गिरगावांतलं एक मॅटर्निटी होम. लेबरमध्ये गेलेली एक आई. दरवाज्याबाहेर अधीरतेने फेऱ्या मारणारा एक बाबा. बराच वेळ लागलेला. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न चाललेले. डॉक्टरांनी दिलेली तारीख देऊन सतरा दिवस झालेले. संध्याकाळची वेळ. बाबाच्या चेहऱ्याला चिंतेचं ग्रहण लागलेलं. आईच्या वेदनांची काळजी तर होतीच, पण नवीन येणाऱ्या जीवाचीही तितकीच काळजी होती.
बाहेर एक वेगळीच संध्याकाळ रंगात येत होती. कसलातरी उत्सव. लोकं भेटत होते, आनंद साजरा करीत होते. त्यांना चिंता होती वेगळीच घटका भरण्याची.
त्या आईची शर्थ चालली होती. चेहरा घामाने भिजून गेलेला. स्वतःची तिला पर्वा नव्हती, स्वतःच्या बाळाची मात्र होती. ह्या त्रासातून सुटका तर हवी होती, पण पराभवाचा विचारही तिच्या मनाला शिवत नव्हता. अचानक आजूबाजूचं विश्व गरगरा फिरायला लागलं, त्या आईने पराकाष्ठा केली. आता बाळाच्या रडण्याचा मंजूळ आवाज ऐकायला येणार होता. काहीच ऐकू आलं नाही. पुन्हा तिने प्रयत्न केला. शांतता. हळूच मान वर करून ती बघायचा प्रयत्न करीत होती पण काहीच दिसलं नाही. डॉक्टर हळूच तिच्या कानात म्हणाले, मुलगी आहे, पण रडत नाही. आम्ही प्रयत्न करतोय.
मिनिटभर तिथं सन्नाटा पसरला. एक क्षण शांततेचा सरला आणि बाळाने भोकांड पसरलं.
.........
एक आजी खूप आजारी होती. खूप म्हणजे खूप. तिच्या नातीला ती वेगळीच वाटायची आजारी पडल्यापासून. तिचे लाड करणारी, तिचं हवं नको बघणारी, तिच्या केसांना तेल लावून मस्त दोन चंपू वेण्या बांधणारी आजी खरी की गालफडं आत गेलेली, बिछान्यावरून उठूही न शकणारी, नातीला कधी मधी न ओळखणारी, आल्या गेल्याकडे रडून मरणासाठी भेकणारी ही आजी खरी.
कालच डॉक्टर येऊन गेलेले. नात खूप लहान होती. तिला कुणी काही सांगितलं नाही. तिनं आपल्या बाबाला विचारलं. बाबाच्या एका डोळ्यात चमकलेला एक अश्रू तिने पाहिला. पण बाबावर तिचा विश्वास होता. तो तिला म्हणाला, लवकरच आजी ह्या त्रासातून सुटेल. नातीला खूप आनंद झाला. पुन्हा आपली जुनी आजी आपल्याला मिळणार म्हणून ती खूश झाली. तिने आपल्या सगळ्या मैत्रिणींना पण सांगितलं.
आज सकाळापासूनच आजी तिच्याशी छान बोलत होती. डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम झाला असणार, नातीला वाटलं. तीपण मजेत आजीशी बोलत होती. दुपारी आजीने नातीला बोलावलं आणि पाणी मागितलं. नातीने आनंदाने आजीला पाणी आणून दिलं. समाधानाने आजी ते पाणी प्यायली. नातीला तिने जवळ बसवून घेतलं. थोडा वेळाने आजीला उचक्या यायला लागल्या, आजीची नजर छताकडे लागलेली. नातीने आजीला विचारलं की आजी अजून पाणी देऊ का? आजी काही बोललीच नाही, पण तिच्या उचक्या थांबल्या.
दुसरा क्षण शांततेचा गेला.
नात आजीचा हात घेऊन तशीच बसून राहिली. तितक्यात तिथे नातीचा बाबा आला. त्याच्या डोळ्यातलं पाणी तिला स्पष्ट दिसलं. त्याने तिचा हात सोडवला आणि तो तिला तिच्या लाडक्या काकूंकडे घेऊन गेला. मागाहून तिला कळलं की आजी देवाघरी गेली. पण तो आजीचा हात धरून घालवलेला एक शांत क्षण मात्र तिच्या डोक्यात कायमचा राहिला.
................
एक मुलगी, शांततेच्या मंदिरात बसलेली. सत्तावीस संगमरवरी पाकळ्यानी बनलेलं ते एक कमळ होतं. आणि त्या कमळाच्या पोटात ठासून भरली होती अशक्य शांतता. आवाज येत होते ते श्वासांचे, स्वतःच्या. डोळे मिटून ती बसली होती. सगळं लक्ष स्वतःच्या श्वासांवर एकवटलं होतं.
तिला अनुभवायची होती शांतता जी त्या कमळाबाहेर कुठेच नव्हती. बाहेर होतं एक अक्राळ विक्राळ जग, अशांत, सतत कशाच्यातरी पाठी पळणारं. धावतं, स्वतः धावणारं आणि तिलाही धावडवणारं. क्षणभर शांतता तिच्यात पाझरतेय की काय तिला वाटलं.
शांततेचा तिसरा क्षण.
पण शांततेच्या चौथ्याच क्षणी तिला असेच काही शांततेचे क्षण आठवले, आजीचा थंडगार हात आठवला, आईच्या बाबाच्या तोंडून अगणित वेळा ऐकलेली तिच्या न रडण्याची गोष्ट आठवली.
पुढचे शांततेचे क्षण मोजण्याचं भानही तिला राहिलं नाही.
- संवादिनी
6 comments:
अप्रतीम
sahi
Tumhi phrach chan lihita
Mast lihila ahes.
How sad
शांतीच्या मंदिरात जाऊन आयुष्यातले अशांत क्षण आठवणे उचित वाटत नाही. ज्यामुळे मन सैरभैर होतं, जिथे चित्तात स्मृतिची वादळ उठतात अशा क्षणांचा त्याग करण्यासाठीच बहाई मंदिरासारख्या स्थळांचा उपयोग आहे.
असो. छान शब्दबद्ध केलायंस अनुभव.
आदीनीं लिहीलेले कॉमेंट्स अप्रतिम व चपखल आहे
Post a Comment