Thursday, April 10, 2008

नोकरी आणि भिजलेली रात्र

मिळाली. शेवटी मिळालीच.

गेल्या आठवड्यात लिहिलं नाही, पण नव्या नोकरीची बोलणी जवळ जवळ जमत आलेली होती. ह्या आठवड्यात ऑफर लेटर आलं. खूप छान वाटतंय. म्हणजे दहादा नाही ऐकल्यावर, दोन तीन वेळा नाही म्हटल्यावर, हो ऐकून, हो म्हणायचा आनंद काही वेगळाच असतो ना? तसा काहीसा आनंद झालाय मला.

कालच ऑफिसमध्ये सांगितलं. आमचा बुटकोबा तर एकदम सेंटीच झाला. म्हणाला, अभी मेरेसाथ कॉफी पिने कौन जायेगा? तशी काय मी त्याच्याबरोबर रोज नाही जायचे पण कधी कधी खूप वैताग आला सगळ्याचा की मला घेऊन जायचा कॉफी प्यायला. सगळ्या जगाला शिव्या घालायचा आणि मग शांत व्हायचा. त्याला माहीत होतं की मी इथली गोष्ट कधीही तिथे करणार नाही. आपल्याला काय, फुकट ते पौष्टिक. कॉफी आणि ऑफिसच्या पॉलिटिक्सचं ज्ञान फुकट कोण नाही म्हणेल?

त्याला सांगितलं, मग डिपार्टमेंट हेड कडे जाऊन रीतसर राजीनामा वगैरे दिला. आपण कुणीतरी मोठ्ठे झालोत असं वाटलं. त्यांनी विचारलं का चाललीस. काय उत्तर द्यायचं? का चालले? सूख खुपलं? अहं, असं काही मी बोलले नाही. मी सांगितलं, पगार चांगला आहे. आपली कंपनी पण छान आहे, पण तेवढा पगार नसता मिळाला म्हणून सोडतेय. खोटंच सांगितलं. पगार चांगला आहे, पण पगारासाठी नाही मी नोकरी सोडली. माझं आभाळ शोधण्यासाठी सोडली.

मग सगळ्या ऑफिसमध्ये बातमी पसरली. एकेक फोन यायला लागले. त्याचाही आला. मिशीवाल्याचा. ऑल द बेस्ट म्हणाला. काहीबाही बोलत गेला. पण त्याचं बोलणं काही डोक्यात गेलंच नाही. फक्त तो बोलत असल्याचा फील.

नेहमीची टेप लावायची. कुठली कंपनी, काय रोल, कुठलं शहर? मग पुणं म्हणून सांगितलं की मग तू एकटी राहणार? आमच्यासाठीपण बघा ना काहीतरी नव्या कंपनीत, इथपर्यंतच्या गप्पा. दिवस मोठा मजेत गेला.

घरी जायला निघाले, तेव्हा मात्र हुरहूर लागली. बरोबर पाच आठवडे राहिले. पाच आठवड्यांनंतर मी ह्या इथे येणार नाही. कुठेतरी दुसरीकडे जाईन. पण जग बदलणार नाही. तसंच राहील. लोकं ऑफिसात येतील, आपली कामं करतील आणि घरी जातील. मी मात्र इथे नसेन. माझा डेस्कही असेल, कॉमही असेल आणि तिथे दुसरंच कुणीतरी? छे, ही कल्पनाच असह्य आहे.

घरी पोचले. कालपासून घरी तशी शांतताच आहे. मी पुण्याला जाणार महिन्यांनी म्हणून. बाबाला मी म्हटलं, काय शोकसप्ताह वगैरे साजरा करताय का? नुसताच हसला. तो असा हसला ना की मला खूप वाईट वाटतं. खूप बिचारा वाटतो तो. बाबा. मुलगी जायला तर नकोय पण अडवायचं पण नाहीये अशी काहीशी हतबलता. काहीच बोलला नाही. मग मीच मुघल ए आझम ची सीडी लावली. ऐकत राहिला डोळे मिटून.

कधी नव्हे ते आत जाऊन आईला मदत केली थोडी. बाबापेक्षा आई ठीक वाटली. म्हणजे तिने ऍक्सेप्ट केलंय की मी जाणारे म्हणून. मग पोळ्या लाटल्या. अर्ध्या आईने पुन्हा लाटल्या. पण आमटी मात्र मीच बनवली. आता माझा स्वैपाक मलाच करायला लागेल ना ह्यापुढे?

