मी का लिहिते?
.....................................................................................
ऐलतीराच्या कुशीला, माझ्या काळजाचा ठाव
उगवतीच्या दिशेला, माझा जीवलग गाव
उगवतीच्या दिशेला, माझा जीवलग गाव
तिथे सोनेरी सकाळ, चढे चंदेरी दुपार
मन फिरे रानोमाळ, नाही काळजी चकार
बाबा मोठा तालेवार, त्याचा चिरेबंदी वाडा
माय मायेची फुंकर, दारी प्राजक्ताचा सडा
दृष्ट पडावी कुणाची, असा सखा भाऊराया
चौकोनी गुणांची, माझ्या वाड्याची हो माया
वाड्याच्या अंगणाला, आहे पिंपळाचं धन
आल्या गेल्या दिवसाला, एक पिंपळाचं पान
आल्या गेल्या दिवसाला, एक पिंपळाचं पान
चोपडीत हो सारीलं, एक पिंपळाचं पान
एक पिंपळाचं पान, माझं तन मन धन
.....................................................................................
कदाचित माझं लिहिणं म्हणजे पिंपळपानं जपण्याची गरज असेल. हातात असलेलं निसटून चाललंय ही हतबलता असेल. मुठीत वाळू कधीच राहत नाही मला माहितेय. प्रयत्न वाळू पकडण्याचा नाहीये. प्रयत्न कधीतरी वाळू हातात होती ह्याची आठवण ठेवण्याचा आहे.
मी मनात येईल ते इथे लिहिते, कारण खऱ्या आयुष्यात खरं आणि स्पष्ट बोलण्याची ताकद माझ्यात नाही. मग भागवून घेते एक हौस, खरंखुरं बोलण्याची, प्रांजळ बिंजळ लिहिण्याची.
ही गरज शब्दात पकडणं कठीण आहे. कलाकाराला अव्यक्त राहण्यासारखी शिक्षा नाही. अव्यक्त व्यक्त करण्याची गरज म्हणून मी लिहिते. पण गंमत अशी की अव्यक्त ते व्यक्त करण्याच्या भानगडीत मी स्वतः अधिकाधिक अव्यक्त होत जातेय. कोंबडी आधी की अंडं? मी की माझ्या आयुष्यातलं अव्यक्त? माझ्यासाठी मी गौण आहे. माझ्या आयुष्यातलं अव्यक्त महत्त्वाचं आहे, म्हणून लिहिते, स्वतःला संवादिनीच्या सुरात लपवून.
उद्या खरंच भविष्य आलं वर्तमानात, तर उघडेन मी माझी चोपडी आणि पाहीन माझ्या गावातल्या पिंपळाचं विटलेलं, जराजर्जर पिंपळपान. हिरवेपणा हरवला असेल कदाचित पण तिथल्या सोनेरी सकाळी, चंदेरी दुपारी, चिरेबंदी वाडा आणि प्राजक्ताचा सडा तरी नक्कीच दिसतील त्या पानाच्या वृद्ध शिरांमध्ये.
कुठेतरी एखादी हास्याची लकेर, कुठे डोळ्यात ओघळलेला एखादा अश्रू, कुठे एखादा जमलेला मालकंस, एखादा विश्वासघातकी ब्रूटस, कधी एवढं एवढंसं झालेलं मन, हे सगळे हायलाईटस आहेत माझ्या आयुष्याचे. ते रेकॉर्ड करून ठेवावे आणि कधी निवांत रिप्ले करून बघता यावेत, म्हणून लिहिते. मी कशी आहे ह्याची आठवण व्यवहारी जगात कुठे गेलीच हरवून, तर ती इथे सापडेल, म्हणून मी लिहिते.
