Thursday, March 6, 2008

आजी, गाणं आणि दुःख

मला एकदम निराश बिराश वाटायला लागलं की दोनच गोष्टी मदतीला येतात. नाटक चालू असेल तर नाटक नाहीतर तानपुरा. अर्थात दुःखाची नवलाईही पाच दिवसाचीच असते. पहिले दोन दिवस आपल्याला वाटत होतं ते न घडण्याचं दुःख आणि उरलेले तीन बॅक टू नॉर्मल येण्यासाठी लागतात म्हणून.

रविवारी संध्याकाळी असंच डिप्रेसिंग वाटत होतं. हो नाही करता करता तानपुरा काढलाच. यमनाचे आलाप सुरू केले. "म" बरोबर लागतोय असं वाटलं. विनयला म्हटलं बस जरा तबला घेऊन. "ओरी आली पियाबिना" सुरू केलं. एवढं बरं वाटलं ना? सगळं सगळं विसरवून टाकायची जादू आहे संगीतात नाही? तो एक "नि", तो एक "म" बस्स. बाकी काही दिसतंच नाही डोळ्यापुढे.

तेवढ्यात बाबा आले, ते बसले, आई आली, तीही बसली. आमच्या मजल्यावरचे भावे काका आहेत त्यांनाही बाबांनी बोलावलं. ते उत्तम पेटी (खरंतर संवादिनी म्हणायला हवं) वाजवतात. बैठक जमली. अजूनही दोघं तिघं आली ऐकायला. मी काही फार गायले नाही. पण बाबांनी त्यांची हुकमी नाट्यगीतं म्हटली, देवाघरचे ज्ञात कुणाला, रम्य ही स्वर्गाहून लंका. मग मला खास भावेकाकांसाठी "का धरला परदेस" गायला लागलं. त्यांचं अतिशय आवडतं गाणं.

किती दिवस झाले अशी मैफल जमली नव्हती. ह्या मैफलीला ना उत्तम गायक ना श्रोते. आम्हीच गायक, आम्हीच वादक, आम्हीच सबकुछ. पण तरीही आनंद अगणित. वर्णनच करता येणार नाही. अर्थात बऱ्याच दिवसांनी झाली म्हणून मजा आली. दर रविवारी झाली असती तर कदाचित इतकी मजा आलीही नसती.

पण असं काही उत्स्फूर्तपणे घडलं की फार छान वाटतं. एकदम "जिप्सी". खावं, प्यावं, गाणी म्हणावीत, गप्पा माराव्यात, पुढच्या गावी जावं, पुन्हा तेच करावं. तो अभ्यास, ती नोकरी, लग्न, असल्या कटकटी कुणी निर्माण केल्या कुणास ठाऊक?

अर्थात आमच्या ह्या बैठकीची निस्तरपट्टी आईला करायला लागली. नाही म्हटलं तरी चहा पाणी करावंच लागतं.

असो तर सांगायचा मुद्दा हा, की रात्रीपर्यंत माझं डिप्रेशन कुठल्या कुठे पळालं. पुन्हा नवं वाटायला लागलं. आता नवं वाटायला लागलं म्हणजे काय? लिहिणं कठीण आहे.

उगाचंच आजीची आठवण आली. तिच्या भावंडांपैकी सगळे ह्या ना त्या प्रकारे शास्त्रीय संगीताशी जोडलेले. पण तिला काही जमलं नाही, एवढं वाईट वाटायचं तिला त्याचं. जाऊदे. आजी गेली तिच्याबरोबर तिला न जमलेलं गाणंही गेलं.

लाईफ जस्ट मूव्हस ऑन.

तिच्या गाण्यासाठी थांबलं नाही आणि माझ्या दुःखासाठीही.


- संवादिनी

13 comments:

Monsieur K said...

like the way u put it - life just moved on. :)
asach mast gaana mhanat rahaa, enjoy karat rahaa.

Samved said...

wa wa kya baat hai...music has amazing powers

Abhijit Bathe said...

आयला! हे बरंय!! आणि मला उगीच इतके दिवस तुझ्यासाठी सॉरी वगैरे वाटत होतं!
मला संगीतातलं काही कळत नाही. पण इतके लोक म्हणतात म्हणजे काहीतरी ग्रेट असणारच त्यात.
येणाऱ्या डिप्रेशन्समधुन बाहेर काढणारे राग आता मलाच शोधायला हवेत....

Nandan said...

