Thursday, February 14, 2008

मी आणि बाबा

आपण ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडू शकतो असे थोडेच जण असतात. माझ्यासाठी माझे बाबा तसेच आहेत. खरंखरं सांगायचं तर मला आईपेक्षा बाबा जवळचे वाटतात. म्हणजे आई आवडत नाही असं नाही. पण बाबा इज समवन स्पेशल. लहानपणापासूनच मला त्यांचा ओढा जास्त. आरडाओरड्याचं काम आईचं. ती म्हणते तसा सगळा वाईटपणा तिनं घ्यायचा. आणि त्यावर मलम लावायला बाबा. त्यामुळे नाही म्हटलं तरी बाबांबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाच.

पण ते आहेतच तसे. त्यांना काही चुकतंय असं वाटलं तर ते फक्त त्यांना तसं वाटतंय हे सुचवतात. कुणाची चूक आहे. कशी सुधारायची वगैरे निर्णय ते माझ्यावर सोपवतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तरुणपणी त्यांनी केलेल्या चुका ते आम्हाला सांगतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. स्वतःच्या चुका मान्य करणं किती कठीण आहे.

ह्या रविवारी मी दुपारी नाटकाच्या तालमीवरून आले. चहा पीत निवांत लोकरंग वाचत बसले होते. चार साडेचार झाले असतील. तर हे आले. उगाचच नाटक कुठपर्यंत आलंय वगैरे चौकश्या केल्या. मग म्हणाले चल पाणी पुरी खायला जाऊ. मी कशाला नाही म्हणतेय. आईला विचारलं, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणाली. विनयला क्रिकेट खेळायला जायचं होतं, त्यामुळे तो आला नाही.

सहा वाजता मी आणि बाबा गेलो बाहेर. पाणी पुरी खाल्ली, नेहमीप्रमाणे एक प्लेट झाल्यावर दुसरी अर्धी अर्धी खाल्ली. मग म्हणाले चल कॉफी पिऊ. म्हटलं चला. नेहमी मी म्हणते कॉफी कॉफी. आज हे म्हणतायत तर जाऊया. सीसीडी मध्ये गेलो. तिथे माझी मैत्रीण भेटली, तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर आली होती. आणि मी आमच्या तातांसोबत. जरा ऑकवर्ड झालं. का? माहीत नाही? कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो, म्हणून असेल.

मी माझी नेहमीची ट्रॉपिकल आईस्बर्ग घेतली. थंडीचं कारण देत बाबांनी मलाच कोणती तरी गरम गरम कॉफी ऑर्डर करायला सांगितली. एकात एक विषय गुंफत त्यांनी तो माझ्या करिअर आणि लग्नावर आणून सोडला. मला कळलंच नाही. मी त्यांना सांगितलं मला इतक्यात लग्न करायचं नाही. ते म्हणाले ठीक आहे, कधी करायचंय? म्हटलं माहीत नाही. मग हसत हसत म्हणाले, ठीक आहे.

उगाचच मला त्यांना त्या मिशीवाल्याबद्दल सांगावंसं वाटलं. मग विचार केला आता नको. अजून नीट ओळखही नाही त्याची. जाऊदे. मग मीच त्यांना त्यांच्या कॉलेजातल्या मैत्रिणींबद्दल विचारलं. तसं अनेकदा ऐकलंय पण बाबा सांगायला लागले की ऐकायला मजा येते. तेपण बिंधास्त एखाद्या मित्राला सांगावं तसं त्यांचं तरुणपण मला, विन्याला सांगतात.

एकंदरीत काय तर संध्याकाळ मजेत गेली. पण एक वॉर्निंग देऊनच. कारण जेव्हा बाबा कॉफी प्यायला घेऊन जातात आणि एखादा विषय काढतात. समजावं की आता खरंच काहीतरी ऍक्शन घेणं जरूरीचं आहे. ते काही बोलणार नाहीत, पण त्यांना काय म्हणायचंय हे बरोबर त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलंच. त्यांच्या हसण्यातून. तिढा वाढत चाललाय. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. वादळापूर्वीची शांतता तर नाही ना ही? सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी "आई" म्हणते. चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला? शेवटी आई आहे ती.

आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसात गेले तर एक मोठा धक्का. पुढच्या आठवड्यात मँगलोरला जायचंय कामाला. अजून मी ऑफिसच्या कामाला, शिवडी, वाशी आणि नरिमन पॉइंट सोडून कुठेही गेले नाहीये आता एकदम मँगलोर. तिथे म्हणे नवं ऑफिस सुरू झालंय तिथे ट्रेनिंग द्यायचंय. खरंतर आमच्या बुटकोबाला (साहेबाला) सांगितलं होतं जायला. पण तो साहेब असल्याने त्यांनी पार्सल मला पास केलं.
कोंकण रेल्वे ने जायचं हेच त्यातल्या त्यात बरं आहे. आम्ही चार जण आहोत आणि काही लोकं विमानानं येणार आहेत. आम्ही पडले तळा गाळातले कामगार म्हणून आम्ही रेल्वेने. पण कोंकणात जायचं तर विमानापेक्षा रेल्वेचीच मजा.