आणि आज चक्क मी बनवलेल्या आमटीचं विन्यानी तोंडभरून कौतुक केलं. जेवणं झाली. नेहमीच्या गप्पा काही रंगल्या नाहीत. बाबा तर गप्प गप्पच होता. विन्या फुटकळ बोलत होता पण त्यालाही म्हणावा तसा उत्साह नव्हता. आई तर काय कामातच असते नेहमी ती तशी होतीच.

झोपायच्या आधी देवाला नमस्कार करायला गेले. म्हटलं बरोबर निर्णय घेतलाय ना? मला कोण उत्तर देणार? पाठी विन्या उभा होता. म्हणाला ताई तू आता अतिरेकी होणार पुण्याला जाऊन. आता मी कुणाशी भांडणार? कुणाच्या कुरापती काढणार? आय विल मिस यू यार.

आय विल मिस यू टू.

बिछान्यावर पडले तर झोप लागेना. खूप रडायला आलं. खूप खूप. सगळं आठवलं, माझा रिसल्ट, सेलेब्रेशन. बाबा तर अक्षरशः नाचला होता. आईच्या कंपनीत नोकरी, वेगळी वेगळी ऑफिसेस, आमचा बुटकोबा, मोठे सर, नवखी मी, रुळलेली मी, निराश मी, उत्साही मी, माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेय ही नोकरी. आणि तीच कापून दूर करायची?

पूर्ण रात्र भिजून निघाली.

- संवादिनी

19 comments:

स्नेहा said...

kaay bolaNaar? sanvaadinii.. lakshaat thev kitihii unch udaalis tarii partayalaa hakkach ghar aahe...aai baba vinyaa aahet....
aapaN aapala parigh vaadhvaayachaa ... avadhach...
aani tu paratalyavar tyanchyaa cheharyavarachaa anad ..abhiman kahi orach asel... kahinchya nashibat tehi nasat...
mi jara jastach lihal sorry

मोरपीस said...

आपल्या भावना आपण योग्य रितीने मांडल्या आहेत.

Monsieur K said...

all the best for the new job, new city & new life :)

aadhichya post varchya comment ch tujha uttar pan vaachla.
hya post madhe tu parat nehmi saarkha, tujhya aayushyaat kaay-kaay ghadala, tey nehmi saarkha lihila aahes.
aadhichi post, tu mhantes tasa, ek apvaad hotaa - tujhya manaat kasle vichaar yetaat - tya baddal.

good one!
keep writing..

Anonymous said...

Hi

Read all ur blogs. Mazi diary wachtey ase watale.

Jaswandi said...

मला आत्ता एक्दम ४ वर्षांपुर्वीची मी आठवले...कॉलेजात शिकायला पुणं सोडून मुंबईला जायचं होतं तेव्हाची मी!
आई-बाबांनी आधी समजावलं "पुण्यात कॉलेजांना तोटा नाही" पण मलाही तुझ्यासारखी उडायची हौस होती! आमच्या घरी उलटं झालं, बाबा जास्त काही बोलले नाही..पण आईचे डोळे कायम भरुन यायचे!
घर सोडुन राहायचं, फोनवरुन अपडेट्स आईला देत राहायच्या, आपला आपण स्वयपाक, आपली कामं आपण करणं, आणि वेड्यासारखी घरी पळण्यासाठी शनिवारची वाट पाहणं...सगळंच एकदम वेगळं होऊन जातं!
ह्या नव्या गोष्टींसाठी खुप खुप शुभेच्छा!!

अगं आणि आमच्या पुण्यातचं येत्येस ना... जास्त काळजी नाही. :P

HAREKRISHNAJI said...

पिल्लाचा पंखात बळ आले तर गगनाला गवसणी घालण्यास.

घरचांच्या वियोगाचे दुःख तर जाणवायलाच हवे.

नव्या जीवना विषयी शुभेच्छा.

Bhagyashree said...

आणि आमच्या पुण्यातचं येत्येस ना... जास्त काळजी नाही.>>>> kaahIch kalji naahi ! :) njoy ur stay in pune... and keep updating abt 'amcha pune'! All the best!

प्रिया said...

एक सांगते संवादिनी, No matter where you are you will always miss something/somebody/some place. खरंच... अजून दोन वर्षांनी समज पुणं सोडून परत मुंबईला परत गेलीस, तर पुण्याला.. म्हणजे तिथल्या आयुष्याला मिस करशील. स्वानुभवावरून सांगत्येय, हे असंच चालायचं... (एक प्रदीर्घ उसासा!)

नवीन नोकरीकरता शुभेच्छा. आणि आमच्या पुण्याला जाणारेस म्हणजे नक्कीच एन्जॉय करशील यात वाद नाही :)

Abhijit Bathe said...

