता खूप उशीर होतोय. तेव्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.

विश यू ऑल अ व्हेरी हॅप्पी (अँड व्हेरी बिलेटेड) न्यू इयर....



- संवादिनी

8 comments:

a Sane man said...

मी विचार करत होतो कि या ब्लाँगमध्ये नेमकं काय आहे जे एवढं छान नि भीडणारं आहे? म्हणजे सामान्यांच्या सामान्य दैनंदिनीत नेमकं काय असामान्यत्व दडलंय? बहुदा सच्चेपणा नि सहजता. आताशा मला हे काहिसं "श्रीयुत गंगाधर टिपरे" सारखं वाटू लागलंय. नवीन वर्षात अशीच प्रांजळ पोस्ट्स येऊ देत. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Nandan said...

a sane man shi sahmat. sachchepana aaNi sahajata aahe sagalyach posts madhe. Naveen varshachya tumhalahi hardik shubhechchhaa.

सर्किट said...

साने आणि नंदन शी सहमत!

’टीव्ही’ ला वाईट वाटेल म्हणून तू तो पहात बसतेस हे वाचून तुझ्या परोपकरी वॄत्ती जाणवली आणि अगदी गदगदून आलं बघ. :-)

लिहीत रहा, आणि तू जे ब्लॉग्ज वाचतेस त्यांवर कॉमेण्ट्स ही लिही. म्हणजे दुसऱ्यांना जे वाटतंय त्याबद्दल तुला काय वाटतंय ते ही आम्हाला कळेल. (अर्थात, तू संवादिनी नावा ऐवजी दुसऱ्या नावाने कॉमेण्ट्स लिहीत असशील तर हा सल्ला इग्नोअर केलास तरी चालेल.)

Abhijit Bathe said...

"म्हणजे दुसऱ्यांना जे वाटतंय त्याबद्दल तुला काय वाटतंय ते ही आम्हाला कळेल."

सर्किट - या कन्व्होल्युटेड लॉजिक ने ’शॉर्ट सर्किट’ होईल रे! :))

HAREKRISHNAJI said...

सद्ध्या गाण्याचे किती कार्यक्रम होत आहेत, रविवारी सकाळी भुवनेष कोमकली,शनिवार, रविवारी भातखंडे महोत्सव, itc sangeet res. acadamy महोत्सव ( यांची साईट खुप मस्त आहे, चांगल गाण ऐकायला मिळते ) नुसती रेलचेल आहे, मध्यंतरी साहित्य संघात पं.सुरेश तळवळकरांचा ही उत्तम कार्यक्रम झाला.

पॄथ्वीत नाट्य महोत्सव ही आहे.

Dhananjay said...

Navin varshat likhanasathi shubhechha!

Jaswandi said...

navin varshat Klele sankalp purn karnyasathi shubhechchha!

संवादिनी said...

सेन मॅन, नंदन आणि सर्किट - तुमच्या कौतुकाबद्दल धन्यवाद. पण खरंच हे फार सोपं आहे. जे घडतं ते लिहायचं. काही फॅन्सी लिहायचा मी प्रयत्नही करत नाही, ते मला जमणारही नाही. पण हे जमतं. पेन नेमची जादू आहे सगळी. त्याच्या शिवाय नसतं लिहिता आलं इतकं मोकळं. सर्किट ह्या आठवड्यापासून मी कमेंटस टाकायला सुरवात केलेय. तुझा ब्लॉग अजून सापडला नाही कमेंट करायला.

हरेकृष्णाजी - मी तळवलकरांच्या कार्यक्रमाला होते. आमच्याच गावातला म्हटल्यावर जायलाच हवं. नो एक्स्क्युजेस.

अभिजित, धनंजय आणि जास्वंदी (जास्वंदी, तुझा आय डी फार आवडला) - कमेंटबद्दल खूप खूप थँक्स.