Thursday, February 28, 2008

मँगलोर, तो आणि पंचावन्न पाढे

काल परत आले. आम्ही सगळेच आलो. मागच्या पोस्ट मध्ये लिहिलं नाही पण तोही मँगलोरला आला होता. त्याच्या डिपार्टमेंटच्या कामासाठी.

खूप मजा आली आणि नाहीही. तो खरंच खूप चांगला आहे. खूप गप्पा मारल्या त्याच्याशी मी. भटकलो खूप. त्याचं आजोळ आहे मँगलोर! आणि जुनं घरपण आहे त्याच्या आजोबांचं. तिथे तो घेऊन गेला. बीचवर घेऊन गेला. म्हणजे मला एकटीलाच नाही, सगळ्यांनाच. पण त्याच्याशी खूप छान मैत्री झाली. रविवारी म्हणाला फिश खायला जाऊ. बाकी सगळे कट्टर व्हेजी लोकं. मग दोघंच गेलो.

ह्यापेक्षा अजून काय पाहिजे. जी व्यक्ती तुम्हाला आवडते तिच्यासोबत एक संध्याकाळ घालवायला मिळणं ह्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?

पहिली धडधड, त्यात वेंधळेपणा करणं, हेही मी साग्रसंगीत केलं, नेहेमीप्रमाणे. मग हळूहळू तो बोलत गेला आणि मीही. माझं घर, आई, बाबा, विनय, माझी चाळ, माझी शाळा, मैत्रिणी, पुस्तकं, नाटक, गाणं, सगळं सगळं.

तोही बोलत गेला. त्याच्याबद्दल. त्याच्या बायकोबद्दल!

हो. त्याचं लग्न झालंय. गेल्याच वर्षी. आधी चौकशी..

जाऊदे. काय लिहू आणि काय नाही? मला तो आवडतो. त्याचं बोलणं, वगणं, हसणं, गाणं, खिदळणं. सगळं सगळं मनापासून आवडतं. पण त्याने काहीही फरक आता पडणार नाही. पुढचे सगळे रस्तेच खुंटलेत.
फार वाईट अवस्था झाली माझी तिथे. अचानक लक्षच उडालं सगळ्यातलं. तो काय बोलतोय मी काय बोलतेय? काय खातेय? खातेय ते चांगलं आहे की वाईट? काही काही कळत नव्हतं. हॉटेलवर परत आले तर रडायचीसुद्धा खोटी. माझी रूम पार्टनर होतीच. मग काय? खोटं खोटं हसत सांगावं लागलं फिश खूप आवडलं म्हणून.

रात्रभर झोप नाही. सतत डोक्यात तेच चालू होतं. तो मिळणार नाही म्हणून दुःख की मी सपशेल गंडले म्हणून दुःख? ते शेवटपर्यंत कळलं नाही. खरंतर मी त्याला पुरेशी ओळखत नव्हतेच प्रेम बीम करायला, मग मी का गुरफटत गेले?

पण मग विचार केला. जर मला माहीत असतं की त्याचं लग्न झालंय आधीच, तरीही आवडलाच असता ना तो मला? म्हणजे एक चांगला मित्र झालाच असता ना? नाही झालाच तो चांगला मित्र माझा. सगळंच मोठं विचित्र आहे. मी स्वतःलाच समजवू शकत नाहीये की मी त्याच्याशी मैत्री करू शकतेच ना? देअर कॅन बी लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे लग्न. लाईफ पार्टनर वगैरे अशक्य आहे. ते तर मी कधीच डोक्यातून काढलं आहे. पण ते नाही म्हणून अजिबात बोलायचंच नाही असं थोडीच आहे? आणि त्याला बिचाऱ्याला तर यातलं काही माहीत सुद्धा नाही.

प्रेमभंग नाही म्हणता येणार पण जवळपासचं काहीतरी अनुभवायला मिळालं. खूप त्रास झाला. पण मलाच बरं वाटलं. मी स्थितप्रज्ञपणे विचार करू शकले म्हणून.

घरी गेल्यावर आई म्हणाली. तिच्या मैत्रिणीने एक स्थळ सुचवलंय म्हणून. फोटो पसंत आहे त्यांना भेटायचंय. खरंतर डोक्यात तिडीक जायला हवी होती, पण चक्क बरं वाटलं. आपण कुणालातरी आवडलो ही भावना अशा वेळी हात देते. आईने फोटो दाखवला. मुलगा चांगला वाटला. पण तो परदेशी आहे. आई वडील येणारेत त्याचे, जर मला फोटो आवडला तर. मी सांगितलं आईला, नीट बघते आणि सांगते.