"आपल्या भावना आपण योग्य रितीने मांडल्या आहेत." ही कमेंट वाचुन धो-धो हसु आलं!

एनीवे - इथे लिहिलेल्या लोकांचं काहीही ऐकु नकोस. पुणं हे अत्यंत बकवास आणि दरिद्री शहर आहे, तुला मुंबई आवडत असेल तर पुण्याला पकशील याची गॅरंटी!
आता पुण्याला शिव्या घातल्यात म्हणजे पुणेकर भडकणार हे ओघाने आलंच - म्हणुन स्पष्टीकरण:

अमेरिकेत स्थलांतरित एक माणुस एके दिवशी आपल्या गावात परत आला.
मग लोक त्याच्या मागे लागले कि अमेरिकेच्या गोष्टी सांग म्हणुन.
म्हणुन मग तो त्या सांगायला लागला.
मध्येच एका माणसाने (हात वर करुन) एक प्रश्न विचारला कि - का रे भाऊ, आम्ही ऐकलं कि अमेरिकेतले रस्ते हे सोन्याने बनवलेत म्हणुन! खरं आहे का ते?
मग त्या स्थलांतरित माणसाने (स्वत:ची) हनुवटी दोन बोटांत धरुन, मान तिरकी करुन, भुवया वर करुन विचार केला आणि तो म्हणाला -
’हे खरंय! पण गंमत म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना ते माहित नाही!’

पुण्याचं तसंच.
दळभद्री लोकांनी पुणं बाटवुन ठेवलंय.
स्नेहसदन, बालगंधर्व, टि.स्मा., अल्का आणि इतर कुठेही - तुझ्या आवडीचं सोनं तुला नक्कीच सापडेल. फक्त तमाम पुणेकरांपासुन सपशेल सावध रहा.
(आणि मुंबईपासुन लांब लांब म्हणजे कुठे? तर पुणे? बाई तु कल्पनादरिद्री वाटत नाहीस तुझ्या लेखांवरुन!)

Samved said...

नव्या नौकरी बद्दल अभिनंदन आणि पुण्यात स्वागत. अजिबात रडारड करु नकोस. पुण्यात निम्मे मुंबैकर आहेत, सारखे पळत असतात, तुही पळशील. मस्त रहा. इथे ऎश टाकायला लै जागा आहेत: खाणं- स्वर्ग!! वैशाली (खाण्याच्या बाबतीत गणपतीच जणु. कायम सुरुवात इथूनच होते), रुपाली, जोशीवडेवाले, ज्ञानप्रबोधिनी समोरचा गाडेवाला, S P समोरचा बिर्याणीवाला हे गावात, कोथरुडात येशील तर गणेशभेळ (हा ब्रॅन्ड आहे बरं का. याचे बरेच duplicate आहेत), अभिषेक आहेत, हडपसर/मगरपट्टा भागात वेगळं कल्चर आहे, कॅम्पात दोराबजीला अजूनही पर्याय नाही. आता तुला वाटेल काय खादाड माणसं आहेत. तर ते काही खोटं नाही. पुण्यात रवीवारी गॅस पेटत नाही.
आता आत्मसुख: ब्रिटीश लायब्ररी मस्तच. कॅम्पात लॅन्डमार्कच कलेक्शन सुंदर. तिथे CD पण चांगल्या मिळतात. अलुरकर कोथरुडात, classical साठी पण माज आहे
बालगंधर्व आणि टिळकस्मारक जुनी नाट्यगृह, ऍकॉस्टीकची बोम्ब आहे. त्या मानाने यशवंतराव चव्हाण उत्तम. पण हल्ली नाटक येत नाहीत हे मुळ दुखण आहे.
सवाई आणि असंख्य गाण्याचे platform म्हणजे तू enjoy करशीलच, मस्ट आहे.

हुश्श्श्श्श्श. दमलो. बाठेसाहेब, काही विसरलं का? आम्ही पक्के, मुळ पुणेकर नसल्यामुळे आमच्या पासुन फारशी भिती नसावी. वाघ हल्ली फक्त सर्कशीतच दिसतात हो. त्यामुळे खरा पुणेकर बघायचा असेल (आणि तो बघच एकदा) तर पेठेत जा आणि ज्या जीर्ण वाड्यावर खंडीभर पाट्या असतील तो पुणेकराचा समज.

.... said...