>>मला एकदम निराश बिराश वाटायला लागलं की दोनच गोष्टी मदतीला येतात. नाटक चालू असेल तर नाटक नाहीतर तानपुरा

-- sahi. mothi bhagyachi goshta!

Meghana Bhuskute said...

कसली मस्त आहेस यार तू... जस्ट कीप इट अप!

Unknown said...

mala kayam gane gata yenarya lokancha heva vatat alay.. tasach tujha hi vatla!! natak n tanpura.. donhi goshti tula sath dyayla ahet! amazing.. amhala aple awdati gani 'eikun' samadhan manav lagtay.. neways, nice post again.. u write just too well! simple but superb! lihit raha..

a Sane man said...

sahich aahes tu!

gaNa na kaLaNe va na yeNe hyacha atonaat dukhkha aahe mala...u r lucky...aso.

keep it up!

Jaswandi said...

good! :)

post ekadum chhaan zalay!

Vidya Bhutkar said...

Nothing depressing like a Sunday evening at home,no one to talk to and all the unwanted thoughts in hear.
I am very happy abt one thing, u have ur family around to come over those depressing evenings. And yes, life does move on...:-)
Take care.
-Vidya.

HAREKRISHNAJI said...

kya baat hai, such is a wonder of Yaman raga.

For such mood, Puriya Dhanashree is most appropricate raga, Sandhyakaal, kataaarvel, manalaa lagalelu hurhur.

When will we get a chance to listen to your singing ?

संवादिनी said...

@ केतन - हमम.... लाइफ विल ऑल्वेज मूव्ह. आपण ठरवायचं की ते आनंदात घालवायचं की दुःख करत. निदान आनंदात घालवायचा प्रयत्न तरी करत राहीन.

@ संवेद - प्रश्नच नाही. संगीत म्हणजे इश्वर.

@ अभिजित - तुला एक राग सुचवू का? डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी राग "डिप्रेशन बहार" (की बाहर?). हा राग कोणत्याही सुरांत गाता येतो. भारतीय शास्त्रीय संगिताच्या अभ्यासकांनी बारा श्रुतींनी गावा. इतरांनी बावीस. काळ वेळेचं बंधन नाही. स्थळ? बंधन नाही पण अधिक परिणामकारक होण्यासाठी, बाथरूम. शॉवर असल्यास शॉवर चालू करून म्हणावा. लगेच डिप्रेशन उतरतं.

@ नंदन - खरंच. माझ्या मनातलं.

@ भाग्यश्री - हं. मान्य. पण गाणं ऐकण्यातही तीच जादू आहे. हेवा नको वाटून घेऊस. खरंच गावंसं वाटत असेल तर खुल्लम खुल्ला आवाजात गा. कुणाची भीड न बाळगता. नाहीतर गाणं शीक ना? गाणं शिकायला सुरू करण्याचं काहीच वय नसतं.

@ सेन मॅन - गाणं कळलं नाही तरी काही हरकत नाही. भिडलं पाहिजे. त्यासाठी संगीत शिकायची अजिबात गरज नाही.

@ जास्वंदी - थँक्स

@ विद्या - येस, फॅमिली म्हणजे आपला सेफ्टी कुशन आहे. सगळा धक्का पेलणारा सेफ्टी कुशन.

@ हरेकृष्णाजी - हं. पुरिया धनश्री. तुम्ही इतकं गाणं ऐकता की मी मोठी गायिका नसूनदेखील, तुम्ही मला ऐकलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ह सगळं गेल्या वर्षीपर्यंत त्यानंतर मी स्टेजवरून गायले नाही.

HAREKRISHNAJI said...

संवादिनी,

कदाचीत आपले गाणॆ मी ऐकले सुद्धा असेल. तरुण पिढीचे गाणे मी जास्तच ऐकतो. माझ्या बॉगवर या बद्द्ल बरेच लिहीले आहे, या संबधी माझी पत्रे वर्तमानपत्रात प्रकाशीत झाली होती. आपण कधी ’कल के कलाकार’
संमेलनाला गेल्या आहत काय ?
गेल्याच्या गेल्या रविवारी देवधर मधे अलका देव मारुलकर यांचे गाणॆ झाले, आपण त्याला होतात काय ? मी थोडाच वेळ होतो.

आणि हो तस बघायला गेल तर ’संवादिनी’ नामक कलावंताचे गाणॆ ऐकल्याचे तरी माझ्या स्मरणात नाही.
परत केव्हा कार्यक्रम असल्यास मला जरुर कळवा

HAREKRISHNAJI said...
This comment has been removed by the author.