सध्यातरी मी सरळ रेषेत विचार करू शकेन कशाबद्धलही असं वाटत नाहीये. कुणी चांगली शंभर ठिपके शंभर ओळींची नक्षीदार रांगोळी काढायला घेतली आणि ती पूर्ण व्हायच्या आतच वाऱ्यावर उधळली गेली, तर काढणाऱ्याला कसं वाटेल? तसंच काहीसं मला वाटलं. रांगोळी पुन्हा काढता येईल, दहादा काढता येईल, पण ती अशीच जमेल ह्याची काय खात्री?

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.


- संवादिनी

11 comments:

Meghana Bhuskute said...

:(

Abhijit Bathe said...

आता मस्तपैकी मंगलोरला परत जाऊन त्याच किनार्यावरुन त्याच समुद्राला जीव खाऊन दोन-चार दगड हाण. शिस्तीत शोक व्यक्त कर आणि विसरुन जा.
तु कानफाट्या म्हणायच्या आधीच/ती कमेंट वाचायच्या आधीच तुझ्या पुढच्या पोस्टला ’तुम्हे हो ना हो...’ कमेंट दिल्यामुळे मलाच लई गिल्टी वाटायला लागलंय.

एनीवे - बिग डील यार!
खरं सांगु का - तु दु:खात वगैरे आहेस माहितिये, पण असं होण्याला ’पोपट होणे’ म्हणतात. तर तुझा पोपट झालाय. याचं कारण आपण lack of research म्हणुयात. Who knows - त्यालाही लग्न करायची उगीच घाई केली वगैरे वाटलं असेल! (मग त्याचाही पोपट!)
आता नवरा ना सही दोस्त तो है - वगैरे म्हणणं म्हणजे मुर्खपणा आहे. एवढीच जवळीक वाटत असेल तर त्याला जाऊन सांग - भाय मेरे! तेरा बॅड लक बहोतही खराब है!

I dont know man - its unfortunate, but so is life!
अरे यार - टेन्शन लेनेका नहीं, देनेका!

You know what - coming to think of it - I do feel sorry for you. I hope you wont let it affect you too much.

पूनम छत्रे said...

aaigga! khoop feel zala he post :(( tu itakyaa shitapradnyapaNe he lihoo shakates yaatach tujha kautuk vaaTataM..

Tulip said...
This comment has been removed by the author.
Vidya Bhutkar said...

Oh no! I felt really sad to read it. But the last two paragraphs worried me more. I agree that feeling sad is obvious, but making a hasty decision at the same time is worse. So just try to be calm and think well before taking any life time decision.
Take care,
Vidya.

सर्किट said...

लूक ऍट इट धिस वे - लव्ह स्टोरी शुरु होनेसे पेहेलेही खत्म हो गयी. लाखो लोकांच्या लव्ह स्टोऱ्या सुरु होवून लोणच्यासारख्या वर्षानुवर्षे मुरून मग खत्म होतात. त्या तर किती जास्त दु:ख देत असतील. तो तितका दर्द-ए-सदियॉं त्रास तुला होणार नाही. आणि दिलाचं ऐकून मोहात पडून, नवरा नाही तर मित्र सही, म्हणत हे लोणचं मुरवू पण देवू नकोस.

करकरीत नव्या कात्रीनं रस्सी कापल्यासारखं त्याच्याशी असलेलं तुझं मानसिक नातं छाटून टाकणं तुला आत्ताच शक्य आहे. आणि आत्ताच ते सर्वात सोपंही आहे. जरा प्रेमभावनेत ढिल्ली पडलीस तर कात्रीची धार खूप लवकरच निघून जाईल, आणि मग बंध तुटता तुटणार नाही.

आणि आम्हाला तुझी दर्द-ए-संवादिनी झालेली पहायला बिलकुल आवडणार नाहीये.

a Sane man said...

:(..:((.. ugich jashn-e-bahara mhatla asa zalay mala...aata pudhachi oL pan khedane khari zalya...sha!...take care!

Jaswandi said...

ohh!!

kahi kahi vela dev jara jastch kathin prashna-patrika deto!
pan ti sodavanyatch khara kas lagato na... manapasun sodvlas ani ghai keli nahis tar result bestch lagato!