सामवेद ध्यन्यवाद... अगं पुण खरच सही आहे त्यात तु नटक प्रेमी म्हटल्यावर खुप मज्जा येयिल... सामवेद्ने एका महत्वाच्या जागेचा उल्लेख केला नाही... ते म्हणजे सुदर्शन रंगमंच... दर्जेदार नाटक बघायला मिळतील... मी पुण्यात होते तेव्हा तरी मिळायची... माझा आवडता कट्टा आहे तो.... मज्जा कर आणी हो मला जरा तुझा email ID हवा आहे .. मला mail कर nehaj84ster@gmail.com

shinu said...

व्वा! मस्त जमलंय. प्रत्येकानं घ्यावाच हा अनुभव घरापासून दूर रहाण्याचा. बाय दि वे पुण्यात बाकी कशाची नसली तरी एका गोष्टिची मात्र खात्री आहे की, येथे माणूस भुकेला कधिही रहात नाही. प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीत किमान दाबेलीवाला आणि डोसेवाला उभा असतोच. तुला त्यामुळे आमटिला फोडणी घालायची वेळ फार कमीवेळा येईल.:))

Sumedha said...

प्रियानी तुझा ब्लॉग आवर्जून वाच असं सांगितलं... खूप छान आणि fresh वाटलं. आणि आमच्या पुण्याला जातीयेस, मजा कर, खूप नवीन नवीन गोष्टींचा आनंद घे! आणि लिहीत राहा.

Parag said...

congrats for the new job.. welcome to pune.. :) aaj khup divsanni vachala tuza blog.. chan lihiliyas.

क्ष said...

तुज पंख दिले देवाने,कर विहार सामर्थ्याने..

आभाळ शोधण्यासाठी शुभेच्छा.

संवादिनी said...

@ स्नेहा - मला पूर्णपणे पटतंय तुझं म्हणणं. पण तरीसुद्धा ओढाताण होतेच ना थोडी? तशीच होतेय. आणि तुला वाटेल ते खुशाल लिही बरं इथे. जास्त वगैरे काही होत नाही. आणि सॉरी म्हणायची तर अजिबातच गरज नाही. सुदर्शन रंगमंचाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. नक्की जाईन तिथे.

@ मोरपीस, सुमेधा, पराग, क्ष - धन्यवाद!

@ केतन - ऑल द बेस्ट बद्दल थँक्स. फॉर शुअर आय ऍम गोइंग टू नीड इट व्हेन टाईम कम्स.

@ ऍनॉनिमस - खरंच बरं वाटलं तुझी कमेंट वाचून. आपल्यासारखीच गोष्ट अजून कित्येकींची असेल नाही?

@ जास्वंदी - चार वर्षानंतर मी तुझ्यासारखं असं म्हटलं म्हणजे झालं. काय? ए, तुझ्या आईचा ब्लॉग खूपच छान आहे हं.

@ हरेकृष्णाजी - खरंच. घरच्यांच्या वियोगाचंच दुःख जास्त आहे. नव्या आव्हानांचं दडपण कमी आहे.

@ प्रिया - तुझ्या तोंडात साखर पडो. इतकी मजा येऊदे पुण्यात की सोडावसं वाटायलाच नको.

@ अभिजित - अरे लांब जायचं म्हणून कुठं टेन्शन आहे. घर सोडून जायचं म्हणून वाईट वाटतंय. चांगली गोष्ट एवढीच आहे की पुणं म्हणजे दर विकेंडला घरी पोहोचता येईल. सोनं शोधायचा प्रयत्न नक्की करेन, वेळ मिळाला तर.

@ संवेद - मस्तच. ही लिस्ट बरोबर बाळगणं मस्ट आहे. कारण आमचे पुण्यात कुणी नातेवाईक नाहीत त्यामुळे मला तसं नवखंच शहर आहे.

@ शिनू - तुझ्याही तोंडात साखर पडो. आमटीला फोडणी द्यायची वेळ जितकी कमी येईल तेवढी चांगली. आणि मी फोडणी दिलेली आमटी खाण्याची वेळ तर वैऱ्ञावरही येऊ नये.

प्राजकताची फुले............ said...

Congrats for new job !

माझं पण असाच झालं होतं मुंबई सोडून पुण्याला जाताना , पण रुळशिल तू नक्की पुण्यात , खाण्याचे हाल होणार नाहीत ह्याची guarantee :)

मी एक वर्ष काढलं पुण्यात (अगदी दिवस ढकलावे लागतील असं वाटलं होतं तसं नाही झालं) , प्रत्येक weekend ला घरी परत, एकही weekend चुकवला नाही

आता पुण्यात नाहीये तर काही गोष्टी नक्की करते

प्राजकताची फुले............ said...

आता पुण्यात नाहीये तर काही गोष्टी नक्की miss करते

Saurabh said...

tooooo good!

Chaan lihates.