एकंदरीत वादळ गिरगावात आलं तरी मी मँगलोर ला असेन, त्यामुळे आनंदातच आहे.

पुढच्या आठवड्यात गुरुवारी मी तिकडे असेन. कदाचित ब्लॉग लिहिता येणार नाही. पण इंटरनेट मिळालं तर काहीतरी पोस्ट करीनच.

आणि हो. हॅपी व्हलेंटाईन्स डे!!

मला शिवसेना आवडते पण आज शिवसेना मुर्दाबाद! व्हॅलेंटाइन झिंदाबाद!

ज्यांना त्यांचे व्हालेंटाइन्स आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाहीत (उदाहरणार्थ मी) त्यांना ऑल द बेस्ट!!



- संवादिनी

12 comments:

Samved said...

Happy V-Day! मंगळुर(असंच म्हणतात मराठीत) जाऊन ये. छान, छोटं टुमदार गाव आहे, खाण्यापिण्याची चंगळ आहे..तू प्रथम(hopefully I am right)अवतारावर प्रेम करत असशील, तर ब्येष्ट मंगलोरियन फिश मिळतं बघ तिथं. आणि ती त्यांची छान रोटी cum भाकरी..वा वा..मस्तच. आणि एक गोष्टं करच...तिथे गडबड नावाचं icecream cum faluda मिळतो..don't miss it लय बंपरभर येतो बर का त्यामुळे पोटात जागा असतानाच order कर..
आणि माझा अनुभव विचारशिल, तर most likely तू मिशीवाल्याबद्दल आईलाच आधी सांगशिल :). फार उशीर करु नकोस, मौका है, दस्तुर भी है...हातौडा मार भी दो..

सर्किट said...
This comment has been removed by the author.
सर्किट said...

कितीही प्रयत्न केला तरी बाबा या ’प्रकरणा’बद्दल तू जितकं मनमोकळेपणे खरंखरं लिहून टाकलंयेस, त्याच्या १% सुद्धा मला कधी लिहीता येणार नाही हे, त्यात लपवण्यासारखं काहीच नसलं (उलट गर्वाने सांगावंसं आहे) तरी, मी कबूल करुन टाकतो. त्याबद्दल तुला सलाम! यू डिझर्व्ह इट! ते त्यांचं तसं असणं, वागणं, बोलणं, मोठ्या विषयाला हात घालण्यासाठी कॉफ़ीला घेऊन जाणं - सेम पिंच!

धिस वॉज जस्ट अनादर मास्टरपीस बाय यू!

Nandan said...

happy journey :)
>>>ज्यांना त्यांचे व्हालेंटाइन्स आहेत त्यांना शुभेच्छा. ज्यांना नाहीत (उदाहरणार्थ मी) त्यांना ऑल द बेस्ट!!
-- chhe chhe, ulaT happy independence day mhaNayala hava :)

Monsieur K said...

circuit mhanto tasa - another master-piece from u! :)
aani samved che tips aikun mala pan mangalore la jaavasa vaatat aahe - chance aahe, april-end la -ekaa mitraachyaa lagnaa nimitta - tevha nakki lakshaat thevel :D

saglyaanchech baba aani aai ase astaat - aai raagavte, aani baba laad kartaat - maahit naahi, asel kadaachit...

aani, tulaa "all the best" - vaadaLaalaa tonD dyaaylaa :)

Abhijit Bathe said...

अल्टिमेट!
मुड अचुक आणि कन्सिस्टंटली पकडलायस!
मी म्हणीन कि मिशीवाल्याशी जाऊन बोलण्याला तुला ही (आणखी एक) इन्स्पिरेशन ठरो!
जाऊन जरा त्याला पिन मार - बघुयात तो ’साथिया’तल्या विवेक ओबेरॉय सारखा तुला शोधत मंगलोर ला येतोय का! :)

मला ऑलरेडी बॅकग्राउंडला ’बंजर है सब बंजर है....’ ऐकु यायला लागलंय!!!

श्रद्धा कोतवाल said...

संवादिनी, तुझा ब्लॉग आवडला. छान लिहितेस. :-) हे पोस्ट जास्त आवडलं. मलाही आईपेक्षा बाबा जास्त जवळचे वाटतात त्यामुळे बहुधा!