पण नकळतंच ह्या लिहिण्याला नवी किनार प्राप्त झालेय. कुणीतरी ते वाचण्याची. लिहिण्याला सुरुवात केली तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की कुणी हे वाचेल. कुठल्यातरी गजबजलेल्या हिडीस शहरातल्या एका कोपऱ्यातल्या खुराड्यात घडणारी गोष्ट, कुणाला वाचावीशी वाटते, बरं वाटतं. एका कोणत्याही सामान्य कुटुंबासारखं असावं असं आमचं कुटुंव. त्यातल्या आईला, विन्याला, बाबाला आणि मलादेखील थोडं ग्लॅमर प्राप्त होतं ह्या ब्लॉगवर म्हणून लिहिते.
अगदी जसं घडतं तसं. माझ्या गावातल्या पिंपळाच्या पानासारखं.
माझा खो यशोधराला
आणि मला खो दिल्याबद्धल थँक यू गं, जास्वंदी!
- संवादिनी
8 comments:
hmm khup chaan...
हिरवेपणा हरवला असेल कदाचित पण तिथल्या सोनेरी सकाळी, चंदेरी दुपारी, चिरेबंदी वाडा आणि प्राजक्ताचा सडा तरी नक्कीच दिसतील त्या पानाच्या वृद्ध शिरांमध्ये.
sundarach
कुठेतरी एखादी हास्याची लकेर, कुठे डोळ्यात ओघळलेला एखादा अश्रू, कुठे एखादा जमलेला मालकंस, एखादा विश्वासघातकी ब्रूटस, कधी एवढं एवढंसं झालेलं मन, हे सगळे हायलाईटस आहेत माझ्या आयुष्याचे
vaaa
sahich!!
somehow, i felt this is being written by someone else.
mhanje, tujhya aadhichya saglya posts - i think they talked about events in your life.
pan hya veles, tu tujhya manaat-la lihit aahes, mhanun kadaachit vegla vaatat asel malaa.
jey lihila aahe, tey apratim tar aahech - tyaat vaad naahi.
"surreal, but nice"
(ref: Notting Hill)
आधीच्या सगळ्या प्रतिक्रियांपेक्षा आणि तुझ्या नेहमीच्या स्टाइलपेक्षाही किती वेगळं. किती ओरिजिनल आणि प्रामाणिक! धन्यवाद. :)
संवादिनी, लिहिलं गं.
शप्पत..........मस्त
एकदम कविता वगैरे ?
पिंपळाचं विटलेलं, जराजर्जर पिंपळपान. हिरवेपणा हरवला. अश्या या पानावर पेंटीग किती सुरेख होते माहीती आहे ना
@ स्नेहा, जास्वंदी, संवेद, प्रिया - मनापासून थँक्स.
@ केतन - हा तुम्हा सर्वांच्या लिहिण्याचा माझ्यावर होत असलेला परिणाम आहे. मी जसं लिहिते तसं लिहिणं खूप सोपं आहे, पण तुम्ही सगळेजण जसे मनातले विचार लिहिता, तसं लिहिणं कठीण आहे. ह्या खोखो मुळे अशी संधी मिळाली. विषयच असा होता की मनातलं लिहिणं भाग होतं. मग एक प्रयत्न केला. पण माझ्या ह्या लिखाणावर, नाटक ह्या माध्यमाचा खूप मोठ इंपॅक्ट आहे असं मलाच वाटतं.
@ मेघना - ओरिजिनल आणि प्रामाणिक प्रयत्न वाटला हेच खूप आहे माझ्यासाठी.
@ यशोधरा - मला अगदी लाजवलंस तू. माझा ब्लॉग वाचून तुला दडपण आलं काय? असं तू लिहिल्यामुळे माझ्यावर केवढं दडपण आलं? त्याचं काय?
@ हरेकृष्णाजी - हं. कवितेचा प्रयत्न केला. शाळेत असताना बक्षिसं मिळायची माझ्या कवितांना. पण मध्ये कुठेतरी कवितेची नाळ तुटली. लिहायला सुरवात केली आणि कविताच डोक्यात आली. मग लिहिली.
Post a Comment