Samved said...

बाप रे. सगळ्यांच्या comments वाचूनच मला कसंस होतय.. शांत बस आणि कसलाच निर्णय घाईत घेऊ नकोस. नेमकं असं होतं की काही तरी फाटतं आणि मग जो खांदा समोर मिळेल त्यावर डोक ठेवुन मुसमुसताना तोच खांदा आपला वाटायला लागतो. तसं करणं टाळ.

HAREKRISHNAJI said...

दोन चार वर्षानंरत मी तुला नेहमीच माझा भावाप्रमाणॆच समजत आहे हे ऐकण्यापेक्षा आधीच रॉंग नंबर ऐकणे केव्हाही चांगले.

मग काय आता

लताजी अब तेरा ही है सहारा की काय ?

हे गाणे ऐकले आहात काय ?

बहारे बेच दाली, फुक डाला आशीयाने को
ज़रा सी राख रख दी, बेवफ़ा तेरे दिखाने को !

ऐ प्यार तेरी दुनीयासे हम बस इतनी निशानी लेके चले
एक टुटा हुवा दिल साथ रहा, रोती जवानी लेके चले !

आये थे बडे अरमान लिये सीने मे कही तुफान लिये
अंजाम ये है सीने मे दबी एक गम की कहानी लेके चले !

दो दिन कि मुहब्बत में आखीर, हम तेरी गली से क्या लेते
इतनी भी नवाजी़श है तेरी, आखों मे ये पानी लेके चले !

ऐ प्यार तेरी दुनिया से हम !

चित्रपट - झांझर - सी. रामचंद्र, लता.

संवादिनी said...

खरंच ह्या पोस्टच्या कमेंटस वाचून खूप बरं वाटलं. दिलासा हवा तेव्हा मिळाला की खूप मोलाचा असतो. तो तुम्ही सगळ्यांनी मला दिलात. म्हणून खूप खूप थँक्स.

@ अभिजित - पटलं. ह्याला पोपट होणे असंच म्हणतात आणि तसंच माझं झालंय. समुद्राला दगड मारायची स्टेज केव्हाच गेली आहे. येस, लॅक ऑफ रिसर्च. पुन्हा अशी वेळ आलीच तर एक धडा मिळाला. दुःखात तेवढंच सूख.

@ पूनम - मलाही तसंच वाटलं. एवढं सगळं मी कसं काय लिहू शकले. आणि लपवण्यासारख्या गोष्टी मी जितक्या मोकळेपणाने लिहित जातेय ना, तितकंच माझं स्वतःचं लपून राहणं गरजेचं होवू लागलंय. पण त्याने काहीच फरक पडणार नाही. इथे जे एक नवं विश्व तयार झालंय ते खूप आवडतंय मला. मी लपून राहिल्याने माझ्या किंवा कुणाच्याही आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. पण मी हे सगळं न लिहिल्याने मला कोंडल्यासारखं नक्कीच वाटेल.

@ ट्युलिप - काय लिहिलं होतंस? आणि डिलीट का केलंस?

@ विद्या - पटलं. रिबाउंड वर प्रेमात पडणं वाईटच. तेव्हा काही दिवस मी हलकेच घ्यायचं ठरवलंय.

@ सर्किट - मी करकरीत कातरीनं नाही सगळं कापू शकले. मी अजूनही त्याच्याशी बोलते. खरंतर हल्ली रोजच आम्ही चहाला एकत्र जातो. पण आता सगळं वेगळं वाटतं. वेगळं आहेच. त्याच्यापासून दूर राहून तोटा कुणाचा? माझाच ना? चांगली माणसं भेटणं कठीण झालंय. एक भेटलाय, त्याला कशाला तोडू?

@ जास्वंदी - प्रयत्न नक्कीच करेन. पण आताशा प्रश्नपत्रिका खूप कठीण होती असं वाटत नाहीये.

@ संवेद - विद्याला म्हटलं तसंच. हलकेच घ्यायचं ठरवलंय काही दिवस.

@ हरेकृष्णाजी - खूप भावलं.

दो दिन कि मुहब्बत में आखीर, हम तेरी गली से क्या लेते
इतनी भी नवाजी़श है तेरी, आखों मे ये पानी लेके चले !

@ केतन, सेन मॅन आणि मेघना - थँक्स.