मला ऑलरेडी बॅकग्राउंडला ’बंजर है सब बंजर है....’ ऐकु यायला लागलंय!!!<<<<<
अभिजित, या गाण्याला मंगलोर उपयोगाचं नाही. त्याला राजस्थानच हवा. :-) (नुकतीच राजस्थानला जाऊन आल्यामुळे हे एक ठाम मत! :-P)

a Sane man said...

"..कदाचित लोकांची आपण जरा जास्तच काळजी करतो, म्हणून असेल."

:)

ultimate...nehmisarkhach frank aaNi masta... happy journey!!!

:)

Abhijit Bathe said...

मंगलोर काय किंवा राजस्थान काय - संवादिनीने इनिशिएटिव्ह घेतला तर तिच्या अनुपस्थितीत मिशीवाल्याला काश्मिरही बंजर वाटायला लागेल. हु नोज मग तो दरडी पाडुन कोकण रेल्वे अडवायलाही मागेपुढे पहाणार नाही! :)
भायलोग - ’मिशीवाला’ हे नाव पकाऊ नाही वाटते का तुम्हाला? ’टारझन’ कसं वाटतंय? :))
आय मीन टारझनला मिशी होती कि नाही ते आठवत नाही, पण नावाचा विचार डोक्यात आल्यावर सुचलेलं पहिलं नाव म्हणजे ’टारझन’. असा विचार डोक्यात येऊन मी गदागदा हसतोय! :))

सर्किट said...

ई.. टारझन काय? संवादिनी म्हणजे काय किमी काटकर का मग? ;)

त्यापेक्षा ’राज’ म्हणूया.. जिन लोगोंको वो अच्छा लगता है, वो उसे राज केहेते है - सिर्फ़ राज.

आता कसलं रोमॅण्टिक ऍट्मॉस्फ़िअर तयार होतंय पहा!

Jaswandi said...

aga mastch!
aai nehemi oradate ani baba malam lavaycha kam kartat! :)

सहसा अशी वादळं जिच्या डोक्यात जन्माला येतात तिला मी "आई" म्हणते. चुकवून चुकवून चुकवू तरी किती तिला? शेवटी आई आहे ती.

ekdum barobbaarr!!

tujhi lihaychi style bhhaaaari mast ahe!! bakichya barachshya complicated blogs madhun tuza blog vachana treat asta! sahiye!!

संवादिनी said...

@ संवेद - खरंच "मंगळुर" झकास आहे. मला मनापासून आवडलं. मत्स्यावतारावर प्रेम आहेच. ते इथे येऊन आणखी वाढलंय. पण विकेंडला खास एका ठिकाणी फिश खायला जाणार आहे. मुंबईला आले की लिहीन त्याच्याबद्दल सविस्तर. तू गेला नसशील तर पुढच्या वेळी जाऊ शकतोस तिथे.

@ सर्किट - केतन म्हणतो तसे सगळ्यांचेच बाबा असेच असतील बहुतेक. असावेत. आणि कौतुकाबद्दल धन्यवाद! राज? नको. राज म्हटलं की हल्ली भय्ये आठवतात.

@ नंदन - मान्य. पण हे स्वातंत्र्य गमावण्यातच एक वेगळी मजा आहे ना. जितके सब जीतते है, हारके भी जीतो तो?

@ केतन - वादळाला तोंड देण्यासाठी मला बऱ्याच शुभेच्छांची गरज आहे. थँक्स.

@ अभिजित - मी काही बोलून जर ते तसं घडलं तर माझी आजी मला कानफाटी म्हणत असे. आता तुला कानफाट्या म्हणावं का? आज काय लिहिलंय ते वाच. आणि जर अशाच तुला वाटणाऱ्या गोष्टी खरंच घडत असतील. तर मी सांगेन तसं वाटवून घे. आणि टारझन काय रे? एखादं बरं नाव नाही मिळालं?

@ श्रद्धा - आज मला कोणतं गाणं ऐकू यायला लागलंय ते लिहिलंय.

@ सेन - थँक्स अ लॉट.

@ जास्वंदी - अगं जास्त कौतुक नको करू माझं. आजीची अजून एक म्हण सांगते, जी ती मला म्हणायची. भरवशाच्या म्हशीला टोणगा. खरंतर तिने मला भरवशाच्या टोणग्याला म्हैस असं म्हणायला हवं होतं हे आता लिहिता लिहिता लक्षात आलं.

बाप रे. आज इथेच ब्लॉग इतकं लिहून झालं. आणि इथे कामही नेहमीपेक्षा जास्त आहे. म्हणून ह्यावेळी ब्लॉग एकदम छोटा आहे.